बुंदीची कढी : राजस्थानी खाद्यप्रकार

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 10 August, 2011 - 05:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कालच एका संकेतस्थळावर राजस्थानी खाद्यप्रकारांच्या पाककृती दिसल्या. त्यातील ही पाककृती खूपच सोपी आणि छान वाटली. मूळ पाककृतीत घरच्या घरी ताजी बुंदी कशी पाडायची तेही दिले आहे. परंतु मी आयते बुंदीचे पाकिट बाजारातून आणले आणि ही पा कृ करून बघितली. त्यात स्वतःच्या अंदाजानुसार थोडे फेरफारही केले आणि एक स्वादिष्ट प्रकार खायला मिळाला! (असंही मीच म्हणते! ;-)) तर ह्या कृतीसाठी लागणारे घटक पदार्थ :

बुंदी - एक ते दीड वाटी (अंदाजे)
दही - २ कप
बेसन - १ कप
जिरे व मेथी दाणे - प्रत्येकी छोटा अर्धा चमचा
हिंग - २ चिमटी
हिरव्या मिरचीचा ठेचा - आवडीनुसार कमी जास्त करा. मी एक चमचा ठेचा घेतला.
आले - एक इंच, किसून (मूळ कृतीत चिरून म्हटले आहे)
कोथिंबिर - चिरलेली
हळद - पाव ते अर्धा चमचा
लाल तिखट - पाव चमचा
तेल - फोडणीसाठी
मीठ - चवीनुसार
कढीपत्ता

क्रमवार पाककृती: 

१. बेसनाचे पाण्यात कालवून भजीच्या पिठाप्रमाणे मिश्रण तयार करा. गुठळ्या राहता कामा नयेत. दही फेटून घ्या. फेटलेल्या दह्यात हे सरसरीत बेसनाचे पाण्यात भिजवलेले पीठ मिसळा. त्यात ६-७ कप पाणी घालून व्यवस्थित एकजीव करा.

२. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे तडतडवा, मेथी दाणे घालून तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्या. त्यात हिंग, ठेचा, किसलेले आले, हळद घालून जरा परता. नंतर त्यात कढीसाठी तयार केलेले बेसन + दह्याचे मिश्रण घालून गॅस हाय फ्लेमवर ठेवा व ते मिश्रण उकळी येईपर्यंत सतत ढवळत रहा. उकळी आली की आंच मंद करा. त्यात चवीप्रमाणे मीठ व तिखट घाला. (बुंदी जर खारी असेल तर त्या अंदाजाने मीठ घाला.)
आता ह्या कढीला किमान १५ मिनिटे तरी व्यवस्थित शिजू द्या. अधून मधून कढी ढवळत रहा. जर कढी लगेच खाणार नसाल तर त्यानंतर गॅस बंद करा.

३. अगदी खायच्या वेळेला कढी गरम केली की त्यात बुंदी घाला व कढी २-३ मिनिटे शिजू द्या. वरून चिरलेली कोथिंबीर पेरा. कढीला आणखी खमंग करायचे असेल तर वरून तेलाची जिरे, तिखट, कढीपत्ता घालून फोडणी द्या व गरम गरम कढी वाढा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ माणसांसाठी
अधिक टिपा: 

* ही कढी दाटसरच होते. मला तर आधी चक्क हे बुंदीचे पिठले झाले की कॉय म्हणून शंका आली! Lol पण त्याची चव घेतल्यावर ती कढीच आहे ही खात्री पटली! Proud जर तुम्हाला कढी इतकी दाट नको असेल तर पाण्याचे प्रमाण वाढवा किंवा बेसनाचे प्रमाण कमी करा. पण मूळ कृतीतील कढी घट्टसरच आहे.

* मूळ कृतीत ठेचा न वापरता मिरच्या वापरल्या आहेत. पण मला तो तिखटपणा कमी वाटला, म्हणून मी ठेचा वापरला आहे.

* बुंदी शक्यतो ताजी असावी. पॅकबंद बुंदीचे पाकिट वापरत असल्यास ते नुकतेच उघडलेले असावे. ताज्या बुंदीत ह्या पदार्थाची खुमारी आहे. तसेच बुंदी फार शिजू देऊ नये. खायच्या अगोदर कढीत घालून द्यावी. अन्यथा कढी आळत आळत तिचे खरोखरीचे पिठले होण्यास वेळ लागणार नाही!!! Light 1

* मूळ कृतीत कढीपत्ता वापरलेला नाही, परंतु माझ्या मराठी मनाला कढीपत्त्याशिवाय कढी म्हणजे अगदी कसेसेच वाटले, त्यामुळे तोही वापरलाच!

*** ही कढी भात/ पोळी/ भाकरी बरोबर खाऊ शकता.

** ह्या कढीचा पंजाबी अवतार म्हणजे फोडणीत जिरे, मेथी दाणे, आले, चिरलेला कांदा, मिरी दाणे, सुक्या लाल मिरच्या घालून परतणे व त्यात दही + बेसन + मीठ + हळद + पाण्याचे मिश्रण घालून उकळणे. वरून आवश्यकते नुसार तिखट घालणे, बुंदी घालून ३-४ मिनिटे शिजवून गॅस बंद करणे. ही कढी तुलनेने पातळ असते. त्यात बेसनाचे प्रमाणही कमी असते. (१ कप दही : १ कप बुंदी : पाव कप बेसन)

माहितीचा स्रोत: 
निशामधुलिकाचे संकेतस्थळ व मूळ कृतीत स्वतः केलेले बदल
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुंधती मस्त प्रकार आता मी घरी जाउन ताकाची कढी बनवेन आणि त्यात बुंदी सोडेन.
कढी गोळे पण साधारण असाच प्रकार असतो.

अकु, मेथी दाण्यांऐवजी पंच फोरनची फोडणी आणि चवीपुरती दालचिनी घालून पण मस्त लागेल ही कढी Happy

येस्स... नेक्ष्ट टाईमला तोच प्रयोग करायचा विचार आहे! पंच फोरन मस्त लागेल ह्या कढीत. दालचिनीबद्दल मात्र किंचित साशंकता वाटते. (मला दालचिनी फार आवडत नाही, हेही कारण असेल!! ;-))

दीपा, त्या कृतीत त्यांनी म्हटलंय की बेसनाचे भजीच्या पीठाइतके सरसरीत मिश्रण पाण्यात कालवून तयार करा. कढईत (पाव किलो) तेल गरम करा. बुंदी पाडायचा मोठा झारा मिळतो, त्यात हे मिश्रण घालून झार्‍याची भोकाची बाजू कढईच्या तळाच्या दिशेने नेऊन झार्‍याचा दांडा कढईच्या कडेवर आपटत बुंदी थेट तेलात पाडा. (मला वाटतं ह्यांची कढई चांगली लांब, रुंद, जाडजूड असणार!) मग तो झारा बाजूला ठेवा व दुसर्‍या झार्‍याने बुंदी तांबूस - लाल रंगाची होईपर्यंत तळा. तळलेली बुंदी बाजूला काढा. व पुन्हा बुंदी पाडण्याची प्रोसेस रिपीट करा! (हुश्श!!)

आडो, भारत-कोरियात ये-जा करणारे लोक्स तुला आता माहितीच आहेत! Biggrin मागवून घे त्यांच्याकडून! Proud

दिनेशदा, अगदी, अगदी.

सिंडरेला, मी धार्ष्ट्य करून दालचिनी पण घालून बघणार!

सर्वांचे धन्स! Happy