मला स्वच्छ भारतात राहायला आवडेल. तुम्हाला?

Submitted by सावली on 25 April, 2011 - 00:09

यावेळच्या भारतवारी मध्ये अशा अनेक गोष्टी दिसल्या त्याबद्दल काही बोलावसं वाटलं, काही करावसं वाटलं.
जास्त दिवस राहिल्याने गोष्टी जुन्याच पण नव्या दृष्टीने बघितल्या गेल्या आणि प्रत्येक वेळी बोलावसं वाटूनही भिडेपोटी बोलता आलंच नाही.

असेच काही प्रसंग
गेल्यागेल्या रंग पंचमी होती. त्याची आठवण मात्र मला फार खराब प्रकारे झाली. दोन तीन दिवस आधीपासून रस्त्यावर, आजूबाजूला सगळीकडेच छोट्या छोट्या प्लास्टिकच्या फुटलेल्या पिशव्या आणि त्याभोवती पाण्याचे ओघोळ दिसायला लागले. आधी कळेना कि सगळीकडे हा असा कचरा काय आहे? पण मग रंगपंचमी जवळ आल्याचे कळले. आता पिशव्या टाकायच्या आणि मग पावसाळ्यात पाणी तुंबले म्हणून रडायचे!!

रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सगळीकडे रंगच रंग. रंगीत आयुष्य जगण्यासाठी अशा खोट्या रंगाची जरुरी असतेच का हा प्रश्न पडलाच.

नंतर आलं क्रिकेट. पाकिस्तान विरुद्ध आणि फायनल मॅच दोन्ही साठी बऱ्याच सोसायट्यामध्ये मोठे स्क्रीन लावून एकत्र मॅच बघायचे प्रोग्राम झाले. वा वा! छान त्या निमित्ताने सगळे लोकं एकत्र येणार! मग जेवणखाणेही झाले एकत्रच.
दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी सकाळी जाऊन बघितल्यावर खायच्या प्लेट्स, कागदी/ प्लास्टिकचे कप, फटाक्याचे तुकडे आणि त्याचा कचरा अशी घाण ! तीही स्वत:ची मुलं जिथे संध्याकाळी खेळतात त्या ग्राउंडमध्येच.

स्टेशन वर गेलो होतो काही कामासाठी. तिथे तर डोळे बंद करूनच चालायचे. रुळ आणि प्ल्याटफॉर्म दोन्ही अत्यंत गलीच्छ. आणि लोक अजून कचरा टाकतातच आहेत. कोणालाच काही वाटत नाही.

शाळा शोधनाचाही कार्यक्रम केला यावेळी. काही शाळा बघून त्याच्या गेटमधूनच परत आले. इतका कचरा, घाण आणि दुर्गंधी.

ज्युपिटर हॉस्पिटल म्हणून एक नवीन हॉस्पिटल झालंय. तिथे गेल्यावर आश्चर्य वाटावं इतकं स्वच्छं, सुंदर. कुठे साधी धूळ नाही. हॉस्पिटलचा टिपिकल वास नाही. मात्र टॉयलेट मध्ये गेले तर लोकांनी सगळे टिश्यूपेपर इतस्तत: टाकून पाणी सांडवून घाण केलेलं. तिथले मॅनेजमेंट साफ करत असणारच. बाहेर बघून ते कळतच होतं. पण आलेल्या लोकांना इतकीही जाणीव नाही कि इतक्या स्वच्छं ठिकाणीही आपण घाण करतोय.

आपले एअरपोर्टही बऱ्यापैकी स्वच्छ आहे आता. लोकांनी तिथेही कचरा टाकू नये अशी अपेक्षा होती. तिथे विमानाची वाट बघत असताना, एक अगदी चांगल्या स्थितीतले दिसणारया कॉलेजला जाणाऱ्या वयातल्या मुलामुलींचा ग्रुप आला. बराच वेळ बसले होते. जाताना विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या संपवून रिकाम्या बाटल्या अक्षरश: सीटवर फेकून निघून गेले. कचऱ्याचा डबा अगदी समोरच होता. पण एकानेही त्रास घेतला नाही त्यापेक्षा फेकण्यात जास्त मजा आली त्यांना. नंतर तिथे बसणाऱ्या लोकांची पर्वा वगैरे नाहीच पण कचरा फेकल्याची लाजही नाही. मागे जाऊन सांगावसं वाटलं पण पुन्हा तेच. तसं करता आलं नाही.

सोसायटी मध्ये सॅंडपिट आहे. तिथे खेळायला गेलो तर थर्मोकोल ते प्लास्टिक हा सगळा कचरा मिक्स. दुसऱ्या दिवशी मीच एक पिशवी घेऊन गेले सगळा कचरा उचलून भरून डब्यात फेकला. आणि थोड्या वेळानेच एक शाळेतली मुलगी आणि तिची आई आल्या. मुलीला खायला एक कसलातरी खाऊ आणला होता. त्याची पिशवी फाडून वरचे टोक तीथेच टाकले तिने. खाऊ संपल्यावर रिकामी पिशवीही तिथेच सॅंडपिट मध्ये ! आताच मी मूक पणे इथला कचरा उचलला होता. या मुलीलाही बोलायला हवं होतं पण माझा धीर झालाच नाही. पण जाणवलं कि नं बोलता केलं तर ते वाया जाणार. कचरा टाकू नये याची जाणीवही करून द्यायला हवी.

घरात असं करतात का? घर आरशासारखं स्वच्छं हवं मग बाहेर घाण का चालते? घरात फळांची सालं , रिकाम्या पिशव्या आपण खाल्ल्याठिकाणी टाकत नाही ना? मग बाहेर का टाकतात? कळत नाही म्हणून? चुकून? कचरा दिसत नाही म्हणून? काही कायदा , दंड नाही म्हणून? जाणीव नाही, दुसऱ्याचा विचार नाही म्हणून?

बहुतेक शेवटचं खरं असावं. पण एक व्यक्ती म्हणूण मला जाणीव असली तरी काय करता येईल? मी स्वत: कचरा नं फेकून , किंवा अगदी स्वत: साफ करूनही लोकांना जाणवणारच नसेल तर अजून काहीतरी करायला हवं. वर उल्लेखलेल्या प्रसंगी मला काही बोलताच आले नाही ही माझी चूक आहेही. पण एक व्यक्ती म्हणून प्रत्यक्ष न सांगता अजून काही मार्गांनी किंवा एक ग्रुप , संघटना म्हणून सांगणे सोपे जाईल का?

मला सुचलेली कल्पना अशी कि
एखादी वेबसाईट बनवून त्यावरून लोकांमध्ये जागरुकता वाढवायची. आजकाल बरेचजण इंटरनेट वापरतात. तर कधी ना कधी त्यांच्या कडून हे वाचलं जाईल. सारखं वाचलं गेलं तर कुठेतरी जाणीवही होईल. वेबसाईट हा एक प्लाटफॉर्म असेल तर त्या नावाखाली अनेक छोटे छोटे ग्रुप बनवून आपापल्या सोसायट्यामध्ये, आपल्या मुलांच्या शाळांमध्ये या बद्दल बोलता येईल. आणि एकटेपणी बोलण्याची भीड पडणार नाही. शाळा कॉलेज मधील मुलांना याची जाणिव करुन दिली तर मुळातुनच स्वच्छतेची आवड असणारी पिढी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असं मला मनापासुन वाटतं.

तुम्हाला काय वाटतं? अजून काय करता येईल? तुमच्या पैकी किती जणांना यात काही भाग घ्यायला आवडेल? तुमच्या पैकी किती जणांना स्वच्छ भारतात राहायला आवडेल?

विनंती: परदेशात आपलेच लोक कसे वागतात पण भारतात कसे वागत नाहीत वगैरे वाद जरा बाजूला ठेवून, आपल्याला काय करता येईल यावर चर्चा करायला आवडेल.

२६-एप्रिल- अपडेट
मी काय ठरवले आहे

  • - पुन्हा परत जाईन तेव्हा सोसायटी मध्ये ग्रुप तयार करून आधी सोसायटी मध्येच सफाई करणे आणि त्या बद्दल जाणीव निर्माण करणे.
  • - सो. मध्ये जे शिक्षक असतील त्यांच्याशी या बाबत बोलणे. त्यांना जाणीव करून देणे. * हे आधीच सुरु केले आहे.
  • - फेसबुकवर एक ग्रुप तयार केला आहे. http://www.facebook.com/idonotlitter या ग्रुप मधून थोडा अवेअरनेस कदाचित करता येईल.
  • - या ग्रुप मार्फत सेलेब्रिटीना ही फेसबुक अकाउंट असल्यास संपर्क साधता येईल
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कचरा व्यवस्थापनावर काम करणार्‍या पुण्यातील कोणा व्यक्तीविषयीचा अनिल अवचटांचा लेख आठवला. त्यात त्यांचे निष्कर्ष होते की कचरा हलवणारी यंत्रणा पुरेशी सक्षम नाही. कचरापेट्या पूर्ण भरायच्या आधी रिकाम्या करता येतील इतके मनुष्यबळ (पुण्यातल्या मनपाकडे) नाही. वगैरे. मला ते पटते.

इथे इंग्लंडात दोन फुटबॉल विश्वचषकांदरम्यान एकत्र जमून मैदानात मोठ्या पडद्यावर सामने बघण्याचा अनुभव घेतला. सामना संपल्यावर मैदानभर बीअरचे कॅन, बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर, कागद पसरलेले असतात. पण दुसर्‍या दिवशी सकाळी बघितले तर मैदान पुन्हा स्वच्छ चकचकीत.
कचरा गोळा करण्याचे दिवस, वेळ वगैरे नगरपालिकेच्या निवडणूकीतले महत्त्वाचे मुद्दे असतात.

आपल्याकडे सरकारी यंत्रणा पुरेशी नाही म्हणून प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे हे खरे आहे. पण मुळात शहरात कचरा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे ही जाणीव होणे गरजेचे आहे. ती हळूहळू होऊ लागली आहे असे वाटते.

@साधना
हो. घरातल्यांना शिस्त आपण लावू शकतो.माझाही तो प्रयत्न चालू असतो कायम. बऱ्याच वेळा नातेवाईकांकडूनही हेटाळणी, कुत्सितपणा वाटेला येतो.
कुत्र्याबाबत अगदी. पण आपल्याकडे ती स्टेप यायला अजून बराच काही व्हावं लागेल. आधी माणसांनी टाकलेला, स्वत: केलेला कचरा उचलला, किंवा मुळात फेकलाच नाही तरी खूप आहे.
पार्किंगचा किस्सा सही Happy पण पुन्हा ते लोकं नसतील तेव्हा नियम मोडले जाण्याची भीती राहीलच. म्हणून अवेअरनेस सुद्धा हवा.

@udayone
फोटो प्रसिद्ध करण्यात बरेच प्रॉब्लेम येणार.
@monalip
अतिशय वाईट अनुभव. असला उद्धटपणा या शाळा कॉलेजची मुलं कुठून घेऊन येतात देव जाणे. अशावेळी बाकीच्या बायका गप्प का बसल्या. चांगली खरडपट्टी काढायला हवी होती त्या ग्रुपची.:राग:

रुळाखाली काय घालातात ते बघून रुळावर लोकं कागद टाकतात कि काय! मग आता पर्यंत लोकल गाड्यांना अज्जिबात धक्के बसायला नको होते Lol

यावेळी मी ठाण्यात स्टार बझार मध्ये बायो डीग्रेडेबल गार्बेज बेग्ज बघितल्या. त्या कचरा टाकण्यासाठी वापराव्या.

@सचिन_साचि धन्यवाद
@उदय, तुमचे मुद्दे अतिशय योग्य आहेत. पण कचऱ्याची कुंडी भरली असेल तर म्युनिसिपाल्टी / किंवा एरियामधला नगरसेवक वगरेला फोन करून होईल का काम? मला अनुभव नाही पण तरी प्रयत्न करून बघायला हवा. अशा सारख्या तक्रारी जात राहिल्या तर तक्रारीची दाखल घेतली जाईल का?

@प्राजक्ता_शिरीन हो पब्लिक प्रॉपर्टी म्हणूनच अनास्था.
@चैतन्य दीक्षित,
हो हा आदर्शवादी उपाय मलाही वाटतो. म्हणून मी वरही लिहिले कि ग्रुप्स बनवून शाळा कॉलेज मध्ये अवेअरनेस वाढवायचा. कारणं मुळात मुलांना शिकवणार कोण तर आईबाबा. आता आईबाबानाच जाणीव नाही म्हटलं कि झालंच!! आधी कोंबडी कि आधी अंडे. म्हणून आईबाबांना, शिक्षकांना जबरदस्तीने/ प्रयत्न पूर्वक ही जाणीव करून देऊन मुलांमध्ये ही मुळात सवय म्हणूनच भिनावावी लागेल.

@मामी,
शाळेत / पुस्तकातून शिकलेल्या गोष्टी फक्त मार्क मिळवण्यासाठी नाही तर आचरणातही आणण्यासाठी असतात हेच मुलांना शिकवायला विसरतोय का सगळे?

@आशुचँप,
हो वेळखाऊ पण कदाचित आपली पुढची पिढी तरी स्वच्छं भारतात राहील अशी आशा. लेखाचे नावं बदलून "माझ्या मुलांना स्वच्छं भारतात राहायला आवडेल. तुमच्या?" असं करायला हवे का Wink
रुणुझुणू, शैलजा
मी ही प्रवासात कचरा पिशवी घेउनच फिरते त्याबद्दल अनुमोदन. इतरांनीही असे करावे असे वाटतेय.

@anjali_12, हो मानसिकताच हवी Happy

@दिनेशदा ,
सिरियल्स मधून काहीतरी करणे हा एक छान उपाय आहे. पण कोणत्या सिरीयलवाल्याला हे पटेल आणि ते हे काम सुरु करतीलं?
कोक वगैरे च्या जाहिरातीवाल्यांनी करावे ही अपेक्षाही छान आहे. पण त्यांच्या पर्यंत कोण पोहोचवणार?
सेलेब्रिटीना सामान्य माणसासारखे घाणीतून वाट काढत चालावे / नाक दाबून ट्रेन ने प्रवास करावा लागतं नाही त्यामुळे त्यांना स्वत:हून जाणीव होणे नाही.

@अवनी,
क्रिकेटपटूनी जाहिरात करणे हा ही अतिशय परिणाम कारक उपाय आहे. पण पुन्हा त्याच्या पर्यंत ही कल्पना कशी पोहोचवणार? खरच काही उपाय आहे का?
एखाद्या क्रिकेटपटूला खुले पत्र लिहून काही होईल का?

मी काय ठरवले आहे

  • - पुन्हा परत जाईन तेव्हा सोसायटी मध्ये ग्रुप तयार करून आधी सोसायटी मध्येच सफाई करणे आणि त्या बद्दल जाणीव निर्माण करणे.
  • - सो. मध्ये जे शिक्षक असतील त्यांच्याशी या बाबत बोलणे. त्यांना जाणीव करून देणे. * हे आधीच सुरु केले आहे.
  • - फेसबुकवर एक ग्रुप तयार करते आहे *** प्लीज नाव सुचवा. *** या ग्रुप मधून थोडा अवेअरनेस कदाचित करता येईल.
  • - या ग्रुप मार्फत सेलेब्रिटीना ही फेसबुक अकाउंट असल्यास संपर्क साधता येईल

.

सावली, पुढच्या वेळेस जे करशील त्यावरून हे 'परदेशी फॅड' किंवा परदेशातून येऊन 'इथे शाईन मारतात' असा तुझ्याबद्दलचा समज होईल अशी माझी खात्री आहे. कारण आपण इथलं काही सांगितलं तरी लोकांचा (तिथल्या) असाच समज होतो.

मला अज्जिबात आवडणार नाही...
एकदम स्वच्छ भारत ही कल्पनाच सहन होत नाही. मी राहतो त्या देशाला इथल्याच मातीचा सुगंध हवा. आणि तो येतो, पर्ण चर्वितचर्वण पिंकांनी, उष्णजलविसर्जनाने, मुखरसत्यागाने..
आपल्याच देशाची ओळख हरवून आपण काय साध्य करणार आहोत. आपल्या दैदीप्यमान परंपरा आणि उच्च संस्कृतीला धक्का लागेल असं काही खपवून घेतलं जाणार नाही.. काय म्हणता ?

अभिनंदन सावली , खुप चांगला आणि ज्वलंत विषय चर्चेला घेतलायस.
"Clean India", " स्वच्छ व सुंदर भारत" , स्वप्नच वाटतय , पण आपली तरुण पिढी एकत्र आली तर काय करु शकते हे अण्णाच्या आंदोलनाच्या निमित्ताने दिसलचं आहे , जन( तरुण ) जागृती करणं खुप महत्वाचं आहे , प्रत्येक जण आपापल्या ऑफीसमध्ये नोटीस बोर्डवर मेसेजेस लावु शकतो , चहासाठी एकत्र आल्यावर चर्चा करु शकतो.
तु म्हणतेस त्याप्रमाणे फेसबुक/ वेबसाईटवर कँपेन केलं तर खुप मोठा प्रतिसाद मिळेल.

मला अज्जिबात आवडणार नाही...
एकदम स्वच्छ भारत ही कल्पनाच सहन होत नाही. मी राहतो त्या देशाला इथल्याच मातीचा सुगंध हवा. आणि तो येतो, पर्ण चर्वितचर्वण पिंकांनी, उष्णजलविसर्जनाने, मुखरसत्यागाने..

<<< सुगंधा बद्दल बोलताय ना अनिल ?
मिट्टी कि खुशबु हवीच पण ती खुशबु घालवणारा लोकांनी फेकलेला कचरा असेल तर कसा येइल तो सुगंध ?

दीपांजली, त्यांनी ते उपहासाने लिहिलंय असं वाटतंय मला.
---- त्यांनी उपहासाने म्हटले असले तरी उत्तर खुप गंभीर आहे :स्मित:.

http://www.facebook.com/home.php?sk=group_206158306073660&ap=1

मी ग्रुप बनवला आहे..........आता आपल्या सहकार्या ची गरज आहे.......

आपन इथे त्यांचे फोटो प्रसिध्द करु शकतो......आपले मत नोंदवु शकतो.......आपल्या पैकि कोणी आल्या वर अड्मीन होईल ज्याला फेसबुक माहीती आहे.......( मला जरा कमीच येते ते Happy

धन्यवाद...........
सहकार्य कराल अपेक्षा आहे

udayone
धन्यवाद. पण जरा थांबायला हवे होतेत.
मी साजिरा यांना काही नाव आणि आणि मटेरियल साठी विचारले होते. त्या नंतर नीट विचार करुनच चालू करणार होते.
तिथे आधीच हजरो ग्रुप आहेत त्यातला एक ग्रुप म्हणुन हरवायला नको आहे मला.
तिथे ग्रुपला काही आयडेंटीटी आणि फेसबुक स्टेटस वगरे द्यायचा विचार होता. तरच हा ग्रुप जिवंत राहील. त्यासाठी नीट प्लॅन करुन मटेरिअल लिहायचे होते.
शक्य असेल तर प्लिज तुमची पोस्ट काढाल का?
नंतर सर्व ठरल्यावर ग्रुप करूयात

सावली क्षमा असावी........मी वरची पोस्ट वाचली नाही..............

हवे तर आपन तिथे काही लिहावे.........अडमीन होउन आपन हवे ते करु शकतात......... हे माझे आमंत्रन आहे.....

आपले विचार तिथे प्रकट केल्यास इतरांना ही लाभ होइल........

बघा आपन सुध्दा ग्रुप बनवणार होतातच.........मग मी बनवला काय आणी तुम्ही बनवला काय......एकच ना......तुम्ही त्यालाच आकर्षक बनवा........तुम्ही तिथे अड्मीन होउन तुम्हाला तो ग्रुप हवा तसा बनवा....सगळे अधिकार मी आपल्याला देतो....मी अजुन तरी काहीच केले नाही त्या वर .........आपण आपणास हवे तसे करु शकतात............!!!!!

बाकी आपणास वेगळा ग्रुप बनवायचा असल्यास.....दोन्ही ग्रुप ना लिन्क देउ................एक मेकांची

उत्तम धागा. मलाही ह्या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल. नुकतीच रामनवमी झाली. रामनवमीच्या दुसर्‍या दिवशी सकाळी फिरायला जावे की नाही विचार करत होते असाच विचार दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशीपण करावा लागतो पण गेले आणि आश्चर्य म्हणजे रस्ता बर्‍यापैकी स्वच्छ होता. हा चांगला बदल मला दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशीपण जाणवला होता हे आधी मुद्दाम सांगते. मी हे सांगतेय ते नागपुरमधलं. दसर्‍याच्या दिवशी होणार्‍या अस्वच्छतेबद्दल बोलताना 'हे' लोकं येतात आणि घाण करुन जातात असं बोलल्या जातं पण हे असंच दृश्य रामनवमीच्या शोभायात्रेनंतर दिसतं. मला सध्या खूप प्रवास करावा लागतोय. मी माझ्या डब्यातला प्रवाश्यांना खिडकीतून बाहेर कचरा फेकू देत नाही त्यांना समजावून सांगते हे व्रतच घेतलंय म्हणाना. कचरा, घाण ह्या गोष्टींचा जसा त्रास होतो तसाच वाया जाणार्‍या अन्नाच. लग्नकार्य किंवा इतर कार्यक्रमाच्या प्रसंगी वाया जाणारं अन्न आणि त्याही पेक्षा आजकाल धार्मिक कार्यात कचरापेटीत फेकलेला प्रसा बघून वाईट वाटतं. ह्या बाततीत काय करता येईल अर्थात वेगळा धागा काढीन.

वरील रामनवमी वरुन आठवले - भयंकर - गुढीपाडव्याची नव-वर्ष स्वागत यात्रा.
ती यात्रा कोणत्या रस्त्यावरुन गेली हे नंतर सांगावे लागत नाही. अजुन काही लिहीत नाही. आपण सर्व जाणकार आहात.
ती यात्रा म्हणजे, संस्कृती कशी जपली जाते, व सामाजीक जबाबदारी कशी वेशीवर टांगली जाते याचे उत्तम उदाहरण

मोनालीपि, तुझ्या वरील प्रतिसादावरून आठवलं.

इथे कोरियात एक पौर्णिमा साजरी करतात. त्यादिवशी आपल्यासारखीच होळी पेटवतात. अर्थात ती होळी प्रत्येक सोसायटीची वेगळी वै काही नसते. फेब्रुवारीमधल्या अशाच एका पौर्णिमेच्या दिवशी आम्ही कोरियन ट्रॅडिशनल व्हिलेजला गेलो. तिथे एका चिटोर्‍यावर सगळेजण आपापल्या इच्छा लिहित होते व नंतर ते सगळे कागद एका दोरीला गुंडाळून त्या होळीवर टाकले होते. होळी बघायला प्रचंड गर्दी होती. होळी पेटवल्यावर एक १०-१५ मिनिटांच्या आत बाजूला बंब उभे होते त्याने पाणी टाकून ती पूर्ण विझवली. तासाभराने तिथे होळी वै होती याचा मागमूसही शिल्लक नव्हता.

आडो,हो ते होऊ शकतं. पण तरी प्रयत्न करायला हवा Happy

अनिल सोनवणे , तुमची उपहासगर्भ प्रतिक्रिया असली तरी अगदी मार्मिक आहे.

श्री, धन्यवाद. असे व्हावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे सहकार्य गरजेचे आहे.

udayone, तुम्हाला आधीच इमेल केले होते. पण तुम्हाला हवे असल्यास ग्रुप तसाच ठेवा. काही हरकत नाही.

मंजू, धन्यवाद.

monalip खरं आहे.
आडो, Happy

सावली, तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा, ही नावं कशी वाटतात पहा
१. KEEP INDIA CLEAN
२. GARBAGE FREE INDIA
३. CLEAN INDIA
४. MAKE MY INDIA BEAUTIFUL

छान उपक्रम सावली... मनापासुन शुभेच्छा. नुसते विचार मांडुन न थांबता पुढे कृती करते आहेस हे फार आवडले. फेबु. ची कल्पना पण आवडली. नक्की जोडुन घेणार.

आरडी धन्यवाद Happy हा फक्त माझा उपक्रम नाही आपला आहे.
सुनिधी धन्यवाद. लवकरच नविन फेबु अकाउंट चालू करून त्यात ग्रुप करतेय.
मला पर्सनल नावावर ठेवायचे नाहीये मग तिथे ओनरशिप वगरे मध्ये येते Happy

मलाही दोन नावे सुचली आहेत.
IDoNotLitter
CleanGenX India

यातल्या IDoNotLitter ला प्रेफ. आहे. या नावाला इतर मित्रमैत्रिणींमधे आधी मते पण मिळालीत.

माणूस हा घाण करणारा प्राणी आहे. १८व्या शतकात युरोपातील मोठी शहरेही त्यांच्या आत्यंतिक घाणीसाठी प्रसिद्ध होती. प्रथम कायद्याच्या धाकाने आणि नंतर स्वच्छतेचे फायदे कळल्याने ते सुधारले. त्यांची कमी लोकसंख्या हा घटकही महत्वाचा आहे.
कडक कायदा आणि त्याची कठोर अंमलबजावणी केली तर कचर्‍याला, विशेषतः प्लास्टीक कचर्‍याला आळा बसू शकतो हे मी आग्रा आणि नैनिताल या दोन्ही पर्यटनस्थळी अनुभवले आहे. लोक आणि नोकरशाहीची इच्छा असेल तर हे करता येते.
लोकांना घाण 'फील' होण्याची वाट पहात बसलो तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही.

IDoNotLitter आणि MAKE MY INDIA BEAUTIFUL ही दोन नावे आवदली.
सावली, ग्रुप चालु केलास की नक्की जोडून घेईन.

सावली,एका महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू केल्याबद्दल अभिनंदन्.भारतीय लोक ह्या बाबतीत जेंव्हा जागृत होतील तो सुदिन्.अग,टु टायर ए सी मध्ये तरूण जोडपी बसली होती.त्यांनी संत्री खाऊन साले,बिया,खाली टाकायला सुरवात केली.मला न रहावून मी आमच्या जवळची कॅरी बॅग त्यांना कचरा टाकायला दिली. एका रस्त्यावर थुंकणार्‍या माणसाला हटकले,तर मलाच म्हणाला आपने ये रस्ता खरीदा है क्या? मी म्हटले तू चुकीचे वागत होतास ते तुला दाखवले.तुझ्या बोलण्याचा मला राग आला नाही.

मागे गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवले गेले होते. ते भलतेच यशस्वी ठरले होते. गाडगेबाबांनी स्वच्छतेचं महत्व लोकांमधे बिंबवलं. अगदी झाडू कसा हातात धरावा इथपासून.
खरंच काही होणार असेल तर त्याला गाडगेबाबांचं नाव देऊन औचित्य साधावं असं मनापासून वाटतं.

गाडगेबाबा नागरी / ग्रामीण स्वच्छता अभियान
किंवा
महाराष्ट्र राज्य गाडगेबाबा स्वच्छता आंदोलन
किंवा
अखिल भारतीय गाडगेबाबा स्वच्छता आंदोलन

हे नाव द्यावं. गाडगेबाबांच्या शिकवणुकीचा आधार घेतल्यास काय करायचं हे क्लिअर होईल.
मध्यंतरी अजितदादांनी स्वच्छते खूपच मनावर घेतलं होतं.

राज्य सरकारी नोकरांना घरात संडास अनिवार्य केलं होतं. हागणदारी मुक्त गाव योजनेची घोषणा केली आणि धडाक्यात कामाला सुरूवात केली. अजितदादांचा धडाका तो..

पथकं निर्माण झाली. कुणी उघड्यावर मंत्रोच्चार करताना दिसला कि जागेवर दंड..
एका हार्ट पेशंटने मंत्रोच्चार करत असतानाच पथक येताना पाहीलं आणि कार्य पूर्ण न करताच तो पळू लागला. आधीच वय झालेलं त्यात हार्ट पेशंट आणि रनिंग रेस !!

१००० रू दंड वाचवताना जागेवर प्राण गेले.
तेव्हापासून मोहीम थंड आहे..

आपल्या देशातली अस्वच्छता/ घाण मला ही खटकते. लोकांच ह्या बाबतीत प्रबोधन करत रहायला पाहिजे हे मलाही पटतं. पण आपल्या देशातली लोकसंख्येची घनता बघता, परदेशातल्यासारखी स्वच्छ शहरं आपल्याकडे बघायला मिळतील ही अपेक्षा थोडी अवास्तव आहे असं मला वाटतं.
अमेरिकेत सुद्धा जास्त लोकसंख्या असणारी शहरं बर्यापैकी अस्वच्छ असतात. उदा. न्युयॉर्क. मी येथे अनेक रस्त्यांवर कचरा टाकलेला बघितला आहे. लोक रस्त्याने खात फिरत असतात आणि अनेकदा खाद्यपदार्थ रस्त्यात टाकतात. सब-वे च्या गाड्यांमधे मल-मूत्र विसर्जन करतात.

छान लिहिलय! भारतात बाहेर घाण असतेच हे assume केल्याने स्वतः घाण केली तरी या लोकांना फरक पडत नाही. आणि एकदा सवयच झाली की वासही येत नाही आणि डोळ्यांनापण दिसत नाही.
>> दुसऱ्याचा विचार नाही म्हणून?
हेच त्यामागचे कारण वाटते (घाणीबरोबर अजुन बर्‍याच गोष्टींच्या मुळाशी हे कारण आहे... वाहतुकीचा प्रश्ण वै)
>> 'परदेशी फॅड' किंवा परदेशातून येऊन 'इथे शाईन मारतात'
ह्याला मात्र तयार रहा. आपल्याकडे fast-food, कपडे, भाषा, डिस्को, पब वै परदेशी चालेल पण अनुकरणीय गोष्टींवर मेहनत कोण घेणार नाही Angry . यांना फक्त Mercedes हवी manners नकोत.

मी स्वतः याबद्दल जागरुक आहे. घरच्यांनाही पटवलय. पण अनोळखी माणसाला सांगायचं काही जमत नाही... एकतर अशी (बिनडोक) माणसं बघितली की माझं डोकं सटकत, मग उगीच काहितरी बोलुन जाईन असं वाटतं. Sad
व्यक्तिगत पातळीवर पर्यावरणासाठी काय करू शकतो यावर या काही वेबसाईट: No Impact man, story of stuff

(३R) Reduce - Reuse - Recycle, यात Recycle च्या भरवश्यावर राहुन उपयोग नाही. Reduce हे सगळ्यात महत्वाचं... त्यासाठी सध्या मी कमित कमी packaging असलेली वस्तू घेतो. प्लॅस्टिक ऐवजी काचेच्या बाटल्यातलाच ज्युस घेतो. कचर्‍यासाठी वेगळ्या पिशव्या विकत घेत नाही. दुकानातुन पिशवी घेत नाही. वै वै

फ्रांस मधे याबाबत बरीच जागरुकता आहे. इथे दुकानातुन टिकाउ कापडी पिशव्या भेट म्हणुन दिल्या जातात. प्लॅस्टिक पिशव्यांवर क्षुल्लक का असेना पैसे आकारले जातात. या प्लॅस्टिक पिशव्यांवर देखिल नंतर कचर्‍यासाठी वापरा म्हणुन छापलेले असते. अगदी तरुणरक्त सोडले (बिचारे संक्रमण अवस्थेत असतात बहुतेक) तर लहान-मोठ्ठे कोणीच कचरा करताना दिसत नाही.

पण असे गृप अस्तित्वात असतील तर अजुन एक तयार करायची मला गरज वाटत नाही (Reduce-Reuse Wink ) (अर्थात तुला हवाय ते कार्य करणारा गृप मिळालाच नाही तर जरुर नवीन कर)
माझ्या ओळखितील एकांनी केलेली ही साईटः http://asahee09.ning.com/
बाकीच्यांना काही गृप माहिती असतील तर त्यांची सूची इथे तयार होउ शकेल.

Pages