फॅशन कशाशी खातात!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

२००५ की २००६ साली 'ती' नावाचे एक मासिक चालू झाले त्यात 'फॅशन कशाशी खातात!" ही लेखमाला लिहिणार होते. त्यासाठी हा पहिला लेख लिहिला होता. तो त्या मासिकात प्रसिद्धही झाला पण माझ्याकडचा सातत्याचा अभाव आणि इतर अनेक कारणांन्वये लेखमाला काही होऊ शकली नाही. तोच पहिला लेख थोडी डागडुजी करून इथे टाकतेय. पहिला लेख टाकतेय म्हणजे मी पूर्ण लेखमाला लिहेन असं काही नाही. Happy
-------------------------------------------------------------------
‘‘हल्ली आमच्या कॉलनीच्या गणपती उत्सवात आम्ही अगदी नवनवीन कार्यक्रम करतो बाई! या वर्षी आम्ही फॅशन शो पण करणारोत! आम्हा मोठ्या बायकांचा फॅशन शो बरंका..’’
‘‘हो का? म्हणजे काय करणारात?’’
"तू एवढी ड्रेस डिझायनर (नाही हो मी कॉश्च्यूम डिझायनर आहे!) आणि तुला नाही माहित? अगं आमच्या शेजारची ती अपर्णा आहे ना ती यावर्षी आमचा फॅशन शो बसवून देणारे."
(तो काय नाच आहे बसवून द्यायला!)

काकू उत्साहात सांगत होत्या त्यामुळे ’अरे वा!’ एवढंच म्हणून मी तिथनं सटकले. पण मग शिकलेलं, वाचलेलं सगळं मला म्हणायला लागलं की बये तुला खटकलंय ना, कळतंय ना काकू घोळ घालतायत म्हणून तर मग सांग तरी काय बरोबर आहे ते. कळू तरी देत सगळ्यांना. लिहूनच का नाही काढत तू? हं, कल्पना चांगली आहे असं म्हणून मी हे सगळं डोक्यात घडी घालून नीट ठेवून दिलं. मग आता इथे असं काही लिहिशील का असं विचारल्यावर आळस झटकून लिहायला लागल्याशिवाय पर्यायच नव्हता. असं लिखाण सुरू करायचं ठरलं. आता ही सगळी लेखमाला आपण फॅशन , कपडे, कॉश्च्यूम्स या शब्दांच्या आजूबाजूने झिम्मा घालणार आहोत.

तर श्रीगणेशा फॅशन म्हणजे काय इथूनच करूया. अगदी साधंसोपं म्हणायचं तर त्या त्या ठराविक काळात, ठराविक समाजात लोकप्रिय असणारी पद्धती. मग ती कपड्यात, सौंदर्य खुलवण्यापासून घर, वाहन अगदी वापरातल्या छोट्या छोट्या वस्तूंपर्यंत दिसते. म्हणजे अगदी रविवर्म्याच्या चित्राप्रमाणे नऊवारी नेसण्यापासून ते खाली घसरणारी जीन्स घालण्यापर्यंत सगळं. गुप्तकालात म्हणजे इसवीसनाच्या चौथ्या-पाचव्या शतकाच्या दरम्यान रंगीत कपडे, वैविध्यपूर्ण दागिने घातले जात ती एक फॅशन, स्वातंत्र्यपूर्वकाळात देशभक्तांची ओळख म्हणून वापरली जाणारी खादी ही पण एक फॅशन, पेशवाईच्या काळात नऊवारी साडी नेसून मग रेशमी शेला अंगभर पांघरूनच घराच्या बाहेर पडण्याची पद्धत ही ही फॅशनच. थोडक्यात काय हा शब्द जरी गेल्या काही दशकात आपल्याकडे रूळला असला तरी संकल्पना आपल्याकडेही जुनीच आहे.

कुठलीही पद्धत अशीच उगाचच जन्माला येत नाही. समाजाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात तिच्या जन्माची कारणं दडलेली असतात. कधी गरज असते, कधी एखादा महत्वाचा बदल असतो, कधी एखादा नवीन शोध असतो आणि हे सगळं आपल्यावर परिणाम करत असतं त्यातून आपली सगळ्यांची सौंदर्यदृष्टी घडत असते. कशाला एवढा मोठा शब्द वापरायचा... आपल्या सगळ्यांना काय बघावसं वाटतं, कसं दिसायला आवडतं हे सगळं आकार घेतं ते या वेगवेगळ्या कारणांच्यातून आणि मग त्यातून एक पद्धती जन्माला येते जी समाजमान्य असते किंवा कालांतराने होते.

कळपात किंवा विशिष्ठ गटात असणे ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीतूनच फॅशन जन्म घेते. एखादी पद्धत जन्माला येते काही लोक ती स्वीकारतात. त्या पद्धतीला प्रतिष्ठा प्राप्त होते आणि मग ती पद्धती अनुसरणे हे प्रतिष्ठीत मानले जाऊ लागते. आणि मग त्या पद्धतीची फॅशन होते. म्हणजे कसं की माझ्या आधीच्या पिढीने मुलींनी पँट घालण्यावरून खूप विनोद ऐकले होते पण मी कॉलेजमधे पोचेपर्यंत ते सगळं विरून गेलेलं होतं. सब घोडे बाराटक्के पँट असं न म्हणता जीन्स, ट्राउझर्स, फॉर्मल्स इत्यादी शब्द रूळले होते. आणि आता शिक्षण संपल्यानंतर १०-१२ वर्षांनी मी जेव्हा शिकवायला जाते तेव्हा जीन्स हा तरूणाईचा गणवेश झाला आहे.
जेव्हापासून शरीर झाकण्याची सुरूवात झाली तेव्हापासून फॅशन अस्तित्वात आहे हे बघता हे फॅशन नावाचे प्रकरण केवळ झाकण्या-सजवण्यापुरते मर्यादीत नाहीये हे आपल्या लक्षात येतं. समाजात घडणार्‍या सगळ्या बर्‍यावाईट गोष्टींचे परिणाम फॅशनवर होत असतात आणि फॅशन ही ही समाजमनावर परिणाम करत असते. ही देवाणघेवाण खूप गमतीशीर असते. ती थोडीशी समजून घेऊया.

वस्त्रालंकार ही एक चिन्ह व प्रतिकांची भाषा असते जी शब्दांशिवाय त्या व्यक्तीबद्दल खूप माहिती देत असते. त्या व्यक्तीचे लिंग, वय, सामाजिक स्थान, आर्थिक स्थान, व्यवसाय, समाजातील ठराविक गटाचे असणे, वैवाहिक स्थिती, प्रादेशिकता, त्या ठराविक वेळेचे महत्व इत्यादींसाठी संपूर्ण कपडा किंवा त्यातला एखादा भाग हे चिन्ह असते. उदाहरणार्थ नऊवारी साडी म्हणजे मराठी स्त्री मग त्या नऊवारी साडीची नेसण त्या स्त्रीची जात, कामाचं स्वरूप सांगते आणि साडीचा रंग, मंगळसूत्र, जोडवी, हिरव्या बांगड्या हे तिच्या विवाहित असण्याचे सूचन करतात तर नाकातली नथ आणि आंबाड्यावरची वेणी कुठला तरी शुभप्रसंग असल्याचे सूचित करते. इतकं दूर कशाला जायचं जीन्स तीच पण त्यावर गमतीदार रंगाचा तोकडा टॉप कन्या कॉलेजकुमारी आहे हे सांगतो तर कॉटनचा शॉर्ट कुडता व्यक्ती आयुष्यात थोडी स्थिरावल्याचे दाखवतो. अशी काही ढोबळ उदाहरणं..

अशी चिन्हे वापरणारे कळप बनत जातात आणि मग ही चिन्हे असणारे कपडे हे त्या त्या गटाचे गणवेश असल्यासारखे होतात. उदाहरणार्थ; स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी पगड्या, मुंडास्यांच्या ऐवजी गांधीटोपी घालण्याचं आव्हान केलं. महात्मा गांधींना मानणारे सर्वजण गांधीटोपी घालू लागले आणि मग गांधीटोपी घालणं हे देशभक्ती आणि स्वार्थत्यागाचं लक्षण मानलं जायला लागलं. देशभक्तीचा शिक्का बसण्यासाठी गांधीटोपी गरजेची पडू लागली. किंवा मग थोडं पल्याडचं उदाहरण, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सामान्यत्वाचं प्रदर्शन किंवा सामान्यांच्याबद्दलच्या आस्थेचं प्रदर्शन हे महत्वाचं ठरायला लागलं. अमीरउमरावांच्यासारखे कपडे असणं म्हणजे आपली मान कापून घेणं अशी दहशत पसरल्यामुळे सामान्यांच्या पट्टेरी ब्रीचेस लांब निमुळत्या टोप्या (फ्रिजियन हॅटस किंवा लिबर्टी बॉनेट) अश्या अनेक गोष्टी अमीरउमरावांच्या अंगावर दिसू लागल्या. आता या ठिकाणी मुळातल्या सामान्यत्व दाखवणार्‍या गोष्टी ह्या एका गणवेशाचा भाग झाल्या आणि त्या कळपात शिरण्यासाठी अमीरांनी त्या गोष्टी आपल्याश्या करून अजून एक वेगळा गणवेश निर्माण केला.

तंत्रज्ञान व शास्त्रात नवनवीन शोध लागत गेले आणि रोजच्या वापरातल्या गोष्टी बदलायला लागल्या. प्लॅस्टीकच्या शोधानंतर कृत्रिम कापड, कृत्रिम कातडं, कृत्रिम फर या गोष्टी बनू लागल्या. त्यामुळे या शोधानंतर १९५० च्या आसपास संपूर्ण कापडउद्योगाचेच रूप पालटले. याचा अर्थातच जगभरातल्या फॅशनवर परिणाम झाला. वेगळ्या प्रकारचे रंग, रेषा, वेगळ्या प्रकारचे कापड आणि वेगळ्या प्रकारचे आकार वस्त्रांच्यात वापरले जाऊ लागले.

फॅशन या संकल्पनेचं समाजाशी असलेलं नातं आहे ते असं. पण मग ज्याला फॅशन जगत म्हणतात ते नक्की काय आहे? शरीर झाकण्या-सजवण्याची सुरूवात झाली तेव्हापासून वेगवेगळ्या पद्धती येत गेल्या आणि कालबाह्य होत गेल्या आणि नवीन रूजत गेल्या. फॅशन डिझायनिंग/ फॅशनचे जगत या घटना मुळात पाश्चात्य. तर तिथे काय नि कसं घडलं त्याचाच धांडोळा घेऊ.

अमीरउमरावांच्या आवडीनिवडी, आजूबाजूची परिस्थिती इत्यादी गोष्टींतून पद्धती बदलत असत. अमीरउमरावांच्या स्त्रिया व राजघराण्यातील व्यक्ती त्यांना कश्या प्रकारची फॅशन हवी हे आपापल्या कुटुरियेंना सांगत असत. कुटुरीये या शब्दाचा अर्थ अत्यंत सुबक आणि सुंदर काम करणारे कपड्यांचे कारागिर असा घेता येईल. उच्च दर्जाचे शिवणकाम, विणकाम, भरतकाम आणि वापरलेल्या वस्तूही अत्युच्च दर्जाच्या असा सगळा हा मामला. अश्या कपड्यांना ऑत कुटूर (Haute Couture) म्हटले जाते. ऑत या फ्रेंच शब्दाचा अर्थ उच्च दर्जाशी निगडीत आहे तर कुटूर चा अर्थ सुबक कारागिरीशी. उच्च दर्जाची सुबक कारागिरी असलेले कपडे म्हणजे ऑत कुटूर किंवा हाय फॅशन. अर्थातच हे फक्त राजघराणी आणि अमीरउमराव यांनाच परवडू शकत होते. या ऑत कुटूर संकल्पनेचा इतिहास अठराव्या शतकातपर्यंत मागे जातो. नवीन पद्धतीचे कपडे चढवलेल्या लाकडी बाहुल्या एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठवून त्यातून त्या त्या पद्धतीचा प्रसार करण्याची प्रथा या काळात होती. पण पद्धती बदलायला हव्या असे सांगणारे किंवा घडत असलेल्या गोष्टींचा आढावा घेऊन नवीन बदल कसा असेल हे सूचित करणारे लोक या ठिकाणी नव्हते.

पद्धती ठरवणारे वा घडवणारे हे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आले. ज्यांना फॅशन डिझायनर्स अशी संज्ञा मिळाली. १८५८ साली चार्ल्स फ्रेडरीक वर्थ या माणसाने स्वतःचे टेलरींगचे दुकान उघडले वेगवेगळ्या प्रकारचे, रंगांचे गाउन्स बनवून त्याचे खर्‍याखुर्‍या माणसांच्या अंगावर त्यांचे प्रदर्शन करण्याची त्याने सुरूवात केली. या नवीन कल्पनेला सर्वांनी उचलून धरले. असा जन्म झाला फॅशन शो या संकल्पनेचा. तस्मात फॅशन शो म्हणजे माणसांनी वेगवेगळ्या पद्धतीने चालून दाखवण्याचा प्रयोग नसून डिझायनरने बनवलेल्या वेगवेगळ्या कपड्यांचे खरेदी करू इच्छिणार्‍यांसमोर मांडलेले प्रदर्शन. असे प्रदर्शन ज्यात कपडे माणसांच्या अंगावर घातलेले असतात आणि अनेक कोनांतून फिरून ही माणसे ते कपडे कुठल्याबाजूने कश्यापद्धतीने दिसेल हे सर्वांना दाखवत असतात. आपण जेव्हा एफटीव्ही वर एखादा फॅशन शो बघतो तेव्हा त्या फॅशन शो ला त्या त्या डिझायनरचे नाव असते. मॉडेल्सचे चालणे, थबकणे, फिरणे हे सगळे त्या त्या कपड्यातले महत्वाचे भाग, कपड्यातले सौंदर्य उठून दिसावे या पद्धतीने बसवलेले असते. तर अश्या प्रकारच्या फॅशन शोजचा आद्य प्रणेता हा चार्ल्स फ्रेडरीक वर्थ हा होता. याला पहिला फॅशन डिझायनर मानले जाते. १८७० व १८८० च्या दशकात पॅरीस मधल्या फॅशन जगताचा तो सर्वेसर्वा होता.

मोठी मोठी कुटूर हाउसेस, फॅशन सिंडीकेट, वेगवेगळे डिझायनर्स, भारतातलं फॅशन जगत, जगाच्या नकाशावर भारतीय फॅशन या गोष्टींची अजून ओळख आपण पुढच्या काही भागात करून घेणारच आहोत. फॅशन, कापड आणि कपड्यांच्या दुनियेची माहिती करून घेण्याच्या या आपल्या मोहिमेतलं हे पहिलं पाउल. आत्ता कुठे दार थोडसं किलकिलं झालंय आणि आपण तोंडओळखीच्या दालनात प्रवेश केलाय. मग तयार रहा पुढच्या प्रवासासाठी. भेटूया पुढच्या महिन्यात.

संदर्भसूची:

प्रकार: 

फॅशन डिझानयर उत्तम कॉश्चूम डिझायनर असतोच असं नाही याचं उत्तम उदाहरणः
http://maharashtratimes.indiatimes.com/photoshow/8167171.cms
नीता लुल्ला हे नाव हिंदी चित्रपट आणि फॅशन दुनियेत एक लोकप्रिय नाव आहे. पण यांचा हा दुसरा चित्रपट जिथे यांनी कॉश्चुमची वाट लावली आहे. पहिला जोधा अकबर.
पहिल्या फोटोत बालगंधर्वांच्या आणि सुबोध भावेच्या साडी नेसण्यातला फरक लगेच दिसून येईल. पुढच्या फोटोंमधे ब्लाउजची स्टाईल, दागिने हे अजिबात मराठी नाहीत. ब्लाउजच्या बाह्या, गळे बंगाली पध्दतीच्या वाटतात. दागिने थोडे दाक्षिणात्य पध्दतीचे तर पदर चक्क पिन अप केला आहे . नितीन देसाईंच्या प्रॉडक्शन कडून ही अपेक्षा नव्हती. साड्या दागिन्यांवर 'देवदास' झाक स्पष्ट दिसते आहे.

गुड पॉईंट अंजली.. साडी, ब्लाउज बद्दल बरोबर आहे.
पण दागिन्यां बाबतीत तज्ञ म. वि. सोवनी म्हनतात कि आपल्या पारम्पारीक दागिन्यांवर दाक्षिणात्त्य आणि उ. दोन्हीकडच्या दागिन्यांचा प्रभाव आहे , डिटेल्स बघून सांगते.

डिजे, जरी दाक्षिणात्य प्रभाव असला तरी मराठी दागिने इतके बटबटीत नसायचे/नसतात. सुबोधने घातलेली दागिने कुठल्याही कोनातून मराठी (ते ही जवळ जवळ १०० वर्षांपूर्वीचे) वाटत नाहीत. पण सोवनींच्या पुस्तकातली माहिती लिही.

आणि दुसर्‍या फोटोत जी साडी/ब्लाउज आहे त्यात जरदोजी वर्क केलय. पुर्वी मराठी लोकांच्यात असा साड्या नेसायचे?

नितीन देसाईंच्या प्रॉडक्शन कडून ही अपेक्षा नव्हती.>>>

विषयांतर मोड ऑन..

मला अगदी असंच वाटलं जेव्हा मी "राजा शिवछत्रपती" मालिका बघितली. वेशभूषा ठीक, बाकी अनेक ठिकाणी ओपन एंड्स्... नाही पटलं. ऐतिहासिक मालिका/ प्रोजेक्ट करताना त्याकाळच्या वास्तवाशी अधिकाधिक साम्य असेल असं काही अपेक्षित होतं. असो.

विषयांतर मोड ऑफ. Happy

म्हणजे आता हा सिनेमा फक्त बालगंधर्व आणि गाणी हेच डोळ्यासमोर ठेवून बघणे आले!

पुर्वी मराठी लोकांच्यात असा साड्या नेसायचे?>>> नाही गं. आणि आपल्याला या मराठी साड्या दागिने माहित असल्याने चुका लगेच जाणवतात.

खरंय अंजली..काही ठिकाणी अमराठी आणि ग्लॅमरस वाटतायत साड्या आणि दागिने.जुन्या महाराष्ट्रीय साड्या उंची/श्रीमंत दिसत.

फॅशन जगतावरील प्रॅक्टिकल माहिती साठी ' Devil wears Prada ' हा चित्रपट पाहा. फॅशन जगता तील अत्यंत बारीक सारीक बारकावे ह्या चित्रपटात टिपले आहे.

मनापासुन पहावा असा चित्रपट , फॅशन जगताशी सबंधित आहे म्हणुन येथे ऊल्लेख

अंजली,
'बालगंधर्व'मध्ये वापरलेले दागिने हे पु. ना. गाडगीळ आणि कंपनीने खास त्याकाळची छायाचित्रं / चित्रं बघून तयार केले आहेत. सं. मानापमानाच्या वेळी नेसलेली साडी आणि दागिने जसेच्या तसे तयार केले गेले आहेत.

माझ्याकडे नाहीत फोटो Happy
आत्ता एवढ्यात एका मुलाखतीच्या निमित्ताने चित्रपटाशी संबंधित काही तंत्रज्ञांना भेटलो, तेव्हा ही माहिती कळली.

चिन्मय, म्हणजे तू स्वतः हे फोटोज पाहिलेले नाहीस Happy मी जेवढा costumes चा अभ्सास केला आहे - नीरजा एवढा नाही पण थोडा फार अभ्यासक्रमात होता तेव्हढा - महाराष्ट्रीयन ब्लाउजची किमान १०० वर्षांपूर्वीची पध्दत (बाह्या, गळे) फोटोत दाखवल्यापरमाणे नव्हती. साड्यांचे पदर व्यवस्थित पिनअप केले जात न्व्हते. साड्यांच्या काठांवरचे डिझाईन्स, साड्यांवर केलेले जर्दोझी वर्क, दुसर्‍या फोटोतल्या ब्लाऊजच्या काठाला लावलेले टिश्यूचे कापड ही महाराष्ट्रीयन पध्दत नाही. जर ही सगळी डिझाईन्स त्या काळच्या फोटोंवरून केली असतील तर मला ते फोटो बघायला आवडतील. Happy
एक उदा.: पहिल्या फोटोत बालगंधर्वांची साडी, तिचे काठ, नेसण्याची पध्दत, खांद्याशी असलेला पदर बघ. सुबोधचा व्यवस्थित खांद्याशी पिनप केलेला पदर, आणि पुढे खोचलेल्या पदरावरचे डिझईन आधुनिक काळातले आहे हे फोटोतही स्पष्ट दिसत आहे. Happy

अंजली,
तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण मी फक्त दागिन्यांबद्दल आणि मानापमानातली साडी जशीच्या तशी वापरण्याबद्दल लिहिलं आहे. Happy

अगदी अगदी. आजच्या मटात जी मोठी रंगित जाहिरात आहे त्यात साडीची किनार अगदी लेटेस्ट डिझाईनची दिसतेय. मारवाडी स्टाईलची. तेव्हाच माझ्या मनात आलं. आणि ही फार ठळक चूक आहे. कारण बालगंधर्व त्यांचा गाण्याकरता जेवढे प्रसिध्द होते तेवढेच त्यांच्या साड्या आणि दागदागिन्यांबद्दलही होते.

छानच माहिती मिळतेय नीधप, अंजली तुमच्याकडून.
मध्यंतरी छत्रपती शिवाजी ह्या मराठी मालिकेचे काही भाग बघितले. त्यात जिजाबाई आणि इतर काही जणींच्या साड्या ग्रे कलर शेड मध्ये बघितल्या. मला नेहमी वाटायचं की हा रंग मूळ भारतीय नाही. त्या काळात ग्रे रंगाचे कपडे असत का?

प्रथमदर्शनी तरी चित्र मलाही खटकतंय. अंजली म्हणतेय तेच मुद्दे. पण तपशीलात बघितल्यावरच कळेल.
बाकी.... 'मगर मै चुप रहूंगी!' (फालतू एथिक्स घुसलीयेत ना डोक्यात! Proud )

Pages