बिशी बेळे हुळी अन्ना (सांबार भात)

Submitted by ठमादेवी on 16 May, 2011 - 05:21

उडप्याकडचं सांबार अनेकांचं फेव्हरिट. कर्नाटकच्या काही भागांमध्ये बिशी बेळे हुळी अन्ना किंवा बिशी बेळे अन्न हा प्रकार प्रचलित आहे. आमच्याकडे माझी आई हा भात करायची. यात भात शक्यतोवर शिळा असेल तर त्याला जास्त मजा येते. त्यामुळे आम्ही रात्री जास्तीचा भात करायचो आणि मग सकाळी धम्माल बिशी बेळे अन्न.

साहित्य-
तयार भात. (हा आपला नेहमीचा पांढरा भात)

सांबारासाठी
तूरडाळ, मसूरडाळ- साधारण १०- १५ ग्रॅम प्रत्येकी
सांबार मसाला
टोमॅटो- १
कांदा-१
भेंडी- ३ किंवा ४
थोडा लाल भोपळा
वांगं १
शेवग्याची शेंग (आवडीप्रमाणे मुळा वगैरे घालता येईल.)
चिंच
लाल- सुकी मिरची
धणे जिरे पावडर
मोहरी
हिंग,
हळद
कोथिंबीर
मिरचीपावडर

कृती : सांबार
तूरडाळ आणि मसूरडाळ कुकरला उकडून घ्यावी. कांदा उभा चिरून घ्यावा. टोमॅटो, भाज्या चिरून घ्याव्यात.
एका पातेल्यात तेलावर कांदा, टोमॅटो आणि सर्व भाज्या- वांगं, शेवग्याची शेंग, भोपळा, भेंडी एकामागोमाग एक टाकून चांगल्या परतून घ्याव्यात. त्या तेलात मुरल्या की त्यावर उकडलेली डाळ टाकावी. चांगलं उकळू द्यावं. आवश्यकतेप्रमाणे पाणी घालावं. (पाणी गरमच हवं.). शिजत आलं की त्यात चिंच. मिरचीपावडर, मीठ, धणेजिरे पावडर घालावी. सगळ्यात शेवटी आवश्यकतेप्रमाणे सांबार मसाला घालावा. मग कोथिंबीर घालावी.
दुसर्‍या एका भांड्यात तेलावर लसूण, सुकी मिरची, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद यांची फोडणी करावी. ही फोडणी वरून सांबारावर ओतावी.

मग भात फोडून तो सांबारात घालावा आणि चांगला जिरवावा. गरम गरम वाढावा. हा तुपासोबत चांगला लागतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यन्ना रास्कला, सांबार चांगलं आहे. पण हि भाषेची खिचडी मधेच कशाला. लोकहो, चांगल्या रेसिपीमधे अशी कालवाकालव नको. वेगळा बाफ काडून तिकडे काय उटा माडायचेय ते माडरा.

मल्ली.
नितीन आम्ही कन्नड मायबोलीचा प्रस्ताव अ‍ॅडमिनच्या विचारास्तव ठेवत आहोत.
तिच्यायला फुल्या फुल्या...... शेवटी महाराष्ट्रात राहुन कानडीचा जाज्वल्य अभिमान दिसतोय Light 1

मस्त!
गेल्याच आठवड्यात मैत्रीणीकडे ओरपला होता. उरलेल्या भाताचाही करता येतो हे माहित नव्हते. आता या पद्धतीने करेन.

बिशी ब्याळे अन्ना .. काही ठिकाणी एवढेच नाव आढळते. नन्गं भाळ शेरतद. ( मला खूप आवडतो.) भात अर्धवट करुन मग आमटीत शिजवणे अशीही कृती वाचल्याचे आठवते

ब्याळे म्हणजे डाळ. हे बेंदराला करत असतील बहुतेक .( म्हनूनच इतके सारे बैल जमा झाले ना? ) Proud

या भातासाठी मी भिशिभेळी मसाला मिळतो (मी MTR चा) वापरते, सांबार मसाला नाही. तसेच कढईत डाळ-भात एकत्रच घालते मी, आधी सांबार अन मग त्यात भात असे नाही. किंचित गूळ पण घालते यात.
असेही करुन पहायला हवे.

मस्त रेसिपी, घरात सगळ्यांना प्रचंड आवडतो.
साबा खुप मस्त बनवतात. मसाला भातापुरता ताजा करतात त्यामुळे जास्ती छान लागतो. (वरुन थोडस तुप घातल तर छान चव येते.
ह्या प्रकारे सुध्दा नक्की करुन बघेन.

ठमादेवी तुम्ही जो बिशी भेल भात बनवला आहे ना तो फोर्ट ला भरपूर लोक खातात उडुपी हॉटेल मध्ये मी सुधा. या भाताला तिकडे दुपारच्या जेवणात भरपूर आवक असते भाताबरोबर लोणच, पापड ते पण उडपी पद्धतीचे

याबरोबर पोटॅटो चिप्स अस्सा ढीग रचायचा भातावर अन एकत्र कालवून खा.धम्माल्ल.
बाय द वे,हा प्रकार शिळ्या भाताचा कधीच करत नाहीत.
पण हेही एक इनोव्हेशन!!!

मस्तच बिशि ब्याळे... खूप दिवस झाले खाल्ले नाही आता साग्रसंगीत रेसिपी मिळालीय तर करायलाच पाहिजे. नवरा खूश होईल.
माझे सासर कानडी असल्यामुळे हे प्रकार आता मला माहित झालेत. कालच नृसिंह जयंती होती, तो तर उत्सवच आमच्याकडे, त्यामुळे 'पायसा' बनवले होते. Happy चक्क नवर्‍याकडून कॉम्प्लिमेंट... अगदी कानडी झालीस तू, सेम मठातल्यासारखी खीर झालीय Happy

बाय द वे,हा प्रकार शिळ्या भाताचा कधीच करत नाहीत.
<<< हो, आमच्याकडे पण शिळ्या अथवा उरलेल्या भाताचा करत नाही. ताजाच बनवला जातो.

ही वरची कृती थोडी वेगळी आहे. आमच्याकडे सांबार मसाला वापरत नाहीत, वेगळा चांगला ताजा मसाला बनवतात. तूरडाळ शिजवतानाच त्यामधे एक कांदा चिरून घालायचा, आणि नंतर ती डाळ घोटून घ्यायची. डाळीमधे बीन्स, गाजर, भोपळा वगैरे भरपूर भाज्या घालायच्या. यात कढीपत्ता-शेंगदाणे-काजू- चिंच मस्ट! गूळ ऑप्शनल. मी कधीच घालत नाही, आणि मग तिखट- मसाला इ. घालून उकळी आणायची, हवे तितके पाणी घालून त्यात तांदूळ घालायचा, भात शिजला की मग त्याला वरून कर्नाटकी चरचरीत फोडणी घालायची. साधारण पळीवाढा व्हायला हवा हा भात. वरून साजुक तूप, पापड एवढे असले तरी पुरेसे आहे. प्रेशर पॅनमधे केला तर वीस मिनिटे पण लागत नाहीत. भात मसाल्यामधे शिजल्याने जास्त चविष्ट लागतो. रात्रीचा आवडता वन डीश मील आहे माझ्यासाठी.

कालच मुंबईच्या जुहू एरियातील,'दक्षिणायन'या रेस्टॉरंट मधे ट्राय केला.... ड ड डेलिशिअस!!!!!!!

अनु३, धणे, उडीद डाळ, चणा डाळ, मेथीदाणे, लाल सुक्या मिरच्या, खसखस, दालचिनी, वेलची, हिंग असं सर्व एकत्र भाजून घ्यायचं आणि त्याची मिक्सरला पूड करायची. नक्की प्रमाण मी थोड्या दिवसांत टाकेन.

भात मसाल्यातच शिजवायची कल्पना मस्तच...मी तयार भात घालते नेहमी.
नंदिनी , भात मसाल्यातच कसा शिजवायचा (पाणी किती?मसाल्याचे प्रमाण वगैरे) , जरा सविस्तर लिहिणार का प्लीज?