बोस्टन गटग - १३ ऑगस्ट, २०११

Submitted by भास्कराचार्य on 19 August, 2011 - 03:25

'वृत्तांत लिहायचा प्रयत्न करतो आजचा.'

कुठल्या मुहूर्तावर हे शब्द मुखावाटे निघून जाते झाले कुणास ठाऊक. रचु ने लगेच ते पकडून 'तुला नक्की जमेल' वगैरे म्हटल्याने आत्तापर्यंत हरभर्‍याच्या झाडावरच होतो. (मायबोलीकरांच्या इरसालपणाची झलक मिळतेच अशी. Light 1 ) पण गटग झालंच एवढं छान, की त्याबद्दल लिहिलं पाहिजेच. (जे आले नाहीत त्यांना जरा टुकटुक पण करून दाखवता येईल. Proud )

माबोवर आल्याच्या एकदोनच दिवसांत अजयनी विचारणा केली, की गटगला यायला जमेल का? आधी 'गटग म्हणजे काय?' हा प्रश्न पडून झालेला होता. त्यानंतर काहीकाही भन्नाट गटग वृत्तांतसुद्धा वाचून झालेले होते. (विशेषकरून खादाडी असलेले. आमची धाव आधी तिकडे. गरजूंनी माझा फोटो पाहा, खात्री पटेल.) (किंवा खरं म्हणजे, कशाला पाहाता? Proud ) त्यामुळे त्यांना बिन्धास हो म्हणून टाकलं. बाकीचेही भिडू तयार होत होते. गटगला वेळ असल्याने तोवर माबोवर इतर काय काय वाचायला बिचायला सुरवात केली. शेवटी होमवर्क नीट पाहिजे. गटगला प्रश्नोत्तरांचा तास वगैरे घेतला तर? Happy

पण जसजशी वेळ यायला लागली तसतसं जरा कठीणच वाटायला लागलं. एकेक नावं कमी व्हायला लागली. 'अरे फॉल सुरू व्हायचाय अजून, आधीच कसले गळताय?' Light 1 पण 'जे जे होईल | ते ते पाहावे' म्हणून स्वस्थ बघत बसलो. शेवटी तरी ५-६ नावं उरलीच. मग मात्र खात्री झाली, की गटग होणार. मग तो सोनियाचा दिनु उजाडला. अजयना एकदा फोन करून कुठे, कसं ते पक्कं करून घेतलं आणि निघाली स्वारी.

पार्क स्ट्रीट ला भेटायचं असं ठरलेलं. तिकडे थोडा आधीच जाऊन उभा राहिलो. बोस्टन फिरणार्‍या पर्यटकांकडे गळपट्टेवाला कुत्रा बिन गळपट्टेवाल्यांकडे बघतो तसं बघून घेतलं. (संदर्भ - दुसरं कोण? पुलं.) अजून थोडी बागेतली 'शोभा' वगैरे बघून घेतली. (जाणकारांना जास्त सांगायला नकोच.) मग तिकडं माझ्याच वयाची एक मुलगी येऊन इकडंतिकडं बघायला लागली. तिच्या हावभावांवरून वगैरे मी ओळखलंच. (अजूनही कपाटाआड पेन गेलं की माझा चेहरा असाच होतो. Light 1 ) पण पुढे जाऊन ओळख करून घेणार तेवढ्यात दस्तूरखुद्द अजय जमिनीच्या पोटातून वर येताना दिसले. मग आधी त्यांच्याशीच हातमिळवणी केली. (आधी खर्‍या आणि नंतर लाक्षणिक अर्थाने Happy ) त्यांच्याबरोबर भावना पण होत्या. त्यांच्याशी ओळख झाली. तेवढ्यात त्या मुलीने अजयना फोन केला आणि मग तिचीही भेट झाली. ही सखीप्रिया. मग बोलत असताना लक्षात आलं की अजयनी माबोचा शर्ट घातलाय आणि भावनांनी सुद्धा माबोचा बिल्ला डकवलाय. त्याचं कौतुक केलं तर त्यांनी जादूगारासारखे खिशातून अजून दोन बिल्ले काढून हातावर ठेवले. Happy तसा मी १२वी नंतर हॉस्टेलवर राहिलेला असल्यामुळे 'अ‍ॅडमिनच्या ताकदीला सीमा नसते' हे माझं आधीचं मत अजूनच दृढ झालं. Happy

मग तुम्ही कोण, आम्ही कोण, इतर कोण येणार आहेत वगैरेवर थोडी चर्चा आणि फोनाफोनी झाली. बाकीचे येईपर्यंत हिरवळीवर बसूया असं ठरलं. सगळेजण एकमेकांना पहिल्यांदाच भेटत होते. त्यामुळे एकमेकांच्या कुंडल्या जुळवल्या जाऊ लागल्या. सुदैवाने हवा पण काय छान वाहत होती. दुपार असूनही उकाडा नव्हता. त्यामुळे फार उल्हसित वाटत होतं. कोण कोण कुठे कुठे राहतं ह्या चर्चेवरून बोस्टनमध्ये काय काय करण्यासारखं आहे वगैरेवर गाडी गेली. सखीप्रिया आणि मी तसे नवेच खेळाडू इथले. त्यामुळे अजय आणि भावना आम्हाला काय काय सांगत होते. तरी सखीप्रियाने संस्कृत बोलायला शिकायला घेतलंय हे ऐकून आश्चर्यच वाटलं. लई भारी. ती तिच्या शिकायच्या वेळच्या गमती सांगत होती. त्यातून ती तेव्हा दक्षिण प्रदेशात होती आणि उत्तर-दक्षिण हा फरक इकडेही लागू होतो. त्यामुळे ते कुतूहलाने ऐकत होतो.

मग रचुकडून येणार्‍या बातमीनुसार समजलं, की ते येणारेत, पण पत्राच्या डिलीव्हरीसाठी थांबलेत. मग तोपर्यंत असं ठरलं, की खायला काहीतरी घेऊन बसू. मग फलाफल घेऊन आलो. (हा शब्द आला की मला का कोण जाणे फळफळावळ आठवते. आजकाल हा शब्द फारसा दिसत नाही. फलाफल मात्र बरंच दिसतं. Proud असो. हे आपलं उगाच. लिहिताना एकरेषीय लिहिण्याची सवय नाही फार. ) यावेळेस जरा कॉमन्सच्या मोठ्या भागात बसलो. जवळच 'शेक्सपिअर ऑन कॉमन्स' च्या नाटकवाल्यांची जागा होती. तिकडे कायकाय प्रयोग होत होते जगलिंग वगैरेचे. (ह्याला मराठी शब्द सांगा ना कोणितरी.) मी तो प्रयोग नुकताच पाहिलेला. मग त्याविषयी थोडं बोलणं झालं. मग बृममं च्या अधिवेशनाच्या गोष्टी निघाल्या. ह्यावेळचा वृत्तांत तर सगळ्यांनी वाचलेला होताच. मग अजयनी पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या. ह्या वर्षी गणपती कुठे आहे ते पण कळालं. बर्‍याच आधी बोस्टनचं पहिलं गटग झालेलं, त्याच्या आठवणी निघाल्या. हे बोस्टनचं दुसरंच गटग आहे, हे पाहून जरा आश्चर्य वाटलं.

अशाच वेगवेगळ्या गप्पा चालू होत्या. कुठूनकुठून कोणाकोणा माबोकरांच्या लिंक्स लागत होत्या. आपापल्या माहेरच्या गप्पाही चालू होत्या. तेवढ्यात रचु आणि रितेश येऊन पोहोचले एकदाचे. फेडेक्सवाल्यांनी उशीर केला. Sad मग त्यांना इकडेच डिलीव्हर करायला सांगायची कल्पना आली. जाहिरातीसाठी खरंच छान आहे. मग त्यांच्याशी ओळख झाली. रचुने 'तू भास्कराचार्य ना?' विचारल्यावर 'आपण भास्कराचार्य म्हणून ओळखले जाऊ शकतो' हा आनंद माझ्या चेहर्‍यावर झपकन पसरला. माबोवर नवा असल्याने म्हणा किंवा हे गटग सकलगुणवंत अशा पुण्यनगरीत होत नसल्याने म्हणा, तो कोणी लगेच हिरावून घेतला नाही. Light 1 रच्याकने, रितेश म्हणजे रचुचा 'लेसर हाफ'. (सारखासारखा दिवा देत नाही, तरी तो आवश्यक तिथे घेणे. Happy ) रचु काहीकाळ डोंबिवलीला राहिलेली, तर रितेश मध्ये चेन्नईला होता. ह्या दोन्ही ठिकाणांहून मीही माझा शेर गोळा केला असल्यामुळे आमच्या सोंगट्या जवळ आल्या. मग तिकडचे अनुभव वगैरेंची देवाणघेवाण सुरू झाली. आजूबाजूने अनेक गोंडस कुत्री जात होती. त्यांच्याबद्दल गप्पा चालू झाल्या. रचुला ती खूप आवडतात. मग अमेरिकेत राहाणं वगैरेवर चर्चा झाली. त्यातूनच दुसर्‍या दिवशी होणार्‍या 'इंडिया डे' ला जायचं ठरलं. (उसका भी एक वृत्तांत बनता है!)

हे सगळं चालू असताना जरा उठून अजून चांगल्या ठिकाणी जाऊन बसलो. मग तर फड अजूनच रंगात आला. अगदी बेने इस्त्रायली लोक ते बंगाली मिठाया ते अंबानी बंधू अशा भरार्‍या झाल्या. आता म्हणजे अगदी शिळोप्याच्या गप्पा. सगळ्यांची एकमेकांशी ओळख झाल्याने व्यवस्थित बडबड चालू झाली. मध्येच रचु आणि भावना उठून तळ्यातले हंस पाहून आल्या. मी तर एव्हाना गवतावर बराच सुस्तावलो होतो. मस्त वाटत होतं एकदम. इथून उठून जाऊच नये असं. निघायची वेळ कधी झाली ते कळलंच नाही. (एक तर उन्हा़ळ्यात इथे दुपार संपता संपत नाही. सुर्याकडे बघून अंदाज अजून मला तरी नाही येत करता.) पण ती झाली. Sad सगळ्यांनाच काहीनाकाही करायचं होतं. मग जरा बाकड्यावर बसलेल्या कोणाकडून तरी छान फोटो काढून घेतला. टांगारू मंडळींबद्दल एक फायनल बडबड झाली. दुसर्‍या दिवशी भेटायचं ठरलं आणि मंडळी दिवसभराच्या आठवणी मनात घोळवत पांगली.

अशी ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळसंपूर्ण. अशा अनेक कहाण्या एकत्र गुंफून आयुष्याचं वस्त्र बनत असतं. ही अशाच एका गर्भरेशमी धाग्याची सुरवात आहे यात शंकाच नाही. Happy

फोटोत डावीकडून उजवीकडे - रचु, सखीप्रिया, भावना, अजय, मी, रितेश

Boston GTG 2011.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघ मी म्हणाले नव्हते तुला की तु छान वृत्तांत लिहीशील म्हणुन.... छान लिहील आहेस Happy

मग इंडिया डे चा वृत्तांत कधी लिहीतोस Proud

प्रिया हो आम्ही सगळे भेटलो परत दुसर्‍या दिवशी, त्या वेळी पण खुप धमाल केली आम्ही Happy
तुला मिस केलं आम्ही Happy

काय छान लिहिलाय वृतांत.
(जे आले नाहीत त्यांना जरा टुकटुक पण करून दाखवता येईल. फिदीफिदी )>> Sad यायला पाहिजे होतं.

तिकडे कायकाय प्रयोग होत होते जगलिंग वगैरेचे. (ह्याला मराठी शब्द सांगा ना कोणितरी.)>>> हात चलाखीचे प्रयोग?

बारागटग म्हणजे बाग राज्य गटग ना?

इंडिया डे चा वृत्तांत. >> Proud

मी पण हातचलाखीचे प्रयोग च म्हणणार होतो! पण ते तितकंसं नाही वाटलं बरोबर. खूप जनरल आहे हा शब्द असं वाटलं.

रच्याकने, हंसाला दात असतात हे लिहायचंच राहिलं. Happy

मी पण हातचलाखीचे प्रयोग च म्हणणार होतो! पण ते तितकंसं नाही वाटलं बरोबर. खूप जनरल आहे हा शब्द असं वाटलं. >> मी मराठी शब्दकोषामधे हाच अर्थ लिहिलेला पाहीला ... Happy
रच्याकने, हंसाला दात असतात हे लिहायचंच राहिलं. >> खरं की काय ? हे माहीत नव्हत

रचुला विचारा. तिला चांगलाच अनुभव आलाय. तरी बरं त्या दिवशी नाही.

ते बर्गर खातात, हाही एक प्रकार आश्चर्यकारक.

अरे वा मस्त वृत्तांत लिहला आहे.

>'अरे फॉल सुरू व्हायचाय अजून, आधीच कसले गळताय?
>आजकाल हा शब्द फारसा दिसत नाही. फलाफल मात्र बरंच दिसतं.
>रितेश म्हणजे रचुचा 'लेसर हाफ'.

हे मस्तंच !! Happy