फॅशन कशाशी खातात!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

२००५ की २००६ साली 'ती' नावाचे एक मासिक चालू झाले त्यात 'फॅशन कशाशी खातात!" ही लेखमाला लिहिणार होते. त्यासाठी हा पहिला लेख लिहिला होता. तो त्या मासिकात प्रसिद्धही झाला पण माझ्याकडचा सातत्याचा अभाव आणि इतर अनेक कारणांन्वये लेखमाला काही होऊ शकली नाही. तोच पहिला लेख थोडी डागडुजी करून इथे टाकतेय. पहिला लेख टाकतेय म्हणजे मी पूर्ण लेखमाला लिहेन असं काही नाही. Happy
-------------------------------------------------------------------
‘‘हल्ली आमच्या कॉलनीच्या गणपती उत्सवात आम्ही अगदी नवनवीन कार्यक्रम करतो बाई! या वर्षी आम्ही फॅशन शो पण करणारोत! आम्हा मोठ्या बायकांचा फॅशन शो बरंका..’’
‘‘हो का? म्हणजे काय करणारात?’’
"तू एवढी ड्रेस डिझायनर (नाही हो मी कॉश्च्यूम डिझायनर आहे!) आणि तुला नाही माहित? अगं आमच्या शेजारची ती अपर्णा आहे ना ती यावर्षी आमचा फॅशन शो बसवून देणारे."
(तो काय नाच आहे बसवून द्यायला!)

काकू उत्साहात सांगत होत्या त्यामुळे ’अरे वा!’ एवढंच म्हणून मी तिथनं सटकले. पण मग शिकलेलं, वाचलेलं सगळं मला म्हणायला लागलं की बये तुला खटकलंय ना, कळतंय ना काकू घोळ घालतायत म्हणून तर मग सांग तरी काय बरोबर आहे ते. कळू तरी देत सगळ्यांना. लिहूनच का नाही काढत तू? हं, कल्पना चांगली आहे असं म्हणून मी हे सगळं डोक्यात घडी घालून नीट ठेवून दिलं. मग आता इथे असं काही लिहिशील का असं विचारल्यावर आळस झटकून लिहायला लागल्याशिवाय पर्यायच नव्हता. असं लिखाण सुरू करायचं ठरलं. आता ही सगळी लेखमाला आपण फॅशन , कपडे, कॉश्च्यूम्स या शब्दांच्या आजूबाजूने झिम्मा घालणार आहोत.

तर श्रीगणेशा फॅशन म्हणजे काय इथूनच करूया. अगदी साधंसोपं म्हणायचं तर त्या त्या ठराविक काळात, ठराविक समाजात लोकप्रिय असणारी पद्धती. मग ती कपड्यात, सौंदर्य खुलवण्यापासून घर, वाहन अगदी वापरातल्या छोट्या छोट्या वस्तूंपर्यंत दिसते. म्हणजे अगदी रविवर्म्याच्या चित्राप्रमाणे नऊवारी नेसण्यापासून ते खाली घसरणारी जीन्स घालण्यापर्यंत सगळं. गुप्तकालात म्हणजे इसवीसनाच्या चौथ्या-पाचव्या शतकाच्या दरम्यान रंगीत कपडे, वैविध्यपूर्ण दागिने घातले जात ती एक फॅशन, स्वातंत्र्यपूर्वकाळात देशभक्तांची ओळख म्हणून वापरली जाणारी खादी ही पण एक फॅशन, पेशवाईच्या काळात नऊवारी साडी नेसून मग रेशमी शेला अंगभर पांघरूनच घराच्या बाहेर पडण्याची पद्धत ही ही फॅशनच. थोडक्यात काय हा शब्द जरी गेल्या काही दशकात आपल्याकडे रूळला असला तरी संकल्पना आपल्याकडेही जुनीच आहे.

कुठलीही पद्धत अशीच उगाचच जन्माला येत नाही. समाजाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात तिच्या जन्माची कारणं दडलेली असतात. कधी गरज असते, कधी एखादा महत्वाचा बदल असतो, कधी एखादा नवीन शोध असतो आणि हे सगळं आपल्यावर परिणाम करत असतं त्यातून आपली सगळ्यांची सौंदर्यदृष्टी घडत असते. कशाला एवढा मोठा शब्द वापरायचा... आपल्या सगळ्यांना काय बघावसं वाटतं, कसं दिसायला आवडतं हे सगळं आकार घेतं ते या वेगवेगळ्या कारणांच्यातून आणि मग त्यातून एक पद्धती जन्माला येते जी समाजमान्य असते किंवा कालांतराने होते.

कळपात किंवा विशिष्ठ गटात असणे ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीतूनच फॅशन जन्म घेते. एखादी पद्धत जन्माला येते काही लोक ती स्वीकारतात. त्या पद्धतीला प्रतिष्ठा प्राप्त होते आणि मग ती पद्धती अनुसरणे हे प्रतिष्ठीत मानले जाऊ लागते. आणि मग त्या पद्धतीची फॅशन होते. म्हणजे कसं की माझ्या आधीच्या पिढीने मुलींनी पँट घालण्यावरून खूप विनोद ऐकले होते पण मी कॉलेजमधे पोचेपर्यंत ते सगळं विरून गेलेलं होतं. सब घोडे बाराटक्के पँट असं न म्हणता जीन्स, ट्राउझर्स, फॉर्मल्स इत्यादी शब्द रूळले होते. आणि आता शिक्षण संपल्यानंतर १०-१२ वर्षांनी मी जेव्हा शिकवायला जाते तेव्हा जीन्स हा तरूणाईचा गणवेश झाला आहे.
जेव्हापासून शरीर झाकण्याची सुरूवात झाली तेव्हापासून फॅशन अस्तित्वात आहे हे बघता हे फॅशन नावाचे प्रकरण केवळ झाकण्या-सजवण्यापुरते मर्यादीत नाहीये हे आपल्या लक्षात येतं. समाजात घडणार्‍या सगळ्या बर्‍यावाईट गोष्टींचे परिणाम फॅशनवर होत असतात आणि फॅशन ही ही समाजमनावर परिणाम करत असते. ही देवाणघेवाण खूप गमतीशीर असते. ती थोडीशी समजून घेऊया.

वस्त्रालंकार ही एक चिन्ह व प्रतिकांची भाषा असते जी शब्दांशिवाय त्या व्यक्तीबद्दल खूप माहिती देत असते. त्या व्यक्तीचे लिंग, वय, सामाजिक स्थान, आर्थिक स्थान, व्यवसाय, समाजातील ठराविक गटाचे असणे, वैवाहिक स्थिती, प्रादेशिकता, त्या ठराविक वेळेचे महत्व इत्यादींसाठी संपूर्ण कपडा किंवा त्यातला एखादा भाग हे चिन्ह असते. उदाहरणार्थ नऊवारी साडी म्हणजे मराठी स्त्री मग त्या नऊवारी साडीची नेसण त्या स्त्रीची जात, कामाचं स्वरूप सांगते आणि साडीचा रंग, मंगळसूत्र, जोडवी, हिरव्या बांगड्या हे तिच्या विवाहित असण्याचे सूचन करतात तर नाकातली नथ आणि आंबाड्यावरची वेणी कुठला तरी शुभप्रसंग असल्याचे सूचित करते. इतकं दूर कशाला जायचं जीन्स तीच पण त्यावर गमतीदार रंगाचा तोकडा टॉप कन्या कॉलेजकुमारी आहे हे सांगतो तर कॉटनचा शॉर्ट कुडता व्यक्ती आयुष्यात थोडी स्थिरावल्याचे दाखवतो. अशी काही ढोबळ उदाहरणं..

अशी चिन्हे वापरणारे कळप बनत जातात आणि मग ही चिन्हे असणारे कपडे हे त्या त्या गटाचे गणवेश असल्यासारखे होतात. उदाहरणार्थ; स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी पगड्या, मुंडास्यांच्या ऐवजी गांधीटोपी घालण्याचं आव्हान केलं. महात्मा गांधींना मानणारे सर्वजण गांधीटोपी घालू लागले आणि मग गांधीटोपी घालणं हे देशभक्ती आणि स्वार्थत्यागाचं लक्षण मानलं जायला लागलं. देशभक्तीचा शिक्का बसण्यासाठी गांधीटोपी गरजेची पडू लागली. किंवा मग थोडं पल्याडचं उदाहरण, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सामान्यत्वाचं प्रदर्शन किंवा सामान्यांच्याबद्दलच्या आस्थेचं प्रदर्शन हे महत्वाचं ठरायला लागलं. अमीरउमरावांच्यासारखे कपडे असणं म्हणजे आपली मान कापून घेणं अशी दहशत पसरल्यामुळे सामान्यांच्या पट्टेरी ब्रीचेस लांब निमुळत्या टोप्या (फ्रिजियन हॅटस किंवा लिबर्टी बॉनेट) अश्या अनेक गोष्टी अमीरउमरावांच्या अंगावर दिसू लागल्या. आता या ठिकाणी मुळातल्या सामान्यत्व दाखवणार्‍या गोष्टी ह्या एका गणवेशाचा भाग झाल्या आणि त्या कळपात शिरण्यासाठी अमीरांनी त्या गोष्टी आपल्याश्या करून अजून एक वेगळा गणवेश निर्माण केला.

तंत्रज्ञान व शास्त्रात नवनवीन शोध लागत गेले आणि रोजच्या वापरातल्या गोष्टी बदलायला लागल्या. प्लॅस्टीकच्या शोधानंतर कृत्रिम कापड, कृत्रिम कातडं, कृत्रिम फर या गोष्टी बनू लागल्या. त्यामुळे या शोधानंतर १९५० च्या आसपास संपूर्ण कापडउद्योगाचेच रूप पालटले. याचा अर्थातच जगभरातल्या फॅशनवर परिणाम झाला. वेगळ्या प्रकारचे रंग, रेषा, वेगळ्या प्रकारचे कापड आणि वेगळ्या प्रकारचे आकार वस्त्रांच्यात वापरले जाऊ लागले.

फॅशन या संकल्पनेचं समाजाशी असलेलं नातं आहे ते असं. पण मग ज्याला फॅशन जगत म्हणतात ते नक्की काय आहे? शरीर झाकण्या-सजवण्याची सुरूवात झाली तेव्हापासून वेगवेगळ्या पद्धती येत गेल्या आणि कालबाह्य होत गेल्या आणि नवीन रूजत गेल्या. फॅशन डिझायनिंग/ फॅशनचे जगत या घटना मुळात पाश्चात्य. तर तिथे काय नि कसं घडलं त्याचाच धांडोळा घेऊ.

अमीरउमरावांच्या आवडीनिवडी, आजूबाजूची परिस्थिती इत्यादी गोष्टींतून पद्धती बदलत असत. अमीरउमरावांच्या स्त्रिया व राजघराण्यातील व्यक्ती त्यांना कश्या प्रकारची फॅशन हवी हे आपापल्या कुटुरियेंना सांगत असत. कुटुरीये या शब्दाचा अर्थ अत्यंत सुबक आणि सुंदर काम करणारे कपड्यांचे कारागिर असा घेता येईल. उच्च दर्जाचे शिवणकाम, विणकाम, भरतकाम आणि वापरलेल्या वस्तूही अत्युच्च दर्जाच्या असा सगळा हा मामला. अश्या कपड्यांना ऑत कुटूर (Haute Couture) म्हटले जाते. ऑत या फ्रेंच शब्दाचा अर्थ उच्च दर्जाशी निगडीत आहे तर कुटूर चा अर्थ सुबक कारागिरीशी. उच्च दर्जाची सुबक कारागिरी असलेले कपडे म्हणजे ऑत कुटूर किंवा हाय फॅशन. अर्थातच हे फक्त राजघराणी आणि अमीरउमराव यांनाच परवडू शकत होते. या ऑत कुटूर संकल्पनेचा इतिहास अठराव्या शतकातपर्यंत मागे जातो. नवीन पद्धतीचे कपडे चढवलेल्या लाकडी बाहुल्या एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठवून त्यातून त्या त्या पद्धतीचा प्रसार करण्याची प्रथा या काळात होती. पण पद्धती बदलायला हव्या असे सांगणारे किंवा घडत असलेल्या गोष्टींचा आढावा घेऊन नवीन बदल कसा असेल हे सूचित करणारे लोक या ठिकाणी नव्हते.

पद्धती ठरवणारे वा घडवणारे हे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आले. ज्यांना फॅशन डिझायनर्स अशी संज्ञा मिळाली. १८५८ साली चार्ल्स फ्रेडरीक वर्थ या माणसाने स्वतःचे टेलरींगचे दुकान उघडले वेगवेगळ्या प्रकारचे, रंगांचे गाउन्स बनवून त्याचे खर्‍याखुर्‍या माणसांच्या अंगावर त्यांचे प्रदर्शन करण्याची त्याने सुरूवात केली. या नवीन कल्पनेला सर्वांनी उचलून धरले. असा जन्म झाला फॅशन शो या संकल्पनेचा. तस्मात फॅशन शो म्हणजे माणसांनी वेगवेगळ्या पद्धतीने चालून दाखवण्याचा प्रयोग नसून डिझायनरने बनवलेल्या वेगवेगळ्या कपड्यांचे खरेदी करू इच्छिणार्‍यांसमोर मांडलेले प्रदर्शन. असे प्रदर्शन ज्यात कपडे माणसांच्या अंगावर घातलेले असतात आणि अनेक कोनांतून फिरून ही माणसे ते कपडे कुठल्याबाजूने कश्यापद्धतीने दिसेल हे सर्वांना दाखवत असतात. आपण जेव्हा एफटीव्ही वर एखादा फॅशन शो बघतो तेव्हा त्या फॅशन शो ला त्या त्या डिझायनरचे नाव असते. मॉडेल्सचे चालणे, थबकणे, फिरणे हे सगळे त्या त्या कपड्यातले महत्वाचे भाग, कपड्यातले सौंदर्य उठून दिसावे या पद्धतीने बसवलेले असते. तर अश्या प्रकारच्या फॅशन शोजचा आद्य प्रणेता हा चार्ल्स फ्रेडरीक वर्थ हा होता. याला पहिला फॅशन डिझायनर मानले जाते. १८७० व १८८० च्या दशकात पॅरीस मधल्या फॅशन जगताचा तो सर्वेसर्वा होता.

मोठी मोठी कुटूर हाउसेस, फॅशन सिंडीकेट, वेगवेगळे डिझायनर्स, भारतातलं फॅशन जगत, जगाच्या नकाशावर भारतीय फॅशन या गोष्टींची अजून ओळख आपण पुढच्या काही भागात करून घेणारच आहोत. फॅशन, कापड आणि कपड्यांच्या दुनियेची माहिती करून घेण्याच्या या आपल्या मोहिमेतलं हे पहिलं पाउल. आत्ता कुठे दार थोडसं किलकिलं झालंय आणि आपण तोंडओळखीच्या दालनात प्रवेश केलाय. मग तयार रहा पुढच्या प्रवासासाठी. भेटूया पुढच्या महिन्यात.

संदर्भसूची:

प्रकार: 

गणू,तुम्ही कितीही काड्या केल्यात तरी मी आणि मामी भांडायच्या गेमात उतरणार नाही हो >>>

तुम्हि उतरा नाहितर नका उतरु. मी एकटा पुरेसा असतो . मला डुआयची देखील गरज पडत नाहि इतरांसारखी Proud आणी कंपु करण्याचीही Proud

नीधप खुप सुंदर आणि सोप्या भाषेत तु फॅशन म्हणजे काय हे समजावुन दिले आहेत. खुप छान. मालिका पुर्ण कर.

अगं एकाच शब्दात? तसं म्हणतेय मी... कायतरी असेलच ना

>>>अश्या कपड्यांना हॉटे म्हणजे 'ओSच' (oht) (च चावलचा आणि त्याआधी किंचित ट चा उच्चार) कुटूर (Haute Couture) म्हणले जाते. हॉटे म्हणजे 'ओSच' (oht) (च चावलचा आणि त्याआधी किंचित ट चा उच्चार) या फ्रेंच शब्दाचा अर्थ उच्च दर्जाशी निगडीत आहे<<

असं लिहू का? Happy

असं लिव ना.

अशा कपड्यांना Houte Couture (उच्चार: ओSच कुटूर) म्हटले जाते. या फ्रेंच शब्दाचा अर्थ उच्च दर्जाशी निगडीत आहे.

नीधप, छान माहिती. लेखमालेच्या प्रतिक्षेत.
आत्तापर्यंत बर्‍याच जणांना वाटत असेल कि फॅशन म्हणजे फक्त वेगवेगळे रंगाचे, आकाराचे कपडे घालून 'कॅटवॉक' वर नजरा खिळवून ठेवणं दुसरं काही नाही. पण सुरवात आणि आत्ता फॅशन शोचं बदलत चाललेलं स्वरूप यात कुठेतरी विसंगती वाटते आहे. अर्थात जगाच्या पाठीवर बर्‍याच संस्कृती आणि जिवनपद्धती आहेत आणि त्यामधे पोशाख, रहाणीमान या सगळ्याचा बदल जाणवतो. कदाचित तेच बदल एखाद्या दुसर्‍या देशात आत्मसात करण्याचा प्रयत्न या फॅशन शो'ज मधे चालतो असे मला वाटते.

शेवटी काय?
नविन काहीतरी घालायचं आणि निदान आरश्या समोर तरी मिरवून पहायचं आणि त्यालाच फॅशन आणि शो म्हणायचं असं कित्येक घरामधे चालतं. प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर दिसावं आणि मग त्याच कुतूहलापोटी हे सगळं जन्माला येतं असावं असं मला वाटतं.

या लेखमालेत मेकओव्हर,थीम कलेक्शन्स आणि सिझनल कलेक्शन्स वर आणखी वाचायला आवडेल. आणि हो मराठी फॅशनमधे सुद्धा काही बदल पहायला मिळत आहेत. उदा. खणा-चोळीचा उपयोग पुर्वी नऊवारी साडीसोबतच केला जायचा पण आता त्याचा उपयोग डिझायनर टॉप्स किंवा टूपीस ड्रेसेस मधे सुद्धा केला जातो आणि तो बर्‍याचदा छानही दिसतो. असे काही नवे फंडे वाचायला आवडेल.

भारतीय संस्कृतीमधली मला आजपर्यंत आवडलेली फॅशन एका मराठमोळ्या स्त्रीची ते हि वटपोर्णिमेला किंवा मंगळागौरीच्या वेळेस सजते तेव्हाची.

पाश्चात्य संस्कृतीमधे सर्वात जास्त आवडलेली फॅशन म्हणजे लाँग गाऊन आणि फिदरी राऊंड हॅट.

कालच हावडा ब्रीज हा साधारण ३०-४० वर्ष जुना सिनेमा पहात होतो. आजची लेडीज करतात ती फुल्ल ट्रान्स्फरंट स्लीव्हज ची फॅशन तेव्हा सुध्दा होती. असा टॉप घालुन मधुबालाचा एक डान्स आहे.

लेख छान आहे.
पण टीव्हीवर असे शोज बघताना नेहमीच एक विचार येतो. की हे असे कपडे कोण घालत असेल?? ९०% जनता तरी ते कपडे घालू शकणार नाही तेव्हा याना एव्हढे पैसे कसे मिळतात. या व्यवसायाची आर्थिक गणिते काही कळत नाहीत.

डेलिया तुमच्या प्रतिसादाशी सहमत.
पण तिथेही वर्गवारी पहायला मिळते आणि त्या वर्गवारीनुसार आपण आपल्या जवळच्या एरीयात एखादा फॅशन डिझायनर कम टेलर असतोच कि. जसच्या तसं आपल्याला विकत घेणं महाग असलं तरीही त्यासारखं किंबहुना हुबेहुब पण कमी पैशातसुद्धा मिळवणं कठीण नाहिये. आपली त्या फॅशनसारखी मागणी आणि त्यासारखंच ९०% मिळवून देण्याचा प्रयत्न तो टेलर करतो आणि त्यानी तो करावा असं मला वाटतं. यातच ग्लोबल फॅशन डिझायनिंग आणि फॅशन शो'ज चं यश आहे ना.

पण टीव्हीवर असे शोज बघताना नेहमीच एक विचार येतो. की हे असे कपडे कोण घालत असेल?? ९०% जनता तरी ते कपडे घालू शकणार नाही तेव्हा याना एव्हढे पैसे कसे मिळतात. या व्यवसायाची आर्थिक गणिते काही कळत नाहीत.

हे कळण्यासाठी ह्या लेखमालेचा उपयोग होईल ही आशा आहे Happy

खूपच छान Happy हल्लेबोल करणार्‍यांकडे दुर्लक्ष कर नेहमीप्रमाणेच Happy पु.ले.शु.

खूपच छान हल्लेबोल करणार्‍यांकडे दुर्लक्ष कर नेहमीप्रमाणेच >>. त्यांना दुसरा उपाय आहे का ? स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा मारुन घेतला आहे. Proud

गणू तूझ्यासारख्यांवर उपाय करणे कसे बरे शक्य आहे ? Proud असो, तूला स्वतःच नाव आडनाव आणि सापडलं की सांग हो. विसरु नकोस. Rofl

मी आताच वर्साचेचा लेटेस्ट शो पाहिला टीवीवर. दोनातेला वरसाचे फार डायनामिक बाई आहे. भावाचा बिझनेस मस्त सांभाळला आहे. मस्त असतात त्यांचे कपडे. भारतात फार महाग पड्तात. पहिल्या जगात हे फॅशन शो प्रकरण सीरीअसली घेतले जाते. सर्व मोठ्या चेनस पुढील सीजनला काय विकणार ते या वर्षी ठरते. मस्त लेख माला आहे. पुलेशु.

'कॉश्च्युम' काय तो चांगलाच मनावर घेतलास. बरीच माहीती कळते आहे. लेखमालिका आवर्जून पुर्ण कर. माझे किचकट प्रश्न विचारेलच मी ऐकेक लेख वाचून.

लेख छानच आहे. एका नविन विषयाची माहीती कळते आहे. पण एक शंका (कृपया याला कुठलेही वेगळे वळण देण्याचा हेतू नाही. मनात आलेला प्रश्न आहे....सध्या सारखे असे डिक्लेमर टाकावे लागतात)...
मला विचारायचे आहे की ही जी फॅशन तुम्ही म्हणाला तशी बदलत आलीये ती बदलण्यात हातभार पुरुषांचाच असेल ना. कारण स्त्रीयांनी कुठले कपडे घालावे हे देखील पुरुषच ठरवत असतील ना.
उदाहरण द्यायचे तर पेशवाईत स्त्रियांचा पेहराव त्यांना पाहिजे तसा नक्कीच नसणार. हा आता त्यातले तपशील त्या ठरवत असतील. म्हणजे नऊवारीचा पोत, रंग, त्याला साजेसे दागिने वगैरे..पण नऊवारीच नेसली पाहीजे हा हट्ट पुरुषांचाच ना...???

आशु अरे तो हट्ट त्या वेळेसच्या संस्कृतीचा, समाजाचा होता. जसे राजे तसे राज्य, जसे बादशहा तसा त्यांचा दरबार आणि तसाच त्यांचा पोशाख. त्या काळात ज्या त्या विशिष्ट समाजाने आत्मसात केलेले बदल होते ते. काळ बदलत गेला तशी सत्ता बदलत गेली आणि ग्लोबल विचारांच्या अनुशंघाने क्रांतीही होत गेली. अत्ताही तेच होते आहे. त्यावेळी पुरषांचे सुद्धा टिपिकल पेहराव होतेच कि.

हो पण मला असे म्हणायचे आहे की तो पेहराव करण्याची सक्ती होती का त्यांच्यावर...आणि बदल पुरुषांपासून स्त्रियांकडे होत गेला का उलटं. (फॅशनच्या बाबतीत पुरुष स्त्रियांच्या दहा पावले मागे असतात असे म्हणतात). पण इतिहासात आधी पुरुषांचा पेहराव बदलला आणि त्या अनुषंगाने स्त्रियांचा का उलटे का दोघांचा परिस्थितीतनुसार बदलत गेला?

तूला स्वतःच नाव आडनाव आणि सापडलं की सांग हो. विसरु नकोस. हसून हसून गडबडा लोळण >> चिखलात लोळू नका म्हणजे झाले Proud

'कॉश्च्युम' काय तो चांगलाच मनावर घेतलास >>> मनावर नाहि पायाव्रर धोंडा पडलाय Proud

Pages