रेझिलियन्स

Submitted by निनाद on 7 September, 2011 - 00:46

दलजीतचं लग्न झालं आणि ती भारतातून ऑस्ट्रेलियात आली. नवर्‍याबरोबर समाधानाने संसार चालला होता. नवर्‍याला शेतीची आवड असल्याने अनेक वर्षे शहरात नोकरी केली आणि पैसे जमवले. ऑस्ट्रेलियात संत्री आणि द्राक्षांची शेती घेतली. काही काळ स्थिर होण्यात गेला. दलजीतचा सारा वेळ मुलांचे संगोपन आणि घरकाम यातच जात असे. तीन मुले पदरी असतांना चाळिसाव्या वर्षी अचानकपणे नवरा गेला!

नवर्‍याच्या आधाराने दलजीतचे आयुष्य चाललेलं असल्याने इंग्रजीचा संबंध जेमतेमच आला होता. इंग्रजीची माहिती नाही. पदरात तीन मुले आणि अंगावर आलेली शेती. नवर्‍याच्या बोलण्यातून झालेली अतिशय जुजबी शेतीची माहीती दलजीतला होती. ऑस्ट्रेलियात शेतीसाठी मजूर मिळण्याची शक्यता जवळपास नाहीच. पण दलजीत ने धीर सोडला नाही.

इतर कोणताही उत्पन्नाचा पर्याय नसल्याने शेतीची सुरुवात केली. ट्रॅक्टर चालवण्या पासून ते फवारणी करण्यापर्यंत सारी कामे तीने शिकून घेतली. वेळप्रसंगी मोडलेले ट्रॅक्टर घरच्याघरी दुरुस्तीही करण्याची तयारी ठेवली. दिवस बदलत गेले. कधी भरभराट तर कधी दुष्काळ यांना तोंड देत मोठ्या धीराने दलजीतने आयुष्य सावरून धरले.
तीची मुले आज मोठी झाली आहेत. एक मुलगी फार्मासीस्ट आहे. मुलगा आता युनि च्या शेवटच्या वर्षाला आहे. आणि लहान मुलगी दहावीला गेली आहे.

या असामान्य महिलेची दखल नुकतीच ऑस्ट्रेलियाच्या एबीसी रेडियोने घेतली. ३६० डॉक्युमेंटरी मालिके अंतर्गत तीच्या या आयुष्याचा मागोवा घेणारा रेझिलियन्स नावाचा एक कार्यक्रम प्रसारित झाला. एबीसी रेडियोच्या दुव्यावर ही छोटीशी डॉक्युमेंटरी तुम्हाला ऐकता येईल. ही डॉक्युमेंटरी डाऊनलोड करून नंतर ऐकता येईल अशी सुविधाही तेथे आहे.

* ऑस्ट्रेलियामध्ये कुणालाही शेती घेता येते, नागरिकत्वाची अट येथे नाही.

*या कार्यक्रमा नंतर लगेचच वॉटर्स ऑफ लाईफ नावाचा एक सुरेख छोटासा कार्यक्रमही ऐकण्याजोगा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट. खरेच स्फुर्तीदायक अशी कथा आहे दलजितची.

गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी सकाळमध्ये विदर्भातल्या आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या बायकांपैकी काहीजणींची कथा छापलेली त्याची आठवण झाली. कर्जाचा डोंगर, मुले, नापिक जमिन आणि सोबत हिंमत घेऊन काहीजणींनी त्यातुनही मार्ग काढला आणि ५-७ वर्षांत घरचे चित्र बदलुन टाकले.

वाह ! खुप स्फुर्तीदायक कहाणी !
अशा अनेक महिला आपल्या देशात आलेल्या परिस्थीतीशी झगडत आहेत,धैर्य दाखवत आहेत्,यशही मिळवत आहेत, पण आपल्या मिडियाला,समाजाला याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे असतो ?

साधना,
विदर्भातल्या आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या बायकांपैकी काहीजणींची कथा
या विषयी वाचायला आवडेल. दुवा मिळाल्यास देणे.

थँक्स इथे माहिती दिल्याबद्दल निनाद! जर त्या मुलाखतीचे ट्रान्स्क्रिप्ट उपलब्ध असेल तर तेही टाकू शकाल का? धन्यवाद! Happy