अग्गोबाई.. कळसुबाई..!

Submitted by Yo.Rocks on 30 June, 2011 - 14:50

महाराष्ट्राच्या सह्याद्रीरांगेत ५००० फूटाच्या वरती मानाने उभी असणारी तीनच शिखरे ! तिसर्‍या क्रमांकावरती असलेले 'घनचक्कर' चे मुडा शिखर, दुसर्‍या क्रमांकाचे 'साल्हेर'वरती असलेले 'परशुराम मंदीरा'चे शिखर नि पहिल्या क्रमांकावरती सह्याद्री रांगेतील सर्वोच्च शिखर असलेले सुप्रसिद्ध 'कळसुबाई शिखर' ! उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ५४०० फुटच्या आसपास ! [मायबोलीकर 'हेम' ने माहिती दिल्याप्रमाणे : कळसूबाई(१६४६ मी.) , साल्हेरवरील परशुराम मंदीर (१५६७ मी.) आणि घनचक्करवरील मुडा (१५३२ मी.)]

यांपैंकी 'साल्हेर' ला आम्ही काही मायबोलीकर मागेच डिसेंबरमध्ये जाउन आलो होतो.. तेव्हा आता सर्वोच्च शिखराला गवसणी घालण्याची उत्सुकता लागून राहिली होती.. त्यात ज्या ग्रुपबरोबर जाणार होतो त्या 'ऑफबीट सह्याद्रीज' ग्रुपच्या लिडर्समध्ये आपला मायबोलीकर 'सुन्या आंबोकर' सहभागी होता... शिवाय इतर लिडर्सदेखील माझे स्नेहीच.. यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता... सो शुभेच्छा देण्यासाठी माझे जाणे ठरलेच होते ! साहाजिकच मायबोलीचे काही मावळे होतेच सोबतीला.. विनय भीडे, सुर्यकिरण, आनंदयात्री नि गिरीश जोशी.. ढॅण्ढँणॅण ! Proud

या ट्रेकचे वैशिष्टय असे होते की आमची वाटचाल ही आगळ्यावेगळ्या वाटेने होणार होती.. नेहमीची प्रचलित असलेली ही वाट कळसुबाई डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या 'बारी' या गावातून आहे.. जिथे पुढे वाटेत चढताना सोयीसाठी असलेल्या काही लोखंडी शिडी, बांधलेल्या पायर्‍या लागतात.. . पण 'ऑफबीट सह्याद्री' ग्रुपने चढाईसाठी नावासारखा ऑफबीट मार्ग पत्करला होता.. इंदूरमार्गे ! साध्या शब्दात उलटया बाजूने ! जिथे ना लोखंडी शिडी दिसणार ना बांधलेल्या पायर्‍या..

ठरल्याप्रमाणे २५ जुनच्या रात्री दादरहून प्रायवेट बसने आम्ही रवाना झालो.. पाउसाने दडी मारल्याने घाम गाळतच चढाई करावी लागणार की काय असा प्रश्ण होताच.. पहाटे चार-साडेचारच्या सुमारास आम्ही गावात पोहोचलो.. तिथेच मग उजाडेपर्यंत बसमध्येच झोप काढली.. बाहेर एकदम थंडगार वारा सुटला होता त्यामुळे तासभर का होईना मस्त झोप लागली.. बाहेर पडलो तर पावसाला पुरक असे वातावरण तयार झाले होते.. थंडगार वार्‍यामुळे बर्‍याचजणांनी आपापली विंडचिटर्स चढवली.. एकीकडे कळसुबाईच्या डोंगरावर साहाजिकच ढगांनी मुक्काम ठोकला होता.. भरभक्कम नाश्तापाणी करून आम्ही सातच्या सुमारास लेटस गो केले !

ग्रुप मोठा असल्याकारणाने आम्ही सर्वात शेवटून निवांतपणे मजा घेत गर्दी टाळत जाण्याचे ठरवले.. त्यात बॅकलिडला सुन्या होताच.. ग्रुपची संख्या नव्वदीच्या घरात असल्याने पंढरपुरच्या यात्रेलाच जातोय असे वाटत होते.. Proud आमचा ट्रेक सुरु झाला नि पावसाची रिपरीपदेखील सुरु झाली.. म्हटले चला बरे झाले !
त्या छोटया गावामधून कौलारु घरांच्या गल्लीतून वाट काढत आम्ही पुढे सरावलो... घरे मागे सरली.. शेतमळे लागले.. नि त्यात हिरवा भात नजरेस पडला की डोळ्यांना सुखद गारवा मिळतोच.. मनाला थेट कोकणात नेउन सोडते..
प्रचि १

इथूनच मग पहिला चढ लागला.. जिथून पुढे लागणार्‍या मंदीरापाशी ओळखपरेड पार होणार होती.. आजुबाजूला हिरवाई पसरली होती..
प्रचि २

हसतखेळत ओळखपरेड पार पडली नि आमची वारी पुढे सरकली.. चढणीचा मार्ग सुरु झाला.. थंडगार वारा नि पाउसाचे शिंतोडे चालूच होते.. आज सूर्यदर्शन होणे कठीणच दिसत होते.. एकूण आल्हाददायक वातावरण..
प्रचि ४

मागे वळून पाहिले तर बरीच उंची गाठल्याची जाणीव झाली..
प्रचि ६

पुढे चालून गेलो नि आतापर्यंत अवतीभवती घुटमळणार्‍या मेघांनी पावसाला वाट मोकळी करून दिली.. मी लागलीच कॅमेर्‍याला सॅकमध्ये जागा करुन दिली.. सॅकमध्ये विंडचिटर होते.. पण आज ठरवले होते भिजणार.. मनसोक्त भिजणार !!

आमची वाट नेमकी त्यावेळी झाडीझुडुपांत घुसली.. सुरु झालेला पाउस नि त्यामुळे निसरडी झालेली वरती सरकरणारी वाट.. यात भर म्हणून आम्ही सगळे वारकरी !! अचानक ट्रॅफीक झाले ! जो तो मिळेल त्या वाटेने वरती सरकू लागला.. नि पुन्हा घसरून खाली येउ लागला.. ! Proud मूळात पायाखालची वाट दिसतच नव्हती.. जिथे होती तिथे निसरडे झाल्याने नवखे अडकून पडले.. तेव्हा ट्रॅफीकमधून बाहेर पडण्यासाठी जो तो धडपडू लागला.. खरे तर धांदलच उडाली.. सगळीकडे नुसता चिखल ! सुरवातीच्या टप्प्यातच चिखल लागल्याने बरेचजण थबकले ! एकदम बिकट अवस्था.. 'हात टाकतोय तर निसटतोय नि पाय टाकतो तर घसरतोय.'. Lol चढ पण अगदी सरळ होता.. इथेच आम्हा मायबोलीकरांची पण ताटातूट झाली.. आनंदयात्री, सुक्या, गिरीश हे सगळे इथून तिथून वाट काढत पुढे सरकले.. माझी पण एकीकडे घसरण झाल्यामुळे चिखलात मस्तपैंकी माखला गेलो होतो.. विन्या त्या ट्रॅफीकमध्ये अडकलेला दिसला.. म्हटले ये वरती.. तर याची पोकरखळी 'मी काय आता घोरपड बनून येऊ' एकच हशा उडाला Lol

आता एव्हाना सगळयांनी चिखलाशी जुळवून घेतले होते.. आम्ही वरती छोटया पठारावरती आलो तर बॅकलिडर सुन्या आमच्याआधीच एका 'हेविवेट' जोडप्याला घेउन समोर उभा ! जल्ला मग कळले की वरती येणारी वाट वेगळीच होती.. आमच्या पुढचे चुकले नि मग आम्ही पण चुकलो ! पण त्या वाटेने सॉलिड धमाल उडवून दिली होती.. पाउस मंदावला तसा पुन्हा कॅम बाहेर काढला.. इथेच मग विन्या येइपर्यंत फोटोज काढून घेतले.. चारीबाजूंनी ढगांनी वेढलेले असल्याने फोटो काढायला फारसा वाव नव्हताच..

प्रचि ७

(जो-जो.. गिरीश जोशी नि आनंदयात्री)

बराच वेळ झाला पण आमच्या मागच्या ट्रॅफीकमधून कोणीच वरती येइना.. विन्याही तिथेच अडकला होता सो आनंदयात्री नि गिरीश बघायला गेले... तोच दहिहंडी खेळल्यागत अवतार झालेला विन्या वरती आला.. ! Happy
खरेतर ही सुरवात होती.. अजून बराच टप्पा गाठायचा होता.. जो ढगांच्या पडद्यामुळे काही दिसत नव्हता.. आम्ही सुन्याबरोबर पुढे सरकलो.. मध्येच लागलेल्या छोटया धबधब्याखाली विन्या आणि मी स्वतःला धुउन घेतले.. Happy

पाउस थांबताच ढगांनी अवतीभवती असणार्‍या ढगांनी कवटाळायला सुरवात केली.. त्यातून मार्ग काढत मागच्या -पुढच्यांना कॉल देत सगळे पुढे सरकू लागले... इथून पुढे नुसते चढणच होते.. त्यात एक छोटासा रॉक पॅच लागला.. नि रिपरिप करत पडणारा पाउस नेमका त्याक्षणी कोसळू लागला.. सोबतीला घोंघावणारा वारा.. त्यामुळे आमच्यावर पावसाच्या थेंबांचा अक्षरक्षः गोळीबार सुरु झाला.. पावसाळी ट्रेकचा अनुभव नसलेले विन्या नि सुक्या तर असला वेडापिसा पाउस बघून चक्रावले होते.. ! पण आम्ही भिजण्याचा मनमुराद आस्वाद घेत होतो..

आता त्या रॉक पॅचजवळ पुन्हा ट्रॅफीक जमायला लागले.. पॅच काहीच अवघड नव्हता.. पण वारा पाउस असल्याने नवख्यांसाठी काळजे घेणे आवश्यक होते सो रोप लावण्याची तयारी सुरु झाली.. ज्यांना रहावत नव्हते ते बाजूनेच एक चढ होता तो चढून गेले.. त्यात आनंदयात्री देखिल होता.. माझ्याही मनात आले चढून जावे..पण नंतर पावसाने चांगलाच जोर धरला तेव्हा उगीच रिस्क घेणे उचित वाटले नाही.. नेमके तेव्हा अजुन दोघे चौघे सूचना देउनही त्या मार्गाने चढायला गेले.. हा पुर्ण टप्पा चढणीचा असल्याने त्या टप्प्याच्या खाली सगळे इथे तिथे जागा बघून दाटीवाटीने बसले होते.. जे आगाउपणे चढायला गेले त्यांच्या पायाखालची दगडमाती खाली आमच्यावर सरकु लागली.. लगेच अंदाज आला नि मी, जो, सुकी पुढे सरकलो पण विन्याला मध्ये दोघे- तिघे उभे असल्याने जमले नाही... नि त्याला नेमका प्रसाद मिळाला.. नशिब दगडाचा आकार छोटाच होता.. म्हटले चला कळसूबाईसाठी विन्याने रक्त वाहीले ! Proud

इथे रोप लावून होईस्तोवर आम्ही त्या पावसातच कुडकुडत थोडीफार पेटपूजा करुन घेतली.. असल्या वातावरणात एका जागी थांबले की कुडकुडा भरणे स्वाभाविकच होते.. लिडरलोकांची तयारी झाली.. नि मग एकेक करत वरती जाण्यासाठी सरकू लागला.. होते तशे सोप्पेच काम.. पण आतापर्यंत पावसाने चांगलेच झोडपल्याने नवखेलोक्स चाचपडणार नक्कीच होते... आपले विन्या, सुकी, गिरीश जोशी तर अगदी दिमाखात वरती गेले.. पाठोपाठ मी पण जरा आखडत नौटंकी करत रोपला बाजूला ठेवत चढून गेलो.. Wink म्हटले या पॅचचा फोटो व्हायलाच पाहीजे !

प्रचि ८

हा पॅच झाला नि पुढे सरकू लागलो.. पुन्हा एक छोटा चढ होता
प्रचि ९

नि तिथूनच वाट डावीकडे डोंगराला वळसा घेत जात होती.. त्या वाटेने पुढे गेलो तर घळीत येउन पोहोचलो.. जिथे चक्क खोदुन काढलेल्या पायर्‍या नजरेस पडल्या..
प्रचि १०

वाह ! अश्या पायर्‍या दिसल्या की एक वेगळाच आनंद मिळतो ! इकडूनच थोडेसे मागे येउन पाहिले तर मघाशी पास केलेला पॅच दिसत होता जिथे लिडर्सलोक्स कार्यरत होते..
प्रचि ११

प्रचि १२

(डावीकडून तिसरा.. सुन्या)

आम्ही पायर्‍या चढायला घेतल्या.. खोदून काढलेल्या पायर्‍या म्हटल्या की त्यांची उंची ढोपराएवढी ठरलेली ! आम्ही चढून आलो नि पुन्हा ढगांची दाटी सुरु झाली..
प्रचि १३

या पायर्‍या चढताना विन्या आणि आनंदयात्री हे आतापर्यंत किती अंतर कापले असावे याचे आखाडे बांधू लागले.. जवळपास झाले असेल असे विन्याला वाटत होते.. त्या पायर्‍यांच्यावरतीच ग्रुपची मुख्य लिडर 'प्रिती पटेल' ही पुढील वाट दाखवण्यासाठी उभी होती... यांचे बोलणे ऐकताच 'अजून हजार फूट बाकी' असे तिने सांगितले.. Proud
तिथेच मग विन्याची मलमपट्टी करुन आम्ही पुढे वाटचाल केली.. पुन्हा एकदा कोरलेल्या पायर्‍या लागल्या.. शिवाय एक गंजलेला भलामोठा साखळदंड लोंबकळत होता... त्याचे प्रायोजन मला काही कळले नाही कारण तो साखळदंड पायर्‍यांच्यामधूनच खाली दरीत गेला होता..म्हटले रॅपलिंग करूया.. Proud

प्रचि १४ : आतापर्यंत मायबोलीकरांचे ट्रेक्स झाल्यामुळे विन्या नि सुक्या आता ट्रेकला चांगलेच सरावले आहेत.. खालच्या फोटोवरून लक्षात येइलच..

(कोण म्हणतो आम्ही अनुभवी ट्रेकर्स नाही..)

हा पायर्‍यांचा पॅच सर करेस्तोवर पावसाने क्षणभर विश्रांती घेतली होती.. आता चढून आम्ही बराच टप्पा गाठला होता.. वरती चढून आलो नि चारी बाजूंनी वार्‍याने ढगांसकट जोरदार आक्रमण सुरु केले.. थंडगार, भणभणता अशा ह्या बेफाम वार्‍यापुढे कुडकुडा असह्य झाला नि शेवटी मलाही नाईलाजास्तव सॅकमधून विंडचिटर बाहेर काढावे लागले..इथेच मग थोडी पेटपूजा उरकली.. ही माझी मायबोलीकरांसोबत केलेली या ट्रेकमधली शेवटची पेटपूजा !!

आमच्या ग्रुपनंतर कोणाचीच चाहूल नव्हती तेव्हा प्रितीने 'मी ह्यांना पुढे जाते घेउन, तू दुसरा लिडर येइपर्यंत थांब नि मग जो येइल त्या लिडरला थांबवून इतरांना घेउन ये' असे सांगत इतरांना घेउन पुढे गेली.. मीही कर्तव्य समजून थांबलो.. नि मायबोली टिम पुढे निघून गेली..

इथे भन्नाट वारा सुटला होता.. त्यामुळे वरती कळसुबाई मंदीराच्या परिसरात हालत काय होणार याचा अंदाज आला.. काहीवेळातच एक पाच-सहाजणांचा ग्रुप चढत आला.. मागोमाग एक लिडर(अनिरुद्ध) आला ज्याच्याबरोबर आतापर्यंतच्या ट्रेकमुळे हादरलेली मुलगी होती.. सगळ्यांची हवा टाइट झाली होती हे सांगणे नकोच.. Proud त्यांचीही चूक नव्हती.. बहुतांशी ते सगळे नवखे होते.. त्या मुलीचादेखिल पहिलाच ट्रेक होता.. थंडीने गारठली होती शिवाय श्वासाचा अधुनमधून प्रॉब्लेम होत होता.. मी निघायचे म्हटले पण लिडरने 'एकटा काय करू' म्हणत थांबण्याचा आग्रह धरला.. हाही माझा मित्र असल्याने निघू शकलो नाही.. बराच वेळ झाला.. पण मागून कोणाची चाहुल येत नव्हती.. वेळ जात होता.. नि एकाजागी थांबून अंगात शिरशिरी येत होती.. शेवटी त्याने खाली जाउन बघतो म्हणत पुन्हा खाली उतरला..

सभोवताली असलेले ढगांचे सावट जोरदार वार्‍यामुळे अचानक दूर होत होते नि तेवढीच काय ती आजुबाजूचा परिसर बघण्याची संधी मिळत होती.. त्याच संधीचा फायदा घेत मी लगेच कॅम बाहेर काढून घाइघाईत फोटो टिपत होतो..

प्रचि १५

काही अवधीतच खालून दुसर्‍या एका लिडरची चाहूल लागली नि आम्ही पुढे ढगांमध्ये हरवलेल्या वाटेने चालू पडलो..!पुढची वाट प्रितीने समजवली होती.. 'सरळ वाटेने गेले की पठार लागेल..तिथून मग वाटेत दोन तीन टेकडया लागतील...नो राईट नो लेफ्ट' इति.... त्याप्रमाणे पठारावरती आलो नि आम्ही जवळपास पोहोचलो याची जाणीव झाली.. कारण कानठळ्या बसवणारे पावसाचे थेंब नि आम्हाला लोटू पाहणारा बेफाम वारा ! फक्त यात सातत्य नव्हते हीच एक आमच्या दृष्टीने जमेची बाब.. नाहीतर मी फोटो कसे काढणार.. ! थोडा पाउस मंदावला की जमेल तसे फोटो काढून घेत होतो.. असाच क्षणभर पावसाने पाउस मंदावला नि अचानक समोरील ढगांचा पडदा दूर झाला.. नि समोर पाहतो तर....जय कळसुबाई !
प्रचि १६

- - - - -

आनंदाचे चित्कार पडणारच ! भले ते शिखर नाही म्हटले तरी बरेच दूर होते.. पण मंदीर दिसले नि एकदम समाधान वाटले.. फोटो काढून घेताच पुन्हा ढगांनी त्या परिसरावर कब्जा केला.. मायबोलीकरांची टिम एव्हाना त्या मंदीरापाशी सुखरुप पोहोचली असेल याची मला खात्री होतीच.. आता आमची पावले झपाझप पडू लागली..अधुनमधून त्या मुलीसाठी ब्रेक घेत होतो.. एव्हाना या ग्रुपबरोबर चांगली ओळख झाली.. त्यात एक तर म्हणत होता.. 'मी आता दोन वाढदिवस साजरे करणार.. एक जो आहे तो जन्मदिन तर दुसरा आजचा दिवस २६ जून !' Lol त्यांनी नुकताच सहजसोप्पा असलेला कोथाळीगड(पेठचा किल्ला) केला होता.. नि हा दुसराच ट्रेक होता बहुदा..!

प्रचि १७
<

प्रचि १८: थरारक ट्रेकमुळे भेदरलेल्या मुलीला घेउन येणारा लिडर

एका टेकडीवर ब्रेक घेतला आणि नंतर पुन्हा वाटचाल सुरु केली नि पुन्हा पाउसाचा जोर वाढला.. कॅम साहाजिकच सॅकमध्ये ! अगदी शेवटच्या टप्प्यात आलो.. बस्स ! फक्त कळसुबाई मंदीराची टेकडी चढायची होती.. पण सरळसोट चढण नि पावसामुळे भुसभुशीत झालेली पाउलवाट.. त्या वाटेतच अर्ध्यावरती डाव सोडलेल्या चार-पाच जणांचा ग्रुप ठाण मांडून बसलेला दिसला.. हेदेखिल नवखेच वाटत होते.. मग त्यांना पण घेउन पुढे चढू लागलो.. त्यांच्यात दोन स्त्रिया असल्याने आधी पुढील वाटेचा थोडाफार माग घेत मगच त्यांना पुढे सरकण्यास सांगत होतो.. नाहीतर जल्ला त्यांनी मला धुतला असता.. आधीच चढून चढून वैतागले होते.. Lol

वाट वर सरकत होती.. पण त्याबरोबर पायदेखील सरकत होते.. Proud शिवाय खटयाळ असा वारापाउस पुन्हा अश्या मोक्याच्या क्षणी दिमाखात एंट्री घेत हजर झाला..! धड उभे राहणे कठीण होते.. मागे वळून पाहिले तर माझ्याबरोबरची ही सगळी गँग आपल्या माना खाली घालून पाउसवार्‍यापासून बचाव करत वाकून येत होते.. पाठीवरच्या सॅकच काय त्या त्यांच्या ताठ मानेने डोकावत होत्या ! हे दृश्य कॅममध्ये घेण्याची हुक्की आली... पण पावसा रे पावसा.... !! Happy

वरती पाहिले तर ढगांमध्ये कळसुबाई मंदीराभोवतीचे रेलिंग्ज नि त्याला लागूनच असलेला रॉक पॅच अगदी धुसर दिसत होता.. हा नक्कीच चढायचा नसणार म्हणून जागीच थांबलो.. क्षणात ढग बाजूला सारले तर चक्क तिघे जण चढताना दिसले.. !! त्याचवेळेला काहितरी गडबड असल्याप्रमाणे प्रितीचा कॉल ऐकू आला.. पण इतरबाजूला ढगांच्या कल्लोळात ती दिसत नव्हती.. एकीकडे मात्र शिडीने लोक उतरताना दिसली.. त्यात आनंदयात्रीपण दिसला.. आवाज दिला.. पण सुसाट वार्‍यामध्ये तो लोप पावला.. ढगही लगेच धावून आले ..! म्हटले जल्ला ह्यांनी खाली उतरायला पण घेतले..! प्रितीच्या कॉलमुळे एकीकडे तो रॉक पॅच चढण्याच्या बेतात असणार्‍यांना वेळीच थांबवले.. नि मागे असणार्‍यांना पण जागीच थांबवून टाकले.. मिनीटांतच बाजूच्या परिसरावरील ढगांचे ग्रहण सुटले नि प्रिती दिसली.. मी जिथे उभा होतो तिथूनच फक्त डावीकडे वळायचे होते.. जिथून पुढे ती वाट 'बारी'मार्गे येणार्‍या पायर्‍यांना जाउन मिळत होती.. अगदी थरार चालू होता ! साहाजिकच नवखे थरथरत होते.. Proud

आम्ही 'बारी'हून येणार्‍या मुख्य वाटेला येउन मिळालो.. नि अगदी शेवटच्या टप्प्यात असणारी शिडी चढायला घेतली.. जिच्यामार्फतच त्या टेकडीवर प्रवेश होता !! तो पॅच मारणे फारसे कठीण वाटत नव्हते.. पण लोटून देइल इतकी ताकद असलेला वारा नि अधुनमधून थेंबांचा गोळीबार करणारा पाउस यामुळे ते चढणे नक्कीच जीव धोक्यात घालण्यासारखे होते..

प्रचि १९

शिडी चढून गेलो नि समोर असलेले 'कळसुबाई मंदीर' बघून मन प्रसन्न झाले.. समोरच खडकात रोवलेले त्रिशुळ नि बाजूलाच एका खांबाला बांधून ठेवलेल्या अनेक घंटा ! घंटानाद करण्यासाठी सुसाट असणारा वारा समर्थ होता.. आपले अस्तित्व दाखवत होता.. कळसुबाई शिखराचा दरारा काय आहे ते समजावत होता..!!

प्रचि २०

प्रचि २१

(जय कळसूबाई _/\_ Happy )

इथेच मग मंदीराच्या आडोशाला बसून माझ्याबरोबर असणार्‍या ग्रुपबरोबर थोडीफार पेटपूजा केली.. मायबोलीकरांची टिम खाली गेल्याचे कळले होते.. मोबाईल रेंजची सोय नव्हतीच त्यामुळे जेव्हा पुढे ते भेटतील तेव्हा त्यांच्याबरोबर आडवा हात मारु म्हणत थोडक्यात आटपून बाकीचे खाद्य सॅकमध्ये ढकलले.. इथेच मग दहापंधरा मिनीटांत 'ढगांचा पडदा दूर सरला की काढा फोटो' असे करत होतो.. दुरचे दिसणे शक्यच नव्हते.. तेव्हा आजुबाजूचे फोटो टिपून घेतले.

प्रचि २२

प्रचि २३:आम्ही पठारावरुन केलेली वाटचाल दिसत होती..

काहि अवधीतच लेटस गो केले ! मागाहून अजुन बरेच जण यायचे बाकी होते.. बॅकलिडला असलेला सुन्या तर आता ट्रेकच्या शेवटीच भेटेल हे एव्हाना समजून गेलो होतो..

उतरताना आम्ही नेहमीच्या वाटेने उतरणार होतो.. जी वाट 'बारी' गावात जाते.. उतरताना आमच्या मागाहून चढणारा आमच्या ग्रुपसंगे आलेला एक वयस्कर प्रोफेसर वाट सोडून घसरून पडलेला दिसला.. लागलीच मी आणि अनिरुद्धने त्या दिशेने धाव घेउन त्यांना सावरले ! तिथेच थोडावेळ त्यांना थांबवले नि वरती शिडीच्या अगोदर विश्रांती घेउनच मंदीराकडे जाण्यास सांगितले..कमाल होती ह्यांची ! दोन वर्षापूर्वी झालेल्या अपघातामुळे हातात रॉड बसवला होता.. नि अपघातानंतर प्रथम ट्रेक करत होते !!

आता उतरताना बर्‍यापैंकी वातावरण निवळले होते.. पण पावसाची रिपरिप अधुनमधून सुरुच होती.. आतापर्यंत अजिबात दमछाक झाली नव्हती.. तर थरारक अनुभवामूळे सुखावलो होतो.. अगदी दोन वर्षांपूर्वी 'भिमाशंकर व्हाया शिडी घाट' हा भरपावसात केलेला ट्रेक आठवला.. !

पुढे जाउ लागलो तर प्रितीने एका मुलीला नजरेखाली ठेवण्यास सांगितले.. तिची गुडघेदुखी सुरु झाली होती ! प्रितीबरोबर असणार्‍या मुलीच्या पायातील बुट जमिनीवर रहातच नव्हते ! तर अनिरुद्धबरोबर असणारी मुलगी एव्हाना त्यातल्या त्यात सावरली होती..

प्रचि २४

इथून आजुबाजूचा परिसर छानच दिसत होता..
प्रचि २५:राईसप्लेट्स !

पदोपदी निसरडी वाट असल्याने पटापट उतरणे शक्य नव्हते.. प्रितीला पुढचा ग्रुप गाठायचा असल्याने आमच्यावर जबाबदारी सोपावून ती पुढे गेली.. एकीची गुडघेदुखी.. त्यात तिच्या शुजचे सोल निघाल्यामुळे त्यांचे स्केटशुज झालेले.. तर दुसरीने आतापर्यंत दोनदा तीनदा घसरून घेतले होते.. शिवाय दोघी फ्रेशर्स ! सो यांना सांभाळत कासवगतीने जाणे भाग होते.. काहिवेळाने अनिरुद्धदेखिल या दोघींचा वेग बघून त्याच्याबरोबर असणार्‍या मुलीला घेउन पुढे पशार झाला..! पण त्याचवेळी चढताना मला भेटलेला तो ग्रुप मागाहून आला नि मग त्यांना बरोबरीने चलण्यास सांगितले..

या मार्गात अनेक ठिकाणी सोयीसाठी लोखंडी शिडी लावण्यात आली आहे..
प्रचि ३०

उतरताना बराच पल्ला गाठायचा होता.. त्यात पुन्हा पावसाची अधुनमधून रिपरिप सुरु असल्याने वाटेतील चिखल त्या दोघींसाठी चांगलाचा त्रासदायक ठरत होता.. त्यांनाच काय बाकीच्यांना पण कसरत करावी लागत होती.. कधी कुठे पाय घसरेल नि चिखलात लोटांगण घालू याचा नेम नव्हता....काहि ठिकाणी तर घसरगुंडी तरी बरी म्हणावे अशी घसरणीची वाट बनली होती.. नि या दोघींना न पाडता घेउन येताना नाकेनौ आले होते.. आमची मंद वाटचाल सुरु असताना मायबोलीकर नक्कीचे खाली पोहोचले असणार याचा अंदाज आला.. पण काही झाले तरी आमची वाटचाल त्यामानाने बरी होती कारण आमच्या मागाहून येणारे अजून बरेच होते ! पण दिसतही नव्हते ! तेव्हाच कळले सात वाजणार मुंबईकडे निघताना.. !

पुढे आम्ही मध्ये एक झोपडी लागली तिथेच चहा घेतला.. चांगलीच ओळख झालेल्या ग्रुपबरोबरच मग अळुवडी, ठेपळे, उकडलेले अंडे इ. थोडेफार खाणे आटपले नि चालू पडलो.. इकडूनच मायबोलीकरांशी संपर्क झाला. तेव्हा अजून दिड दोन तास लागतील याची कल्पना त्यांना दिली नि पुन्हा उतरायला सुरवात केली.. उतरण मग पठार. परत उतरण मग पठार.. असे तीन चारवेळा झाले... तेव्हा कुठे बर्‍यापैंकी खाली आलो.. आतापर्यंत वाटेत दिसणार्‍या धबधब्यांची माळ खालून मस्तच दिसत होती..

प्रचि३१.

संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास खाली पोहोचलो..मागोमाग अजुन एक ग्रुप येउन दाखला झाला होता.. तिथेच मग वाटेत लागणार्‍या ओढ्यात हातपाय धुणे झाले..
प्रचि ३२

कामगिरी फत्ते झाली होती तेव्हा मी सरळ डांबरी रस्त्याची वाट धरत पुढे कलटी मारली... ! दोन बसपैंकी एक बस नक्कीच पुढे रवाना करणार हा अंदाज होता नि त्या बसमधून मायबोली मावळे असणार हेही ठाउक होते.. !

प्रचि ३२ गावात दिसलेले एक सुंदर कौलारु घर..

या गावांतून बाहेरच्या मुख्य रस्त्यावर येण्यासाठी २०-२५ मिनीटांचे बरेच अंतर कापायचे होते.. संपुर्ण दिवसभर पावसाळी वातावरण असल्याने सांजवेळ कधी झाली ते कळलेच नव्हते.. सॅकचे वजनही काही फारसे खाली न झाल्याने पटापट चालायलाही कंटाळा आला होता.. दुरवर उभ्या असलेल्या दोन्ही बसेस दिसत होत्या.. पण काही अंतर बाकी असताना पहिली बस सुटली... नि आमची चुकामूक झाली ! दोष त्यांचाही नव्हता.. ते खाली पोहोचून दोन तास लोटले होते.. सो पुढे गेले ते बरे केले...फक्त आनंदयात्री मात्र थांबला होता.. पण त्याला बघून 'हाच एकटा माझ्यासाठी थांबला.. हाच खरा मित्र ' इति. म्हणून मला काही आनंद झाला नाही.. कारण ह्याचा जल्ला मोबाईल माझ्या सॅकमध्ये राहीला होता ! Proud Lol

तिथेच मग चहा-पोहे नाश्ता आटपला.. सगळे येउन निघेपर्यंत संध्याकाळचे सव्वा सात वाजले ! निघताना देखील पाउस निरोप द्यायला आलाच होता !

एकंदर सॉल्लिड ट्रेक झाला होता.. मायबोलीकरांची ताटातूट झाल्याने उडीबाबा कार्यक्रम मात्र गुंडाळावा लागला.. पण खर्‍याअर्थाने पावसाळी ट्रेक झाला होता... ' ऑफबीट रुट...तुडवलेली चिखलवाट.. अंगाशी झटापटी करणारे ढग..कोसळणारा पाउस.. सोसाटयाचा वारा.. नि 'कळसुबाई' शिखराचा दरारा !! खरचं.. अग्गोबाई.. कळसुबाई !! Happy

समाप्त नि धन्यवाद Happy

कळसुबाई मंदीराचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास खालील लिंक जरुर पहावी
http://fortsinmaharashtras.mumbaihikers.com/2010/12/kalsubai-history.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पीचलेस, मन भरून आले कळसुबाईचे शिखर पाहुन. खुप सुंदर आणि धोकादायक ट्रेक आहे हा!!

कौलारु घर आणी सगळे ढगातले फोटो फारच आवडले. फ्रेशेर्स बरोबरीने ट्रेक हळू हळू करताना कंटाळा नाही का येत? अर्थात एव्हढा मोठा ग्रूप असला की थोडं फार असं होणारच म्हणा. पण they slow you down.

शीर्षक जबरी.... Happy
प्रचि २५:राईसप्लेट्स !>>> Happy
पण त्याला बघून 'हाच एकटा माझ्यासाठी थांबला.. हाच खरा मित्र ' इति. म्हणून मला काही आनंद झाला नाही.. कारण ह्याचा जल्ला मोबाईल माझ्या सॅकमध्ये राहीला होता>>>> Lol

सही... छान वाटलं वृत्तांत वाचुन.... Happy

नेहमीप्रमाणेच खास वृतांत आणि फोटोज Happy

'हात टाकतोय तर निसटतोय नि पाय टाकतो तर घसरतोय.'>>>>:खोखो: Happy

घोरपडे मंडळी>>>>>:फिदी:

नेहमीप्रमाणेच जबरी वर्णन आणि फोटो..

लोक पण महान असतात ना.. पहिलाच ट्रेक तो पण डायरेक्ट कळसूबाई... डेरिंग करायलाच पाहिजे एकदा...

जबरदस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!

बापरे फोटोत तरी ती चढण बघून अंगावर काटा आलाय. आणि सुन्या मला यायला सांगत होता तर मी शिल्लकच राहिले नसते Biggrin

तो घराचा फोटो जबरी आलाय. मी सेवला Happy

ट्रेकचे वर्णन एकदम मस्तच केले आहे अणि तेही फोटोंसहीत. वाचताना असे वाटले मी स्वतः ट्रेकमध्ये आहे ट्रेक पूर्ण झाल्याचा आनंदही तेवढाच झाला. एकदम थरारक!!

आता मीही लिहेन म्हणतो.. चढताना रॉकपॅचपासून जवळजवळ संपूर्ण ट्रेकमध्ये मी आणि जो पुढे गेलो होतो... सो we had another experience... Happy


'हाच एकटा माझ्यासाठी थांबला.. हाच खरा मित्र ' इति. म्हणून मला काही आनंद झाला नाही.. कारण ह्याचा जल्ला मोबाईल माझ्या सॅकमध्ये राहीला होता

>> जल्ला मुलींना नीट ट्रेकमधून सुखरूप उतरवणार्‍या योरूपी कृष्णासाठी हा सुदामा (फोडणीच्या) पोह्यांची पुरचुंडी घेऊन उभा होता, ते नाही दिसलं व्हय रे!!! Lol

ज ..ह.. ब.. ह.. री... Happy मस्तच.... कडक ट्रेक.. Happy आलो असतो तुझ्या बरोबर तर....... पण गर्दीची अडचण सोसवत नाही रे... Lol
माझा एक मित्र होता देवेंद्र म्हणून. त्यानेही त्याच्या ब्लॉगवर लिखाण केले आहे ह्याच ट्रेकवर... Happy लिंक विपु करतो.. Happy

यो आणि नच्या Lol
वृत्तांत अगदी हुबेहुब जमलाय रे. पलीकडून (इंदोरेकडून) कळसुबाई चढतानाचा अनुभव एकदम थ्रिलींग.
प्रितीने सांगितलं कि अजून १००० किमी आहे तेव्हा काहीच करू शकत नव्हतो तेव्हा पुढे पठारावर चालायला सुरुवात केली तेव्हा अगदी अगदी 'बिगस्टेट चा एव्हरेस्ट' सर करतोय असाच फिल येत होता. ह्या वेळेस थोडं वजन वाढलं होतं त्या मुळे उडून जाण्याची भिती जरा कमीच जाणवली. Proud
चष्म्यानं मात्र कळसुबाई शिखरावरून आत्मबळी दिला. एवढा प्रचंड वार्‍याच 'गेला चष्मा कुणीकडे' हे म्हणायची सोय पण उरली नव्हती. कळसूबाई टॉपला पोहचलो तेव्हा एकदाचं हुश्शsss झालं.उतरताना मात्र कळतच नव्हतं कि एवढ्या उंच टोकावर शिडी सरळ उतरायची कि उलटी?
शिखरावरून बारी गावातल्या आमच्या बस आगदी आळीसारख्या दिसत होत्या. एवढा अवघड आणि थ्रिलिंग ट्रेक करून शिणवटा मात्र कुठेच जाणवला नाही. याचं खास कारण म्हणजे मस्त पाऊस, स्टोनकोल्ड मायबोलीकर्स आणि नको ती हौस.
जल्ला, यो चं एकच टिशर्ट खराब झालाय तो नीट होईल ना. Proud

ऑफबीट सह्याद्रीचा हा पहिलाच ट्रेक खरोखर आयुष्यात लक्षात राहण्यासारखा. सुन्या,प्रिती,योरॉ यांचे अभिनंदन आणि आभार सुद्धा.

पुढचा बेत ठरवा असं ठासून सांगायला हरकत नाही. Happy

बाकी, नच्या काय त्या मोबाईल मधे जीव अडकला होता काय माहित.

जोशीच जोश्यांची टांग खेचतायेत हे दृष्य फक्त तुम्हाला इथेच पहायला मिळेल. ह्या फोटोची प्रत इतर कुठेही नाही. Proud

अप्रतिम ट्रेक... सह्याद्रीचा शिरोमणी!

जुलै २००९ मधे मी आणि गिरीविहारने बारी मार्गे कळसुबाई ट्रेक केला होता... तेव्हा ही असाच पावसाचा आणि वार्‍याचा सपाटून मार खाल्ला होता...

"

तुम्ही इंदूर मार्गे केलेला ट्रेक तर त्याहून थ्रीलिंग वाटतोय... कळसुबाईचा चढ चढता संपत नाही... भले भले धारातिर्थी पडतात. :p त्यामानाने गिरपडे ग्रुपने खुपच धम्माल केलेली दिसते.

अरे इंद्रा, इंदुरीवरून इतकाही थ्रिलींग नाहीये... रॉकपॅचला रोप वगैरेची गरज नाहीये खरंतर... पहिलटकर्‍यांची टरकते एवढंच...

कळसुबाईचा चढ चढता संपत नाही... >> हे मात्र खरंच!!

सगळ्यांचे धन्यवाद Happy

उडीबाबाचा कार्यक्रम टॉपला करण्याचा प्लॅन होता.. मायबोलीकरांची ताटातूट झाल्यामुळे जमले नाही.. तसेपण तिथे उडी मारणे आव्हान होते.. ! Happy

टिशर्ट खराब झालाय तो नीट होईल ना. >> सुक्या.. हे तुझ्या बरं लक्षात राहीलं . Lol

ह्या फोटोची प्रत इतर कुठेही नाही >> Proud

<<सह्याद्रीचा शिरोमणी! >> सही बोललास इंद्रा.. Happy

Pages