जपणूक

Submitted by आनंदयात्री on 30 June, 2011 - 00:39

त्याला एकटक पाहत बराच वेळ बसलो होतो मी -
तो स्वतःच पाऊलभर चिखलात बुडालेला.
खाली जुन्या उन्हाने घायाळ झालेल्या जमिनीवर
नुकत्याच आलेल्या फुंकरपावसाचा ओलावा..

स्वतःशीच पुटपुटत त्याने खाली बसून
थोपटलं मातीवर - आणि बाजूला केलं तिला.
खाली होते तिच्या आत रूतलेले तण, कुजलेली मुळं, हट्टी दगड.
ते सगळं काढायला जरा जडच गेलं त्याला,
पण त्याने काढले - निर्विकारपणे ओढून ओढून!

सनातन आदिम श्रद्धेने आकाशाकडे पाहिलं मग!
आणि धोतराच्या सोग्यात बांधून आणलेले मूठभर कोवळे दाणे पेरत बसला..
मग अपार जिव्हाळ्याने बराच वेळ माती पुन्हा सारखी केली
आणि घाम पुसत शांतपणे खाली बसला.
सगळं झाल्यावर माझ्याकडे लक्ष गेलं त्याचं.
हसला, म्हणाला - खणावं लागतं अधूनमधून -
मोकळं करायला, मोकळं व्हायला,
सलणारं काढायला, फुलणारं भरायला...

तिथून निघताना मी भलत्याच विचारात!
आयुष्य घ्यावं एकदा खणायला! -
मोकळं करायला, मोकळं व्हायला
सलणारं काढायला, फुलणारं भरायला...

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2011/06/blog-post_18.html)

गुलमोहर: 

आयुष्य घ्यावं एकदा खणायला! -
मोकळं करायला, मोकळं व्हायला
सलणारं काढायला, फुलणारं भरायला...>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> भारीच.....

अहा..
खणावं लागतं अधूनमधून -
मोकळं करायला, मोकळं व्हायला,
सलणारं काढायला, फुलणारं भरायला...>> खरं आहे, अगदी नेमकं टिपलस !!

आयुष्य घ्यावं एकदा खणायला! -
मोकळं करायला, मोकळं व्हायला
सलणारं काढायला, फुलणारं भरायला...>>> Happy लवकर बहरुन या ह्या शुभेच्छा..! Happy

फुंकरपावसाचा ओलावा..>> बेष्टं..!

Happy

मस्त रे आवडली..

तिथून निघताना मी भलत्याच विचारात!
आयुष्य घ्यावं एकदा खणायला! -
मोकळं करायला, मोकळं व्हायला
सलणारं काढायला, फुलणारं भरायला >>> मस्त

अविचाराचं तण काढून टाकल्याशिवाय आयुष्याचं शिवार बहरत नाही.
फारंच सुंदर विचार.. आणि मांडायची पद्धत पण खूप सुरेख.. Happy

आयुष्य घ्यावं एकदा खणायला! -
मोकळं करायला, मोकळं व्हायला
सलणारं काढायला, फुलणारं भरायला...
...........ये हुई ना बात!

चिमुरी, पल्ली, योगिता, मुक्ता, कविता, श्यामली, चेतना, क्रांति, मिल्या, निंबुडा, चिन्नु, मनिषा_माऊ (मनिमाउ?), सांजसंध्या, शामराव, निवडुंग, दक्षिणा -
धन्यवाद!! Happy Happy

जुन्या उन्हाने घायाळ झालेल्या,
सनातन आदिम श्रद्धेने आकाशाकडे पाहिलं मग,
अपार जिव्हाळ्याने बराच वेळ माती पुन्हा सारखी केली,
खणावं लागतं अधूनमधून,
तिथून निघताना मी भलत्याच विचारात!...हे parts special!

नचिकेत जोशी या character मधे असलेली आपुलकी, समंजसपणा अन प्रत्येक situation ला
नव्याने हाताळायची असलेली उमेद दिसली...
कविता छानच असते नेहमी...माणूस खासच!

लोभ असावा!

नचिकेत, सॉरी... 'त्याच्या' तोंडून मोकळं करायला, मोकळं व्हायला, सलणारं काढायला, फुलणारं भरायला हा साहित्यिक ओव्हरडोस वाटतोय रे... जरा unrealistic वाटलं. एवढी एक गोष्ट सोडली तर मला ही कविता किती आवडलीये ते आधीच सांगितलंय मी तुला... Happy

बहोत बहोत खूब...
<<सलणारं काढायला, फुलणारं भरायला...>>
तो फुंकरपाऊस शब्दं... माझ्या लिखाणात डोकावला तर माझा दोष नाही... सर्वस्वी तुझाच, इतका समर्पक, सुंदर शब्दं लिहिण्याचा दोष Happy
खरच खूप सुंदर.
हे असं स्चतःला खणायला घेणं किती म्हणजे किती कठीण... त्यासाठी रोजच्या रोज नाही पण वरचेवर तण काढून जमीन उपज-शुद्धं ठेवायला हवी.

Pages