रसग्रहण स्पर्धा - ’माझी लाडकी पुतना मावशी’ : लेखक- सतीश तांबे

Submitted by मणिकर्णिका on 18 August, 2011 - 04:13

cover.jpg माझी लाडकी पुतना मावशी
सतीश तांबे
अक्षर प्रकाशन
प्रथम आवृत्ती- नोव्हेंबर, २००८
किंमत-२०० रुपये

--

दिवसभरातल्या अनेक घटनांमधून एक कथा जन्म घेत असते. आयुष्यातली पुरेशी वर्षं जगून घेतली म्हणजे जगून घेतलेल्या वर्षांमधली लय अखेरीस आपणांस सापडते, माणसाकडे आपण सूक्ष्मदर्शकातून पाहावं तसं पाहायला लागतो ,त्याचे कंगोरे आपणांस उकलू लागतात. वरवर पाहायला जरी सर्व व्यक्ती सुट्यासुट्या असल्या तरी त्यांची-आपली वीण आत कुठेतरी घटट विणली गेलीये, अदृश्याचा हा धागा आपल्याला उकलून घ्यायचाय पण तो कसा? कुठून? कुठवर? ह्याचा विचार आपल्याही नकळत आपल्या अंतर्मनात चालू असतो. या दृश्य-अदृश्यातच कथांची बीजं लपलेली असतात. पण कथानिर्मितीस एव्हढं पूरक हो‌ऊ शकतं? पारंपारीक कथेत किमान दोन तीन प्रसंग असावे लागतात, ते काही अंतराने घडावे लागतात, त्यात कार्यकारणभाव असावा लागतो, पण सतीश तांब्यांच्या कथा हा समज खोटा ठरवतात.

’माझी लाडकी पुतना मावशी’ मधली प्रत्येक कथा कथेच्या पारंपारिक साच्याला छेद देत जाते. यातली कथा घटनाप्रधान रंजन आणि कृत्रिम उद्दीष्टवादापेक्षा व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून अधिकाधिक अंतर्मुख होत जाणारी आहे. ह्या कथा आपल्याला भिडतात कारण त्या शोकात्म असतात किंवा त्यातल्या नाट्यपूर्ण घटनांनी नपेक्शित वळण घेतलं म्हणून नव्हे तर त्यातली पात्रं म्हणजे मी-तुम्ही-आपण सगळे असतो. ती पात्रं कधीकाळी आपणच बोललेली वाक्यं, आपणच सांगीतलेली फ़िलॉसॉफ़ी सांगत असतात. सतीश तांबे आपल्याला व्यक्तिश: ओळखत होते की काय असं वाटावं इतपत ती कथा आपल्यावर बेतल्याचं सतत जाणवत राहतं. ’राज्य राणीचं होतं’ या त्यांच्या पहिल्यावाहिल्या पुस्तकातल्या सर्जनशील लिखाणानंतर या दुसरया पुस्तकाबद्दलच्या अपेक्षा साहजिकच उंचावतात. ’न निखळ कल्पना, न निव्वळ वास्तव तर संकल्पना असते ज्यात तेच ठरु शकतं अभिजात’ या लाडक्या धारणेतून लिहीणारया या लेखकाच्या कथा मुळीसुद्धा भ्रमनिरास करत नाहीत.

काही घट्ना आठवणींच्या ड्रॉवरमध्ये पार आतल्या कप्प्यात लपवुन ठेवलेल्या असतात. कधीकधी वाटू नये त्या गोष्टींबद्दल ओढ वाटते, का वाटते हे विचारल्यावर समाधानकारक सुसंगत उत्तर देता येत नाही, जगाच्या दृष्टीने दळभद्री त्याबद्दल तीव्र उत्सुकता वा्टते, आयुष्यातल्या रहस्यमय गोष्टींशी त्या त्या गोष्टींचं अनाकलनीय नातं जाणवायला लागतं अशा मनोवस्थेमधल्या ’खुनाच्या हद्दपारीची शिक्षा’, ’देव-दानवे नरा’ या कथा. आपल्या हातुन घडू नये ते घडवण्याची अमर्याद ताकद बाळगणारया आपल्यामधल्या अनिर्बंध ’त्या’ला प्रचंड वचकून असणारा समीर असो किंवा ’अ डे विल कम , डेविल विल विन, ईविल विल विन’ हा मंत्र अथक पुटपुटणारा नंदन असो, काहीशी भयाण, काहीशी विनोदी असंबंद्धता हाच जीवनाचा खरा पाया आहे ह्याची जाणीव या कथा वाचताना पदोपदी होते. समीरबद्दल लिहीताना तांबे एका ठिकाणी लिहीतात,
"चुटपूट लागल्यावर त्याला समांतरपणे असं आठवायचं की , बरयाचदा उंच ठिकाणी गेल्यावर वा चालत्या वाहनातून उडी टाकू की काय, अशी जी धाकधूक वाटते त्यातलाच हा प्रकार आहे"
अर्थ-निरर्थकाची अशी कितीतरी भेंडोळी आपल्याही डोक्यात पडून असतात पण त्यावर आपण कधी नीट विचार करत नाही. आपण फ़क्त उत्तरं मिळवायची धडपड करतो पण मुळात प्रश्न काय याचा सखोल विचार आपल्याकडून होत नाही. फ़क्त उत्तरंच कठिण असतात असं नव्हे तर कधीकधी प्रश्नसुद्धा कठिण असतात, समीर, उदय, नंदनला पडणारया-तांब्यांनी शब्दात नेमक्या मांडलेल्या प्रश्नांसारखे.

षांताराम पवारांची भडक गुलाबी-पिवळ्या रंगातली जी पुतना मावशी मुखपृष्ठावर विराजमान झालिये त्या वच्छीमावशीची ’माझी लाडकी पुतना मावशी’ ही शीर्षक कथा. ’लैंगिकता’ या विषयाकडे बघायची आपली दृष्टी किती साफ़ आणि सहज आहे यावर ही कथा तसेच ’थेंब थेंब तळं-थेंबे थेंबे गळं’ तसेच ’खुदको खुद..खुदही!’ या कथा वाचक किती समजूतदारपणे घेतोय हे ठरेल. ’लैंगिकता’ ही मानवाची अनघड अशी आदिम प्रेरणा आहे, भल्याभल्यांना चकवणारी.लेखकाने आपल्या कथांमधून लैंगिक उर्मी आणि व्यवहार यांच्या विविध रुपांचा शोध घेतलाय. जिथे प्रत्यक्षपणे हा विषय नाही तिथेही तो अपरिहार्यपणे डोकावतोच आहे. तांब्यांच्या कथेत स्त्री-पुरुष संबंधाविषयीचे विषय व्यापून राहिले आहेत पण, त्यातही पुरुषमनाचा मागोवा त्यांनी समर्थपणे घेतला आहे. हे करताना परंपरागत कुटुंबव्यवस्थेची, स्त्री-पुरुष संबंधांची अंधारी दारं थोडीफ़ार का हो‌ईना किलकिली केली आहेत. बेरकी पुतना मावशीसुद्धा आपल्या व्यावहारीक शहाणपणात कणभर का हो‌ईना सरतेशेवटी भर घालून जातेच.

’सी-सॉ’ ,’देव-दानवे नरा’ , ’झेपेना मज अढी, वैर कुठे’ ह्या श्याम मनोहरांच्या कथांच्या शीर्षकांची आठवण करुन देणारया कथा -
एकाच वेळी जगण्याच्या आधुनिक आणि आर्ष गाभ्याला स्पर्श करणारी, साध्यासुध्या जगण्याची ’गुरुविण कोण’-
आपल्या सभोवतालचं जग स्थायी असतं, आपण बदलत जातो. लहानपणी पाह्यलेली एखादी गोष्ट मोठेपणी आपल्याला वेगळी भासते. ती वस्तू बदललेली असते का? तर नाही. आपण बदललेलो असतो. पण आपल्यात नेमकं बदलतं तरी काय,या बदलण्याचा वेध घेणारी ’होवो होवो सृष्टी दृष्टी‌आड’ -.
कधीकधी घटना एकदम साधी असते पण तिच्यामध्ये मायक्रोस्कोपिक पदरांचं जंजाळ असतं. त्या बारीक-बारीक तपशिलांमधून कथा आकाराला येते याचे उदाहरण असलेली ’बापूंच्या खुर्चीची गोष्ट’..
कोणतीही कथा असो, संस्कृती, सभ्यता यांचे मुळातले अर्थ तपासून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे.प्रत्येक गोष्टीबद्दलचा उलटसुलट विचार झाला आहे. उल्टाच्या उल्टा विचार म्हणजे सुल्टा नसलेला विचारही मग ओघाने येतोच. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रातली दांभिकता, खोटेपणा तसेच कचखा‌ऊपणे भव्यदिव्य किंवा खरं श्रेष्ठ आहे ते नाकारतच आपण कसं जगतो याचं हे जबरदस्त चित्रण या कथांमध्ये झालेलं आहे.

अमर्याद प्रश्नांची तेव्हढीच अमर्याद उत्तरं वाचताना, व्यक्तिगत आणि समूहजाणिवांचा गुंता सोडवताना, त्यावर मनातल्या मनात बोलताना मनावर हलकासा झाकोळ येतो न येतो तोच येते ’लेखकाचं डोस्कं आणि न्हावी’ही कथा आणि मग तांब्यांची कथा तिची स्थिरवृत्ती सोडून गतिमान होते.प्रकटीकरणाच्या उपरोधात्मक आणि तिरकस शैलीतुन कथा मजेदार उलगडत जाते.कथेचा उगम कसा होत असावा हे शोधू पाहणारया आणि त्यासाठी तिला नियंत्रितपणे ’घडवू’ पाहणारया लेखकाची आणि गणपा न्हाव्याची कथा प्रत्येकाने वाचावी, खुसखुसावं, लेखकाला दाद द्यावी आणि ताजतवानं हो‌ऊन पुढच्या कथेच्या जगात जगायला निघून जावं.

तांब्यांच्या कथेचं वैशिष्ट्य असे की ते समकालीन जगण्याबद्दल लिहीतात, त्या जगण्याचा एक भाग हो‌ऊन लिहीतात. कथेची भाषा या जगण्याच्या रितीचाच एक भाग आहे आणि म्हणूनच ती चोख , रोकडी आहे. ती काही झाकत नाही, सुशोभितही करत नाही. प्रत्येक कथा काहीतरी निराळा विचार सांगते, समाज, परंपरा यावर भाष्य करणाया कथा असल्या तरी त्यांचा स्वर टिपेचा नाही, शांत आहे.
आयुष्यात वाच्यता करता न येणारया बरयाच घटना असतात, खुद्द आपल्या व्यक्तिमत्वाला काळी, करडी किनार असते पण त्या काळोख्या कोपरयांना आपण चुटपुटत्या भावनेनंच, क्वचित गंड मनात घे‌ऊनच बघतो. पण आयुष्यातल्या डार्क प्रॉब्लेम्सना डार्क व्हिजननेच भिडावं असं काही नसतं. तांबे आपल्या कथेतुन सर्वप्रथम तो अंधार काय आहे ते सांगतात आणि मग खुबीने त्या अंधारातून त्यांनी शोधलेला-तात्पुता/कायमचा मा्र्ग सांगतात.

सर्वसाधारण कथा वाचताना तेच तेच अतिपरिचयाचे आयुष्य, त्याचत्याच नाट्यमय घटना, तीच ती तकलादू पात्रं यांतून ती कथा पूर्वी वाचलेली वाटावी इतकी ओळखीची वाटायला लागते, मग त्या कथेतून आपल्याही नकळत आपण मनाने बाहेर पडतो.
पण या सगळ्या ’जगण्या’बद्दलच्या गोष्टी आहेत. जगण्याविषयीचे अ-चाकोरीतले अनुभव सांगणारया या कथा अतिपरिचयाच्या शिळ्या कथांसारख्या ठोकळेबाज नाहीत. या संपतात तिथून चालूच राहणार आहेत कारण जगण्याला कसला आलाय आरंभ- शेवट? कुठल्यातरी बिंदूपासून सुरु व्हाव्या तशा त्या सुरु होतात आणि कुठेतरी संपतात. मुद्दामून केलेली वातावरणनिर्मिती नाही, कोणतीही डूब द्यायचा प्रयत्न नाही, आणि सर्वात महत्वाचं कुठलाही अभिनिवेश नाही. ह्या कथा घटनांमधून नाही तर घटनांमधल्या संकल्पनांमधून, पात्रांमधून उलगडत जातात. आणि म्हणूनच आपण या कथांमध्ये हरवून जातो आणि त्या संपतात तेव्हाच सापडतो.

जगताना बहुसंख्यांना काळाची जाणीव तर असते पण क्वचितच कोणाला क्षणाचं भान असतं. या कथांमध्ये ते भान जपलेलं पदोपदी जाणवतं. जगण्याच्या रेट्यातही लहानसहान गोष्टींमधला आनंद शोधत-शोधत जाणारया कथा वाचायच्या असतील तर प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे असा हा कथासंग्रह- ’माझी लाडकी पुतना मावशी’.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहिलं आहेस मणिकर्णिका. पुस्तकाचं शीर्षक पण पुस्तकासारखंच इंटरेस्टिंग वाटतंय. धन्यवाद! Happy

सुंदर, आटोपशीर ओळख !!

लाँग इनफ टू कव्हर ऑल व्हायटल पाँईंट्स.. शॉर्ट इनफ टू रेझ क्यूरिऑसिटी !!

"त्याला असं वाटायचं की माणूस हा मरेपर्यंत जगतच राहतो, म्हणजेच एक तर भरगच्च दिनक्रमाचा आधार मिळवतो आणि त्यात पुन्हा वेधक-वेधक घटना घडामोडींची आशा बाळगतो, ह्यात कुठेतरी गफलत आहे. आयुष्य जरी बेभरवशी असलं, मरण कधी येणार हे जरी ठाऊक नसलं, तरी काहीतरी सरासरी आयुर्मान कल्पून विशिष्ट वयानंतर जीवनातील 'घडण्याचा' वेग कमी कमी करत नेत, जे घडलं त्याचा वेध घेत जीवन म्हणजे नेमकं काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणे हाच जीवनाचा खरा अर्थ आहे. अन्यथा जगणं व्यर्थ आहे."

- कथा- 'गुरुविण कोण'

मलाही ललितासारखेच वाटले.
पुस्तक इंटरेस्टिंग आहे हे नक्कीच कळले, पण रसग्रहण नीट एका दमात वाचू नाही शकले, विस्कळीत व जड वाटले. :|

पुस्तकाचा परिचय आवडला. पूतनामावशी मधल्या कथा जवळजवळ सगळ्या वाचून झाल्या.

‎"भवतालाकडे तडकलेल्या चष्म्यातून पाहणारी माणसे" असे काहीसे आतापर्यंत झालेल्या वाचनातून वाटते आहे. ते वर्णन अपुरे आहे, समग्र दृष्टीला न्याय देणारे नाही. तांब्यांच्या कथेतल्या माणसांच्या, अडनीड्या परिस्थितीत जगत असतानाच्या पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या प्रसंगांमधून , त्यांच्या सप्रेस केल्या गेलेल्या इच्छांच्या वर्णनातून , त्यांच्या मजबूरी आणि आडमुठेपणातून, वखवख आणि निरिच्छतेतून माणसाबद्दल , माणूस विचार कसा करतो याबद्दल मला आजवर माहिती नसलेली काही सत्ये प्रकाशात आणली गेली आहेत.

शरीरा-मनाच्या खुंटलेल्या किंवा अ‍ॅबनॉर्मल वाढीतून उद्भवणारी आयुष्ये जगणारी पात्रे जयवंत दळवींशी नाते सांगतात. मुंबई महानगराचे धक्के सोसत, कुचंबत जगणारी माणसे मेघना पेठ्यांच्या पात्रांची काहीतरी लागत असतील असे वाटते. आणि हो, तांब्यांच्या लाडक्या भाऊ पाध्यांच्या कथाकादंबर्‍यांमधल्या पात्रांचे मित्र/नातेवाईकही तांब्यांकडे आलेले दिसत आहेत.

कथासंग्रह भर्रकन वाचून संपवावा इतका रोचक आहे ; महानगरात वाढ झालेल्या वाचकाला बर्‍याचदा आत्मचरित्राचे काही अंश वाचल्याचाही भास होतो. (मला तसा झाला.)

मुक्तसुनीत,

पुस्तक वाचून जे-जसे-जितक्या इंटेंसिटीने वाटले ते सगळे तुमच्या प्रतिसादात दिसते आहे. बेहद्द आवडणे’ नावाचा वाक्प्रचार अजून मराठीत अस्तित्वात आहे काय? ते तसले काहीतरी तुमचा प्रतिसाद वाचून माझे झालेय.
त्यांचा ’राज्य राणीचं होतं ’ हा ही एक अफलातून कथासंग्रह आहे,नक्की वाचा असं मी म्हणेन. त्यातली ’जोडपेपण’ वाचलीत की त्यावर तुमच्याशी बोलायला मला आवडेल.
खुद्द तांबेकाका त्यांच्या कथेमधल्या संकल्पनेवर, पात्रांवर बोलताना म्हणतात की,
"मी सहसा भेटलेल्याला पात्र बनवत नाही . तर बहुतांश पात्र घडवतो. मराठीमध्ये गेली अनेक वर्षे " रंगवणे ’ ह्या सूत्राचा पगडा असलं तरी मी ”रचणे” हे साहित्याचे सूत्र मानून लिहितो. थोडक्यात असं की माझी कथा मी कुठे ऐकलेली / पाहिलेली नसते तर ती माझ्या मनात (= मेंदूत ) रचलेली / घडवलेली असते. तर सांगायचा मुद्दा असा की वच्छीमावशी, रमा ही स्त्रीपात्रं मलादेखील कधीच भेटली नव्हती. पुरुष पात्र देखील तशीच आहेत . पुरुषांचं अस्तित्व मला तुलनेत जास्त उमगलेलं असल्याने ती पात्र अधिक वास्तवातील वाटत असावीत. "
कदाचित तुम्हाला वाटत असलेल्या किंवा तुम्ही ती पात्रं जगलात याचं उत्तर कदाचित यातच आहे.
प्रतिसादाकरता खूप धन्यवाद!

वेगळ्या नावाच्या पुस्तकावर लिहिलेलं वाचणारया आणि त्यावर प्रतिसाद देणारया सगळ्यांना खूप थॅंक्स!

मराठीत थोर्थोर लोकांनी इतकं लिहून ठेवलंय की तो बॅकलॉग भरुन काढायच्या प्रयत्नात आपलं कंटेंपररी वाचायचं राहूनच जातं आणि पुढे काही वर्षांनी ते वाचताना ते मग तेव्हढंसं कंटेंपररी राहत नाही. त्या त्या काळाचं महत्व, त्या त्या काळातली मूल्यं , समाजव्यवस्था यावर त्या त्या काळातली पुस्तकं भाष्य करतात, ती तेव्हाच वाचण्यात मजाय. पुढे कधीतरी जाऊन ’ऐतिहासिक’ वाटणारी ही पुस्तकं वाचण्यात काय गंमतेय, नाही? Happy
सर्वसाधारणपणे, एकाच ठिकाणी सध्याची पुस्तकं आणि त्यावरची मनापासूनची मतं वाचायला मिळत नाही, स्पर्धेच्या निमित्ताने का होईना, ते हिरीरीने झालं त्याबद्दल ’मायबोली’ आणि स्पर्धेच्या आयोजकांचे आभार!
सगळ्यांनी वाचावे असे वाटलेले पुस्तक जास्तीत जास्त पीच करण्याचा माझा प्रयत्न होता, तो सफ़ल झालाय असं वाटतंय. Happy

@मणिकर्णिका

प्रतिसाद आवडललेले कुणाला आवडत नाही ! ( हलके घ्या. )

मी तांब्यांचे तीन्ही कथासंग्रह वाचले आहेत. ("राज्य राणीचं..." आणि "ख. प. च.") माझ्या आकलनानुसार तांबे क्रमाक्रमाने लेखक म्हणून इव्हॉल्व होत गेलेले आहेत. एक व्यक्ती म्हणून ज्या काळात त्यांची हयात गेली/जात आहे, तो काळ फार मोठ्या बदलाचा आहे हे आता निराळे सांगायला नको. १९८३ सालच्या कथा आणि २००० नंतरच्या कथा यांमधे मला तरी, अ ग्रेट लीप फॉरवर्ड ( किंवा अ ग्रेट फ्लाईट अपवर्ड अँड अक्रॉस द टेरेन) असं जाणवलेलं आहे. वास्तवाचे रंग रंगविताना तांबे सहजच फँटसी/मिथक या प्रदेशात पोचलेले आहेत. अजूनही "रसातळाला खपच" सारखी तीक्ष्ण धारदार वास्तवाला घट्ट पकडून असलेली कथा ते लिहिताना दिसतातच पण आता त्याना "करीना" किंवा "स्वयंवरा"च्या कथानकासारखी कथा लिहिणे अपरिहार्य वाटते.

तांब्यांनी जी ए कुलकर्णी आणि नेमाडे या "हेवीवेट्स" चे ऋण कुठेतरी मान्य केल्याचं मला अंधुक आठवतंय. खुद्द तांब्यांनी केलेलं काम श्याम मनोहर आणि भाऊ पाध्ये यांच्या जातकुळीचं मला वाटतं. सद्यस्थितीतलं जगणं जगतानाचं आकलन , त्याबद्दल लिहिणं सोपं नाही. जीएंना आणि नेमाडेंना युगप्रवर्तनाचे श्रेय देताना आपण आपल्या आजच्या "हिरोज"ना ही मानवंदना द्यावी. तुमच्या या लेखाच्या निमित्ताने ती दिली गेली.

थोडसं अवांतर : सहज आपलं एक कुतुहल म्हणून. तांब्यांसारखे लेखक मध्यमवर्गीय , मध्यमवयीन महानगरातील पुरुषांचा दृष्टिकोन पुढे ठेवताना आपण पहातो. (फिनिक्स्च्या राखेतून उठला मोर लिहिणार्‍या जयंत पवार यांच्याबाबतही असं म्हणता येईल. ) तर जगण्याच्या रेट्याच्या या (प्रथम)पुरुषी चित्रणांमधे स्त्रियांबद्दलचे जे विचार आलेले आहेत ते स्त्रीवाचकांना कसे वाटतात ? स्त्रियांबद्दलची फँटसी म्हणा, किंवा विविध संदर्भातल्या स्त्रीपुरुष नाते संबंधांचं चित्रण जे तांब्यांच्या लिखाणात येतं ते (कळत नकळत अंगिकारलेल्या )स्त्रीवादी भूमिकेतून कसं जाणवतं हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.

Happy ऑफ कोर्स, मी भलभलते लोड घेत बसत नाही.

आता स्त्रीवाद म्हणजे तुमच्या कल्पना काय आहेत? कारण एका स्त्रीच्या दृष्टीकोनातून एखादी गोष्ट कशी वाटते असं विचारणं आणि स्त्रीवादी भूमिकेतून तीच गोष्ट कशी वाटते हे विचारणं ह्या संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. एक व्यक्ती म्हणून स्त्री आणि एक स्त्रीवादी स्त्री यांच्या विचारांच्या सहजतेमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. असो, तुम्हाला 'स्त्रीच्या दृष्टीकोनातून' विचारायचं होतं असं मी गृहीत धरते.

मी स्त्रीवाचकांचं प्रतिनिधीत्व वगैरे करत नाहीये फक्त मला काय वाटतं हे सांगते, सगळ्याच स्त्रिया याच्याशी सहमत असतील याबद्दल खात्री मी देणार नाही.

कशापासूनतरी, कोणापासूनतरी (इथे फक्त 'पुरुषा'पासून किंवा 'पुरुषी वर्चस्वा'पासूनच अभिप्रेत नाही) आपापल्या पातळीवर, आपापल्या स्केलवर 'मुक्त' होणारया स्त्रियांचं चित्रण गौरी देशपांडे, शांता गोखले, पेठे करतात तेव्हा त्यांच्या कथांमधले दिमित्री, माधव, दयाल सारखे सहिष्णू, अति-समजूतदार नायक वास्तवात असतात का? हा प्रश्न मला हजार वेळा पडलेला आहे. त्यांचं वास्तवातलं अस्तित्व खरं मानून चालणं म्हणजे भाबडेपणा आहे. ते पूर्णतया काल्पनिक आहे्त असं मी म्हणत नाही, गौरी देशपांड्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक पुरुषांमधले काहीकाही चांगले ट्रेट्स उचलून त्त्यांनी ही पात्रं तयार केली असतील कदाचित, पण या सगळ्या चांगल्या ट्रेट्सचा ब्लेंड जेव्हा एका नायकात होतो, त्याने निर्माण होणारा जो भास आहे ह्याबद्दल ज्याने-त्याने स्वत: विचार केला पाहिजे-समोरच्याकडून मानवीय पातळीवरच्या, कितपत कायकाय अपेक्षा बाळगणं याबद्दलचा. माधव आणि दयाल तागडीत आपल्या आयुष्यात येणारया प्रत्येक पुरुषाला तोलण्याचा अट्टाहास का असावा? ही पात्रं खरी मानून चालणारी माणसं असतीलही पण मी त्यात मोडत नाही. जे जे आपल्याला हवं वाटतं, जसं असावं वाटतं ते काल्पनिक पात्रांतून मांडायचा प्रयत्न प्रत्येक लेखक करतोच. तांबेही त्याला कसे अपवाद असतील?

वर सांगितलेल्याप्रमाणेच जेव्हा पुरुष लेखक स्त्री पात्रांबद्दल लिहीतो तेव्हा तो ही त्याला काय हवं वाटतं, कसं असावं वाटतं थोडक्यात त्याची बाया-रिलेटेड अल्टीमेट फँटसी याबद्दलच लिहीलच. मी पुरुषांच्या गोतावळ्यात बराच वेळ असल्याने हे असं ’असतंच’ याची मला कल्पना आहे. शिवाय तांब्यांच्या नायिका खंबीर, महत्वाकांक्षी, निर्भय आहेत आणि त्यांचे पुरुषसुद्धा सहिष्णू, समजूतदार, संयत आहेत. ते कुठल्याही नायिकेला मारहाण करत नाही, ओव्हरसीज अपॉर्चुनिटीज सोडायला सांगत नाहीत, बाहेर लफ़डी करुन वर तोंड करुन बोलत नाहीत, बायकोबरोबर झोपून तिला दुसरया पुरुषावरुन हिणवत नाहीत, बायका-पोरांना वारयावर सोडत नाहीत, दारु पिऊन ओकून त्रास देत नाहीत त्यामुळे मी स्त्रीवादी असते तरी मला तांब्यांच्या कथांनी त्रास झाला नसता अथवा रागही आला नसता.

"स्त्रियांबद्दलचे जे विचार आलेले आहेत ते स्त्रीवाचकांना कसे वाटतात ? स्त्रियांबद्दलची फँटसी म्हणा, किंवा विविध संदर्भातल्या स्त्रीपुरुष नाते संबंधांचं चित्रण" Happy
त्यांच्या कथांमध्ये वर उल्लेखलेल्या गोष्टीच्या चित्रणात पुरुषांना हे ’असंच’ वाटत असतं हे माहीत असल्याने त्याबद्दल मी काही करावं किंवा काही वाटून घ्यावं अशी परिस्थितीच नाहीये. आणि तसंही- त्याबद्दल कोणी काय का करावं किंवा मतप्रदर्शन का करावं? किंवा फ़रक पाडून का घ्यावा?
अशा गोष्टी असतात, पुरुष आपापसात बोलताना हे असंच बोलतात, किंवा त्यांच्या सेक्सविषयक कल्पना या स्त्रीच्या सेक्सविषयक कल्पनांपेक्षा वेगळ्या असतात या गोष्टींची कल्पना नसेल तर आपल्या जगाचं मर्यादितपण याला जबाबदार असेल किंवा आपल्या भोवतालच्या लोकांचं कलेक्टीव्ह मर्यादितपण-हे मान्य करता आलं की बहुतेक प्रश्न चुटकीसरशी सुटतील. मग काही गोष्टी आहेत तशाच मांडल्या की त्रासही व्हायला नको.
आपल्याला एखादी गोष्ट अशी असेल असं वाटत नाही तेव्हा ती तशी नसेलच अशी कल्पना करुन घेणे म्हणजे मंडुकप्रवृत्तीच नाही का?

मी स्वत:ला मुक्त आणि स्वतंत्र व्यक्ती मानते त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दलचे स्त्री आणि पुरुषविषयक दृष्टीकोन मला पार्शालिटी न करता बघता येतात असं मला वाटतं.

असो, जयंत पवारांचं हे पुस्तक मी नव्हतं वाचलेलं , आत्ता तेच वाचतेय.

छान रसग्रहण. आवडलं. Happy
तांब्यांचं अजून काहीच नाही वाचलंय. घेणार नक्की हे पुस्तक.

मराठीत थोर्थोर लोकांनी इतकं लिहून ठेवलंय की तो बॅकलॉग भरुन काढायच्या प्रयत्नात आपलं कंटेंपररी वाचायचं राहूनच जातं आणि पुढे काही वर्षांनी ते वाचताना ते मग तेव्हढंसं कंटेंपररी राहत नाही. त्या त्या काळाचं महत्व, त्या त्या काळातली मूल्यं , समाजव्यवस्था यावर त्या त्या काळातली पुस्तकं भाष्य करतात, ती तेव्हाच वाचण्यात मजाय. पुढे कधीतरी जाऊन ’ऐतिहासिक’ वाटणारी ही पुस्तकं वाचण्यात काय गंमतेय, नाही? >>>

अगदी खरंय! (मुळात वाचनाचा बॅकलॉगच कधी भरून निघत नाही... स्वानुभवावरून सांगते.)