मिरासीचे म्हुण...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

तर परवा आम्हाला नवीनच गोष्ट कळली. म्हणजे गोष्ट नवीन नव्हे, पण आता वयोमानापरत्वे गोष्टी पटपट कळत नाहीत आणि दुसरे म्हणजे कळल्या तरी वळत नाहीत. आता हेच बघा - तुकोबांची गादी की कायसेसे आहे म्हणे. आता हे आम्हाला नवीनच होते. म्हणजे आम्ही समजत होतो की या मर्‍हाटदेशी गादी एकच, ती ज्ञानोबांनी चालू केली आणि तुकोबांपाशी संपली. आता हेसुद्धा आम्हाला पहिल्यांदा खटकायचे. परंतु, आमच्या वालिदसाहेबांनी सांगितले की मित्रा, खरी गादी अशीच चालते. म्हणजे गर्दीवर सद्दी चालत असल्याने ज्यांना गर्दीच गादीवर बसवते ते संत आणि गादीवर बसल्यामुळे ज्यांची गर्दीवर सद्दी चालते ते जंत असेही आमच्या वालिदसाहेबांनी सांगितलेले स्मरते. ते कळून घेऊन वळून घेण्यातच अनेक वर्षे गेली... अन् आता आता कुठे वळू लागले तर या वंशपरंपरागत गादीचे कळले. त्यामुळे आमचा तर फार गोंधळ उडाला आहे.
.
तसे आम्ही पूर्णतः शहरी वातावरणात वाढलो. पण काही ग्रामीण मित्रांशीही आमच्या सुदैवाने संपर्क आला (काही ग्राम्य मित्रांशीही, तोसुद्धा आमच्या सुदैवाने). त्यांजकडून शेतीबद्दल थोडीफार माहिती मिळाली. तर मिराशीचे शेत म्हणून प्रकाराबाबत त्यांचेकडूनच आम्हाला कळले. पूर्वी म्हणे ग्रामव्यवस्थेत शेतकर्‍यास स्वतःची स्वतंत्र जमीन नसे. शेतकर्‍यास कसायला जमीन मिळे ती गावच्या पाटलाकडून. ही शेतजमीन वंशपरंपरागतरित्या वारसाहक्काने त्या शेतकर्‍याच्या कुटुंबात चालत राही. आता अरबी भाषेत मृताच्या वारसाला वारसाहक्काने मिळणार्‍या गोष्टीस मिरास म्हणतात, त्यामुळे ही झाली 'मिराशीची जमीन'. हा मिराशीचा हक्क पूर्ण किंवा अंशतः विकता येत असे (लक्षात घ्या बरे, जमीन विकली नाही जायची, तर मिराशीचा हक्क विकला जायचा). पण यात गंमत अशी की पाटलास किंवा शासनास शेतकर्‍याकडून हा मिराशीचा हक्क काढून घेणे सहजसोपे नव्हते, आले मना आणि काढून घेतली जमीन असे नव्हते. तेव्हा मिराशीचा हक्क हा जवळजवळ मालकीहक्कच होता.
आता आमचे मित्र असेही म्हणतात की, अहो शेतजमीन मिळाली तरी ती पिकवणे यास अपरंपार कष्ट लागतात. (हेही आम्हास नवीनच. आम्हास वाटले की 'शेत' मिळते, तर तसे नव्हे, 'शेतजमीन' मिळते !). तेव्हा हे कष्ट केले तर कुठे पीक येते. ढिम्म बसून फक्त ढेकूळ हाती येते. असे आपले आम्ही ऐकले. मग आम्ही तुकोबांचा सल्ला घ्यावा असे ठरवले आणि उघडली त्यांची गाथा (ही प्रथा आमच्या काही परधर्मी मित्रांकडून उचलली) आणि अहो आश्चर्यम् ! हे पहा तुकोबा काय म्हणतात - मिरासीचे म्हुण सेत | नाही देत पीक उगे || म्हणजे तुकोबांचे आणि आमच्या शेतकरी मित्रांचे म्हणणे अगदी तंतोतंत जुळते !
आता तुकोबांना शेत देणारा पाटील कोण असे विचारायची आमची तरी टाप नाही. अहो, तुकोबा म्हणजे कुठल्याही, अगदी कुठल्याही, पाटलाच्या 'अरे'ला 'कारे' म्हणू शकणारा माणूस. त्याची थोरवी ओळखून एक राजा गेला त्याच्याकडे (असे राज्यकर्ते होते म्हणे !). तर तुकोबा म्हणाला, अरे हट् ! यापेक्षा भारी शेत आहे माझ्याकडे. राजा सूज्ञ (असेही राज्यकर्ते ... !!). त्याला आधीही अशाच एकाने 'आम्ही काय कुणाचे खातो, तो श्रीहरी आम्हास देतो' असे काहीतरी सुनावले होते. तेव्हा गुपचूप परत गेला. असो. तर सांगायचा मुद्दा असा की तुकोबांना कुठल्या पाटलाने काय शेत दिले ते आपले आपण समजून घ्यावे.
.
आता तुकोबांच्या 'वंशपरंपरागत' वारसांनी कशाची मिराशी घेतली हे त्यांचे त्यांनाच ठावकी. त्याची त्यांनी काय व कशी मशागत केली हेही त्यांचे त्यांनाच ठावकी. बरे मिराशी घेतली, मशागत केली तेही ठिक... पण आता ते म्हणतात, एका माणसाने तुकोबांवर पुस्तक लिहिले, त्यात तुकोबांचे चारित्र्यहनन झाले. आता तुकोबांचे किंवा त्यांच्यासारख्या माणसांचे असे 'चारित्र्यहनन' होते हेही आम्हास नवीनच. आम्ही आपले 'तुका आकाशाएवढा' हे जाणणारे. आम्ही दि. बा. मोकाशींनी अनेक वर्षांपूर्वी लिहिलेले 'आनंद ओवरी' नावाचे पुस्तक वाचले आहे. त्यात तर ठिकठिकाणी या गादीधार्‍यांना 'चारित्र्यहनन' दिसेल अशी आम्हांस खात्री आहे ! (ते प्रकाशित झाले तेव्हा 'चारित्र्यहनन' कशास म्हणायचे याचा दृष्टीकोन वेगळा असावा असा आम्हाला दाट संशय आहे). तर ते आकाशाचे चारित्र्यहनन कोणी केले बुवा असे बघायला गेलो... तर माणूस आपल्या मातीतलाच निघाला हो. म्हणजे आपल्या मातीत शब्दशः वाढलेला. साक्षात आयुष्याशी, या व्यवस्थेशी झोंबाझोंबी केलेला. कोणी लुंगासुंगा ऐरागैरा नव्हे.
आम्हाला काय 'इनामं' हाईत ?
लंगुटी एवढीबी न्हाई पट्टी
न्हेतावं दीस कसं तरी ढकलत
अहो, आमच्या नशिबी शेणाचीच पाटी
असे लिहिणार्‍या या माणसाबद्दल आम्हास फार आदर. मातीशी घट्ट नाळ असलेले लोक आकाशाकडे बघतात ते थुंकण्यासाठी नव्हे, तर गवसणी घालण्यासाठीच... असा आमचा तरी अनुभव. तर अशा माणसाने काय नक्की लिहिले हेही बघण्याची सोय आता राहिली नाही, कारण ते पुस्तक बाजारातून मागे घेतले गेले आहे (हे योग्य, बाजारात बाजारीच लोक येणार म्हणा !).
आता आम्ही विचार केला की आपले जाऊ दे, यांचे जाऊ दे, त्यांचेही राहू दे. प्रत्यक्ष तुकोबांचे यावरी काय मत हे तरी पहावे. म्हणून परत गाथेचे पान उघडले अन् काय सांगू ! परत तीच ओळ - मिरासीचे म्हुण सेत | नाही देत पीक उगे ||
म्हणजे आता यावरी चिंतन करणे आले. तुकोबांचे हेच आम्हांस आवडत नाही, ते फुका मननचिंतन करण्यास भाग पाडतात.

प्रकार: 

अतिशय मार्मिक स्लार्टी.. मी पण कालच ही बातमी वाचली.. आनंद यादवांनी हे पुस्तक मागे घ्यायला नको होते असे वाटून गेले.. संपूर्ण तपशील माहिती नाही पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असल्याने यादवांनी असा निर्णय घेतला का?

हो, मलाही तसेच वाटले. पुस्तक मागे घ्यायला नको होते. त्यांचे काल वर्तमानपत्रात आलेले निवेदन वाच. 'ज्या समाजात राहत आहे त्याच्या इच्छेचा आदर करणे भाग आहे' अशा स्वरूपाची विधाने आहेत. ते मला थोडे विषादाचे, थोडे वक्रोक्तीचे वाटते. तसे असेल तर ते समजण्यासारखे आहे. पण त्यांना तसे जर खरेच वाटत असेल, संमेलनाध्यक्ष असण्याने फरक पडला असेल तर खरेच दुर्दैव होय... मग तुकोबांसारख्या समाजाशी पंगा घेतलेल्या माणसावर लिहिताना नक्की काय अभ्यास केला हा मुद्दा येतो.

    ***
    “If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away.” - हेन्री डेव्हिड थोरो

    आनंद यादवांच्या विधानांपेक्षाही काल श्री. सदानंद मोरे यांनी केलेली विधाने वाचून वाईट वाटले.

    ***
    दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

    मोरेंची विधाने काय होती ? ती नाही वाचनात आली.

      ***
      “If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away.” - हेन्री डेव्हिड थोरो

      आनंद यादव यांचे लेखन म्हणजे 'क्रौर्य' आहे, असं त्यांचं मत आहे. आजच्या सकाळला बातमी आहे.

      ***
      दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

      ह्म्म... तसे एका अर्थाने ते होते. त्या पुस्तकात तुकारामांच्या जीवनातील चमत्कारांचे शास्त्रीयरित्या स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता. आता 'गाथा वर येणे, सदेह स्वर्गगमन, इ.' बाबींवरची दृढ श्रद्धा पाहता आणि त्यांचे जनमानसातील स्थान बघता त्याकडे अशा दृष्टीने बघणे हे एक प्रकारे त्या लोकांसाठी क्रौर्य आहे. पण पुस्तक मागे घ्यायला लावणे हे प्रतिक्रौर्य होय. हा त्या मूळच्या 'क्रौर्या'वरील उपाय नव्हे.

        ***
        “If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away.” - हेन्री डेव्हिड थोरो

        वाचला 'वादग्रस्त भाग'. त्यात वादग्रस्त काय आहे? Uhoh त्यांच्या आजूबाजूचे लोक कसे होते याचं वर्णन आहे.. फार काही चांगल्या शब्दात नाही, पण आक्षेपार्हही नाही. का तुकाराम असल्या लोकांमध्ये असायचे हेच मुळात आक्षेपार्ह आहे? पण त्या वेळचा समाज, तुकारामांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती बघता, ते फार गैर आहे असे वाटत तरी नाही! Uhoh असो.
        -----------------------------------
        क्या कोई नयी बात नजर आती है मुझमें
        आईना मुझे देखके हैरानसा क्यूँ है..

        यादवांसारख्याने पुस्तक मागे घेणे बघून वाईट वाटले खरेच.
        आपल्याला देवत्व बहाल करायला नेहेमी कुणीतरी हवा असतो. कधी संत, कधी नेते, कधी अभिनेते. त्याशिवाय आपल्या सामान्यत्वातलं 'असामान्यत्व' सिध्द होत नाही असं आपल्याला वाटत असावं. हे सगळे आपले समाजनायक हेही माणूसच होते, आहेत, हे आपण सोयीस्कररीत्या विसरतो, अन त्यांच्याबद्दल काहीही (लौकिकार्थाने) वाईट वाचायला, माहिती करून घ्यायला आपण बिचकतो, घाबरतो.
        म्हणजे स्वतःलाच फसवितो.
        मग अशी पुस्तके, संशोधने मागे घेतली गेली, त्यात आपला विजय समजतो. Sad
        'समाजाची इच्छा राखायला हवी' यात अनेक पदर असावेतसे वाटून गेले. विषाद, वक्रोक्ती असेल तर योग्यच आहे. पण सहज होऊ शकणार्‍या प्रसिध्दीचा हव्यास असेल काय बोलावे? Sad

        काही असो, हे सगळं 'आपलंच' प्रतिबिंब आहे, हे खरं.

        --
        पुढच्या युगांची सर्वच दु:खे; मीही भोगीन म्हणतो,
        आजच्या व्यथांना काय करावे; कुणी सांगतच नाही!

        साजिरा पूर्ण अनुमोदन. माणूस कुठे सुरू झाला एवढेच कसे काय बघतात लोक ? माणूस कुठे सुरू होऊन कुठे गेला हे बघणे सर्वात महत्त्वाचे.

          ***
          “If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away.” - हेन्री डेव्हिड थोरो

          माझ्या मते पुस्तक मागे घ्यायला लावल गेल, तेही सामुहीक ताकदीच्या जोरावर, ते एका अर्थी योग्यच!
          विभुतीपदाला पोचलेल्या व्यक्तिरेखा "कादम्बरी" च्या रुपात वर्तमानकालिक सामाजिक चौकटीत माण्डणे अयोग्यच! त्यात पुन्हा पुरावे नसताना, केवळ कल्पनाविलासाच्या आधारे त्या त्या व्यक्तिरेखेभोवती "भाकडकथा" रचणे त्याहुन अश्लाघ्य! तेव्हा झाले ते योग्यच झाले! Happy

          मात्र, त्याचबरोबर, अशीच ताकद, हाच समाज, पेशवे/फडणवीस्/सावरकर/टिळक्/आगरकर (यातुन अंनिसचे दाभोळकर काय की लोकसत्ताचे केतकर काय, कोणीही सुटत नाहीत) इत्यादीन्च्या बद्दल लिहिल्या गेलेल्या/लिहिल्या जात असलेल्या निरर्गल्/गलिच्छ लिखाणाबद्दल वापरतो का??? माझ्यामते कळीचा प्रश्ण आणि मुद्दा हाच आहे! Happy

          इथेही "यादवान्सारख्या" माणसाने हे लिहिले, तेव्हा XXXच्या नादी लागून त्याने "ब्राह्मण्यवाद (?)" जोपासला असे गळे काढायला पुन्हा हाच समाज मोकळा! आणि मतान्च्या जोगव्यासाठि बुद्धी गहाण टाकून यान्चीच री ओढणारे राजकारणी असल्यावर अजुन काय हवे?
          ...;
          आपला, लिम्बुटिम्बु

          लिंबूदादा, यादव 'कल्पनाविलासा'साठी प्रसिध्द नाहीत बहूतेक.. Happy
          बाकी मागे घेण्याला कारण घडलेलं लिखाण काही वाचण्यात आलं नाही अजून. त्यामूळे चु.भू.मा.

          --
          पुढच्या युगांची सर्वच दु:खे; मीही भोगीन म्हणतो,
          आजच्या व्यथांना काय करावे; कुणी सांगतच नाही!

          लिंबू, आनंदओवरीमध्येही साधारण अशा प्रकारचे वर्णन आहे. शिवाय, हे पुस्तक लिहिताना यादवांनी अभ्यास केला नव्हता हे कुठून आले ? या पुस्तकाचे परीक्षण मी वाचले आहे, त्यातही त्यांनी अभ्यास करून पुस्तक लिहिल्याचा उल्लेख आहे. (परीक्षण 'पुस्तक फारसे चांगले नाही' असे होते, पण त्यात कुठेच चारित्र्यहननाचा उल्लेख नव्हता.)
          चौकटी वर्तमानकालिक नाहीत. त्यात जे वर्णन केले आहे ते हजारो वर्षांपासून चालत आले आहे. तरूणांनी उच्छृंखल असणे ही वर्तमानकालिक चौकट कशी काय ? तुकोबा जन्मतःच विभूतीपदाला पोहोचले होते असेही नाही.
          विभूती या 'विश्लेषणबाह्य/विवेचनबाह्य' कशा काय होतात ? नशीब हेच की व्यासमुनींची असली गादी नव्हती आणि त्यावर त्यांचे तथाकथित वंशज नव्हते. नाहीतर 'भावार्थदीपिका'पासून 'युगांत', 'व्यासपर्व' इ. काही घडलेच नसते. (व्यासांसकट सर्व लेखक/लेखिका ब्राह्मणच होते, काही जन्माने काही कर्माने.)
          .
          शेवटी एकच. विभूतींवर कितीही राळ उडवली, काहीही अश्लाघ्य लिहिले तरी सत्य उरते - त्यांचे कार्य, त्यांचे विचार. गाथेसारख्या चिरंतन लखलखीत सत्याचीसुद्धा भाकडकथा होऊ शकते असे मानणे यासारखा दुसरा भ्रम नाही. आनंद यादव हे इतकेही भ्रमिष्ट असतील असे वाटत नाही.

            ***
            “If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away.” - हेन्री डेव्हिड थोरो

            म्हणजे गर्दीवर सद्दी चालत असल्याने ज्यांना गर्दीच गादीवर बसवते ते संत आणि गादीवर बसल्यामुळे ज्यांची गर्दीवर सद्दी चालते ते जंत >> हाच कळीचा मुद्दा आहे राव- गर्दीवर सद्दी हवी - येन केन प्रकारेण हवीच हवी.

            म्हणजे गर्दीवर सद्दी चालत असल्याने ज्यांना गर्दीच गादीवर बसवते ते संत आणि गादीवर बसल्यामुळे ज्यांची गर्दीवर सद्दी चालते ते जंत >>
            या एका वाक्यात सारा खुलासा होतो.

            सन्त तुकाराम हे सार्‍या महाराष्ट्राचे ( खरे तर सार्‍या मानवजातीचे) होते.
            असे असताना त्यान्चे दहावे वन्शज असणे या एकाच भान्डवलावर दुकान चालवणार्‍याना असले
            काहीतरी करून आपले महत्व दाखविणे जरुरिचे वाटते.

            स्लार्टी चांगल लिहीलंय.
            तुकोबा जन्मतःच विभूतीपदाला पोहोचले होते असेही नाही. >> अनुमोदन असे लिहीनेच चूक ठरेल कारण हेच सत्य आहे. तुकाराम महाराज आणि मंबाजीचे भांडन हे जगजाहिर होते. तुकोबांच्या हयातितच मंबाजी प्रकरनात एक खून झाला आहे. माणुस नंतर महान झाला म्हणून पुर्वी घडलेल्या गोष्टी लपवुन ठेवने मुर्खपणा आहे. आपल्याच संस्कृतित ( हा शब्द बोथट होत चालला आहे). वाल्याच्या वाल्मीकी पण झालेला आहे, तुकोबाचा तुक्या नक्कीच झाला नसता.

            हा सगळ्या संताचे आश्रम आणि गाद्या आहेत. त्या गादीवर बसन्यासाठी फक्त सात्विक उपाय योजले जात नाहीत तर काटा देखील काढला जातो.

            आनंद यादवांना शेवटी खुर्ची महत्वाची वाटली. तसे आनंद यादव देखील कच्चे गुरुचे चेले नाहीत. प्रत्येक कांदबरी, कथेनंतर त्यांना प्रकाशझोतात राहने आवडते(च).

            (पर तुमने लिहीनेकी स्टाईल तात्यासे लि है क्या?)

            स्लार्ती, चांगलं लिहिलंयस.

            माणूस कुठे सुरू झाला एवढेच कसे काय बघतात लोक , माणूस कुठे सुरू होऊन कुठे गेला हे बघणे सर्वात महत्त्वाचे. >> अगदी बरोबर.

            लिहिण्याची style आवडली.

            काय बोलू स्लार्टी? तुझ्या लेखनशैलीची तर मी पंखाच झालीये. Happy बाकी, तुला आणि साजिर्‍याला अनुमोदन.
            ----------------------
            एवढंच ना!

            स्लार्टी,
            सुरेख लिहीलयस. मार्मिक आणि नेमकं. विशेष फापटपसारा नाही आणि मुद्देसूद बांधणी.

            सुंदर आहे हा लेख.
            बाकी मलाही वादग्रस्त काय आहे त्या लेखात ते कळले नाही.

            स्लार्टी,

            अतिशय उत्तम आणि नेमक लेखन. प्रश्न फक्त यादवांचा नाही, फार मोठा आहे, पण महाराष्ट्रातले तमाम साहित्यिक आणि पुरोगामी पत्रकबाज विचारवंत मूग गिळून गप्प बसले आहेत.

            या सर्व वादामागे खरे काय आहे त्याबद्दल कोणीही एक चकार शब्द उच्चारायला तयार नाही !!!

            विषयाला खास तुमच्या शैलीत वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.

            वरील लेखाच्या संदर्भात इ-सकाळ मधील बातमी . म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या काळातील समाजाची मानसिकता आणि आताच्या समाजाची मानसिकता ह्यात काहीच फरक नाही का ? Sad

            स्लार्टी छान लिहिलयं, मलाही यादवांनी पुस्तक मागे घेतलं तेव्हा आश्चर्य वाटलं. एखाद्या थोर व्यक्तीचे वंशज असल्यावर वाट्टेल त्या गोष्टींचे भांडवल करणे हे काही आपल्याला नवीन नाही....
            पण मला एक प्रश्न आहे, यादवांनी जे लिहीलय तस खरच घडल्याचा पुरावा त्यांच्या कडे आहे का?
            जेव्हा एखाद्या खर्‍या होवुन गेलेल्या व्यक्ती बद्दल कादंबरी लिहीण्यात येते, तर त्यात लिहीलेलं सगळच पुराव्यांना धरुन नको का असायला? उ. संभाजी महाराजां बद्दलच्या कादंबरीत जर "ते सुरवातीला वाईट मार्गाला लागले..." अस लिहीलं तर त्यात कोणाला (त्यांच्या वंशजांना सुद्धा) काही गैर वाटण्याचं कारण नाही, कारण ही बाब सगळ्या जगाला माहीत आहे....... तसच वाल्याचा वाल्मिकी झाला या गोष्टीला सुद्धा कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही....
            कादंबरीच कॅरॅक्टर जर फिक्शनल नसेल तर त्या बद्दल फक्त "कादंबरी आहे" या सदराखाली पुराव्या शिवाय लिहीण्यात कितपत "लिबर्टी" घ्यावी याला पण मर्यादा नसतात का ?
            तुकोबांच "चारित्र्यहनन" वगैरे म्हण्ण्याच्या लायकीचं त्यांच लिखाण नाही हे जरी खरं असलं तरी पुरावा नसताना अस लिहील्यावर आधीच टपुन बसलेल्या हलक्या डोक्याच्या आणी रिकामटेकड्या त्यांच्या "सो कॉल्ड" वादांपुरते पुढे येणार्‍या भक्तांना वाद निर्माण करायाला आयतं कोलीत हातात दिल्या सारखं आहे.....

            भारी लिहिलंय स्लार्टी.... शैली एकदम खास...

            मस्त लिहिलंयस...लेखनशैली आवडली .
            आजच्या पेपरला यासंदर्भात काल देहू येथे झालेला गोंधळ छापून आलाय. त्यावर तुझं भाष्य वाचायला आवडेल.

            यादवांनी माफी मागीतली अशी नुकतीच बातमी वाचली.

            वरच्या एका प्रतिसादात संभाजीराजांचा उल्लेख आहे.

            काळ सोकावतोय हे खरे.

            {पण महाराष्ट्रातले तमाम साहित्यिक आणि पुरोगामी पत्रकबाज विचारवंत मूग गिळून गप्प बसले आहेत}

            वस्तुस्थिती अशीच होती का याबद्दल शंका आहे.