पुजावे कुठे अन भजावे कुठे

Submitted by छाया देसाई on 29 August, 2011 - 04:53

अणूरेणुलाही तुझा स्पर्श आहे ,कुठे बोध घ्यावा भुलावे कुठे
असा रोमरोमी बहरही तुझा मग पुजावे कुठे अन भजावे कुठे

तुला आवडावे असे वागताना ,तुला टाळणे हे मला शक्य ना
तुला वाहते मी अता जीवपुष्पा ,अवेळी फुलाने फुलावे कुठे

तुला अर्पिताना असे देहगेहा अता बुद्धिलाही तुझा ओघ दे
दिशाही विचारास लाभो तुझी अन ,मनाला कळावे वळावे कुठे

विसर ना पडावा तुझा मज कधीही असे रम्य सातत्य ह्रदयास दे
जपाजप घडावे असे श्वास यावे ,तुझ्यावीण तल्लीन व्हावे कुठे

असा व्यापुनी ये जळी अन स्थळी तू,मला फक्त आता तुझी आस रे
स्विकारून घ्यावे अशा मीपणाला ,अता मी अणी तू दुरावे कुठे

जसा आवरी तू तुझ्या दिव्य रश्मी,तसा अस्त व्हावा सुखाने जगी
तुझी दिव्य छाया ,तुझी दिव्य माया ,तुझ्या दिव्य डोही डुबावे कुठे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अणूरेणुलाही तुझा स्पर्श आहे,कुठे बोध घ्यावा भुलावे कुठे
हजारो दिशानी तुझी हाक येते ,तुझा हात सोडून जावे कुठे>>> छान केलात मतला. Happy

तुला आवडावे असे वागताना ,तुला टाळणेही अता शक्य ना
-------------------------------- ,अवेळी फुलाने फुलावे कुठे - डॅशच्या जागा सोडून एकंदर आवडले. Happy

(अवांतर - र्‍हस्व दीर्घाच्या सुटी जास्त झाल्या तर काहीसा रसभंग होऊ शकतो असे जाणकार म्हणतात. कृगैन.)

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

उन्नत साधकाची आध्यात्मिक अवस्था आणि उत्कट प्रेमाची भावावस्था विलक्षण सूचकतेने पकडली आहे. भन्नाट आहे कविता .तंत्राच्या बाबतीत बेफिकीर म्हणतात ते अगदी खरे .चांगल्या कवितेकडून अधिक चांगलेच हवे वाटते .गझल बेहद आवडली .

उन्नत साधकाची आध्यात्मिक अवस्था आणि उत्कट प्रेमाची भावावस्था विलक्षण सूचकतेने पकडली आहे.

सहमत.

आशयगंभीर गझल आवडली.

आशयगर्भीत रचना रचताना तांत्रीक बाबीपेक्षा आशयघनताच महत्वाची असते.
मग ती गझल होवो वा कविता. त्या काव्याचा आशयच महत्वाचा असतो. Happy