सरहद्द

Submitted by आशुचँप on 8 May, 2011 - 06:34

करड्या निस्तेज राखाडी आकाशात,
पांढुरक्या हिमशिखरांच्या मागून
आत्ता कुठे उगवायला लागलाय चंद्र,
वार्‍याने हलणार्‍या पाईनच्या सावल्या मात्र,
तितक्याच गडद आणि भेसूर ……

नेहमीचा स्निग्ध शीतल चंद्रप्रकाश,
आज ओरबाडून काढतोय अंधाराला
त्याच्या तीक्ष्ण नख्यांनी, हवा तसा.
…. दिसू लागलंय त्याचं शरीर
त्या उरल्या सुरल्या अंधारातूनही

देहाच्या उष्ण मांसल गोळ्यातून
फांद्या फुटावेत तसे फुटलेले हातपाय
आता मुडपून पडलेत वेडेवाकडे
शिशीराची पानगळ नेहमीच त्रासदायक
झडून गेलेल्या पानांच्या आठवणीतलं झाड

भरकटलेल्या मनाला देऊन जरब
डोळे स्थिरावतात पुन्हा समोर
….. जमिनीवरच्या किड्यासारखी रेंगाळत
नजर सरकत चाललीये त्याच्या बुटांवरून…..
चिखल, माती, बर्फाची चढलेली पुटं
अन् जीर्ण वस्त्रांच्या मागून दात विचकणार्‍या,
वेदना हरवलेल्या जुनाट काळसर जखमा

छातीवरची जखम मात्र ताजीतवानी,
तारूण्याच्या ऐन भरात असलेली
रक्त ठिबकतंय मंदावणार्‍या स्पंदनाबरोबर
एक एक थेंब…. मृत्युची वाट शोधणारा

बर्फाळ वारा माजलेल्या सांडागत धडका देतोय
जीव घेण्याचा बेत दिसतोय बेट्याचा
हुं: .... अशा तशाने मरायचा नाही मी
…… कळलं का रे !!
घोटू शकतो मी गळा मृत्यूचाही
पुरावा ….. ? समोरच पडलाय
… छातीवर भोसकलाय मीच त्याला…. आत्ताच

मायभूमी लुटायला आला होता भोसडीचा,
सिमेपल्याड वळवळणारा गांडूळ…..
कसा मस्त चिरडून टाकलाय !!!

गुलमोहर: 

उकाका...खूप खूप धन्यवाद...
तुमच्याच मौल्यवान सूचनांमुळेच कवितेला एवढा उठाव आला आहे...

धन्यवाद शाम
कविता वाचून शेवटच्या ओळीवर येईपर्यंत डोकं भणाणून मुठी वळू लागल्या होत्याच....
खूप सुंदर प्रतिसाद
चँप, एकदम चँप कविता झालिये!! Happy

Pages