भगवद्गीता - सोप्या मराठीत - ३ व ४

Submitted by एम.कर्णिक on 2 February, 2009 - 01:37

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
कर्मयोग
नावाचा तिसरा अध्याय

अर्जुन म्हणाला,
कर्मापेक्षा श्रेष्ठ बुध्दि हे तुझेच म्हणणे ना ?
तरि युध्दाच्या घोर कर्मी मज लोटिशी, जनार्दना ? १

दुटप्पी तुझ्या उपदेशाने कुण्ठित मति होई
निश्चित एकच मार्ग सांग जो श्रेयस्कर होई २

श्रीभगवान म्हणाले,
हे कौंतेया दोन मार्ग मी वर्णन केले तुजसाठी
संन्याशाचा ज्ञानमार्ग अन् कर्मयोग योग्यांसाठी ३

कर्मारंभ न करण्याने ना होइ मुक्ती प्राप्त
अन् संन्यासी होउनदेखिल सिध्दी दुरापास्त ४

असो कुणीही, कर्मावाचुन बसूच ना शकतो
निसर्गनियमे बध्द कार्यरत असा सदा असतो ५

देखाव्याला इंद्रियसंयम, मनात जप जास्त
अशा नराला केवळ ‘दांभिक’ ही संज्ञा रास्त ६

मनी संयमित राहुनि करि जो कर्मप्रारंभ
निश्रित होतो खास प्रतिष्ठेचा त्याला लाभ ७

रिकामेपणे उगा न बसता कार्य तू करावे
श्रेयस्कर तुज स्वधर्मातले कर्म आचरावे
जाण अर्जुना क्रमप्राप्तही असे काम करणे
कर्म न करता अशक्य होइल उदराचे भरणे ८

यज्ञाखेरिज इतरहि कामे या लोकी, पार्थ
नि:संगपणे तीहि करावी जैसी यज्ञार्थ ९

यज्ञासह घडवुनी विश्व त्वष्टा होता वदला
यज्ञची करिल इच्छापूर्ती प्रदान तुम्हाला १०

देवांना प्रिय यज्ञ करूनिया खूष करा त्याना
तोषवतिल ते तुम्हास, श्रेयस् हे परस्पराना ११

यज्ञाने संतुष्ट देव हे फल सर्वा देती
परत तया जो न देइ त्याची ‘चोरां’मधि गणती १२

यज्ञानंतर उर्वरीत जे त्यावर उपजीवितो
तो नर होतो पापमुक्त अन् मोक्ष प्राप्त करतो
पण जे केवळ स्वत:चसाठी शिजवतात अन्न
अन् स्वत:च भक्षितात ते, ते खाती पापान्न १३

जिवास पोषी अन्न, ज्यास करी पाउस निर्माण
जन्म पावसाचा यज्ञातुन, कर्मांतुन यज्ञ १४

कर्म निघाले ब्रम्हापासुनि, ब्रम्ह ईशरूप
सर्वव्यापि ब्रम्ह म्हणूनच यज्ञाचे अधिप १५

यज्ञकर्मचक्राला या जे अव्हेरती, पार्थ
पापी लंपट आयुष्य त्यांचे हो केवळ व्यर्थ १६

पण आत्म्यामधि मग्न राहुनी आत्म्यातच तुष्ट
ऐशांसाठी कार्य न उरते काही अवशिष्ट १७

ऐसा सज्जन करे काही वा काहीही न करे
कारण इतरांमधी तयाला स्वारस्यच ना उरे १८

कौंतेया, तू कर्म करावे अलिप्त राहून
अनासक्त कर्माचरणामधि आहे कल्याण १९

जनकासम जन सिध्दि पावले आचरून कर्म
लोकाग्रणि होण्यास्तव तुजला उचित नित्यकर्म २०

पुरूषश्रेष्ठ जे जे करतो ते इतर लोक करिती
प्रमाण मानी तो जे त्याला सगळे अनुसरिती २१

पार्था, या तिन्हि लोकी मजला कर्तव्यच नुरले
अथवा काही मिळवायाचे असेहि ना उरले
तरीही पहा कर्मावाचुन राहतो न कधि मी
सदैव असतो, हे पार्था, मी मग्न नित्यकर्मी २२

ध्यानी घे मी राहिन निष्क्रिय जर आळस करूनी
निष्क्रिय बनतिल जनही सारे मजला अनुसरूनी २३

अन् त्या निष्क्रियतेतुन त्यांचा होइल जो नाश
ठरेन कारण मीच अर्जुना त्यांच्या नाशास २४

अजाणते जन करिती कर्में होउनिया लिप्त
लोकाग्रणिने तशिच करावी राहूनि अलिप्त २५

कर्र्ममग्न पण अजाणत्याना कमी न लेखावे
अविकारिपणे कसे करावे कर्म‚ दाखवावे
स्वत: तसे आचरून करावे प्रवॄत्त तयाना
हेच असे कर्तव्य ज्ञानी अन् लोकाग्रणिना २६

प्रकॄतिच्या त्रिगुणानी सारी कर्मे होत असता
अहंकारि अन् अज्ञानी म्हणे, तोच असे कर्ता २७

सुजाण जाणी गुण कर्मातील अध्याहॄत द्वैत
गुणातुनि गुण येती जाणुनि राही अविचलित २८

त्रिगुणांच्या मोहात राहति निमग्न अज्ञानी
सोडुन द्यावा पाठपुरावा त्यांचा सूज्ञानी २ ९

मजवरती सोपवुनी चिंता तू परिणामांची
नि:शंक सुरू करी प्रक्रिया या संग्रामाची ३०

नि:शंकपणे जे माझे आदेश अनुसरती
कर्मबंधनातुन ते श्रध्दावंत मुक्त होती ३१

मत्सरामुळे नकार देती करण्या अनुसरण
ते अविवेकी मूढ पावती नाश खचित जाण ३२

सुजाणही वागती आपुल्या स्वभावानुसार
तसेच जीवहि सर्व, काय मग करायचा जोर? ३३

विषयवासनांमध्ये वसती प्रीति अन् द्वेष
आधीन त्यांच्या कधी न व्हावे, दोन्ही रिपुरूप ३४

कितिहि भासले सोपे परधर्माचे अनुकरण
धर्म आपला पाळावा जरि नसला परिपूर्ण
स्वधर्मातले मरणे देखिल श्रेयस्कर ठरते
परधर्मामधि घुसमत जगणे भीतिप्रद असते ३५

अर्जुन म्हणाला,
इच्छा नसतानाही करिती लोक पापकर्म
कोणाच्या बळजबरीने? मजसी करी कथन मर्म ३६

श्री भगवान म्हणाले,
रजोगुणातुन जन्म घेति जे क्रोध आणि काम
तेच मुळाशी असती याच्या शत्रू अति अधम ३७

अग्नि धुराने‚ दर्पण धुळिने, नाळेने गर्भ
वेढले जसे तसे वेढले या रिपुनी सर्व ३८

सर्वभक्षि अग्नीसम आहे रिपू कामरूपी
तये टाकिले झाकोळुन रे तेज ज्ञानरूपी ३९

बुध्दि आणि मन तशी इंद्रिये तिहीत हा वसतो
ज्ञाना झाकुन टाकुन मनुजा सदैव मोहवितो ४०

म्हणुनि अर्जुना विषयवासनांचे करि संयमन
अन् ज्ञानाच्या, विज्ञानाच्या रिपुचे करि दमन ४१

इंद्रियांहुनी थोर असे मन, मनाहुनीहि मती
मतीहुनीही थोर असे त्या परमात्मा म्हणती ४२

परमात्म्याला जाण, पार्थ, अन् स्वत:स आवरूनी
कामस्वरूपी शत्रूचा तू टाक अंत करूनी ४३

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला

********

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानकर्मसंन्यासयोग
नावाचा चौथा अध्याय

श्री भगवान म्हणाले,
हा सांगितला योग प्रथम मी विवस्वान सूर्याला,
त्याने मनुला, मनुने नंतर स्वपुत्र ईक्ष्वाकूला १

तदनंतर मग परंपरेने इतराना कळला
काळाच्या उदरात पुढे तो गेला विलयाला २

तू माझा प्रिय भक्त अन् सखा असेच मी मानतो
म्हणुनी तोच पुरातन उत्तम योग तुला सांगतो ३

अर्जुन म्हणाला,
विवस्वान हा असे पुरातन, तुझा जन्म तर नवा
कसा भरवसा व्हावा त्याला कथिला योग तुवा ? ४

श्री भगवान म्हणाले,
तुझे नि माझे जन्म अर्जुना झाले रे अगणित
ज्ञात मला ते सर्व परंतु तुज नाही माहित ५

सर्व जिवांचा ईश्वर मी, जरि ना जन्मि ना मॄत
स्वेच्छापूर्वक संभव घेतो याच प्रकॄतीत ६

जेव्हा जेव्हा अवनीवरती धर्मर्‍हास होतो
अधर्मनाशास्तव मी तेव्हा जन्माला येतो ७

सज्जनरक्षण, कुकर्मनाशन, धर्मस्थापनार्थ
युगा युगातुनि जन्म घेउनी मी येतो, पार्थ ८

दिव्य असे मम जन्म, कर्म हे जाणवती ज्याला
पुर्नजन्म ना लागे त्याला मिळे येउनी मला ९

माया भय अन् क्रोध त्यागुनी ठेवुनि विश्वास
विशुध्द बनलेले ज्ञानी मज आले मिळण्यास १०

करती माझी भक्ति अशी जे त्यांवरती प्रीती
करतो मी‚ ते येती सर्वश: मम मार्गावरती ११

इहलोकातच त्वरीत व्हावी सिध्दीची प्राप्ति
इच्छुनिया हे फल, पूजा देवांचि इथे करती १२

गुणकर्माअनुसार निर्मिले मी चारी वर्ण
त्यांचा कर्ता, तसेच भर्ता मीच असे जाण १३

कर्मबंध ना मजला, वा मी ना ठेवि फलाशा
हे जो जाणी त्या न बांधिती कर्म नि अभिलाषा १४
पूर्वी जैसी मोक्षेच्छूनी कर्मे आचरिली
तशिच अर्जना, तूहि करावी ती कर्में आपुली १५

काय करावे, काय करू नये कठिण जाणण्यास
दाखवीन मी अशुभमुक्तीप्रद कर्में करण्यास १६

कर्माकर्मामधिल भेद ना सोपा समजावा
कर्म, अकर्म नि दुष्कर्मातिल फरक कळुन घ्यावा १७

ज्याला दिसते कर्म अकर्मासम वा अकर्म कर्म
तो ज्ञानी, बुध्दिमान, जाणी कर्मांतिल मर्म १८

ज्याची सारी कर्मे असती कर्मफलेच्छेविना,
जाळी ज्ञानाग्नित कर्में, तो ‘पंडित’ सकलजनां १९

फलप्राप्तीची आस सोडुनी निरिच्छ अन् तॄप्त
कर्म करी तरि प्रत्यक्षामधि राहि तो अलिप्त २०

आशाविरहित, चित्तसंयमित, शरीरधर्माची
कर्मे करी जो त्या न लागती पापे कर्माची २१

हर्षशोक, हेवेदावे अन् यशअपयश दोन्ही
समान समजुन कर्तव्य करी असा पुरूष ज्ञानी
दैवेच्छेने मिळे त्यात तो मानि समाधान
पापपुण्य कर्मांतिल त्याला ना ठरते बंधन २२

निरिच्छ अन् समबुध्दी ज्ञानि जे करी यज्ञकार्य
त्या कर्मातिल गुणदोषांचा होइ पूर्ण विलय २३

यज्ञार्पणहवि, यज्ञाग्नी, अन् हवन यज्ञकर्म
ब्रम्हरूप हे तिन्ही जो करी त्यास मिळे ब्रम्ह २४

देवांसाठी कोणी योगी यज्ञकार्य करिती
तर कोणी यज्ञाची पूजा यज्ञाने मांडती २५

नाक कान अन् दॄष्टी यांचा संयम पाळुनिया
उच्चारण करि त्या जिव्हेला आवर घालुनिया
एक प्रकारे या सर्वाचे असे हवन करून
कोणी योगी आचरिती जे तेहि असे यजन २६

सर्व इंद्रियांच्या कर्मांचे ज्ञानाग्नित हवन
करिति कोणी तो असतो आत्मसंयमन यज्ञ २७

धन, तप, आत्माभ्यास असे कितितरी विविध यज्ञ
करीत असती पूर्णव्रताचरणी ऐसे सूज्ञ २८

श्वासोच्छवासावरी ठेवती ताबा मुनि काही
प्राणायामाच्या स्वरूपातिल यज्ञाचे आग्रही २९

अन्ननियोजन हेही कुणाला यज्ञासम ज्ञात
सर्व यज्ञकर्मी ऐसे हे असति पुण्यवंत ३०

यज्ञानंतर उरते अमॄत तेच फक्त भोगिती
ते पुण्यात्मे परलोकामधि ब्रम्हस्थान मिळविती
यांपैकी एकही यज्ञ ना करती जे लोक
इहलोकातहि नाहि स्थान त्यां कुठून परलोक ? ३१

वेदांमध्ये या सा~या यज्ञांचे वर्णन आहे
कर्मामधुनी जन्म तयांचा सत्य जाण तू हे
ब्रम्हमुखाने सांगितलेल्यावरती दे लक्ष
या सत्याचे आकलन होता पावशील मोक्ष ३२

धनयज्ञाहुन मोठि श्रेष्ठता ज्ञानयज्ञाची
ज्ञानसाधना करून होते प्राप्ती मोक्षाची ३३

वंदन आणिक सेवा करूनि विचार ज्ञानिजनां,
उपदेशाने देतिल तुजला ज्ञान, कुंतिनंदना ३४

त्या ज्ञानाच्या योगे होशिल तूहि मोहमुक्त
समाविष्ट दिसतील सर्व जिव तुझ्या नि माझ्यात ३५

आणि मानले जरि पाप्यांहुन तू पापी असशी
ज्ञानाच्या जोरावर जातिल विरून पापराशी ३६

समिधा अग्नीमधी टाकिता होति भस्मसात
तशा प्रकारे ज्ञान करी कर्मांचा नि:पात ३७

या अवनीवर पवित्र ज्ञानाहून नसे काही
सिध्दयोगि पुरूषाला याची जाणिव मग होई ३८

ज्ञान हे मिळे समत्वबुध्दी श्रध्दावंताना
ज्या योगे ते अखेर जाती चिरशांतिनिधाना ३९

अज्ञ आणि अश्रध्द संशयात्म्यांचा हो नाश
इहपरलोकी त्या न मिळे शांतीचा लवलेश ४०

आत्मज्ञान मिळवून फलेच्छा जो टाकी त्यजुनी
कर्मयोगि तो होइ मुक्त मग कर्मबंधनातुनी ४१
अज्ञानातुनि जन्मुनि वसतो मनात जो संशय
ज्ञानाच्या खड्गे छिंदुनि तो उठि रे धनंजय ४२

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला
**********
अध्यायांसाठी दुवे :
अध्याय आठरावा http://www.maayboli.com/node/6531
अध्याय सतरावा http://www.maayboli.com/node/6448
अध्याय सोळावा http://www.maayboli.com/node/6370
अध्याय पंधरावा http://www.maayboli.com/node/6307
अध्याय चौदावा http://www.maayboli.com/node/6226
अध्याय तेरावा http://www.maayboli.com/node/6166
अध्याय बारावा http://www.maayboli.com/node/6101
अध्याय अकरावा http://www.maayboli.com/node/6072
अध्याय दहावा http://www.maayboli.com/node/5966
अध्याय नववा http://www.maayboli.com/node/5937
अध्याय आठवा http://www.maayboli.com/node/5868
अध्याय सातवा http://www.maayboli.com/node/5790
अध्याय सहावा http://www.maayboli.com/node/5720
अध्याय पाचवा http://www.maayboli.com/node/5651
अध्याय चौथा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय तिसरा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय दुसरा http://www.maayboli.com/node/5479
अध्याय पहिला http://www.maayboli.com/node/5479

प्रिय मित्रांनो,
माझ्या इतर कवितांसाठी माझ्या http://mukundgaan.blogspot.com या ब्लॉगवर भेट देण्याचे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
-मुकुंद कर्णिक.

गुलमोहर: 

छान. पुढचे येउ द्या.

खुप छान आणि ज्ञानवर्धक. पहिल्या दोन अध्यायाची लिंक द्या ना.
धन्यवाद.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

धन्यवाद, विशाल आणि जागू,
mkarnik नावावर टिचकी मारली असता "व्यक्तिरेखा" आणि "पाऊलखुणा" असे दोन विभाग दिसतील. "पाऊलखुणां" मध्ये मी केलेले सर्व लेखन आपल्याला पहायला मिळेल. त्यात पहिले दोन्ही अध्याय आहेत. एक दोन दिवसात पुढील अध्याय पोस्ट करेन. तेही आपल्याला आवडतील अशी आशा करतो.

लोभ असावा ही विनंती.
-मुकुंद कर्णिक