नॅशनल पार्क ते कान्हेरी गुंफा

Submitted by Yo.Rocks on 25 April, 2011 - 06:48

भटक्या मायबोलीकरांचा भटकंती गटग करुया असे म्हणता म्हणता दोन तीन ट्रेक्स झाले.. पण सगळ्यांना एकत्र येण्यास जमेल तर शप्पथ.. असाच आतापर्यंतच्या आमच्या ट्रेक्सला मुकलेला पुण्याचा 'आशुचँप' आम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक होता.. तो अचानक मुंबईत आला.. अचानक त्याचा फोन आला.. नि विकेंडला काहीच प्लॅन नसताना अचानक रविवारी सकाळी कुलाब्याचे "सागर उपवन" गाठण्याचे ठरले.. पण अचानक प्लॅन चेंज झाला नि शेवटी आदल्या रात्री ठरले बोरिवलीच्या "नॅशनल पार्क" (संजय गांधी उद्यान )मध्ये भेटूया.. साहाजिकच सर्वात जास्त आनंद बोरिवलीकराला झाला होता.. एकतर सकाळीच ६.३०-७ च्या सुमारास भेटण्याचे ठरले होते.. तेव्हा मला सहाला उठले तरी खूप होते.. तिकडे ठाण्यात मुक्कामास असलेला आशुचँप आणि मुंबईचेच जिप्सी नि दिपक डी (आमच्या भाषेत 'डिडी') हे सगळे बाईक घेउन येणार होते..

ठरल्याप्रमाणे जिप्सी नि डिडी पहाटेच तयार.. पण मुंबईच्या गरमीला वैतागलेला आशुचँप मात्र 'आता कुठे झोप लागलीय' या अवस्थेत होता.. साहाजिकच यांचे तिथेच ७ वाजले.. इथे मी नॅशनल पार्कात प्रवेश घेउन मोकळा.. कोण यांची वाटत बघत बसतय.. Proud येतील तेव्हा भेटतील म्हणत एकटयाने जवळपासच्या परिसरात घुटमळू लागलो.. पहाटेच जॉगिंगला जाणारे जॉगर्स नि पाय मोकळे करणारे वॉकर्स आता परतीच्या वाटेला लागले होते.. तर नुकतेच आकाशात विराजमान झालेल्या सूर्यदेवांची किरणे गर्द झाडींच्या छप्परामधून जमिनीवर टेकण्यास आतूर झाले होती..

प्रचि१

- - - - - -
प्रचि२

अर्ध्यातासभरात दोन बाईक्स आल्या.. एकावर आशुचँप नि दुसर्‍या बाईकवर डिडी नि मागे जिप्सी.. म्हटले उन वाढण्याअगोदरच कान्हेरी उरकून घेऊ.. नि आम्ही कान्हेरीचा रस्ता धरला.. आमची भटकंतीला सुरवात झाली नि थोडे अंतर पुढे गेलो असू तर एका जागी आम्हाला थांबणे भाग पडले.. कारणच तसे होते.
प्रचि३

- - - - --
प्रचि४
<

वाट धुक्याची नव्हती.. बाजूला जाळ केलेल्या धुराची होती.. पण सूर्यकिरणांनी रंगत निर्माण केली नि साहाजिकच आमचे क्लिकींग सुरु झाले.. जिप्सी नि आशुचँप आपापले लेन्स लावून सज्ज झाले..

तिथून बाईक पुढे घेउन गेलो.. काही अंतरानेच आशुला बाईक हळू करायला सांगितली.. कारण त्या जागेत जंगलात मोकळी सोडलेली हरणे सकाळच्या वेळेत हमखास दिसतात.. नि नेमके हरिण नजरेस पडले.. पुन्हा एक स्टॉप.. दुरवर दिसणारे हरिण टिपण्यासाठी DSLR गँग (जिप्सी नि आशुचँप) फोटो काढण्यास सरावली.. तर मी नि डिडी तिथेच आजुबाजूस जवळून काही टिपण्यासारखे आहे का बघत घुटमळत राहीलो.. Proud

प्रचि ५

(जिप्सी नि आशुचँप आपापले अवजड अस्त्रे घेउन.. Wink )
- - -- - - -
हरिण जसजसे आत गेले तसे पाठोपाठ हे दोघेही गेले.. डिडीला म्हटले समोरुन बिबट्या येउदे म्हणजे येतील बाहेर पळत .. Wink जिप्सीने खुणावून सांगितले की एक नाही तर चार हरिण आहेत.. त्यांचे तिथे फोटोशूटचा प्रयत्न चालू असतानाच डिडीने जवळच सुक्या गवतावर विसावलेले सुंदर फुलपाखरू दाखवले.. हे अंतर माझ्या कॅमच्या टप्प्यात येउ शकत असल्याने मग माझे क्लिकींग सुरु झाले..

प्रचि६

आमचा इथेच बराच वेळ गेला.. म्हटले निघूया आता.. तिकडे कान्हेरी गुंफा चांगलेच उन खात गरम होत असणार.. आम्ही लागलीच निघालो.. पण पुन्हा एक स्टॉप लागला शिलोंडा ट्रेलला.. काय करणार या पार्कात पहिल्यांदा येणार्‍या आशुचँप नि डिडीला परिसराची थोडीफार माहिती द्यायची होती ना.. पण खरे कारण होते त्या ट्रेलच्या प्रवेशद्वारासमोरच असणार्‍या सोनबहावा झाडाचे.. झाडाला लागलेले पिवळे झुंबर मस्तच वाटत होते..

प्रचि७

आता इथे मात्र जास्त वेळ न दवडता आम्ही कान्हेरीकडे प्रयाण केले.. तसे गरमीने आमचा घामटा काढायला कधीच सुरवात केली होती.. लवकरच कान्हेरी गुंफाच्या परिसरात येउन पोहोचलो.. मग सुरु झाले कान्हेरी गुंफा निरीक्षण..

प्रचि८

प्रचि ९:कोरलेला पण मोडक्या अवस्थेत असलेला एक भलामोठा खांब

प्रचि१०:कान्हेरी गुंफाचे खास आकर्षण

- -
प्रचि११

---
प्रचि १२ :हे खालील स्तूप तर मस्तच

<

आम्ही सकाळीच लवकर आल्याने मनसोक्त फोटो काढायला मिळत होते.. गर्दी नव्हती अन्यथा ही जागा किंचाळ्या आरडाओरड करून दणदणून सोडतात.. कारण इथे घुमणारा आवाज.. वरिल फोटोत दिसणार्‍या खांबाच्या मागून सुद्धा चालण्यास जागा आहे.. पण अंधारापलिकडे काही दिसत नाही.. Happy

इथे असणार्‍या प्रत्येक खांबाच्या वरती वेगवेगळे कोरीव काम केलेले दिसून येते.. त्यातील काही..
प्रचि१३

- - - - -
प्रचि१४

- - - - -
प्रचि१५

- - - - - -
प्रचि१६

एकीकडे उकाडयाने पुरते हैराण झालो होतो तर गुंफामध्ये शिरल्यावर अजून घाम फुटत होता.. याच गुंफेच्या आवारात मग ग्रुप फोटो काढण्यात आला.. त्यासाठी सेटींग करणारा आशुचँप..
प्रचि१७

इथूनच मग आम्ही कान्हेरीच्या टॉपवर जाण्यास निघालो..

प्रचि१८

इथे येईस्तोवर बर्‍याच गुंफा लागल्या.. ते पाहून डिडी नि आशुचँप थक्कच झाले.. जर या गुंफाबद्दल अधिक माहीती जाणून घ्यायची असेल योग्य माहितीगार हवा सोबत.. पण ही मंडळी माझ्याबरोबर आल्याने त्यांनी फार अपेक्षा ठेवली नाही हे नशिब माझे.. Proud टॉप गाठला.. पण सकाळच्या १० चे उन मध्यदुपार झाल्यागत पडले होते तेव्हा लगेच जवळपासची गुहा बघून क्षणभर विश्रांती नि पेटपूजेचा कार्यक्रम पार पाडला..

तिथूनच मग पुढे पाण्याच्या टाक्या असणार्‍या वाटेने गेलो नि डोंगराच्या एका कडेला पोहोचलो.. जिथून तुलसी तलावाचा अतिशय छोटा भाग नजरेस पडत होता.. तर बाकी चोहोबाजूंनी जंगलाचा वेढा.. दृश्य बघण्यास मस्तच होते.. पण उन काही आम्हाला जास्त वेळ एका जागी उभे राहू देत नव्हते.. Proud

लागलीच मोर्चा वळवला.. पुन्हा एक सुंदर गुहा लागली.. पुन्हा क्षणभर विश्रांती.. नि मग आठवले उडीबाबा कार्यक्रम.. उडीबाबाचा मान अर्थात मुंबईचे पाहुणे म्हणजेच आशुचँपला देण्यात आला.. Proud

प्रचि१९

- - - --

तिथूनच मग मोर्चा त्या परिसरातील मंदीराकडे वळवला.. विशेष काही नाही.. मुर्ती नाही.. मंदीराची साफसफाईसुद्धा नाही .. भिंतीवरती नेहमीप्रमाणे रंगरंगोटी करून स्वतःची नावे लिहीलेली दिसतात मात्र.. ह्याच मंदीरात का महाशिवरात्रीला भक्तगण येतात ? माहित करुन घ्यायला हवे.. इथे झाडांच्या शीतलछायेचा आस्वाद घेता आला.. शांतता तर होतीच.. या परिसरात सीताअशोकाची झाडे फुलांनी मस्तच बहरली होती..
प्रचि२०

इथूनच मग आम्ही कान्हेरीवरील एका मुख्य गुंफेमध्ये गेलो.. प्रशस्त गुंफा आहे.. तेव्हा सभागृह असे म्हणतात..

प्रचि २१:या गुंफेचा बाहेरील भाग..

प्रचि२२:या गुहेचा आतील भाग..

प्रचि२३:याच गुहेच्या बाहेरील भागाची एक बाजू .. जिथेही सुंदर खांबांच्या पलीकडे कोरीव काम केलेले दिसते..

इथे काहीवेळ आराम करून आम्ही कलटी घेण्याचे ठरवले.. कान्हेरी परिसरातील उपहारगृहामध्ये थंडा घेउन कलटी मारण्याचे ठरवले.. आम्ही निघेस्तोवर कान्हेरीला जत्रेचे स्वरुप येत होते हे सांगणे नकोच.. रविवारी इथे खूपच गर्दी असते.. पावसाळ्यात येथील धबधब्यांमुळेतर हा पिकनिक स्पॉट म्हणूनच ठरला आहे.. साहाजिकच बेपर्वाईने कचरा केला जातो.. पण यावेळी मला वेगळेच चित्र दिसले.. जागोजागी वॉलेंटियर होते.. खाण्यास मनाई होती.. साफसफाई करणारे कामगार दिसत होते.. इति.. कदाचित पुढच्या महिन्यात असणार्‍या बौद्ध पौर्णिमेचे निमित्त असेल.. Happy नंतर येरे माझ्या मागल्या..

पावसात पुन्हा येउ म्हणत आम्ही निघालो.. जाता जाता आम्हाला खालील सरडेरावांनी दर्शन दिले.. उकाड्याने त्रासलेले जिप्सी नि आशूचँपने त्यांचे कॅमेरे काढण्यास आळस केला.. मग माझ्या कॅमेर्‍याने क्लिक करून त्या सरडयाला सलामी दिली.. Happy
प्रचि२४

कान्हेरी सोडले.. आता थेट नॅशनल पार्काच्या गेटच्या बाहेर असे ठरविले.. पण आता आलोच आहे तर संजय गांधी स्मारकाला भेट देउया म्हणत तिथे मोर्चा वळवला.. ही जागा 'स्मारक' म्हणून जेवढी प्रसिद्ध नाही तेवढी गांधी टोपी म्हणून सर्वज्ञात आहे.. कारण याचे बांधकाम घुमटाकार आहे.. नि घुमटाच्या खाली बसण्यास जागाही आहे.. इथे जाण्यास दोन वाटा आहेत.. एक पायर्‍यांची वाट तर एक गाडीरस्ता आहे.. हा परिसरदेखील सुंदरच.. त्यात सभोवताली बगिचा फुलवल्यामुळे सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.. विशेष म्हणजे कमळपुष्प नि तिथेच पाण्यात सोडलेले मासे..

प्रचि२५

- - - - - -
प्रचि२६

- - - - - -
प्रचि २७

इथून पुर्वेकडे जंगलाने वेढलेल्या डोंगररांगा दिसतात तर पश्चिमेकडे सिमेंटचे काँक्रीट जंगल नजरेस पडते..
प्रचि२८

(कांदिवली-बोरिवलीचा परिसर.. नि सर्वात मागे आपली उंची दाखवणारा गोराईचा ग्लोबल पॅगोडा)

इथे बर्‍यापैंकी वारा असल्याने आम्हाला तेवढाच दिलासा मिळाला.. आडवे पडलो तर मस्तच झोप लागेल इतके छान वाटत होते.. इथेच मग थोडीफार फोटोग्राफी आटपून शांतपणे बसून राहीलो.. तर आमच्यातला डिडी मात्र तिथल्याच बगिच्यामध्ये ह्या फुलावरून त्या फुलावर असे भुंग्याप्रमाणे फिरत फोटो टिपत होता.. शेवटी बाराच्या सुमारास लेटस गो केले..

एकंदर 'नॅशनल पार्क ते कान्हेरी गुंफा' अशी छोटी नि छान सफर झाली.. फक्त पक्षी दिसले नाही तेवढेच काय ते.. पण आशुचँपशी पहिल्यांदाच प्रत्यक्षात भेट झाली.. तसेपण पहिल्यांदाच भेटतोय असा फिल आमच्यात नसतोच मुळी.. Proud पुर्ण सफरमध्ये गप्पा भटकंतीवर होत्या हे सांगायला नकोच.. दरवेळी कोणी ना कोणी भटक्या भेटतो..नि मग 'हा गड, तो गड.. इकडे जायचेय.. ते करायचेय' असे प्लॅन पाडले जातातच.. Happy तो मायबोलीकरांचा भटकंती गटग तर कधीपासून रेंगाळतोय.. Proud सध्या 'विसापूर विसापूर' चाललेय वा अजुनकुठेतरी.... बघुया सगळ्यांना एकत्रे येण्यास कधी नि कितपत जमतेय ते.. Wink कब है ये पूनम की रात ??? Proud Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!
फोटो फ्रेश आलेत अगदी. Happy

सध्याची माझी अत्यंत आवडती जागा आहे कान्हेरी गुंफा. रिटायर झाल्यावर एका गुंफेत रहायला आवडेल. Proud

फोटो मस्त.

रैना तू रिटायर होईपर्यंत कान्हेरी गुंफा शिल्लक असतील का पण??? नाहीतर व्हॉलंटरी घेऊन जायचं ठरवं. Proud

आडो Lol
अगं त्यातील काही तर ख्रिस्तपूर्व काळातील आहेत, त्यामुळे आणखी तिनेक दशकं टिकतील आरामात. Proud

Happy छान !

मस्त फोटूगिरी!

ट्रेकिंगचं प्राथमिक शिक्षण नॅशनल पार्क, कान्हेरी गुहा परीसरातच घेतले होते त्याची आठवण झाली. Happy

मस्त फोटो. पण शिल्पांची पार रया गेलीय रे. आणि इतक्यात गरम होतेय ? अजून मे जायचाय. उन्हाळ्यात पाणी बघूनच ट्रेक करा रे.
इथे तूम्हाला डिकेमालीची झाडे दिसायला हवी होती. चाफ्यासारखीच फूले असतात.

कान्हेरीचे चित्रदर्शन सुंदरच. प्र.चि.२१ आणि २२ हे तत्कालीन ग्रंथालय आहे असे मानले जाते. ते लांबच लांब बुटके ओटे दिसतात ते ग्रंथ(अर्थात हस्तलिखिते) ठेवण्याच्या दगडी घडवंच्या आहेत. कान्हेरी येथील प्राचीन जलनियोजन अभ्यासण्याजोगे आहे. डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी प्रत्येक गुंफेसमोर खेळवले आहे. आणखी एक किरकोळ गोष्ट-- गांधी टोपी हे संजय गांधींचे स्मारक नसून महात्मा गांधींचे स्मारक आहे. तिथे तळघरात गांधीजींच्या रक्षेचा अंश असलेला कलश कित्येक वर्षेपर्यंत होता. नंतर तो बहुधा विसर्जित केला असावा.

सहीच रे योगेश...मस्त फोटो...
मला वाटते कान्हेरीला जाण्यात खरी मजा आहे ती सकाळी चालत जाण्यात...
१० वर्षांपुर्वी मी खुप वेळा नॅशनल पार्क गेट ते कान्हेरी चालत गेलो आहे...
माझ्या माहीतीनुसार कान्हेरी गुंफा समुह हा महाराष्ट्रातील सगळ्या लेणी समुहातील सर्वात जास्त लेण्यांचा समुह आहे (दुसरा नं आगाशिवच्या लेण्यांचा). साधारण पहील्या ते दहाव्या शतकातील या गुंफासमुहात विशेष असे, सहसा लेण्यांमध्ये न आढळणारे बुद्ध भिक्खुंचे कबरस्तान पण आढळले आहे.

सुंदर प्रचि आहेत. कान्हेरी गुंफामध्येच आमिर खान च्या इंक्रेडिबल इंडियाचे शुटिंग झाले होते वाटतं.

सगळ्यांचे मन:पुर्वक धन्यवाद Happy
आशू.. येउदे रे झब्बू..
तिथे तळघरात गांधीजींच्या रक्षेचा अंश असलेला कलश कित्येक वर्षेपर्यंत होता.. >> हिरा.. धन्यवाद माहितीबद्दल.. हे ठाऊक नव्हते..
मनोज.. कधी जायचे.. Happy जाउन येउन फक्त १२किमी.. चालत जाणे माझ्या आवडीचे.. Happy

रैना.. कुठली गुहा बुक करणार... Happy

मस्त Happy

आह... काय मस्त फोटो आहेत...
(कधी एकदा भारतात परत येतोय आणि असंच भटकतोय असं झालय!)

Pages