मुंबई राष्ट्रीय उद्यानातले ५ दिवस ...

Submitted by सेनापती... on 9 May, 2011 - 10:25

कृष्णगिरी उर्फ कान्हेरी... बोरीवली. मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग. म्हणतात की लोकल रेल-वे म्हणजे मुंबईची जीवनरेखा.. पण खरेतर हे राष्ट्रीय उद्यानच मुंबईची जीवनरेखा आहे. हे जंगल नसते तर मुंबई-ठाणे आणि आसपासच्या परिसराची प्रदूषणाची पातळी कित्ती वाढली असती ह्याचा अंदाज देखील येणार नाही. ह्या उद्यानात प्राण्यांच्या आणि माणसांच्या दृष्टीनेही उजाडायच्या आधी आणि मावळल्यानंतर प्रवेश बंद असतो. आत मध्ये राहायचा तर प्रश्नच नाही. असे असतानाही जर मी ह्या ब्लॉगपोस्टला हे नाव दिलेले पाहून तुम्हाला जरा आश्चर्याच वाटले असेल नाही???


आमचा आख्खा ग्रुप.. डाव्या कोपऱ्यात खाली बसलेले आमचे ट्रेकचे सर.. काका उर्फ विध्याधर जोशी.

पण ते खरे आहे. २००२ साली २७ ते ३१ डिसेंबर असे तब्बल ५ दिवस आम्ही ३८ जण ह्या उद्यानात रितसर परवानगी वगैरे घेऊन तळ ठोकून होतो... मुंबई युनिव्हरसिटीच्या हायकिंग आणि ट्रेकिंग क्लबचा ५ दिवसाचा एक कोर्स होता. ह्यात प्रस्तरारोहण, अवरोहण आणि इतर अनेक प्रकार शिकवले जाणार होते. शिवाय रोप वर्क म्हणजे चढाईला लागणारे रोप कसे वापरायचे, त्यांची काळजी कशी घ्यायची, ते ठेवायचे कसे ह्याबद्दल अधिक माहिती मिळणार होतीच. कान्हेरी केव्ह्जच्या खाली पायऱ्या जिथून सुरू होतात त्याच्या डाव्याबाजूला एक पडका बंगला दिसतो. हा आहे बंगला नंबर ८. आमचा ५ दिवसांचा मुक्काम इथेच होता.


स्लॅबवर मी बोल्डरींगचा सराव करताना

पायऱ्यांच्या उजव्या बाजूला झाडीत जरा आत गेलो की एक नर्सरी लागते. नर्सरी म्हणजे बोल्डरींगचा सराव करता येईल अशी जागा. इथे चिमणी आणि काही सोप्या प्रकारची चढाई दोर न वापरता करता येते. अर्थात इथल्या दगडांची उंची ८ फुट पेक्षा अधिक नाही. इथून पुढे कान्हेरी केव्ह्जच्या टेकडीला वळसा मारून तुळसी लेकपर्यंत जाता येते. अर्थात तशी वनखात्याची वेगळी परवानगी तुमच्याकडे असावी लागते नाहीतर पकडले गेलात की भरा दंड. आम्हाला काही तिथे जाण्याची आवशक्यता नव्हती. कारण आमचा मुख्य मोर्चा असणार होता तो केव्हच्या पुढे. सर्व गुफा पार करून पलीकडच्या टोकाला पोचले की तुटलेले बांधकाम लागते. इथे आधी काही अनधिकृत आश्रम सदृश्य बांधकाम होते. ते आता वनखात्याने मोडून टाकले आहे. इथून जरासे पुढे जाऊन डावीकडे वळले की एक वाट वर चढू लागते जी आपल्याला एका मोठ्या प्रस्तरभिंतीकडे घेऊन जाते. ह्या भागाला ट्रेकर्सच्या भाषेत स्लॅब म्हणतात. दररोजचा आमचा बहुतेक वेळ इथेच जाणार होता. इथे बोल्डरींग, ७५ ते ८० अंश कोनात प्रस्तरारोहण, अवरोहण (रॅपेलिंग), क्रॅक ट्रॅवर्स (प्रस्तरातील आडवी भेग पकडून चालत जाणे) असे सर्व प्रकार एकाबाजूला एक असे करता येतात.


स्लॅबवर शोल्डर बिले देताना मी. मागे शमिका क्रॅक ट्रॅवर्स करताना... Happy

दिवसभर स्लॅबवर घाम गाळायचा, मग संध्याकाळी गप्पा मारत गुहेसमोर बसायचे आणि रात्री राहायचे ८ नंबर मध्ये. आम्ही स्लॅबवर असताना आमच्या सामानाची, जेवणाच्या भांडी-गॅसची काळजी घ्यायला एक मोरे नावाचे काका नेमले होते कारण इथे माकडांचा प्रचंड उच्छाद आहे. कोणी चोरून नेणार नाही पण माकडे उचलून नेतील अशी परिस्थिती. याशिवाय रात्री उशिराने एकट्या-दुकट्याने बंगल्याबाहेर बसायचे नाही हा स्पष्ट नियम होता. आणि तो सर्वांनी गुपचूप पळाला होता. गरज नसताना बिबट्याच्या दर्शनाची कोणालाही आवशक्यता वाटली नव्हती... आम्हाला ४ ग्रुप्समध्ये विभागून दररोजची कामे वाटून दिलेली होती. अगदी जेवण बनवण्यापासून ते भांडी घासेपर्यंत आणि भाज्या आणण्यापासून ते पाणी भरेपर्यंत सर्व काही करावे लागे. प्रत्येक ग्रुपमधली २-३ जण भाज्या आणि दुध आणायला बोरीवली मार्केटला जायची तर बाकी पाणी भरून ठेव, सामान आवरून ठेव अशी कामे करायची. त्या दिवशी त्या-त्या ग्रुपला बाकी काहीच करता येत नसे. जेवण बनवा, वाढा, भांडी घासा, पिण्याचे पाणी भरून ठेवा हेच उद्योग दिवसभर सुरू असायचे. संपूर्ण ग्रुपला कान्हेरी केव्ह्जमधून जाण्या-येण्यासाठी खास परवाने दिलेले होते. म्हणजे कोणी दररोज तिकीट विचारणार नाही.


स्लॅबवरची मुख्य प्रस्तर चढाई. वरती सिटींग बीले द्यायला अभिजित, प्रवीण आणि काका.

ह्या दिवसात काही मजेशीर घटना ही घडल्या. एकदा तर संध्याकाळी उशिराने पिण्याचे पाणी कमी असल्याचे लक्ष्यात आले. मग आम्ही ६-८ जण टोर्च वगैरे घेऊन कान्हेरी गुहा क्र. ३४ पर्यंत पोचलो. ही गुहा बऱ्यापैकी आत आहे पण इथल्या टाक्यामध्ये शुद्ध पाणी असते. दूरवर शहरातले लाईट्स दिसत होतेच. पण आत, जंगलात किर्रर्र अंधार. हिवाळ्यात उब हवी म्हणून बिबट्या अनेकदा रात्रीच्या वेळी गुहेत येऊन झोपतात असे मी ऐकले होते. आत्ता राहून राहून उगाच आम्हाला तो ३४ किंवा आसपास तर नाही ना.. असे वाटत होते. गुहेबाहेरच्या टाक्यामधून भरभर पाणी भरून घेत होतो. अचानक कसलासा आवाज आला. कोणी काढला की बिबट्यानेच काढला काय माहीत पण तिथून पाणी घेऊन जे सुटलो ते थेट बंगल्यात येऊन थांबलो. हुश्श्श...

४ रात्री तिथे राहून, अनेक उद्योग करत, अनुभव घेत आम्ही ३१ डिसेंबरच्या दुपारी जेवून तिथून निघालो आणि ठाणा-मुलुंडकडे येणारे मोजकेच लोक वनखात्याच्या आतल्या रस्त्याने थेट भांडूपकडे बाहेर पडलो. हा रस्ता एकदम जबरी आहे. इथून सार्वजनिक वाहतुकीला परवानगी नाही. दोन्ही बाजूला घनदाट अरण्य आहे आणि असे वाटत देखील नाही की आपण मुंबईसारख्या शहराच्या बऱ्यापैकी मध्ये आहोत. ट्या रस्त्याने प्रवास करणे हा एक छान अनुभव होता. राष्ट्रीय उद्यानात १ दिवस जाण्याने किती आल्हाददायक वाटते ते तुमच्यापैकी तिथे गेलेल्यांना सांगायची गरज नाही. आम्ही तर तिथे तब्बल ५ दिवस मुक्काम ठोकून होतो. विविध प्रकारची झाडे आणि इतके पक्षी पहिले की विचारूच नका. सुदैवाने की दुर्दैवाने ते माहीत नाही पण बिबट्याचे दर्शन त्यावेळी झाले नाही. आता मात्र पुन्हा एकदा मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानात जावेसे वाटते आहे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय थरारक दिवस ! !
मध्यंतरी या पार्कला खूप वाईट दिवस आले होते. आता राबता वाढलाय. नीट जोपासना झाली तर चांगलेच आहे.

मस्त रे गिर्या'रोहन'! भारी झालाय ट्रेक.

रच्याकने पहिल्या प्रचित पडणारे खिडकीचे दार हवेतच कसे रोखले गेले होते..? माहित आहे..?

आम्ही तर तिथे तब्बल ५ दिवस मुक्काम ठोकून होतो. >> किती जळवशील रे..:P आता तिथे येत्या सहा सात महिन्यात जंगलात कँपिंग करुन राहण्याची सोय करणार आहेत.. तेव्हा आम्ही पण तळ ठोकू रे.. Wink बाकी मस्त लिहीलेस.. नशिबवान तुम्ही Happy

मस्त रे भटक्या...

आता तिथे येत्या सहा सात महिन्यात जंगलात कँपिंग करुन राहण्याची सोय करणार आहेत.. तेव्हा आम्ही पण तळ ठोकू रे.. >> जल्ला हा प्लान फिक्स झाला आता... यो माहिती काढुन ठेव.... Happy

आता तिथे येत्या सहा सात महिन्यात जंगलात कँपिंग करुन राहण्याची सोय करणार आहेत.. तेव्हा आम्ही पण तळ ठोकू रे..
>>>>> ही माहिती तुला कुठून मिळाली??? ह्याचे बरे-वाईट परिणाम काय??? तिकडे कोण तळ ठोकेल ह्याला काही मर्यादाच राहणार नाहीत की...

अरे तशी योजना राबवली जाणार आहे. आणि तेदेखील या पावसाळ्यातच... आता कोर ऐरियात ही सोय करतील असे वाटत नाही.. पण मलातरी आपल्या इथे जंगलसंवर्धनाबाबत सुज्ञ लोक कमी असल्याने याचे वाईटच परिणाम होतील याची भिती वाटतेय... Sad जल्ला पिकनीक स्पॉट नाय बनवला म्हणजे झाले..

SGNP Director, P.N. Munde, stated, “We’ll take appropriate protection and have put up 32 instructions for people to follow. There will be 10 crore suggestions, but we’ll have to wait and see how it goes. We have to remove all speculations.”

जल्ला सूचना पाळतेय कोण ?? Happy

इकडे बघ.. ही शिळी बातमी
http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-04-14/mumbai/29416994_1...

नि आता हे पक्के झालेय..
http://www.afternoondc.in/city-news/striking-a-natural-balance/article_2...