कानबाई- खान्देशातील एक प्रथा!

Submitted by मी_आर्या on 3 October, 2011 - 02:08

श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.

या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.

'कानबाई परनुन आणणे'- पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही...अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक ..नदीवरुन पाणी आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जायचा. आता चाळीसगावजवळ उमरखेडला म्हणे कानबाईचं मंदीर बांधलय. ज्यांना नविनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेउन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात.

तर असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, वै. बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात. आणि केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची स्थापना होते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र वै. चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/ नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो.
Photo0731.JPG
काहींकडे हातापायाची कानबाई असते तरकाहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात.
Photo0736.jpg

दुसर्या सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही.

Photo0764.jpg

नदीवर पुन्हा एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात. पुरणाचे दिवे मग मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दुध, तुप घालुन ह्या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा नि पुरणपोळ्या वगैरे देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं काश्याच्या त्या एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणुन फक्त घरातलेच लोक खातात. अगदी लग्न झालेल्या मुलीला सुद्धा हा प्रसाद वर्ज्य असतो.

दुसर्‍या दिवशी नि तिसर्‍या दिवशी पण रोटांचंच जेवण असतं. रोट ( म्हणजे सवा- सवा मुठ गहु घेउन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं.रोट संपेपर्यंत जेउन हात धुतलेलं पाणी नि उष्ट्या ताटातील पाणीसुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडु देत नाहीत. पौर्णीमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात.
कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे.

परवाच कानबाईचे एक गाणे ऐकले. ते जसेच्या तसे इथे देत आहे.

डोंगरले पडी गई वाट,
वाट मन्ही कानबाईले|

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
साडी चोळीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ....

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
पुजा पत्रीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
फुलेस्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ...

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
रोटास्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...

कसाना लऊ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
तोरणना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई....

गुलमोहर: 

.

आर्या, मस्तच माहिती आहे ही. मला अज्जिबात माहिती नव्हती या सणाची.

ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही...अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. >>>> खुप अवघड असेल हे. Happy आणि कारण काय असेल बरं? हल्ली ठिक आहे, बर्‍याच जणांकडे स्वयंपाकाच्या मावशी असतात, पण पुर्वी सगळी कामं घरातच करताना न कापणं आणि न भाजणं...... लयीच डिफिकल्ट असणार हे.

छान

आर्या मस्तच . मना माहेर ले कानबाइ बसस तवय दहि भात ना ( मोगरा) जेवन राह्स आनि पावना पै साठे पुरण पोळि न जेवन राह्स.

धन्यवाद दिनेशदा, शोमु,नीधप, अनु, वत्सला, जिप्सी, कविता, स्वाती, सारीका, बुडबुडा नि मनिमाऊ!

<<लयीच डिफिकल्ट असणार हे.<<अगदी अगदी मनिमाऊ! आणि नीरजा म्हणते तसं म्हणुनच त्यांचं महत्त्व जास्त. मला अजुन एक कौतुक वाटलं ते हे की 'त्या'वेळेस ह्या गावजेवणाचा स्वयंपाक इ. इतकच काय तर नदीवरुन पाणी आणणे, जळणासाठी लाकुड आणणे ही सर्व कामे पुरुषमंडळी उत्साहाने करत. स्त्रीयांना त्या दिवशी 'देवी'चा मान असे. Happy

मस्त माहिती आर्या, आमच्याकडेपण कानबाई असते. मी प्रत्येक वेळेस त्यासाठी घरी जातो. रविवार असल्याने सुट्टीचाही काही प्रश्न येत नाही. खूप छान माहिती.

अरे वा... खूप छान वाटलं कानबाईवरचा लेख इथे पाहून. Happy

आईकडे कानबाई नेहेमी बसते. दरवर्षी पुरणपोळी, कटाची आमटी, लाल भोपळ्याची(डांगराची) भाजी, पापड, भजे आणि अजून काय काय असा साग्रसंगीत प्रसाद असतो तेव्हा. कानबाईचा मुखवटा तयार करणं पण कलेचं काम असतं. मुखवट्यासाठीची हळद एकदम पर्फेक्ट भिजली पाहिजे. जास्त फुगली पण नाही पाहिजे. दुसर्‍या दिवसापर्यंत तडा जाणार नाही इतकीच ओली लागते. आम्ही काळ्या उडदाच्या दाळीचे डोळे आणि कुंकू वापरून ओठ बनवतो. कानबाईचे वेगळे दागिने पण असतात.

आरास नुकतीच करून संपली आहे, तेव्हाचा हा फोटो:
kaanbaai.jpg

आमच्याकडंच्या कानबाईची सुरुवात झाल्यापासूनची एक मज्जा म्हणजे, प्रत्येकवर्षी त्याच दिवशी मुसळधार पाऊस होतोच होतो, आणि येणारा पाहुणा किमान १ तास उशिरा येतो. आणि काहीही करा, त्या रात्री लाईट जातातच जातात. आता तर युपीएससुद्धा बंद पडतो. किमान एका तासासाठी का होईना, पण तसा खोळंबा झाल्याशिवाय आम्हालाही चैन पडत नाही. Happy

दर्शनाला आलेल्या प्रत्येकाला आई प्रसादाचे जेवण देते (का ते देव जाणे, खरं तर तशी काही रीत नसते.) त्यामुळे चुलीपाशी पुरणपोळ्या करणार्‍या आम्हा सगळ्यांची कंबर पार मोडून निघते. पण घरभर पसरलेला तो पुजेचा-नैवेद्याचा वास, पावसाळी हवा, खोलीतला मेणबत्त्या-कंदिलाचा मंद प्रकाश, पुजेची ताटं घेऊन आलेली ओळखी-अनोळखी माणसं, त्यांच्या गडबडीत आपल्या घरच्या पाहुण्यांशी गप्पा-टप्पा, असा सगळा 'माहौल' तयार होतो.

मला लहानपणापासून काय आवडायचं ते म्हणजे कानबाईचं सर्व जातींतलं अस्तित्व! कानबाई सगळ्यांकडे बसते - कुठलाच भेदभाव करत नाही. जर तुमच्या घरी नसेल, तर त्या दिवशी तुम्ही कुठल्याही घरात जाऊन पुजू शकता. ओळख पाहिजेच असं पण नसतं. ऐन वेळी, न सांगता येणार्‍या सुवासनींनी आईला आवर्जून "बरं झालं बाई तुम्ही करता कानबाईचं... नाही तर मला संकटच पडलं होतं यावर्षीच्या पुजेचं.... निभावलं म्हणायचं. देवीच्या मनात असतं हो. ती करून घेते आपल्याकडून..." असं (बर्‍याचदा खांदेशी भाषा - अहिराणीमध्ये) म्हणणं, आईला किती समाधान देतं ते तिच्या चेहेर्‍याकडे पाहूनच कळतं. Happy शिवाय नंतरची ती कानबाईची गाणी, फुगड्या - धमाल असते अगदी!!!

जाता जाता, हा कानबाईवर आलेला मटातला एक लेखः
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6357833.cms

छान माहिती दिलीस आर्या आमच्या घरात रोट असतात पण काहीच माहिती नव्हती का, कशाला वगैरे. करायचं म्हणून करायला कधी तरी कंटाळा पण यायचा आता जरा तरी रिलेट करता येयील..
भारतात कधी बघून पण नव्हते.. इथे उसगावातच करते आहे..
चण्याची डाळ>> Happy अगदी अगदी..

दुसर्‍या दिवशी नि तिसर्‍या दिवशी पण रोटांचंच जेवण असतं. रोट ( म्हणजे सवा- सवा मुठ गहु घेउन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं.रोट संपेपर्यंत जेउन हात धुतलेलं पाणी नि उष्ट्या ताटातील पाणीसुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडु देत नाहीत. पौर्णीमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात.>> हे सासूबाई कडून बरेचदा ऐक्लय..त्यामुळे आता त्या म्हणतात त्या मानाने आपण काहीच करत नाही.. इथे तर तयार कणिक मिळते त्यातूनच थोडी बाजूला काढून करावं लागतं

मी आर्या, मस्त माहिती दिलीस. कित्ती * य वर्षे झाली हे सगळे अनुभवुन. तुला खूप धन्यवाद. लेख छान शिवाय फोटो पण मस्त.

सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद!! Happy
धारा...कानबाईला हळदीचा मुखवटा करतात ही माहिती माझ्यासाठीही नविन आहे. पण छान, आटोपशीर मांडलीये पुजा.

<<< कानबाई सगळ्यांकडे बसते - कुठलाच भेदभाव करत नाही. जर तुमच्या घरी नसेल, तर त्या दिवशी तुम्ही कुठल्याही घरात जाऊन पुजू शकता. ओळख पाहिजेच असं पण नसतं.<< अगदी अगदी...आणि त्यासाठी कुणाकडे आडकाठी नसते.

<<भारतात कधी बघून पण नव्हते.. इथे उसगावातच करते आहे..<<
प्रित्...धन्य आहे तुझी. तु 'कानबाई'ला साता समुद्रापार नेलस आणि उपलब्ध साधनसामुग्रीतुन तिची पुजा कशी करता याची मला उत्सुकता आहे. तुझ्याकडच्या कानबाईचा फोटो नक्की टाक.

प्रिन्सेस तुझेही आभार. अगं इथे पुण्यातही आम्ही मागच्या वर्षी घरी बसवली होती. पण विसर्जनाला मिरवुन वगैरे आणण्यापेक्षा घरच्या घरीच केलं!

रात्रीच्या जागराणाच्या वेळेस आमच्या घरी जळगावहुन 'भाट' लोक येतात. ते कानबाईची ची भजनं गाणी छान म्हणतात्...डफ वाजवुन. शिवाय आपल्या कुटुंबाचा पुर्ण इतिहास त्यांच्याजवळच्या चोपडीत असतो. मुळपुरुष कोण होता, मुळगाव कुठलं वै. सगळं ते सांगतात.तसेच आपल्याकडे त्यावर्षभरात जन्मलेल्या बालकांचे ही डिटेल्स नेतात. त्यांचा पिढ्यान पिढ्या हा व्यवसाय असतो.

आर्या

खुप छान.

बालपणी हे सर्व अनुभवलंय माझ्या आजोळी, चिंचोली ता यावल. खुप मज्जा यायची, आणि वेगवेगळे पदार्थ हादडायला मिळायचे ते वेगळेच.

कटाची आमटी - तोंडाला पाणी सुटते ऐकले की

Pages