सह्याद्रीनवल ..... सांदण दरी

Submitted by रोहित ..एक मावळा on 20 August, 2011 - 10:03

राकट .. कणखर सह्याद्री ...
आसमंताला भिडलेल्या उंचच उंच शिखरांचा सह्याद्री .....
खोलच खोल दर्‍या-खोर्‍यांचा सह्याद्री ...
काळजाचा ठोका चुकविणार्‍या कोकणकडांचा सह्याद्री...
निसर्गसंपत्तीने नटलेला सह्याद्री.....
सह्याद्री
... बस्स नावात सगळ सामावलेल आहे.

अशा या आपल्या लाडक्या सह्याद्रीत अनेक रत्न दडलेयत.आपल्या सारख्या भटक्यांची पारखी नजर त्याच्यावर आहे.पण ही संपदा आपल्याला चोरायची नाही.तर त्यातुन फक्त निसर्गानुभव घ्यायचा.वार्‍याची गाज कानात भरुन घ्यायची.ढगांशी खेळायच.पाऊस प्यायचा.डोंगर,किल्ले यांचाशी गप्पा मारायच्या.आपल्या पुर्वजांच्या पाऊलखुणा शोधायच्या. असा हा अनमोल खजिना काळजाच्या कप्प्यात जतन करुन ठेवायचा.

आपण कितीही मोठे झाले असलो तरी या सह्याद्रीच्या ,निसर्गाच्या पुढे किती खुजे आहोत याची जाणीव यांच्या नुसत्या दर्शनाने आपल्याला होते.

असच एक सह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी.....

एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे.

सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ १ कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत.त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा.दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो.हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते.

सांदण दरीला जाण्यासाठी जाण्यासाठी साम्रद गाव गाठावे लागते.मुंबईपासुन जवळ-जवळ २०० कि.मी अंतरावर असलेल्या साम्रद गावाला जाण्यासाठी मुंबईहुन नाशिकला जाणारा महामार्ग पकडायचा.कल्याण-शहापुर-कसारा घाट -घोटी - भंडारदरा(शेंडी) -पांजरे-उधवने- घाटगर डॅम मार्गे मजल दरमजल करत आपण साम्रद गावात पोहोचतो.

मायोबोलीकर मावळ्यांसोबत जुन महिन्यात सांदण दरी अनुभवुन आलो.त्याचा सविस्तर वृतांत यो-रॉक्स ने सांदण दरी येथे दिला आहे.

प्रकाशचित्रांच्या माध्यमातुन सांदण दरीची सफर घडवुन आणण्याचा हा छोटासा प्रयत्न ......
चला तर मग एका अनोख्या सफरीवर.....

सांदन दरीला जाण्यासाठी आम्ही मायबोलीकरांनी ४ जुनच्या रात्री आमच्या लक्ष्याकडे रथातुन (तीन गाड्या ) कुच केले.कसारा घाटात पावसामुळे पसरलेल्या धुक्यांनी छान सलामी दिली होती.नंतर घोटीतुन पुढे भंडारदर्‍याच्या रस्त्याला लागलो.शेंडी गाव येण्याआधी M.T.D.C चे रिसॉर्ट लागते.तेथुन उजवीकडे उधवणे गावाला आम्ही वळलो.या वळणावर काजव्यांचा अनोखा लाईटींग शो बघितला. अस वाटत होत की जणु आकाशातल्या लुकलुकणार्‍या चांदण्या खाली उतरल्या होत्या.पुढे याच रस्त्याने जाताना दाट जंगल लागले."कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य" या नावाने हे जंगल बिबट्यांसाठी प्रसिद्ध आहे.या जंगलातुन जात असताना आजुबाजुला असलेली दाट झाडी अन त्यातुन वाट काढणारा निरव रस्ता एक वेगळीच अनुभुती देऊन जातो.भंडारदरा बॅकवाटर च्या काठाने पुढे वळणावळणाच्या रस्त्याने घाटघरला पोहोचलो अन तेथुन पुढे साम्रद गावात नवी पहाट घेऊन आलो.

रात्रीचा पाऊस पडुन गेला होता.पहाटेच कुंद वातावरण पसरल होत.तीस-चाळीस उंबर्‍याच छोटस साम्रद गाव हळुहळु जाग होत होत.येथुन दिसनारा नजारा म्हणजे आपल्या सारख्या भटक्या लोकांसाठी एक पर्वणीच असते.कारण समोरच एका बाजुला डौलाने उभ्या असलेल्या अन नेहमी आपल्याला आव्हान देणार्‍या अलंग-मदन-कुलंग अन कळसुबाई रांगा पाहुन डोळ्याचे पारणे फिटते.तर दुसर्‍या बाजुला रतनगड,आजोबा गड उभे ठाकलेले दिसतात.
साम्रद गावाच्या बाजुला मोठ खडकाळ माळरान पसरलेल होत.तेथेच आमचे रथ स्थानापन्न केले.
पहाटेच मंत्रमुग्ध वातावरण अन चारी बाजुला पसरलेला निसर्ग डोळ्यात साठवुन घेत होतो.

पावसाचे काही ढग रात्रीच्या निळाईत रंगुन गेले होते तर काही ढग त्या शिखरांशी लगट करण्याचा प्रयत्न करताना दिसले.

क्षितिजावर हळुहळु पिवळसर छटा उमटु लागल्या होत्या.

याच त्या विशाल गगनाला भिडलेल्या अलंग-मदन-कुलंग अन कळसुबाई रांगा ...
या सह्याशिखराच्या कुशीत काही ढग विसावलेले होते.

त्या माळरानाच्या बाजुला हि छोटीशी टेकडीसुद्धा दिसली.
शिपनुर टेकडी ...

सुर्याच्या कोवळ्या सोनेरी किरणांनी सृष्टीला हळुहळु रंगवायला सुरुवात केली.

कोवळ्या किरणांनी आमच्यात अनोखा जोश भरला.रात्रीची मरगळ निघुन गेली.मग काय ...
त्या किरणांना मुठीत पकडायला मायबोलीकरांचा उडी-उडीचा खेळ रंगला.

उड्या मारुन झाल्यानंतर आता पोटाकडे मोर्चा वळविला.गावातल्या दत्ताच्या घराकडे आम्ही वळलो.दता भांगरे च्या घरी नाश्त्याची अन जेवणाची सोय केली होती.मस्तपैकी चहा-पोह्याची भर पोटात टाकली.

साम्रद गावातील एक घर ...
या भागात जवळपास सगळी अशीच घरे पहावयास मिळतात.
ठेंगणी,कौलारु, शेणाने सारविलेल्या कुडाच्या भिंती ....

सुर्य बर्‍यापैकी वरती आला होता.पिवळ्या छटांनी सारा आसमंत भारून टाकला.

मग सांदण दरीला जायला आम्ही मावळ्यांनी कुच केले.

दरीत जाण्यासाठी गावापासुन वीस मिनिटे चालत जावे लागले.दरी अशी वरतुन दिसुन येत नाही.कारण दरीच्या आसपास खुप झाडी पसरलेली होती.या झाडीतुन जात असताना एका सापाने दर्शन दिले.पण आम्हाला भाव न देता तो पटकन निघुन गेला.त्या झाडीतुन पुढे गेल्यावर पाण्याची एक वाट दिसली.त्या वाटेवर दगडधोंड्याच साम्राज्य होत.दगडी खडकाळ वाट पायदळी तुडवत आम्ही दरीच्या तोंडापाशी येऊन उभे ठाकलो.
सांदण दरीच्या तोंडापाशी पाण्याच्या एका वाटेवर सुर्यकिरणांचा अनोखा पिसारा फुललेला दिसला.

दगडधोंड्यानी भरलेली अद्भुत अशी निसर्गनवल सांदण दरीत आम्ही पाऊल ठेवत होतो. उत्सुकता शिगेला पोहोचली होती.धरतीच्या पोटात आम्ही शिरकाव करणार होते.दरीत दोन्ही बाजुला पसरलेल्या कातळकडा आम्हाला भेटायला आतुर झाल्या होत्या.

माकडउड्या मारत आमचा प्रवास सुरु झाला.

या कातळकडा पाहुन अचंबा वाटत होता.

दरीतुन वरती दिसणारे हे आकाश .....

थोड्या वेळ चालल्यानंतर पहिला पुल लागला.नुकताच उन्हाळा संपुन पावसाळा सुरु झाला होता म्हणुन या पुलात पाणी खुप कमी होत.

तरीपण त्या पाण्यात पाय न भिजवता कातळाच्या कपारीला पकडुन कडेकडेने तो टप्पा आम्ही पार केला.

पुढे थोड चालल्यानंतर काही ढग आमची खोडी काढायला दरीत उतरले.
धुक्क्यात हरविलेली दरी....

मागे वळून बघितले तर ...

वरच आकाशसुद्धा दिसत नव्हत..
पण त्या धुक्यातल्या पावसाच्या स्पर्शाने अंगावर रोंमाच उभा राहिला.

धुक्यातुन चालत आता आम्ही दुसर्‍या पुलापाशी पोहोचलो.

दुसरा पुल कसोटी पाहणारा ....

खरच येथे पाणी किती असेल काही कल्पना नव्हती.पाण्याचा अंदाज घ्यायला बाजीराव अवि पुढे गेला अन त्याच्या मागोमाग मी त्या पाण्यात उतरलो.आपसुकच कॅमेरा बॅगरुपी पेटार्‍यात बंद झाला.पाणी चांगलच थंडगार होत.दोन्ही बाजुच्या कातळभिंतीत तीन ते चार फुट अंतर असलेली ही जागा थोडी खोलगट होती.पायाखाली दगडसुद्धा लागत होती.त्यामुळे अंदाज घेत आम्ही पुढे सरकत होते.आधी गुढघाभर.... पुढे कमरे एव्हढे .... अन एका ठिकाणी तर छातीएव्हढे पाणी लागले.मग दोरीच्या साहाय्याने एक-एक करत सगळ्यांनी तो पॅच पार केला.(याचे फोटो यो च्या वृतांतात पाहिले असतीलच)
हा पॅच पार करत असताना ठक्क करत दरीत आवाज झाला.धुक्यामुळे वरती काही दिसत नव्हत.त्यामुळे नक्की कशाचा आवाज झाला कळले नाही.

कातळातुन पावसाचे थेंब नितळत होते.पावसाचे ते तुषार पिऊन मन तृप्त झाल.
दगडाळ वाटेवरुन पुढे कुच केले.

सह्याद्रीच्या या रुपापुढे फक्त नतमस्तक व्हायच....

ढग बाजुला सरले अन धुक कमी झाल.दरीच्या सुरुवातीला दिसणारे मोठे आकाश
नंतर निमुळत झाल..

जिथे नजर जाईल तेथे कातळच...

शेवटी एकदाचे आम्ही दरीच्या दुसर्‍या टोकापाशी पोहोचलो.
मायोबोलीकर दिसतात का बघा ?

नाही दिसले ... जरा जवळुन बघा..
त्या दगडावरती कसे पहुडलेत...

येथे थोड खाली एक छोटासा रॉक पॅच उतरुन जाव लागत.

सांदण दरीपर्यंतचा ट्रेक हा येथेच संपतो.येथुन खाली उतरायला तीन मोठे रॉक पॅचेस पार करुन खाली उतराव लागत.५०,७ अन १५ फुटाचे अवघड रॉक पॅचेस रॅपलिंग करुन उतरावे लागतात.ही वाट हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेसारखी आहे.

या नळीच्या वाटेने खाली उतरुन तुम्ही कोकणात उतरु शकता.ही वाट पुढे आजोबा गडाच्या पायथ्याशी असलेल्या डेहणे गावापाशी घेऊन जाते.तेथुन आसनगावला जाता येते.नाहीतर पुन्हा सांदण दरीच्या पायथ्यापासुन करोली घाटातुन ट्रेक करत साम्रद गावापाशी येता येत.अट्टल ट्रेकर्स सांदण दरी - करोली घाट असा ट्रेक करतात.

आम्ही आणलेल्या शिदोरीतला खाऊ पोटात सरकविला.अन या रांगड्या निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ हरवुन गेलो.
परतीचा प्रवास सुरु झाला.
याच छोटा रॉक पॅचने आम्ही खाली उतरलो.
खुप छोटी-छोटी दगड आहेत ना....

परतत असताना एक फुटलेला दगड वाटेवर दिसला.त्याच्या अक्षरशः ठिकर्‍या उडाल्या होत्या.जो आवाज आम्ही दुसरा पुल पार करत असताना ऐकला होता.त्यामुळे शक्यतो पावसात येथे येणे टाळा असच हा रांगडा निसर्ग आम्हाला सांगु पाहत होता.

हिच ती जागा जिथे ऊन-सावल्यांचा खेळ रंगतो.पण सुर्य माथ्यावर आला नव्हता.अन थोडेसे ढगाळ वातावरण होते.

फक्त कात़ळकडा,दगडधोंड्याच अस्तित्व असलेल्या दरीत काही सजीवसुद्धा दिसले.

कातळामध्ये लपलेला हा कोळी ....

दरीत यांचेसुद्धा दर्शन झाले. हि छोटी-छोटी खेकड्याची पिल्ले एका कातळावर खेळत होती.

आता ओळखीची झालेली ही पाण्याची वाट दोरीशिवाय पार केली.

निखळ आनंद देणारी ही खडकाळ वाट,दरीतील अनोखी शांतता,त्या शांतलेला आव्हान देत कातळातुन टिप-टिप झिरपणारे पाणी ,उंचच उंच धडकी भरवणारे कातळकडा.... दरीत वावरताना अनामिक भिती मनात दाटुन येते.पण या रांगड्या निसर्गाच्या प्रेमात आपण कधी पडतो ते कळत नाही.

खरच अद्भुत अशी निसर्गनवल सांदण दरी अनुभवने म्हणजे एखादे शिखर पादाक्रांत केल्यासारखेच आहे.

दरीतुन बाहेर परत आलेल्या वाटेने निघालो.त्या वाटेवर दरीच्या आसपास पसरलेल्या झाडीतला करवंद अन जांभळाचा रानमेवा चाखला.
माळरानावर पोहोचलो.मागे वळुन बघितले तर रतनगडाचा खुटा,रतनगड अन आजोबागडाची शिखरे ढगांच्या राशीत हरवुन गेलेली होती.

याच वाटेने रतनगडाला कल्याण दरवाजामार्गे पोहोचता येते.सकाळी या डोंगरात चरायला गेलेली गुरढोर एखाद्या ठिपक्यासारखी दिसत होती.

पावसाचे ढग आकाशात हळुहळू जमायला लागले होते तसे गावातल्या लोकांची घर शाकरायची काम सुरु झाली होती.
साम्रद गाव....

भिजलेले कपडे बदलुन आम्ही पुन्हा पोटाची खळगी भरण्यासाठी दत्ताच्या घराकडे धुम ठोकली.मस्तपैकी भाकरी-भाजी ,डाळ-भात ओरपला.थोडा वेळ निद्रादेवीला शरण गेलो.

या परिसरात दोन कोकणकडे बघायला मिळतात एक साम्रद गावातुन (दरीच्या उजव्या बाजुला) अन
दुसरा घाटगर डॅमच्या बाजुला...
खर म्हणजे पश्चिम घाटात जवळपास सर्वच ठिकणी अशा कोकणकडा पहावयास मिळतात.त्यातल्या त्यात हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा सरस आहे.वार्‍याच्या घर्षणातुन निर्माण झालेले,जणू काय ...तासलेले कोकणकडे उंचावरुन बघण्यात मजा येते.

वामकुक्षी झाल्यानंतर कोकणकड्याकडे मोर्चा वळवला.सांदन दरी कडे जाणार्‍या वाटेच्या उजव्या बाजुने माळरानातुन ढोरवाटेने आम्ही प्रयाण केले.याच वाटेने जात असताना हे एक रानातल मंदिर दिसले.

कोकणकडा....

येथुन एका बाजुला रतनगड आणि आजोबागडाचे जवळुन दर्शन होते.तर एका बाजुला करोली घाट नजरेस पडतो.

लांब दुरवर एका ढगातुन पाऊस कोसळत असताना दिसला.त्या बरसणार्‍या वरुनराजाला पाहुन आमच्यातल्या इंद्रदेवाला घरी जायची घाई लागली.

मग काय .. तेथुन आम्ही मागे फिरलो.
परतत असताना अलंग-मदन-कुलंग अन कळसुबाई रांग स्पष्ट दिसत होती.दिवसभर ढगांच्या आड लपलेली हि रांग पाहुन डोळे तृप्त झाले.

पॅनोरामा...

दत्ता भांगरे अन त्याच घर ...

साम्रद गावाच्या उजव्या बाजुला जाणारा रस्ता रतनवाडीला जातो.तेथे शंकराचे (अमृतेश्वर )एक पुरातन मंदिर आहे.तेथुनसुद्धा रतनगडला जाता येते.
दत्ताचा निरोप घेऊन आम्ही दुसर्‍या कोकणकड्याकडे म्हणजे घाटगर डॅमच्या दिशेने वळलो.
रस्त्याच्या एका वळणावर अलंग-मदन-कुलंग हे त्रिकुट सामोरी आले.

भंडारदरा बॅकवॉटर वर बांधलेल्या घाटगर डॅमचे दोन भाग आहेत.वरच्या डॅममधील पाणी खालच्या डॅम मध्ये सोडुन वीज निर्मिती केली जाते.

घाटगर डॅमचा कोकणकडा .....

घाटगर डॅमच्या पुढे कॅनॉलमध्ये सोडलेल्या पाण्यात मस्तपैकी पोहायचा (डुंबायचा) कार्यक्रम उरकुन घेतला.

जुनच्या सुरुवातीला पडणारा वळवाचा पाऊस साधारणतः संध्याकाळच्या सुमारास सक्रिय होतो.त्यामुळे आम्ही लवकरात लवकर गाशा गुंडाळुन घराकडे निघालो.
जसजस आम्ही पुढे जात होतो .. तसतसे ढग आमचा पाठलाग करत होते.

शेवटी पावसाने कसारा घाटात आम्हाला गाठलच.

कसारा घाट उतरल्यानंतर चिंब पावसात मस्तपैकी गरमा-गरम चाय अन कांदाभज्जीचा आस्वाद घेतला.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल साम्रद गाव.... निसर्गनवल सांदण दरी ... अलंग-मदन-कुलंग अन कळसुबाई रांगेच भव्य दर्शन... रतनगड .... कोकणकडा ... अन मायबोलीकर.

सह्याद्री आपल्याला साद देतच राहणार अन आपण त्याच्या हाकेला ओ द्यायला जातच राहनार... काय बरोबर ना..

पुन्हा भेटुया... Happy

------ रोहित ..एक मावळा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पीचलेस...

वृत्तांत आणि प्रचि...अफलातून.

विशेषतः पॅनो..... हॅट्स ऑफ.

रोहितसारखे अवलिये माबोचे टृ अ‍ॅसेट्स आहेत.

Happy

माझ्या निवडक १० त.

मस्त प्रकाशचित्र मावळ्या....:स्मित:

>>साम्रद गावातील एक घर ...
या भागात जवळपास सगळी अशीच घरे पहावयास मिळतात.
ठेंगणी,कौलारु, शेणाने सारविलेल्या कुडाच्या भिंती ....<<<
मावळ्या याभागात पावसाबरोबर प्रचंड वारा वाहतो, त्यावार्‍याने घराच छप्पर उडू नये म्हणून घरांची रचना तशी असते.

खुप खुप धन्यवाद डॉक ... Happy

मावळ्या याभागात पावसाबरोबर प्रचंड वारा वाहतो, त्यावार्‍याने घराच छप्पर उडू नये म्हणून घरांची रचना तशी असते. >> हो बरोबर वेताळा ... धन्यवाद Happy

हुश्श.....आला एकदाचा वृतांत Wink

पण, वाट पाहिल्याचे सार्थक झाले रे. अप्रतिम प्रचि आणि लिखाण Happy

निसर्गाच्या पुढे किती खुजे आहोत याची जाणीव यांच्या नुसत्या दर्शनाने आपल्याला होते.>>>>>लेखातील काही प्रचि पाहताना खरोखर याची जाणीव होतेय. Happy

खुप्पचं छान वर्णन आणी त्या बरोबरीने फोटोग्रॅफ्स पण तितकेच खिळवून टाकणारे.
सगळे दरीतले फोटोज कुठल्या तरी scary movie मधले वाटतायेत. मला तर अश्या स्पेसेस मधे फार claustrophobic वाटेल. वर आकाशा कडे बघवणारच नाही.

घराचे फोटो नेहमी प्रमाणे खूप आवडले. कौलारू घरं पाहीली कि नेहमी, ती आतून कशी असतील अशी एक उत्सुकता असते मनात. एकच खोली असते का खूप असतात, एकच असेल तर division of space कशी असेल, एका घरात किती माणसे असतील, आत मधे ते व्यवस्थित उभं राहू शकतात का, वगेरे वगेरे
प्रश्न नेहमी मनात येतात.
ही मंडळी सगळ्यांची खायची सोय पण करतात तर त्याचे पण फोटो टाक पुढ्च्या वेळेस.

मायबोली वर आल्यामुळेच अलंग मदन कुलंग ही नावे पण कळाली नाहीतर ट्रे़किंग चे वर्णन अजून कुठेही वाचलेले नव्हते.

धन्यवाद जिप्सि,रैना,टण्या,दिनेशदा,निराली,दादाश्री ,चांगभलं,सारंग .... Happy

कौलारू घरं पाहीली कि नेहमी, ती आतून कशी असतील अशी एक उत्सुकता असते मनात. एकच खोली असते का खूप असतात, >> खर सांगु का निरालीजी यांची घर मोठी नसतात.पण यांच मन मोठ असत.
तसच जेवणाच्याबाबतीत ... पण गावच्या पाण्याला एक वेगळीच चव असते.त्यामुळे ते जेवण रुचकर लागते. Happy

देवा.. मला ती दरी बघून शहारा आला...एकदम कडक फोटो.. ते पाणी बघून वाटलं ki tyat चालताना जर काही पायाखाली आल तर मी तर न बघताच टुपुक होईन..
मी नाणे घाट आणि त्रंबकेश्वर ट्रेक केला आहे....त्रंबकेश्वर तर मी आयुष्यात कधी विसरणार नाही.. एवढा वारा, आणि एवढं पाणी होत का आम्ही डोंगर चढताना मागे फेकले जात होतो...पण आम्ही चढलो तो डोंगर नेटाने
असाच तिथेई डोंगर होता, पण हि दरी म्हणजे थरार आहे..
बर त्यातून फोटो पण काढले तुम्ही..धन्य. ....

अरे सॉरी उशीर झाला रिप्लाय द्यायला...

पुन्हा त्या मस्त ट्रेकची आठवण करून दिलीस... पहाटेच्या वेळी साम्रदच्या वाटेवर रस्त्यात बसकण मारून मारलेल्या गप्पा, दरीमधली शांतता, एक-दोन मजली उंच, राकट, अवाढव्य कातळाखाली झुरळासारखे दिसणारे आपण (किंवा मी एकटा हवंतर:P), कोकणकड्याचा रौद्रपणा... जस्ट टू गूड... Happy

प्रचिंबद्दल काय बोलावं? राहूलद्रविडला तू टेस्ट क्रिकेट मस्त खेळतोस म्हणण्यासारखं आहे, किंवा दगडाला किंवा जिप्स्याला तुम्ही स्वभावाने फार चांगले आहात असं म्हणण्यासारखं आहे... Proud

मस्त फोटॉ! कीप गोईंग..
भेटू पुढच्या ट्रेकला.. Happy

धन्यवाद सावली ,dsj14 ,इंद्रा, यो ,मानुषी ,माधव ,नची ,प्रसन्न Happy

भेटू पुढच्या ट्रेकला.. >> हो नक्कीच Happy

मला घेऊन जा रे , पुढच्या ट्रेक ला नक्की.. विसरू नकोस >> नक्की मित्रा Happy

बाप रे! असले पराक्रम तुमच्यासारखे हाडाचे भटकेच करु जाणे.
मला अजिबात घेऊन जाऊ नको रे असल्या ट्रेकला. आम्ही फक्त वृत्तांत वाचणार आणि तुमचं कौतुक करणार Happy

मस्तच !
पण << दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो.>> हे वाचून गोंधळले. आधी कितीतरी वेळ मला दरीत पूल कसा आणि कशाला बांधला असेल तेच कळेना. दरी ओलांडायला वरून (cross) पूल बांधला तर समजू शकते. पण दरीत ? तो ही पाण्यात असलेला पाण्याचा पूल ! प्र.चि. १ बघेपर्यन्त पूल म्हणजे bridge नसून पाण्यानी भरलेला pool आहे हे कळलं च नाही Lol

ऱोहित...मस्तच प्रची आणी त्याला सही लेखनाची जोड असल्याने अगदी डोळ्यासमोर ऊभे राहीले.

माझी काही झाली नाहीये पण ही सांदण दरी मात्र आत्ता-आत्ताच प्रसीद्ध होतेय... ५ वर्षांपुर्वी डेणे-वोरपड्-करोली घाट-साम्रद-रतनगड ट्रेक केला होता तेव्हा मात्र सांदण दरी अजिबातच माहीत नव्हती... अगदी ८ फुटी गवतातुन मार्ग काढावा लागला होता... आता तुझे फोटो बघुन परत त्या भागात जायची ईच्छा झालीय.

कधीतरी एकत्र ट्रेक करु खुप मजा येईल..

Pages