स्कूल चले हम...!

Submitted by इंद्रायणी on 19 September, 2011 - 05:24

श्री गणेश

स्कूल चले हम.....!

गणपतीचे दिवस. दुपारी बारा, साडेबाराची वेळ. पुण्यातले रस्ते. रस्त्यात वेडेवाकडे उभारलेले मांडव. त्यातच खास गौरी गणपतीच्या वस्तूंनी सजलेले असंख्य स्टॉल्स. खरेदीसाठी उडालेली झुंबड. त्यामुळे होणारं ट्रॅफिक जॅम, कर्कश्य हार्न्स आणि त्यातुन कासवाच्या वेगानं जाणारी वाहनं. नायर सरांकडे मी क्लास साठी निघाले होते.

ओणम दोन दिवसांवर आलेला! ओणम म्हणजे केरळी लोकांची दिवाळी. नायर सरांना ओणमच्या शुभेच्छाही द्यायच्या होत्या, मिठाई घ्यायची होती. नेहमी प्रमाणेच घरातून निघायला उशीर झाला होता म्हणून रिक्शा शोधत होते. दोन्ही हातात खरेदीच्या मोठ्या पिशव्या घेतलेली बरीच माणसं रिक्शाच्या शोधात होती. स्पर्धा जबरदस्त होती. एवढ्या गर्दीतून शनीवार पेठेतून रास्ता पेठेत जायला हिम्मतच पाहिजे. तेव्हा मोजून सहा रिक्शेवाल्यांच्या नकार घेतल्यावर एक शूर रिक्शाचालक मला रस्तापेठेत पोहोचवायला तयार झाला. माझ्या अन्य स्पर्धकांकडे विजयाने पहात आणि त्या शूर रिक्शाचालकाचा विचार बदलायच्या आत मी पटकन रिक्शात घुसले. रिक्शेवल्या दादांनी मिटर टाकलं आणि रिक्शा सुरु होणार इतक्यात एका बाईंनी धावत येऊन आमची रिक्शा धरली. म्हणाल्या, “ताई, मला येऊ द्या की ओ तुमच्या बरोबर!” साधारण पंचावन्नच्या आसपासचं वय. मजबूत बांधा. रापलेला खास गावाकडचा रंग. फुलाफुलांच्या डिजाईनची सुती साडी. मोठ्ठं लाल कुंकु. हातात पालेभाजीनं भरलेल्या दोन मोठ्या पिशव्या आणि बोलण्यात विनंती असली तरी चेहेऱ्यावर आक्रमक भाव. म्हणाल्या, “शाळेला उशीर होतोय, येऊ द्या मला.” रिक्शेवाले दादा म्हणाले, “ही शेअर रिक्शा नाहीये.” माझ्यातला शहरी सावधपणा जागा झाला. आजकाल रिक्शा शेअर करण्याच्या निमित्तानं लुटीचे कितीतरी प्रकार घडतायत. आणि अशी साधी माणसंच धोकादायक ठरतात. पण गर्दी किती आहे. बाई घाईत दिसतायत. नातवंडांना आणायला चालल्या असतील. द्यावी का लिफ्ट त्यांना? काही सेकंदात माझ्या मनात अनेक उलट सुलट विचार येऊन गेले. पण मी काही निर्णय घ्यायच्या आत बाईंनी त्याच्यां हातातल्या पिशव्या दाणकन रिक्शेत ठेवल्या आणि स्वतःही रिक्शेत शिरल्या. रिक्शेवाल्या दादांनी माझ्याकडे पाहिलं. पण आता करणार काय? म्हंटलं, “चला, सोडू त्यांना कुठे जायचय तिथे.” बाईंना विचारलं, “कुठे जायचंय? पुढच्या चौकातून आम्ही डावीकडे वळणार आहोत.” तर म्हणाल्या, “मला सरळ जायचय. येक दोन चौक सोडलंत तरी चालंल. मंग जाईन म्या चालत. येक वाजताची शाळा हाये.” बोलता बोलता त्यांनी पिशवीतून एक कोथिंबीरीची गड्डी काढली आणि मला द्यायला लागल्या. मी पुन्हा सावध!. मंडईमधे पंधरा रुपयांना आहे कोथिंबीरीची गड्डी. या बाई भाजी विकणाऱ्या दिसतायत. केवढ्याला मागावी बरं गड्डी? तर म्हणाल्या, ”पैसे नगं. अशीच न्या गड्डी. तुमी मला तुमच्या रिक्शेत घेतलंत ना म्हणून.” मग मात्र मला फारच संकोच वाटला. मी नको नको म्हणत असताना त्यांनी माझ्या कॅरी बॅग मधे कोथिंबीरीची जुडी आणि बचकभर हिरव्या मिरच्या टाकल्या. शाळेला उशीर होतोय हे पालुपद चालूच होतं. मी सहजच विचारलं, “कोणाला आणायला चाललायत? नातवंडं आहेत का?” तर म्हणाल्या, ”आओ, मीच चाललेय की साळंला!” मी त्यांच्याकडे पहातच राहिले. म्हणाल्या, “मी साळंत जाते. ल्ह्या वाचायला शिकते. इथली न्हाय ओ मी. उरळीला ऱ्हाते. इथं येका आजींच्या घरी ऱ्हाते. त्यांची धुणी भांडी, सैपाक करते आन साळा शिकते. सा म्हयने झाले. आता मला वाचता येतंय. जोडाक्षर आलं कि अडखळल्यागत होतं पन अजून सा म्हयन्यात ईल मला सगळं. मला का नाय ताई, शिकायची लय आवड हाय पन बाप लवकर गेला आन म्या बारा तेरा वर्षाची असतानाच माजं लगीन लावून दिलं. साळंत जायचं ऱ्हाऊनच गेलं बगा. आता मला दोन मुलं हायत. सुना हायत. नातवंड हायत. आमचं शेत हाय मोटं. मालक रिटायर झालेत. सगळं ब्येस चाललंय बगा. मंग मालकच मला म्हनले, आता तुला घरात काय काम नसतं ना, मंग जा शीक तुला काय हवं ते. आमच्याकडं काय मोट्यांची साळा न्हाय म्हनून इकडं आले. शनवार रैवारला घरला जाते आन येताना साळंतल्या बायांसाटी भाजी घिऊन येते. मला का नाय हरीपाठ वाचायचाय म्हून शिकते बगा.” बाई धो धो बोलत होत्या आणि मी कौतुकानं त्यांच्याकडे पहात होते.

मग मला रहावेना. मी म्हंटलं, “मावशी, मी पण शिकतेय लिहा वाचायला.” हे ऐकल्यावर त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिलं. जिन्स, टी शर्ट, गॉगल अशा आधुनिक अवतारातल्या या बाईला लिहिता वाचता येत नाही यावर त्यांचा विश्वास बसेना. म्हणाल्या, “खरं सांगता व्हय?” म्हंटलं, “अहो मावशी खरंच! मी लिहा वाचायला शिकतेय पण ते मल्याळी. आता मी माझ्या सरांकडेच चाललेय.” हे ऐकल्यावर ओळ्खीची खूण पट्ल्यासारख्या हसल्या आणि म्हणाल्या, “म्हंजी साळंतच की! आपुन दोगी बी निघालोय साळंला!”
आणि आम्ही दोघी एकमेकींकडे बघुन हसत राहिलो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एकदम मस्त.

एक जुना पी जे आठवला.

कोकणातल्या मुलींच्या शाळेचे नाव काय असावे?
उत्तर : " शिका गों " ( यात गो सानुनासिक म्हणायचा ) Happy

ज्या पद्धतीने तुम्ही त्या बाईंचा निरागसपणा (हाच शब्द मला योग्य वाटतो) शब्दात व्यक्त केलात ते छान वाटलं !!!

धन्यवाद आशिगो! तुम्ही वापरलेला "निरागस" हा शब्द योग्यच आहे. इतकं आयुष्य जगून झाल्यावर, इतके टक्के टोणपे खाल्यावर सुद्धा काही माणसं अशी निरागस कशी राहू शकतात? असो अधुन मधुन अशी माणसं भेटली की आपलंही निर्ढावलेलं मन काही क्षण का होईना पण निरागस होतं नाही?

श्रीकांतजी, एक छान जोकची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद! मला हा जोक अमिरेकतल्या मालवणी विद्यापीठाचं नाव म्हणून माहित होता. बरं, चीन मधल्या मराठी टी स्टालचं नाव माहीत आहे? “फुंकुन पी”