असे हे दुर्ग कोकणचे

Submitted by वेताळ_२५ on 14 August, 2011 - 10:41

असे हे दुर्ग कोकणचे
Sindhudurg%20Fort%20in%20Tarkarli_0.jpg

`महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी आहे`, असे मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँड डफ म्हणतो. शिवाजीमहाराजांनी किल्ल्यांच्या आश्रयाने स्वराज्याची स्थापना केली आणि राज्यविस्तार साधला. रामचंद्रपंत अमात्य `आज्ञापत्रात` लिहतात, 'हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले....`
मराठ्यांचे सामर्थ्य गगनचुंबी आणि दुर्गम अशा गिरीदुर्गामध्ये होते, याची कबुली औरंगजेबाच्या पदरी असलेले साकी मुस्तैदखान, खाफीखान यासारखे ग्रंथकारही देतात. सह्याद्रीच्या पर्वतराजीने गडकोट उभारण्यास नैसर्गिक संरक्षणाने मुक्त असलेली अनेक स्थळे उपलब्ध करून दिली. महाराष्ट्राचा इतिहास या स्थळानी घडविला. असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. यादवखिलाहारांच्या काळापासून महाराष्ट्रातील गिरीदुर्गांनी इतिहासात महत्वपूर्ण कामगिरी बजावल्याचे आढळते. परंतु गिरीदुर्गांचा यथायोग्य आणि तंत्रशुध्द उपयोग प्रथम शिवाजीमहाराजांनी केला हे मात्र नि:संशय !

19-konkan-map.jpg
नकाशा सौजन्य : आंतरजाल

कोकण : किल्ल्यांचे आगर
महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी आहे तर, कोकण हे किल्ल्यांचे आगर आहे. सार्‍या कोकणात किल्ल्यांचे जाळे पसरलेले आढळते. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात ५२ किल्ले आहेत कोकणातील अनेक किल्ले शिवपूर्वकालापासून अस्तित्वात असून या किल्ल्यांच्या साहाय्याने कोकणच्या छोट्या राज्यकर्त्यांनी बहामानी सुलतानांना कित्येक वर्षे नामोहरण केल्याचे उल्लेख सापडतात. इ.स.१४६९ मध्ये बिदरच्या बहामनी राज्यकर्त्यांचा दिवाण महमूद गवान याने दक्षिण कोकणची मोहीम हाती घेतली होती. संगमेश्वरच्या राज्यकर्त्यांनी महमूद गवानाला कित्येक वर्षे दाद दिली नाही. अखेर लाच देऊन कितीतरी किल्ले महमूद गवानाला ताब्यात घ्यावे लागले. शिवकालात तर कोकणातील किल्ल्याचे महत्व शतपटीने वाढले

dhak fort.jpgगड : राजकीय केंद्रस्थाने
कोकण भागाचा डोंगराळ प्रदेश राजकीय हालचालीसाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे मध्ययुगामध्ये अनेक सत्ताधिशांनी या भागातील गडांवर आपली केंद्रस्थाने प्रस्थापित केली. निजामशाही वाचविण्यासाठी शहाजीने मोगल व अदिलशाहा यांच्याविरूध्द जी प्रखर झुंज दिली, ती डोंगराळ प्रदेशातूनच ! माहुली हे केंद्रस्थान म्हणून शहाजीने निवडले होते. कल्याण हे मोगलांचे प्रमुख केंद्रस्थान होते. जंजिरा ही सिद्यांची राजधानी होते. आग्र्याहून परत आल्यानंतर शिवाजीमहाराजांनीही आपली राजधानी राजगडहून रायगडला आणली. त्याच सुमारास मुंबई हे बेट इंग्रजाना पोर्तुगीजांकडून आंदण म्हणून मिळाले. कोकणच्या किनारपट्टीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले 'सागरी केंद्र' म्हणून सिंधुदुर्गाची मालवणजवळ उभारणी केली. वसई हे पोर्तुगीजांचे कोकणातले महत्वपूर्ण केंद्रस्थान बनले. सतराव्या शतकातील राजकीय घडामोंडींचा परामर्श घेतल्यास कोकण भागाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाल्याचे आढळून येते.

kothaligad1.jpgघाट रक्षक दुर्ग
भौगोलिकदॄष्ट्या महाराष्ट्राचा अगदी पश्चिमेकडील भाग म्हणजे कोकण होय. समुद्रकिनार्‍यापासून सह्याद्रीपर्यंतची अरुंद पट्टी म्हणजे कोकणपट्टी. कोकणातून देशावर जाण्यासाठी किंव्हा घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी अनेक अरुंद घाट आहेत. या घाटमार्गातूनच प्राचीन आणि मध्ययुगीन कालामध्ये देश आणि कोकण येथील रहीवाशांना एकमेकांशी संपर्क साधता येत असे. कोकणभागाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या घाटांचे महत्व अनन्यसाधारण असल्यामुळे घाटमार्गावर मोक्याच्या ठिकाणी किल्ले उभारलेले दिसतात. हे किल्ले म्हणजे घाटरक्षक होत.
काही महत्वाचे घाट आणि त्यांचे रक्षक दुर्ग पुढीलप्रमाणे सांगता येतील :-
कोळंबा घाट - कोथळीगड
नाणे घाट - जिवधन
कुसुर घाट - भिवगड, ढाकगड
पिंपरी घाट, सव्षाणी घाट - सुधागड
बोर घाट - राजमाची
वरंथ घाट - कावळ्या किल्ला
पार घाट - प्रतापगड
अंबिवली - रसाळगड
शेवत्या घाट - लिंगाणा, रायगड
कुंभार्ली घाट - जंगली जयगड
माला घाट - भवानगड,
तिवरा घाट - प्रचितगड
कुंडी घाट - महीमतगड
अंबा घाट - विशाळगड, माचाळ
फोंडे घाट - शिवगड
नरडवा घाट - बहिरवड
घाटावर उभारलेल्या किल्ल्यांचा उपयोग प्रामुख्याने टेहळणीसाठी आणि परकीयांच्या हालचालीवर नियंत्रंण ठेवण्यासाठी केला जाई. हे घाट-रक्षक दुर्ग शिवपूर्वकालापासून अस्तित्वात असून मध्ययुगात कोकणभागाच्या संरक्षणाचे महत्वपूर्ण कार्य त्यानी केले. या घाटरक्षक दुर्गामुळेच महमूद गवानासारख्या कसलेल्या सेनापतीला दक्षिण कोकणच्या मोहीमेमध्ये सहजासहजी यश आले नाही.

lingana fort.JPG

पंधराव्या शतकाच्या अखेरीस अमहदनगरच्या निजामशाहीच्या राजवटीत कोकणातील जलदुर्गांचे महत्व वाढू लागले. निजामशहाने स्वत:चे आरमार उभारले आणि जंजीरा या किल्ल्याचे अधिपत्य सिद्दीकडे देऊन समुद्रमार्गे चालणार्‍या व्यापारावर नियंत्रण प्रस्थापित केले. मक्केला जाणार्‍या मुस्लीम यात्रेकरूंना संरक्षण मिळावे, हाही आरमार उभारण्यापाठीमागे निजामशहाचा हेतू होता.

janjirafort.jpg

जंजिरा या किल्ल्यावर सिद्यांचे आधिपत्य प्रस्थापित झाल्यामुळे कोकण किनार्‍यावर अल्पावधीतच त्यांचा दरारा निर्माण झाला. जंजिरा हा किल्ला किनारपट्टीवर मोक्याच्या जागी असून संरक्षणाच्या दॄष्टीने भरभक्कम मानला जातो. या किल्ल्याच्या तटाच्या भिंतीची उंची १६ मीटर असून नियमित अंतरावर अर्धवर्तुळाकार असलेले १९ बुरूज आहेत. बुरूजांतून तोफ़ांच्या सहाय्यांने मारा करता येईल, अशा जंग्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाजीमहाराजांनी स्वराज्याचा विस्तार कोकणात सुरू केल्यानंतर जंजिर्‍याच्या सिद्दीकडून त्यांना आव्हान मिळू लागले. याशिवाय पोर्तुगीज आणि ब्रिटिश यांच्या चोरट्या हलचाली कोकण किनार्‍यावर चालूच होत्या. परकिय सागर-शत्रूवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी महाराजांनी स्वत:चे आरमार उभारले. सिद्दी हे मराठ्यांवे कट्टर शत्रू असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे, हे महाराजांच्या अनेक ध्येयापैकी एक ध्येय होते. सभासद लिहतो, "राजियास राजपुरीच शिद्दी, घरात जैसा उंदीर तैसा शत्रू, यास कैसे जेर करावे म्हणून तजवीस पडली." सिंद्यांच्या हालचालीवर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी जंजिर्‍यापासून अवघ्या पाच मैल अंतरावर असलेल्या कांसा बेटावर महाराजांनी पद्मदुर्ग नावाचा किल्ला उभारला. प्रभावळीच्या सुभेदारला लिहलेल्या एका पत्रात ‘पद्मदुर्ग वसवून राजापूरीच्या उरावरी दुसरी राजापूरी केली’-असा उल्लेख महाराजांनी केलेला आढळतो.

mahimat gad.jpgजल दुर्गांची साखळी
सिंद्यांचा बंदोबस्त करणे एवढे एकच कार्य शिवाजीमहाराजांना करावयाचे नव्हते. स्वराज्याच्या रक्षणासाठी गिरीदुर्गांच्या साखळीप्रमाणे जलदुर्गांची साखळी निर्माण करण्याचे उद्दिष्ट महाराजांना पूर्ण करावयाचे होते. त्यासाठी पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, गोपाळगड, जयगड, रत्नागिरी, पूर्णगड, यशवंतगडविजयदुर्ग, सिंधुदुर्ग, , कूर्मगड अशा सागरी किल्ल्यांची महाराजांनी साखळी निर्माण केली. शिवछत्रपतींच्या निर्वाणानंतर मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने ज्यावेळी दक्षिणेची मोहीम हाती घेतली त्यावेळी या सागरी किल्ल्यांच्या साखळीचा मराठ्यांना उपयोग झाला.
कर्नाटकात जिंजीकडे गेलेल्या राजारामाला समुद्रमार्गे स्वराज्यातील मराठे नेत्यांशी संपर्क साधता आला. औरंगजेबाने एकाचवेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतात मोहीम उघडल्यामुळे रसद पोहोचविण्यासाठी सागरी किल्ल्यांवा उपयोग मराठ्यांना करता आला. रामचंद्रपंतानी राजारामाचे कुटंब जिंजीकडे पाठविताना राजापुरापासून होनावरपर्यंत समुद्रप्रवासाचा मार्गच सुरक्षित मानला. कारण या मार्गावर मराठ्यांचे अनेक जलदुर्ग होते..

सिद्यांप्रमाणे पोर्तुगीज आणि टोपीकर (ब्रिटिश) यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासही या सागरी किल्ल्यांच्या साखळीचा मराठ्यांना उपयोग झाला. इंग्रजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी इ.स. १६७९ मध्ये मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या खांदेरी आणि उंदेरी या बेटावर तटबंदी बांधण्याचे काम महाराजांनी सुरू केले होते. त्यातून इंग्रजांबरोबर युध्दही झाले. अखेर इंग्रजांनी खांदेरी आणि उंदेरीवरील महाराजांचा हक्क मान्य केला.

जलदुर्गांविषयी शिवाजीमहाराजांचे धोरण स्पष्ट करताना सभासद लिहतो, "राजियांनी जागोजागी डोंगर पाहून गड वसविले, की येणेकडून दर्या जेर आहे. आणि पाणियांतील राजे जेर होतील......असे जाणून कित्येक पाणियांतील डोंगर बांधून दर्यामध्ये गड वसविले ..... . जोवर पाणियांतील गड असतील तोवर आपले नाव चालेल असा विचार करून अगणित गड जंजिरे जमिनीवर व पाणियांत वसविले."

sindhudurg.JPGशिवलंका सिंधुदुर्ग
शिवाजीमहाराजांनी सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग इत्यादी किल्ले विपुल पैसा खर्च करून दुरूस्त केले. अलिबाग, पद्मदुर्ग, यशवंतदुर्ग यांसारखे किल्ले नव्याने उभारले, पण या सर्व सागरी किल्ल्यात सिंधुदुर्गाचे महात्म्य आगळेच आहे. मालवण जवळ असलेला सिंधुदुर्ग महाराजांची सागरी राजधानी म्हणून मान्यता पावला. शिवरायांनी बांधलेल्या या जलदुर्गाचे वर्णन 'चौर्‍याऐंशी बंदरात हा जंजिरा मोठा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा जागा निर्माण केला' असे केले जाते.

इ.स. १६६४ मध्ये महाराजांनी सिंधुदुर्गाची उभारणी केली. या किल्ल्याच्या बांधकामासाठी पोर्तुगीज तंत्रज्ञांची शिवाजीराजांनी मदत घेतली होती असे म्हटले जाते. चित्रगुप्त बखरीत असलेल्या या उल्लेखाला समकालीन अशा पोर्तुगीज किंव्हा मराठी साधनांतून दुजोरा मिळत नाही. सिंधुदुर्गाच्या बांधकामाच्या वेळी पाया तयार करताना पाच खंडी शिसे ओतल्याचेही सांगितले जाते.
याच सिंधुदुर्गावर राजाराममहाराजांच्या काळात शिवाजीमहाराजांची प्रतिमा असलेले मंदीर उभारले गेले. आजही सिंधुदुर्ग पवित्र स्थान म्हणून गणले जाते.

sindhudurga-map1.jpgराजधानी रायगड

Raigad_fort_long_view.jpeg

कोकणातील लोकांना सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट कोणती असेल तर शिवरायांची राजधानी रायगड ही कोकणात आहे ही होय.
इ.स. १६७० च्या सुमारास महाराजांनी आपली राजधानी राजगडहून रायगडला हलविली. मुंबईकर इंग्रज, जंजिर्‍याचा सिद्दी यांच्या हलचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी, घाटमाथा आणि कोकण या भागातील आपला प्रदेश सुरक्षित राखण्यासाठी आणि मोगलांसारख्या बलाढ्य शत्रूचा सहजासहजी शिरकाव होऊ न देण्यासाठी महाराजांनी रायगड ही राजधानी केली.
सभासद लिहितो, `पुढे रायगड अदिलशाही होता तो (महाराजांनी) घेतला. राजा खास जाऊन पहाता गड बहुत चखोट, चौतर्फा गडाचें कडे तासिल्या प्रमाणे, दीड गाव उंच पर्जन्यकाळी कडियावरी गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव, एकच आहे.--- दौलताबादहि पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका, दौलताबादचे दसगुणी गड उंच असे देखोनी बहुत संतुष्ट जाले आणि बोलले, ‘तस्तास जागा गड हाच करावा,‘

शिवाजीमहाराजांच्या कर्तॄत्वाची ओळख करून घ्यायची असेल तर रायगड पाहणे आवश्यकच आहे. या गडावरील बालेकिल्ला, राण्यांचे महाल, मंत्र्याची घरे, बाजारपेठ? (नगरपेठ), पीलखाना, दारूचे कोठार, जगदीश्वर मंदीर या वास्तू पाहील्यानंतर शिवकालात रायगडावर केवढे वैभव होते याची कल्पना येते. पाण्याने तुडुंब भरलेला गंगासागर तलाव, बालेकिल्ल्याच्या सौंदर्यात भर घालणारे मनोरे पाहिले म्हणजे गतकालातील इतिहासाची आठवण होऊन कंठ सदगदित होतो. याच रायगडावर बत्तीस मणाचे सुवर्णाचे सिंहासन होते. कोठे गेले ते ?.... कोठे असेल ते ? गंगासागर तलावाच्या तळात सापडेल का ते ?

इ.स. १६७३ मध्ये रायगडला भेट देणारा इंग्रज वकील टॉमस निकल्स गडाविषयी लिहतो, ".......अन्नाचा भरपूर पुरवठा झाल्यास हा किल्ला अगदी अल्प शिबंदीच्या सहाय्याने सर्व जगाविरूध्द लढू शकेल-" पाश्चात्यांनी रायगडला पूर्वेकडील जिब्राल्टर असे नाव दिल्याचे आढळते, परंतु जिब्राल्टरमधील दोष पाहील्यास रायगड हा अनेकपटीने श्रेष्ठ किल्ला असल्याचे दिसून येते.

jangli jaigad.JPGपोर्तुगीजांचे केंद्र वसई
इ.स. १५३४ मध्ये पोर्तुगीजांनी वसई प्रांत गुजरातच्या सुलतानाकडून मिळविला. वसईचा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत मानला जातो. एका बाजूस खाडी, दुसर्‍या बाजूस समुद्र तिसर्‍या बाजूस दलदल आणि चौथ्या बाजूस वाळूचे मैदान असे संरक्षण या किल्ल्याला लाभले होते. इ.स. १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी महापराक्रमाने पोर्तुगीजांचे हे केंद्र जिंकून घेतले. त्यामुळे पोर्तुगीजांचे कोकणातून उच्चाटण झाले. याच काळात बाजीराव पेशव्याने जंजिर्‍याच्या सिद्दीलाही नामोहरण केले. वसई जिंकली त्यावेळी चिमाजी अप्पा एका पत्रात लिहीतात, 'श्रीचे सुदर्शन धर्मद्वेष्टे यांच्या मस्तकी वज्रप्रहार होऊन टोपीकर म्लानवत जाहले. अन्यथा वसई होती व फिरंगी आगीचा पुतळा होता.'

vasai.jpgआंग्र्यांचे ठाणे : विजय दुर्ग
पेशवेकालात आंग्र्यांनी प्रबळ आरमार उभारले. विजयदुर्ग हे आंग्र्यांचे प्रमुख केंद्र बनले. आंग्र्यांना दहशत वाटावी म्हणून इंग्रजांच्या मदतीने नानासाहेब पेशव्यांनी आंग्र्यांचे आरमार (पर्यायाने मराठा आरमार) नष्ट करायचा प्रयत्न केला. मराठ्यांच्या इतिहासातील ही एक शोकांतिका होय. इंग्रजांनी विजयदुर्ग ताब्यात घेऊन पेशव्यांना झुलविण्यास सुरुवात केली. कालांतराने सार्‍या किनारपट्टीवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

vijaydurg3_0.jpgअसे हे दुर्ग
पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे, हे कोकणातील दुर्ग आज उपेक्षित अवस्थेमध्ये आहेत. तटबंदी ढासळत आहेत, वास्तुंची आणि रस्त्यांची पडझड होत आहे. कडे कोसळून पडत आहेत. रान माजत आहे.

अपूर्ण.................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.