अभंग, शहर, जथा आणि मी!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

हे पण जुनेच ललित आहे.
---------------------------------------------------
सकाळची कामं उरकणं चालू होतं. अचानक मोठ्या आवाजात पखवाज आणि पेटीच्या दमदार साथीने अभंग ऐकू आले. शब्द लांबून येत होते त्यामुळे कळले नाहीत पण सूर होता सच्चा आणि खणखणीत बंदा रूपया.
एकेक सूर पांडुरंगाच्या पायाकडे नेणारा. मधेच एक दुसरा आवाज आला. योग्य जागी, योग्य वेळी आणि योग्य सूर उचलून अप्रतिम ताना आल्या. परत पहिला आवाज मूळ अभंगावर आला. आता दोन्ही आवाज पांडुरंगाला आळवत होते.
अशी स्वर्गीय भक्ती.. का नाही पांडुरंग येणार भेटीला.
मला त्या आवाजातच पांडुरंग भेटून गेल्यासारखं वाटलं.
स्वैपाकातले हात थबकले. ते अप्रतिम स्वरब्रह्म शक्य तितकं पिऊन घ्यावं म्हणून मी क्षणभर स्तब्ध झाले. ऐकत राह्यले.
आता लक्षात आलं ही रेकॉर्ड नाहीये. कुणीतरी खरंच गातंय.
मी खिडकीकडे धावले.
खाली रस्त्यावर ५-६ वारकर्‍यांचा जथा चालला होता. पेटी आणि पखवाज गळ्यात बांधलेला, एकिकडे वाद्य वाजवणं आणि एकिकडे गाणं असं ते रस्त्यावरून चालत होते. जथा थोडा थबकला होता आणि जथ्यातला पुढचा माणूस पैसे मागत होता.
रस्त्यावर पैसे मागायला येणार्‍या विविध लोकांबद्दलचे सगळे संदर्भ माझ्या शहरी आणि बंद डोक्यात चमकून गेले.
मला पैसे द्यायचे नव्हते असं नाही पण खाली जाणं सुरक्षित वाटलं नाही. का कोण जाणे.
रस्त्यावर जाऊन पैसे देणं हे थोडं त्या स्वरब्रह्माचा अपमान केल्यासारखंही वाटणार होतं. कारण मी देऊन देऊन ५०-१०० रूपयापेक्षा जास्त थोडीच देणार होते.
सकाळच्या कामांच्या धांदलीत अजून अंघोळ उरकायची होती आणि अंगावरचा गाऊन हा काही रस्त्यावर खाली जाण्याच्या लायकीचा नव्हता.
५-१० मिनिटात पाणी जाणार होतं त्याच्या आत स्वैपाकाचं सगळं पाण्याचं काम उरकायचं होतं.
असा काय काय विचार होतोय जेमतेम दोन मिनिटात तोच जथा पुढे सरकला. पैसे मागायला ठाण मांडून बसणारे लोक नव्हते तर हे.

नवर्‍याचं ऑफिस पलिकडच्या गल्लीत. त्याला फोन करून सांगितलं असं असं आहे. तुझ्याइथे ते आले तर पाच मिनिट गाणं ऐक आणि त्यांना पैसे दे. नवरा अजून अतरंगी. आणि त्याच्याबरोबर कामाला बसलेला आमचा सीए त्याच्याहून जास्त गाण्याचा वेडा. २-५ मिनिटात तो जथा यांच्या गल्लीत पोचला नाही तर काम टाकून बाइकवरून त्यांना शोधायला निघाले. आजूबाजूच्या बर्‍याच गल्ल्या धुंडाळल्या शेवटी महिला संघाकडून हनुमान रोड कडे येणार्‍या रस्त्यावर ते त्यांना सापडले. जथा वारकर्‍यांचाच होता. रोज थोडं थोडं चालत ते पंढरपूरला निघाले होते. जिथे असू तिथे सकाळी गात गात प्रभात फेरी करायची. त्यात मिळेल त्या पैशातून दिवसभराचा गुजारा करायचा. अशी त्यांची पद्धत.. असो...

एक मात्र झालं त्यांना बघितल्यानंतर ते दिसेनासे होईपर्यंत त्यांचं गाणं ऐकलंच नाही मी.

-नी

प्रकार: 
शब्दखुणा: 

मागच्या कार्तिकी एकादशीला आळंदीला वारकर्‍यांचा सोहळा बघण्याचा योग आला होता. तेव्हा एका चिमुकल्या वारकर्‍यांने 'विठठल नामाचा' हे भक्तीगीत गाताना एका वेगळ्याच धुंदीत घेऊन गेला. भगवंताचे ते नामस्मरण खरोखर अंतर्मुख करणारं होतं. दुर्दैव इतकंच होतं कि त्या चिमुकल्याला हे बरबटलेलं जग पाहण्यासाठी दृष्टी नव्हती पण त्याच्या गाण्यातल्या आलापाची झेप मात्र ... !

भगवंताचे आर्त नामस्मरण सुरू झाले कि कातळही कड्याकपारीतून पाझरू लागतो म्हणतात ना ते खरंच आहे.

छान अनुभव लिहिलात.

प्रचंड आवडलं हे मनोगत... Happy
हे खरे वारकरी... सच्च्या दिलाने गाणारे, पांडुरंगाकडे जाणारे आणि सोबत आपल्यालाही घेऊन जाणारे.
प्रसंगाचं वर्णन अतिशय सुरेख केलं आहेस, गाऊनमधली तु, पाणि जाणार आहे पण तरिही खाली जायचं आहे अशा द्विधा मन:स्थितीतला तुझा चेहरा, ते वारकरी सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं.. Happy

पुलेशु!!!

दक्षे Happy

मी एकुणात अध्यात्म, धर्म आणि अध्यात्मिक चर्चा यापासून करोडो योजने दूर आहे. मला अश्या चर्चा खरोखर कंटाळा आणतात... भवसागर बिगर तरून जाण्यापेक्षा एंजॉय करण्यात मला मजा येते... मनाची शांती बिंती मिळण्यापेक्षा अस्वस्थता मला जास्त इंटरेस्टिंग वाटते... अशी मी व्यवस्थित षड्रिपूंनी बरबटलेलीच व्यक्ती आहे.

तरीही संगीत, स्वर, एक सट्टाक्कन आलेली तान मला शहारा आणते. मग शब्द देव भक्तीचे असोत की
'सौतन के घर रतिया बितायी' असोत... Happy

नी, छान लिहिलय.
कधीकधी रेल्वेगाडीत असे भजनी कलाकार भेटतात. ते केवळ स्वतःच्या आनंदासाठी गातात.
एकदा मी शालू माझा रंगाने भिजला, हि गवळण ऐकत इतके भान विसरलो कि स्टेशनवर उतरायचेच विसरुन गेलो.

नी, काय एकेक आमच्यावर बॉम्ब टाकते आहेस भन्नाट लिहून. हल्ली तर रोज सकाळी वाचायची सुरुवात तुझ्या लेखनाने होतेय. जरा पुरवून पुरवून टाक गं बाई. एकदम नको संपवू सगळं.
हे तर जबरीच लिहीलं आहेस. सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहीलं. Happy
आणि बाईसाहेब, सगळे म्हणाताहेत तसं त्या लेखनस्फूर्ती देवतेची जरा आराधना करा बरं, नवीन येऊद्या अजून जबरी. Happy

भवसागर बिगर तरून जाण्यापेक्षा एंजॉय करण्यात मला मजा येते... मनाची शांती बिंती मिळण्यापेक्षा अस्वस्थता मला जास्त इंटरेस्टिंग वाटते... अशी मी व्यवस्थित षड्रिपूंनी बरबटलेलीच व्यक्ती आहे. >> नीरजा, अगदी नेमके शब्द ! मस्त लिहिलं आहेस.
कालच ह्या विषयावर नवरा, साबा आणि मी अशी चर्चा ( की वादावादी !) रंगली होती. साबा कट्टर जैन. मग फक्त जैन धर्मच कसा मोक्ष मिळवून देऊ शकतो हे त्या पटवून देत होत्या.
आणि माझा बेसिक प्रश्न होता.....मोक्ष हवाच्चे कुणाला ?
काय वाईट आहे आयुष्यात ? पुन्हा जन्म घेऊन ह्यावेळी राहिलेलं सगळं जगून घ्यायचं......शेवटी दोघांनी माझ्याकडे तु.क. टाकून विषय संपवला !

....अवांतराबद्दल सॉरी गं. Happy
वारकर्‍यांचा नामाचा गजर मात्र खरंच भान हरपवून टाकतो !

छान लिहिलंय . दृश्य उभं राहिलं डोळ्यांसमोर.

<रस्त्यावर पैसे मागायला येणार्‍या विविध लोकांबद्दलचे सगळे संदर्भ माझ्या शहरी आणि बंद डोक्यात चमकून गेले.> अगदी नेमकं.
गेल्यावर्षी आमच्या भागात वारकरी , वासुदेव असे लोक नेहमी यायचे. तेव्हा बहुभाषिक वस्तीत यांना भिकारी समजलं जात असेल का असा प्रश्न पडून वाईट वाटायचं.

<एक मात्र झालं त्यांना बघितल्यानंतर ते दिसेनासे होईपर्यंत त्यांचं गाणं ऐकलंच नाही मी> खरंच.

शेवटी दोघांनी माझ्याकडे तु.क. टाकून विषय संपवला !<<< मस्त किस्सा रुणुझुणू.. Happy

मयेकर, हे सगळं आपणच करत असतो ना तेच च्यायला टोचतं जाम.. Sad
आम्ही एम ए ला असताना पारंपारीक प्रयोगकलांमधे वासुदेव, भारूड, गोंधळी, पोतराज, कडकलक्ष्मी, नंदीबैल घेऊन येणारे, पांगुळ, बहुरूपी असं सगळं तोंडओळख पातळीवर का होईना अभ्यासलं. पेपरात उत्तरं लिहिताना सगळं वर्णन लिहून ह्या कला जगल्या पाहिजेत इत्यादी बडबड पण केलीच. पण ते दारावर आल्यावर हात आखडला जातोच. सगळ्या शंका, भय येतंच डोक्यात...

नी,ललित आवडलं.

एक मात्र झालं त्यांना बघितल्यानंतर ते दिसेनासे होईपर्यंत त्यांचं गाणं ऐकलंच नाही मी.

हे फारच पटलं.नको त्या वेळी डोक्यात विचारांची इतकी गर्दी होते की एखाद्या छानश्या गोष्टीचा धड आनंद घ्यायलाच
जमत नाही आपल्याला.

शेवटच्या वाक्याला 'अगदी अगदी' होत होतं माझंही.

मस्त वाटलं वाचून.
आणि मवाला अनुमोदन. पोतडी अशी एकदम नको रिकामी करू. एकेक दागिना काढ त्यातला.
(सगळे एकदम संपवलेस तर खनपटीला बसून नवीन घडवून घेऊ! आम्हाला काय, बरंच आहे एका परीने!)

व्यवहारी पातळीवरून जगता जगता अचानक त्या स्वरातील आर्जवामुळे जी व्याकुळता नीधप याना नंतर स्पर्शून गेली तिचेच भावात्मक रूप या लेखात नेमकेपणाने उतरले आहे. कुणीतरी कशासाठी 'पैसे मागत आहे' ही बाब सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे विचित्र वाटत असल्याने वारकर्‍यांचा पुकारही आपल्यात रूक्षता निर्माण करतो हे जरी खरे असले तरी नंतर दुसर्‍या व्यक्तीला (इथे नवरा) निरोप देऊन काही प्रमाणात का होईना पैसे पोचते करून मानसिक टोचणी कमी करण्यात लेखिकेला जे यश लाभले यातच त्या समाजाप्रती त्याना वाटणारी ओढ स्पष्ट होते.

अनेक प्रसंगी आपण आदर्श समाजाची (युटोपिआ) कल्पना करतो. वर उल्लेख केलेल्या वारकर्‍यांचे तल्लीन होऊन गाणी म्हणत पुढे जात राहणे आणि त्याचवेळी त्याना आपण काही तरी आर्थिक स्वरूपात मदत करणे गरजेची आहे ही भावना मनी उमटणे हे देखील एका युटोपिआचेच लक्षण आहे.

(अवांतर ~ हा लेख वाचत असताना का कोण जाणे मला पु.लं.च्या "एका मोर्चाची गोष्ट" आठवली. तोही असाच एक विषण्ण करणारा अनुभव आहे.)

प्रतिक देसाई,
युटोपिया... हम्म इंटरेस्टिंग
तुमचे प्रतिसाद सगळीकडेच खूप वाचनीय असतात. त्याबद्दल आभारच.
प्रतिसाद इतके सही तर लिखाण किती खास असेल याची उत्सुकता आहे. तस्मात लवकर लवकर काहीतरी छान लिहा आणि आम्हाला वाचायला द्या हि विनंती. Happy