जलदुर्ग २ - कांसा बेटावरचा पद्मदुर्ग..

Submitted by हेम on 24 May, 2011 - 10:29

२- ३ वर्षांपूर्वी कुठल्यातरी ट्रेकवेळी विनयने खटकी पडल्यागत एक भन्नाट ऑफर दिली. मोजक्या मंडळींना घेऊन सहसा न होणारे सागरी किल्ले करायचे आहेत. खांदेरी-उंदेरी, पद्मदुर्ग उर्फ कांसा आणि सुवर्णदुर्ग. या सर्व किल्ल्यांवर जाण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट जमवावी लागणार होती ती म्हणजे स्थानिक नावाड्यांशी संपर्क नि परवानगी. हे काम विनयने इतर सोबत्यांच्या मदतीने उत्तमपैकी हाताळलं. इतर किल्ल्यांप्रमाणे हे किल्ले सहजपणे होणारे नव्हेत त्यामुळे कितीही महत्त्वाची कामे असली तरी ती बाजूला सारायला हवी होती. सगळ्यांच्या सोयीसाठी पद्मदुर्गाच्या तारखा ३-४ वेळा बदलल्या तरी शेवटी तारीख पक्की ठरली ती माझ्यासाठी अत्यंत गैरसोयीची निघाली, ....:अओ:, कारण ट्रेकच्या दुसर्‍या दिवशी चुलतभावाचं लग्न कोल्हापूरला होतं. मजबरोबर बायको नि मुलेही !!. टांगारुपणा करण्यासाठी यापेक्षा आणखी सोयीचं कारण कांय हवं होतं!! ...पण पद्मदुर्ग या चुंबकाने घट्ट धरून ठेवलं होतं.

वडील लगीनघाईमुळे कोल्हापुरातच होते, त्यांना फोन करुन सांगितलं की मी आदल्या दिवशीच्या कार्यक्रमाला हजर राहू शकणार नाही. त्यांनी कारण विचारण्याआधीच फोन कट झाला. बाबांपासून मला वाचवण्याची सगळी जबाबदारी बायकोवर आली. तिला आधीच शरण गेलो होतो. माझा नेहमीचा डोंगरसोबती चिन्मय त्यावेळी डोंबिवलीतच होता आणि तोही पद्मदुर्गला येणार होता. मी ट्रेकच्या आदल्या दिवशी सगळा कबिला घेऊन त्याच्याकडे गेलो. २ ट्रेकरांच्या बायका एकत्र आल्यावर अत्यंत धोकादायक वातावरण निर्माण होतं. प्रत्येक शब्द जपून वापरावा आणि निमूट ऐकावा लागतो. चिन्मयने माझं दुसर्‍या दिवशी ट्रेक आटोपल्यानंतर, कोल्हापुरसाठी रात्रीच्या खाजगी बसचं आरक्षण करून ठेवलं होतं, त्यामुळे लग्नालाही कोल्हापुरात पहाटे मी हजर असणार होतो. हुश्श्श!!!
रात्रीचं जेवण आटोपून दोघेही ठरल्या वेळी+ ठिकाणी गेलो. रात्रीचा प्रवास करून पहाटे राजपुरीला पोहोचलो. तिथे एक मोठं बालगणेशाचं मंदिर आहे. जवळच एक भैरोबाचंही देऊळ आहे, तिथेच थोड्या वेळासाठी पथार्‍या पसरल्या.

फटफटल्यावर आमच्या नावाड्याच्या, गोपाळच्या घरी गेलो. तिथे प्रत्येकाच्या पोतडीतून निघालेले च्यॅवम्याव हादडले.

ज्यांच्यामुळे पद्मदुर्गाची सफर आम्हांला घडली ते हे २ प्रमुख म्होरके... विनय कुलकर्णी - राजन महाजन. राजनची आणि टोमू उर्फ संदिपची या लेखासाठी मला मोठी मदत झाली.

बर्‍याच वेळाने घरातून चहा आला. उशीर होत होता तसतशी चुळबुळ वाढत होती. चहा घेऊन जेटीकडे निघालो.

वाटेत कॅमेर्‍याचीही चुळबुळ वाढली होती

डावीकडे बलदंड जंजिरा डोकावत होता.

राजपुरीच्या धक्क्यावर गोपाळची बोट उभी होतीच. जंजिर्‍याला जाणार्‍या पर्यटकांचीही लगबग सुरु होती.

गोपाळची ३ मुलं आणि त्यांचे २ मित्रही मदतीसाठी सोबत येणार होते. धक्क्यावरून बोट निघेपर्यंत ८ वाजले होते. समोर बलदंड जंजिर्‍याचं प्रवेशद्वार, त्याचे बुरुज, तटातून डोकावणार्‍या तोफांची तोंडे कॅमेर्‍याला कामाला लावत होती.

एका वेगळ्या कोनातून आज जंजिरा पहायला मिळत होता. सिद्दींचा हा अभेद्य नि बलाढ्य जलदुर्ग शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. या दुर्गावर व सिद्दींच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी इ.स. १६७५ मध्ये शिवाजी महाराजांनी मुरुड्च्या समोर खोल समुद्रात असलेल्या कांसा बेटावर पद्मदुर्गाचं बांधकाम करण्याची जबाबदारी दर्यासारंग व दौलतखानावर सोपवली. रसद पुरवण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या सुभेदारांनी आपल्या कामांत कसूर केल्याचे महाराजांना समजताच संतप्त महाराजांनी १८ जानेवारी १६७५ रोजी लिहिलेले पत्र प्रसिद्ध आहे. त्यांत महाराज म्हणतात,
' पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली आहे, त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान पावावे, ते होत नाही. पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करत असतील आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल. न कळे की हबशीयांनी काही देऊन आपले चाकर तुम्हांस केले असतील. त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल. तरी ऐशा चाकरांस ठाकेठिक केले पाहिजेत. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करु पाहतो. या उपरि बोभाट आलिया उपरि तुमचा मुलाहिजा करणार नाही...ताकीद असे.'
सिद्दीशी संघर्ष करतच या दुर्गाची उभारणी झाली. पद्मदुर्गाशी संबंधित दुसरा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे, ऑगस्ट १६७६ मध्ये मोरोपंतांनी पद्मदुर्गावर आरमारी चाकरी करणार्‍या सोनकोळ्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला, त्यावेळी सोनकोळ्यांचा म्होरक्या लाय पाटील यांना 'जंजिरेयासी शिड्या तुम्ही लाऊन याव्या. आम्ही हजार धारकरी तयार केले आहेत' असे सांगितले. पंतांच्या सांगण्यानुसार लाय पाटलांनी आपली जबाबदारी पार पाडली. रात्र संपत आली तरी पंतांचे धारकरी आलेच नाहीत. शिड्या परत काढून घेऊन लाय पाटील पद्मदुर्गावर परत आले. नंतर ओशाळलेले पंत त्यांना म्हणाले,' आम्हापासून कोताई जाली. धारकरीयांनी माघार घेतली. आम्हापासोन अंतर पडले हे खरे..'. मोरोपंतांनी लाय पाटलांना रायगडावर नेले व सगळी हकिगत महाराजांच्या कानावर घातली. महाराज म्हणाले,' यांनी ऐसे कार्य केले असता तुम्ही कोताई केलीत्..कार्य राहून गेले..' या लाय पाटलांचा महाराजांनी पालखी देऊन सत्कार केला पण लाय पाटलांनी पालखी नम्रतापूर्वक नाकारली. महाराजांनी पेशव्यांना आज्ञा केली,' गलबत बांधोन त्या गलबताचे नांव पालकी ठेऊन लाय पाटील यांचे स्वाधीन करणे'. संभाजीराजांच्या काळातही पद्मदुर्ग मराठ्यांकडे होता. सिद्दीने तो नंतर जिंकून घेतला, तो शेवटपर्यंत त्याच्याकडेच राहिला.
इतिहासाची उजळणी करण्याच्या नादांत सुरुवातीस लांबवर दिसणारा पद्मदुर्ग आता हळूहळू जवळ येऊ लागला.

या दुर्गाजवळ बोट लावण्यासाठी धक्का किंवा एखादी बरीशी जागाही नसल्यामुळे गोपाळने बोट कौशल्याने ज्या ठिकाणी दोन खडकांमध्ये उभी केली तिथे लाटांमुळे तीचा एकदम भरात हलेडुले नाच सुरु होता. कसरत करतच गोपाळ आणि सहकार्‍यांच्या मदतीने सगळे कसेबसे त्या निसरड्या खडकांवर पायउतार झाले.

जवळच पद्मदुर्गाचा पूर्वेचा दरवाजा आमच्या स्वागताला उभा होता.

ढोबळपणे पूर्वेच्या दरवाजापासून दुर्गाच्या बांधकामाचे ३ भाग पडतात. मुख्य किल्ला- पडकोट आणि भिंतीचे अवशेष. दुर्गाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या बाहेरील भिंती आणि पुढेही काही ठिकाणी तटातले दगड समुद्राच्या पाण्याच्या शेकडो वर्षांच्या मार्‍याने झिजलेत पण त्या दगडांना जोडणारे चुन्याचे मिश्रण आजही तसेच टिकून आहे.

मुख्य किल्ल्याला वळसा मारून आम्ही प्रथम पडकोटाकडे मोर्चा वळवला. मुख्य किल्ला व पडकोट यांमध्ये एक छोटीशी पुळण आहे. इथे शंख शिंपल्यांच्या तुकड्यांचा खच पडलेला होता. पडकोटाचं मुख्य आकर्षण म्हणजे कमलदलाच्या आकाराचा बुरुज..!!

आपटेकाकांनी या किल्ल्यासंबंधीचा इतिहास व इतर माहिती सांगितली.

पाटी लिहावी ती पुणेकरांनी तर पाठीवर कांयबाय लिहावं ते म्हमईकरांनी...

मी सुरुवातीला पद्मदुर्गाला चुंबक म्हणालो, त्याचा प्रत्यय इथे फिरतांनाही येत होता. थोडक्या वेळात कांय कांय पाहू असं झालं होतं!!

पडकोटातील तटांत शौचालयही आढळले.

याशिवाय कबर, पाण्याचं कोरडं टाकं, कोठाराचे अवशेष दिसतात.

इथून जंजिर्‍याकडे पहातांना अंगात एक वेगळीच खुन्नस चढत होती, कारण आजही पद्मदुर्ग हा पडीक अवस्थेत असला तरी आपल्या राजाचा किल्ला आहे ही भावना मनांत पक्की होती. आपल्या अपयशाचा इतिहास वाकुल्या दाखवित सांगणारा जंजिरा शासनदरबारी प्रमुख पर्यटनस्थळ... मान्य करतो की जंजिरा हा इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा दुर्ग आणि साहजिकच पर्यटकही मोठ्या प्रमाणात येणार..! ..पण म्हणून जंजिर्‍यापासून मैलभर अंतरावर असलेला, शिवरायांची आरमारी दूरदृष्टी नि लाय पाटलांची मर्दुमकी अभिमानानं मिरवणारा माझ्या राजाचा पद्मदुर्ग दुर्लक्षित...स्थानिकांच्या पार्ट्यांसाठी???? योग्य परवानगीने, स्थानिकांनी आणि शासनाने मनावर घेऊन पद्मदुर्गाची सफर आणि त्याचे महत्त्व लोकांपुढे आणायलाच हवं.

तटावरील चर्यांचा आकारही कमळाच्या पाकळ्यांचा आहे. या दुर्गाचं आढळलेलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुर्गात विपूल असलेल्या तोफा. जवळपास पन्नासेकतरी तोफा आमच्या दृष्टीस पडल्या. बुजलेल्या अवस्थेतही आणखी काही असतीलही. त्याचप्रमाणे, दुर्गावर दिसलेल्या दारुच्या बाटल्या, पेपरडिशेस व बाकी कचरा या ठिकाणी स्थानिकांच्या पार्ट्या होत असणार हेच दर्शवत होता. पडकोटाच्या बाजूला खडकाळ भागानंतर भिंतीचं मोठं बांधकाम आहे. त्या भिंतीवर चढल्यावर तिथून पद्मदुर्गाचा एक वेगळा अँगल मिळेल म्हणून मी व किरण दोघांनीही वर चढून काही फोटो मिळवले.

आता मुख्य किल्ला बघायचा राहिला होता. मुख्य किल्ल्यांत तटाला लागून रो हाऊसप्रमाणे एकाला एक लागून ८ पडीक खोल्यांचे अवशेष आहेत.

अलिकडच्या काळांत कस्टमच्या लोकांसाठी बांधलेल्या सिमेंटच्या खोल्यांचेही अवशेष त्याचप्रमाणे त्यांच्या वापरासाठी बांधलेली पाण्याची टाकीही आहेत.

तटावर चढायला पायर्‍या बांधल्या आहेत.

तटामध्ये बांधलेल्या जुन्या खोल्यांचं बांधकामही पहाण्यासारखं आहे.

गोपाळने आता बोट आधीच्या जागेवर न आणता मधल्या पुळणीच्या ठिकाणी आणली.

जाता जाता कमळाकार बुरुजाचा फोटो घ्यायला एक भारी जागा दिसली. पळत जाऊन बुरुजाचा फोटो घेतला.

समुद्रातल्या या राजांच्या पद्मशिल्पाला नमस्कार करून निघालो तोवर १० वाजले होते. येतांना विनयने आणखी एक बोनस दिला. जंजिर्‍याच्या मागच्या बाजूला प्रदक्षिणा घालून नेण्याची विनंती गोपाळला केल्यावर त्यानेही बोट तिकडे वळवली. गोपाळमुळे जंजिर्‍याचा दर्या दरवाजा आम्हांला दर्यातून पाहायला मिळाला.

राजपुरी कोळीवाड्यावर परत आल्यावर बोट धक्क्याला लावतांना लाटांमुळे नुसती लवलवत होती. गोपाळबरोबर असलेल्या मुलांना हा आटापिटा थोडा कठीणच जात होता. तो ओरडला-'.. नुसतेच पगार घेतात येड **.... काम नको करायला रांडेच्यांना...!!' गंमत म्हणजे त्यांत त्याचीही ३ मुले होती. गोपाळ नि राजपुरीचा निरोप घेऊन आम्ही ११ वाजता निघालो. आता लक्ष्य सामराजगड...!! (क्रमशः...)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.. पद्मदुर्ग अजूनही करायचा बाकी आहेच... जायचे नक्की होईल तेंव्हा गोपाळचा संपर्क नक्की घेईन तुझ्याकडून..

तटामधील शौचकूप हे राजांच्या गडांचे वैशिष्ट... Happy

ण म्हणून जंजिर्‍यापासून मैलभर अंतरावर असलेला, शिवरायांची आरमारी दूरदृष्टी नि लाय पाटलांची मर्दुमकी अभिमानानं मिरवणारा माझ्या राजाचा पद्मदुर्ग दुर्लक्षित...स्थानिकांच्या पार्ट्यांसाठी???? योग्य परवानगीने, स्थानिकांनी आणि शासनाने मनावर घेऊन पद्मदुर्गाची सफर आणि त्याचे महत्त्व लोकांपुढे आणायलाच हवं.
१००००००००००० टक्के अनुमोदन

मला पण गोपाळचा संपर्क देऊन ठेव रे..च्यायला माझा खांदेरी-उंदेरी आणि कासा राहीलाय करायचा. हे फोटो पाहून तर जाम इच्छा बळावलीये

मी पण ह्या भारत भेटीत जंजिरा ला भेट दिली. अगदी जन्म भर लक्शात राहील असा तो बोटी चा अनुभव होता. आधी मोटर बोट ने नेतात आणी मोटर बोट जास्तं जवळ जाऊ शकतं नसल्याने एका लहान बोटीत
transfer करतात. त्या बोटीतला waiting period अगदी जीव घेणा होता. बोट सारखी हलत असते. प्रचंड गर्दी, वरुन ऊन, आणी उतरताना तर फारच हाल होतात. ते नावाडी तर तुम्हाला विचार करायला ही वेळ देत नाहीत, सरळ उचलून बोट मधून काढतात आणी ठेवतात. ज्यांना motion sickness चा त्रास आहे त्यान्ची हालत तर फार खराब होते.

दुसर्या दिवशी आम्ही हरिहरेश्वर ला गेलो. तिथे कन्गना राणावत पण आली होती. तिच्या भोवती अज्जिबात गर्दी वगेरे काही नव्हती, अगदी सिम्पल पिन्क सलवार कुर्ता घातला होता. माझ्या बरोबरच्या मुलीना ती माहिति नस्ल्याने मलाच एक्स्प्लेन करुन सान्गावे लागले.

मस्तच रे हेम्..मस्त वर्णन आणी फोटो..

च्यायला माझा खांदेरी-उंदेरी आणि कासा राहीलाय करायचा>>>> माझा खांदेरी - उंदेरी झालाय पण पद्मदुर्ग मात्र राहीलाय... जेव्हा जमत असेल तेव्हा तुला संपर्क करीन

मला हे वर्णन वाचुन अगदी भरून आलय. मुरूड माझे गाव्...कासा किल्ला कायम किनार्‍यावर उभं राहूनच पाहिलाय.माझ्या ओळखीतलं कोणीच तिथे जाऊन आलं नाहीय. धन्स. खुप बरं वाटलं पद्मदुर्गाबद्दल वाचून.

सुंदर वर्णन. या गडाचे केवळ दुरुनच दर्शन झाले होते. २५ वर्षांपूर्वी मुरुड गावात फारशी ये जा नसायची. त्यावेळी आमच्या परिचितांनी अगदी निक्षून सांगितले होते, कि पद्मदूर्गावर पडावाने जाणे अशक्यच आहे. म्हणून आग्रह धरला नव्हता. पण आता नीट धक्का वगैरे बांधला तर लोक जाऊ शकतील. राजांचा एक प्रयत्न म्हणून का होईना, तो आपल्यासाठी अभिमानाचाच विषय आहे.

सगळ्या प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद...
यो - 'पक्क्या, आशू.. गोपाळा गोपाळा' .... 'जाल तेव्हा खरं..!' असा अर्थ घ्यायचा कांय?
अमि - पुढच्या भागांत आहेच मुरूडचा सामराजगड.. आलोच घेऊन!!
निराली - शिडाच्या बोटी जातात पायर्‍यांपर्यंत..

ज्या लाय पाटलाचा उल्लेख ह्या लेखात आला आहे त्याचा शिवाजी राजाने यथोचित सत्कार केला होता.

श्रीमान योगी मध्ये देसाई म्हणतात..

शिवाजी राजांनी ह्या पराक्रमासाठी लाय पाटलाला पालखीचा मान दिला. तेंव्हा पाटील राजांना म्हणाला,'आम्ही दर्यावरची माणसे. काय करायची आम्हाला पालखी. आणि आम्ही काय पालखी घेऊन तुमच्या दर्शनाला येणार होत काय. आम्हाला नको महाराज पालखीचा मान.'

त्यावर राजांनी खुश होऊन पाटलांना 'पालखी' नावाचे गलबत बांधून देण्याची घोषणा केली... Happy

पद्मदुर्ग बांधणीचे काम नेमके कधी सुरू झाले हे सांगू शकशील का हेम?

माझ्यामते ते काम १६६७ नंतर सुरू झाले असावे..

रोहन, महाराजांनी सुभेदार जिवाजी विनायकांस लिहिलेल्या खडसावणीच्या पत्राची तारीख १८ जाने. १६७५ आहे, ज्यावेळी दुर्गाचं बांधकाम सुरु होतं. लाय पाटलांचा प्रसंग १६७६ मधला आहे, म्हणजे त्यावेळी दुर्गबांधणी पूर्ण झाली असावी. हा सनाचा उल्लेख लेखांत आलेला आहे.

होय.. बरोबर.. माझ्याकडे जे पत्र आहे त्यात जिवाजी विनायकला समज देणारे उद्गार राजांनी १६७५ मध्ये काढलेले आहेत. तेंव्हा रसद पोचती होत होती म्हणजे गड पूर्ण झाला होता बहुदा. ते पत्र मी इथे मायबोलीवर देखील इतिहास विभागात टाकले होते.

लाय पाटलांचा प्रसंग १६७६ मधला आहे>> ह्यासाठी मला संदर्भ दे ना.... मला काहीच सापडत नव्हत..

नविन गडाची ओळख झाली. धन्यवाद.
बाकी गुग्लुन पाहिले असता हे मिळाले ते खरे आहे का?
Padmadurg is a fort in Maharashtra, India. It is also known as Kasa fort. It was built by king Sambhaji - son of the great Maratha ruler king Shivaji to northwest of the fort Janjira - built mainly to conquer the fort Janjira. Although it is not as big as Janjira but still a sea fort that can be visited upon permission by Indian Customs\Navy. It looks great from Janjira. There are no direct ferryboats to Padmadurg. Visitors have to hire a personal ferryboat. Due to incomplete construction, bombarding from Janjira during its construction, only ruins of the Padmadurg fort remain. Many parts of the fort are now inaccessible.This fort is under a seal by Indian Government as it has been claimed that the drugs were smuggled there.

मी जेव्हा मुरुड ला गेलो होतो ४/५ वर्षापूर्वी तेव्हा सांगण्यात आले कि पद्मदुर्गवर जायला कस्टमची खास परवानगी काढावी लागते. आता परवानगीची गरज नसली तर चला जायचा प्लान करायला हवा.

सुरेsssssssख!!!

मी पण घेईन गोपाळचा नं तुझ्याकडून!
दगडा, फिदीफिदी काय करतोयस? तू येणार नाहीयेस का? Proud

It was built by king Sambhaji ......

>>> ही माहिती तुला कुठून मिळाली? ही माहिती चुकीची आहे... किल्ला शिवाजी राजांच्या कारकीर्दीतच बांधला गेला. संभाजी राजांनी त्याला मजबुती नक्की आणली होती शिवाय एक सेतू ही बांधला होता. तोफा अधिक जवळ नेण्यासाठी...

किल्ला तोफांच्या प्रचंड भडिमारात मराठ्यांनी कसा बांधला असेल? तो हे इतका मजबूत की आजही दगड झिजला पण सांधा झिजत नाहीये...

हेम्.मस्तच. सुंदर वर्णन आणी फोटो..

माझा पन कासा राहीलाय करायचा>>>> खांदेरी - उंदेरी झालाय पण पद्मदुर्ग मात्र राहीलाय.

होय मनोज मी पन आहे कासा किल्ला करायला. ६ जुन ते १० जुन मी अलिबागला आहे काही तरी जुगाड करतो, किवा हेम ल संपर्क करु. रीप्लाय कर.

व्वा... जंजिरा आणि पद्मदुर्ग... सोबत लाय पाटिल... सुंदर वर्णन आणि माहिती.

जबर..
जंजिरा २-३ वेळा पाहिलाय, आणि प्रत्येक वेळी पद्मदुर्ग कसा असेल याचा विचार मनात आलेला ! आज आपण ती सफर घडवलीत.. मनःपूर्वक आभार ! Happy

नेक्स्ट टाईम, पद्मदुर्ग पाहायचा नक्कीच प्रयत्न राहिल, नक्कीच आपली गरज भासेल तेव्हा ! Happy

छान वर्णन आणि माहिती. जंजीरा केला होता तेव्हाच पद्मदुर्ग करायचं ठरत होत.. दुर्दैवाने काही अनुत्साही लोकामुळे राहून गेलं. आता कधी जमेल कुणास ठाऊक?

टिल्लू, चुकीची माहिती आहे. किल्ला शिवाजीराजांच्याच कारकिर्दीत बांधलाय. जंजिर्‍याहून तोफांचा मारा पद्मदुर्गापर्यंत पोहोचणे कठीण वाटते. दुर्गबांधणीआधी जंजिर्‍याच्या तोफा इथवर इजा पोहोचवणार नाहीत हा मुख्य मुद्दा महाराजांनीही लक्षात घेतला असेलच की..! खालून ११ व्या फोटोत अंतराची कल्पना येते. किल्ल्यावरील अवशेष भग्न पावलेत ते आपल्याच अनास्थेमुळे..!! तरीही आता जे काही आहे तेही खूप आहे असं म्हणायला हवं.

पक्क्या, संभाजीराजांनी पद्मदुर्गाला मजबूती नक्की आणली होती हा संदर्भ कुठे आहे तो मिळेल कां? कारण इंग्रजांच्या २६ डिसें. १६८९ रोजीच्या एका पत्रांत, मुंबईच्या सभोवतालचा प्रदेश आता संभाजीराजाकडून मोगलांकडे गेला आहे. या राजाकडे आता खांदेरी, कुलाबा कोट व पद्मदुर्ग इतकेच कांय ते उरले आहेत, तेही अनिश्चित परिस्थितीत सांभाळले गेले आहेत....असा उल्लेख आढळतो.
शिवाय एक सेतू ही बांधला होता. तोफा अधिक जवळ नेण्यासाठी... तो जंजिर्‍यावरील स्वारीचा भाग होता. यांत पद्मदुर्गाचा संबंध नाही. सेतू बांधण्याचे काम सुरु झाले होते पण औरंगजेब दक्षिणेत उतरल्यामुळे त्यांना अर्धवट सोडावे लागले. त्या सेतूचे अवशेष राजपुरीत आजही ओहोटीच्या वेळी आपण बघू शकतो.

Pages