बाकी ठीकेकर

Submitted by स्वातीपित्रे on 1 October, 2011 - 02:23

# १ #

येह जमीन ही आसमान, येह जमीन ही आसमान, हमारा कल हमारा आज, बुलंद भारत कि बुलंद तस्वीर, हमारा बजाज..

आणि त्या हमारा बजाज वर नेहेमीप्रमाणेच आरूढ झालेले आमचे बाबा..कुठेही कोणालाही कुठेही सोडायला तयार..कित्येक वर्ष..उलट नको म्हंटलं तरच चिडून बसणारे..जसे होते तसेच आठवतात बाबा आम्हाला सगळ्यांना..गमतीने आम्ही त्यांना त्यागराज giveupkar म्हणायचो..त्यागमूर्ती त्यांची सदैव हजार तुम्हा आम्हा सर्वांसाठी. तुम्ही तर आमचा सर्वांचाच त्याग करून अचानक निघून गेलात...गेलात ते गेलात आणि शिवाय न काही mobile फोन, न काही नाव पत्ता, सर्वांना झोकुन मदत करायला आवडते पण आम्हाला कुठलीच कसलीच मदत करायची संधी न देता , तुम्हाला थांबवायची संधी न देता गेलात.. तुमच्या चिडक्या स्वभावानुसार तुम्ही पूर्वी सुधा कित्येक वेळा घर सोडून जातो म्हणायचात आणि लहान मुलांसारखे चक्कर मारून पुन्हा लगेच परत यायचात..आणि राग म्हणायचा तर कुठल्या कुठे..मला वाटले तसेच याल आपले..

बाबा, तुमच्यासारख्या स्वच्छंदी कलाकार माणसाला ओळख्नेच कठीण...कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही..देणार्याचे हात हजार म्हणतात ना.तसेच..अखंड पैलू सतत दर्शवत राहणारा calidoscope च तुम्ही.. आपल्या वर्षानुवर्षांच्या आठवणीतून तुमच्याबद्दल लिहिताना सुरुवात कुठून करायची हेच समजत नाही..आज मी मोकळ्या आकाशाकडे बघते तर मला तुम्ही दिलेले रंग दिसतात..तुम्हाला जसे नसलेल्या गोष्टींमध्ये काल्पनिक चित्र आधी दिसायचे..जे तुम्ही रंगवयचात ते दिसते..तुम्ही एक हात फिरावलात कि घर पण कसे चकाचक आणि सुबक दिसायचे..मग ते अगदी शंभर स्क़्वेर फूट का होईना..

अगदी आत्ताआत्ताचीच गम्मत आठवते...सिमिमावशी आली होती, आपल्या घरात म्हणजे आईकडे नेहेमीप्रमाणे केबल युद्ध चालू होते..रिमोट कंट्रोल कोणाकडे असणार ह्यावरून..सस्मित संथपणे चहापान करत होता आणि रिमोट हस्तगत त्यानेच त्यावेळी केला होता..त्यात आपले काहीतरी बोलणे उर्फ वाद चालू होता ..आणि मला हसू आले ..मला हसताना बघून मावशी हसली..तुम्ही अजून चिडलात ...त्यात वातावरण शांत करावे म्हणून सस्मित ने channel बदलले..आणि गाणे लागले ते नेमके..”हो जा रंगीला रे” ज्यात उर्मिला बेधुंद पणे नाचत होती..तुम्ही अजून चिडलात...आम्ही अजून हसलो..तुम्हाला नाही..पण त्या प्रसंगातल्या विरोधाभासाला..असो..तुमची माफी मागायची राहिली ..कि आम्ही तुम्हाला नाही हसलो पण संताप, हास्य, विनोद, विरोधाभास, माणसे भांडताना कसा गोंधळ वाढत जाऊ शकतो..आणि त्याचे परिणाम..आणि त्यात सगळ्यात शेवटची ती उर्मिला..जिने आगीत तेल कसे ओतले ..ह्याला हसलो..

तुमची फत्तेसिंग म्हणून मावशीने ओळखलेली ओळख तेवढीच महत्वाची..कुठलेही काम कसेही करून फत्ते करणे, आत्ता करणे आणि त्याचा फज्जा उडवणे हे तुम्हाला लीलया जमायचे...आता माझ्याकडे तुम्ही केलेला कार की चा फिक्स आहे..पण तुम्ही नाही. आता तुम्ही म्हणाल, ही मी गेल्यावर आत्ताच कशी लिहित्ये, आधी का लिहिले नाही, तर असे आहे कि येह साली जिंदगी ही ऐसी है..मी खरे तर नुसतेच लिहायला घेतले आहे, जसे विचार मनात येतील तसे, ते तुमच्यावरच आहेत असेही नाही, असेच आपले पूर्वीचे आत्ताचे, नवे जुने पुढचे मागचे. खूप गोष्टींवरचे मळभ एकदम काढून तर टाकता येत नाही ना, पण कुठेतरी सुरुवात तर होते.

#२#

तुमची आमची पिढीच वेगळी, अर्थात असणारच. पण तरीही.. त्या दिवशी तुम्ही मला खास विश्वासात घेऊन सांगितलंत, कि तुम्ही रिस्क घेऊन आईला न सांगता काहीतरी गोष्ट केलीत, आणि मी म्हणजे आजच्या कॉर्पोरेट’ जगातल्या विचारांच्या धर्तीवर विचार केला, कि काही investment रिस्क घेतलीत का काही करिअर मध्ये रिस्क घेतलीत..किती लिमिटेड विचार माझे..तुमची रिस्क मात्र सॉंलिड होती, आईला न विचारता एखादी गोष्ट करण्याची, मला तर गम्मतच वाटली होती तेंव्हा..इतकी साधी आणि सरळ आणि घाबरट ‘रिस्क’ असू शकते?? मी तुम्हाला घाबरट म्हणत नाहीये तर त्या गंमतशीर रिस्क ला ..एवढे लक्षात ठेवा 

कधीकधी वाटता कि तुम्हाला मी थोडीशी आवडत नसेन, म्हणजे तसे शब्दशः नाही पण एक माझे, आमच्यासारख्या लोकांचे खटकत असेल, कि फार विचार विमर्ष करतात, साधे सरळ बोलत नाहीत, जगत नाहीत, उगाच लिहिलेले वाचलेले काढतात. म्हणजे थोडक्यात अघळ पघळ नाहीत, तुमच्यासारखे. पण आता मी तरी काय करू, आहे हे असे आहे.

आता कलाकार म्हंटले कि मनमौजीपणा आलाच आणि डोक्यात चालू असलेले असंख्य विचार जरा जास्तच रंडम, हे हि आलेच, आणि मग विसरभोळेपणा हि आलाच. कित्येकदा तुम्ही सांगितलेल्या गोष्टी परत सांगितल्या गेलेल्या असायच्या, आणि एका विषयातून दुसऱ्या विषयात डीप डाईव्ह घेताना नक्की पहिली विचारांची उडी कुठे कशी आणि कधी घेतलीत तुम्ही हेच कळायचे नाही आणि ऐकणारा गुंग व्हायचा तो विचारांच्या आणि गोष्टींच्या एका मोठ्या महाजाळा त. काही वेळा तर तुम्ही तुमची खतरनाक छान काढलेली पेंटींग्स बस मध्ये विसरून आला आहात..पण look who is talking about absent mindedness.

#3#
खरे, खोटे, सफेद झूठ आणि ह्या सर्वातल्या ग्रे शेड्स ! इथे आपण फ़क़्त पांढऱ्या, काळ्या आणि त्यातल्या छटा ह्याबद्दल बोलत आहोत. तसे लहानपणापासून शिकलो खरेपणाचे महत्व आणि तशी कधी खोटे बोलायची वेळच आली नाही, आली ती थेट कॉर्पोरेट जगात शिरल्यावर काही महिन्यातच. अर्थात ते खोटे निरुपद्रवी होते, समोरच्याचे भलेच साधणारे आणि आपले काही वाईटही न साधणारे होते, पण तरीही राखाडी छटा आल्या. तुमचे चित्रांमधले रंग छान असतात, त्यात ह्या मला न आवडणाऱ्या अशा ह्या राखाडी छटा नसतात. तुमच्या चित्रांमध्ये असतात ते आयुष्यात मजा आणणारे रंगांचे खेळ, त्यांच्यातली एक symphony, पण ग्रे छटान्मध्ये दिसते कधीकधी ती एक प्रकारची उदासीनता..स्वतःलाच हरून, स्वतःला लौकिकदृष्ट्या जिंकावण्याचा खेळ, ह्यात कोणीच तसे जिंकत नाही, जिंकते ते फ़क़्त असहाय्यता. आणि हा कॉर्पोरेट मुखवटा माणूस इतका कधीकधी चढवतो कि त्यात तो स्वतःला पण ओळखेनसा होतो.

#४#

जरा एक हलका उर्फ light विषय घेऊन म्हणत्ये लिहायला..ती म्हणजे तुमची फोटोग्राफी. हा विषय आज कित्येक वर्ष तुमच्यासाठी अतिशय आवडता..म्हणजे त्यातल्या अक्ट्स. आपण ट्रीप ला गेलेलो असताना जेंव्हा जेंव्हा कॅमेरा नेलेला असायचा तेंव्हा तेंव्हा तुम्ही फोटो काढता काढता वाकडे वाकडे होत जात काहीतरी गडबड करायचात. तुम्ही तरी आडवे पाडायचात नाहीतरी कॅमेऱ्याला तरी आडवे पाडायचात किंवा दोघेही..आणि फोटोग्राफी subject कुठेतरी दुसरीकडेच. एक कलाकार म्हणून अशा सेट-उप मध्ये फोटो काढणे नक्कीच exciting असेल हि, पण ह्या सर्व खटाटोपात तुम्ही आपल्या मैन काम्पुच्या मागेच कुठेतरी पडायचात, मग पुन्हा वाद..आणि हो,एकदा तर आपण अशा निष्कर्षापर्यंत आलो (म्हणजे मी लहानाच होते, आई, मावशी आल्या- निष्कर्षापर्यंत) कि आपल्या ज्या ज्या ट्रिप्स कॅमेऱ्या शिवाय होतात त्या त्या सगळ्यात जास्त छान होतात. तो जमाना आणि फिल्म्स वाल्या कॅमेऱ्यांचा होता ना. आपली गोवा ट्रीप आठवत्ये न, त्यात तुम्ही कॅमेराच विसरलात आणि ट्रीप बेस्ट झाली? अगदी आत्ता आत्ताची सिडने ट्रीप, तिथे फेरी मध्ये तुम्ही फोटो काढता काढता कॅमेरा च पाडलात आणि लेन्स तुटली....पण ती सुधा तुम्ही फत्तेसिंग सारखी मुंबईत कोपच्यात कोणीतरी दुरुस्तीवाला शोधून दुरुस्त करून घेतलीत, आणि कॅमेरा चालू पुन्हा. पण कॅमेरा पडला तेंव्हा किती हिरमुसून बसला होतात कि आता फोटोंच्या फुतुरे चे काय? नुस्र्या एका कॅमेऱ्या साठी एवढे वाटले तुम्हाला, तर आम्हाला तुम्ही गायब झालात त्याचे काय वाटत असेल ह्याचा कधी विचार केला आहे का कोणी?

#5#

एक शिट्टी मारली तर काय बिघडते? बरोबरच. एक साधी शिट्टी मारायचे स्वातंत्र्य ही नसावे माणसाला? तेही एका क्रिएटिव शॉप मध्ये?? तुमच्या एकमेव पोस्ट रिटायरमेंट जोब बद्दल बोलतोय आपण, निर्मिती नाव त्या शॉप चे. आपण जिथे काम करतो तिथले नियम आपल्याला पाळावे लागतात हे बरोबर आहे, पण त्या निर्मिती दुकानातल्या बाईने खरोखरच आपले डोके तपासून घ्यावे असे मला वाटते. त्या दिवशी तुम्ही तक्रार मांडत होतात आमच्यासमोर, कि मला शिट्टी मारल्याबद्दल असे करू नका असे सांगितले आणि थोडक्यात भविष्यातही त्याबद्दल मज्जाव करण्यात आला. तुमच्याबरोबरच इतरही काम करणाऱ्या सर्वांना. लेकी बोले सुने लागे म्हणतात न तसे. एखादे सहज माझे जीवन गाणे सुचणे, व्यथा असो व तिमिर असो, आणि ते गाताना आनंदाने शिट्टी मारणे हा अधिकार प्रत्येक जण जगायला सुरु करतो, तेंव्हाच मिळवतो, आणि आपण जेंव्हा स्वतः स्वतः ला परवानगी देतो हा अधिकार गमावण्याची तेंव्हाच गमावतो.

#६#

चोर बझार हा मुंबईतला एक कोपरा आहे जिथे सगळे चोर दबा धरून बसलेले असतात असे मला उगाचच वाटायचे. पण मग चोर असतील तर असा समुदाय जमा करून का बसतील? पकडले जाणार नाहीत का? असे बाळबोध प्रश्न माझ्या मनात येतात कधीकधी. पण अर्थात तुम्ही कित्येकदा चोर बाजारातून काही इंटरेस्टींग वस्तू आणाय्चात, आणि कशा कमी किमतीत मिळवल्या, कसे बार्गैनिंग केले ते सांगाय्चात मोठ्या गमतीने. आता वाटते जावेच एकदा त्या चोर बाजारात आणि बघावेत चोर वस्तू कशा विकतात. Jokes apart, तुम्ही तिकडे जाऊन काही खरोखरच antique वस्तू गोळा केल्या होत्या, आता काळाच्या ओघात वाहून गेल्या कि काय त्या काय माहित? पण अशा antique वस्तू, आपले जुने जुने antique फोटो, antique memories बद्दल माणसाला एक fascination असते खरे. ह्याचा अर्थ भूतकाळातच राहायचे असा मुळीच नाही, पण एक विचारांची मनाच्या तळाशी खोल डुबकी मारून आल्यावर मन कसे प्रसन्न होते, त्यातील अशा antique गोष्टी सापडतात, म्हणून तर आज antique गोष्टींना एवढे मार्केट आहे.

#७#

“दुपारचे ३ वाजले कि दिवस हातात आल्यासारखा वाटतो बघ” त्या दिवशी तुम्ही म्हणालात आणि खूप वाईट वाटले. नक्कीच वेळ घालवायला तुम्हाला आताशा कठीण जात असेल, सर्वच ऑफिसातले सहकारी आता जवळपास नाहीत गप्पागोष्टी करायला, कोणाला फोन करायला जावे तर कदाचित ते कामात असतील ह्या विचाराने तेही नकोच. मित्र नवीन करायला जाऊ थोडे वाकडी वाट करून तर त्याचाही drive कमी. आपली बायको मैत्रीण आहे न मग तसे पुरसे आहे. चित्र काढायला जावे तर कधीकधी कल्पना सहजासहजी येत नाहीत आणि डोके बंद पडते..बँकांची कामे केली कितीही रोज तरी त्यात फारसा वेळ जात नाही. शेवटी दुपारचा चहा करायची वेळ आली कि हुश्श होते. त्यात कोणी बरोबर असेल चहा ला तर काय मजा. संध्याकाळ, रात्र तर थोडी माझी आहे, त्यावेळीच प्रतिभा आणि प्रतिमांचा प्रभाव जास्त असतो..

पण खरेच, एके काळी काळ- काम- वेग ह्या सर्वांनाच गुंगवून टाकणारी कामे केल्यानंतर अशी वेळ आलीच तर काय करावे, रिटायरमेंट नंतर कधी न कधी हे होणारच होते. कधी न कधी मुलं पांगणांरच होती, कधी न कधी तुमचा जॉब नाही आणि आईचा आहे हि वेळ येणारच होती. न? येतोच ना एकटेपणा..अहो तुमचेच काय सर्वांनाच येतो, कधी पाचव्या गेअर मधून झिरो वर येताना येतो, कधी यशाच्या शिखरावर असताना येतो, कधी नसताना येतो, कधी गर्दीत येतो कधी एकांतातही येतो ..

कधी वाटते तुम्हाला अजून थोडेसे मित्र हवे होते, म्हणजे ‘हर फिक्र को धुवे में उडाने वाले’, ती चहाची वेळ ज्याला आम्ही कंपनी देऊ शकलो नाही- तेंव्हा तुमच्याबरोबर खळखळून हसणारे..अथवा थोडेसे रडणांरेही .. तुम्ही गेल्यानंतर भेटायला येणारे नाहीत, तर तुम्ही असताना तुम्हाला भेटायला येणारे..

#८#

त्या दिवशी तुम्ही नेहेमीप्रमाणेच तरातरा बाहेर फिरायला गेलात आणि आलात तेच मोठ्ठ्या उत्साहात, आम्ही विचारला काय झाला काय, तर म्हणालात, अगा ऑस्ट्रेलिया! मी म्हंटला, अचंबित होऊन, ऑस्ट्रेलिया?? आणि तेही इथे मुंबईत? दादर सारख्या भर गर्दीने दाटलेल्या ठिकाणी? काय झाला तरी काय? तुम्ही पुढे excitement च्या भरात काही बोलायलाच तयार नाही आणि आमच्या तोंडावरचे प्रश्नचिन्ह अजूनच मोठ्या font चे !!! शेवटी तुम्ही शांत झालात आणि सांगायला सुरवात केलीत, अगा तो आपला ऑस्ट्रेलिया त होता तसा मॉल आपल्या घराजवळच अगदी दाराशीच म्हणा न, २० पावला पण नसतील, आलाय. ओह तर असे आहे का? ओह म्हणजे ते वूल्वोर्थ ज्याची ऑस्ट्रेलिया भर stores ची चेन आहे ते...

आम्ही हसून हसून बेजार झालो, तुम्हीही हसलात, फोर अ चेंज, म्हणजे रागावला नाहीत..ऑस्ट्रेलिया येती घरा आणि तोची दिवाळी दसरा असा आनंद घरभर पसरला, अर्थात ह्या आनंदात होता तो फार मोठ्ठा भोळेपणा..ज्याने तुम्ही तुमचे मी पण जपवले..तीच तर गोम आहे..तसे आपण सूर्याला सूर्य आणि जयद्रथाला जयद्रथ तर म्हणतोच...पण कधीतरी काय कारकत आहे सूर्याला जयद्रथ आणि जयद्रथाला सूर्य म्हंटलेले..

तर विचारांती मला असे लक्षात आले कि तुम्ही ऑस्ट्रेलियात आल्यावर लगेच परत घरी इंडिया त जायचा लगदा लावला होतात..तुमचे स्वातंत्र्य गेलेले ना ..मग मीही आगीत तेल ओतले..म्हंटले आता तुमचे जाणे माझ्या हातात आहे..मग तुम्ही चिडलात..पण मग शेवटी तुम्ही जेंव्हा वूल्वोर्थ मध्ये जाऊन आपले आपण शॉप्पिंग करून यायला लागलात तेंव्हा तुमचे स्वातंत्र्य थोडे का होईना..परत आले..आणि स्वातंत्र्य मिळवून देणारी व्र्याक्ती, किंवा वस्तू किंवा दुकान कायमचे मनात कोरले गेले तुमच्या मनावर..आणि तसेच store जेंव्हा तुम्हाला अचानक बनलेले जवळच दिसले तेंव्हा तुम्हाला वाटले, हेच ते ऑस्ट्रेलिया..हुस्श्ह्ह केवढी मोठी आणि complex - thought - process समजून घेतली मी तुमच्या ह्या गमतीची. पण तुम्ही जिथे असाल तिथे असेच रहा, आपले मीपण जपत ..

#९#

तुम्ही आणि तुमच्या गप्पा, मग अनोळखी माणसे, पुन्हा कधीही ना भेटणारी माणसे असतील तर मग तर एक आगळीच मजा. तसे काहीच लागेबांधे नाहीत, पण तरीही आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलूही शकतो मनात आणले तर. तशीच तुम्हाला भेटलेली अनोळखी मेरी. ऑस्ट्रेलिअन मेरी. म्हणजे मूळची ब्रिटीश. आता जुन्नर च्या मातीतले तुम्ही आणि हि मेरी बया याच्यात काय साम्य? तर दोघांनाही गप्पा प्रचंड मारायला आवडतात. मग भाषा भिन्न का होईना? इंग्लिश असले तर वेगळ्या उच्चाराचे का होईना.

तर अशी ना भूतो ना भविष्यति अशी मैत्री झाली कशी? तुम्ही फिरायला बाहेर पडाय्चात, सिडनी त असताना आणि कॉम्प्लेक्स च्या मध्येच खाली तुम्हाला मेरी भेटायची. तब्बल पंच्याहात्तारीची असेल. पण सकाळी खुडबुड करत ती काहीतरी शोधात असायची. गवतात. शोध घेतल्यावर आम्हाला कळले कि ती उंदीर शोधत असायची. मला खरा तर लाज वाटली पाहिजे हे सांगताना, कि आमच्या सिडनी तल्या घराच्या आजूबाजूला कधीकधी उंदीर असायचे हि. कोणाला वाटेल ऑस्ट्रेलिया त उंदीर? शी... पण मी तर ते पाळलेले नव्ह्ते ना. शिवाय आता मी उंदराला पोपट तर म्हणू शकत नाही ..किंवा जयद्रथ हि म्हणू शकत नाही. सो, कमिंग back टू मेरी, तिला कदाचित आभासी उंदीर शोधण्याचा छंद जडला असेल. ती वाढत्या उंदरान बद्दल बोलत असे तुमच्याशी आणि तुम्ही हो ला हो, नाही ला नाही करत करत काय काय बोलाय्चात मग. इंडिया, भारत , ऑस्ट्रेलिया, आणि काय काय. कदाचित तुम्हाला ती ऑस्ट्रेलिया तल्या कबुतारांबद्दल सांगत असेल आणि तुम्ही असेच आपले काही तरी शिवनेरी वगैरे, गम्मत जम्मत. अर्थात हि सगळीच माझी कल्पना, बरून गच्चीतून जो गप्पांचा सूर दिसायचा त्यावरून. एक नक्की, एक निखळ मैत्री मला बघायला मिळाली आणि आणि तुमचे हसतमुख चेहरे.

#१०#

चांगलाच गुटगुटीत झालायस हो चिंत्या तू, रिटायरमेंट नंतर- इति तुमची ऑफिसातली एक मैत्रीण. तसे तुम्ही ‘जुन्या’ ऑफिसात रिटायरमेंट नंतर हि जात असायाचत. मागेच ना अगदी ऑफिस , त्यात हमारा बजाज का साथ. मग काय. तिकडे जाऊन गप्पा मस्करया रंगवणे हा तर तुमचा जन्मसिद्ध हक्क आणि गम्मत म्हणजे तुमच्या गप्पा मारायला तेवढाच जन्मसिद्ध हक्क घेऊन आलेले तुमचे एक्स- सहकारी बालभारती तले.

आणि त्यात अजून गम्मत म्हणजे मला सुदधा कित्येक वेळा येऊन तुमच्या सहकाऱ्यांना येऊन भेटण्याचा जोरदार आग्रह. आपलेच अग ते, चल जाऊ, चहा मिळेल तो पिऊ कॅन्टीन मधला. मीही कधीकधी आग्रहाला बळी पडायचे आणि मग तुमच्या बालभारती तले वातावरण . काही जण सर्वच आटपून टेबल क्लीअर करून तय्यार. निघण्यासाठी. आणि मग तुमच्या सर्वांच्याच “जब में छोटा बच्चा था” च्या धर्तीवर फार फार वर्षांपासूनच्या कहाण्या आणि किस्से.

आत्ता मीच वाचकांना “जब में छोटा बच्चा था” ची मज्जा सांगते. कोणीही व्यक्ती जेंव्हा फार फार वर्षांपासून ची गोष्ट सांगायला लागते तेव्हा म्हणायचे “जब में छोटा बच्चा था”. आपले हृदयनाथ मंगेशकर सुधा झी सारेगामा त असेच करायचे. कुठल्याही गाण्यावर प्रतिक्रिया सांगायची तर, आधी, फार फार वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे, तेव्हा लता दीदी, आशा आम्ही सगळे एक रेकॉर्दिंग करत होतो....आई बात समझ में?

तर मला असे म्हणायचे नाही कि “जब में छोटा बच्चा था” फ़क़्त तुम्ही आणि हृदयनाथ च करायचात. अमिताभ पण करायचा त्या जुन्या advertise मध्ये. पण प्रत्येकाचीच चोरी कधीतरी पकडली जाते...आणि रोशन होता ...बजाज..again!!

#११#

बंद दार, जे तुम्हाला अजिबात आवडत नसे, अगदी चाळीतून ब्लॉक शिष्टीम मध्ये आल्यावर सुद्धा. आणि मी, मला कळायला लागल्या पासून मला आपले वाटे कि एक mimimum privacy तरी असावी, नाहीतर चाळ नावाच्या वाचाळ वस्तीतले कोणीही कधीही घरी घुसणे मला आवडत नसे. पण तुम्ही, माझ्याशी दार दार खेळायचात माझ्या वयाचे होऊन, मी दार बंद करणार आणि तुम्ही उघडणार.

तरी काहीच बरोबर किंवा चुकीचे नाही, आपले stand एकदम नक्की. शेवटी आपण त्यातला मध्य म्हणून दोरीची कडी लावायचो ज्यात दोन्ही गोष्टी साध्य व्हायच्या. अश्या ह्या दोरीच्या कडीने आपल्याला सुधारले.

गम्मत म्हणजे ब्लॉक शिष्टीम मध्ये आल्यावर सुद्धा तुम्ही दार उघडेच टाकायचात, पण आधीसारखे कोणीच घुसून यायचे नाही आणि मला तेंव्हा लक्षात आले कि तसे त्या “घुसखोर” जणांचे जाणे येणे हि साधे सुधे होते, मोकळे होते, आयुष्यातल्या चार दोन सुख-दुखांच्या क्षणांचे साथीदार होते, हेही नसे थोडके.

आता अशी physical दोरीची कडी कुठे विशेष दिसत नाही, कदाचित मीही लांब आले आहे बरीच..पण मनात एक अशीच एक दोरीची कडी आहे जिचा मला आधार वाटतो, वाटते तुम्ही असाल जिथे तिथे मला समजून घ्याल.

#१२ #

आधीच्या एपिसोड मध्ये दोरीच्या कडीवर लिहिले, आणि आता अखेर लगाम. मनावरचा. मी तसे अजून कितीही लिहू शकेन, आठवणीच्या प्रदेशात जाऊन, तुमच्यावर, तुम्हाला श्रध्दांजली म्हणून, पण आता थोडी थांबते, चौखूर उधळलेल्या विचारांच्या वादळाला एक लगाम देते, मीही शांत, वादळही शांत आणि तुम्ही तर शांतच शांत. मग बोलायचे कसले, हे न कळण्या एवढी मी वेडी नाही. आणि मग एकतर्फी संवाद एक शांत चित्ताने असलेल्या आपल्या व्यक्तीसाठी अजून मी पुढे करू शकत नाही. आता परत लिहिले तरी मी नवीन विषय घेऊन येईन, त्यात कुठे ना कुठे तुमचा प्रभाव असेलच कि.

तुम्हाला आम्ही ठेवलेल्या नावांपैकी अजून एक नाव म्हणजे “बाकी ठीकेकर”. तुम्ही फोन केल्यावर ठेवताना विचाराय्चात ना, बाकी ठीक ना? तर उत्तर आहे कि बाकी सगळे ठीकच आहे कि. बाकी शून्य असली तरी ती ठीक तर असू शकते ना? थोडीशी मनाची डागडुजी, थोडेसे ओईलिंग, थोडेसे ओव्हर ड्राईव्ह ..करून बाकी ठाक-ठीक करता येते.

ठीक तर मग!

©स्वाती पित्रे

गुलमोहर: 

अती सुंदर ! बाबा अगदी डोळ्यासमोर उभे केलेत.ओघवती भाषा ,उत्तम श्रद्धांजली.

आवडलं Happy

स्वाती, सुर्रेख... एकतर्फी असला तरी किती ओघवता संवाद आहे हा.
<<....बाकी ठीक ना? तर उत्तर आहे कि बाकी सगळे ठीकच आहे कि. बाकी शून्य असली तरी ती ठीक तर असू शकते ना? थोडीशी मनाची डागडुजी, थोडेसे ओईलिंग, थोडेसे ओव्हर ड्राईव्ह ..करून बाकी ठाक-ठीक करता येते. >>

किती हळवा तरी समजुतदार शेवट.... लिही गं, अजून लिही. बाबांवरच असं नाही पण... तू लिही. जे लिहिशील ते असं सहज, सोप्पं, शहाणं असेल असं वाटतय... वेडं लिहिलस तरीही... Happy