पश्चिमेतला स्वर्ग

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

अमेरीकेत आल्यापासून प्रत्येक लाँग विकेंडला भटकंती सुरुच असते. सेंट लुईस तसच अटलांटा ह्या दोन्ही ठिकाणांपासून एखाद-दोन दिवसांत बघता येतील अशी ठिकाणं पहाणं साध्या विकेंडना चालू असतं आणि लाँग विकेंडना मोठ्या ट्रिप. बरेच मित्र-मैत्रिणी अमेरीकेतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेले असल्याने त्यांच्या भागातल्या नविन नविन ठिकांणाबद्दल कळत असतं आणि मग तिथे जायचे प्लॅन्स ठरतात. अमेरीकेत यायच्या आधी नायगारा आणि ग्रँड कॅनियन सोडून बाकी काही नैसर्गिक गोष्टी बघण्यासारख्या आहेत हे माहित नव्हतं. योसेमिटी आणि क्रेटर लेक ही नावं मी साधारण दिड-एक वर्षांनंतर एका मित्राचे फोटो बघताना ऐकली होती. दोन्ही ठिकाणांचे फोटो खूप मस्त होते आणि त्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणी जायचच ! असं नक्की ठरवून टाकलं होतं. पण बाकीची यशस्वी ठिकाणं बघण्यात आणि योसेमिटी /क्रेटर लेकचं हवामान, विमानाच्या तिकीटांच्या किंमती आणि सुट्ट्या ह्या सगळ्यांचा ताळमेळ घालण्यात सुमारे ३ वर्ष गेली. यंदाच्या वर्षी मेमोरीयल डे विकेंडला जोडून दोन दिवसांची सुट्टी मिळाल्याने योसेमिटी आणि क्रेटर लेकची "मच अवेटेड" ट्रीप पार पडली. स्वस्त डील मिळाल्यावर विमानाची तिकीटं काढून टाकली. बॉसला सुट्टीसाठी पटवणं आणि तिथलं प्लॅनिंग हे नंतर करायला ठेवलं. प्लॅन आखायला घेतल्यावर मात्र "रात्र थोडी आणि सोंग फार" अशी स्थिती झाली ! ज्याला विचारू तो " हे नक्क्कोच अजिबात.. तेच्च्च पहा" टाईप मतं सांगत होता. शिवाय आमच्या बरोबर अजून एक मित्र आणि मैत्रिण येणार होते त्यांना त्यांचे मित्र-मैत्रिणी असेच सल्ले देत होते. त्यामुळे रोज रात्री आमचा फोन झाला की प्लॅन बदललेला असे !! शेवटी निघायच्या आदल्या रविवारी दोन दिवस योसेमिटी, दीड दिवस क्रेटर लेक आणि शेवटचा दीड दिवस सॅन फ्रँन्सिस्को असा प्लॅन नक्की केला आणि हॉटेल्स बूक करून टाकली. हवामानाचा अंदाज रोज पहात होतो. एकडून तिकडे किंवा तिकडून इकडे येणार्‍या हवेच्या झोतांमूळे कधी स्वच्छ सूर्यप्रकाश, कधी पाऊस तर कधी बर्फ असा रोज बदलता "अंदाज" दाखवला जात होता. पण आता विमानाची तिकिटं काढली आहेत त्यामुळे काय वाट्टेल ते झालं तरी जाऊच असं ठरवून हवामानाचे अंदाज बघणं बंद करून टाकलं.
एकूण ट्रीपचा प्लॅन बघता धबधबे, लेक, समुद्र, खाडी ह्या सगळ्यांचं बर्‍याचदा दर्शन होणार होतं. Happy

बे-एरीया मधून योसेमिटीला जायला निघाल्यावर रस्त्यावर जवळच्या बागांमधून तोडून आणलेल्या ताज्या आणि अतिशय चविष्ठ चेरी आणि स्ट्रॉबेरीचे स्टॉल लागले. आम्ही लगेच गाडी तिकडे वळवून ताज्या फळांवर ताव मारला !
*
<फोटो १>

*
नंतर हे स्टॉल बर्‍याचदा दिसले. रस्त्यांवर दुतर्फा फळांच्या बागा दिसत होत्या. शाळेतल्या भूगोलाच्या पुस्तकात वाचलेला फळफळावळ पिकवणारा कॅलीफोर्निया पहायला मिळाला. एकदा तर आम्ही लंच न करता किलो-दोन किलो चेर्‍या आणि स्ट्रॉबेर्‍याच फस्त केल्या !
*
<फोटो २ >

*
हायवे १२० वर घाट सुरु होण्याच्या आधी एक सुंदर लेक लागला. खूप मोठा होता आणि अधेमधे गाड्या थांबवून फोटो काढण्याकरता जागा पण होती. ह्या लेकचं नाव मात्र कळू शकलं नाही.
*
<फोटो ३>

*
योसेमिटी नॅशनल पार्क हे अमेरिकेतल्या जुन्या नॅशनल पार्क्सपैकी एक आहे. हे दरीत वसलेलं आहे. त्यामुळे सगळ्या बाजूंनी डोंगररांगा, दाट झाडी, डोंगरावरच्या बर्फाचे पाणी वितळल्यामुळे खळाळणारे धबधबे असं नयनरम्य दृष्य वसंतात आणि उन्हाळ्यात दिसतं. दरीत असल्यामुळे थंडीतही तिथे जाता येतं पण आजुबाजूला डोंगरांवर चढाई करण्याचे रस्ते तसचं उंचावरची प्रेक्षणीय स्थळं पहाता येतं नाहीत.
*
<फोटो ४>

*
पार्कमध्ये शिरता शिरता ब्रायडलवेल धबधबा लक्ष वेधून घेतो. ह्या धबधब्याच्या अगदी जवळ जाता येतं. पाणी बर्फाचं असल्याने भयंकर गार होतं तरीही कुडकूडत आम्ही तिथे जाऊन आलोच ! जवळजवळ पूर्ण भिजलो आणि एखादी चहाची टपरी जवळपास हवी होती अशी तीव्र जाणिव झाली.
*
<फोटो ५ >

*
पार्कमध्ये पुढे गेल्यावर एक झुलता पूल लागतो. त्याच्या आसपास खूप मोठं हिरवळ असलेलं मैदान आहे. अनेक लोक तिथे खेळत, वाचत, चित्र/फोटो काढत, ग्रील वरच्या गरमागरम पदार्थांवर ताव मारत किंवा नुसतेच उन्हं खात बसले होते. इथूनच योसेमिटी धबधब्याच्या वरच्या भागाचे दर्शन झाले.
*
<फोटो ६ >

*
आम्हीही जरावेळ टाईमपास करून मग पुढे निघालो. हा रस्ता पुढे पार्कच्या मुख्य भागात म्हणजे योसेमिटी वॅलीत जाऊन पोहोचतो. या पार्कमध्ये आत फिरण्यासाठी बस आहेत, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी वाहनांची गर्दी होत नाही. मध्यभागी असलेल्या वाहनतळावर गाडी ठेऊन बसने आरामात फिरता येतं. आम्हीही गाडी तिथे ठेऊन योसेमिटी धबधब्यापाशी जाणारी बस पकडली. ह्या धबधब्याच्या वरच्या भागात जाता येतं किंवा खालचा अर्धाभाग पाहून परतता येतं. वरचा अर्धा भाग पार करणं खूप अवघड आहे असं तिथे लिहिलेलं होतं तसच सूर्यास्त होईपर्यंत आम्ही तिथून परतू शकलो नसतो त्यामुळे आम्ही खालच्याच सुमारे ३ मैलांच्या ट्रेलवर गेलो.
*
<फोटो ७>

*
तिथून परतेपर्यंत थंडी चांगलीच वाढली होती आणि अंधारही पडायला लागला होता. त्यामुळे मग गाडी घेऊन करी व्हिलेजमध्ये जिथे आम्ही एक तंबू भाड्याने घेतला होता, तिथे जायला निघालो. हा तंबू फारच सोईचा होता. आतमध्ये हिटर होता. तसच झोपायला पलंगही होते. बाहेर अस्वलांपासून अन्नपदार्थ लपवून ठेवण्यासाठी पेट्या पण होत्या. इथली अस्वलं खाण्याचा वास आला तर गाड्यांची दारंही तोडतात. त्यामुळे खाद्यपदार्थ तसेच वास येणार्‍या कुठल्याही गोष्टी ह्या पेटीच ठेवणं बंधनकारक आहे.
* <फोटो ८ >

*
इथल्या बर्‍याच नॅशनल पार्क्समध्ये सरकारच्या नॅशनल पार्क सर्व्हिसेस तर्फेच खाण्यापिण्याची तसेच रहाण्याची सोय केलेली असते. त्यामुळे अतिशय चांगली सोय वाजवी दरात उपलब्ध असते. अश्याच रेस्टॉरंटमध्ये पोटपूजा करून आम्ही मिरर लेकच्या दिशेने प्रयाण केले. जाता जाता सहज तिथल्या ऑफिसमध्ये चौकशी केल्यावर कळले की गेले काही महिने बर्फामुळे बंद असलेला ग्लेशियर पॉईंटचा रस्ता त्या दिवशी दुपारी बारा वाजता उघडणार होता ! आम्ही आमच्या पुढच्या प्लॅनमध्ये लगेच बदल केले कारण ग्लेशियर पॉईंट अजिबात चुकवायचा नव्हता. मिरर लेक नावाप्रमाणेच आरसा आहे. नितळ पाण्यात आजुबाजूच्या दृष्याचे सुंदर प्रतिबिंब पडतं.
*<फोटो ९ >

*
मिरर लेक हून परत येईपर्यंत ग्लेशियर पॉईंट उघडायची वेळ झाली. लगोलग आम्ही गाडी तिकडे वळवली. ग्लेशियर पॉईंट हा डोंगरमाथ्यावर आहे आणि त्यामुळे तिथून योसेमिटी व्हॅलीचं सुंदर दृष्य दिसतं. जसजसे वर जात होतो तसा आजुबाजूला साठलेला बर्फ दिसायला लागला. रस्त्यावरून गाड्या जाता याव्या म्हणून रस्ता तेव्ह्डा साफ केलेला होता. मध्ये एकेठिकाणी खूप मोठा बोगदा आहे आणि ह्या बोगद्याच्या सुरुवातीला गाड्या थांबवून फोटो काढता येतात. आपण साधारण डोंगराच्या मध्यापर्यंत आलेलो असतो.
ग्लेशियर पाँईटहून दिरणारं दृष्य हे योसेमिटीमधल्या सौंदर्याची परमावधी म्हणायला हरकत नाही ! आजुबाजूचे राकट पहाड, मुळात भली मोठी असलेल्या पण वरून नाजूक दिसणार्‍या झाडांनी भरलेली दरी, खळाळते धबधबे आणि अजिंक्य दिसणारा हाफ डोम असं हे सगळच फार सुंदर दिसतं ! आम्ही तर १० मिनीटे काही न बोलता नुसते बघतच बसलो.
*
<फोटो १० >

*
वरून दिसणारा पार्कचा परिसर
*
<फोटो ११>

*
ग्लेशियर पॉईंटहून हाफ-डोम ही सुरेख दिसतो. हा डोंगर एकाबाजूने सरळसोट उभा आहे तर दुसर्‍याबाजूने डोमच्या आकाराचा आहे. ह्यावर चढाईपण करता येते.
*
<फोटो १२ >

*

हा एक पॅनोरमाचा प्रयत्न
*
<फोटो १३>

*

हे सगळं दृष्य डोळ्यांत आणि कॅमेर्‍यात साठवून आम्ही मॉरीपोसाला जायला निघालो. मॉरीपोसाला पृथ्वीवरचे सगळ्यात मोठे सजिव अर्थात जायंट सेक्वा ट्री आहेत. तिथे उन्मळून पडलेल्या झाडाच्या मुळावरूनच आकाराची कल्पना येईल.
*
<फोटो १४ >

*
हे ग्रिझली जायंट. ह्याची उंची सुमारे ६३ मिटर आणि घेर ८ मिटर आहे. ह्याच्या अतिभव्यतेपुढे काय बोलावं सुचतच नाही !
*
<फोटो १५ >

*
पुढे कॅलिफोर्निया जायंट लागतो. ह्याचं चित्रही भूगोलाच्या पुस्तकात पाहिलं असेल. ह्या झाडाच्या बुंध्याला भलं मोठं भोक पाडून पूर्वी ह्यातून गाड्या जात असत. आता हे भोक हळूहळू (म्हणजे फारच हळू) बुजतय. अश्याप्रकारचा प्रयत्न केलेलं हे एकमेव झाड आता जिवंत आहे.
*
<फोटो १६ >

*
मागे यलोस्टोन नॅशनल पार्कला जाऊन आलेलो असल्याने योसेमिटी आणि येलोस्टोनची सारखी तुलना होतं होती. योसेमिटी नक्कीच जास्त सुंदर आहे पण मानवी वस्तीपासून जवळ असल्याने तसेच पर्यंटकांची खूप गर्दी असल्याने हे सौंदर्य हरवणार नाही ना अशी कुठेतरी भिती वाटून गेली !
योसेमिटी बघून झाल्यावर आम्ही बे-एरीयात परतून क्रेटर लेकच्या दिशेने प्रयाण केलं. क्रेटर लेक हा कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला असलेया ऑरेगन राज्यात येतो. गेल्यावेळच्या ट्रीपमध्ये ऑरेगन कोस्ट मला फार म्हणजे फारच आवडला होता ! बे-एरीयाच्या हाईपपुढे ऑरेगन हे एखाद्या फेमस हिरॉईनच्या सुंदर पण दुर्लक्षित बहीणीसारखं वाटतं (ट्युलिपच्या ब्लॉगमधून साभार ! Happy ) ऑरेगनच्या प्रेमामुळे आम्ही खरतर पोर्टलँडपर्यंत ड्राइव्ह मारायचा विचार करत होतो पण वेळेआभावी ते रद्द करावं लागलं.
क्रेटर लेक हा भुकंपामुळे तयार झालेल्या प्रचंड मोठ्या खळग्यात साठलेल्या बर्फाच्या तसेच पावसाच्या पाण्याच्या साठ्यापासून तयार झाला आहे. ह्या लेकमध्ये ना कुठले झरे, नद्या येऊन मिळतात ना लेकमधून उगम पावतात. पाण्याचा स्त्रोत फक्त पाऊस किंवा बर्फ असल्याने पाणी अतिशय शुद्ध आणि स्वच्छ आहे. बे-एरीयातून जसजसे उत्तरेला जात होतो तसं आजूबाजूचं दृष्य बदलतं होतं. आधी फळांच्या बागा, मग वाळलेलं गवत असलेली जमीन, मधेच उजाड डोंगर. माऊंट शास्ता जवळ आल्यावर झाडांची उंची वाढायला लागली आणि जरा वेळानी पाऊसही आला. दरम्यान आम्ही ऑरेगनमध्ये प्रवेश केला होता. तिथे तर थंडीही जोरदार वाढली पण ऊन मात्र होतं. आत एका विजीटर सेंटरवर विचारलं तर तिथल्या काकूंनी अगदीच उसासे सोडले. म्हणे बघा जाऊन लेक पर्यंत नशिब असेल तर मिळेल बघायला. म्हंटलं बाई बर्‍या आहेत ना ! इथे ऊन पडलय आणि बर्फाचं काय घेऊन बसल्यात.
मुख्य रस्ता सोडून आत वेळल्यावर आजुबाजूला साठलेला बर्फ दिसायला लागला.
*
<फोटो १७>

*
हळूह्ळू तो वाढायला लागला. रस्ता अगदी बर्फातून कोरून काढला होता ! विजिटर सेंटरचं वळणं आलं. मात्र तिथे काही असेल असं वाटतं नव्हतं.
*
<फोटो १८>

*

ते व्हिजिटर सेंटर पाहिल्यावर मात्र आम्ही अवाक झालो ! ह्या भागात इतका बर्फ पडतो की ती पूर्ण इमारत बर्फात गाडली जाते. ती वापरता यावी म्हणून अधेमधे त्याच्या खिडक्या आणि दारं खणून काढतात !

*
<फोटो 1९>

*
ह्या सेंटरपासून लेक पुढे साधारण ३ मैलांवर आहे. इथे फक्त २ महिने बर्फ नसतो. तेव्हड्यावेळात लेकच्या कडेने गाडी नेता येते तसच पाण्यापर्यंत जाता येतं. आम्ही व्ह्यू पॉईंटपाशी पोचलो तर तिथेही रस्त्याच्या बाजूला सुमारे १५ फुट उंचीचे बर्फाचे ढिगारे होते. त्यावर चढून गेल्यावर पाण्याचं पहिलं दर्शन झालं.
*
<फोटो २०>

*
हळूहळू त्याच्या प्रचंड आकाराचा अंदाज येत गेला. लेकच्या एका कोपर्‍यात एक बेट आहे.
*
<फोटो २१>

*
मध्येच एकदम ढगबाजूला झाले आणि प्रखर सुर्यप्रकाश पडला. पाणी गडद निळ्या रंगाचं दिसायला लागलं, जसं काही तिथे शाईची दौतच उपडी केली आहे !
*
<फोटो २२>

*

सगळ्या बाजूंनी बर्फाच्छादीत डोंगर आणि झाडं, शार निळं पाणी आणि चकाकणारा सूर्यप्रकाश अश्या त्या दृष्याचं वर्णन करणच शक्य नाही ! ते आम्ही अक्षरशः डोळे भरभरून बघितलं. जरा वेळाने फोटो काढले. हा एक पॅनोरमाचा प्रयत्न :
*
<फोटो २३>

*
परत हळूहळू ढगांची छाया पडायला लागली. एका बाजूला थोडा सूर्यप्रकाश होता.
*
<फोटो २४>

*
तर दुसर्‍या बाजूने अचानक बर्फवृष्टी सुरु झाली. बर्फ हळूहळू सरकत होता आणि लेकचा तो तो भाग दिसेनासा होत होता.
*
< फोटो २५ >

*
बर्फात उभं रहाणं अशक्य झाल्यावर आम्ही अखेर गाडीत बसलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो ! ह्या दोन्ही ठिकाणी निसर्गाची अनेक रुपं आणि वर्णनातीत सौंदर्य पाहिलं. बर्‍याच दिवसांपासूनची योसेमिटी आणि क्रेटर लेक पहायची इच्छा पूर्ण झाली.
आता अजून एक इछा होते आहे ती म्हणजे रिटायरमेंट घेतल्यानंतर यलोस्टोन, योसेमिटी किंवा क्रेटरलेक च्या विजिटर सेंटरवर "हाऊ मे आय हेल्प यू?" वाल्यांचं काम करायचं म्हणजे सगळ्या ऋतूंमध्ये ह्या गोष्टी पहाता येतील. बघूया हे पूर्ण होतय का... Happy

----------------------------------------------------------------------------------------------------------------
माहितीसाठी काही लिंक्स :
नॅशनल पार्क सर्व्हिसेसच्या वेबसाईट वर सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे. रस्त्यांची सध्याची स्थिती, हवामान तसच सद्यस्थिती दाखवणारे कॅमेरे ह्याचा खूप उपयोग होतो.
१. योसेमिटी : http://www.nps.gov/yose/index.htm
२. क्रेटर लेक : http://www.nps.gov/crla/index.htm

ह्या शिवाय योसेमिटीचं प्लॅनिंग करण्यासाठी मला खालचा ब्लॉग खूप उपयोगी पडला.
http://www.yosemitefun.com/images/yosemite_park.htm

विषय: 

मस्त रे पराग, पश्चिमेतल्या स्वर्गाची ट्रिप आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद Happy

फक्त ते तुम्ही विमानाचं बूकिंग करून गाडीने कसे काय फिरलात तेवढं जरा कळलं नाही Uhoh
Proud

वा काय अप्रतिम ठिकाणं आहेत!
सुंदरच. कधीतरी जाता यायला हवे तिथे.
मंजूडी अगं एअरपोर्टवरून मग गाडी भाड्याने घेऊन जाता येते त्यामुळे हे तसे गेले असण्याची शक्यता आहे.

एकूणएक फोटो सुंदर आणि सुरेख वर्णन केलं आहेस आदमा! लेक क्रेटरचे सगळेच फोटो आणि ग्लेशियर पॉईन्टचे फार आवडले. धन्यवाद!

सावली, अगं ते अध्याहृतच आहे. पण लेख परीपूर्ण होण्यासाठी ती माहिती (nearest airport) हवी असं मला वाटते. बरेच लोकं अशा लेखांचा पर्यटन आखणीसाठी गाईड म्हणून उपयोग करतात.

सुंदर फोटो. असे फोटो बघितले कि आणखी बघावेसे वाटतातच. मागे मला वाटतं, लालूने पण या भागातले फोटो टाकले होते.

योसेमाइट आमचे फेवरेट ठिकाण. प्रत्येक सीझन ला तिथे गेलोय बे एरियात असताना. अनेक वेळा करी व्हिलेज अन हाउस किपिंग टेन्ट्स मधे राहिलोय. फारच सुंदर जागा आहे ती. त्या पांढर्‍या ग्रॅनाइट पहाडांचं सौंदर्य पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात , मावळतीच्या केशरी उन्हात वेग वेगळे (आणि अप्रतिम) दिसतं.

डोमवर नाही चाढलात ? You missed something Sir.

मॉरीपोसाला पृथ्वीवरचे सगळ्यात मोठे सजिव अर्थात जायंट सेक्वा ट्री आहेत.>> sequio park वाले पण असेच सांगतात. काहिही असो दोन्ही जागा महान आहेत. आपण किती नगण्या आहोत ह्याची जाणीव करून देणार्‍या जागा.

धन्यवाद सगळ्यांना. Happy

मंजू, सावली म्हणते तसचे ते.. इथून विमान, तिथून गाडी. प्लॅनिंगच्या दृष्टीने माहिती तसेच लिंका देऊन अपडेट करतो वर...
मै.. खरय.. बे-एरियात रहाणारे अगदी प्रत्येक सिझनला प्रत्येक महिन्यात जाऊ शकतील तिथे ! त्या रंगाचे फोटो काढायचा प्रयत्न केला. पण ते नीट येत नव्हते. त्यामुळे सोडून दिलं आणि फक्त अनुभवले !

हिम्या.. हो. प्रविणपांनी ह्याबद्दलच लिहिलं होतं..

आपण किती नगण्या आहोत ह्याची जाणीव करून देणार्‍या जागा. >>> असाम्या अगदी अगदी ! अरे डोमवर चढायला वेळ नव्हता. पुढच्यावेळी Happy

मस्त! कित्ती सुंदर फोटू आहेत!
ग्रँड टीटन नॅशनल पार्क पण सुंदर आहे. येलोस्टोनबरोबर आम्ही तेथून फेरी मारून आलेलो.
विझिटर सेंटरमध्ये काम करण्याचे आय्ड्या भारी Happy

वा. मस्त लिहिलय. फोटो पण मस्त. क्रेटरलेक चे फोटो पाहून अस वाटल कि कितीही लिहिल, फोटो काढले तरी तिथला प्रत्यक्ष अनुभव वर्णन करण्याच्या पलिकडे अदभुत असणार आहे.

सुरेख आहेत फोटो. जुने दिवस आठवले. एखाद्या समरमध्ये कॅलगिरीला जरूर जाऊन या. आवडेल तुम्हाला.

आमच्याकडे आलेल्या एक पाहुण्या योसेमिटीला "यशोमती" म्हणतात. बर्‍याचवेळ त्या कशाबद्दल बोलतायत ते समजत नव्हतं.

Pages