एका दुर्मीळ पण बहुमोल पुस्तकाबद्दल थोडेसे ...

Submitted by दामोदरसुत on 12 October, 2011 - 08:53

सुमारे २० वर्षांपूर्वी सावरकर दर्शन प्रतिष्ठानने काढलेल्या स्मरणिकेत श्री मुकुन्द सोनपाटकी यांचा ’कुछ याद उन्हे भी कर लो’ या शीर्षकाचा एक अतिशय मौलिक माहिति देणारा लेख वाचला होता. तसेच कोठेतरी त्यांच्या ’दर्यापार’ या पुस्तकाचा उल्लेख वाचला होता. पण ते पुस्तक कोठेही विकत मिळू शकले नाही पण माझे मित्र श्री. गुणे यांचेशी बोलतांना हे पुस्तक त्यांच्याजवळ असल्याचे समजले आणि अनपेक्षितपणे हाती आले. दर्यापार - लेखक - मुकुन्द सोनपाटकी, पुरंदरे प्रकाशन, पुणे, सन १९८०. काळाच्या ओघात दुर्मीळ झालेल्या या १२० पानांच्या छोटयाशा पुस्तिकेतील माहिती मात्र खूप मोलाची आहे आणि ती त्यांनी इंग्लंडमधील वास्तव्यात अतिशय परिश्रम घेऊन जमा केली आहे.
९ जून १९०६ ला सावरकरांनी मातृभूमीचा निरोप घेतला. इंग्लंडला प्रयाण केल्यापासून त्यांनी पुढील चार वर्षात इंग्लंडमध्ये राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी जिवाचे अक्षरशः रान केले.
त्यांच्या तेथील कार्याविषयी सोनपाटकींनी केलेल्या संशोधनातून मिळालेल्या माहितीच्या खजिन्याचा महत्वाचा भाग या पुस्तकात समाविष्ट आहे. लेखकाने सर्वत्र साधार विवेचन केलेले आहे. वाचकांनी आवर्जून शोध घ्यावा व हे पुस्तक जरूर वाचावे. अशा या पुस्तकात वाचलेली महत्वाची माहिति येथे अशासाठी देतो आहे की ज्या कोणाकडे हे पुस्तक असेल त्याला त्याचे खरे मोल कळावे आणि त्याने ते काळजीपुर्वक सांभाळावे. ते रद्दीत घालू नये.
(१) इंडिया ऑफिस लायब्ररी- भारताशी संबंधित सर्व कागदपत्रे येथे साठवली आहेत. त्यात दोन फायली Public & Judicial (secrets) या अंतर्गत ७५ वर्षांच्या निर्बंधांखाली ठेवल्या आहेत. त्यातून दरवर्षी ज्या कागदपत्रांना ७५ वर्षे पूर्ण होतात ती अभ्यासकांना उपलब्ध होत जातात. त्यातून त्याकाळी अत्यंत गुप्त ठेवलेल्या व बाहेरच्या जगाला अज्ञात अशा गोष्टी उघडकीस येत आहेत. त्यामुळे ब्रिटिश सरकार सावरकरांच्या लहान वयातील उद्योगांपासून त्यांच्यावर कसे लक्ष ठेऊन होते हे लक्षात येते. ब्रिटिशांचा मुत्सद्दीपणा व दक्ष कारभारही त्यात दिसून येतो. त्यातूनही सावरकरांनी चाणाक्षपणे मार्ग काढून जे प्रचण्ड काम केले ते आश्चर्यचकित करणारे आहे. माहितीचा असाच प्रचंड खजिना ब्रिटीश म्युझियमच्या ग्रंथालयातही पसरला आहे. तेथे संशोधकांना विनामूल्य प्रवेश आहे.
(२)बोटीवर पाऊल ठेवल्यापासून जो जो संपर्कात येईल त्याला त्याला सावरकरांनी मायभूमीच्या स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी कसे करून घेतले त्या प्रयत्नांची कहाणी पुराव्यानिशी मांडलेली आढळते.
त्याच काळात नेहरूही शिक्षण घेत होते. इंग्लंडमधील जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांनी मिळून सावरकरांच्या प्रभावाखाली कमी अधिक प्रमाणात ब्रिटीश सत्तेला इंग्लंडमध्ये व भारतातही अस्वस्थ केलेले असतांना, ते मात्र या चार वर्षातील स्वातंत्र्यचळवळीपासून १००% दूर राहिले. त्यांनी स्वतंत्रपणेही काही केल्याचेही वाचनात आलेले नाही.
(३)सावरकर बॅरिस्टर झाले तरी त्यांना सनद दिली जाऊ नये यासाठी ब्रिटीश सरकारनेच कॉलेजवर दडपण कसे आणले याचीही सर्व कथा यात आहे.
(४)सावरकरांचे वास्तव्य असलेल्या इंडिया हाऊसवर आतून-बाहेरून गुप्तचरांची सतत असलेली नजर, आणि तरीही सावरकरांनी तेथे केलेल्या अदभुत कार्याची पुराव्यासह माहिती दिली आहे.
(५)सावरकरांच्या प्रभावळीतील मदनलाल धिन्ग्रा [ याच्याविषयीची माहिती तर हृदय हेलावून टाकणारी आहे. सर्व देशभक्तांनी त्याही परिस्थितीत त्याची बाजू घेतली, त्याचा गौरव केला; पण त्याच्या घरच्यांनी मात्र (नाईलाजाने असेल कदाचित!) त्याचा जाहीरपणे धिःकार केला.] , श्यामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा वगैरे प्रसिद्ध क्रांतिकारकांबरोबरच, इंडिया हाऊसमधील चतुर्भुज अमीन हा आचारी, हरिश्चंद्र कोरेगावकर, चंजेरी रामराव आणि आणखी आपल्याला माहीत नसलेल्या कितितरी लोकांनी सावरकरांच्या कार्यात घेतलेल्या लहान मोठ्या सहभागाची माहिती दिलेली आहे.
(६)एच एम हिंडमन, डेव्हिड गार्नेट व गाय आल्ड्रेड हे तीन ब्रिटिश नेते क्रांतिकारकांची उघडपणे बाजू घेत. गाय अल्ड्रेड याने तर भारतीय स्वातंत्र्याकरिता १ वर्षाचा तुरुंगवास भोगला. सावरकरांना अटक झाल्यावर त्याने त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. सावरकरांनी मांडलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या तत्वज्ञानाचा तो पूर्ण समर्थन करायचा. त्यांच्या कार्याचीही माहिती यात मिळते.
(७) ८ जुलै १९१० या दिवशी सावरकरांनी मार्से बंदरात मोरीया बोटीतून उडी मारून सुटण्याचा जो प्रयत्न केला त्याचा खूप तपशील दिला आहे. तसेच ब्रिटिश भारताला कसे लुटत असत त्याचेही दाखले मधून अधून दिले आहेत.
(८)मुख्य म्हणजे मुळचे त्याकाळातील अनेक दुर्मीळ फोटो या पुस्तकात पहायला मिळतात. उदा.-
सावरकरांना अटक झाल्यानंतरचा खुर्चीत बसलेले असतांनाचा सुटाबुटातील पूर्ण फोटो
गुरुगोविंदसिंह यांचा जन्मोत्सव कॅक्स्टन हॉलमध्ये साजरा केला त्याचा व त्या समारंभाच्या आमंत्रण पत्रिकेचा फोटो ( जीवर सावरकरांनी हाताने लिहिलेला कांही मजकूरही आहे)
कॅक्स्टन हॉल, मदनलाल धिंग्रांना फाशी दिले तो पेन्टोन्व्हील तुरुंग, सावरकरांना अटकेत ठेवले होते तो ब्रिक्स्टन तुरुंग, इंडिया ऑफिस लायब्ररी, इंडिया हाऊस, मोरीया बोट, बोटीचा नकाशा व त्यावर सावरकरांनी ज्या पोर्टहोलमधून उडी मारली ती जागा आणि आणखीही कांही फोटो त्यात आहेत.
मुकुन्द सोनपाटकी यांची त्रोटक माहिती मिळाली ती अशी :- व्यवसाय आर्किटेक्टचा. सावरकर-अभ्यासक. बरीच वर्षे इंग्लंडमध्ये वास्तव्य. पण नंतर तळेगाव-दाभाडे जवळ वास्तव्य. १० मार्च १९९९ रोजी सात सशस्त्र दरवडेखोरांनी घरावर केलेल्या हल्ल्यात प्रतिकार करतांना वयाच्या ५९ व्या वर्षी अकाली मृत्यु. ’तमसा तटाकी’ हे त्यांचे आणखी एक पुस्तक त्यांच्या नावावर आढळले.
इंग्लंडमध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यासंबंधित माहितीचा जो प्रचंड खजिना आहे तो शोधण्याचे काम सध्या ब्रिटनमधील श्री. श्रीधर दामले आणि अनुरुपा सिनार करीत आहेत. श्रीधर दामले 'Savarkar in foreign media', 'La affaire Savarkar', 'Indian Sociologist', and 'Gallic American' अशी चार पुस्तके लिहिणार आहेत, तर अनुरुपा सिनार ’Burning Soul' हे पुस्तक सावरकरांवर लिहिणार आहेत.
सूर्याचे तेज असलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्व त्यांच्या तेजस्वी विचारांमुळे नव्या पिढीतील तरुणांनाही आज ना उद्या स्तिमित केल्याशिवाय राहाणार नाही. हे तेजस्वी विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे.

गुलमोहर: 

नव्या हुरुपाने लेखन सुरू केल्याबद्दल मी दामोदरसुत यांचे अभिनंदन करतो. श्री.सोनपाटकी यांच्या कार्याविषयी यापूर्वीही अन्यत्र वाचले होतेच आणि ज्या व्यक्तिमत्वाविषयी त्यानी जे अथक संशोधन केले आहे त्या व्यक्तीचे नाव जरी उच्चारले तरी गंगास्नानाचा अनुभव येतो.

इतक्या चांगल्या लेखाचा शेवट मात्र तुम्ही 'तसा' करायला नको होता असे मला प्रामाणिकपणे वाटते. ज्या सावरकरांविषयी तुमच्यामाझ्या मनी इतकी भक्ती दाटलेली असताना लिखाणात "कुणी कितीही उपेक्षा करो वा गरळ ओको," अशा निगेटिव्ह वाक्याचे कशासाठी प्रयोजन? यातून काहीही साध्य होत नाही. आपल्याला त्या सूर्याच्या तेजाची मोहनी भावते ना ? बस्स, मग कशाला जगातील अन्य त्याची उपेक्षा करतात का गरळ ओकतात याची चौकशी करावी ?

थोडक्यात लेख संपादित करता येत असेल तर शेवटच्या दोन ओळीतील ते वाक्य काढून टाकावे आणि निखळ वाचनाचा आनंद इथल्या सदस्यांना तुम्ही द्यावा असेच मी म्हणेन.

अशोक पाटील

दामोदरसुत, चांगली माहिती दिली आहे.

त्या पुस्तकाचे प्रकाशनहक्क पाहून जर त्यातला काही भाग इथे प्रकाशित करता येऊ शकत असेल तर जरूर करा.

सूर्याचे तेज असलेले हे व्यक्तिमत्व नव्या पिढीतील तरुणांनाही आज ना उद्या स्तिमित केल्याशिवाय राहाणार नाही.
----- लेख आवडला, सुंदर लिहीले आहे. थोर क्रांतिकारक, महान कवि, द्रष्टा समाज-सुधारक प्रत्येक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अचंबीत करणारे आहे.

महत्त्वपुर्ण माहितीसाठी धन्यवाद.

आपल्याला त्या सूर्याच्या तेजाची मोहनी भावते ना ? बस्स. >> Happy एकदम पटले.

अशोकजी, मला जे पोहोचवायचे आहे त्याला बाधा येत नसल्याने मी आपल्या सुचनेनुसार संपादन केले आहे. या बहुमोल सुचनेबद्दल आपल्याला आणि इतर सर्व वाचकांना धन्यवाद!

<<<इंग्लंडमध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यासंबंधित माहितीचा जो प्रचंड खजिना आहे तो शोधण्याचे काम सध्या ब्रिटनमधील श्री. श्रीधर दामले आणि अनुरुपा सिनार करीत आहेत. श्रीधर दामले 'Savarkar in foreign media', 'La affaire Savarkar', 'Indian Sociologist', and 'Gallic American' अशी चार पुस्तके लिहिणार आहेत, तर अनुरुपा सिनार ’Burning Soul' हे पुस्तक सावरकरांवर लिहिणार आहेत.>>

अगदी योग्य माहिती दिलीत पण श्रीधर दामले हे प्रसिद्ध मधुमेह व ग्रंथीविकारतज्ञ डॉ.श्रीरंग गोडबोले ह्यांच्यामुळे हे संशोधन करीत आहे. डॉ.श्रीरंग गोडबोले हे डॉ. अरविंद गोडबोलेंचे सुपुत्र व अरविंदजी सावरकरांचे वैद्य होते. ह्या तिघांविषयीचा विवेकमधील लेख येथे वाचा.
http://evivek.com/29May%202011/lekh010.html

सावरकरांच्या मार्सेलिस उडीवरील नव्या संशोधनावर आधारीत Centenary of Savarkar's escape from ship S S Morea हे पुस्तक खालील दुव्यावर विलामूल्य उपलब्ध आहे.
http://www.savarkar.org/en/veer-savarkar

ह्या व्यक्तिंसोबत मला काम करण्याची संधी मिळत आहे हे मी माझे भाग्य समजतो.

व्वा ~ धन्यवाद शशि...

~ बघा, तुम्हीच नव्याने एका वाचकाच्या भूमिकेतून तुमचाच हा लेख वाचा, मग तुम्हालाही भावेल की मूळ विषयावरच आपले लक्ष केन्द्रीत केले की त्यातून उगम पावणारी भाषा किती आल्हाददायक होते. आलेले आणि येऊ घातलेले असे प्रसन्न प्रतिसाद तुम्हाला नक्की आनंद देत राहतील असा माझा विश्वास आहे.

स्वा.सावरकरांचे भाषाशुद्धीचे प्रयोग किती विस्मयकारक होते हे त्यांच्या लिखाणाचे वाचन करताना प्रकर्षाने जाणवते. आजही त्यातील काही शब्दांचा अर्थ शोधण्यासाठी मोल्सवर्थबाबाकडे जावे लागते यातच तात्यांच्या तेजस्वी बुद्धीचा सन्मान आहे.

खरेतर सावरकरांची बुद्धी, प्रतिभा, साहित्यरचना या गोष्टी देखील अफाट होत्या. त्यांची बरीच बुद्धी स्वातंत्र्यसंग्रामामधे खर्ची पडली. तसे न होता ते जर स्वतंत्र भारतात जन्मते तर फार फार मोठे साहित्यिक म्हणुन प्रसिद्ध पावले असते.
आणखी एक विचार म्हणजे भारता ऐवजी जर दुसर्‍या कोणत्या देशात जन्म घेऊन एवढे भरीव कार्य करते तर आत्ता जेवढी प्रसिद्धी, वाहवा होत आहे त्याच्या कित्त्येक पटीने जास्त प्रसिद्धी मिळाली असती आणि त्या देशाने त्यांना अगदी डोक्यावर घेतले असते. त्यांचे दुर्दैव असे की आपल्याकडच्या राजकारणामुळे या सर्व गोष्टींना जरा ग्रहण लागले आहे.

त्या इ-विवेक वर दिलेल्या लेखातील खालील परिच्छेद वाचून नरेंद्र मोदींविषयी आदर वाढला. Happy
अक्षय जोग, धन्यवाद.

<<
पण त्यावेळी सावरकरांपेक्षा जास्त लक्ष श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यावर होते. लंडनहून बि"टीशांच्या त्रासाला कंटाळून श्यामजी 1908 साली पॅरिसला गेले. बि"टीशांच्या दबावामुळे त्यांना 1914 साली पॅरिस सोडावे लागले आणि ते जिनिव्हाला 1914 सालापासून 1930 पर्यंत होते. कुठल्याही सोयी, सुविधा नसतानाही आपली प्रचंड मालमत्ता सोडून ते आपल्या बायकोबरोबर एकटेच राहिले. कारण एकच इच्छा मनात होती की, आपला देश स्वतंत्र व्हावा. अनेक निराशेचे प्रसंग आले असताना तिथल्या बॅंकेशी करार करून सांगितले की, आम्हाला भारतात जाऊन मरता येत नाही, आमच्या अस्थी तिथे विसर्जित होणार नाहीत. त्यामुळे कमीत कमी आमच्या अस्थी तुम्ही 100 वर्षे तुमच्याजवळ ठेवा आणि जेव्हा आमचा देश स्वतंत्र होईल तेव्हा आमची माणसे येऊन त्या भारतात नेतील, अशी त्यांची आशा होती. देश स्वतंत्र झाला पण दुर्दैवाने कोणीच त्या अस्थी भारतात आणल्या नाहीत. पण किरीट सोमय्यांनी हा मुद्दा मांडला आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केले.
>>

दामोदरसुत, अक्षयजी आणि फचिन तुम्हा सगळ्यांचेच आभार !
खुप चांगली आणि महत्वपुर्ण माहिती.
अक्षयजी, तुम्ही दिलेल्या दुव्यावरुन पुस्तक डालो करुन घेतो, पुन्हा एकदा आभार Happy

Centenary of Savarkar's escape from ship S S Morea हे पुस्तक >> लिंक साठी धन्यवाद अक्षय.

फचिन, धन्यवाद Happy

श्री शिवरायांची आरती

जयदेव जयदेव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्यां ताराया // ध्रु //

आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सददिता भूमाता दे तुज हांकेला
करुणारव भेदुनि तव ह्रद्य न कां गेला // १ //

श्रीजगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेच्छांही छळतां
तुजविण शिवराया तिज कोण तुजा त्राता? // २ //

त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो
परवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालों
साधु परित्राणाया दुष्क्रुति नाशाया
भगवन भगवतगीता सार्थ कराया या // ३ //

ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला
करुणोक्तें स्वर्गी श्रीशिवनॄप गहिंवरला
देशास्तव शिवनेरी घेई जन्माला
देशास्तव रायगडीं ठेवी देहाला
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला ततश्रीमत्शिवनॄप की जय बोला // ४ //

जयदेव जयदेव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्यां ताराया //