मला स्वच्छ भारतात राहायला आवडेल. तुम्हाला?

Submitted by सावली on 25 April, 2011 - 00:09

यावेळच्या भारतवारी मध्ये अशा अनेक गोष्टी दिसल्या त्याबद्दल काही बोलावसं वाटलं, काही करावसं वाटलं.
जास्त दिवस राहिल्याने गोष्टी जुन्याच पण नव्या दृष्टीने बघितल्या गेल्या आणि प्रत्येक वेळी बोलावसं वाटूनही भिडेपोटी बोलता आलंच नाही.

असेच काही प्रसंग
गेल्यागेल्या रंग पंचमी होती. त्याची आठवण मात्र मला फार खराब प्रकारे झाली. दोन तीन दिवस आधीपासून रस्त्यावर, आजूबाजूला सगळीकडेच छोट्या छोट्या प्लास्टिकच्या फुटलेल्या पिशव्या आणि त्याभोवती पाण्याचे ओघोळ दिसायला लागले. आधी कळेना कि सगळीकडे हा असा कचरा काय आहे? पण मग रंगपंचमी जवळ आल्याचे कळले. आता पिशव्या टाकायच्या आणि मग पावसाळ्यात पाणी तुंबले म्हणून रडायचे!!

रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सगळीकडे रंगच रंग. रंगीत आयुष्य जगण्यासाठी अशा खोट्या रंगाची जरुरी असतेच का हा प्रश्न पडलाच.

नंतर आलं क्रिकेट. पाकिस्तान विरुद्ध आणि फायनल मॅच दोन्ही साठी बऱ्याच सोसायट्यामध्ये मोठे स्क्रीन लावून एकत्र मॅच बघायचे प्रोग्राम झाले. वा वा! छान त्या निमित्ताने सगळे लोकं एकत्र येणार! मग जेवणखाणेही झाले एकत्रच.
दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी सकाळी जाऊन बघितल्यावर खायच्या प्लेट्स, कागदी/ प्लास्टिकचे कप, फटाक्याचे तुकडे आणि त्याचा कचरा अशी घाण ! तीही स्वत:ची मुलं जिथे संध्याकाळी खेळतात त्या ग्राउंडमध्येच.

स्टेशन वर गेलो होतो काही कामासाठी. तिथे तर डोळे बंद करूनच चालायचे. रुळ आणि प्ल्याटफॉर्म दोन्ही अत्यंत गलीच्छ. आणि लोक अजून कचरा टाकतातच आहेत. कोणालाच काही वाटत नाही.

शाळा शोधनाचाही कार्यक्रम केला यावेळी. काही शाळा बघून त्याच्या गेटमधूनच परत आले. इतका कचरा, घाण आणि दुर्गंधी.

ज्युपिटर हॉस्पिटल म्हणून एक नवीन हॉस्पिटल झालंय. तिथे गेल्यावर आश्चर्य वाटावं इतकं स्वच्छं, सुंदर. कुठे साधी धूळ नाही. हॉस्पिटलचा टिपिकल वास नाही. मात्र टॉयलेट मध्ये गेले तर लोकांनी सगळे टिश्यूपेपर इतस्तत: टाकून पाणी सांडवून घाण केलेलं. तिथले मॅनेजमेंट साफ करत असणारच. बाहेर बघून ते कळतच होतं. पण आलेल्या लोकांना इतकीही जाणीव नाही कि इतक्या स्वच्छं ठिकाणीही आपण घाण करतोय.

आपले एअरपोर्टही बऱ्यापैकी स्वच्छ आहे आता. लोकांनी तिथेही कचरा टाकू नये अशी अपेक्षा होती. तिथे विमानाची वाट बघत असताना, एक अगदी चांगल्या स्थितीतले दिसणारया कॉलेजला जाणाऱ्या वयातल्या मुलामुलींचा ग्रुप आला. बराच वेळ बसले होते. जाताना विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या संपवून रिकाम्या बाटल्या अक्षरश: सीटवर फेकून निघून गेले. कचऱ्याचा डबा अगदी समोरच होता. पण एकानेही त्रास घेतला नाही त्यापेक्षा फेकण्यात जास्त मजा आली त्यांना. नंतर तिथे बसणाऱ्या लोकांची पर्वा वगैरे नाहीच पण कचरा फेकल्याची लाजही नाही. मागे जाऊन सांगावसं वाटलं पण पुन्हा तेच. तसं करता आलं नाही.

सोसायटी मध्ये सॅंडपिट आहे. तिथे खेळायला गेलो तर थर्मोकोल ते प्लास्टिक हा सगळा कचरा मिक्स. दुसऱ्या दिवशी मीच एक पिशवी घेऊन गेले सगळा कचरा उचलून भरून डब्यात फेकला. आणि थोड्या वेळानेच एक शाळेतली मुलगी आणि तिची आई आल्या. मुलीला खायला एक कसलातरी खाऊ आणला होता. त्याची पिशवी फाडून वरचे टोक तीथेच टाकले तिने. खाऊ संपल्यावर रिकामी पिशवीही तिथेच सॅंडपिट मध्ये ! आताच मी मूक पणे इथला कचरा उचलला होता. या मुलीलाही बोलायला हवं होतं पण माझा धीर झालाच नाही. पण जाणवलं कि नं बोलता केलं तर ते वाया जाणार. कचरा टाकू नये याची जाणीवही करून द्यायला हवी.

घरात असं करतात का? घर आरशासारखं स्वच्छं हवं मग बाहेर घाण का चालते? घरात फळांची सालं , रिकाम्या पिशव्या आपण खाल्ल्याठिकाणी टाकत नाही ना? मग बाहेर का टाकतात? कळत नाही म्हणून? चुकून? कचरा दिसत नाही म्हणून? काही कायदा , दंड नाही म्हणून? जाणीव नाही, दुसऱ्याचा विचार नाही म्हणून?

बहुतेक शेवटचं खरं असावं. पण एक व्यक्ती म्हणूण मला जाणीव असली तरी काय करता येईल? मी स्वत: कचरा नं फेकून , किंवा अगदी स्वत: साफ करूनही लोकांना जाणवणारच नसेल तर अजून काहीतरी करायला हवं. वर उल्लेखलेल्या प्रसंगी मला काही बोलताच आले नाही ही माझी चूक आहेही. पण एक व्यक्ती म्हणून प्रत्यक्ष न सांगता अजून काही मार्गांनी किंवा एक ग्रुप , संघटना म्हणून सांगणे सोपे जाईल का?

मला सुचलेली कल्पना अशी कि
एखादी वेबसाईट बनवून त्यावरून लोकांमध्ये जागरुकता वाढवायची. आजकाल बरेचजण इंटरनेट वापरतात. तर कधी ना कधी त्यांच्या कडून हे वाचलं जाईल. सारखं वाचलं गेलं तर कुठेतरी जाणीवही होईल. वेबसाईट हा एक प्लाटफॉर्म असेल तर त्या नावाखाली अनेक छोटे छोटे ग्रुप बनवून आपापल्या सोसायट्यामध्ये, आपल्या मुलांच्या शाळांमध्ये या बद्दल बोलता येईल. आणि एकटेपणी बोलण्याची भीड पडणार नाही. शाळा कॉलेज मधील मुलांना याची जाणिव करुन दिली तर मुळातुनच स्वच्छतेची आवड असणारी पिढी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असं मला मनापासुन वाटतं.

तुम्हाला काय वाटतं? अजून काय करता येईल? तुमच्या पैकी किती जणांना यात काही भाग घ्यायला आवडेल? तुमच्या पैकी किती जणांना स्वच्छ भारतात राहायला आवडेल?

विनंती: परदेशात आपलेच लोक कसे वागतात पण भारतात कसे वागत नाहीत वगैरे वाद जरा बाजूला ठेवून, आपल्याला काय करता येईल यावर चर्चा करायला आवडेल.

२६-एप्रिल- अपडेट
मी काय ठरवले आहे

  • - पुन्हा परत जाईन तेव्हा सोसायटी मध्ये ग्रुप तयार करून आधी सोसायटी मध्येच सफाई करणे आणि त्या बद्दल जाणीव निर्माण करणे.
  • - सो. मध्ये जे शिक्षक असतील त्यांच्याशी या बाबत बोलणे. त्यांना जाणीव करून देणे. * हे आधीच सुरु केले आहे.
  • - फेसबुकवर एक ग्रुप तयार केला आहे. http://www.facebook.com/idonotlitter या ग्रुप मधून थोडा अवेअरनेस कदाचित करता येईल.
  • - या ग्रुप मार्फत सेलेब्रिटीना ही फेसबुक अकाउंट असल्यास संपर्क साधता येईल
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला विषय आहे. बर्‍याच लोकांनी छान कल्पना दिल्यात. फक्त लेखाच्या शिर्षकात 'भारतात' ऐवजी 'जगात' केले तरी चालेल. तुमच्या जपानमध्ये काय स्थिती आहे माहिती नाही. पण इथे अमेरिकेत आणि लंडनमध्ये तरी कचरा करणारे घाणेरडे लोक कमी नाहीत. ह्यात देशी-विदेशी सगळेच आले. भारतीयांना स्वच्छतेचे धडे देणारे लोक ह्यांना पण देतीलच अशी आशा.

सावली चांगला विषय आहे, खुप दिवसांपासून या विषयावर व्यक्त करावेसे वाटत होते. काही वर्षापुर्वी अब्दुल कलाम यांचा या विषयावरचा लेख आला होता.
स्वच्छता आणि शिस्त यांची सुरवात स्वःत पासुन करावी या बद्दल ईथे असणाय्रा कोणाचेही दुमत नसावे. एखादी गोष्ट लोकानां पटावून द्यायची असेल तर त्याची मनावर सतत हॅमरींग करावी लागते. दुर्दैवाने स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणाय्रा जाहीराती मोजक्याच चैनेलवर दिसतात. सिगारेट च्या पाकिटावर जसा वैधानिक ईशारा असतो तसाच ईशारा स्वच्छतेबद्दल स्पष्ट शब्दात पॅकेजींग प्रोडक्टस वर द्यायला हवा.
काही दिवसांपुर्वी ठाण्यातल्या टिकुजी-नी-वाडीला गेलो होतो. तेथे एक मुलगा पोपटासारखा तोडं लाल करून पान खात वेव्हपुलमधे उतरला होता. जागरूक सुरक्षारक्षकानीं त्याला लगेच बाहेर काढला नसता तर ...यक
बर त्या मुलाला खाण्यासाठी पान देखिल कुठे मिळावे तर टिकुजी-नी-वाडी मधेच पान संस्कृतीच्या नावाखाली एक स्टॉल आहे, तिथून?
एस.टी. मधे तर स्वच्छतेची ईतकी मारामार असते, बोर्डवर सुचना आणि बसस्टॉपवर पानाचे ठेले दिसणे तर नेहमीचेच झाले आहे. एकीकडे स्वच्छतेची आवाहने करायची आणि दुसरीकडे पिचकाय्रा मारण्यासाठी साधने उपलब्ध करून द्यायची असा विरोधाभासाचे उदाहरण बघीतल्यावर कपाळाला आठ्या पडाल्याशिवाय रहात नाहीत.
नैतिकतेच्या नावाखाली लेडीजबार वर बंदी आली तशी बंदी स्वच्छतेच्या नावाखाली पान, सिगारेटच्या विक्रीवर देखिल यायला हवेय.

सिगारेटच्या विक्रीवर देखिल यायला हवेय.
---- पण त्याने सरकारचा महसुल बुडेल :अरेरे:. घुटक्याच्या विक्रीवर बंदी होती.... मग रसिक लोकं मध्यप्रदेशातुन आयात करायचे, रेल्वे मधे तर बंदी असतांना पण सर्रास विक्री व्यायची. आजच्या परिस्थितीची कल्पना नाही.

बंदी मुळे खुप काही साध्य होणार नाही.

भारताची लोकसंख्या खुप मोठी आहे हे मान्य पण मग स्वच्छतेचे काम करणारे हात जगाच्या तुलनेने जास्तच आहेत ना? न्युझीलंड किंवा कॅनडा मधे कामं करणारी लोकं कमी आहेत हे त्यांचे नाजुक दुखणे आहे, पण भारताचे तर अगदी विरुद्ध आहे.

सावली, तुझी फेसबुकवर ग्रुप काढण्याची आयडीआ मला आवडली. "Clean India drive/campaign" अश्या काही नावाने काढ....नी इथे माबो वर कळव्...आम्ही सर्व माबोकर तो ग्रुप join करतो...सध्या FB खूपच powerful medium आहे.. आशा करूया, निदान काही भारतीय तरी याप्रकारे बदलतील...

महेश Happy
अनिल सोनवणे , चांगली नावे आहेत.
सोहा, लोकसंख्या आणि घाण हे एकत्र असायलाच हवे असे काही गरजेचे नाही. मी सध्या तोक्यो मधे रहाते आणि इथे घाण नाही. तोक्योच्या लोकसंख्येविषयी काही बोलायलाच नको. त्यामुळे अवेअरनेस जरुरी आहे.
सॅम , ज्यांना अनोळखी माणसाला सांगणे सहज जमत नाही पण अप्रत्यक्षपणे करावे असे वाटते त्यांनाही या ग्रुपचा फायदा आहेच.
नविन ग्रुप करतेय कारण दुसर्‍या देशातल्य कोणीतरी काढलेले ग्रुप, बघुन भारतातले लोक परदेशी फॅड म्हणुन झटकून देण्याची शक्यता जास्त. तु दिलेल्या लिंकला जोडून घ्यायचे बघते. ती बर्‍याच विषयांना स्पर्श करतेय.
सिंडरेला, जगात म्हटले की आमचा काही संबंध नाही आम्ही भारतीय असेच, असे म्हणुन मोकळे होनारे जास्त लोक असतील. म्हणुन भारतात.
प्रसिक,
<<स्वच्छता आणि शिस्त यांची सुरवात स्वःत पासुन करावी या बद्दल ईथे असणाय्रा कोणाचेही दुमत नसावे. एखादी गोष्ट लोकानां पटावून द्यायची असेल तर त्याची मनावर सतत हॅमरींग करावी लागते.>> फेसबुकने करता येईल असे वाटले. त्यासाठी तुमची सगळ्यांची मदत हवी.
उदय , Happy
रायगड , धन्यवाद.

तर नविन प्रोफाईल बनवला आहे.
फेसबुक प्रोफाईल
http://facebook.com/idonotlitter

सध्या जास्त माहीतीसाठी इथे बघा
अजुन फेसबुकवरचा मजकुर लिहिणे चालू आहे.

आपल्याकडच्या कचर्‍यात जास्त काय असते, याचा विचार केला आहेत का ?
१) गुटख्याची पाकिटे
२) कमी जाडीच्या काळ्या प्लॅस्टीकच्या पिशव्या
३) फूटक्या बाटल्या
४) भाजीपाल्याचा टाकाऊ भाग
५) मोकाट जनावरांची विष्ठा
६) मृत जनावरे
७) झाडांचा पालापाचोळा
८) मानवी उत्सर्जिते
९) मेडीकल वेस्ट
११) गर्भनिरोधके
१२) कॅसेट्स च्या रिबीन्स (हा कचरा कमी झालाय आता )
१३) फिरत्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा कचरा
१४) खाण्यातला टाकाऊ भाग (कणसे, टरफले आदी.)
१५) कागद
१६) पॅकिंग मटेरियल (थर्मोकॉल, प्लॅस्टीक पट्ट्या वगैरे )
१७) छोटे प्लॅस्टीक कंटेनर्स. (आईसक्रीम वगैरेचे )

हि यादी वाढवा बघू. मग या प्रत्येकाच्या संदर्भात काय करता येईल त्याचाही विचार करता येईल.

मंदार धन्यवाद Happy
दिनेशदा,
स्नॅक्स ची प्लॅस्टीक रॅपर्स , पेप्सिकोलाचे रॅपर्स, प्लाटीक बाटल्या, असंख्य कागद, चिंध्या, सिगारेट्ची पाकीटे आणि थोटके, थुंकलेल्या पिंका, खरकटे, निर्माल्य, फुले पाने यांचा कचरा, हे ही येईल यात.

वेबमास्टर यांनी दुसर्‍या धाग्यावर प्रतिसाद देण्यास बंद केले आहेत व तशी विपु केली आहे पण त्यांच्या विपू लाही मला प्रतिसाद देता येत नाही आहे त्यामुळे इथे लिहिते. त्यांना लिहिण्याचा दुसरा काही मार्ग असल्यास कृपया सांगा.

तो धागा काढण्याचे मुख्य कारण हे होते की इथुन मदत मिळवावी. चित्रे, जाहिराती करण्यासाठी, वेगवेगळे मजकुर लिहिण्यासाठी किंवा प्रत्यक्ष कसले उपक्रम चालवण्यासाठीही जी मदत हवी ती मायबोली वर नक्की मिळेल हि अपेक्षा होती. इथे अनेक कलाकार आहेत त्यांच्या कल्पनांतुन वेगवेगळ्या गोष्टी साकारून मग फेबु वर टाकता आल्या असत्या.
केवळ इथल्या स्वच्छतेच्या ग्रुप मधे फक्त मायबोली वरच्या लोकांना कचरा न करण्याचे आवाहन करण्यापेक्षा इथल्या मित्र मैत्रिणींची मदत घेणे आणि कार्यकारी असा छोटा ग्रुप करणे हा उद्देश्य होता. तो धागा चालू राहिल्यास असा कार्यकारी ग्रुप बनवून त्यांची ( म्हणजे इथल्या मित्रमैत्रिंणींची) मदत घेता येणे सोपे जाईल आणि जास्तीत जास्त लोकांचा त्यात सहभाग राहील असे वाटते.

सावली >> मस्त उपक्रम आहे. फेसबुक ग्रुप जॉइन केला आहे. कृपया अप्रुव्ह कराल का?
आणि हो मदत लागल्यास अवश्य सांगा.

रच्याकने, ग्रुप पेक्षा कम्युनिटी पेज काढलेले बरे पडले असते.

मला वाटतं की फेसबुक वर ग्रुप निर्माण करण्या बरोबरच आपापल्या विभागानुसार मायबोलीकरांचा ग्रुप व्हायला हवा. रस्त्यावरचा कचरा जो कचराकुंड्यात टाकला जातो तो बर्‍याच अंशी तिथल्या झोपड्पट्टीमधुन टाकला जातो. त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण ग्रुप्स करुन विभागवार सोशल वर्क केले तर थोडी सुधारणा होइल अशी आशा वाटते.
मी ठाण्यात रहाते. ईथे सोसायटयात घंटागाडया येतात पण जी बैठी घरे आहेत ती मात्र रस्त्यावर कचरा टाकतात. त्यांची मानसिकता बदलायला हवी.

निवि चांगली कल्पना आहे.
बहुतेक तुमची पोस्ट अपुर्ण राहिलीये. अजुन काहि असल्यास प्लिज लिहा.
मी दोन तीन दिवस नसेन पण आल्यावर पुन्हा बोलुयात इथे.

जर सर्वसामान्य लोकांनी या गोष्टी सांगितल्या तर त्या पटत नाहीत किंवा पटल्या तरी वठत नाहीत. त्या कोणीतरी लोकमान्य व्यक्तीने सांगितल्या तर त्याचा परिणाम नक्की दिसेल.
नट,नट्या, राजकीय नेते यांच्या शब्द प्रमाण मानणारी लोकं भारतात खूप आहेत. आता त्यांना हे (अस्वच्छता)दिसत नाही कारण ते हल्ली आकाशमार्गाने जातात. रस्त्याने गेलेच तर तेंव्हा ते येणार म्हणून रस्ते एकदम स्वच्छ की विचारूच नका.
मधे आमिरने जाहिराती केल्या होत्या 'परदेशी प्रवासी सन्दर्भात. टाटा टी ने सुद्धा 'जागो रे ' अशी जाहिरात केली होती. तसे काही केले तर होइल का काही?

मागच्या वर्षी स्वाइन फ्लुची साथ होती त्या वेळी अनुभावलेला प्रसन्ग:
मी हैदराबाद ते मुम्बई बस ने प्रवास करत होते. शनि-रवि प्रवास करणारे माझ्यासारखे बरेच लोक बस मध्ये होते जे पुण्याला उतारले. रात्रि स्वाइन फ्लुचे लावालेले मास्क, सकाळी बस मधुन उतरताना तसेच seat खाली टाकुन निघुन गेले. एवाढाही विचार नाही केला की ह्या मुळे सन्सर्ग दुसर्याला होवु शकातो.

सावली,

मलाही अगदी तुझ्यासार्खच काहितरी करायची इच्छा आहे. फेसबूक - IDoNotLitter वर request पाठवली आहे. कृपया Add करावे.

मला वाटते कि आपण जमेल तेवडे करावे आणि लोकाना पण जाणिव करून दिली पहिजे. उदा. रस्त्यावर कचरा न टकणे, न थुंकणे इ.

धन्यवाद अंजली. नक्कीच जाणीव करुन दिली पाहिजे. त्यासाठी काही पोस्टर इथे आणि फेसबुक वरही टाकले आहेत. तुम्हाला ते तुमच्या मित्रमैत्रिणिंमधे शेअर करता येतील.

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

केळं खाऊन झाल्यावर त्याची साल कचरापेटीऐवजी आजुबाजूला फेकून देण्याची सवय अनेकांना असते. परंतु अशा बेजबाबदारपणाचा जबर फटका रेल्वे कर्मचारी सारंग लोखंडे यांना बसला असून , त्यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले.

कोणाच्या तरी हलगर्जीपणाची शिक्षा मला आयुष्यभर भोगावी लागणार आहे. अतिशय बेफिकिरीने प्लॅटफॉर्मवरच केळ्याची साल फेकणा-या त्या माणसाला पकडता येणार आहे का ? असा उद्विग्न सवाल सध्या भायखळ्याच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या लोखंडे यांनी केला.

लोखंडे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे रेल्वेच्या सिग्नल आणि टेलिकॉम खात्यात काम करतात. गेल्या सोमवारी आपले काम आटोपून ते आपल्या घरी म्हणजेच कर्जतला जायला निघाले. सीएसटीहून त्यांनी लातूर एक्सप्रेस पकडली. ट्रेन कर्जत स्टेशनवर पोहचली , प्लॅटफॉर्मवर उतरत असताना लोखंडे यांचा पाय केळ्याच्या सालीवर पडला आणि काही कळायच्या आतच प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्यामधल्या जागेत लोखंडे अडकले. मात्र मदतीसाठी धावा करेपर्यंत ट्रेन सुरु झाली आणि लोखंडे यांच्या पायावरून ट्रेनचे डबे गेले. या भीषण प्रकारामुळे लोखंडे यांची शुद्ध हरपली.
त्यानंतर त्यांना कर्जतच्या म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना भायखळ्याच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अपघातात मोठ्या प्रमाणात इजा झालेला लोखंडेंचा डावा पाय कापण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. मात्र दुस-या पायात पसरत असलेल्या इन्फेक्शनमुळे , दुसरा पायही कापण्याचा कटू निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागला. लोखंडे यांच्यावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. लोखंडे यांचे पाय कापावे लागणार हे कळल्यावर त्यांच्या पत्नीची शुद्धच हरपली. जेव्हा त्या शुद्धीवर आल्या तेव्हा लोखंडे यांना आपले अश्रू आवरता नाहीत.

कोणाच्या तरी बेजबाबदार वागण्याने मला आयुष्यभराकरता अपंग बनवलं आहे. केळ्याची साल फेकणा-या त्या माणसाला संबंधित अधिकारी पकडून शिक्षा करू शकणार आहेत का , असा सवाल लोखंडे यांनी केला आहे. लोखंडे यांना दोन मुले आहेत , एक १३ वर्षाचा आणि दुसरा १० वर्षाचा. मात्र वडिलांचे दोन्ही पाय कापण्याबाबत मुलांना सांगितले नसल्याचे लोखंडे यांच्या पत्नीने सांगितले.

सार्वजनिक जीवनात शिस्त आणि स्वच्छता न पाळण्याचे प्रकार आपल्याकडे नवीन नाहीत. मात्र लोखंडे यांना त्यांची कोणतीही चूक नसताना आयुष्यभरासाठी अपंग बनावे लागले. लोखंडे यांना झालेल्या दुर्देवी अपघातानंतर तरी असे प्रकार थांबणार का , हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

प्रिय सावली,

कोणी काय करावे काय करू नये! यापेक्षा मी स्वतः याबद्दल काय करते हे मला जास्त महत्वाचे वाटते! माझे योगदान शक्य तितपत देणे हे मी माझे कर्तव्य समजते!
माझ्या कॉलेजमध्ये मी सोशल सर्विस मध्ये सहभागी झाले होते तेव्हा समुद्र किनारा साफ करण्याचा उपक्रम होता त्यावेळेस जाणवले की आपण आपला परिसर, आपला निसर्ग कसा घाणेरडा करतो आहोत, तेव्हाच मी ठरवले की "निदान मी तरी माझ्या परीने परिसर स्वच्छतेकडे लक्ष देईन!"
मी आता केव्हाही बाहेर गेल्यावर काही खाण्यापिण्याची वेष्ठणं जातीनं कचरापेटी टाकते आणि जर जवळपास कचरापेटी नसेल तर सरळ माझ्या बागेत ठेवते! माझ्या मित्र मैत्रिणींना ही तसे करण्यास प्रवृत्त करते.
पूर्वी माझ्या ह्या कृतीने काहीजण म्हणायचे देखील की तुझ्या एकटीच्या अशा कृतीने काय फरक पडणार आहे! तेव्हा माझे त्यांना हेच उत्तर असायचे की माझ्या एकट्याने काय मोठा फरक पडणार आहे असा जर प्रत्येकाने विचार केला तर काहिच चांगले घडणार नाही! माझ्या कृतीने जर एखाद्या व्यक्तीच्या वृतीत फरक पडला तर मला आनंदच होईल!
एकदा तर याच विषयावर ट्रेनमध्ये मैत्रिणीशी बोलणे चालले होते तेव्हा एका स्त्रीचा ट्रेनमधून बाहेर कचरा फेकणारा एक हाथ जागीच थबकला. हे ही नसे थोडके!
माझी ६ वर्षाची भाची श्रावणी देखील वाटेत कोठेही कुठचाच कचरा अगदी चॉकलेटचे वेष्टन ही टाकत नाही. कारण मला वाटते की माझ्या छोट्याशा कृतीतून तिलाही समजते आपण घर जसे स्वच्छ ठेवतो तशीच बाहेर ही स्वच्छता राखावी!
आणि हो वाटेत कोठे चालण्याच्या ठिकाणी केळ्याची साल पडलेली दिसली की मी उचलून ती बाजूला टाकते! तसेच देशाचा ध्वज पायदळी तुडवला जात असेल तर तो उचलून बॅगमध्ये ठेवते.
असो तर शेवटी एव्हढेच म्हणावेसे वाटते की काही संस्कार आपल्यांना आईवडिलांकडून मिळतात, काही प्रयत्नपूर्व आपणास अंगी बनवावे लागतात आणि काही उपजत संस्कारांना आपण वाढवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे!

आजच्या लोकप्रभामध्ये टेट्रापॅकवर एक चांगला लेख आला आहे. त्यामध्ये टेट्रापॅक्स रिसायकल होऊन त्यापासून कागद, वह्या वगैरे बनवले जातात, त्यातील अ‍ॅल्युमिलियम फॉईल रीसायकल करुन शाळेतले बाकही बनवले जातात, असं दिलं आहे. हे सर्व मुंबईतील "सहकार भांडार" म्हणून दुकान करते असं त्यात दिलंय. त्यांची मुंबईत २१ दुकाने आहेत आणि ते ग्राहकांकडून वापरलेले टेट्रापॅक्स गोळा करुन दमणच्या एका रिसायकलींग कंपनीत देतात. अधिक माहितीसाठी हा दुवा पहा. त्यातील चौकटीत या रिसायकलींगविषयी दिले आहे.
http://www.lokprabha.com/lokprabha/20120817/lifestyle.htm
मला "सहकारी भांडार" ऐकून माहिती आहे. ते आणि हे सहकार भांडार एकच असेल का?
आणि २१ शाखा कुठे असतील ते शोधायला हवं.

दुसरयाने फेकलेला कचरा आपण उचलून कचरापेटीत टाकायचा, 'अ‍ॅक्शन स्पीक्स लाऊडर दॅन द वर्डस' ह्या संकल्पना कधी? >>> +१

अमेरिकेत कुठेतरि एका शाळेतल्या मुलाने हाच प्रयत्न केला. पुढे त्याच्या शाळेतल्या सर्वान्नि, नन्तर गावातल्या सर्वान्नि तो उप्क्रम पुढे नेला असे काहिसे वाचनात आले होते. समाजसेवेच्या तासाला आपलि लहान मुले परिसराचि स्वछता करतात हे बघीतल्यावर कुठल्या पालकाची कचरा करायची हीम्मत होईल? मोठे झाल्यावर ही मुले आपसुक स्वछता पाळतील.

हायकीन्ग ला गेलो असताना माझ्या फ्रेन्च मित्राने strawberry चे मि फेकलेले हिरवे देठ मला उचलायला लावले. स्वछते च्या बाबतित असा काटेकोरपणा आवश्यक आहे.

२ आठवड्यांपूर्वी ट्रेन मधे दरवाजाजवळच्या स्पेस मधे उभी होते. बाजुच्या मुलीने (चांगल्या कंपनीत नोकरी करत असावी असे एकंदरीत पेहरावावरून वाटले) उभ्या उभ्या भेळ खाल्ली. खाऊन झाल्या झाल्या भेळेचा कागद चुरगाळला. ट्रेन मधून तो बोळा ती बाहेर फेकणार इतक्यात मी तिला म्हटले "बाहेर फेकू नका प्लीज. तुमच्या पर्स मधे ठेवा आणि घरी गेलात की कचरापेटीत टाका. आपले शहर आपणच स्वच्छ ठेवायला हवे नाही का!" (ती अमराठी होती त्यामुळे इंग्रजी मधे सांगितले.) ती ओशाळली व "ओके. ओके." म्हणाली. ह्यापुढे आता कदाचित ती प्रत्येक वेळी ही गोष्ट लक्षात ठेवेल अशी अपेक्षा. मी स्वतः प्रवासादरम्यान फेकून देण्याच्या गोष्टी (बिस्किट/ चॉकलेट्स चे रॅपर्स, फळे खाल्यावर त्याच्या बिया, साली इ) कटाक्षाने सोबतच्या सॅक / पर्स मधे ठेवते व ऑफिसला किंवा घरी पोचल्यावर तिथल्या डस्ट बिन मधे टाकते.

आपण आपल्या घरात इतक्या बिनदिक्कत पणे केर टाकतो का इतस्ततः? मग सार्वजनिक ठिकाणीच असे वागायचे बुद्धी कशी बरे होते? आपण आपल्या लेव्हल पासून सुरुवात करावी. पुढची पिढी आपोआप अनुकरण करेलच.

एकदा तर एक गुजराथी काकू फळे खाऊन असेच कचरा ट्रेन च्या बाकड्यांखाली टाकत होत्या. असे करू नका सांगितले तर "ट्रेन तुमची आहे का?" असा प्रश्न विचारला. "रेल्वे चे लोक येऊन करतील सफाई!" हे आणखीन वर!

मागे एकदा असेच एका बाईला बिसलेरी ची बाटली चालत्या ट्रेन च्या बाहेर टाकण्यापासून दुसर्‍या एका बाईने रोखले. तर टाकणारीला राग आला. "तुमच्या घरात टाकतोय का?" असा प्रश्न विचारल्यावर दुसर्‍या बाईने उत्तर दिले की "नाही! पण माझ्या शहरात टाकताय. तुम्हाला घरी न्यायची नसेल बाटली तर माझ्याकडे द्या. मी माझ्या घरी नेऊन कचरापेटीत टाकेन!"

चांगला चर्चाविषय आहे.
काही वर्षांपूर्वी (बहुतेक) पुणे मनपाने स्वच्छता अभियान सुरु केले आणि त्यांच्या गस्तीच्या गाड्या ठेवल्या होत्या. लोकांना तिथल्यातिथे दंड आकारत असत. इथपर्यंत मी ऐकून होते. नंतरच्या भारतवारीत त्यातली एक गाडी दिसली. त्यातून गस्तवाले लोक गाडीच्या समोर कोणी दिसते का? असे लक्ष ठेवून होते. मला जरा बरे वाटले. दुसर्या सेकंदाला पाहिले तर त्या गाडीचाच आडोसा करून एक बुवा आपले विधी उरकत होते. मी थक्क झाले.

खुप चांगला विषय आहे. कुणाला स्वच्छ जागेत राहायला आवडणार नाही! पण नाही ,वरच्या तुमच्या आणि माझ्याही अनुभवातुन असेच सिध्द होते कि सर्वांनाच स्वच्छ जागेत राहायला, स्वच्छतेने वागायला नाही आवडत. तर अशा लोकांना बदलवण्याचे मोठे काम सर्वप्रथम झाले पाहिजे.
सोसायटीत, शाळा-कॉलेजात, फेसबुक वर याची चर्चा करायला हवीच हवी. पालकांनी लहानमुलांना हे शिकवले पाहिजे. यासाठी स्वतःला सुधरवले पाहिजे म्हणजेच सुरुवात घराघरातुन झाली पाहिजे.
स्वच्छता ही शहराची असावीच, पण त्याची सुरुवात आपल्या स्वतापासुन होणे हे ही तेवढेच गरजेचे आहे. यासाठी आपल्या सवयींपासुन सुरुवात केली पाहीजे. ... बसल्याजागी कानात-नाकात बोट घालणे, बाहेर कचरा फेकणे, थुंकणे, या सवयी बंद करायला पाहिजेत. तसेच कुणाची ही भिड न ठेवता कुणी असे करत असले तर त्याला बोलले पाहिजे. हे सर्वात महत्वाचे आहे असे मला माझ्यासाठी वाटते. मी असे बोलु शकत नाही ही माझी चुक आहे. पण आता मात्र मी नक्की बोलणार.
मी पुण्यावरुन पार्ल्याला volvo ने येत होते. तर एक बिहारी फॅमेली चढली. त्यातला तो बिहारी तिथेच थुंकला मी त्याला बोलु शकली नाही. फक्त एक जळजळीत द्रुष्टीक्षेप टाकला, आणि बडबड केली. पण माझे चुकलेच, मी त्याला डायरेक्ट बोलायला पाहिजे होते.

कालच थान्याहुन येताना दिस्ले.. गोविन्दाचे खुप त्र्क त्र ट्र्क उभे. बाजुला उश्त्या तात्ल्या..पेले...आनि ताकुन दिलेले जेवन.. १००० गोविन्दान्चि सोय कुनि ..कशि..कुथे..करायचि...ते आले..घान केलि..निघुन गेले.. सफाएइ काम्गार झाडु मात मार्तिल..आम्हि कर भर्तो ना..

शहरातून मोठ मोठ्या इमारतीतून अनेक चकाचक कार्यालये असतात. डॉक्टरांची कन्सल्टिंग रूम्ज, क्लासेस, रेस्तराँज असतात. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात एसपी कॉलेजसमोरच्या गल्लीतलं उदाहरण घेउयात.

एकाही इमारतीत थुंकण्यासाठी सोय नाही. एखादा पेशंट लांबून आला असेल तर त्याचा नंबर येईपर्यंत एखादा तास त्याला बसून रहावं लागणं ही पुण्यात नवीन गोष्ट नाही. इथे चलती असलेले डॉक्टर्स चारची अपॉइण्टमेंट देतात याचा अर्थ चारला येऊन बसून रहा. चारची अपॉइण्टमेण्ट असलेले शंभरेक पेशंटस बसून असतात. एखाद्याला प्रेशर आलं तर कन्सल्टिंगमधे कसलीही सोय नाही. इथल्या एकाही इमारतीतच तशी सोय नाही. हे एक उदाहरण आहे. पुण्यात ही सामान्य बाब आहे. लोकांच्या सवयी तर आहेतच आहेत पण सार्वजनिक अस्वच्छतेत भर टाकण्यासाठी ही आमंत्रणे नाहीत का ?

Pages