पिवळी पडलेली कात्रणे - गीतरामायण

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

आज बर्‍याच दिवसांनी कपाट झाडायला घेतल्यावर, सगळा पसारा काढून वर्गवारी करताना नेहमीप्रमाणे काय ठेवायचे आणि काय टाकायचे अशा यक्षप्रश्नाने गाठले. शिंप्याकडची कोपर्‍यात अडकवून ठेवलेली चिंध्यांची पिशवी समोर पालथी केल्यावर जसे नाना रंगाचे, नाना आकाराचे, नाना प्रकारच्या नक्षीकामाचे कपड्यांचे तुकडे लक्ष गुंतवून ठेवतात तसे हा पसारा काढल्यावर माझे होते. खूप खूप वर्षांपासूनचे वर्तमानपत्रातले लेख, कात्रणं, एखादा विशेषांक, पुरवणी, आलेली भेटकार्ड, जुनी पत्रं, तयार करायला घेतलेली पण अर्धवट अवस्थेत 'अहिल्या' होऊन राहिलेली भेटकार्ड असं बरेच काही समोर येते आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी पुळका दाटून यायला लागतो. सध्या ठेऊन देऊ, मग नंतर बघता येईल काय करायचे ते, असं म्हणून जवळजवळ सगळ्याच गोष्टी बाजूला पडायला लागतात. आजही तसेच झाले. एक महाशय असतात. आपल्या घरातले भंगार काढून टाकावे म्हणून कामावरून येताना ते भंगारवाल्यालाही सोबत घरी घेऊन येतात. त्याच्यासमोर सगळा पसारा काढतात. आणि बिनकामाचे सगळे वेगळे काढायला त्याच्यासमोर बसतात. पण तेव्हा त्यांना हेही महत्त्वाचे आणि तेही महत्त्वाचे वाटू लागते. शेवटी भंगारवाला हात हलवत परत जातो. अशा विनोदी आवरणाचा टोमणाही आमच्या पिताश्रींनी हाणला. बरेचदा उलटेपालटे करून शेवटी काही कागद वेगळे काढले. हाही त्यातलाच एक. २००५ साली लोकसत्तेत गीतरामायणावर आलेला श्री. दत्ता मारुलकरांचा लेख. संपूर्ण लेख टंकणे शक्य नाही. म्हणून त्यातले महत्त्वाचे संक्षिप्तरुपात इथल्या चाहत्यांशी शेअर करावे या हेतूने इथे लिहिलेय.

संपूर्ण ५६ गीतांसाठी बाबूजींनी वापरलेल्या आधारभूत रागांची संख्या आहे ३६. त्यातल्या मिश्रकाफी चार, मिश्र जोगिया चार, भैरवी चार. भीमपलास, मिश्रमोड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग यातल्या प्रत्येकी दोन. अशा २६ रचना सोडल्या तर उर्वरित ३० स्वररचना या २६ रागांत एकेक व दोन लोकगीतांवर आधारित आणि दोन स्वतंत्रपणे निर्मित.

२६ राग असे आहेत - भूप, मिश्र देसकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुद्ध सारंग, ब्रिंदावनी सारंग, मुलतानी, तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुद्ध कल्याण व मिश्र पहाडी. हे राग व त्याचे शास्त्रशुद्ध स्वर याबाबत बाबूजींचा विचार ध्यानी घेणे महत्त्वाचे आहे. आधारभूत रागचौकट निश्चित केल्यानंतर गीताला, आशयाला आणि परिणामाला साह्यभूत होणार्‍या स्वरांनाच त्यांनी आमंत्रीत केले आहे. परिणामात बदल होणार नाही ही दक्षता घेताना त्यांनी रागसापेक्ष विचार बाजूला ठेऊन गीताला परिणामकारक केलेले आहे, हे ध्यानी घेणे आवश्यक आहे.

१ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत आकाशवाणीने प्रसारित केलेल्या गीतरामायण कार्यक्रमात सहभागी झालेल्या गायक-गायिकांची नावे आणि त्यांनी सादर केलेली गीते पुढीलप्रमाणे. (गीतासोबतचे आकडे गीतरामायणातील त्या गीताचा क्रम दर्शवितात.)

सुधीर फडके:
स्वये श्री रामप्रभू ऐकती (१)
दशरथा घे हे पायसदान (५)
आकाशाशी जडले नाते (१२)
या इथे लक्षुमणा बांध कुटी (२०)
दाटला चोहीकडे अंधार (२२)
दैवजात दु:खे भरता (२५)
उजाड आश्रम उरे काननी (३१)
ही तिच्या वेणीतील फुले (३२)
मी धर्माचे केले पालन (३६)
सुग्रीवा हे साहस असले (४४)
जा झणी जा रावणास (४५)
आज का निष्फल होती बाण (४८)
किती यत्ने मी (५०)
लोकसाक्ष शुद्धी झाली (५१)
रघुराजाच्या नगरी (५६)

माणिक वर्मा:
निरोप कसला माझा घेता (१७)
तोडिता फुले मी (२९)
याचका थांबू नको दारात (३०)
नको करूस वल्गना (३९)
मुद्रिका अचूक मी (४०)
रघुवरा बोलत का नाही (४३)
ओठात थांबूनी सशब्द आशा लाजे (५४)

राम फाटक:
जेष्ठ तुझा पुत्र मला (८)
जोड झणी कार्मुका (९)
मरणोन्मुख त्याला का रे (३३)
प्रभो मज एकच वर द्यावा (५३)

वसंतराव देशपांडे:
माता न तू वैरिणी (२३)
तात गेले माय गेली (२६)
असा हा एकच श्री हनुमान (३७)

व्ही. एल्. इनामदार:
सन्मित्र राघवाचा (३५)
हीच ती रामाची स्वामिनी (३८)
योग्य समयी जागविले(४७)

सुरेश हळदणकर:
रामाविण राज्यपदी (१६)
आश्रया गुहेकडे (२४)

बबनराव नावडीकर:
उदास का तू (४)

चंद्रकांत गोखले:
चला राघवा चला (१०)

गजानन वाटवे:
शेवटी करिता नम्र प्रणाम (२१)

ललिता फडके:
उगा का काळीज माझे (३)
सावळा गं रामचंद्र (७)
उंबरठ्यासह ओलांडूनिया (१५)

मालती पांडे:
रामा चरण तुझे लागले (११)
कोण तू कुठला (२७)
धन्य मी शबरी श्रीरामा (३४)

प्रमोदिनी जोशी, मंदाकिनी पांडे:
सरयू तीरावर अयोध्या (२)
लीलया उडुनी गगनात (४१)
नभा भेटुनी नाद चालले (४६)

योगिनी जोगळेकर:
विरूप झाली शूर्पणखा (२८)

कुमुदिनी पेडणेकर:
मोडू नका वचनास (१४)

लता मंगेशकर:
मज सांग लक्ष्मणा (५५)

समूहगान:
चैत्रमास त्यात (६)
राम चालले (१८)
नकोस नौके परत (१९)
सेतू बांधा रे (४२)
देव हो बघा (४९)
त्रिवार जयजयकार (५२)

सुमन माटे, जानकी अय्यर, उषा अत्रे, योगिनी जोगळेकर, सौ. जोग:
आनंद सांगू किती (१३)

निवेदक: पुरुषोत्तम जोशी

विषय: 
प्रकार: 

गजानन, गीतरामायणाबद्दल वाचून सप्ताहांताची सुरूवात छान झाली. ही गाणी मध्यंतरी कॅसेट्स आल्या त्यात सगळी सुधीर फडक्यांनी गायलेली मिळाली. पण पूर्वी टीव्हीवर इतरांच्या आवाजात ऐकल्याची आठवतात (विशेषतः 'राम जन्मला' आणि 'शरयू तीरावरी'). ही ऐकायला मिळाली पुन्हा तर आवडेल. खरे म्हणजे मी अजून पहिल्या एक दोन कॅसेट्स च्या पुढे गेलो नाही (पुढची गाणी जरा जास्त दु:खी आणि शांत वाटली), पण इतर काही नाही तरी शब्दरचने साठी तरी ऐकायला पाहिजेत असे आता वाटते. एकेका गाण्यातील शब्दरचना काय सुंदर आहे! परत परत ऐकताना सुद्धा नवीन काहीतरी सापडते.

'जोड झणी कार्मुका' आणि''ज्येष्ठ तुझा पुत्र' ही गाणी राम फाटकांच्या आवाजात आणखी वेगळी वाटत असतील ना? एक आश्चर्य म्हणजे लता आणि आशा ची फारशी नाहीत. मुळात सुधीर फडके आणि लता यांनी फार एकत्र काम केले नाही असे दिसते (वरच्या या गाण्याव्यतिरिक्त मला फक्त हिन्दीतील 'ज्योती कलश छलके' आठवते).

पुरूषोत्तम जोशी हे नाव सुद्ध आकाशवाणी संदर्भात ऐकलेले आहे खूप, नक्की आठवत नाही कोणत्या कार्यक्रमासाठी ते.

बरे झाले तू गोष्टी टाकून देत नाहीस ते Happy

खूपच माहितीपूर्ण आहे लेख. मूळ लेख वाचायला आवडेल.

गजानन, फारच छान लेख. मूळ लेख पाठवलास तर टंकण्याची माझी तयारी आहे. ही माहिती मी केव्हाची शोधते आहे! त्यामुळे तुझे आभार मानावे तितके कमीच.

फारेंडा, GaDiMa.com म्हणून एक सी.डी. मिळ्ते त्यावर मूळ गीत रामायण आणि बाबूजींच्या आवाजातले गीत रामायण असे दोन्ही RealAudio format मध्ये आहे. पण त्यात ही माहिती दिलेली नाही. त्या सी.डी. मध्ये गदिमांची इतरही काही गीते, साहित्य (ध्वनी आणि लिखित) असे बरेच आहे.

चांगली माहिती दिलीत गजानन. पूर्ण लेख वाचायला मिळाला असता तर अजून मस्त वाटलं असतं.
मलापण गीतरामायण फार आवडते. त्यातली सगळी गाणी सुरेख आहेत. माझ्याकडे आहेत ती सगळी सुधीर फडक्यांनी म्हटली आहेत.

खरे म्हणजे मी अजून पहिल्या एक दोन कॅसेट्स च्या पुढे गेलो नाही (पुढची गाणी जरा जास्त दु:खी आणि शांत वाटली)>>

फारेंड, अरे 'जय गंगे जय भागीरथी' या गाण्यापासून ते सीतेला पळवून नेण्यापर्यंत सगळी गाणी चांगली आहेत, दु:खी नाहीत. आणि पुढे मग 'सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला' पासून ते पार युध्द संपेपर्यंत (भूवरी रावणवध झाला) पर्यंत सगळी गाणी बिनदु:खीच आहेत. उरलेल्या गाण्यांमध्येसुध्दा 'मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे' हे गाणे सोडले तर सगळी आनंदाची गाणी आहेत. त्यामुळे आता तू उरलेली गाणी नक्की ऐक. Happy

मस्त लेख एकदम जी डी. पूर्ण लेख टाकता येईल का ? किती महत्वाची माहिती आहे ...

गजा मस्तच. आता या लेखाची एक प्रिंट काढुन कात्रणे करावी. Happy बाबुजींच्या अर्ध्या आत्मचरीत्रात गीतरामायणाच्या सुरेख आठवणी आहेत.

गजानन, खूप सुंदर लिहिलीस माहिती आणि ही माहीती नक्कीच संगीत-प्रिय रसिकांसाठी मोलाची आहे. लेख कुठल्या मासिकात अथवा वर्तमानपत्रात आला आहे ते लिहायचे असते.

जमत असेल तर scan प्रत तू इथे जोडू शकतोस.

असो.. विनम्र आभार!

अमोल, सचिन, होय. बाकीच्या गायकांच्या आवाजात ऐकताना वेगळे वाटते.
प्रिया म्हणतेय तसं गदिमांच्या ध्वनीतबकडीवर ही गाणी आहेत. (बाबूजींच्या आवाजातली गाणी त्यात जास्त स्वच्छ ऐकायला मिळतात. ती नंतर ध्वनीमुद्रीत केली असावीत. माझ्या आठवणीप्रमाणे तबकडीवर या मूळ गायक/गायिकांच्या गाण्यांना निवेदन नाही.)

प्रिया, अगं कसले आभार! आधी बोलायचंस ना. Happy

बी, लोकसत्तेत हा लेख आला होता. संपूर्ण मूळ लेख इथे टाकता येण्यासंबंधी काय करता येईल ते बघतो.

आता ही गाणी www.gadima.com वर थेट उपलब्ध आहेत. CD ची गरज नाही.
धन्यवाद गजानन. सगळ्या गायक्/गायिकांची नावं समजली. बर्‍याच दिवसांपासून शोधत होतो.

परागकण

पराग, हे माहीत नव्हतं. बरेच दिवस झाले तिकडे भेट दिली नाही. आता बघायला पाहिजे अजून काय काय नवीन आहे तिथे ते.
माझे कसले आभार? आभार मारुलकरांचे. Happy

मस्त माहिती. गीत रामायण माझे पण भयंकर आवडते. लहानपणी आई रोज लावायची. त्यामुळे सगळी गाणी तोंडपाठ आहेत.

गजानन- रोचक माहिती रे. थँक्यु

हल्ली इरालाही थोडी थोडी ओळखायला यायला लागलीत गीतरामायणातली गाणी.
त्यातले 'सेतू बांधा रे' आणि 'राम जन्मला ग सखी' तिचे आवडते. Happy
आणि 'मज सांग लक्ष्मणा ' म्हणायला लागले की हमखास डोळ्यात पाणी येते.

रच्याकने : गीतरामायण श्रेष्ठ काव्य आहे अथवा नाही यावर मी तुंबळ युद्ध ऐकलेली आहेत. Wink आणि नेमाड्यांचा चांगदेवाला ते गीतरामायण वगैरे ऐकणारे शेजारी नको असतात.

मस्त लेख.

गीतरामायण लहानपणी किती ऐकले याला सुमारच नाही. आजी-आजोबांकडे आम्ही पडीक असायचो. त्यावेळी गीतरामायणाची एलपी सतत लावलेली असायची.

गीतरामायण श्रेष्ठ काव्य आहे अथवा नाही यावर मी तुंबळ युद्ध ऐकलेली आहेत. <<< रैना, हे वाचल्यावर जरा धक्काच बसला. Happy गीतरामायण न आवडणारांचे मुद्दे काय होते हेही लिही, वाचायची उत्सुकता लागलीय.

इराचे कौतुक वाटते.

मामी, एलपी म्हणजे काय?

एलपी म्हणजे लंडन पिल्स्नर ! Proud

HMV च्या सुरुवातिच्या काळात ६० मिनिटं आणी नंतर ९० मिनिटं पाटपोट चालणार्‍या तबकड्या येत. त्यावर 'लाँग प्ले' असं लिहिलेल असे, म्हणुन एलपी. त्यापुर्वी एक तबकडी सुमारे २०-३० मिनिटांची असे.

लेख मस्तच. जुन्या आठवणी चाळवणारा.

.