मज्जाखेळ [3-5]/[5-7]: बटाट्याचे रोप

Submitted by सावली on 26 June, 2011 - 21:51

झाडाला फळं लागताना दिसतात. पण जमिनीखाली बटाटे कसे लागत असतील, ते कसे दिसतात हे बघायचे होते. त्यासाठी हा प्रयोग केला. इंटरनेट वर असे किट मिळतात ज्यात गाजर किंवा मुळ्याची वाढ पारदर्शक डब्यातुन दिसते. तसला किट वगैरे मागवण्यापेक्षा घरीच करता येईल असा विचार केला.
बटाटे आम्हाला पारदर्शक डब्यातुन दिसले नाहीत कारण ते अगदी कडेला आले नाहीत. पुन्हा लावताना कोंब अजुन कडेला, डब्याला चिकटवुन लावणार आहे. शिवाय गाजर / मुळा हे प्रयोगासाठी घेईन. तुम्हीही करुन बघा. एकत्र रोज पाणी घालायला, झाडाची वाढ बघायला छान वाटतं.

साहित्यः
कोंब आलेला बटाटा, प्लास्टिकचा एक पारदर्शक मध्यम आकाराचा डबा ( शक्यतो कमी रुंदीचा असलेला बरा, शिवाय माती दगड भरल्यावरही सहज उचलता आला पाहिजे), एक पाण्याची पेट बाटली. माती , दगड

कृती:
१. मोठी सुई किंवा काहीतरी टोकदार गरम करून प्लास्टिकच्या डब्याला तळाला पाच सहा भोके पाडा. भोके एकदम बारीक नको पण खूप मोठ्ठीहि नकोत.

२. डब्यात तळाला दगड घाला.

३. त्यावर माती घाला.

४. कोंब आलेला बटाटा एका तुकड्यावर एक/दोन कोंब येईल असा कापून त्याचे तीन चार तुकडे करून ठेवा.

५. आता हे तुकडे त्या माती वर ठेवून वरून पुन्हा थोडी माती टाका. बटाट्याच्या कोम्बाबर थोडी वर येईल अशा प्रकारे टाका. तुकडे मातीवर ठेवताना डब्याच्या अगदी कडेला लावा. म्हणजे पारदर्शक डब्यातून मूळ आणि बटाटे दिसतील.

६. आता त्या पाण्याच्या बाटलीच्या झाकणाला गरम सुईने तीन चार भोके पाडा. हि पाण्याची झारी तयार होईल.

मुलाला रोज ठराविक वेळी पाणी झाडाला पाणी घालायला सांगायचे. त्याच वेळी झाडाचे निरीक्षण पण करायचे. जर मुलाला लिहिता येत असेल तर एका वहीत तक्ता करून त्यात माहिती भरायला सांगायची. शक्य असेल तर आकृत्याहि काढायला सांगायच्या.

दोन चार दिवसातच कोंब वर येतात. आणि मुळे डब्याच्या कडेला दिसायला लागतात. त्या मुळांची लांबी छोट्या पट्टीने मोजून रोज किती वाढतात ते बघता येते. काही दिवसात खूप वाढतात त्या नंतर मात्र मोजता येणार नाहीत. बटाटे डब्याच्या कडेच्या मुळांना लागले तर ते कसे वाढतात तेही बघता येतील. पण आमचे कडेला लागले नाहीत.
या मध्ये फार मोठे बटाटे येणार नाहीत कारण डबा छोटा आहे. पण प्रयोग म्हणून मजा येते.

मी घरी प्रयोग केला तेव्हा मीच तक्ता लिहिला कारण अजून लेकीला लिहिता येत नाही. शिवाय मध्ये एक महिना आम्ही घरी नव्हतो तेव्हाच फुलं येऊन गेली. पाणी न घालताही बाहेरच्या मध्ये मध्ये पडणार्या पावसात झाडाने तग धरला होता.

१. नुकतेच लावलेले बटाटे १२-feb

२. दुसऱ्याच दिवशी कोंब थोडे वर आले. १३-फेब

३. सगळे कोंब वर आले १७-फेब

४. डब्यातून कडेला मूळ दिसायला लागले १७-फेब (फोटोवर चुकीची तारीख झालीये, मग बदलेन)
याच दिवसापासून मुळांची लांबी मोजून लिहायला सुरुवात केली. दिवसातून साधारण सहा तासांनी / किंवा ठराविक तासांनी मुळे मोजायची. सहा तासात सुद्धा दोन मिमी वगैरे वाढतात ते पाहून मज्जा वाटते.

५. मुळे दोन दिवसात इतकी मोठी झाली. एक दोन मुळे असल्याने त्यांना मार्किंग आणि वेळ लिहिली आहे. वरची रोपेही वाढली

६. देठाला बारीक केस आलेत. ते कसे हाताला लागतात ते बघायचे.

७. लावल्यापासून १२ दिवसात रोपे इतकी छान वाढली

८. मात्र आता मुळे मोजता येणार नाहीत इतकी वाढलीत

९. मध्ये एक महिना भारतात असल्याने फुलांचे वगरे फोटो नाहीत. पण साधारण मे महिन्याच्या सुरुवातीला एक चिमुकला बटाटा वर दिसायला लागला होता. त्याचाही फोटो नाही.

१०. बटाटे वाढत नाहीत आणि वरचे रोप पिवळे व्हायला लागले म्हणून आणि हळुवारपणे रोप वर उचलले. सहज येणार नाही मुळे खूप वाढली असतील. खुरपणी वगैरे काहीतरी घेऊन हळूच वर उचलावे. म्हणजे मुळाना लागलेले बटाटे दिसतील . आमचे अगदी छोटे छोटे बटाटे तयार झाले होते.

११. ते तोडून घ्यावे. मुलांना तोडायला मज्जा येते.

१२. हे आमच्या रोपाला आलेले चिमुकले स्वच्छं धुतलेले बटाटे. 



अधिक खेळ इथे बघा
मज्जाखेळ: खेळता खेळता गंमत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच सावली. एकदा बटाटे आल्यावर नंतर काय केलंस? ते ही वाचायला आवडेल.

रच्याकने, छोटे बटाटे दम आलू करण्याकरिता वापर बघू. Happy

आडो ते बटाटे आम्ही खाल्ले नाहीत Sad
रेडीएशनच्या काळात ते बाहेर बाल्कनी मधे होते.
पुन्हा लावले कि दम आलु करेन

खूपच सहिये , मुलानांच नव्हे तर मोठ्याना ही बी पेरून त्याच रोप वाढ्ताना त्याला फळ फुलं लागताना पहाताना कित्ती कित्ती आनंद होतो ना Happy

कोंब आलेल्या बटाट्याला बटाटे येतात का? मला वाटलं बटाटे येण्यासाठी वेगंळं बियाण असतं?
खरच येत असतील तर लावायला हवेत लेकींना दाखवायला......

धन्यवाद. Happy
ज्यांना जमेल त्या सगळ्यांनीच करुन बघा.
फुलं आली तर त्याचा फोटो इथे नक्की द्या. आणि बटाटे तयार होतानाचा वगैरे पण फोटो द्या.

किती मस्त!
माझी मुलगी १० महिन्याची आहे. ती कधी मोठी होइल आणि मी कधी तिच्या बरोबर हे करेन. Sad
- सुरुचि

मस्त मस्त बटाटे आहेत. आणि खेळही. (बटाट्याला फूलेही छानच येतात.)

रताळ्याचे कोंब लावले तर ती वेल किती भराभर वाढते ते पण दाखवता येईल.

भारी आयडीया आहे ही.
बटाट्याचे कोंब लावल्यावर त्याला मुळाशी बटाटे येतात हेच मला माहित नव्हते, माझे घोर अज्ञान दूर केल्याबद्दल तुला स्पेशल धन्यवाद.

आम्ही पण लेकाला झाड कसं येतं बघायचं होतं म्हणून कोंब आलेला बटाटा लावलाय. छान रोप पण आलंय. पण मी छोट्या कुंडीतच लावलाय. आता त्याला खाली बटाटे आले असतील तर कसे कळतील? किमान तयार बटाटे तरी त्याला दाखवता येतील.

~साक्षी

रताळी पण लावुन बघेन आता.
बाकी खरच सगळ्यांनी करुन बघा Happy फक्त आपापल्या राहत्या ठिकाणी कोणत्या सिझन मधे केले तर चांगले ते बघावे लागेल. इथे साधारण स्प्रिंगच्या सुरुवातीला लावतात म्हणे म्हणुन इथे जेव्हा बटाट्याला कोंब येतात तेव्हाच मी लावला. घरात ठेवणार असु तर ऑड सिझनलाही चालु शकेल लावलेले.
साक्षी , बहुतेक फुल आल्याशिवाय बटाटे येणार नाहीत त्याला. फुलं येऊन गेल्यानंतरच बघा.