भगवद्गीता - सोप्या मराठीत - १२

Submitted by एम.कर्णिक on 1 March, 2009 - 11:15

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
भक्तियोग नावाचा बारावा अध्याय

अर्जुन म्हणाला,
तुमची भक्ती सदैव करिती ते योगी, अथवा
योगी जे अव्यक्ताक्षर ब्रम्हा पुजती ते, केशवा?
या दोन्हीतिल श्रेष्ठ कोण ते मजसी सांगावे
योगाचा परिपूर्ण ज्ञानि कोणाला मानावे? १

श्री भगवान म्हणाले,
माझ्या ठायी राहुनी मजला श्रध्देने भजतो
अशा कर्मयोग्या मी, पार्था, श्रेष्ठ योगि मानतो २

तरि, दर्शविता येइ न ऐशा अव्यक्ता भजती,
मूलभूत अन अचिंत्य अक्षर ब्रम्हाला पुजती, ३

इंद्रियनियमन करूनी जे समबुध्दि ठेवतात
असे भक्त ब्रम्हाचेही मज येउन मिळतात ४

मन ज्यांचे रमलेले असते अव्यक्ताठायी
देहधारींना त्या, उपासना होइ कष्टदायी ५

अर्पण करती आपुलि सारी कर्मे मजलागी
अन मज भजती अनन्यभावे असे कर्मयोगी ६

पार्था, त्याना मजठायी मी स्थान खचित देतो
विलंबाविना मर्त्यलोक मी त्यांचा सोडवितो ७

सुस्थिर माझ्या ठायि चित्त तू ठेवी, धनंजय,
अंती येउन मिळशिल मजला यात नसे संशय ८

आणि जरी असमर्थ ठेवण्या मजमधि स्थिर चित्त
उमेद धरूनी फिरून यत्न कर करण्या मज प्राप्त ९

वारंवार प्रयत्नांतीही अपयशि जर होशील
माझ्यासाठी कर्मे करूनी सिध्दि प्राप्त करशील १०

अन् हे सारे करण्यातहि तू असशिल असमर्थ
तर कर कर्मे त्यजुनि फलाशा स्थिरचित् बनण्यार्थ ११

यत्नापेक्षा ज्ञान श्रेष्ठ अन् ज्ञानाहुनि ध्यान
ध्यानाहुनही फलत्याग जो शांत करिल तव मन १२

द्वेषमुक्तसा मित्र, कॄपाळू ,सर्वां समान मानी
ममत्वबुध्दीविरहित संतत, निरहंकारी, ज्ञानी १३

सुखदु:खांप्रत निर्विकार जो दॄढनिश्चयि, संयमी
असा भक्त जो नत मजसि त्यावर करि प्रीती मी १४

ज्या न टाळिती लोक आणि जो टाळि न लोकांना
हर्ष, क्रोध, भय, खेदापासुनि अलिप्त धरि भावना
असा भक्त जो कर्मफलाशामुक्त बनुनि राही
त्या माझ्या भक्तावर माझी प्रीति जडुनि राही १५

शुध्द, कुशल, निरपेक्ष, उदासिन सुख अन् दु:खामधी
फलदायक कर्मे त्यागी तो मम प्रियभक्तांमधी १६

हर्ष, खेद वा द्वेष, शोक अन् आकांक्षा टाळतो
शुभाशुभापलिकडे पाहतो तो मज आवडतो १७

शत्रु–मित्र, सन्मान–अवमान, अन शीत–उष्ण, सुख–दुख
दोन्हींमधि समभाव राखुनी राही नि:संग १८

स्तुतिनिंदेमधि राखी मौन अन् शांत, तुष्ट सतत
अनिकेत अन स्थिरचित्त, भक्त मम प्रिय मज अत्यंत १९

हा जो मी सांगितला, पार्था, अमॄतमय धर्म
श्रध्देने आचरिति भक्त ते होती मज प्रियतम २०

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
भक्तियोग नावाचा बारावा अध्याय पूर्ण झाला
**********
अध्यायांसाठी दुवे :

अध्याय आठरावा http://www.maayboli.com/node/6531
अध्याय सतरावा http://www.maayboli.com/node/6448
अध्याय सोळावा http://www.maayboli.com/node/6370
अध्याय पंधरावा http://www.maayboli.com/node/6307
अध्याय चौदावा http://www.maayboli.com/node/6226
अध्याय तेरावा http://www.maayboli.com/node/6166
अध्याय बारावा http://www.maayboli.com/node/6101
अध्याय अकरावा http://www.maayboli.com/node/6072
अध्याय दहावा http://www.maayboli.com/node/5966
अध्याय नववा http://www.maayboli.com/node/5937
अध्याय आठवा http://www.maayboli.com/node/5868
अध्याय सातवा http://www.maayboli.com/node/5790
अध्याय सहावा http://www.maayboli.com/node/5720
अध्याय पाचवा http://www.maayboli.com/node/5651
अध्याय चौथा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय तिसरा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय दुसरा http://www.maayboli.com/node/5479
अध्याय पहिला http://www.maayboli.com/node/5479

प्रिय मित्रांनो,
माझ्या इतर कवितांसाठी माझ्या http://mukundgaan.blogspot.com या ब्लॉगवर भेट देण्याचे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
-मुकुंद कर्णिक.

गुलमोहर: 

हर्ष, खेद वा द्वेष, शोक अन् आकांक्षा टाळतो
शुभाशुभापलिकडे पाहतो तो मज आवडतो १७

हा या अध्यायातील महत्वाचा सार लक्षात ठेवन्यासारखा आहे.
-हरीश