एका सिरीयलची जन्मकहाणी - स्वप्ना_राज

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 11:03

प्रथमेश त्या कॅफ़ेत शिरला तेव्हा तिथे शुकशुकाटच होता. असं कसं होईल? त्याला पत्ता तर इथलाच मिळाला होता. 'तो' इथे असायलाच हवा होता. २-३ वेळा निरखून निरखून पाहिल्यावर दूरच्या एका कोपर्‍यातल्या टेबलावर त्याला 'तो' दिसला..... एकटाच.

"नमस्कार" प्रथमेशने असं म्हटल्यावर 'त्या'ने वळून पाहिलं. ’त्या’च्या नजरेत संशय होता.
"कोण तुम्ही? काय हवंय?"
"मी प्रथमेश पहिलटकर. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. मार्गदर्शनासाठी आलो होतो"
"मार्गदर्शन? कसलं मार्गदर्शन?"
"मला एका टीव्ही चॅनेलकडून त्यांच्या आगामी सिरियलच्या लिखाणाची संधी मिळाली आहे. आपला ह्याबाबतीतला अनुभव दांडगा आहे. म्हणून आशीर्वाद आणि मार्गदर्शन दोन्हींसाठी आलो होतो."
'त्या'ने काही क्षण प्रथमेशकडे निरखून पाहिलं. आणि मग दिलखुलासपणे हसत समोरच्या खुर्चीकडे हात केला. "बसा"
"धन्यवाद." प्रथमेश खुर्चीत बसत म्हणाला.
"दो कॉफी लाना रे." 'त्या'ने वेटरला ऑर्डर दिली.

"बोला. विषय काय आहे?"
"हेच की आपलं नेहमीचंच"
"नेहमीचंच? अहो, नेहमीचंच ह्या सदरात अनेक गोष्टी येतात. वाढती महागाई, स्त्रीभृणहत्या, घटस्फोटांचं वाढतं प्रमाण, रस्त्यातले खड्डे, खड्ड्यात गेलेली भारतीय क्रिकेट टीम ते भारतातली खेळाविषयीची अनास्था, सरकारची जनतेविषयीची अनास्था, जनतेची पर्यावरणाविषयीची अनास्था, पाकिस्तानची भारताविषयीची अतिआस्था, दहशतवाद, वंशवाद इथपर्यंत. तुमच्या सिरियलचा विषय काय आहे? नाही म्हणजे विषय आहे ना?"
"हो, आहे ना. अगदी ज्वलंत विषय आहे - भ्रष्टाचार"
"अरे वा! एकदम ताजा फडफडीत विषय आहे. पण ह्याबाबतीत माझ्या मार्गदर्शनाची काय गरज? प्रत्येक भारतीयाला ह्याबद्दल साद्यंत माहिती असतेच आणि नसलीच एखाद्या पामराला तरी गेल्या काही दिवसात ती झाली असेलच नाही का?"
"नाही म्हणजे ही माहिती नसणार्‍या पामरांपैकी मी एक आहे. मी कधी कोणाला लाच दिली नाही किंवा कधी लाच घेतली नाही."
"हिमालयात नक्की कुठे रहात होता तुम्ही इतके दिवस?"
"अं?"
"हॅहॅहॅ. विनोद केला हो. सिरियल लिहिणार्‍या लेखकाला विनोदबुध्दी आवश्यक आहे हं."
"कशाला? माझी सिरियल विनोदी नाहिये"
"अहो, काहीतरीच तुमचं. विनोदी सिरियलमध्ये कुठे विनोद असतो? बरं पण ते जाऊ देत. तुमच्या सिरियलमधल्या प्रमुख स्त्रीपात्राचं नाव काय?"
"तेजस्विनी. शिक्षिका आहे ती."
"असं का? अरे वा! काय शिकवते ती?"
"अं? ते नाही अजून ठरवलं."
"हरकत नाही. बर्‍याच शिक्षकांनासुध्दा अगदी रिटायर्ड होईपर्यंत ते ठरवता येत नाही म्हणे आजकाल. पहिल्या एपिसोडची सुरुवात कशी करणार आहात?"
"तेजस्विनी उपोषणाला बसलेय"
"कशासाठी?"
"ती ज्या शाळेत शिकवते तिथे वर्गांना भिंती नाहीत, फळ्यांना तडे गेलेत, ओल आलेल्या जमिनीवर मुलांना बसायला लागतंय, पिण्याचा पाण्याच्या टाकीला झाकण नाही, शौचालयाची सोय नाही...." प्रथमेश आवेशात येऊन सांगू लागला.
"ह्यासाठी उपोषण? उपोषण म्हणजे काय खायचं काम वाटलं का तुम्हाला?"
"असं कसं वाटेल? काहीही न खाणं, पिणं म्हणजे उपोषण."
"इंग्रजी शाळेत शिकलाय काय तुम्ही? बरं, मग बसली आहे ती उपोषणाला? पुढे?"
"पुढे काय?"
"अहो, पुढे काय म्हणजे पुढे कथेत काय?"
"हा, ते होय. शाळेला मिळालेल्या देणग्यांच्या वाटपात भ्रष्टाचार होतोय असा तिचा आरोप आहे. तिथंच अडलंय घोडं. ह्यापुढे मला काहीच सुचत नाहिये" प्रथमेशने खिशातून रुमाल काढून घाम पुसला.
"कमाल आहे. आता बघा, सिरियलचे पाचएक एपिसोड जातील प्रमुख पात्रांची ओळख करून देण्यात. मग पुढल्या ५ एपिसोडमध्ये मिडियावाल्यांना आणा..."
"प्रमुख पात्रांसाठी ५ एपिसोडस? एव्हढे कशाला? फार तर दोन एपिसोडस पुरतील त्यासाठी." 'मी काय महाभारत लिहितोय थोडाच' हे मनात.
"ते तुम्ही तुमच्या कॅमेरावाल्यांना सांगा. आणतील ते व्यवस्थित जुळवून. खालची आणि वरची अश्या २ दिशा सोडल्या तर बाकी ८ दिशांतून कॅमेरा फिरवून प्रत्येक पात्राचा चेहेरा किमान २-३ वेळा दाखवायचा म्हणजे इतका वेळ लागणारच ना."
"ह्म्म्म" राखी सावंतला तुमच्याशी लग्न करायची इच्छा आहे असं समजल्याबरोबर बाबा रामदेवचा चेहेरा कसा झाला असेल तस्सा चेहेरा करुन प्रथमेशने त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे म्हटलं तर चिंता, म्हटलं तर....
"त्यापुढले पाच एपिसोड स्थानिक पुढारी. चौथ्या आठवड्यात दिल्लीहून आलेले नेते दाखवा. झाला ना एक महिना पुरा? मग पाचव्या आठवड्यात तेजस्विनीचा विजय."

"अहो, पण सिरियल २ वर्ष चालवायची आहे. पाचव्या आठवड्यात तिचा विजय झालेला दाखवला तर बाकीच्या एपिसोडमध्ये काय दाखवणार?"
"तेजस्विनीच्या घरात आणखी कोण आहेत?"
"आई-बाबा आणि लहान भाऊ कॉलेजात शिकतोय."
"वडिलांना नोकरी आहे?"
"आहे ना. खाजगी कंपनीत आहेत"
"लाच घेतल्याचा आरोप टाका त्यांच्यावर. जाऊ देत नोकरी. १०-१२ एपिसोडस तरी नुसती रडारड दाखवता येईल तुम्हाला. मग धाकट्या भावाला शिक्षण सोडून नोकरी करायला लागते. तिथे तो पैसे मिळवायला ड्रग्ज विकायला लागतो. हे झाले आणखी १० एपिसोड्स."
"ड्रग्ज. अहो पण सिरियल भ्रष्टाचारावर आहे"
"मग? भाजी बटाट्याची आहे म्हणून नुस्ते बटाटेच घालतात काय भाजीत? कांदा, टॉमॅटॊ, मसाला घालतातच ना? तसाच हा मसाला आहे. ड्रग्ज हीही समाजाला लागलेली एक कीड आहे. हवं तर हे वाक्य त्या एपिसोडच्या शेवटी टाका. तेव्हढंच समाजप्रबोधन केल्याचं पुण्य मिळेल. आणि तिला काय मित्र वगैरे?"
"आहे ना, तिचा कॉलेजमधला फ़्रेन्ड आहे, सूरज. त्यांचं लग्न दाखवायचं आहे सिरियलच्या शेवटी."
"सिरियलच्या शेवटी लग्न दाखवणार? मग बाकी सिरियलभर काय दाखवणार? शेवटी लग्न दाखवायला तो काय करण जोहरचा पिक्चर आहे? लग्न सिरियलच्या सुरुवातीला दाखवायचं असतं म्हणजे सिरियलभर त्याचे धिंडवडे निघालेले दाखवता येतात. भ्रष्टाचारविरोधी लढाईत विजय होतो तेव्हाच तेजस्विनीचं लग्न झालेलं दाखवा. विवाहबाह्य संबंधाबद्दल तुमचं काय मत आहे?"
"नाही म्हणजे, मला काही अनुभव नाही त्याचा" प्रथमेश पुन्हा घाम पुसत म्हणाला. डोळ्यांसमोर सौ. ची मूर्ती(मंत भीती उभी!) तरळली.
"अहो, एखाद्या गोष्टीबद्दल मत द्यायला अनुभव कशाला असायला हवा? फक्त गल्ली क्रिकेट खेळलेले लोक धोनीचं कुठे चुकलं ते सांगताहेतच ना छातीठोकपणे आजकाल?"
"हं, तसं म्हणाल तर ह्याबद्दल माझं काही मत नाही."
"म्हणजे तुमचं लग्न झालंय तर. नाहीतर तुम्ही बेधडक आपलं मत सांगितलं असतं. त्या सूरजचं अफ़ेअर दाखवा बाहेर"
"पण तो एक सच्चा, निर्भिड पत्रकार आहे"
"मग?" 'त्या'ने असा काही चेहेरा केला की प्रथमेशला पुढे काही बोलायची हिंमत झाली नाही.

"तुमच्या त्या तेजस्विनीची सासू कशी आहे हो?"
"सासू? नाहिये. सूरज लहान असतानाच गेली ती."
"चक... असं कुठे होतं का? सासरा नसेल तरी चालेल एक वेळ. पण सिरियलमध्ये सून आहे म्हणजे सासू ही पाहिजेच. त्याशिवाय सुनेच्या जीवनात संघर्ष, अपमान, दु:ख कसं असणार? अहो, प्रेक्षकांना तुमची सिरियल आपलीशी वाटली पाहिजे. सासू नसलेल्या घरात सून मनाला पाहिजे तशी वागतेय आणि तिला घालूनपाडून बोलायला, तिच्या माहेरच्या लोकांना नावं ठेवायला, तिला रडवायला सासू नाही हे एकच कारण टीआरपी खाली आणू शकतं मिस्टर प्रथमेश. सासू असली की हुंड्यासाठीच्या छळाचा मुद्दा आणता येतो. एकाच सिरियलमध्ये समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे अनेक प्रश्न आणावे लागतात. मग ते सोडवले नाहीत तरी चालतं. ते आणणं महत्त्वाचं. काय? लक्षात येतंय ना?"
"अं, हो, हो, येतंय लक्षात"

"नणंद आहे?" ’त्या’ने विचारलं.
"कोणाला?"
"अहो कोणाला काय? तेजस्विनीला"
"नाही....म्हणजे आणू शकतो मी" दुसरं वाक्य प्रथमेशने 'त्या'च्या 'काय पण लेखक आहे' छाप चेहेर्‍याकडे पाहून म्हटलं.
"आणा. नुसती सासू काय कामाची? जोडीला नणंद असली म्हणजे बरं. आगीत तेल ओतायला उपयोगी पडते. त्या नणंदेचा घरजावई असलेला नवरा असेल तर उत्तमच. म्हणतात ना ’एक से भले दो, दो से भले तीन’. जावयाचा सासूच्या संपत्तीवर डोळा ठेवा. घरात ड्रामा पाहिजे ड्रामा. बायकांनी ह्या तिघांच्या नावाने बोटं मोडली पाहिजेत. इथे त्यांनी बोटं मोडली की तिथे टीआरपी वाढलाच म्हणून समजा."

प्रथमेशला किती नोटस काढू आणि किती नाही असं झालं होतं. थोडा वेळ शांततेत गेला.
"सिरियलमध्ये एक वेडा किंवा वेडी असणं जरुरीचं आहे." सिगरेटची राख अ‍ॅशट्रेमध्ये झटकत 'त्या'ने शांतपणे सांगितलं.
"वेडा?" प्रथमेशचा पाच फुटी देह तीन ताड उडाला.
"किंवा वेडी. वूई हॅव टूबी जेन्डर न्यूट्रल दीज डेज. लेटेस्ट ट्रेन्ड आहे तो, म्हणजे सिरियलमध्ये वेडा आणण्याचा म्हणतोय मी. तुम्हाला कुठल्या पात्राला वेडं दाखवता येईल?"
'तुम्हालाच वेड्याचा रोल देतो माझ्या सिरियलमध्ये, तुम्ही तो चांगला कराल' हे ओठांवर आलेलं वाक्य प्रथमेशने पोटात ढकललं. ह्याबाबतीत, म्हणजे ओठावरचं वाक्य पोटात ढकलायच्या बाबतीत, मात्र त्याचा घरचा अनुभव दांडगा होता. खरं तर एखाद्याही पात्राला वेडं करायचं त्याच्या अगदी जीवावर आलं होतं.

"तेजस्विनीची आई" प्रथमेश काही बोलत नाहिये हे पाहून 'तो'च म्हणाला. "हां, ती एकदम फिट्ट आहे त्यासाठी. ती नवर्‍याची नोकरी गेल्यावर वेडी होऊ शकते किंवा मुलगा ड्रग्जच्या आहारी गेल्यावर वेडी होऊ शकते. तेजस्विनीची स्मृती गेल्यावरसुध्दा होऊ शकते"
"तेजस्विनीची स्मृती गेल्यावर?" अत्यंत क्षीण आवाजात प्रथमेशने विचारलं. इतके धक्के खड्डे असलेल्या रस्त्यांतून रिक्षा जातानाही बसत नाहीत. त्याला स्वत:लाच त्याची सिरियल पाहणार्‍या भावी प्रेक्षकांची कीव यायला लागली.
"हो, सूरजला जाब विचारायला जाताना तिचा अपघात होतो आणि मग तिची स्मृती जाते. ते पाहून आई वेडी होते. वडिलांची नोकरी गेलेली. भाऊ ड्रग्जच्या आहारी गेलेला. किमान एक महिना हा सगळा घोळ निस्तरण्यात जाईल"
"त्यापेक्षा तेजस्विनी गायब झाली तर कमी घोळ होईल" प्रथमेश उपहासाने म्हणाला. त्याचाही नाईलाज होता. सिरियलचा विषय काय आणि हा प्रतिथयश लेखक सुचवतोय काय?
"तेजस्विनीचं काम करणारी नटी पिक्चरमध्ये चांगला रोल मिळाला म्हणून किंवा जास्त पैसे मिळत नाहीत म्हणून बाहेर पडली तर तेच करायला लागेल तुम्हाला."
"आणि सूरजचं काम करणारा नट बाहेर पडला तर?" प्रथमेशने शंका बोलून दाखवली.
"तर त्याच्या फ़ोटोला हार घाला आणि लटकवा खोलीच्या एका कोपर्‍यात भिंतीवर. स्त्रीप्रधान सिरियलमध्ये पुरुषपात्रं तोंडी लावायला असतात."
"बरोबर, ह्या बाबतीत आयुष्यात आणि सिरियल्समध्ये साम्य आहे" प्रथमेशने पुन्हा एक वाक्य गिळलं.

"अरे हो, पुनर्जन्म राहिलाच की"
"पुनर्जन्म?" हा धक्का नवीन होता.
"हो, पुनर्जन्म. तेजस्विनीच्या भावाचा ड्रग्ज ओव्हरडोसमुळे मृत्यू होतो असं सिरियल टाईमलीप घ्यायच्या आधी दाखवा."
"टाईमलीप?"
"तुम्हाला टाईमलीप माहित नाही?"
"नाही" एखादी गोष्ट माहित नसेल तर तसं स्वच्छ कबूल करावं हा तीर्थरूपांचा सल्ला शिरसावंद्य मानून प्रथमेशने सांगून टाकलं.
"बाकीच्या सगळ्या चॅनेल्सवरच्या सगळ्या सिरियल्समधले सगळे विषय आपल्या सिरियलमध्ये आणून चावून चोथा झालेत आणि तरीही टीआरपी वाढायची सुतराम शक्यता नाही अशी खात्री झाली की सिरियल दहा एक वर्षांनी पुढे न्यायची. त्याला टाईमलीप म्हणतात. मग एक नवं पात्र आणा आणि तोच तेजस्विनीचा भाऊ असं जाहीर करा. तो तिचा भाऊ आहे की नाही ह्या गदारोळात झाली किमान २-३ महिन्यांची सोय."

"बरं ते भ्रष्टाचारावर आणखी काही......"
"आणखी एक महत्त्वाचा मुद्दा राहिला. तेजस्विनी प्रेग्नंट असणे आणि सूरजने ते बाळ आपलं असल्याचं नाकारणे."
"का?"
"काही कारण असणं गरजेचं आहे का?"
"नाही म्हणजे काही सबळ कारण असल्याशिवाय कोणी तसं कशाला करेल?"
"तुम्ही डेलिसोप लिहिताय का रियॅलिटी शो?" ह्यावर प्रथमेश चूप बसला. पण मग लगेच त्याला काहीतरी आठवलं "पण डीएनए टेस्ट करून घेता येते ना पॅटर्निटीसाठी?"
"अरे वा! बरीच माहिती दिसते तुम्हाला'' 'त्या'ने डोळे मिचकावत म्हटलं तसा प्रथमेशने पुन्हा घाम पुसला.
''नाही म्हणजे....."
"टेन्शन नका घेऊ हो. आता असं बघा, हे डीएनए टेस्टबद्दल तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे. आणि प्रेक्षकांना पण माहित असणारच"
"तेच म्हणतोय मी. त्यांना माहित असणारच. मग?"
"अहो, मग काय? ते तुम्हाला घरी येऊन विचारणारेत का? नाही ना? मग दाखवा की तुम्हाला काय पाहिजे ते. ते काही बोलले म्हणून तुम्हाला काही फ़रक पडतो का? सिरियल २ वर्ष चालल्याशी मतलब."

"बरं ते भ्रष्टाचारावर आणखी काही......"
"काय सारखं भ्रष्टाचार, भ्रष्टाचार लावलंय. झालं ना ते दाखवून सिरियलच्या सुरुवातीला."
"अहो, पण सिरियलचा विषय तोच आहे. प्रेक्षक काय म्हणतील?"
"काही म्हणणार नाहीत. २-४ महिने झाले की सिरियलचा मूळ विषय भ्रष्टाचार होता हे तेच काय तुम्हीही विसरून जाल"

'त्या'ने घड्याळाकडे पाहिलं तसं प्रथमेशने वही बंद केली.
"तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहिये. आजकाल कोण कोणाला एवढी मदत करतं हो..." त्याने कृतज्ञतेने म्हटलं.
"त्यात आभार कसले? आणि हो, बाकीच्या चॅनेल्सवरच्या सिरियल्समध्ये काय चाललंय ह्याची खडानखडा माहिती ठेवा. म्हणजे कोणाच्या सिरियलमध्ये एखादा दहशतवादी नाहीतर नक्षलवादी आलेला असायचा आणि तुम्ही आपले इथे चघळताय भ्रष्टाचाराचं कॉन्ग्रेसगवत. शिळ्या कढीला ऊत आणून इथे चालत नाही. नाहीतर लगेच टीआरपी वर परिणाम होतो. झालंच तर कोणी कुठे कोणाचं तरी मूल पळवलेलं असतं, गरोदर बाईला विष देऊन तिचं मूल मारायचा प्रयत्न झालेला असतो, कुठे एखादा सिरियल किलर मोकाट सुटलेला असतो, कोणावर चोरीचा आळ आलेला असतो, कोणाची नोकरी गेलेली घरच्यांना माहित नसते.....सगळ्याचा हिशोब ठेवावा लागतो."
"हो, पहात राहेन मी ह्या सिरियल्स"
"वेडे का खुळे तुम्ही? ह्या सिरियल्स पाहिल्यात तर तुमच्याच सिरियलमध्ये वेड्याचा रोल करावा लागेल तुम्हाला. आऊटसोर्सिंग करा राव."

प्रथमेशला एव्हाना आपण अगदीच ’हॅ’ आहोत असं वाटायला लागलं. दहा दहा वेळा आभार मानून तो तिथून बाहेर पडला.

काही दिवसातच एका प्रसिध्द चॅनेलवर नव्या सिरियलचे पडघम वाजायला लागले. 'मिळूनी संपवू सारे......भ्रष्टाचार हा'. (कमर्शियल ब्रेक सुरु होताना आणि संपून सिरियल पुन्हा सुरु होताना 'भ्रष्टाचार हा' एव्हढेच शब्द ऐकू येत). यथावकाश सिरियल सुरू झाली. मग काही महिन्यांनी चॅनेलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला. त्यात 'नवोदित यशस्वी लेखक' म्हणून प्रथमेश पहिलटकर ह्यांना 'पहिल्या पदार्पणातच' 'प्रेक्षकांची लाडकी' सिरियल लिहिल्याबद्दल पारितोषिक मिळालं.

आणि मग एके दिवशी प्रथमेश आणि त्याचे मित्र हॉटेलात बसले असताना २ जण त्यांच्याजवळ आले. ''तुम्ही प्रथमेश पहिलटकर ना? पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन. त्या समारंभात जमलं नाही विश करायला" त्यातल्या एकाने म्हटलं.
"थॅक्न्स. पण माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही."
"ह्यांना ओळखत नाही तुम्ही? कमाल आहे. हे मालिकांच्या जगातलं प्रसिध्द नाव आहे. मिस्टर सुयश कलमकर" दुसरी व्यक्ती आश्चर्याने म्हणाली.
प्रथमेश वेड्यासारखा त्या दोघांकडे पहातच राहिला. पुन्हा एकदा त्याचं अभिनंदन करून ते निघून गेले.

"काय झालं रे?" प्रथमेशचा भूत दिसल्यावर होईल तसा चेहेरा पाहून एका मित्राने विचारलं.
"अरे, ते सुयश कलमकर नाहियेत." प्रथमेश कसंबसं बोलला.
"काहीही काय?"
"मी खरं सांगतोय रे सुम्या".
"असं काय करतोयस? कोण कशाला खोटं बोलेल? ठीक आहेस ना?" दुसर्‍या मित्राने त्याच्याकडे काळजीने पहात म्हटलं. "का स्वत:च्याच सिरियलचे एपिसोडस वगैरे बघायला लागलास आजकाल?"
"बस काय आता? मी बोललोय त्यांच्याशी. हे ते नाहीत."
"तरी तुला सांगत होतो की चांगली इन्शुरन्स कंपनीतली नोकरी सोडून ह्या सिरियल्स वगैरेच्या भानगडीत पडू नकोस म्हणून." पहिल्या मित्राने एक उसासा टाकला.
"काय म्हणताय तुम्ही दोघं? हे सुयश कलमकर आहेत?"
"मग आणखी कोण असणार? ही काय तुझी सिरियल आहे का एकाच माणसाचे दोन चेहेरे असायला?"
"कसं शक्य आहे? मग मी त्या दिवशी कोणाशी बोललो?"

प्रथमेशला आजतागायत हे कोडंच आहे.

लेखिका: स्वप्ना_राज

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

भारीच.शेवट अल्टिमेट.

प्रथमेश जर कुठल्या स्त्री लेखिकेला भेटलाय असं दाखवलं असतं तर ओळखणं सोप्पं होतं. तो माबोवर 'संचायामा' वर टिप्पणी करणार्‍या माबोकरणीला भेटलाय हे आम्ही एका क्षणात ओळखलं असतं. Happy

खि खि खि!

माझ्या घरी चावायला देऊन काही उपयोग नाही. ते चावर्‍या सिरीअलच त्या पकाव हैत हे माहित असूनही बघत रहातात.

Biggrin

Lol
मस्त!