लहान मुलांमधल्या रेसिझम बद्दल प्रश्न

Submitted by सावली on 20 June, 2011 - 21:03

खरतर भरपुर विचार करुन काही न सुचल्याने इथे लिहितेय.

गेले काही आठवडे लेक खुप जास्त चिडचिड करतेय. आधी आम्हाला वाटलं कि असेच मुलांचा स्वभाव बदलतो किंवा मधे मधे एक एक फेजेस येतात तशी हि नविन फेज असेल. म्हणुन दुर्लक्ष केले.
पण अगदी मला मारायला येणे टोचणे असे प्रकारही अलिकडे सुरु झालेत. हे सहसा मुलं दुसर्‍या वर्षी करतात पण तीने हे कधीच केलं नव्हतं. त्याशिवाय ती तीच्या वयापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आणि मॅचुअर आहे असे नेहेमीच आम्हाला वाटते दिसते. मग हा बदल का ते लक्षात येत नव्हते.

शिवाय आता तीला जपानी डेकेअर मधे जायला आता विषेश आवडत नाही , कंटाळा येतो म्हणते. इंटरनॅशनल शाळा आठवड्यातुन दोन दिवस असते ती मात्र खुप आवडते. खरतर शाळेत तिला इंग्रजी बोलताही येत नाही. नुसती खेळते तिथे. तीला ते जड जाऊ नये म्हणुनच आम्ही दोन दिवसांच्या शाळेचा पर्याय निवडला. म्हणजे आधीच रुळलेल्या जपानी डे केअर पासुन सुद्धा तीला तुटल्यासारखे होणार नाही. डेकेअर मधे दुपारचे झोपायलाही मिळते, आराम असतो. एरवि खरच खुप चांगल्या गोष्टी चालु असतात इथे. शिक्षकही प्रेमळ आहेत.

पण मागच्या आठवड्यात बोलताना तीने सांगितले की जपानी डे केअर मधला अमुक एक 'अ' मुलगा आणि त्याचा 'ब' मित्र ( दोघे जपानी) दोघे तीच्याशी खेळत नाहीत कारण ती ब्राऊन आहे.
मग तीला विचारलं कि इतर कोण खेळतं? तर ती म्हणाली तिच्या वयाचे(वर्गातले) कोणीच नाही. लहान वर्गातले खेळतात. एरवीही हा 'अ' तीला आवडायचा नाही कारण फार गुंडगिरी करायचा, सगळ्यांना मारायचा/ मारतो. लहान मुलं इतकी क्रुर का होतात देव जाणे.

सध्यातर ती इतकी चिडते कि बोलायची सोय नाही. आणि गेले एक दोन आठवडे आम्हीही चुकीचे वागलो. तीने उगीच कारण नसताना मारलं तर आम्ही तीला कान पकडण्याची शिक्षा दोन तीन वेळा केली. मला माहितेय की हे पुर्ण चुकीचे होते आणि त्याचे काहि जस्टिफिकेशन करायचे नाहीये. ती आमची चुक होतीच. पण हिच वर सांगितलेली गोष्ट तीने दोन तीन वेळा सांगितली. तीच्या वागण्यातील बदलाचा आणि या डेकेअरमधील मुलांच्या वागण्याचा संबंध असावा असे मला वाटायला लागले आहे. असेल का? असे काही अनुभव तुम्हाला कोणालाही आलेले आहेत का? त्यावेळी काय करायचे, मुलांना कसे वागवायचे?

माझ्या समोर असलेले पर्याय
#१ डेकेअर बंद करुन पुर्ण वेळ ८ ते ४ शाळेत पाठवणे. ( प्ल्स साधारण १ तास दोन्ही वेळेच्या प्रवासाचा) या प्रकारात दुसरी काही सोय झाली नाही तर कदाचित मला नोकरी सोडावी लागेल. पण त्याला काही हरकत नाहीये माझी. पण रोज इतका वेळ शाळेत जाऊन ती दमेल. शिवाय शाळेत ती फारसे बोलत नाही त्यामुळे कंटाळेल की इंग्रजी बोलायला शिकेल?

#२ डेकेअर तसेच चालु ठेवुन तीला या प्रकाराला सामोरे जाऊ द्यायचे. पण ती इतकी सेन्सिटिव्ह आहे कि तीची सगळी एनर्जी यातच जाते. शिवाय फिजीकलीही ती स्ट्राँग नाहीये फारशी की कोणाचा मार खाऊन त्याला उत्तर देईल.

#३ तुम्हाला सुचत असेल तर अजुन काही वेगळा उपाय. .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती वर्षाची आहे गं मुलगी?

मला विचारायचं आहे की तिच्या डेकेअर मधल्या टिचर/केअरटेकर यात लक्ष घालत नाहीत का? त्यांच्याशी बोलून काही मार्ग काढता येतो का बघ.

वय मी अशासाठि विचारलं की माझी ४ वर्षाची मुलगी पुर्ण वेळ्च्याच शाळेत जाते ८ ते ३.
तिलाही भाषेचा प्रॉब्लेम होताच कारण नुकतेच भारतातून आल्यामुळे अमेरिकन इंग्लिश /स्पॅनिश तिच्यासाठी पुर्णपणे नवीन होते. ती सुद्धा आधी काहीही बोलायची नाही वर्गात. कोपर्‍यात कोपर्‍यातच असायची. खुणेनेच दाखवायची काय पाहिजे ते. घरी आल्यावर म्हणायची माझ्याशी कोणी खेळत नाही. तेव्हा माझ्या पण अगदी काळजाचं पाणी झालं होतं. नशीब कोणी मारायचं वगैरे नाही.
पण जसजसा वेळ गेला तशी तीची तिच अ‍ॅडजस्ट झाली. आणी अर्थात तिची टिचर पण कॉऑपरेट करणारी होती.

तुझ्या मुलीला जी शाळा आवडते तिथेच तिला जास्त वेळ ठेवता येतं का ते बघ किंवा दुसरे चांगले डेकेअर शोधणे. मला मान्य आहे की तुझ्या नोकरी मुळे वेळेवर मर्यादा येईल पण मुलीची सोय चांगली झाली तर तु निश्चींत मनाने बाहेर राहू शकशील.

सावली Sad

मुलांना व्यक्त होता येत नाही त्यामुळे पालकांनाही त्यांच्याशी कसं वागायचं हे कळ्त नाही काही काही वेळेस. तिच्या डेकेअर टिचर्सशी बोलून काही होतंय का बघ किंवा मग पूर्ण वेळ शाळेचा पर्याय आहेच तुझ्यासमोर. आणि भाषेचं म्हणशील तर मुलं पटकन पिकअप करतात. त्यामुळे इंग्लिश शिकेल ती नक्कीच.

अंजली धन्यवाद Happy
हो माझी मुलगीही चार वर्षाची आहे. फक्त इथे तीचा प्रवासाचा वेळ मला नको वाटतो.
तुझी लेक दुपारी झोपली नाही तरी फ्रेश असते का? हि दुपारी झोपली नाही की संध्याकाळी सहालाच झोपाळते.

नविन डेकेअर शोधणे हा ऑप्शन सुद्धा बघायला हवा. पण आता आणखी सहा सात महिन्यात आम्ही कायमचे भारतात यायचा प्लान आहे. त्यामुळे तेवढ्या वेळात नविन जागी अ‍ॅडजस्ट होणे वगैरे जमणारे नाही असे वाटते.
इथे जपानी शिक्षक त्या मुलाला म्हणाले आहेत की ती 'भारतातली आहे म्हणुन वेगळी दिसते.' ( हे लेकीनेच सांगितलेय विचारल्यावर) तरी शनिवारी वन टू वन मिटिंग मधे मी बोलणार आहे. फक्त लेकीसमोर जास्त बोलायचे नाहीये कारण प्रत्येक वेळी 'आई हँडल करेल' असा मेसेजही तीला जायला नको. छोटी छोटी भांडणे वगरे तीचे तीलाच मॅनेज करायला हवे.

हो ना. आडो. बोलुन बघणार आहे टिचरशी. पण खरतर मुलं अशी वागत असतील तर टिचर फारसे काही करु शकतील का देव जाणे.. त्यातुन जपानी टिचर.

सावली, माझी लेक जेंव्हा ५ वर्षाची होती तेंव्हा ज्या इंटरनॅशनल शाळेत जायची, त्यावेळी समहाऊ, एक काळ असा आला होता की तिच्या वर्गात सगळी फक्त जपानी मुलं होती, आणि ही एकटी भारतीय. त्यावेळी एक मुलगा म्हणाला होता की "तू ब्राऊन आहेस, तुझ्याशी खेळणार नाही". त्यावेळी मी लेकीला तर समजावलं होतंच पण हे तिच्या शिक्षकांनाही सांगितलं होतं. कारण ह्या वयात मुलांसाठी त्यांचे शिक्षक सर्वकाही असतात. त्यांच्या फक्त एकदा समजावण्यामुळे खूपच फरक पडला होता. तसं एकदा करुन बघितलंस तर?? शिक्षकांशी बोलून बरेचदा प्रश्न सुटतात. अर्थात सध्या तुझ्या लेकीला त्रास जास्त होतोय, माझ्या लेकीला झाला त्यापेक्षा (कारण तिच्या बाबतीत हे फक्त एखाद दोन वेळेलाच झालं होतं).
इथल्या जपानी शाळेतही जेंव्हा मुलांना त्रास होतो (इथलं टिपिकल इजिमे!) तेंव्हा तेंव्हा इथले पालक शिक्षकांशी बोलतात, हा माझा जपानी मैत्रिणींविषयी अनुभव आहे.

तू म्हणत्येस तसं तिच्या वागण्याचा आणि डेकेअरमधील मुलांच्या वागण्याचा संबंध नक्कीच असेल. तो कदाचित शिक्षकांशी बोलून सुटेलही. पण बरेचदा मुलांना ठराविक काळानंतर जपानी नर्सरीमधे तरी जायचा कंटाळा येतो.
त्यामुळे
>>पण रोज इतका वेळ शाळेत जाऊन ती दमेल.>>
ह्या बद्दल बोलायचं झालं तर कदाचित तू तिला/तिच्यातल्या एनर्जीला कमी लेखत्येस. मुलांची शारिरीक आणि मानसिक एनर्जी एवढी प्रचंड असते की त्यांना त्यासाठी वेगवेगळे आउटलेट्स लागतात(च).
त्यामुळे डेकेअर बंद करुन शाळेत घालू शकतेस.
>>शिवाय शाळेत ती फारसे बोलत नाही त्यामुळे कंटाळेल की इंग्रजी बोलायला शिकेल? >>
तिला जर तिथलं वातावरण जास्त आवडत असेल तर ती नक्कीच इंग्रजी बोलायला शिकेल. जपानी तरी कुठे येत होतं न आधी?

>>>#१ डेकेअर बंद करुन पुर्ण वेळ ८ ते ४ शाळेत पाठवणे. ( प्ल्स साधारण १ तास दोन्ही वेळेच्या प्रवासाचा)>>> ही कुठची शाळा?

डेकेअर पूर्ण बंद करायचं नसेल तर इंटरनॅशनल शाळेचा पर्याय जास्त वाढवून एखाद दिवस डेकेअरला पाठव. यसंही तिला प्रीस्कूलला जावं लागेलंच की आता.
तिच्या वर्गातले, तिच्या वयाचे आधी खेळत होते आणि आता खेळत नाहीत असा फरक पडलाय का? की आधीपासूनच ही मुलं तिच्याशी खेळत नाहीत? तसं असेल तर तिला पूर्ण वेळ दुसर्‍या शाळेत टाकलेलंच बरं.

माझी मुलगी ज्या इंटर. प्रीस्कूलला जायची त्याची वेळ ९-२.३० होती. ४, ४.५ होईस्तोवर दुपारी नॅप टाईम असायचा. अगदी केजीत गेली तेव्हाही दुपारी अर्धा तास रिलॅक्स करायचा वेळ मिळायचा. पहिल्या ग्रेडपासून ते सगळं बंद होतं.

प्रत्येक वेळी 'आई हँडल करेल' असा मेसेजही तीला जायला नको. छोटी छोटी भांडणे वगरे तीचे तीलाच मॅनेज करायला हवे. >> १००% बरोबर आहे. पण त्याच वेळेला आपल्याला काही प्रॉब्लेम्स आले तर आईबाबा पाठीशी आहेत, हे विश्वास वाटणंही तितकंच गरजेचं. आता ह्या दोन्हीमधे समन्वय कसा साधायचा, हा महत्वाचा प्रश्न!
पण माझी लेक पण २ वर्षाची झाल्यापासून शाळेत जायला लागली. आधीच्या वर्षी ९.३० ते १, मग १.३०, पुढच्या वर्षी २.०० आणि मग ३ पर्यंत अशी वेळ बदलत गेली.
३ वर्षाची झाल्यावर तिची दुपारची झोप कमी कमी होत, बंद झाली.
पुन्हा सांगते, तिच्या क्षमतेला कमी लेखू नकोस प्लिज!

मंजिरी धन्यवाद.
डेकेअर मधे नक्कीच बोलणार आहे.

मी लेकीला तर समजावलं होतंच >> कशा प्रकारे समजावले होतेस ते सांगशील का प्लिज.

कदाचित तू तिला/तिच्यातल्या एनर्जीला कमी लेखत्येस >> ह्म्म हे कदाचित बरोबर आहे.

जपानी तरी कुठे येत होतं न आधी?>> या जपानी डेकेअर मधे ती सहा महिन्यांची असल्यापासुन जातेय म्हणुन हा प्रश्न कधी आलाच नव्हता आम्हाला.
पण असही भारतात गेल्यावर तीला इंग्रजी बोलावे लागणारच आहे शाळेत. त्यामुळे ते शिकायचे आहेच.

तिच्या वयाचे आधी खेळत होते आणि आता खेळत नाहीत असा फरक पडलाय का?>> हो, पण आधीही ठराविक मुलांच्या ग्रुप मधे ती खेळायची त्यामुळे ओके होतं ते. आता तीच्या म्हणण्याप्रमाणे कुणीच खेळत नाही.

दोन्हीमधे समन्वय कसा साधायचा,>> कठिण आहे ना हे भारी. आधी एक दोन वेळा इतर काही केसेस मधे मी मुद्दाम तीच्या समोरच बोलले आहे. यावेळीही हा विषय तीच्यासमोर बोलले तर चालेल का?

कारण प्रत्येक वेळी 'आई हँडल करेल' असा मेसेजही तीला जायला नको. छोटी छोटी भांडणे वगरे तीचे तीलाच मॅनेज करायला हवे.>>>>>> अगदी बरोबर. काही काही मुलं पहिल्यापासूनच बोल्ड असतात गं. पण मला वाटतं आपल्या मुलींच्या सारख्यांना हे सांगावं लागतं Happy

(माझ्या मुलीच्या शाळेत नॅप टाईम आहे अगं १ तासाचा, त्यामुळे तशी फ्रेश असते नंतर. )

हम्म भारतात जाणार आहेस तर मग बदलाबदली न करता पहिले टिचरशीच बोल, अगदी टोकाचं म्हणजे परदेशात कसं घेतील हे माहित नाही पण त्या 'गुंड' मुलांच्या पालकांशी नाही का बोलता येत?

सावले, लेकीनेच तिच्या डेकेअरला सांगून बघितलं तर? किंवा तू टीचरशी फोनवर बोलून ह्याबद्दल मुलांना समजावा असं सांगू शकतेस कां? म्हणजे तू बोललीस हे लेकीला कळणारही नाही आणि तुझंही समाधान होईल.

>>मी लेकीला तर समजावलं होतंच >> कशा प्रकारे समजावले होतेस ते सांगशील का प्लिज. >>

वेगळं असं काहीच नाही ग. आपण मागे बोललो होतो त्याप्रमाणेच सगळ्यांचा रंग वेगळा, त्यांच्या आईवडलांसारखा, तरी सगळे सारखेच टाईप्स.
तुझी आणि माझी केस पूर्ण वेगळी असू शकेल आत्ता. पण मुलांची गरज ही बरेचदा त्या त्या वेळेला आईबाबांशी नुसतं बोलुन मोकळं होण्याची असते. त्यांना त्यावेळी आपल्याकडुन काही कडक अ‍ॅक्शन घेणं अपेक्षित नसतही.
उदा: "आई, काईसेई मला असं असं बोलतो" ह्या वाक्यावर मी "हो?? असं का बरं बोलला? चांगलं नाही ना असं बोलणं?" अशा प्रकारचं काहीतरी बोलले. मग लेकीनी त्यावर "पण मला किती वाईट वाटतं असं बोलल्यावर" असं म्हणुन एक मोठं भोकाड पसलेलं आठवतय. जरा शांत झाल्यावर हे कितपत सिरियस आहे हे बघायला मी तिला विचारलं होतं "मग आपण तुला त्या दुसर्‍या मस्त शाळेत घालुयात का??" त्यावर "माझ्या शाळेपेक्षा मस्त शाळा कशी असेल दुसरी?? मला ह्याच शाळेत जायचय फक्त" असं उत्तर आलं आणि मी निर्धास्त झाले. त्या वयात तिला नक्कीच आपली शाळा इतर शाळांपेक्षा कुठल्या दृष्टीनी आणि कशी चांगली आहे, हे कळत नव्हतं. शाळा म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणी आणि आवडत्या टिचर्स हेच समिकरण असणार. पण एक काळजी म्हणुन शाळेत बोलले होते हे तिच्या टिचरशी. आणि नंतर कधी आली नाही ही तक्रार.

>>आधी एक दोन वेळा इतर काही केसेस मधे मी मुद्दाम तीच्या समोरच बोलले आहे. यावेळीही हा विषय तीच्यासमोर बोलले तर चालेल का? >>
तिच्या मनात ह्याचे पडसाद किती खोलवर उमटलेत हे बघायला जरूर बोल तिच्याशी. पण तिच्याशी बोल. ह्या विषयावरची तुमची मतं, टिचरशी झालेलं बोलणं, तुम्ही दोघं एकमेकांशी तिच्यासमोर नका मांडु. कारण आपण त्यावेळेला बरचसं नकारात्मक बोलुन जातो आणि मुलं ते लक्षात ठेवतात.

आडो टिचरला माहित आहे. त्या टिचर कडे हे प्रकरण तीने आधीच नेलय ( किंवा टिचर समोरच हे घडलय.) टिचरने लेकीच्या बाजुने बोलुनही झालय एकदा. (ते किती सिरियसली आनि कशा प्रकारे झाल हे अजुन कळलेले नाही. ते मी बोलल्यावरच कळेल)
पण त्यानंतरही पुन्हा त्या मुलांनी हेच सांगितल लेकीला.

मी बोलणारच आहे फक्त लेकीसमोरच बोलावे की ती नसताना बोलणे योग्य होईल?

अंजली त्या पालकांशी डायरेक्ट बोलणं इथे फारच कठीण आहे. शिवाय वयाच्या दुसर्‍या वर्षापासुनच त्या पोराला गन्स आणि तत्सम खेळणी, तसे व्हिडियो सतत दाखवले गेले आहेत हे आम्ही नेहेमीच बघतो. शिक्षक नेहेमी त्याच्याकडे बारिक लक्ष ठेवुन असतात.

आपल्या मुलींच्या सारख्यांना हे सांगावं लागतं >> होना.

धन्यवाद मंजिरी.

सगळ्यांचा रंग वेगळा, त्यांच्या आईवडलांसारखा, तरी सगळे सारखेच टाईप्स.>> हो हे नेहेमीच बोलतो. तीलाही ते माहितेय. अगदी नविन देशाचं नाव वगैरे ऐकलं की ती विचारते की तिथले लोक कसे असतात वगरे. त्यामुळे याबाबती ओकेच असाव ( आता सगळच असाव वाटतय.. )

"मग आपण तुला त्या दुसर्‍या मस्त शाळेत घालुयात का??" >> या प्रश्नाचे उत्तर बहुतेक ती इंटरनॅशल स्कुल मधे जाऊया असे सांगेल कारण तीला ते जास्त आवडतय. मी विचारुन बघते तीला आडुन आडुन. फक्त का विचारतेय याचं कारण इतक्यात कळु देणार नाही.

पण तिच्याशी बोल. >> तिच्याशी सारखीच बोलते मी. पण सध्या चिडचिड होतेच तीची. बहुतेक कोणी खेळत नाही याचं तीला वाईट वाटतय.
कदाचित तो मुलग इतका गुंड आहे त्यामुळे तो खेळत नाही हिच्याशी म्हणुन बाकिची पोरंही त्याला घाबरुन खेळत नसावित. Sad

विषयावरची तुमची मतं, टिचरशी झालेलं बोलणं, तुम्ही दोघं एकमेकांशी तिच्यासमोर नका मांडु>> ओके. नक्कीच. Happy

रेसिझम ला काहीच करता येणार नाही. आपल्याकडे एखादे काळे मूल असेल तर त्यालाही चिडवतातच कि. शाळेतही आणि बाहेरही. मुलांच्यात हे असं चालतंच. एखाद्याशी इतरांनी बोलायचं नाही म्हणून आडदांड मूल इतरांना सांगतं मग कारण काहीही पुरतं. शाळा बदलून आलेलं मूल, आपल्या भागात न राहणारं मूल, आपल्या बसमधे नसणारं मूल यांना अशा ट्रीटमेंटला सामोरं जावं लागतं. तसच रंगाचंही आहे.

आपल्या मनातलं रेसिझम आणि मुलांचं रेसिझम यात फरक आहे. अशा घटनांना सामोरं जायला शिकवणं हाच एक उपाय दिसतो.

>>रेसिझम ला काहीच करता येणार नाही. आपल्याकडे एखादे काळे मूल असेल तर त्यालाही चिडवतातच कि. शाळेतही आणि बाहेरही. मुलांच्यात हे असं चालतंच. एखाद्याशी इतरांनी बोलायचं नाही म्हणून आडदांड मूल इतरांना सांगतं मग कारण काहीही पुरतं. शाळा बदलून आलेलं मूल, आपल्या भागात न राहणारं मूल, आपल्या बसमधे नसणारं मूल यांना अशा ट्रीटमेंटला सामोरं जावं लागतं. तसच रंगाचंही आहे. >>>
बरोबर आहे. पण बाकी गोष्टीत गृपिझम होणं आणि रंगरूपावरुन डावललं जाणं, हे मुलांना पचायला जड जातच असेल. जपान सारख्या देशात जिथे सगळीच्या सगळी लोक अगदी एकाच छापाची असतात/दिसतात तिथे भारतीय रंग रूप उठुन दिसतं, तेंव्हा मुलांना ते नक्की जाणवत असेल. जपानमधे अजुनही "जपानी नसलेली + गोरी नसलेली" व्यक्ती इतक्या पटकन स्विकारली जात नाही. मग भले आई वडलांपैकी एक जपानी असेल, पण मूल दिसायला जपानी नसेल तरी.

आपल्या मनातलं रेसिझम आणि मुलांचं रेसिझम यात फरक आहे. अशा घटनांना सामोरं जायला शिकवणं हाच एक उपाय दिसतो >> अगदी १००% अनुमोदन!

पण बाकी गोष्टीत गृपिझम होणं आणि रंगरूपावरुन डावललं जाणं, हे मुलांना पचायला जड जातच असेल. >> हो मलाही असे वाटते.
घटनांना सामोरं जायला शिकवणं >> हो हे बरोबर आहे. पण जेव्हा आपलं मुल त्याला फारच वाईट रितीने रिअ‍ॅक्ट होतय असं वाटलं तर काय करायच? तीला आतापर्यंत आम्ही नेहेमीच सामोरे जायला , दुर्लक्ष करायला, शक्य तेव्हा प्रतिकार करायला शिकवलं आहे. या व्यतिरिक्त काय शक्य आहे ते वाचायला मला खरच आवडेल.
तीचे आताचे बदललेले वागणे बघुन मला अजुन दुसरे काय उपाय करावे हा प्रश्न पडला आहे.

मंजिरीला फुल्ल अन्नुमोदन.

<<
उदा: "आई, काईसेई मला असं असं बोलतो" ह्या वाक्यावर मी "हो?? असं का बरं बोलला? चांगलं नाही ना असं बोलणं?" अशा प्रकारचं काहीतरी बोलले. मग लेकीनी त्यावर "पण मला किती वाईट वाटतं असं बोलल्यावर" असं म्हणुन एक मोठं भोकाड पसलेलं आठवतय. जरा शांत झाल्यावर हे कितपत सिरियस आहे हे बघायला मी तिला विचारलं होतं "मग आपण तुला त्या दुसर्‍या मस्त शाळेत घालुयात का??" त्यावर "माझ्या शाळेपेक्षा मस्त शाळा कशी असेल दुसरी?? मला ह्याच शाळेत जायचय फक्त" असं उत्तर आलं आणि मी निर्धास्त झाले. त्या वयात तिला नक्कीच आपली शाळा इतर शाळांपेक्षा कुठल्या दृष्टीनी आणि कशी चांगली आहे, हे कळत नव्हतं. शाळा म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणी आणि आवडत्या टिचर्स हेच समिकरण असणार. पण एक काळजी म्हणुन शाळेत बोलले होते हे तिच्या टिचरशी. आणि नंतर कधी आली नाही ही तक्रार.
>>
कस्लं वाईट वाटलं असेल Sad बिचारी रडताना इमॅजिन झाली एकदम Sad

हे छान /उपयुक्त लिहीलं आहे पण.

सावली,
मंजिरीचा अप्रोच मला पटतो आहे.

GIIS किंवा दुसरी भारतीय शाळा यांचा पर्याय कसा वाटतो? हो मला मान्य आहे की that beats our 'all men are equal' principle आणि ते 'ghetto' करुन राहण्यासारखे होते. पण जर ते लेकीसाठी चांगले असेल, तिला आवडणार असेल तर आपली मते गिळायची.
आपणही सबवे मध्ये, हापिसात थोड्याफार प्रमाणात याला सामोरे जातोच की. पण आपले वय आणि छोट्या मुलांचे वय पाहता..

खालील पर्याय असू शकतात
१. असे काहीच नसते असे म्हणणे आणि तसेच म्हणत राहणे.. पण हा खोटेपणा झाला. मला तरी मुलांशी खोटं बोलायला अजिबात आवडत नाही.
२. हो असे होते खरे. पण आपण याच्याशी डील करुयात. अवघड पर्याय आहे. मुलांवर फार मानसिक बोजा पडणार याचा. आणि दुसर्‍या शाळा नसत्या तर ठिक, पण ऑप्शन असताना, हा मार्ग..
३. शाळा बदलुयात. भारतीय शाळा.
४. शाळेतील जपानी आयांशी सोशलाईज करणे आणि त्यांची मदत घेणे. त्या दोन मुलांच्या आयांशी संपर्क साधणे. त्यांची मदत मिळु शकेल का ते पहाणे.
५. ४+५ शिक्षकांचीही मदत घेणे

मूल खूप लहान असल्यामुळं त्याला आत्ता कळणार नाही. मोठं झाल्यावर समजेल , तोपर्यंत पालकांनी समजून घ्यायला हवं. डेकेअर चे संचालक, शाळेचे शिक्षक यांनाही हा प्रॉब्लेम विश्वासात घेऊन सांगायला हवा आणि पालक मुलाची तक्रार अ‍ॅटेन्ड करताहेत हे त्याला समजू द्यायला हवं..

रैना , ऋयाम तीचा अ‍ॅप्रोच बरोबर आहे. फक्त तो आमच्याकडे वापरुन झाला आहे. त्याचा उपयोग आधी झालाय पण यावेळी होत नाहीये. म्हणुनच इतका विचार करायला लागला मला Sad
मुळात ती बोलुन रडली तरी मला चालण्यासारखं आहे कारण आम्ही सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो. पण ती रडत नाही तर चिडते घरात आणि आता अगदी मारायला वगरे येते यामुळे टेन्शन येतय.
आता पुन्हा भारतीय शाळेत बदलायचे म्हणजे सहा महिन्यांसाठी फार त्रासदायक होणार. तीच्या इंटरनॅशनल शाळेत ती रुळली आहे तशी. तिथेही सगळ्या देशातली मुलं आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांवर आमची घरी ओपनली चर्चा होतच असते. मला आधी वाटलं होतं की इंटरनॅशनल शाळेत रेसिझमचा त्रास होईल. पण उलट तिथे अजुन तरी काही त्रास वाटत नाहीये.

२. वाल्या बद्दल आम्ही खरतर बोललो आहोत. की प्रत्येक जण वेगळा असतो वगरे. तीला फुल्ली हॅप्पीली अ‍ॅसेप्टेड आहे.
३. आत्ता शक्य वाटत नाहीये.
४. ह्म्म कठिण आहे पण विचार करायला हरकत नाही
५. तिचरशी नक्की बोलणार आहे

ओके सावली, म्हणजे हे नुसतं बोलुन मोकळं होणार नाहीये.

दुसराही एक विचार - कदाचित तिला नर्सरीच्या अ‍ॅक्टिविटिज आता कंटाळवाण्या वाटत असतील, त्यात ह्या मुलांच्या वागण्याची भर पडली असेल. (टिपिकल जपानी) नर्सरी मधलं अति गुडी गुडी वातावरण मुलांना कंटाळवाणं वाटु शकतं, जर त्यांच्या मेंदुला हवं तेवढं खाद्य तिथे नसेल मिळत तर.
मित्र किंवा तिथे चालणार्‍या म्हणजे अ‍ॅक्टिविटिज ह्यापैकी एक जरी तिला मनापासून आवडत असतं तर कदाचित तिनी जाण्याचा कंटाळा केला नसता. ह्या दृष्टिकोनातूनही बोलुन बघ हवं तर. (सगळेच अंदाज आहेत. पण तरी......) Happy

अरे बाप रे.. माझी लेक पण आताच शाळेत जायला लागली नि तिला त्या शाळेत जायचे नाही असेही तिचे मत झालेय.. विचारून बघते काही खास कारण आहे का असे ते.. कारण भारतात ती मज्जेत शाळेत जायची.

असे काहीपण असेल.. हे माझ्या डोक्यातच नाही आले. Sad

गंभीर व अती महत्वाचा धागा.

वाचत आहे.

(अवांतर - हे मत पूर्ण असंबद्ध वाटेल, पण माझ्या मनात पहिली प्रतिक्रिया आली ती अशी की मातृभूमीपासून लांब न जाता येथेच राहिलो असतो तर हे प्रश्न भेडसावले नसते की काय! अर्थात, हे निर्णय खासगी असतात व निश्चीतच त्यांचा रिस्पेक्ट आहेच.)

-'बेफिकीर'!

सावली, डेकेअरच्या टिचर्सशी बोलून बघ. पण नाहितर बदल. तसेही तुम्ही परत येणार आहात तर इंटरनॅशनल शाळेत इंग्रजी असेल तर तिला पुढचा विचार करताही बरे पडेल.
इथे आमच्या गावात जपानी कंपन्यांमुळे बरीच जपानी कुटुंब रहातात. माझ्या मुलाच्या वर्गात असलेले जपानी मुलही त्याच्याशी फटकून वागायचे/वागते. अगदी मुलाच्या पालकांनी मैत्री व्हावी म्हणून प्रयत्न करुनही हे होते. बाकी हिस्पॅनिक्,आफ्रिकन अमेरिकन, कॉकेशियस मुलांशी त्याची चांगली मैत्री आहे.

बेफिकिर, आपल्या इथेही रंग-रुप, जात, धर्म, आर्थिक किंवा बौधिक स्तर वगैरे बर्‍याच कारणांमुळे एकटे पडायची वेळ मुलावर येऊ शकते.

सावली, तिचा जेव्हा मूड ठीक असेल तेव्हा हा खेळ तिच्याबरोबर खेळ :

तुला कोण कोण आवडत नाही?
मग जे कोणी आवडत नाही त्या व्यक्तीचा अभिनय करायचा.... तिच्यासारखा चेहरा वेडावाकडा करायचा/ चालायचे/ बोलायचे/ओरडायचे इत्यादी. थोडा वेळ असे खोटे खोटे केल्यावर तीच खुदखुदून हसू लागेल.

तूही तुला न आवडणार्‍या एखाद्या व्यक्तीचा अभिनय करून दाखव तिला.

किंवा आरशासमोर उभे राहून हा खेळ खेळायचा... वेडेवाकडे चेहरे करायचे, राग व्यक्त करायचा. आपण हे सर्व करताना किती मजेशीर दिसतो हे पाहूनच मुलं त्या चिडण्यातील/ वागण्यातील फोलपणा समजू लागतात.

ह्यातून मुलांना आधी ज्या गोष्टीचा व व्यक्तीचा राग येत असतो तो मोकळा होतो आणि मुख्य म्हणजे त्यावर ती हसू लागतात. बघ करून एकदा! Happy

हे खरोखर फारच गंभीर आहे. तुमचा प्रश्न सुटला की तो कसा सुटला ते जरुर लिहा.

आपल्या इथेही रंग-रुप, जात, धर्म, आर्थिक किंवा बौधिक स्तर वगैरे बर्‍याच कारणांमुळे एकटे पडायची वेळ मुलावर येऊ शकते.>>>>>>> अगदी बरोबर....

मला वाटतं कि ज्या लोकल पालकांच्या घरात असे विषय चर्चिले जात असतील त्या मुलांच्या मनात आपल्या मुलांबद्दल 'डिस्क्रिमिनेशन' तयार होत असेल. मग त्या मुलांकडुन इतर मुलाकडे....

सगळ्यांना खुप धन्यवाद.

काल मी तीच्या डेकेअर मधल्या टिचरशी बोलले.

त्यांनाही असे डिस्क्रिमिनिशन चालु झालेय हे जाणवले. मुळात मुलांना होणार्‍या वेगवेगळ्या जाणीवांमधली एक असाच प्रकार आहे. माझ्या मुलीचे वागणे थोडे बदलले आहे हे हि त्यांना पटले.
याच क्लास मधे एक जपानी-रशियन मुलगी आहे. रंग जपानीच आहे पण चेहर्‍याची ठेवण थोडी वेगळी आहे. तर तिच्याही बाबतीत असाच वेगळेपणा करतात मुलं. अशा वेळी टिचर मुलांशी बोलतात किंवा अशी भांडणे सोडवायचा प्रयत्न करतात. पण अजुन कसे समजावे याबद्दल या २० मुलांच्या क्लासचे ४ टिचर मिळुन मिटींग घेऊन उपाय शोधणार आहेत. बहुतेक त्यांनी आतापर्यंत हे लाईटली घेतले होते. आता मी सांगितल्यावर ते जास्त सिरियसली घेतील अशी अपेक्षा आहे. मी त्यांना अशा विषयावरची मुलांची पुस्तके शोधुन ती वाचुन दाखवायला सांगितले. त्याशिवाय ते जे काही उपाय करतील त्यात मी त्यांना मदत करेनच.
टिचरने काही दिवस थांबुन बघायला सांगितले आहे. काहीच बदल वाटला नाही तर पुन्हा बोलुन अजुन काही करता येते का ते बघायचे असे म्हणाल्या.

हो स्वाती. आता ऑगस्ट पर्यंत उन्हाळी सुट्ट्या आहेत शाळांना. त्यामुळे तो पर्यंत डेकेअर मधे बघावे लागेल. फक्त सिच्युएशन आणखी बिघडत नाही याकडे लक्ष ठेवणार आहे.
आपल्या इथेही रंग-रुप, जात, धर्म, आर्थिक किंवा बौधिक स्तर वगैरे बर्‍याच कारणांमुळे एकटे पडायची वेळ मुलावर येऊ शकते.>> अनुमोदन.

अकु,
छान खेळ आहे नक्कीच खेळुन बघते. Happy एरवी सुद्धा राग मॅनेज करायला चांगला उपाय आहे.

जाईजुई, मुलं नविन शाळेत, नविन जागेत अ‍ॅडजस्ट व्हायला वेळ लावतात कधी कधी. म्हणुन काळजी करु नकोस. हि शाळा कशी छान आहे इंटरेस्टींग आहे ते बोल. रोज काय करतात , काय खेळतात ते विचार. काही प्रॉब्लेम असेल तर बोलता बोलता ती सांगेलच. पण कधी कधी आपण 'तुला हा प्रॉब्लेम आहे का?' असं विचारलं कि मुलं त्याच प्रकारचे इमॅजिनेशन करुन काय काय गोष्टी सांगतात (खरच!). म्हणुन तीलाच बोलतं कर. आणि काळजी करु नकोस. फक्त असाही प्रॉब्लेम असु शकतो हे अ‍ॅसेप्ट कर Happy

निवांत पाटिल, हो इथे नक्कीच लिहिन मी.
<<मला वाटतं कि ज्या लोकल पालकांच्या घरात असे विषय चर्चिले जात असतील त्या मुलांच्या मनात आपल्या मुलांबद्दल 'डिस्क्रिमिनेशन' तयार होत असेल. मग त्या मुलांकडुन इतर मुलाकडे....>> अर्थात ज्या घरात पुर्ण निगेटिव्हली बोलले जाते ( हा रंग वाईट, हा धर्म वाईट इ.) त्या मुलांना नक्कीच असे वाटणार. पण ज्या घरात याबद्दल काहीच बोलले जात नाही त्या मुलही उत्सुकते पोटी असे वागतात किंवा त्यांत न्युनगंड निर्माण होतो . त्यामुळे समानते बद्दल, जसे आहोत तसेच छान असण्याबद्दल मुलांशी बोलणे फार जरुरी आहे. जगात वेगवेगळी माणसे आहेत ते त्यांना अ‍ॅसेप्ट करायला शिकवलं पाहिजे. हे आर्टिकल खरच चांगले आहे. प्लिज वाचा.
http://library.adoption.com/articles/young-children-and-racism.html

आम्ही घरी या ( वेगवेगळी माणसे) बद्दल नेहेमी बोलत असल्याने लेकीला हि जाणीव आधीच होती. पण बहुतेक सर्वसामान्य जपानी घरात वेगवेगळे देश, त्यांच्या संस्कृती याबद्दल काहिही बोलले जात नाही. हा सगळ्यात मोठा दोष आहे. विरोधाभास म्हणजे जपानी लोक अनेक देशात फिरतात पण बहुतेक फॅमिलीवाले लोक फिरत नसावेत. स्वाती म्हणुनच तुलाही तो अनुभव आला असावा .

घरातील मोठे लोकं जसं बोलतील,वागतील त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव लहान मुलांवर पडून तेही तसच वागायला शिकतात.. मुलांआधी त्यांच्या पालकांशी ,शाळेतील टीचर्स, डे केअर सेंटर्स च्या शिक्षिका बोलल्या तर काही फरक पडेल का??
सावली.. इकडे कित्येकदा भारतीय ,चायनीज पोरं एकत्र खेळत असता ,काही भारतीय माता (नीट येत नसलेल्या..) इंग्रजीमधे जोरात ओरडून आपल्या पोरांना सूचना देतात,' या चायनीज मुलांशी खेळू नका,आपली चॉकोलेट्स फक्त भारतीय मित्रांबरोबर शेअर करा, म्हणून',, ते ऐकून मलाच इतकं एम्बरॅसिंग होतं,.. अश्या आयांना तिथल्यातिथे सुनावण्याचं कामही मी करत असते..
तुझ्या पोरीचा प्रश्नही गंभीर आहे गं.. तो सोडवायला तू तिच्या टीचरकर्वी त्या त्या पालकांशी भेटून बघ..
किंवा तुझ्या पोरीच्या वाढदिवसाच्या किंवा कोणत्याही निमित्ताने या पोरांना एकत्र येऊ दे, एकत्र खेळले,खाऊ शेअर केला तरी या वयात त्यांच्या मनातले दुराग्रह दूर होण्यास लौकर मदत होईलशी खात्री आहे.

वर्षू धन्यवाद Happy
हो कालच मी नोट केले की साधारण साडेपाच, सहा वाजता काही मुले घरा आणि डेकेअर समोरच्या पार्कमधे खेळतात. आता जमेल तेव्हा तिथेही घेउन जाणार आहे तीला. म्हणजे जरा जास्त वेळ एकत्र खेळतील.
पालकांशी डायरेक्ट बोलले तर जास्त गंभीर वळण लागायची भिती. म्हणुन जरा काही दिवस मुलांनाच समजावुन काय होतय ते बघुयात असे वाटते. पण काहीच बदल झाला नाही तर मात्र पालकांशी नक्कीच बोलेन.
<<काही भारतीय माता (नीट येत नसलेल्या..) इंग्रजीमधे जोरात ओरडून आपल्या पोरांना सूचना देतात,' या चायनीज मुलांशी खेळू नका,आपली चॉकोलेट्स फक्त भारतीय मित्रांबरोबर शेअर करा, म्हणून',>> आई गऽ. काय बायका आहेत.

Pages