''पलाट साडेबाराचा''---------------- आगरी गझल-------------

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 26 August, 2011 - 09:13

आगरी भाषा मायबोलीस कदाचित नवी असेल्,परंतु आजही महाराष्ट्राच्या बर्‍याच भागात ही भाषा बोलली जाते.माझा जन्म् , शिक्षण्,बालपण्,आणि आता व्यवसाय सुद्धा याच आगरी बहुल भागात करत आहे.त्यामुळे या भाषेचे मातृभाषेइतकेच महत्व माझ्या जीवनात आहे. प्रस्तुत गझल भाषेतील क्लिष्टते मुळे कदाचित समजायला कठीण जाईल्,परंतु बहुतांशी माबोकरांस समजू सुद्धा शकेल.

गझलेची पार्श्वभूमी न सांगता ,गझलेचे शेर कदाचित आपणापर्यंत पोचणार नाही,म्हणून मी थोडक्यात हे सांगतो.

नवी मुंबई वसविण्यासाठी,महाराष्ट्र शासनाने,''सिडको'' महामंडळाची स्थापना केली. या महामंडळा ने,ठाणे,रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी,रु.१६,०००/- प्रती एकर या दराने १९७०-१९७६ या काळात संपादित केल्या.शेतकर्‍यांच्या प्रखर आंदोलनानंतर व ५ शेतकरी हुतात्मे झाल्यानंतर भाव वाढवून ४०,०००/- प्रती एकर इतका करण्यात आला.उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या शेतकर्‍यांनी जमिनी गेल्यावर्,आपल्याच जनिनीवर बांधण्यात येणार्‍या इमारतींवर मजूरकाम्,मुकादमाची चाकरी,किंवा बांधकामाला,बांधकाम साहित्य पुरवण्याची कामे घेवून आपला चरितार्थ चालवला. मात्र या शेतकर्‍याचा चांगला फायदा तेव्हा झाला,जेव्हा शासनाने,या विकसित जमिनी पैकी १२.५ % टक्के जमीन विकसित भूखंडांच्या स्वरुपात शेतकरी पुनर्वसन योजने अंतर्गत शेतकर्‍यास परत देण्याची योजना जाहीर केली. आजच्या घडीला अश्या १००.०० चौमी भूखंडाचा बाजारभाव साधारणतः १ कोटी रुपये इतका आहे.परंतु दलाल्,भूमाफिया,बाबूशाही,बिल्डर या चौकडीच्या विळख्यात शेतकरी वा त्याच्या वारसास नाममात्र फायदा झाला आहे. अश्यातच शेतकर्‍याच्या व त्याच्या मुला/नातवांच्या हातात पैसा खुळखुळू लागल्याने,दारु,बारगर्ल्स्,हळदी/लग्नात अमाप खर्च करणे या छानछोकीत्,शिक्षण आणि आरोग्य या बाबींकडे दुर्लक्ष झाले.कित्येकजण दुर्धर आजारांचे बळी ठरले.

माझ्याशी चर्चा करत असताना एका पत्रकाराने,तुम्ही या बाबी गझलेतून का नाही मांडत? असा मला सवाल केला होता....आणि मी त्या आवाहनास प्रतिसाद म्हणून आगरी गझल लिहावयास सुरुवात केली आहे.ज्याचे प्रथम पुष्प माबोचरणी सविनय सादर. Happy

डॉ.कैलास गायकवाड.

====================================================================

भानगरींना कारन झाला,पलाट साडेबाराचा
शिरकोचा म्होटा घोटाला,पलाट साडेबाराचा

कंचे व्यावारान दलाली,आवरि नय गवनार कवा
डिलींग मधला म्होटा गाला,पलाट साडेबाराचा

धा मजल्याचा टॉवर झाला,गावाचे त्या बाजूला
मिनी चरवला पयला माला,पलाट साडे बाराचा

लाईट ,पानी ,रस्ता सगला कॉलनीन रानार्‍यांना
आमचे दारासमोर नाला,पलाट साडेबाराचा

चिकन्,मटन्, दारु ना मच्छी,बायेरचे मित्रांसाठी
खोपटान ठेवू बापाला,पलाट साडेबाराचा

जमीन नाही,पलाट नाही,किती किती मी सहन करु?
तरास आपापले जिवाला,पलाट साडेबाराचा

धरुन ''कैलास'' या जगानी,बाप कुनाला बनेवला
व्हता कुनाचा,लाभ कुनाला,पलाट साडेबाराचा.

--डॉ.कैलास गायकवाड.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जबरदस्त मांडणी.
आवडली गझल. Happy

----------------------------------------------------
गवनार
खोपटान
कृपया अर्थ दिला तर गझल अजून चांगली समजून घेता येईल.

शब्दार्थ Happy

शिरको= सिडको महामंडळ
कंचे= कोणते
आवरि= एवढी
म्होटा= मोठा
पलाट = प्लॉट
चरवला = चढवला
पयला= पहिला
सगला= सगळं
बायेरचे= बाहेरच्या
व्यावारान = व्यवहारात
खोपट= झोपडं
गवनार= मिळणार
कवा= केव्हा
व्हता = होता

आयला कैलासभाऊ, मास्नी गझलीतला काय बी न्हाई कळत. पन आगरी भासा लई आवडली बगा तुमच्या त्वांडची. आन आगरी लोक बी जीवाला जीव देनारे असत्यात! ब्रीटीस (british) म्हंत्यात त्येन्ला! Proud

आगरी भाषेन येवरी मजा हाय हे आताच कलन बग.
भूमिपुत्रांची वाट लावायला त्यांचे नेते तेवडेच कारणिभूत.
विदारक सत्य आपण मांडलय.

व्वा! कैलासराव, मस्त मस्त! रदीफ एकदम आवडलीच! Happy

==========================================

लाईट ,पानी ,रस्ता सगला कॉलनीन रहानार्‍यांना = ३२

चिकन्,मटन्,न दारुमच्छी,बायेरचे मित्रांसाठी = २९

जमिन नाही,पलाट नाही,किती किती मी सहन करु? = २९

=========================================

<<<<धरुन ''कैलास'' या जगानी,बाप कुनाला बनेवला
व्हता कुनाचा,लाभ कुनाला,पलाट साडेबाराचा.
>>>>

व्व्वा !

प्राजु यांच्याशी सहमत! 'यू रॉक'! Happy

-'बेफिकीर'!

( वर दिलेल्या किरकोळ टायपोंमुळे मात्र काहीसे अडखळले. कृगैन)

मस्तच.

मस्तच.

नावीन्यपूर्ण गझल कैलासराव!! पुढेमागे आगरीमधे गझल आणणारे म्हणून तुमचे नाव पहिले घेतले जाईल यात शंका नाही. प्रचंड शुभेच्छा!!

गझल आवडलीच फक्त एक प्रामाणिक मत :

शेर क्रमांक ३, ४, ५ मधे "पलाट साडेबाराचा" ही रदीफ शेराचा भाग वाटला नाही किंवा मला त्यातल्या सानी मिसर्‍यांचा अर्थ व्यवस्थित कळाला नसावा, चू.भु.द्या घ्या.

भूषणजी, टायपो ध्यानात आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.मी शेर दुरुस्त केले आहेत. Happy

कणखरजी, शेर क्र.३,४,५ मधेही रदीफ शेराचाच भाग आहे. मी आपल्याशी प्रत्यक्ष बोलतोच. Happy

रोहित्,मुटेजी,गापै,वीरु,कुमारी,प्राजु,विभाग्रज्,मंदार्,सुप्रिया,दिनेशदा....आपले फार फार आभार. Happy

छान

लय भारी हाय कैलासभाऊ...
मी पण पनवेलमधली यक आगरी मुलगी हाय. आज शिरकोमुल आमचीपण हीच त-हा झालीय...

छान.

हास्यसम्राट मधे आगरी भाषेतुन कला सादर करणारे जॉनी रावत यांची आठवण झाली.
आगरी वेगरी गोर (गोड) भाषा आहे ही. Happy

बरेच दिवस बिझी आहे त्यामुळे जरा कमीच वाचते. डॉ. धन्यवाद हा धागा मला वाचायला लावलात. वाचून इतक बर वाटल की एखाद्या दूर देशी आपल्याला कोणीतरी आपल्या गावातल भेटत तस वाटल.

पहीला तुमच कौतुक की तुम्हाला इतकी अग्रिभाषा येते. मी अग्री असुन मला समजते पण बोलता येत नाही.

माझ्या आजोबांची जमिनही सिडको, जे.एन्.पी.टी. च्या प्रकल्पाला गेली. त्यावेळी आंदोलनात माझ्या आत्यालाही पायाला गोळी लागली. तेंव्हा आत्या आमच्याकडे १ महिना राहीली होती दवापाण्यासाठी हे सगळ मला जीवंत चित्र आता डोळ्यासमोर येत आहे. तेंव्हा इतकी जोरदार आंदोलन होती की एस.आर्.पी. गावागावातल्या संशयीत पुरूषमंडळींना पकडून घेउन जात होते. प्रत्येक घराची झोप उडाली होती तेंव्हा. मी लहान होते. जास्त कळतही नव्हते. माझे वडील डेली नाईट शिफ्ट्ला असायचे. भाऊ साधारण ९-१०वीत असेल. अशा वयाच्या मुलांनाही पकडून न्यायचे. आमची वाडी आहे माहेरी. भावाचे मित्र व भाऊ त्या आंदोलनाशी काही संबंध नसतानाही वाडीतल्या उंच टाकीवर जाऊन झोपायचे. घरात मी आजी आणि आई तिघीच असायचो. म्हणून वडीलांनी आत्याच्या मुलीला आमच्याबरोबर झोपायला यायला सांगितले कारण मी त्या काळात खुप घाबरले होते. कोणी ठोकल तर आईने दार उघडू नये अशी माझी अपेक्षा असायची. तेंव्हाच्या बालबोध पणामुळे मी आईला सांगायचे की तू आत्याच्या मुलीच्या गळ्यात मंगळसुत्र घाल आणि तिला दरवाजा उघडायला सांग. एस.आर्.पी तेंव्हा उचलून मारत न्यायचे. आता निटसे आठवत नाही. मी कधी प्रत्यक्ष ह्या गोष्टी पाहील्या नव्हत्या पण ऐकुन मला थरथरायला व्हायच. खुप भयानक परिस्थिती होती.

जागा गेल्या सरकारने नोटीस असणार्‍यांना १२.५% प्लॉट देण्याचे मंजुर केले आणि नोटीस असणार्‍यांना नोकर्‍या देण्याचे मान्य केले. सिडकोचे प्लॉट मिळत आहेत पण अजुन जे.एन्.पी.टी. चे प्रोसेस मध्येच आहेत. नोकर्‍या काही जणांना मिळाल्या. मला माझ्या भावालाही वडीलांच्या नोटीसवर मिळाली. भावाला सि़डकोच्या (नवघर येथील जागा सिडकोच्या ताब्यात असल्याने) तर मला जे.एन्.पी.टी. मध्ये (फुंडा गावातील जागा गेल्याने) मिळाली. पण अजुन हजारो एज्युकेटेड लोकही वेटींगलिस्ट्मध्ये आहेत.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरच ह्या साडेबारा टक्क्यांमुळे भावबंधकी राहीली नाही. इतकी बिकट परिस्थिती भावाबहीणींच्या चुलत्यांच्या नात्यामध्ये आली आहे की त्याचे नाना तर्‍हा आहेत. माझ्या मिस्टरांमुळे त्यांच्या वकीली पेशामुळे तर मला इतक्या गोष्टी कळतात की बापरे.

मागच्यावर्षी आमच्या ऑफिसमध्ये सांस्कॄतीक कार्यक्रम होते. माझ्यावर कंपेरिंग लिहिण्याची जबाबदारी होती. मला मिस्टरांनीच विषय सुचवला. की तू ह्या विषयावर नाट्यरुपी कंपेरिंग कर. मी घडणार्‍या सगळ्या बाबी जशाच्या तश्या मांडल्या. कंपेरिंगला दुसरे पारितोषीक मिळाले काही तांत्रीकी कारणामुळे नाहीतर पहीलेच मिळाले असते. आणि अक्षरशः त्याची चर्चा झाली सगळीकडे. आमच्या पोर्टच्या ट्रस्टीने आम्हाला हे पथनाट्य करुन तुम्ही गावोगाव सादर करा आम्ही मदत करू असेही सांगीतले. ते नाटक मी माबोवर टाकणार होते पण कोणाला विषय कळाला नसता संदर्भ लागला नसता म्हणून टाकले नाही. पण आता मी ते दिवाळी अंकांमध्ये आणि मायबोलीवर टाकणार आहे. शिवाय अग्रसेनमध्येही देणार आहे.

साडे बाराचा पलाट हाय ह्यो कनाला इचार्तायस काय?
अर मांग पुरः बगतयास कनाला मारुतित बसून जाय!

आगरी कवी एल.बी.पाटिल यांची कविता ते कोंग्रेसमध्ये असताना शेकापच्या आगरी लोकांची खिल्ली उड़विन्यासाठी त्यांनी केली होती असे वाटते.. पण तोच साडेबाराचा पलाट मिलाल्यानंतर ते शेकापमध्ये होते त्यामुले त्यांनी कविता नाही लेख लिहिला आणि शेकापचे कौतुक केले.

मस्त!! Happy

लय भारी!:)

Pages