नातं....दुःखाचं!

Submitted by इंद्रायणी on 17 August, 2011 - 11:10

श्री गणेश

रिश्ता...दर्द का

वॉर्ड P- फीमेल वॉर्ड---
+ कोण गं या तुझ्या?
**मेरी माँ है न।
+ काय झालंय?
**हार्ट को तकलीफ है न। एन्जीओप्लास्टी करने की। कलइच करनेकी।
+ अगंबाई हो का?
**अब क्या करने का? अल्ला ने जिंदगी दी तो परेशानी भी दी ना।
+ हो गं बाई. रहाता कुठे?
**मार्केट यार्ड। सौ रुपए लगते रिक्षा को। अभी मैं रिक्षासेइच आइना माँ को लेके।
+ घरी कोण कोण असतं?
**मैं और माँ। बाप पैलेइच मर गया ना।
+ करतेस काय?
**जाब करती न मैं, साडी की दूकान पे। अभी छुट्टी काढी। पैसा कटेगा। पर क्या करने का?
भाई है पर अलग रहते है। पैसा देते पर मैंईच संभालती न माँ को।
+ खरंय बाई. शेवटी मुलीलाच माया. दादाला सांग गं काही लागलं तर.
**दादा यानी?
+ मुलगा गं माझा, सांग त्याला काही प्रॉब्लेम असेल तर, येतो ना रोज तो इथे...

वेटींग रुम---
*काय हो, बरं वाटतय का आता ?
**हो पण कॉन्फीडन्सच वाटत नाही गं. तो मुलगा पाहिलास? बाईक वरुन आला. डायलिसिस झाल्यावर थोडा वेळ बसला आणि पुन्हा बाईक वरुन एकटाच गेला.
*अहो वयात फरक आहे. मी नाही हं तुम्हाला गाडी चालवू देणार. माझ्या मागे बसा आणि चला. मी आहे ना?
**मी कुठला गाडी चलवतोय.. सांगितलं ना, कॉन्फीडन्सच वाटत नाही गं. खरंच, तू आहेस म्हणून चाललय बघ सगळं
+ अहो काका, आमचा तर बिझनेस आहे. माझ्या मिस्टरांना पस्तीसाव्या वर्षापासून यावं लागतंय डायलीसिसला पण अगदी नॉर्मल आयुष्य जगतात ते. व्यवस्थित बिझनेस सांभाळतायत. तुम्हाला माहितीये, रेग्युलर डायलीसिस पेश्न्टसचा एक क्लब पण आहे. माझे मिस्टर मेंबर आहेत त्याचे. महिन्यातून एकदा ते लोक भेटतात. गप्पा मारतात. एकमेकांना आपले अनुभव सांगतात, प्रॉब्लेम्स शेअर करतात आणि एकमेकांना बकअप करतात. आम्ही या हॉस्पीटला नेहेमी येत नाही. डॉ. अभ्यंकरांच्या क्लिनिकला जातो. तुम्हाला माहितीये, डॉ. अभ्यंकर त्यांच्या डायलीसिस पेशन्ट्स साठी दर सहा महीन्यांनी एक छोटी ट्रीप अरेंज करतात. एकदम फ्री! बस भाडं, खाणं पिणं, कसलाही खर्च नाही. पेशन्टनी फक्त एन्जॉय करायचं. अहो, शरीराच्या व्याधी आपण नाही टाळू शकत पण मन तर आनंदी ठेवू शकतो ना? So be confident and enjoy life, ok? चला निघते मी आता. अरे हां, हा घ्या माझा फोन नंबर. काही गरज लागली तर नक्की फोन करा. आणि काका आमच्या डायलीसिस क्लबला जॉइन व्हा ना. बरं आता निघतेच मी, उशीर झालाय.
*बाई गं! केव्हडी बडबडी आहे नाई? ओळख नाही पाळख नाही पण केव्हड्या गप्पा मारल्या.
** पण केव्हडी धीराची पोर आहे! पाच मिनटात आपल्यालाही धीर देऊन गेली बघ.

वॉर्ड बाहेरचा कॅरीडॉर---
*कयुं चाची, दमल्यागत दिसताय?
** रातभर जागी ना मैं
*काय कु?
** अरे बेटी का जी घबरा रहा था ना
*हा, वो किडनी की बीमारी लय वाईट बगा. निकाल क्यु नही देती?
** हम कैसे बोले निकाल दो? डाक्तर जो बोलेगा वहीच करेंगे ना? मेरे से तो उसकी हालत देखी नही जाती। दो छोटे बच्चे है उसके। मेरी उमर भी साठ से ज्यादा। कैसे करे? दो रात जागी मैं। अभी मेरे को चक्कर आता।
*चाची मेरे को बोलनेका ना. मेरे को क्यु नही उठाया? मैं जागती ना. आमचा पेशन्ट आता येकदम ठीक हाय. आज रात आप सो जाओ. मी बशीन की तिच्या जवळ.

हॉस्पीटलच्या आवारातलं मेडीकल शॉप---
*हां मावशी, द्या इकडे चिठ्ठी...... हां ही घ्या औषधं. हीग घ्या पावती. नऊशे बेचाळीस रुपए द्या.
** नऊशे बेचाळीस रुपए झाले? माझ्याकडे पाचशेची नोट आणि हे दहा रुपए आहेत हो. पण डॉक्टरांनी लगेचच मागितलीत ही औषधं.....
*बरं द्या ते पाचशे रुपए इकडे. चारशे बेचाळीस नंतर आणून द्या.
** माझा मुलगा येतोय पैसे घेऊन. मग लगेचच पैसे देइन हं तुमचे.
*अहो मावशी ठीक आहे, ती औषधं न्या आता पटकन. चला, दादा, चिठ्ठी द्या इकडे.....

हॉस्पीटलचं गेट---
*आजी द्या त्या सलाइनच्या बाटल्या इकडे, मी धरतो.
** रहेन दे पुत्तर
*नाइ नाइ, जड आहेत त्या बाटल्या, नेतो ना मी, कुठल्या वॉर्ड मधे जायचय? लिफ्ट से चलते हैं ना
** अच्छा चल. दूसरे माले पे जाना है. तुझे कहा जाना है?
*फिफ्थ फ्लोर
**मुझे दूसरे माले पे छोड दे, फिर मैं जाऊंगी
*नहीं नहीं, आपके वॉर्ड में छोडता हूं ना... कौन है आपका यहाँ?
**मेरी बहेन है छोटी
*चलिए आ गया आपका वॉर्ड. आता जातो मी.
**तेरा कौन है यहाँ?
*मेरी भी छोटी बहेन है. काफी बीमार है.
** कोइ गल नहीं. फिकर न कर पुत्तर. चंगी हो जाएगी वो. वाहे गुरु सब ठीक कर देगा

R वॉर्ड---
*ओ ताइ, जेवण झालं नाही ना अजून? नका मागवू काही. माझा डबा घ्या. मला नाही जेवण जात. त्या ऎन्टीबायोटिक्सनी चवच गेलीय तोंडाची.
**मला बी न्हाइ ओ जेवान जात. आज सकाळच्यालाच आपरेशन झालंय ना माज्या लेकाचं. लैच उलघाल होतीय बगा त्याची. काय सुचतय मला जेवानखान? त्याला काय धड सांगता बी येत न्हाइ. येडा हाय ना त्यो. पन काळजी बगा किती माजी. सारका इचारतोय, जेवली का म्हनून.
*अहो वेडा नाही तो. मतीमंद आहे.
** व्हय? म्हंजी?
*म्हणजे इतरांपेक्षा त्याला बुद्धी कमी आहे, समज कमी आहे...... पण असं तरी कसं म्हणायचं हो? माझा एवढा शिकला सवरलेला मुलगा, महिन्याला लाखभर रुपए कमावणारा, तीन बेडरुम्सच्या फ्लॅट मधे रहाणारा पण आईची अडचण होते त्याला. इथे आणून टाकलंय, पैसे भरलेत पण कशी आहेस विचारायला साधा एक फोन पण नाही केला. खरं तर ताई, तुमचाच मुलगा जास्त समजदार आहे.

वेटींग रुम---
*बाई नवरा आला बग तुजा नाश्ता घिऊन.
+घे गं थोडं खाऊन.
*नाहीच म्हन्ते की ओ. आई सलायनवर हाये, ती काही खात नाही, ती खाइल तवाच मी बी खाइन असा पणच करुन ऱ्हायली काय तू?.... बगा बाप्पा आता रडूनबी ऱ्हायली की ओ...
**बाई आसं का करुन ऱ्हायली तू? आपनच तर भागदौड करनार ना? आपन खाऊन पिऊन मस्त ऱ्हायलं पायजे, हास्पीटलाची आदत नाय तुले.
*आमी बग आराम है की नाही? सालातून तीन बार येतोय हास्पीटलात. आता आदत जाली आमाले.
बाई, मुसीबत आल्याबिगर हिम्मत येत नाई. चल खाऊन घे, तुझ्या आई साटीच गं...

माझ्या मावशीला न्युमोनियाच्या ट्रीटमेंट साठी आठ दिवस हॉस्पीटल मधे रहावं लागलं आणि तिच्या सोबती साठी मलाही. तिथे आसपास वावरणाऱ्या माणसांमधले मी पाहिलेले हे काही प्रसंग. साधेच पण नात्यांची वेगळीच झलक दाखवणारे.
ही माणसं कोण एकमेकांची? काय त्यांचं नातं? काहीच नाही. त्यांची जात, धर्म, भाषा, वेश, प्रदेश सगळंच वेगळं. त्यांच्या या संवादांची साक्षी असणाऱ्या मलाच काय पण त्यांना स्वत:हाला ही एकमेकांची नावं, गावं माहीत नाहीत. भविष्यात पुढे पुन्हा कधी भेटायची शक्यता नाही. पण तरीही कुठल्या तरी अदॄश्य धाग्यानं बांधली गेलीत ती एकमेकांशी. हा धागा आहे, दु:खाचा. दु:ख हेच त्यांच्यातलं साम्य आणि हेच त्यांच्यातलं नातंही, इतर कुठल्याही नात्यापेक्षा खूप खरं, माणूसपण जागवणारं...

गुलमोहर: 

छान लेख ! नेहेमीपेक्षा वेगळी लेखनपद्धती...
आधी कळाले नाही की नक्की काय आहे, पण लेखाच्या शेवटी जे लिहिले आहे त्यावरून लक्षात आले.
पु.ले.शु.

छानच!
मागल्या वर्षी आमच्याही इस्पितळाच्या बर्‍याच वार्‍या झाल्या होत्या. तेव्हाची आठवण झाली.
तेव्हापासून ज्या लोकांना आयुष्यभर तिथेच धावपळ करावी लागते, अशांविषयी खूप आदर वाटायला लागला आहे.

" दु:ख हेच त्यांच्यातलं साम्य आणि हेच त्यांच्यातलं नातंही, इतर कुठल्याही नात्यापेक्षा खूप खरं, माणूसपण जागवणारं..."

खरं आहे.

दु:ख हेच त्यांच्यातलं साम्य आणि हेच त्यांच्यातलं नातंही, इतर कुठल्याही नात्यापेक्षा खूप खरं, माणूसपण जागवणारं... >>> u said it! Happy

>>. दु:ख हेच त्यांच्यातलं साम्य आणि हेच त्यांच्यातलं नातंही, इतर कुठल्याही नात्यापेक्षा खूप खरं, माणूसपण जागवणारं... >> अगदी अगदी!

ह्म्म्म...
डोळ्यात पाणी आलं. सुंदर लेख...
पण अत्ता दुकान बंद करून घरी बसून माबो वाचतो आहे.
दुकानात काऊंटरच्या दुसर्‍या बाजूने पण दिसतात ही नाती. वेगळे पैलू ही. मृत्यूच्या छायेत सगळे छोटे होतात ना, तसेच सगळ्यांचा छोटेपणा ही उघडा पडतो..
३ वर्षांच्या मुलीला रक्त लागणारे... तिच्या बापाला विचारावं लागतं, की $%##, ही तु़झीच पोर ना? दे की अर्धी बाटली रक्त? असो.
तिकडुन दिसलेल्या चित्राने माझे डोळे ओले होताहेत अजून हेच भरपूर झालं. सगळ्याच संवेदना अजून बोथट नाही झालेल्या.

दु:ख हेच त्यांच्यातलं साम्य आणि हेच त्यांच्यातलं नातंही, इतर कुठल्याही नात्यापेक्षा खूप खरं, माणूसपण जागवणारं>>>>>>>>> अगदी खरयं.

सगळ्याच संवेदना अजून बोथट नाही झालेल्या.>>>>>>>. इब्लिस, मनातल बोललातं

बागुलबुवा, "कॅलिडोस्कोप" हे वर्णन आवडलं.

"मृत्यूच्या छायेत सगळे छोटे होतात ना, तसेच सगळ्यांचा छोटेपणा ही उघडा पडतो.." अगदी खरं आहे इब्लीस.
खरं तर जगात वाईटपणाच्या तुलनेत चांगुलपणा जास्त आहे पण काळा रंग जसा कोणत्याही अन्य रंगाचं अस्तित्व पुसून टाकतो तसा थोडा वाईटपणाही खुपश्या चांगुलपणाला झाकोळून टाकतो. एनी वे, हास्पीटल हे असं ठिकाण आहे जिथे आपल्याल्या अशा अनेक गोष्टींची किंमत कळते ज्यांना आपण नेहमी ग्रुहीत धरत असतो. आपल्या मनामागे धावणारं आपलं बिचारं शरीर, आर्थिक व्यवस्थापन, वेळेचं व्यवस्थापन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला लोकसंग्रह..... या सगळ्याची किंमत कळते ती हास्पीटलात. तिथून बाहेर पडताना आपण स्वस्थ शरीराबरोबरच अनेक गोष्टी शिकुन बाहेर पडतो, नाही का?