सरहद्द

Submitted by आशुचँप on 8 May, 2011 - 06:34

करड्या निस्तेज राखाडी आकाशात,
पांढुरक्या हिमशिखरांच्या मागून
आत्ता कुठे उगवायला लागलाय चंद्र,
वार्‍याने हलणार्‍या पाईनच्या सावल्या मात्र,
तितक्याच गडद आणि भेसूर ……

नेहमीचा स्निग्ध शीतल चंद्रप्रकाश,
आज ओरबाडून काढतोय अंधाराला
त्याच्या तीक्ष्ण नख्यांनी, हवा तसा.
…. दिसू लागलंय त्याचं शरीर
त्या उरल्या सुरल्या अंधारातूनही

देहाच्या उष्ण मांसल गोळ्यातून
फांद्या फुटावेत तसे फुटलेले हातपाय
आता मुडपून पडलेत वेडेवाकडे
शिशीराची पानगळ नेहमीच त्रासदायक
झडून गेलेल्या पानांच्या आठवणीतलं झाड

भरकटलेल्या मनाला देऊन जरब
डोळे स्थिरावतात पुन्हा समोर
….. जमिनीवरच्या किड्यासारखी रेंगाळत
नजर सरकत चाललीये त्याच्या बुटांवरून…..
चिखल, माती, बर्फाची चढलेली पुटं
अन् जीर्ण वस्त्रांच्या मागून दात विचकणार्‍या,
वेदना हरवलेल्या जुनाट काळसर जखमा

छातीवरची जखम मात्र ताजीतवानी,
तारूण्याच्या ऐन भरात असलेली
रक्त ठिबकतंय मंदावणार्‍या स्पंदनाबरोबर
एक एक थेंब…. मृत्युची वाट शोधणारा

बर्फाळ वारा माजलेल्या सांडागत धडका देतोय
जीव घेण्याचा बेत दिसतोय बेट्याचा
हुं: .... अशा तशाने मरायचा नाही मी
…… कळलं का रे !!
घोटू शकतो मी गळा मृत्यूचाही
पुरावा ….. ? समोरच पडलाय
… छातीवर भोसकलाय मीच त्याला…. आत्ताच

मायभूमी लुटायला आला होता भोसडीचा,
सिमेपल्याड वळवळणारा गांडूळ…..
कसा मस्त चिरडून टाकलाय !!!

गुलमोहर: 

मायभूमी लुटायला आला होता भोसडीचा,
सिमेपल्याड वळवळणारा गांडूळ…..
कसा मस्त चिरडून टाकलाय !!>>>

उत्तम शेवट, रहस्यमय व खिळवून ठेवणारा मध्य आणि निसर्गचित्रण असावा असा आरंभ!

कवितेची लांबी घसघशीत आणि व्याप्ती धरतीमातेशी निगडित!

भोसडीचा हा शब्द काहीसा विसंगत, फुलांच्या बागेत सरडा दिसावा तसा!

एकंदर इफेक्ट फार आवडला.

द्या अजून कविता!

-'बेफिकीर'!

"उत्तम, गुढ युध्द वर्णन"... छान चँप.

अ:[मी विचार करतोय तु सध्या कोणत्या परिस्थीतीतुन जात असशील..?thinking-022.gif काळजी घे रे.]

धन्यवाद सर्वांना....
भोसडीचा हा शब्द काहीसा विसंगत, फुलांच्या बागेत सरडा दिसावा तसा!
बेफी - शक्यता आहे पण मला तर याहीपेक्षा तीव्र शब्द वापरायचा होता. त्यावेळी त्याचा संताप व्यक्त शिवीने जितक्या चांगल्या प्रकारे व्यक्त होतो तो आणखी कशाने नाही असे मला वाटते.
आणि भारतीय जवान शिवी कसा देईल मारल्यानंतर असा प्रश्न असेल तर त्याबाबत अधिक माहीत देऊ शकेन...

चातका - असे काही नाहीये रे...ही फक्त कविता आहे...स्फुरलेली..आणि त्याचा प्रेरणास्त्रोत वेगळा आहे..
धन्यवाद रश्मे

आशु, मस्तच आहे कविता Happy

मायभूमी लुटायला आला होता भोसडीचा,
सिमेपल्याड वळवळणारा गांडूळ…..
कसा मस्त चिरडून टाकलाय !!!>>> हे अगदी त्या जवानाची मनस्थिती स्पष्ट करतं आणि त्याला मिळालेलं समाधानही. Happy

आणि भारतीय जवान शिवी कसा देईल मारल्यानंतर असा प्रश्न असेल तर त्याबाबत अधिक माहीत देऊ शकेन...>>

असा माझा काही प्रश्न नाही आहे.

मस्तच रे आशु!!!! आपल्या सर्वांच्याच मनातला संताप, उद्वेग तू सही व्यक्त केला आहेस! आवडली एकदम!!! Happy

आशुचँप ,
मस्तच.......
'भोसडीचा' अगदी चपखल बसला आहे.
तिथे पोहोचल्यावर त्या शब्दाने तापलेले डोके थोडे शांत झाल्यासारखे झाले.......

व्वा ..... आशुचॅंप .... जबरदस्त वाटली कविता.
सुरवातीला किंचित् गूढ वाटली, नंतर काहीसा बीभत्स रस डोकावला आणि अखेरीस वीररस.
.... छान. बीभत्स आणि वीर या दोन्ही रसांचं संतुलित मिश्रण.
आणि त्या जवानाच्या तोंडातून सहजतेने बाहेर पडलेली शिवी, अगदी समर्पक….
.... कवितेला एक जोष, जान देऊन गेलेय. अश्लील/अश्लाघ्य वाटत नाही.

चँप, एकदम चँप कविता झालिये!! कविता वाचून शेवटच्या ओळीवर येईपर्यंत डोकं भणाणून मुठी वळू लागल्या होत्याच....

Pages