रसग्रहण स्पर्धा - 'आर्यांच्या शोधात' लेखक : मधुकर केशव ढवळीकर

Submitted by राजकाशाना on 22 August, 2011 - 04:06

आर्यांच्या शोधात
मधुकर केशव ढवळीकर
राजहंस प्रकाशन
प्रथम आवृत्ती - एप्रिल २००८
किंमत - १०० रूपये

नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्रजो नो व्योमपरो यत् ।
किमावरीवः कुहकस्यशर्मन्नंभः किमासीद्गहनं गभीरं ॥ १ ॥ -- ऋग्वेद, मंडल १०, सूक्त १२९

दूरदर्शन वयात येत असतानाची गोष्ट, जेव्हा मालिका या शब्दाआधी दर्जेदार हे विशेषण नि:संकोचपणे वापरता येऊ शके. त्या काळात दर रविवारी रात्री नऊ वाजता ऋग्वेदातील नासदीय सूक्ताचे हे श्लोक आणि नंतर पं. वसंत देव यांनी केलेला हिंदीतील अनुवाद कानावर पडत असे. 'भारत एक खोज' बघताना पहिल्यांदाच शाळेत शिकवला जातो त्यापेक्षा पूर्वीचा आपला इतिहास कसा होता याविषयी उत्सुकता निर्माण झाली. नुकतेच प्रा. मधुकर केशव ढवळीकर यांचे 'आर्यांच्या शोधात' हे पुस्तक वाचले आणि हा विषय किती गहन, जटील आणि तरीही रोचक आहे याची जाणीव झाली. प्रा. ढवळीकर यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, नागपूर विद्यापीठ आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्वशास्त्र विषयात अनेक वर्षे संशोधन केले. यातील काही काळ डेक्कन कॉलेजचे संचालक आणि उपसंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नुकताच त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.

भारतात आर्यांचे आगमन कधी, कुठून झाले याबद्दल निरनिराळ्या विद्वानांनी मांडलेली मते, त्यातील त्रुटी, उपलब्ध पुरावे आणि त्यावरून आर्यांचे मूळ उत्तर सिंधु संस्कृतीत असले पाहिजे हा निघणारा निष्कर्ष या सर्वांचा उहापोह 'आर्यांच्या शोधात' या पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाच्या सुरूवातीलाच प्रा. ढवळीकर या संदर्भात लोकमान्य टिळक, हार्वर्ड विद्यापीठाचे मायकेल विट्झेल, केंब्रिज विद्यापीठाचे कोलीन रेनफ्र्यु यांच्यासह २० विद्वानांच्या वेगवेगळ्या मतांचा आढावा घेतात. लो. टिळक वेदांमधील खगोलशास्त्रीय पुराव्यांच्या आधारावर वेदांचा काळ इ. पू. ६००० असा ठरवतात. आर्य उत्तर ध्रुवावरून आले असावेत असे त्यांचे मत आहे तर रेनफ्र्यु यांच्या मते आर्यांचे उगमस्थान तुर्कस्तानात होते. विट्झेल आर्य भारतात दोनदा आले असे मानतात. पण तलगेरींना हे अजिबात मान्य नाही. आर्य भारतातीलच आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. या मतांमधील प्रचंड वैविध्य पाहिल्यावर 'आर्यांचा प्रश्न भारताच्याच नव्हे, तर सार्‍या जगाच्या इतिहासातील कूट समस्या होऊन बसला आहे' या पुस्तकाच्या पहिल्याच वाक्याची सत्यता पटते.

यासारख्या प्रचंड व्याप्तीच्या विषयावर सुलभ पुस्तक लिहीताना त्यातील पुरातत्वशास्त्र, तौलनिक भाषाशास्त्र यासारख्या शाखांमध्ये संशोधन कसे केले जाते याच्या तपशिलात जाणे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्याऐवजी ओघाने येतील तसे विषय आणि ते समजण्यासाठी लागणारी पुरेशी पार्श्वभूमी यांचा समन्वय पुस्तकात साधलेला दिसून येतो. इतिहासामध्ये संशोधन करताना विविध प्रकारच्या पुराव्यांचा आधार घेतला जातो. भाषाशास्त्रीय पुरावे - विविध भाषांमधील समान शब्दांचा अभ्यास करून त्यांच्या मूळ भाषेविषयी आणि त्यावरून ती भाषा बोलणार्‍या लोकांविषयी अंदाज बांधता येतात. त्या काळच्या वाङमयाचा अभ्यास करून तेव्हाची भौगोलिक परिस्थिती, तेव्हा घडलेल्या महत्वाच्या घटना याविषयी मौलिक माहिती मिळू शकते. मायकेल विट्झेल यांच्या मते ऋग्वेदाचे सातवे मंडल म्हणजे निखळ इतिहास आहे. याखेरीज सर्वात महत्वाचे पुरावे म्हणजे उत्खनन केल्यावर मिळणारे प्राचीन संस्कृतींचे अवशेष. भारतीय इतिहासातील एक चमत्कृतीजन्य विशेष म्हणजे आर्यांच्या संस्कृतीचे वाङमयीन पुरावे भरपूर आहेत मात्र त्यांचे पुरातत्वीय अवशेष अजिबात सापडत नाहीत. याउलट सिंधु संस्कृतीचे अवशेष भरपूर आहेत पण त्याबद्दलचा लिखित पुरावा अद्याप उपलब्ध नाही कारण सिंधु लिपी अजून वाचली गेलेली नाही.

'ऋग्वेदातील संस्कृती' या प्रकरणात त्या काळातील आर्यांच्या राहणीमानाबद्दल रोचक माहिती दिली आहे. ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाणे आर्यांची वस्ती सप्तसिंधुच्या प्रदेशात होती. सप्तसिंधु म्हणजे पश्चिमेकडे सिंधु आणि पूर्वेकडे सरस्वती यांच्यामधला भूभाग. ऋग्वेदामध्ये सर्वाधिक वर्णन केले आहे अशी प्राचीन सरस्वती नदी म्हणजे आताची कोणती याबद्दल पुन्हा वाद आहेत. तरीही सध्याच्या भारतातील घग्गर आणि पाकीस्तानातील हाक्रा ही सरस्वती आहे असे मानायला पुरावे आहेत. ऋग्वेदकालीन आर्य शेती करत असले तरी त्यांच्या उपजीवीकेचे मुख्य साधन पशुपालन होते. दगडी हत्यारे, मौल्यवान दगडांचे तसेच सोन्याचे मणी, लाकडाची आणि मातीची भांडी यांचा वापर ते करीत असत.

आर्यांच्या वापरातील एका गोष्टीवरून विद्वानांमध्ये परत रण माजले आहे, ती गोष्ट म्हणजे घोडा. यावर सर मॉर्टिमर व्हीलर म्हणतात, "No horse, No Aryans." ऋग्वेदामध्ये आर्यांचा सर्वात आवडता प्राणी म्हणजे घोडा, मात्र तिथे अश्व याचा अर्थ गाढव असाही होतो. सिंधु संस्कृतीच्या उत्खननामध्ये काही हाडे सापडली ती घोड्याची की गाढवाची यावर बरीच वर्षे खल चालू होता. यावर भारत सरकारने हंगेरीमधील 'घोडा' या विषयावरील जगन्मान्य तज्ज्ञ सांडोर बोकोनी यांना पाचारण केले. त्यांनी सर्व हाडे तपासून ती घोड्याची असल्याचा निर्वाळा दिला. पण हार्वर्ड विद्यापीठातील तज्ज्ञ रिचर्ड मिडो यांनी ती हाडे गाढवाची असल्याचे जाहीर केले. घोडा भारतात पहिल्यांदा इ. पू. २००० मध्ये आल्याचे विश्वसनीय पुरावे आहेत.

'आर्यांचे पुरातत्वीय अवशेष' या प्रकरणात उपलब्ध पुरातत्वीय पुरावे आणि त्यातून काढता येणारे निष्कर्ष दिले आहेत. भारतात लोखंडाचा वापर इ. पू. १५०० पासून सुरू झाला. ऋग्वेदामध्ये मात्र लोखंडाचा उल्लेख नाही. तिथे येणार्‍या अयस या शब्दाचा अर्थ तांबे असा होतो. हा पुरावा आणि घोड्याचा पुरावा या दोन गोष्टींवरून वेदांचा काळ इ. पू. २०००-१५०० असा निश्चित करता येतो. एकदा काल निश्चित झाला की त्यांच्या वसाहती कुठे होत्या याबद्दल अनुमान बांधता येते. सिंधु संस्कृतीच्या उत्खननामध्ये ज्या वसाहती समोर आल्या आहेत, त्यामध्ये पूर्व सिंधु (इ. पू. ३२५०-२६५०), नागरी सिंधु (इ. पू. २६००-२२००) आणि उत्तर सिंधु (इ. पू. २०००-१४००) या प्रमुख वसाहती आहेत. प्रा. ढवळीकर आर्यांची वस्ती म्हणजे उत्तर सिंधु संस्कृती असे समीकरण मांडतात. याच्या पुष्ट्यर्थ तेव्हाच्या नद्या, पर्यावरण यांची वर्णने तसेच घरे, शेती, स्थापत्य, अवजारे, भांडी, नाणी असे उत्खननात सापडलेले अनेक पुरावे त्यांनी दिले आहेत. ही उत्खनने सिंधु खोरे, मोहेंजोदारो, हरप्पा, कालीबंगन, भगवानपुरा इ. ठिकाणी केली आहेत. हे मत बहुतेक पाश्चात्य विद्वानांना मान्य नाही. सबळ पुरावा असूनही आर्य बाहेरूनच आले याच मताला ते चिकटून आहेत. मात्र यातही अपवाद आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सुप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ प्रा. केनेथ केनेडी यांनी भारतीय उपखंडात सापडलेया जवळजवळ सर्व मानवी सांगाड्यांचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या मते गेल्या पाच हजार वर्षांमध्ये भारतीय उपखंडात कोणतेही नवे लोक आले नाहीत.

उत्तर सिंधुकालीन लोक वैदिक आर्य होते असे मानले तर ते कुठून आले या प्रश्नाच्या मुळाशी जाता येते. 'वैदिक आर्यांचे पूर्वज' या प्रकरणात याची सखोल चर्चा केली आहे. मेहेरगढ येथील उत्खननावरून असे दिसून येते की ९००० वर्षांपासून ते सुमारे ७००० वर्षांपर्यंत तेथे एकाच प्रकारचे लोक राहत होते. इ. पू. ४५०० च्या सुमारास नव्या लोकांचे आगमन भारतीय उपखंडात झाले. इथून पुढे टोगाओ संस्कृती (इ. पू. ४५००-३८००) सुरू झाली. तेच लोक इ. पू. १७५० म्हणजे उत्तर सिंधु संस्कृतीचा र्‍हास होईपर्यंत राहत होते. या नव्या लोकांची दातांची ठेवण आधीच्या नवाश्मयुगीन लोकांपेक्षा वेगळी होती. त्यांची विशिष्ट प्रकारची दाढेची ठेवण युरोपियन आणि दक्षिण आशियातील काही लोकांमध्ये आढळते. या नवीन लोकांनी बर्‍याच नवीन गोष्टी आपल्याबरोबर आणल्या. या लोकांची भाषा इंडो-आर्यन (संस्कृतसारखी) असावी. यातील काही लोकांनी पूर्वेकडे स्थलांतर केले, त्यातून हाक्रा संस्कृती (इ. पू. ३८००-३२००) उदयास आली. त्यामधून पूर्व, नागरी आणि उत्तर सिंधु अशी वाटचाल झाली. या सांस्कृतिक विकासाचे चित्र आपल्याला आज ऋग्वेदात दिसते.

नागरी सिंधु संस्कृतीच्या काळात राजस्थानमध्ये हवामान अनुकूल होते, १८ इंच पावसामुळे सरस्वती दुथडी भरून वहात होती. परिणामत: नागरी सिंधु संस्कृती बहरली. परंतू इ. पू. २२००-२००० च्या दरम्यान झालेल्या भूकंपांमुळे पर्यावरणात बदल होऊन हवामान दुष्काळी झाले. सिंधु खोरे राहण्यास प्रतिकूल झाल्यावर आर्यांची बर्‍याच प्रमाणात स्थलांतरे झाली. याची चर्चा 'आर्यांची स्थलांतरे' या प्रकरणात केली आहे. इ. पू. १८००-१६०० दरम्यान आर्य इराणमध्ये गेले. तेथील नद्यांना त्यांनी आपल्याकडची नावे दिली. हरैवती-सरस्वती, हरोयु-शरोयु. सप्तसिंधुमधून इराणमध्ये जाताना ज्या क्रमाने नद्या लागतात बरोबर त्याच क्रमाने त्यांचे वर्णन अवेस्तामध्ये आहे. आर्य इराणमध्ये गेल्यानंतर त्यातील काही त्याहून पुढे म्हणजे तुर्कस्तान, इजिप्त, इथियोपिया आणि ग्रीसपर्यंत पोचल्याचे पुरावे आहेत.

आर्यांची भारतातही स्थलांतरे झाली. राजस्थानातून सिंधु संस्कृती मध्य प्रदेशात कायथा संस्कृती (इ. पू. २४५०-२०००) या नावाने पसरली. कायथा (जि. उज्जैन) येथे तिचे पहिले अवशेष सापडले म्हणून तिला कायथा संस्कृती हे नाव दिले गेले. याचा विस्तार पुढे महाराष्ट्रात माळवा संस्कृतीच्या (इ. पू. १७००-१४००) रूपाने झाला. ती इ. पू. १४०० मध्ये लयास गेली पण तत्पूर्वी तिच्यामधून निर्माण झालेली जोर्वे संस्कृती (इ. पू. १५००-९००) कोकण किनारपट्टी सोडल्यास सबंध महाराष्ट्रात पसरली होती. इनामगाव (जि. पुणे), दायमाबाद, नेवासे (जि. अहमदनगर) आणि प्रकाश (जि. नंदूरबार) ही या संस्कृतीची महत्वाची ठिकाणे होती. याखेरीज सौराष्ट्र, कच्छ तसेच पूर्वेकडे बिहारमध्ये आर्यांनी स्थलांतरे केल्याची उदाहरणे आहेत. गंगेच्या खोर्‍यातही आर्यांच्या वस्तीच्या खुणा सापडतात.

सुमारे १०,००० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या इतिहासाचे वाङमयीन उल्लेख आणि पुरातत्वीय पुरावे यांच्या आधारावर जे चित्र उभे राहते त्याचा सारांश उपसंहार या शेवटच्या प्रकरणात आहे.

आर्यांच्या उगमासारख्या कूट समस्येवर सर्व थरातील लोकांपर्यंत पोचेल असे पुस्तक लिहीणे निश्चितच कठीण काम आहे. 'आर्यांच्या शोधात' पुस्तकामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तेवढा पुस्तकाचा व्यापही नाही. मात्र या प्रश्नाबद्दल उत्सुकता निर्मांण करण्यात पुस्तक नक्कीच यशस्वी ठरते. सुरूवातीच्या प्रकरणांमध्ये काही गोष्टींची पुनरावृत्ती होते. तसेच काही ठिकाणी तारखांचा थोडा गोंधळ होतो. उदा. वर दिलेले प्रा. केनेडी यांचे मत - 'गेल्या पाच हजार वर्षांमध्ये भारतीय उपखंडात कोणतेही नवीन लोक आले नाहीत' - इथे इ. पू. ५००० की इ. पू. ३००० हे स्पष्ट होत नाही. या किरकोळ दुरूस्त्या पुढच्या आवृत्त्यांमध्ये करता येऊ शकतील असे वाटते. पुस्तकाच्या शेवटी दिलेली अद्ययावत संदर्भसूची या विषयात खोलात जाऊ इच्छीणार्‍या वाचकांसाठी नक्कीच उपयोगी ठरावी.

पुस्तक वाचण्याचा अनुभव कसा असेल हे बरेचसे पुस्तक कोणत्या प्रकारचे आहे यावर अवलंबून असते. ललित साहित्य किंवा कविता यांचा आस्वाद घेताना येणारी अनुभूती वेगळी असते. खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगनच्या 'कॉसमॉस' या पुस्तकात व्हॉयेजर अंतराळयानातून घेतलेले पृथ्वीचे चित्र दिले आहे. सूर्यमालेच्या बाहेरून घेतलेल्या या चित्रात सूर्यप्रकाशाच्या झोतात मध्यभागी एक छोटासा निळा बिंदू दिसतो, तीच पृथ्वी. याला इंग्रजीत एक चपखल वाक्प्रचार आहे, 'लुकिंग ऍट द बिग पिक्चर.' संस्कृती हा शब्द सामाजिक, नैतिक आणि राजकीय संदर्भांमध्ये ज्या बेधडकपणे वापरला जातो त्याचा परिणाम म्हणून संस्कृतीचा अर्थ एखादी कोणत्याही धक्क्याने सहज तुटणारी नाजूक वस्तू इतकाच होऊन बसला आहे. बहुतेक धार्मिक चालीरीतींचे व्यावसायिकरण झाले आहे. वेद, पुराणे यांचा उल्लेख आल्यावर त्यावर भक्तीभावाने विश्वास ठेवणारे धार्मिक किंवा त्यांना कोणतीही किंमत न देणारे विज्ञानवादी अशी दोन परस्परविरोधी टोके प्रामुख्याने दिसतात. पण यातच आपल्या इतिहासाच्या खुणा लपलेल्या आहेत याची जाणीव क्वचितच दिसते. 'आर्यांच्या शोधात' सारखे आपल्या पूर्वजांचा मागोवा घेणारे पुस्तक वाचल्यावर समाज आणि संस्कृती यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. आपण कळत आणि नकळत 'मोठ्या चित्राचा' विचार करायला लागतो. संस्कृतीच्या नावाखाली आपण आज ज्या चालीरीती क्षणाचाही विचार न करता वापरतो, त्यांचा उगम आणि प्रसार कुठे, कधी, कसा झाला हे जाणून घेणे हा एक रोमांचकारी अनुभव ठरतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहो,
ते पृथ्वी से पहले सत नही था, असत भी नही, अंतरीक्ष भी नही, आकाश भी नही
तेच ना?

मस्त वाटतय पुस्तक. धन्यवाद रे.

"'आर्यांचा शोध ही मानवी इतिहासातील एक कूट समस्या आहे'"

~ परिक्षणातील हे वाक्य फार काही सांगून जाते. या कूटाचेच आकर्षण इतके जबरदस्त आहे संशोधकांसाठी की इ.पू. काळ तर राहू दे, पण आजही कित्येक विद्यापीठातून आणि स्वतंत्र पातळीवर या समस्येवर अहोरात्र संशोधन आणि खलही चालूच असल्याचे दिसते. श्री.ढवळीकर यानी हीच जिद्द मनी ठेवून या विषयाला नव्याने दिशा दिल्याचे श्री.राजकाशाना यांच्या पुस्तक रसग्रहणावरून प्रत्ययास येते.

घोड्यांच्या अस्तित्वाबद्दल फार मते-मतांतरे आहेत...सर्वत्रच. पण त्याचा मागोवा घेण्याचे हे जरी ठिकाण नसले तरी त्यांचा वापर आर्यांच्या काळात नव्हताच हे मानणे फार कठीण जाते. ऋग्वेदात वाहतुकीसाठी घोड्याचा वापर केला जात असे असा उल्लेख आहे तर समुद्रमंथनात मिळालेला दोन पंखे असलेला उच्चैश्रवा नावाचा घोडा खुद्द इन्द्राने काही काळानंतर [त्याचे पंख छाटून] पृथ्वीवर मानवाच्या सेवेसाठी पाठविला असे आर्यच मानत असत. पण 'घोडा' म्हटले की त्याचा विचार नैसर्गिकरित्या केवळ युद्धासाठीच होत असल्यामुळे की काय तो 'घरगुती' कामासाठी वापरला जात नसणार हे गृहीत धरले जात असेल. त्यामुळेच तो हाडांचा - घोड्याची की गाढवाची - वाद उपस्थित झाला असेल.

असो. लिहावे तितके कमीच आहे या विषयावर.

'आर्यांचा शोध' हा जटील विषय असूनही हे परिक्षण इतके प्रभावी झाले आहे की ज्याना अशा विषयात रस असेल ते तर मूळ पुस्तक वाचतीलच पण इतरांनाही ते तसे करण्यास उद्युक्त करेल हे नि:संशय.

अशोक पाटील

चान्गले लिहीलय! Happy विषयही नेमका (अर्थात माझ्या आवडीचा Proud ) निवडलाय
(माझ्या मते महाभारतकालिन महायुद्धानन्तरच्या वाताहातीत जे लोक बाहेर गेले त्यान्चेपासून सध्याचे युरोपिअन बनले Proud )

श्री पाटील, प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

घोड्याबाबत आणखीही बरीच माहिती पुस्तकात दिली आहे. पण रसग्रहण स्पर्धेला १५०० शब्दांची मर्यादा असल्याने तिचा समावेश करता आला नाही. भारतात आढळणार्‍या घोड्यांना ३४ बरगड्या असतात, तर युरोपमधील घोड्यांना ३६. विशेष म्हणजे ऋग्वेदातही घोड्याला ३४ बरगड्या असल्याचे नमूद केले आहे. ऋग्वेदकालीन आर्यांचा घोडा हे आवडते वाहन होते. वाहतुकीबरोबरच अश्वमेध यज्ञासारख्या महत्वपूर्ण विधीमध्येही घोड्याचा सहभाग होता. या विषयावर आंतरराष्ट्रीय विद्वान चर्चा करताना हमरीतुमरीवर येतात असे पुस्तकात नमूद केले आहे.

"या कूटाचेच आकर्षण इतके जबरदस्त आहे संशोधकांसाठी की इ.पू. काळ तर राहू दे, पण आजही कित्येक विद्यापीठातून आणि स्वतंत्र पातळीवर या समस्येवर अहोरात्र संशोधन आणि खलही चालूच असल्याचे दिसते."

सहमत आहे. भारत एक खोज बघतानाही त्यामागे हेच गूढाबद्दलचे आकर्षण होते असे आता लक्षात येते. किंबहुना हे पुस्तक वाचल्यानंतर या विषयावर आणखी माहिती हवी अशी इच्छा निर्माण होते. मराठीमध्ये या विषयावर जी बोटावर मोजण्याइतकी पुस्तके आहेत, त्यात या पुस्तकाने मोलाची भर घातली आहे असे वाटते.

लिंबुटिंबू,
धन्यु. पुरातत्वशास्त्र आणि मानववंशशास्त्र माझे फेबरिट आहेत. Happy
महाभारत थिअरी आवडली. Proud

आवडलं रसग्रहण.

ढवळीकरांचे 'कोणे एके काळी सिंधु संस्कृती' सुद्धा खूप इंटरेस्टींग आहे. राजहंस प्रकाशनाने ही छान, वेगळ्या विषयावरची पुस्तकं प्रकाशित केली आहेत.

चिमण, अवल
अनेक आभार. Happy

शर्मिला
ग्रेट! हे पुस्तक माहीत नव्हते. यादीत अ‍ॅडवले आहे. धन्यु Happy
>राजहंस प्रकाशनाने ही छान, वेगळ्या विषयावरची पुस्तकं प्रकाशित केली आहेत.
सहमत आहे. राजहंसच्या गप्पांची पुस्तकेही छान आहेत. सध्या शेवाळकर-एलकुंचवार "संवादाचा सुवावो" वाचतो आहे.

रोचक विषयाच्या पुस्तकाचे समर्पक परीक्षण केले आहेत. आवडले!
आणि डॉ. ढवळीकर सरांचे पुस्तक त्यासाठी निवडल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! Happy

अरुंधती,
अनेक आभार. Happy
माझ्या आवडीच्या विषयांमध्ये पुरातत्वशास्त्राचा क्रमांक फार वर आहे. त्या विषयातील इतके सुरेख पुस्तक वाचायला मिळाले याचा आनंद वाटतो. आता 'कोणे एके काळी सिंधु संस्कृती' ही वाचायला हवे.

शेवटचा परिच्छेद आवडला.>> +१
रसग्रहण आवडले. निव्वळ इतिहासासारख्या विषयावर रसग्रहण लिहायचे म्हणजे __/\__

पुरातत्त्वशास्त्रात मलाही रस आहे. मात्र त्यावर आधारित एखादं पुस्तक काही मी अजूनपर्यंत वाचलेलं नाही. तेवढ्या पेशन्सने ते वाचलं जाणार नाही असं वाटतं नेहमी म्हणून. पण या पुस्तकाबद्दल वाचून उत्सुकता निर्माण झाली आहे. Happy
शेवटचा परिच्छेद छान.

स्लार्टीचे आगमन झालेच तर.

मात्र त्यावर आधारित एखादं पुस्तक काही मी अजूनपर्यंत वाचलेलं नाही >>> एकदा एकदोन पुस्तके आवडली की परत फिक्शन आवडेनासे होते हा अनुभव.

इ. पू. १८००-१६०० दरम्यान आर्य इराणमध्ये गेले. तेथील नद्यांना त्यांनी आपल्याकडची नावे दिली. हरैवती-सरस्वती, हरोयु-शरोयु. सप्तसिंधुमधून इराणमध्ये जाताना ज्या क्रमाने नद्या लागतात बरोबर त्याच क्रमाने त्यांचे वर्णन अवेस्तामध्ये आहे. >>> इतकेच नाही तर भारतीय वंशांचे राजे भारतातून बाहेर कसे गेले (मार्ग) ह्याचे वर्णन अनेक बौद्धग्रंथांमधून पण आहे.
तरी ह्या वाक्यावरून अनेक तज्ञ (मायबोलीवरील) हे पुस्तक आता वाचणारच नाहीत असे दिसते. Wink

मी अजून हे पुस्तक वाचले नाही, आता मिळवून वाचेन. पण लेखक उत्खनन करणारे आहेत की नाही हे मला माहित नाही. ह्या विषयाच्या प्रसार जितका झाला तितका बरे. कारण आजही आपण आर्य इराण मधून आले ह्या मॅक्स मुल्लरच्या मताला प्रमाण माणून बसलो आहोत.

मुळ सरस्वती पुस्तक ज्यांना भारताचा इतिहास जाणून घ्यायचा आहे त्यांनी वाचावेच वाचावे.

डॉ ढवळीकर हे नामवंत पुरातत्ववेत्ते असून त्यांनी केलेले संशोधन व उत्खनन हे ह्या क्षेत्रातील पथदर्शक ठरले आहे.
केदार, हे वाच : http://en.wikipedia.org/wiki/Madhukar_Keshav_Dhavalikar
ते आम्हाला टिमविमध्ये पुरातत्वाचा विषय शिकवायला होते. त्यापूर्वी ते डेक्कन कॉलेजात डायरेक्टर पदावर होते.

मला त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. धन्यवाद अरुंधती. लाल व इतर संशोधक ह्यांची पुस्तके मी आधी वाचली आहेत, शिवाय माझा सरस्वतीवरच्या लेखातही ऋग्वेदातील नद्या व त्यांची फोड केलेली लिहिले. (अर्थात लाल ह्यांचे नाव देऊन) त्यामुळे मी तसे म्हणालो. ह्या पुस्तकाचे मुळ पुस्तक त्यांनी २००७ मध्ये इंग्रजीत लिहिलेले दिसते. आता त्यांची पुस्तके वाचायलाच हवीत.

"त्यापूर्वी ते डेक्कन कॉलेजात डायरेक्टर पदावर होते."

~ डॉ.ढवळीकर यांचा उल्लेख भालचंद्र नेमाडे यांनी "हिंदू" कादंबरीत केला आहे. [डॉ.सांखळीया यांच्यासमवेत]

छान लिहिलय "...म्हणून संस्कृतीचा अर्थ एखादी कोणत्याही धक्क्याने सहज तुटणारी नाजूक वस्तू इतकाच होऊन बसला आहे" आवडलं Happy

राजकाशना ह्यांनी पण स्लार्टीबार्टफास्ट असे नाव दिल्यामुळे माझा घोळ झाला. मे बी तसे नसावे.

>राजकाशना ह्यांनी पण स्लार्टीबार्टफास्ट असे नाव दिल्यामुळे माझा घोळ झाला. मे बी तसे नसावे.
मला हिचहायकर आवडते म्हणून ते नाव दिले पण आधीचे जे स्लार्टी होते ते वेगळे.
लोकांचा इतका गोंधळ होईल हे माहीत असते तर फोर्ड प्रिफेक्ट नाव दिले असते. Happy
मी इथे असतो. http://rbk137.blogspot.com/

हल्लीच हे पुस्तक वाचले. रसग्रहणावरून जितके आवडले होते तितकेसे वाचल्यावर नाही आवडले. आवडले नाही म्हणण्यापेक्षा खूप क्लीष्ट वाटले. लेखकाचा ह्या विषयानुशंगाने एक दृष्टीकोन आहे. मग तो दृष्टीकोन मांडताना तो बळकट करायला लागणारे पुरावे, विरोधी मतांचे खंडन यांची सुसूत्र मांडणी हवी होती. ती सुसूत्रताच मला दिसली नाही. म्हणजे लेखकाने अनेक विद्वानांची मते दिली आहेत काही पुरावे दिले आहेत पण त्यातून सुसूत्रपणे तात्पर्य हाती लागत नाही. काही ठिकाणी परस्परविरोधी विधाने आहेत त्यामुळे बरेच गोंधळायला होते.

पण तरीही पुस्तक बरेच उपयुक्त आहे - या विषयाच्या अभ्यासाकरता. बर्‍याच मान्यवरांचा आणि त्यांच्या मतांचा लेखकाने परिचय करून दिला आहे. विषयाचा आवाका बघता निर्णायक मत मांडणे अशक्य होते पण लेखकाने बरेच तार्किक विवेचन दिले आहे. त्याला अनुसरून अधिक संशोधन होऊ शकते.

थोडक्यात सांगायचे तर लेखकाच्या मते - 'इसपू ७००० ते इसपू ४५०० भारतात एकाच वंशाचे लोक रहात होते. इसपू ४५०० च्या सुमारास दुसर्‍या वंशाचे लोक भारतात आले. ह्या लोकांची संस्कृती उत्क्रांत झाली आणि तीच हराप्पा / सरस्वती संस्कृती होय. पुढे सरस्वती कोरडी पडत गेली आणि ह्या संस्कृतीच्या र्‍हासाला सुरुवात झाली. नागरी संस्कृतीची परत एकदा जंगली संस्कृती झाली. ह्या लोकांनी वेदांचा बराचसा भाग लिहिला.'