कानबाई- खान्देशातील एक प्रथा!

Submitted by मी_आर्या on 3 October, 2011 - 02:08

श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.

या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.

'कानबाई परनुन आणणे'- पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही...अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक ..नदीवरुन पाणी आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जायचा. आता चाळीसगावजवळ उमरखेडला म्हणे कानबाईचं मंदीर बांधलय. ज्यांना नविनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेउन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात.

तर असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, वै. बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात. आणि केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची स्थापना होते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र वै. चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/ नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो.
Photo0731.JPG
काहींकडे हातापायाची कानबाई असते तरकाहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात.
Photo0736.jpg

दुसर्या सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही.

Photo0764.jpg

नदीवर पुन्हा एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात. पुरणाचे दिवे मग मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दुध, तुप घालुन ह्या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा नि पुरणपोळ्या वगैरे देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं काश्याच्या त्या एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणुन फक्त घरातलेच लोक खातात. अगदी लग्न झालेल्या मुलीला सुद्धा हा प्रसाद वर्ज्य असतो.

दुसर्‍या दिवशी नि तिसर्‍या दिवशी पण रोटांचंच जेवण असतं. रोट ( म्हणजे सवा- सवा मुठ गहु घेउन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं.रोट संपेपर्यंत जेउन हात धुतलेलं पाणी नि उष्ट्या ताटातील पाणीसुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडु देत नाहीत. पौर्णीमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात.
कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे.

परवाच कानबाईचे एक गाणे ऐकले. ते जसेच्या तसे इथे देत आहे.

डोंगरले पडी गई वाट,
वाट मन्ही कानबाईले|

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
साडी चोळीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ....

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
पुजा पत्रीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
फुलेस्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ...

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
रोटास्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...

कसाना लऊ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
तोरणना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई....

गुलमोहर: 

आमच्या घरी fakta रोट असतात .. त्यामुळे kanbaichi मूर्ती वगैरे बसवत नाही..त्यामुळे हि सगळी माहिती नवीन आहे माझ्यासाठी .. घरात नवरा, तीन मुलांचे प्रत्येकी 5 मुठ घेवून बाजुला करतात . ते देवजवल झाकुन ठेवतात. जसं लागेल तसं घेतात.. रविवारी पुरणाची poli, katachi आमटी, कणकेचे दिवे असतात.. ..sasu bai sangtat tyani swatah jatyawar pan dallay pith, चक्क्या आल्या तसं तिथे वेगळं दळून घ्यायचे.. तुला मुंजोबा बद्दल माहिती असेल तर ती हि प्लीज टाकणार का..mothya mulasathi karaycha आहे..

अजिबातच माहीत नव्हतं कानबाईबद्दल. छान ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद मी_आर्या Happy
धारा, तू ही मस्त लिहिलं आहेस आणि किती नेटकी आहे तुमची कानबाई. फार आवडली Happy

रोटाची कणीकः भाऊबंदांपैकी प्रत्येकासाठी काही माप ठरवुन करतात. १ मूठ, १ पावशेर, १ वाटी वगैरे. या गव्हाची पोळी फक्त भावकी खाते. लग्न होऊन गेलेल्या मुलींना वेगळ्या गव्हाची पोळी होते.
परणून आणणे: एक राणादेवीची मुंज / मौंज असा काही प्रकार असतो. त्यात पुजलेला नारळ कानबाई साठी वापरता येतो. बाकी दोन्ही प्रथा पण बरोबर आहेत.

१५ दिवसांपुर्वी भावाकडे कानबाई झाली.
Kanbai- 2013
नविन काही गाणी मिळालीत जुन्या बायकांकडुन. Happy इथे टाकल्याशिवाय रहावत नाही म्हणुन टाकतेय.

१) घरधनीनी मंडप सवारा, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय
गावना मारुतीनी शिवार रोखी, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय
गावना मारुतीले शेंदुर नारय, कथाईन जाशी...
गावना पाटीलने दरजा (दरवाजा) रोखा, कथाईन...
गावना पाटीलले पान सुपारी, कथाईन जाशी...
घरधनीनी मंडप संवारा, कथाईन जाशी...
घरधनीना जयजयकार, तठेच राहसु वं माय!

२) हाऊ काय सरावन महीना वं माय
पान वार्‍यानं उडेल वं माय
आईच्या दरबारी पडेल वं माय
आईने शेल्याने झाकीले वं माय
आईचा सासरा दशरथ वं माय, सासरा दशरथ
आईनी सासु केगामती (कैकयी) वं माय
आईना राम भरतार वं माय, राम भरतार

३) सुर्या निंघना, कानडी (कानबाई) उभ्या, दारावरी
तापी गोमीना(गोमती नदी) मेळ देव चांग्यावरी
सुर्या निंघना...
डोकी तांबन्या घागरी भेट गंगेवरी

४) कानबाई सांगे रानबाईने
थारा कोठे लेशी वं माय
थारा लेसु वारा लेसु
... भाईना घर वं माय
... भाईनं सुर्यामुखी दार
याने बसनं ठाकं दारी वं माय
ठाकं दारी याने मंडप दिला भारी वं माय

५) सहा महिन्याची रात्र गेली, गेले होते कुठे गं
वाणियाच्या दुकानी मी बसलो होतो तिथे गं
नारळाच्या गोणी मी तो खरेदी केल्या दोन्ही गं
सहा महिन्याची रात्र...
वाणियाच्या दुकानी मी...
खारकाच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं
सहा महिन्याची रात्र गेली...
वाणीयाच्या दुकानी मी.....
लिंबोळ्याच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं

छान माहिती!!
हा सण मला माहितीच नव्हता.

ही गाणी कधी म्हणतात? आरतीच्या वेळी की मंगळागौरीसारखे काही खेळ खेळताना?

गमभन... ही गाणी असच कानबाईसमोर बसुन आया-बाया म्हणतात. ताट वाजवत, सुप वाजवत कानबाईसमोर नाचतात.

वरच्या फोटोत केळीच्या खांबाला कण्हेरीच्या फांद्या बांधलेल्या दिसत आहेत. कण्हेरीच्या झाडाचं खान्देशात फार महत्व आहे. कण्हेर हीच कानबाई आहे असेही मानणारे लोक दिसतात.

http://www.youtube.com/watch?v=1o0s_LnEbIs
इथे घट्याची (जात्याची पुजा), प्रत्येकाची एक एक मुठ धान्य घेणे, धान्याची रास पुजा, पुरुषांनी जात्यावर दळण काढणं आणी मांडे करुन ते रोट कानबाईला नैवेद्य दाखवणे असे विधी दिसतील.
http://www.youtube.com/watch?v=6ZfOxe8bcM8
इथे कानबाईला नदीवर विसर्जनाला नेतांनाचा व्हिडीयो आहे.

या प्रदेशावर खानाचं राज्य होतं. गावोगावी असलेल्या भाऊबंदाना या निमित्ताने एकत्र आणणे हाच खरा उद्देश असावा, या सणामागे.

वा खूप सुंदर लेख आणि फोटो. ह्या सणाबद्दल काहीच माहिती नव्हती, तुमच्यामुळे मिळाली.
धन्यवाद आर्या.

व्वा आर्या, खुप छान लेख. सगळी माहिती नविनच आहे.. फोटो पण खुप सुरेख. परत परत बघावेसे वाटतात.
देवीचे कोणतेही रुप लोभसच वाटते, नाही...:)

मस्त आर्या. धन्यवाद लिंक दिल्याबद्दल. फोटो पहायला आणि वर्ण्न वाचताना मजा आली. नवीनच आहे माझ्यासाठी हे.

वा, खुपच छान वर्णन आणि मोलाचे प्रतिसाद. असा काही उत्सव असतो हेही माहिती नव्हतं. थँक्स आर्या.. फोटोज, गाणी, माहिती सगळंच छान लिहिलंय.

Pages