मायबोलीचे अनंत उपकार

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

माझ्या वैवाहिक आयुष्यातील एका वादळाची चर्चा मी मायबोलीवर साधारण सहा सात वर्षांपुर्वी केली होती. आता ते लेखन सापडत नाही पण जुन्या मायबोलीकराना ते स्मरत असेलच.
दिनांक १५.११.२००७ रोजी त्या वादळाची सांगता झाली. मे. न्यायालयाने आम्हा सर्वांची म्हणजे मी, माझे दिवंगत वडील, माझी आई, मा़झी मोठी बहीण, मेहुणे, मोठा भाउ, वहीनी सर्वांची निर्दोष सुटका केली. निकाल दिल्यावर मला शक्य तितक्या मायबोलीकरांशी प्रत्यक्ष संपर्क साधून हि बातमी दिलीच होती. या निकालपत्राची प्रत आता हाती आल्याने मी त्यासंबंधी माझ्या भावना इथे व्यक्त करीत आहे.

सरकार पक्ष म्हणजेच फिर्यादी माझी पत्नी यानी केलेल्या कुठल्याच आरोपात मे. न्यायालयाला तथ्य आढळले नाही. फिर्यादी, तपास अधिकारी व साक्षीदार यांच्या जबानी न्यायालयाला विश्वासार्ह वाटल्या नाहीत. तसा स्पष्ट निर्देश मे. न्यायालयाने आपल्या निकालपत्रात केला आहे. उपलब्ध पुराव्यावरून माझ्या स्वच्छ चारित्र्याचा निर्वाळा मे. न्यायालयाने दिला आहे.

फिर्यादीने दाखल केलेले पुरावे मे. न्यायालयाला विश्वासार्ह तर वाटले नाहीतच त्या व्यतीरिक्त ती कागदपत्रे बनावट असल्याचे मत मे. न्यायालयाने व्यक्त केले आहे.
याच दरम्यान मे. न्यायालयाच्या असेही निदर्शनास आले कि फिर्यादी स्वतःच आर्थिक गुन्हेगार असून आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने एक गुंतवणुक कंपनी सुरु करुन तिने अनेक लोकाना करोडो रुपयांना गंडवले आहे. त्याबाबत ती आणि तिचे साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

माझ्या या लेखनानंतर मला मायबोली आणि मायबोलीकर यांचे निरपेक्ष प्रेम लाभले. माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला. अनेक मायबोलीकरांशी मला वैयक्तिक नाते जोडता आले. केवळ मायबोलीकरच नव्हेत तर त्यांच्या कुटुंबीयानीदेखील मला आपले मानले. या बळावरच मी या वादळाशी साडेसात वर्षे झुंज दिली.

हा आधार मला मिळाला नसता तर काय झाले असते याची कल्पनादेखील मला करवत नाही.

कोरडे आभार मानून मला या कर्जातून मुक्त व्हायचे नाही. तसा विचारही मी करणार नाही. या निमित्ताने यापुढेही मायबोलीसाठि जे करता येईल ते करत राहण्याचे वचन देतोय तसेच कुणाला या बाबतीत जास्त चर्चा करायची असेल वा सल्ला हवा असेल तर त्यासाठी मी उपलब्ध असेन, असे जाहीर करतोय.

या बदल्यात मागणे एकच.
हे प्रेम मला आयुष्यभर लाभो.

आपलाच,

दिनेश.

विषय: 
प्रकार: 

दिनेशदा, वाचुन खुप खुप आनंद वाटला. तो याच साठी कि साडेसात वर्‍शांपासुन चाललेल्या तुमच्या लढाइची अखेर सांगता झाली. मी तुमचे लेखन 'कोणालातरी सांगायचे आहे' अशा नावाच्या बीबीवर वाचल्याचे मला आठवतंय. त्याचवेळी मी खुप खुप व्यथीत झालो होतो. त्यानंतर रंगीबेरंगी वरचे तुमचे लिखाण वाचताना मनामधे नेहमी एक हुरहुर लागुन रहायची. तुमच्या खरेपणाची आणि निर्दोष्त्वाची त्याचवेळी मला खात्री पटली होती. न्यायालयीन निर्णयाने त्यावर आज शिक्कामोर्तब केला इतकंच.

खरेतर तुमच्या सारखा रसिक माणुस शोधुन सापडणार नाही. प्रवास, निसर्ग, पाककला यांतील तुमची आवड आणि अभ्यास आता सर्वज्ञात आहे. आयुष्यातील खडतर पर्वातुन जाताना तुमचा जीवनाविषयीचा सकारात्मक द्रुष्टिकोन पाहून खरेच तुमच्या बद्दलचा आदर दुणावतच गेला. त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

मी मायबोलीवर सहसा जास्त लिहीत नाही (मराठी टायपण्याचा आळस :)), पण इथे लिहीली गेलेली प्रत्येक ओळ वाचण्याचा माझा प्रयत्न असतो. आज तुम्ही लिहिलेली हि बातमी ऐकून अतिशय आनंद झाला आणि अगदी रहावलंच गेलं नाही म्हनून लिहिलं.

तुमच्या या विजयात सगळे मायबोलीकर सहभागी असतील यात शंकाच नाही. मला तुम्ही नेगमीच ज्ञानमार्ग दाखविणार्या दिपस्तंभासारखे भासता. आज त्या दिपस्तंभावर विजयमाळा लागल्या आणि तो दिपस्तंभ आणखीनच झळाळुन उठला. बस, यापूढे आणखी काही लिहिता येणार नाही मला. डोळ्यांत आनंदाश्रु दाटुन आलेत आणि मनात क्रुतज्ञतेचे भाव..............

दिनेशदा,
मनःपुर्वक अभिनदन.
खुप आनद झाला.

नमस्कार. दिनेशदादा. अभिनंदन. तुमची माझी ओळख अगदी नविन. कदाचित तुम्ही मला ओखळतही नसाल. मायबोलीवरच्या तुमच्या लिखानाचा मी एक चातक.
वादळ आले. तुम्ही या वादळाशी साडेसात वर्षे झुंज दिली आणि न्यायालयाने तुम्हाला विजयी घोषित केले. फार कठिण असतात हे दिवस. असो.
मला इतकंच म्हणायचय, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे....

दिनेशदा,

मी तुमची करुण कहाणी वाचली होती, त्या पार्श्वभूमीवर ही बातमी फारच आनंददायक आहे. मनःपुर्वक अभिनदन.
खुप आनद झाला.

डोक्याची कटकट गेली... हेच खूप आहे...

'परदेसाई' विनय देसाई

दिनेशदा! साडेसात वर्षाची झुंज यशश्वी झाली, एका अर्थाने साडेसाती संपली!

अभिनंदन दिनेशदा. असले प्रसंग ओढवलेले असतानासुद्धा आशावादी दृष्टिकोन असणारा तुमच्यासारखा माणूस विरळाच. खूप आनंद झाला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

परत एकदा आभार मित्रानो.

एक कळकळीची विनंति, तुमच्या परिचयात कोणीही अश्या समस्येमधून जात असेल, तर माझ्याशी संपर्क साधायला संकोच करु नका.

आपलाच
दिनेश

दिनेश,

अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

dineshvs

हत्स ओफ्फ तु ऊ. या काल्खन्दात जिवनाकदे सकारात्मक द्रुश्तिने पाहने हे किति कथिन काम आहे याचि कलपना आहे.
या पुधिल आयुश्य आपल्याला सुखात आनि समाधानात जगायला मिलो हि इछा.

दिनेश, आत्ताच बातमी वाचली. वाचून खूप आनंद झाला. खूप फरफट झाली तुझी आणि तुझ्या घरच्यांची. साडेसाती इथेच संपली असेल तुझ्या आयुष्यातली अशी सदिच्छा !

दिनेश,

महाजालावरील संकेतस्थळ ते काय? आणि ते कितपत मानसिक आधार देणार?
ह्या प्रश्नांना आपल्या प्रकरणाचेच उत्तर समर्पक आहे.

साधू लोक संकटातही स्वभाव सोडत नाहीत.
ह्या उक्तीनुरूप आपले लेखन वाचत असतांना मला कधीही आपल्यावर होत असलेल्या अन्यायांची,
बरसणार्‍या संकटांची जाणीवही होत नव्हती.
एवढे ते सदाबहार असे.
त्यामुळेच, जरी आपण एकमेकांना कधीही पाहिलेले नाही.
तरीही मला असे वाटू लागले की आपले विचार जुळतात.
महाजालावर निर्माण होणार्‍या निरपेक्ष मैत्रीचाही हा एक नमुनाच ठरावा.
तेव्हा ही मैत्री तर अवश्य राहीलच.

आता, आपल्याही मनातील किल्मिष दूर झालेले असल्याने आपण आणखीही मुक्तपणे अभिव्यक्त होऊ शकाल.
एक सांगू का, महाजालावरील मराठी साहित्यिकांची यादी कुणी केली तर तुमचे नाव त्यात अवश्य शिरोभागी असेल.
तेव्हा लिहीत राहा. नव्या उमेदीने. आम्हीही वाचतोच आहोत.

आपल्याला भविष्यातील आपल्या सर्व योजनांसाठी हार्दिक शुभेच्छा!

तसेच मायबोलीसही अनेकानेक धन्यवाद.

- नरेंद्र गोळे

खरे तर मला कधीच असे जाणवले नाही कि मी काहि अज्ञात व्यक्तींशी बोलतोय. पहिल्याच भेटीत मला सर्वच मायबोलीकर जुन्या ओळखीचे वाटतात.
या सर्व प्रकरणात सविस्तर रित्या मला मायबोलीबद्दल लिहायलाच हवे. इथे मला भेटलेले बहुतेक मायबोलीकर माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, पण माझ्याशी बोलताना आणि वागताना त्या सर्वानी जो समजूतदारपणा दाखवला त्याला खरेच तोड नाही. माझ्या मनाला कधीहि खिन्नता जाणवली नाही, हे माझे नव्हे तर मायबोलीचे सामर्थ्य आहे.

एरवी माझ्या हातून एवढे सगळे कुठले लिहुन व्हायला ?

अरे दिनेशदा बातमी वाचुन फार आनंद झाला.. तुमच्या मागची साडेसाती संपली, आभिनंदन!!!
आणि उर्वरीत अयुष्यासाठी हार्दीक शुभेच्छा!!!

आता तुमच्या कथा आणि लेख अजुन जस्त यायला हवेत...

लगे रहो दिनेशभाई....

सत्यजित.

दिनेश....... इतकं भयंकर घडलं तु़झ्या आयुष्यात......... मला काहीच कल्पना नव्हती रे.....!
सो सॉरी.... Sad
अरे पण तू मात्र धीराचा हं...... मानावं लागेल रे!
तुला आता तुझ्या नव्या आयुष्यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा !
मायबोलीतलं तुझं स्थान फार मोठं आहे..... आणि ते अजून उंचीवर जाओ!

दु:ख दे देवा परंतू, भोगण्याचे धैर्य दे...

हे म्हणणं सोप्पं आहे.... दु:खात पडेपर्यंत आणि बाहेर पडल्यावरही.... पण त्या मधल्या काळात भोगणार्‍या माणसाचं जे होतं ते होतं... त्यालाच ते कळू जाणे.
दिनेशदा, कुठेतरी दीप तुमच्यासाठीही तेवत होता... हे वाचून खूप बरं वाटलं. सहा-सात वर्षांचा मानसिक संघर्ष.... सोप्पा नाही. दुसर्‍यांसाठी दीप बनेन असं जाहीरपणे सांगणं यातूनच तुमची उमेद आणि धैर्य दिसून येतय...
यापुढला प्रवास निर्वेध होवो, दिनेशदा.... यापरतं तुमच्यासाठी दुसरं मागणं नाही.

आभार जयु आणि दाद

आता खरेच ते दिवस सरले. आता सगळ्याकडे बघताना, त्या त्रासापेक्षा, या सगळ्यात ज्यानी साथ दिली त्यांचीच आठवण येतेय.
माझ्या वडिलांच्या मृत्युनंतर केवळ पाचच दिवसानी मला कोर्टात हजर रहावे लागले होते. वारंवार विनंति करुन, माझ्या आईला, कोर्टात हजर राहण्यापासून सूट मिळू शकली नाही. पण तिने कधीही याबद्दल नाराजी दाखवली नाही.
हे सगळे घडायच्या आधीच, माझ्या वडिलानी मृत्यूपत्रात लिहुन ठेवले होते, कि दिनेशला आपण सर्वानी साथ द्यायला हवी. माझे भाऊ आणि बहिण तर माझेच होते, पण वहिनी आणि भाओजी, तर खंबीरपणे आजही माझ्यामागे उभे आहेत.

निवडलेले एकच नाते चूकीचे होते पण जन्माने जोडलेली आणि मग लाभलेली सर्व नाती, अनेक आयुष्यं उधळुन टाकण्याच्या योग्यतेची आहेत.

मी ज्या सगळ्यातून गेलो, त्यातून कुणाला जावे लागू नये, हिच सदिच्छा.

सत्यजित, मी भेटु शकत नसलेल्या माझ्या मुलाचे नावही सत्यजितच आहे. तुझ्या कवितामधून तो मला भेटतो.

सर्वप्रथम दिनेशभाऊ, हार्दीक अभिनन्दन की तुम्ही या जन्जाळातून सुखरुप निष्कलंक सुटलात! Happy
ते लिखाण मी वाचले होते, खास करुन विमानतळावरुन उतरल्यावर झालेली अटक तसेच तुरुन्गातील दिवस व तेथिल न्हाव्याने दाखवलेली कीव वा दया! तुम्ही यातून सहिसलामत सुटलात हे वाचून आनन्द झाला! Happy

>>>>> निवडलेले एकच नाते चूकीचे होते >>>>>
हे नाते निवडणे खरच आपल्या हातात असते का? आपल्या बुद्धि कौशल्यात अचुक नाते निवडणे बसते का? आपल्या आर्थिक व व्यावहारीक सामर्थ्याच्या जोरावर चुकीची नाती झिडकारून "योग्य" तेवढीच नाती पदरात पाडून घेता येतात का?
आम्ही ज्योतिषाच्या गप्पा मारतो, पण खरच पुढचे जर कळत असेल, तर कळुनही विजोड नाते आगोदरच मोडता येते का?????
तर या व यासारख्या सर्व प्रश्नान्ना उत्तर ठामपणे "नाही" असेच द्यावे लागते! निदान माझातरी "ज्योतिषी" या नात्याने हाच अनुभव हे! व तो फारच जळजळीत हे!
मग हे जे घडते यात दोष कुणाचा? का मी यात फरफटलो? माझा काय दोष होता? मी सज्जन नव्हतो का? असे मी काय पाप केले होते या जन्मी की पूर्वजन्मी की मला हे भोगावे लागले? हे व यासारखे अनेक प्रश्न मनात फेर धरुन नाचतात!
"माणुस जन्माला येतो तो काही भोग भोगण्यासाठीच", "त्यातलेच हे भोग", "भोगुनच सम्पवायचे" हे यावरचे सर्वात सोप्पे उत्तर, पटायला सोपे, पण पचवायला अवघड!
येथुन पुढे, मागिल कालखण्डातिल कटू आठवणीन्ना शक्य तेवढे बाजुला सारुन आयुष्य पुन्हा नव्या उमेदीने नव्याने सुरु करण्यास आपणास शुभेच्छा!

आपल्या चिरंजीवान्बद्दल पुरेसा उलगडा होत नाही! आपण त्यास अजुनही भेटू शकत नाही हे अन्न्याय्य आहे! पण काळ हे त्यावरील उत्तर असू शकते! हरप्रकारे, जर तो "अज्ञान बालक" असेल तर त्याचा ताबा मिळवायचा प्रयत्न करावात!
(माझ्या आयुष्यात घडलेल्या, यापेक्षा बर्‍याचश्या वेगळ्या पण अशाच "चूकीच्या नातेसम्बन्धाच्या" केस मधे अडकलेल्या एका लहान बालकास मात्र मी कायदेशीर झन्झटान्मधून सुखरुप अलगद बाहेर काढू शकलो, त्यास काही लोकान्चे इतके अनाकलनीय सहाय्य झाले की त्यावर कादम्बरी लिहीली जावी, कधी प्रत्यक्ष भेटीचा योग आला तर जरुर कहाणी सान्गेन! इथे उडत उडत उल्लेख केला येवढेच! सर्व वेळ स्वतःतल्या चान्गुलपणावर अन देवावर श्रद्धा ठेवुन वागत गेलो! वागत जावे! अजुन काय लिहू?)

...;
आपला, लिम्बुटिम्बु

दिनेशदा,
तुम्ही सही सलामत सुटलात म्हणुन मनापसुन अभिनंदन्...कश्या असतात काही व्यक्ती? देव अशी विचित्र रसायनं बनवतो तुमच्या सारख्या गोड लोकांची परिक्षा बघण्यासाठी. तुमचं निसर्गावरचं लिखाण मी स्टोअर करुन ठेवलंय. तुमच्या दिलेल्या उपमा इतक्या सुंदर असतात की त्याला शब्द नाहीत माझ्याकडे. मला संपुर्ण माहिती नाही तुमच्याबद्दल पण, जे अर्धवट वाचलंय त्यावरुन हे थोडंसं. माझ्या अगदी जवळच्या एका मित्राच्या आयुष्याची वाट लागलेली मी उघड्या डोळ्यानी पहात आहे. पण मला सांगा - सत्यजीत का दुरावला? तो तुम्हाला का मिळु नये तुम्ही निर्दोष असल्याचा न्यायालयाने निर्वाळा दिला तरी! ज्याच्या नावात सत्याची जीत आहे तो तुमचा व्हायला हवा...
परवा माझी आई निवर्तली. मी दुखात होते म्हणुन मा.बो. वर आले...तुमची सल पाहीली आणि माझी विसरले.

नमस्कार दिनेश,
गेल्या काही महिन्या पासुन मी मायबोली वर येते आहे... माझ्या वाचनाच्या आवडीला इथे खुप छान खाद्य मिळत असते.
आधी हावरटासारख्या कथाच वाचल्या... तिथे तुम्हि पहिल्यान्दा भेटलात.अन् आहारशास्त्र आणि पाककृती या विभागात तर तुम्ही खुप खुप भेटलात. या विभागात ला तुमचा अधिकार सगळ्यानि का मान्य केलाय हे अगदी पटले.मग मात्र dineshvs या नावाची मनात कुठेतरी नोन्द झाली. कुठल्याही भागात तुम्ही भेटलात तरी तुमच्या लिहिलेल्या ओळी न चुकता वाचल्या जायल्या लागल्या.तुमचे रंगीबेरंगी पान वाचले. आता तुमची एक छानशी (झाडाफुलात रमणारा..सखोल ज्ञान असणारा, आहारशास्त्र या विषयात खुप ज्ञान असणारा, साहित्यात रुचि असणारा... एकन्दर... एक रसिक माणुस अशी ) ओळख झालेली. अन् एकदिवस रंगीबेरंगी मधे "मायबोलीचे अनंत उपकार " हा लेख वाचला.
तुम्हाला काय सोसावे लागले असेल हे जाणवून.. खुप खुप वाईट वाटले...आणि काल सहज मायबोली वर फेरफटका मारत आसताना Views and Comments मधल्या Closed BB मधे "पुरुषांसाठी divorce चा अनुभव" हा तुमचा अनुभव वाचला.वाचुन मन सुन्न झाले... सन्सार मोडला...सागळ्या कुटुम्बाला मनस्ताप झाला.. मुल दुरावले.. नोकरी चा Problem.. हे कमीच झाले होते तर जेल सुध्धा...
किती मोडुन पडला असाल तुम्ही... किती मानसिक बळ लागले असेल तुम्हला या काळात... तिव्रतेने वाटले.. का ,काहीही दोष नसताना एखाद्याच्या आयुष्याची इतकी परवड व्हावी..?
पण आता... तुम्हि या दुष्टचक्रातुन बाहेर आला आहात याबद्द्ल मनापासुन आनन्द झाला!
अन् सगळ्यात महत्वाचे की या अनुभवानन्तर ही तुम्ही आयुष्याविषयी खुप सकारात्मक आहात असेच वाटते... याबद्दल खरोखर तुम्हाला हॅट्स् ऑफ!

असेच रहा... शुभेच्छा !!!

दिनेशदा: मी मायबोली ची सदस्य होउन ५ वर्शे होउन गेली. परंतु आहारशास्त्र आणि पाकक्रुती आणि रंगिबेरंगी सोडल्यास जास्त काही वाचन झाले नाही वेळेअभावी. आज सहज इक्डे डोकावले तर तुमचे वरील पोस्ट वाचले. सुप्रिया०१ ने नमुद केलेला Views and Comments मधील तुमचा अनुभव वाचला. मन सुन्न झाले. तुमचे लेख आणि सल्ले वाचताना अजिबात तुमच्या त्या त्या वेळ्च्या मनस्थितीची कल्पना येत नाही. ह्याचे श्रेय तुमच्या सकारात्मक आउट्लुक ला आहे.
तुम्हि या सर्वातुन बाहेर आलात याबद्द्ल मनापासुन आनन्द झाला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा.

आत्ताच तुमचे हे लिखाण वाचले...
आत्त पर्यंत तुमचे इतर लिखाण वाचताना.. तुम्च्या आयुष्यातील झंझावाताची पुसटशी सुद्धा जाणिव झाली नाही... तुमच्या लिखाणाने नेहमिच तुमच्या बद्दल खुप आदर वाटत असे... आता तर तो दुणावलाय...
या सगळ्यातुन तुम्ही आता बाहेर पडलाय कायदेशिरपणे ... पुढील आयष्या साठी खुप खुप शुभेच्छा!
या मायबोली ने खरोखर.. इतके छान मित्र जोडुन दिले आहेत.. जे नेहमिच सर्वांना दु:खातुन सावरतात.. आनंद वाटतात..
खरोखर मायबोलीचे अनंत उपकार आहेत... मला पण खुप मदत केली मायबोलिने सावरायला.. अशीच सर्व मिळुन एकमेकांना मदत करत राहुया...

मी कालच अचानक Views and Comments मधील तुमचा अनुभव वाचला आणि आज हे पान वाचनात आले.

काल अगदी सुन्न व्हायला झाले.....

पुढिल आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा...

*******************
तमसो मा ज्योतिर्गमय

दिनेश,

आपल्याशी माझा संपर्क कधी आला नाहीत पण तुमची पोस्टस मी काही वेळा वाचतो.

इतका कटु अनुभव येउनही कुठेही तुमच्या कुठल्याही पोस्ट मधे कुचकटपणा, नैराश्य, उगाच कोणाला दुखवणे हे कधीच आढळले नाही. तुमच्या सर्व विषयातील ज्ञानाने आश्चर्य वाटते.

तुमचे (बीलेटेड) अभिनंदन्..आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!

-मनोज

दिनेश, अभिनंदन. मी तुमची कहाणी वाचली होती. अंगावर शहारे आणणारी होती. असेहि घडू शकते, एखाद्या चांगल्या, सज्जन व्यक्तीच्या आयुष्यात?

पण आता सर्व ठाकठीक झाले आहे. नव्या उमेदीने पुढील आयुष्य घालवा. ईश्वरकृपेने तुम्हाला पुढील आयुष्यात भरपूर सौख्य समाधान, आयुरारोग्य, संपत्ति व सुकीर्ती लाभो. (हो, मी मानतो ईश्वराला, कुणि मानत असो वा नसो)

Happy Light 1

दिनेशदा, तुमची कहाणी वाचली होती. आपला फ़ारसा संपर्क झाला नसला तरी हे अन्याय्य आहे याची खात्री पटली होती. आता तुमची साडेसाती संपलीय. खुप छान वाटले. नव्या आयुष्याला, नव्या दमाने, नव्या हुरूपाने सामोरे जायला आता तुम्ही सिद्ध झाला आहात. अनेकाने शुभेच्छा !

सस्नेह,

विशाल

दिनेश शुभेच्छा. आता एका आनंदी, निरोगी आयुश्यावर तुझ हक्क आहे. प्रत्येक क्षण सुखात जग.

दिनेशदा...:)

तुमच्या लिखाणाची मी चाहती होतेच जशी मायबोलीवर यायला लागले तेव्हा पासुन
तुमच्या आयुष्यतला हा दु:खद पैलु मला माहीत नव्हता..आज समजला अन खुप वाईट वाटले की का नेहमी चांगल्या लोकांच्याच भाळी हे असे येते...

तुमचा ऋजु स्वभाव, खुप छान लिखाण पाककृती..सगळच छान पण धीराने दिलाला हा लढा ही खुप भारावुन टाकणार असो.

आता सावट गेलय अंधाराच..लख्ख दिपांमधे लखलखीतपणे आयुष्याला सामोरे जालच. या अनेकानेक शुभेच्छा !!

अन मदतीसाठी पुढे केलेला हात तुमच्याबद्दल माझ्या मनात असणार्‍या आदराला अजुन उंचावणारा.

बासुरी

इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्ते पे हम से, भुलकर भी कोई भूल हो ना

दिनेशदा, साडेसात वर्षं म्हणजे खरं तर माणसाच्या आयुष्यातला खूपच मोठा काळ आहे. या संपूर्ण काळात तुम्हाला जे जे काही करता आलं नाही ते सर्व तुम्हाला करता यावं यासाठी आणि आयुष्यातल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

-योगी

Pages