सार्थ गणपत्यथर्वशीर्ष

Submitted by झक्की on 25 August, 2009 - 23:53

असे म्हणतात की श्रीगणेशाने दृष्टांत दिल्यानंतर अथर्व ऋषींनी अथर्वशीर्ष लिहिले. संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्षाची एक हजार (सहस्त्रावर्तन), एकशे आठ अथवा एकवीस आवर्तने करतात. उपनिषदाने आवर्तनाची सुरुवात होते आणि श्रीगणेशाची आठ नावे घेऊन ते संपते.

अथर्वशीर्षाची नियमीत आवर्तने करणारे आपल्यात अनेक असतील. बर्‍याचदा असे होते की धार्मिक विधी अथवा परंपरा पाळत असताना आपल्याला त्याचा अर्थ ठाऊक नसतो, फलश्रुति ठाऊक नसते. ह्यासाठीच यंदाच्या गणेशोत्सवात खास मायबोलीकरांसाठी संपूर्ण अथर्वशीर्षाचा मराठीत अनुवाद केला आहे. तर समजावून घेऊयात अथर्वशीर्षाचा अर्थ आणि उद्देश !!!

| श्रीगणेशाय नम: |
शांतिमंत्र
ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: | भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: | व्यशेम देवहितं यदायु: ||१||

ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: | स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: |
स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: | स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||२||

ॐ शांति: शांति: शांति: ||

ॐ तन्मामवतु तद्वक्तारमवतु
अवतु माम् अवतु वक्तारम्
ॐ शांति: शांति: शांति: ||

हे देवांनो, आम्ही आमच्या कानांनी कल्याणमय वचने ऐकावीत, आम्ही आमच्या डोळ्यांनी शुभ दृष्ये पहावीत (कल्याणमय वचने कानावर पडावी, शुभ दृष्ये डोळ्यांना दिसावीत). तुम्ही पूजनीय आहात. आम्हांला दिलेले आयुष्य उत्तम प्रकृतीने भोगून आमच्याकडून तुमची स्तुती होवो. भाग्यवान इंद्र आमचे पोषण करो. सर्व जाणणारा पूषा आमचे पोषण करो. ज्याला कोणी अडवत नाही असा तार्क्ष्य आमचे पोषण करो. बृहस्पती आमचे पोषण करो. तो माझे रक्षण करो, तो बोलणार्‍याचे रक्षण करो.

उपनिषद
ॐ नमस्ते गणपतये | त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि |
त्वमेव केवलं कर्ताऽसि | त्वमेव केवलं धर्ताऽसि |
त्वमेव केवलं हर्ताऽसि | त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि |
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ||१||

गणपतीला नमन. तूच वेदातील तत्त्वज्ञान आहेस, तू कर्ता आहेस, रक्षणकर्ता आहेस, आणि जग नष्ट करणारा आहेस. तूच हे सर्व ब्रह्म आहेस. तूच परमात्मा आहेस.

स्वरूप तत्त्व
ऋतं वच्मि | सत्यं वच्मि || २||

अव त्वं माम् | अव वक्तारम् | अव श्रोतारम् | अव दातारम् |
अव धातारम् | अवानूचानमव शिष्यम् | अव पश्चात्तात् | अव पुरस्तात् |
अवोत्तरात्तात् | अव दक्षिणात्तात् | अव चोर्ध्वात्तात् | अवाधरात्तात् |
सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् || ३ ||

मी योग्य व सत्य वचन करीन. तू माझे रक्षण कर. तू बोलणार्‍याचे रक्षण कर. तू ऐकणार्‍याचे रक्षण कर. तू देणार्‍याचे रक्षण कर. तू घेणार्‍याचे रक्षण कर. तू गुरूंचे रक्षण कर, तू शिष्यांचे रक्षण कर. तू माझे पश्चिमेकडून (येणार्‍या संकटांपासून) रक्षण कर. पूर्वेकडून रक्षण कर. उत्तरेकडून रक्षण कर. दक्षिणेकडून रक्षण कर. उर्ध्व दिशेकडून रक्षण कर नि अधर (म्हणजे खालील) दिशेकडून रक्षण कर. माझे सर्व बाजूंनी रक्षण कर.

त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय: | त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः ||
त्व सच्चिदानंदाद्द्वितीयोऽसि | त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि |
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि || ४||

तू सर्व शब्द, मन, आहेस. तू सत्यमय, आनंदमय व ब्रह्यमय आहेस. तू अद्वैत जगाचे सार आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस.

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति |
सर्वं जगदिद त्वयि लयमेष्यति | सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति |
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ: | त्वं चत्वारि वाक्पदानि || ५ ||

हे सर्व जग तुझ्यापासून निर्माण झाले. हे सर्व जग तुझ्यामुळे चालते, हे सर्व जग तुझ्यातच नष्ट होते. हे सर्व जग सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. तू भूमी, जल, अग्नी, वायू व आकाश आहेस.

त्वं गुणत्रयातीत: | त्वं देहत्रयातीत: |
त्वं कालत्रयातीत: | त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ||
त्वं शक्तित्रयात्मक: | त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् |
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं | ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ||

तू तीन गुणांच्या (सत्त्व, रज, तम) पलीकडील आहेस. थोडक्यात, तुझे वर्णन करणे देह, काल, अवस्था (जागृती, निद्रा, स्वप्न) यांच्यापलीकडे आहे. योगी लोक सतत तुझेच ध्यान करतात. ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र व भू, भुवः, स्वः, हे तिन्ही लोक तुझ्यात सामावलेले आहेत. (मनुष्य प्रथम भूमीवर जगतो. मृत्यूनंतर आत्मा भुवः लोकात जातो, तिथून जसजसा तो पवित्र होत जातो, तसतसा तो स्वः मः जनः तपः लोकांतून शेवटी सत्य लोकात जातो. पैकी पहिल्या तीन लोकात श्रीगणेशाचे वर्चस्व आत्म्यावर असते.)

गणेश मंत्र
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम् |
अनुस्वार: परतर: |
अर्धेंदुलसितम् | तारेण ऋद्धम् |
एतत्तव मनुस्वरूपम् | गकार: पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् |
अनुस्वारश्चान्त्यरूपम् | बिंदुरुत्तररूपम् | नाद: संधानम् | संहिता संधि: | सैषा गणेशविद्या |
गणकऋषि: | निचृद्गायत्रीच्छंद: | गणपतिर्देवता | ॐ गँ गणपतये नम: ||७||

गं या अक्षरात व ॐ या अक्षरात श्रीगणेश सामावलेले आहेत. सर्व विद्यांचे मूळ तेच आहे. या मंत्राचा कर्ता गणक ऋषी, छंद ( काव्यातील meter) 'निचृद्गायत्री', देवता गणपती. गं अक्षराला वंदन करून मी गणपतीला वंदन करतो. (ॐ नि गं ही गणेशविद्येची वैदिक रूपे आहेत.)

गणेश गायत्री
एकदंताय विद्महे | वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंती प्रचोदयात् || ८ ||

श्रीगणेश हा एकद राक्षसाचा अंत करणारा तसेच वाईट लोकांचा नाश करणारा आहे. तो आम्हाला उत्साहवर्धक असो.

गणेश रूप
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् |
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ||
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् |
रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम् ||

हे आपल्या माहितीचे श्रीगणेशाचे रूप - एक दात, चार हात, हातात पाश व अंकुश, सोंड, आशीर्वाद देणारा हात, उंदीर हे वाहन, लाल रंग, मोठे पोट, सुपासारखे कान, लाल वस्त्रे नेसलेला, लाल रंगाचे गंध लावलेला, लाल फुलांनी ज्याची पूजा केली आहे असे हे श्रीगणेशाचे स्वरूप आहे.

भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् |
आविर्भूतं च सृष्ट्यादौ | प्रकृते: पुरुषात्परम् ||
एवं ध्यायति यो नित्यं | स योगीं योगिनां वर: || ९ ||

तो भक्तांवर दया करतो, सर्व जगाचे निर्माण त्याने केले आहे, तो आपल्या मार्गावर स्थिर आहे. सृष्टीच्या सुरुवातीला प्रकृती व पुरुष त्यानेच निर्माण केले. असे चिंतन जो नेहेमी करतो, तो सर्व योग्यांपेक्षा श्रेष्ठ
आहे.

अष्ट नाम गणपती
नमो व्रातपतये | नमो गणपतये | नम: प्रमथपतये | नमस्तेSस्तु लंबोदरायैकदंताय |
विघ्ननाशिने शिवसुताय | श्रीवरदमूर्तये नमो नम: || १० ||

ही गणपतीची आठ नावे: व्रातपती, गणपती, प्रथमपती, लंबोदर, एकदंत, विघ्ननाशिन, शिवसूत, वरदमूर्ती.
यांना पुनः पुनः नमस्कार असो.

काही लोक इथेच पाठ संपवतात. यानंतर हे अथर्वशीर्ष म्हणण्याचे फायदे (फलश्रुति) वर्णन केले आहेत.

फलश्रुति
एतदर्थवशीर्षं योSधीते | स ब्रह्मभूयाय कल्पते | स सर्वत: सुखमेधते |
ससर्वविघ्नैर्न बाध्यते | स पंञ्चमहापापात्प्रमुच्यते | सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति |
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति | सायंप्रात: प्रयुञ्जानो अपापो भवति |
सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति | धर्मार्थकाममोक्षं च विंदति ||

या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो (वाचन, मनन, चिंतन) तो ब्रह्माच्या योग्यतेचा होतो. त्याला सर्व बाजूंनी सुख मिळते. त्याला विघ्नांची बाधा होत नाही, पाच महापापांपासून त्याची सुटका होते. जो संध्याकाळी अध्ययन करतो, त्याने दिवसा केलेली पापे नाहीशी होतात. जो सकाळी अध्ययन करतो, त्याने रात्री केलेली पापे नाहीशी होतात. सकाळ संध्याकाळ अध्ययन करणारा निष्पाप होतो. सर्व ठिकाणी जप करणार्‍याची सर्व विघ्ने नाहीशी होतात. त्याला धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे सर्व प्राप्त होतात.

इदमथर्वशीर्षंमशिष्याय न देयम् | यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति |
सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् || ११ ||

हे अथर्वशीर्ष 'अशिष्याला' देऊ नये. अशिष्य म्हणजे ज्याची योग्यता नाही असा (ज्याची श्रद्धा नाही असे लोक). जर कुणी मोहामुळे (पैशासाठी) देईल, तो महापापी होईल. एक हजार वेळा जो याचे अध्ययन करेल त्याची जी जी इच्छा असेल ती ती यामुळे पूर्ण होईल.

अनेन गणपतिमभिषिंचति | स वाग्मी भवती |
चतुर्थ्यामनश्नन् जपति | स विद्यावान भवति |
इत्यथर्वणवाक्यम् |
ब्रह्माद्याचरणं विद्यात् | न बिभेति कदाचनेति || १२ ||

या मंत्राने जो गणपतीवर अभिषेक करतो, तो उत्तम वक्ता होतो. जो चतुर्थीच्या दिवशी उपाशी पोटी जप करतो तो विद्यावान होईल. तो यशस्वी होईल. असे अथर्वऋषींनी सांगितले आहे. त्याचे नेहेमी चांगले आचरण होईल, व तो कधीही कशालाही घाबरणार नाही.

यो दुर्वांकुरैर्यजति | स वैश्रवणोपमो भवति |
यो लाजैर्यजति स यशोवान् भवति | स मेधावान् भवति |
यो मोदकसह्स्रेण यजति | स वाञ्छितफलमवाप्नोति |
यः साज्यसमिद्भिर्यजति | स सर्वं लभते स सर्वं लभते || १३ ||

जो दूर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासारखा (श्रीमंत) होतो. जो (भाताच्या) लाह्यांनी हवन करतो तो यशस्वी (व) बुद्धिमान होतो. जो एक हजार मोदकांचा नैवेद्य दाखवेल त्याला इच्छित फळ मिळेल. जो तूप व समिधा यांनी हवन करेल त्याला सर्व काही मिळेल. त्याला सर्व काही मिळेल.

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति |
सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति |
महाविघ्नात्प्रमुच्यते | महादोषात्प्रमुच्यते |
महापापात्प्रमुच्यते | स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति |
य एवं वेद इत्युपनिषद् || १४ ||

जर आठ योग्य शिष्यांना हे कुणी शिकवले तर तो सूर्याहून श्रेष्ठ होतो. सूर्यग्रहणात, महानदीत (म्हणजे गंगा वगैरेसारखी नदी) किंवा मूर्तीजवळ जर याचा जप केला तर या मंत्राचे सर्व फायदे मिळतील. मोठ्या संकटांतून, मोठ्या दोषांपासून, मोठ्या पापांपासून सुटका होईल. अशा तर्‍हेने हे रहस्य जो चांगल्या रीतीने जाणतो तो सर्वज्ञ होतो.

शांतिमंत्र
ॐ सहनाववतु | सह नौ भुनक्तु | सह वीर्यं करवावहै |
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ||

आपल्या दोघांचे (गुरू व शिष्य) रक्षण होवो. आपण एकत्र याचे सेवन (वाचन, श्रवण, मनन) करू. आपल्या दोघांच्या प्रयत्नांनी आपले अध्ययन अधिक तेजस्वी (प्रभावी) होवो. आपल्याला कुणाबद्दलही द्वेष असू नये.

शांतिमंत्र
ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: | भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: | व्यशेम देवहितं यदायु: ||१||

ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: | स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: |
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: | स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||२||

ॐ शांति: शांति: शांति: ||

ॐ तन्मा अवतु
तद्वक्तारमवतु
अवतु माम्
अवतु वक्तारम्
ॐ शांति: शांति: शांति: ||

|| श्रीगणेशार्पणमस्तु ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा! धन्यवाद झक्की ह्या लेखाबद्दल..
कोंणाला प्रथमपती अथवा प्रमथपती चा अर्थ माहिती आहे का? कृपया कळवा.

झक्की, अनुवाद मस्त झाला आहे.

आता उल्लेख केलाच आहे तर ती कालिदास आणि ज्ञानेश्वरांची उपमा सांगून टाका..

खूप छान... किरण रोज अथर्वशीर्ष म्हणतो पण त्यालाही अर्थ माहित्ये कि नाही महित नाही. त्यालाही वाचायला देइन.
खरच प्रिंट काढुन ठेवायला हव.

चिन्नू , तुम्हाला 'प्रथमेश' म्हणायचय का? कारण 'प्रथम + इश' प्रथमेश नक्कीच म्हणतात असा माझा समज आहे. याशिवाय 'प्रमथेश' देखील म्हणतात का?
दुसरा असा अंदाज की प्रमथ म्हणजे प्रमाद आणि त्याचे पतन करणारा (पती नाही) म्हणून 'प्रमथ पतये'..
पण मग 'गणपतये' -> गणपती .. हं... जरा चौकशी केली पाहिजे संस्कृत प्रचुर विद्वानां कडे..

उपासक,
मी काही संस्कृत प्रचुर विद्वान नाही .. तुम्हांला ज्यांना विचारायचे असेल त्यांना नक्की विचारा Happy
पण प्रमथ म्हणजे शिवगण. नंदी, भृंगी, शृंगी हे या गणांमध्ये येतात.

बाकी वर कुणी तरी श्रीसूक्ताचा अर्थ विचारला आहे. थोडी सवड मिळाली की नक्की टाकेन.

झक्की, अतिशय चांगले काम केले आहे तुम्ही .. आपण कुठलीही उपासना करतो तेव्हा त्याचा अर्थ काय आहे हे समजून केले तर त्याला प्रचंड महत्व येते.
प्रत्येक उपनिषदांच्या सुरुवातीला आणि शेवटी असतांत त्याप्रमाणे यांतही शांतिपाठ आहेत. त्रिविध (आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक) तापांची शांती व्हावी यासाठी ही प्रार्थना.
अथर्वशीर्षात गणेशाची तीन पद्धतीने उपासना केली आहे.
दुसरेच चरण, "त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि", हे थेट ब्रह्माचे सूचक आहे. "तत्वमसि" या सामवेदातील छांदोग्य उपनिषदातल्या महावाक्याचा इथे संदर्भ आहे. "ते तू आहेस" तत् त्वम् असि, असे संबोधून गणपतीला ब्रह्मस्वरुप, आत्मस्वरुप समजलेले आहे. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सिष्ठती, लयमेष्यति आणि प्रत्येति मधून ब्रह्मस्वरुप गणपती हा भासमान् विश्वाचे अधिष्ठान आहे हे सांगितले आहे.
पुढे त्यांच गणेशाची निराकार ईश्वररुपाने प्रार्थना केली आहे. चारी वाणींचा दाता, सत्व-रज-तम अशा गुणत्रयांपलीकडला, स्थूल-सूक्ष्म-कारण अशा देहत्रयांपलीकडला, मूलाधारामध्ये राहणारा परमेश्वर अशी त्याची स्तुती केली आहे.
सर्वांत शेवटी त्याची सगुण साकार अशा चतुर्भुज, लंबोदर, रक्तवर्णी गंधाने पूजित केलेल्या गजाननरुपांत पूजन केले आहे.
असे हे सुंदर स्तोत्र समजून, उमजून म्हणा. सुखस्वरुप विघ्नहर्त्याकडे फक्त प्रासंगिक किंवा प्रापंचिक दु:ख निवारण मागण्यापेक्षा पूर्णतः सुखरुप होण्याचे मागणे मागा.

श्रीकृष्णार्पणमस्तु!

उपासक,
प्रमथः याचे दोन अर्थ होतात. एक घोडा आणि दुसरा म्हणजे शिवगण. Destroying pride कुठे बसतं मला कळलं नाही. त्याची व्युत्पत्ती काय आहे हे ही कळलं नाही. गर्वनाश, अहंकारनाश असा अर्थ करत असाल तर "प्रमथ:" यांत अहंकार, गर्व हे शब्द कुठेही नाहीत.
हो, प्रमथन याचा अर्थ नाश करणे असा होतो. पण "प्रमथपतये" हा शब्द प्रमथः वरुन आला आहे. प्रमथाधिपः, प्रमथनाथः, प्रमथपति: हे सर्व शब्द गणेशसूचक आहेत.
बाकी ही अहंकार हरण करुन ज्ञान देणारी देवता आहेच.. त्यामुळे गणपतीचे हे विशेषणही योग्यच आहे, शब्दार्थ नाही.
असो. मोरया!

असे म्हणतात की ज्याला निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या ठिकाणी, सत्य, ब्रह्म, परमेश्वर, परमात्मा, परब्रह्म, इ. संज्ञांनी संबोधले आहे, ज्याला ब्रह्मा, विष्णू, शंकर, गणेश इ अनेक नावांनी संबोधले आहे, ते सर्व आध्यात्मिक दृष्ट्या 'एकच' आहे.

म्हणूनच श्री गणेशाची बारा नावे (संकटनाशन स्तोत्र,) आठ नावे, विष्णुसहस्त्रनाम अशी प्रत्येक देवाची असंख्य नावे असली तरी फरक पडत नाही.
एकं सत् विप्रा बहुधा वदंति |

बाकी नावे, त्यांची व्युत्पत्ति, व त्यांचे अर्थ हा केवळ भाषाशास्त्राचा विषय आहे. आध्यात्मिक दृष्ट्या जसजसे आपण परमात्म्याशी एकरूप होऊ लागतो, तसतसे ऐहिक जगातील सर्व गोष्टी निरर्थक होतात. त्यात भाषा पण. तसे नसते तर मुक्या लोकांनी काय केले असते?

झक्की,
साहित्य सेवे साठी भाषेबद्दल जिज्ञासा! परमात्म्याशी एकरूप होण्याकरता भजनांची / स्तोत्रांची मदत होते आणि त्यातील शब्द हे त्यातल्या अर्थामुळेही भाविकांना आणि भक्तांना भक्तीचा भाव देतात. म्हणून शक्यतो सार्थ शब्द वापरण्याचा माझा प्रयत्न असतो. (आग्रह किंवा दुराग्रह नाही, प्रयत्न मात्र जरूर). केवळ त्याकरताच ही चर्चा. एकदा तो भाव आला आणि आपण परमात्म्यशी एकरूप होऊ लागलो की तुम्ही म्हणता त्यानुसार अर्थांना काहीच अर्थ उरत नाही. एकदम मान्य!
क्ष,
माझा दहावी (ब) नंतर संस्कृत चा अभ्यास नाही. त्यामुळे मी अजून एक datapoint म्हणून sanskrit dictionary गुगलले आणि त्यात हे सापडले. त्यांचा अर्थ बरोबर आहे की नाही हयाची कल्पना नाही. त्यानी नुसत्या 'प्रमथ' चा अर्थ दिलाच नाहिये तेव्हा तुम्ही म्हणता तेच बरोबर असण्याची शक्यता आहे!
चू. भू. दे. घे.

जय हेरंब!

>>>> तसे नसते तर मुक्या लोकांनी काय केले असते?
अगदी अचूक मुद्दा झक्की
खोलात जाऊन विचार केला तर पन्चेन्द्रियान्नाच ज्ञानेन्द्रियेही म्हणतात ना?
म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची साधने, याउप्पर काही नाही
अन त्यातिल एक वा अनेक नसतील, तरी ज्ञान ग्रहण होण्याचे थाम्बतेच असे नाही
किम्बहूना मी तर म्हणतो की जर इश्वरी कृपा असेल तर "ज्ञानाचा" उद्गम/उद्भव देखिल मठ्ठ डोक्यात होऊ शकतो Happy
रेड्याच्या तोन्डून वेद वदवून घेणे हा तर एक बाह्यात्कारी चमत्कार, बाकि लोकान्करता!
अन्यथा वेद अनित्य व अपौरुषेयच आहेत
कुणी पुस्तके जाळली, माणसे कापली, तरी नविन पिढीमधे "विचार" स्फुरणारच नाहीत असे नाही, अन स्फुरणारे विचार, या शास्त्रान्बद्दल असणार नाहीत असेही नाही!
जुन्या घड्या विस्कटल्या जातात, नविन कापडे नविन घड्या घातल्या जातात
तथ्य तेच रहाते! Happy

माझ्याकडे सार्थ अथर्वशीर्ष आहे, त्यातदेखील प्रमथपती असेच दिले आहे.
प्रमथेश हे नाव मित्राच्या मुलाचे नाव. सुरुवातीला मी प्रथमेशच ऐकले होते, पण नंतर मित्रांनी 'प्रमथेश - हे नाव गणपतीचे' असे सांगून खुलासा केलेला.

झक्कि, याचे पठण पण योग्य त्या उच्चारातच व्हायला हवे. अनेकजणांच्या आवाजात ते उपलब्ध असले तरी जे लताचे आहे, ते माझ्यामते तरी सर्वोत्तम आहे. अगदी लहान मुलाना आदर्श उच्चार कसे असावेत, ते ऐकवण्यासाठी तरी हे संग्रही असावेच.

झक्की,

दोस्ता, हे मात्र झकास केलस! खूप बर वाटल!!

ऋतं वच्मि | सत्यं वच्मि || २||

"मी योग्य व सत्य वचन करीन..... तू माझे रक्षण कर."

अध्यात्मामधील 'सत्य' याचा अर्थ, काळातीत असणारे, सर्वकाळी 'सत्य' असणारे असे!मग असे 'सत्य आणि योग्य' वचन जर 'अथर्वकार' करित असतील तर त्यांना, आपल कोणीतरी 'रक्षण' करावे, असे का बरे वाटावे? त्यांनी तर निर्भय असायला हव, नाही का ?

याचा अर्थ... 'अथर्वकार' हे 'आत्मज्ञानी' आहेत, आणि जर हे 'आत्मज्ञान' दुसर्‍यास द्यायचे असेल तर, 'शब्देविण संवादु' असेच शक्य आहे, ते जर शब्दात मांडले तर ते ज्ञान 'मलीन' होते. 'आत्मज्ञान' ग्रहण करणारी 'बुध्दी' आणि शब्द रुपाने प्रकट करणारी 'वाचा' या दोन स्वतंत्र इंद्रिया मधील ज्ञान-प्रवासात, 'संवाद-अंतर' पडते, त्यामूळेच ते 'मलीन' होते. म्हणूनच 'अव त्वं माम्' असे 'ज्ञानी' अथर्वकार म्हणत आहेत.

'तत्त्वमसि,कर्ताऽसि, धर्ताऽसि, हर्ताऽसि आणि सर्वं खल्विदं ब्रह्मासि' , मूलाधारस्थितोऽसि (जगतास 'कारण' असणार्‍या 'मूळमायेचाही आधार' )असणार्‍या, सर्व साक्षी आणि नित्य असणार्‍या 'श्रीब्रम्हगणेशास' वंदन!

ॐ शांति: शांति: शांति:!

त्वं ब्रह्मा: त्वं विष्णु: स्त्वंरूद्र: स्त्वंइंद्र: स्त्वंअग्नि: स्त्वंवायु: स्त्वंसूर्यं: स्त्वंचंद्रमा: स्त्वंब्रह्मभूर्भुवः स्वरोम् || ??????
>>>
लिम्बाजीराव, विसर्गाचे रूपान्तरण सन्धी होताना काही ठिकाणी अर्धा 'स' तर काही ठिकाणी अर्धा'र' होते पण ते विसर्गाच्या ऐवजी. विसर्ग आणि हा स आणि र दोन्ही एकत्र येणार नाहीत. त्यामुळे एक तर विष्णु: त्वं रुद्रः त्वं इन्द्रः असे तरी होईल नाहीतर विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं असे तरी होईल. यात त्वं हे सम्बोधन शेवटी घेण्याच्या ऐवजी सुरुवातीस घेतलेले असल्याने त्वं ब्रम्हः, त्वं विष्णु: , हा क्रम बरोबर वाटतो. त्यामुळे स जोडण्याचे कारण नाही.
(बाकी एवढे चांगले काम केल्याबद्दल पापाचा भार रतीभर तरी कमी झाला असेल :फिदी:)

प्रमथपतये = शिवगणांचा स्वामी.

गणपती ही मूळची आर्येतर देवता असल्याबद्दल बहुतेक संशोधकांचे एकमत आहे. हनुमान, देवी, वेताळ यांसारख्या आर्येतर ग्रामदेवतांबरोबर ती खेड्यात एखाद्या झाडाखाली असे. या सर्व देवतांना शेंदूर फासला जातो. या देवतांसमोर बळी देऊन त्या रक्ताचा अभिषेक करत असत. शेंदूर हे त्या रक्ताचेच प्रतीक आहे. आर्येतरांच्या विविध प्रकारच्या मूर्तिपूजा व देवता यांचा समावेश होऊन आर्य व आर्येतरांची संस्कृती एकात्म बनू लागण्याच्या काळात, इसवी सनापूर्वी व इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांत , गणपती हा देव आर्येतरांच्या इतर देवतांबरोबरच आर्यांनी स्वीकारला असावा.

सुरुवातीला गणेशाची गणना शंकराच्या गणात होऊ लागली. पुढे लवकरच तो शिवगणांचा पती झाला. शिवगणांचे प्रमुखपद गणपतीला मिळाल्यावर त्याचे भक्त तेवढ्यावरच थांबली नाहीत. त्यांनी त्याला शिव-पार्वतीचा पुत्र व कार्तिकेयाचा भाऊ ठरवले.

झक्की अनेकानेक धन्यवाद! श्री सूक्ताचा अर्थ वरती कोणी तरी देतो म्हणाले अन्यथा मी नवरात्रात लिहायचा प्रयत्न करेन. शुभं भवतु!
बोला.. गणपती बाप्पाsssssss...... मोsssssssरया!!

मी हा सार्थ मजकुर छापुन घेऊन ल्यामिनेट करुन बरोबर ठेवणार आहे, म्हणजे उद्या श्रीगणेश प्राणप्रतिष्ठापना करते वेळेस कुणास अर्थ सान्गायची वेळ आल्यास उपयोगी पडेल.
पुनःश्च धन्यवाद झक्की Happy

झक्कीजी

खरंच मनापासून धन्यवाद. आमच्यासारख्यांना कळेल इतकं सोपं लिहीलतं.
( या निमित्ताने जे सांगायचंय तोच अर्थ असलेलं सरळसोट लिखाण तुमच्याकडून झालं. हीच श्रींची इच्छा !)

"आपला संपूर्ण चातुर्मास " ह्या पुस्तकाच्या शेवटी अथर्वशीर्ष संपूर्ण अर्था सकट (बोली मराठी) दिलयं.
सहज सोप्पा अर्थ आणी का म्हणायचं, कसं म्हणायचं हे पण दिलयं.

>>>> (या निमित्ताने जे सांगायचंय तोच अर्थ असलेलं सरळसोट लिखाण तुमच्याकडून झालं. हीच श्रींची इच्छा !) <<<
अनिलभौ, गफलत करू नका! Proud
जे सरळसोटपणे सान्गितल गेलय ते अथर्वऋषीन्नी सान्गितलय, झक्कीन्नी इथे फक्त ते टाईप केलय Wink
त्यान्ना जे काय सान्गायचे होत किन्वा असेल किन्वा असतं, त्यातला एकही शब्द त्यान्नी इथे लिहीलेलाच नाहीये!

झक्की ,खूप खूप धन्यवाद.मायबोलीवर ,अगदी घरगुती गणपतीसारखा आदल्यादिवशीच गणपती आणल्यासारख वाटल .
'' गणपतीबाप्पा मोरया ''

दोन वर्षापूर्वीचे लिखाण पुनः जागे केलेत, धन्यवाद.
जे सरळसोटपणे सान्गितल गेलय ते अथर्वऋषीन्नी सान्गितलय, झक्कीन्नी इथे फक्त ते टाईप केलय
त्यान्ना जे काय सान्गायचे होत किन्वा असेल किन्वा असतं, त्यातला एकही शब्द त्यान्नी इथे लिहीलेलाच नाहीये!

खरे आहे. लिंबूटिंबूंना समजले.

काहींना वाटले असावे मी माझा शहाणपणा दाखवायला किंवा नेहेमीसारखे काड्या लावायला काहीतरी लिहीले.

तसे समजा!! गणपतीबाप्पा किंवा मी कुणालाच काही फरक पडत नाही. जो तो आपल्याजागी स्थिर, दृढ, जगाला गरज असेल तर लक्ष द्या, नाहीतर मला काही 'गरज' नाही. मी मला काय वाटेल ते करतो. शहाण्या लोकांना त्याचा त्रास होत नाही. बाकीच्यांचे काय विचारता राव, लै धम्माल करत्यात न् काय!!

पुनः धन्यवाद, किंवा "धन्स!!"

झक्कीकाका...

आजच्याच शुभ-मुहूर्तावर तुमचं हे लिखाण (दोन वर्षांपूर्वीचं का असेना!!!), वाचनात आलं... खूप बरं वाटलं... इथे प्रतिक्रिया देत नाहीय...

गेली २० वर्षं दररोज सकाळी श्री गणपती अथर्वशीर्ष न चुकता (अखंडित या अर्थाने) अगदी व्यवस्थीत पणे म्हणतोय. एकच आवर्तन - पण नीटपणे, सगळे र्‍हस्व-दीर्घ उच्चार संभाळून म्हणतोय (फलश्रूती सकट)... आयुष्यात अकल्पीत चमत्कार घडला नाही, पण दररोज न थकता काम करण्याची मिळणारी ऊर्जा मात्र अनुभवतोय...

धन्यवाद...

Pages