तुझी भेट व्हावी असे वाटले

Submitted by क्रांति on 17 September, 2011 - 10:29

तुझी भेट व्हावी असे वाटले अन् तुझ्या आठवांचे थवे हासले
पिसारे किती सप्तरंगी क्षणांचे मनाच्या रित्या अंगणी नाचले!

तुझी भेट व्हावी असे वाटले, मी तुझी वाट शोधीत आले खरी,
न वारा तुझा की न चाहूल आली तुझी, फक्त डोळ्यांत आल्या सरी!

तुझी भेट व्हावी असे वाटले तोच आला तुझ्या वेणुचा नाद रे
खरा तो असे की असे भास? काही कळेना मला, घाल तू साद रे

तुझी भेट व्हावी असे वाटले त्या क्षणी भेट झालीच नाही कधी,
किती वाट पाहू इथे एकटी मी? तुझा अंत ना पार लागे कधी

तुझी भेट व्हावी असे वाटले की मनाच्या तळाशी जरा वाकते,
तुला पाहते, बोलते मी तुझ्याशी, क्षणी चोरकप्पा पुन्हा झाकते!

तुझी भेट व्हावी असे वाटले, एवढी का न आशा जगाया पुरी?
तुला भेटण्याची पदे आळवावी, सख्या जोवरी श्वास आहे उरी!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त ..............

पण बर्‍याच ठिकाणी लय घुटमळते.....

असे गोड काही वळण आज आले अता पावलांनी ढळावे कसे?
तुझ्या चाहुलींचे थवे भोवताली तुला टाळुनी दूर जावे कसे?

धरा अंथरावी गगन पांघरावे हवे ते करावे जरी वाटते
मनासारखे दोर कापूनसुध्दा मनाएवढे मुक्त व्हावे कसे?..............आठवले...!

वावावावावा!!!!!!

काही ठिकाणी लय जssरा अडखळते हे खरेच, पण शब्दयोजनेमुळे निर्माण झालेला नाद फार आवडला...

लय कशी काय अडखळली? मला तरी वाटले नाही तसे. Happy

तुझी भेट व्हावी असे वाटले की मनाच्या तळाशी जरा वाकते,
तुला पाहते, बोलते मी तुझ्याशी, क्षणी चोरकप्पा पुन्हा झाकते!>>> अप्रतीम ओळी.

(आठवांचे थवे वरून एक ओळ आठवली. )

तुझ्या आठवांचे थवे टाळणारे मनाला मिळावेत रावे कुठे?