मला स्वच्छ भारतात राहायला आवडेल. तुम्हाला?

Submitted by सावली on 25 April, 2011 - 00:09

यावेळच्या भारतवारी मध्ये अशा अनेक गोष्टी दिसल्या त्याबद्दल काही बोलावसं वाटलं, काही करावसं वाटलं.
जास्त दिवस राहिल्याने गोष्टी जुन्याच पण नव्या दृष्टीने बघितल्या गेल्या आणि प्रत्येक वेळी बोलावसं वाटूनही भिडेपोटी बोलता आलंच नाही.

असेच काही प्रसंग
गेल्यागेल्या रंग पंचमी होती. त्याची आठवण मात्र मला फार खराब प्रकारे झाली. दोन तीन दिवस आधीपासून रस्त्यावर, आजूबाजूला सगळीकडेच छोट्या छोट्या प्लास्टिकच्या फुटलेल्या पिशव्या आणि त्याभोवती पाण्याचे ओघोळ दिसायला लागले. आधी कळेना कि सगळीकडे हा असा कचरा काय आहे? पण मग रंगपंचमी जवळ आल्याचे कळले. आता पिशव्या टाकायच्या आणि मग पावसाळ्यात पाणी तुंबले म्हणून रडायचे!!

रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सगळीकडे रंगच रंग. रंगीत आयुष्य जगण्यासाठी अशा खोट्या रंगाची जरुरी असतेच का हा प्रश्न पडलाच.

नंतर आलं क्रिकेट. पाकिस्तान विरुद्ध आणि फायनल मॅच दोन्ही साठी बऱ्याच सोसायट्यामध्ये मोठे स्क्रीन लावून एकत्र मॅच बघायचे प्रोग्राम झाले. वा वा! छान त्या निमित्ताने सगळे लोकं एकत्र येणार! मग जेवणखाणेही झाले एकत्रच.
दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी सकाळी जाऊन बघितल्यावर खायच्या प्लेट्स, कागदी/ प्लास्टिकचे कप, फटाक्याचे तुकडे आणि त्याचा कचरा अशी घाण ! तीही स्वत:ची मुलं जिथे संध्याकाळी खेळतात त्या ग्राउंडमध्येच.

स्टेशन वर गेलो होतो काही कामासाठी. तिथे तर डोळे बंद करूनच चालायचे. रुळ आणि प्ल्याटफॉर्म दोन्ही अत्यंत गलीच्छ. आणि लोक अजून कचरा टाकतातच आहेत. कोणालाच काही वाटत नाही.

शाळा शोधनाचाही कार्यक्रम केला यावेळी. काही शाळा बघून त्याच्या गेटमधूनच परत आले. इतका कचरा, घाण आणि दुर्गंधी.

ज्युपिटर हॉस्पिटल म्हणून एक नवीन हॉस्पिटल झालंय. तिथे गेल्यावर आश्चर्य वाटावं इतकं स्वच्छं, सुंदर. कुठे साधी धूळ नाही. हॉस्पिटलचा टिपिकल वास नाही. मात्र टॉयलेट मध्ये गेले तर लोकांनी सगळे टिश्यूपेपर इतस्तत: टाकून पाणी सांडवून घाण केलेलं. तिथले मॅनेजमेंट साफ करत असणारच. बाहेर बघून ते कळतच होतं. पण आलेल्या लोकांना इतकीही जाणीव नाही कि इतक्या स्वच्छं ठिकाणीही आपण घाण करतोय.

आपले एअरपोर्टही बऱ्यापैकी स्वच्छ आहे आता. लोकांनी तिथेही कचरा टाकू नये अशी अपेक्षा होती. तिथे विमानाची वाट बघत असताना, एक अगदी चांगल्या स्थितीतले दिसणारया कॉलेजला जाणाऱ्या वयातल्या मुलामुलींचा ग्रुप आला. बराच वेळ बसले होते. जाताना विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या संपवून रिकाम्या बाटल्या अक्षरश: सीटवर फेकून निघून गेले. कचऱ्याचा डबा अगदी समोरच होता. पण एकानेही त्रास घेतला नाही त्यापेक्षा फेकण्यात जास्त मजा आली त्यांना. नंतर तिथे बसणाऱ्या लोकांची पर्वा वगैरे नाहीच पण कचरा फेकल्याची लाजही नाही. मागे जाऊन सांगावसं वाटलं पण पुन्हा तेच. तसं करता आलं नाही.

सोसायटी मध्ये सॅंडपिट आहे. तिथे खेळायला गेलो तर थर्मोकोल ते प्लास्टिक हा सगळा कचरा मिक्स. दुसऱ्या दिवशी मीच एक पिशवी घेऊन गेले सगळा कचरा उचलून भरून डब्यात फेकला. आणि थोड्या वेळानेच एक शाळेतली मुलगी आणि तिची आई आल्या. मुलीला खायला एक कसलातरी खाऊ आणला होता. त्याची पिशवी फाडून वरचे टोक तीथेच टाकले तिने. खाऊ संपल्यावर रिकामी पिशवीही तिथेच सॅंडपिट मध्ये ! आताच मी मूक पणे इथला कचरा उचलला होता. या मुलीलाही बोलायला हवं होतं पण माझा धीर झालाच नाही. पण जाणवलं कि नं बोलता केलं तर ते वाया जाणार. कचरा टाकू नये याची जाणीवही करून द्यायला हवी.

घरात असं करतात का? घर आरशासारखं स्वच्छं हवं मग बाहेर घाण का चालते? घरात फळांची सालं , रिकाम्या पिशव्या आपण खाल्ल्याठिकाणी टाकत नाही ना? मग बाहेर का टाकतात? कळत नाही म्हणून? चुकून? कचरा दिसत नाही म्हणून? काही कायदा , दंड नाही म्हणून? जाणीव नाही, दुसऱ्याचा विचार नाही म्हणून?

बहुतेक शेवटचं खरं असावं. पण एक व्यक्ती म्हणूण मला जाणीव असली तरी काय करता येईल? मी स्वत: कचरा नं फेकून , किंवा अगदी स्वत: साफ करूनही लोकांना जाणवणारच नसेल तर अजून काहीतरी करायला हवं. वर उल्लेखलेल्या प्रसंगी मला काही बोलताच आले नाही ही माझी चूक आहेही. पण एक व्यक्ती म्हणून प्रत्यक्ष न सांगता अजून काही मार्गांनी किंवा एक ग्रुप , संघटना म्हणून सांगणे सोपे जाईल का?

मला सुचलेली कल्पना अशी कि
एखादी वेबसाईट बनवून त्यावरून लोकांमध्ये जागरुकता वाढवायची. आजकाल बरेचजण इंटरनेट वापरतात. तर कधी ना कधी त्यांच्या कडून हे वाचलं जाईल. सारखं वाचलं गेलं तर कुठेतरी जाणीवही होईल. वेबसाईट हा एक प्लाटफॉर्म असेल तर त्या नावाखाली अनेक छोटे छोटे ग्रुप बनवून आपापल्या सोसायट्यामध्ये, आपल्या मुलांच्या शाळांमध्ये या बद्दल बोलता येईल. आणि एकटेपणी बोलण्याची भीड पडणार नाही. शाळा कॉलेज मधील मुलांना याची जाणिव करुन दिली तर मुळातुनच स्वच्छतेची आवड असणारी पिढी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असं मला मनापासुन वाटतं.

तुम्हाला काय वाटतं? अजून काय करता येईल? तुमच्या पैकी किती जणांना यात काही भाग घ्यायला आवडेल? तुमच्या पैकी किती जणांना स्वच्छ भारतात राहायला आवडेल?

विनंती: परदेशात आपलेच लोक कसे वागतात पण भारतात कसे वागत नाहीत वगैरे वाद जरा बाजूला ठेवून, आपल्याला काय करता येईल यावर चर्चा करायला आवडेल.

२६-एप्रिल- अपडेट
मी काय ठरवले आहे

  • - पुन्हा परत जाईन तेव्हा सोसायटी मध्ये ग्रुप तयार करून आधी सोसायटी मध्येच सफाई करणे आणि त्या बद्दल जाणीव निर्माण करणे.
  • - सो. मध्ये जे शिक्षक असतील त्यांच्याशी या बाबत बोलणे. त्यांना जाणीव करून देणे. * हे आधीच सुरु केले आहे.
  • - फेसबुकवर एक ग्रुप तयार केला आहे. http://www.facebook.com/idonotlitter या ग्रुप मधून थोडा अवेअरनेस कदाचित करता येईल.
  • - या ग्रुप मार्फत सेलेब्रिटीना ही फेसबुक अकाउंट असल्यास संपर्क साधता येईल
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावली, चांगलं लिहिलंयस.

भारतात स्वच्छता हे एक 'फॅड' वाटत असावं लोकांना असं वाटतं. तू सांगितलेल्या मार्गांपैकी वेबसाईटपेक्षाही एखाद्या एरियातच छोटे छोटे ग्रूप्स ब नवून स्वच्छतेबद्दल लोकांच्या मनावर बिंबवणं जास्त गरजेचं आहे. शाळेत आपल्यालाही शिकवायचे की, हल्ली शिकवत नाहीत कां? कारण तरूण पिढी हल्ली जगभर फिरते, उघड्या डोळ्यांनी सगळं बघतेय पण मग आचरणात का आणत नाहीत ही मुलं?

मला स्वच्छ भारतात राहायला आवडेल. तुम्हाला?>>>

हो. मलाही स्वच्छ भारतात राहायला नक्कीच आवडेल.
मी घरात जेवढी स्वच्छता राखतो तेवढीच बाहेरही राखण्यास तयार आहे. किंबहुना राखत आहे.

गाडगे महाराजांना जे तेव्हापासूनच जाणवले होते ते आज का होईना आपल्याला प्राकर्षाने जाणवत आहे हे काहीतरी चांगले घडत असल्याचेच लक्षण आहे.

जागृती वाढवायला हवी आहे हे नक्कीच. मीही त्या प्रयासाचा एक भाग नक्कीच असेन!

दुसरयाने फेकलेला कचरा आपण उचलून कचरापेटीत टाकायचा, 'अ‍ॅक्शन स्पीक्स लाऊडर दॅन द वर्डस' ह्या संकल्पना कधी? जेव्हा अधिकार मागताना कर्तव्यांची सुद्धा जाणीव जागी असेल तेव्हा. आपण कचरा उचलत असताना काही लोकं निर्लज्जपणे हसतात. फार कमी लोकं अशी असतात ती मान खाली घालून सॉरी तरी पुटपुटतात. उद्देश त्यांना माफी मागायला लावायचा नसतो पण आपण काहीतरी बेशिस्तपणे वागलोय याची जाणीव होतेय एव्हढं कधीकधी पुरे होतं, काही लोकांना ती जाणीवही होत नाही. खाडीत निर्माल्य टाकू नका, कचरा फेकू नका हे तिथल्या तिथे सांगता येतं, त्या वेळेपुरता टाळता येतं, पण पुढे जाऊन ती लोक जबाबदारीने वागतीलच याची खात्री मी कशी देऊ शकते? इन फॅक्ट कोणीच देऊ शकणार नाही.

अगं जागरुकतेचं काम होत नाहीये असं वाटतंय का तुला? गणपती विसर्जनानंतर चौपाट्या साफ करायला किती हात, किती संस्था साळा पुढे सरसावतात हे बघितले असशीलच तू. पण ह्या बातम्या पेपरातून वाचणारा नागरीक त्यातून योग्य तो धडा घेत नाही ही रड आहे. रंगपंचमी ला केलेल्या कचरा ,महापालिकेने आपण भरलेल्या करातून ठेवलेले सफाई-कामगार साफ करतीलच की -ही मानसिकता. आकाशच फ़ाटलेय तर ठिगळ कुठेकुठे लावणार अशी अवस्था आहे सध्या. जर ही भाषा समजत नसेल तर मग सहज समजणारी कायद्याची भाषाच वापरायला हवी.सरसकट कायदा केला, थुंकण्यावर बंदी घातली, उघड्यावर कचरा टाकणारयांना दंड लावला तर हे प्रकार आपसूकच कमी होतील असं वाटतं.

लोकांना आपले अधिकार बरोब्बर ठाऊक असतात पण मूलभूत कर्तव्यांच्या नावाने इल्ले. कर भरला की इतिकर्तव्यता असं वाटतं त्यांना. 'सार्वजनिक मालमत्ता टिकवण्यास सहाय्य करणे' हे आपलं कर्तव्य आहे. पण मूलभूत कर्तव्य पार न पाडणारयांना शिक्षा होऊ शकते हे माहीत नाहीये आणि तेच माहीती करुन द्यायची गरज आहे.

आज गावच्या गावं हागीनदारी मुक्त झाली पण मुंबईत अजूनही रेल्वे ट्रॅकचाच वापर शौचाकरता केला जातो. लहान मुलाला लेज चं रॅपर ट्रेनच्या खिडकीतून बाहेर फेक म्हणून सांगणारी आई, थुंकणारे पोलिस कर्मचारी, जनता, भाईंदरच्या खाडीत निर्माल्य फेकणारया बाया-कितीतरी उदाहरणं देता येतील.तू म्हणतेस तसं करता येईल पण ते अशा लोकांपर्यंत पोहोचणार आहे? कोण त्यांना ट्रॅकवरुन उठवायला जाणारेय? कित्येकदा समोर स्वच्छतागृह दिसतंय तरी लोकं ट्रॅकवरच बसलीयेत असं दृश्य असतं. त्या आईला एकदा समजावून सांगता येईल पण ती पुढे असं करणार नाही याची खात्री कुणी द्यावी?

इतक्या टोकाला गेलेल्या परिस्थितीत मला दंडाचाच उपाय योग्य वाटतो. अ‍ॅटलीस्ट मोठमोठ्या महानगरात तरी- जिथे स्वच्छतागृहं, कचरापेट्या नाहीत अशी ओरड करता येणार नाही. इंफ्रास्ट्रक्चर आहे पण जाणिवेचा अभाव आहे अशा ठिकाणी.

मागच्या वर्षी काही कामाने बान्द्र्याच्या रजिस्ट्रेशन ऑफिस मधे गेलो असता लक्षात आले कि एव्हढ्या मोठ्या आवारात दूर दूर पर्यन्त नावालाही डस्ट बिन्स दिसत नव्हत्या.. (नाईलाजाने) विझलेल्या सिगारेट्स, चहा पिऊन संपलेले प्लॅस्टिकचे लहानगे ग्लासेस लोकं उभ्या जागी त्यातल्या त्यात कोपरा पाहून फेकत होते. Sad Sad जोडीला कागदाचे कपटे, केळीची साले ,रिकाम्या पाण्याच्या बाटल्या इ.इ. ढीग तर होतेच!!)
खरच आपल्या देशातील लोकांना स्वच्छतेचे धडे गिरवायची भयंकर आवश्यकता आहे.
सोसायटीतील झाडूवाले मजेत हॉकी खेळल्या सारखे डावी कडची धूळ उजवीकडे तर उजवीकडची डावीकडे मजेत सरकवून चालू लागतात. तिथे राहणारे लोकं ही दुर्लक्ष करून बाजूने निघून जातात.
प्रत्येक सोसायटीने सीरियसली स्वच्छतेची मोहीम हाती घेतली तर .. दर रविवारी मुलाबाळांना हाताशी धरून आसपासचा परिसर स्वच्छ करायला सुरुवात करायची.. आपोआपच उस्फूर्तपणे अजून ही लोकं येऊन जॉईन होतील . निदान कचरा करणार्‍यांना पुढच्या वेळी कचरा टाकताना लाज तरी वाटेल.

मणीला अनुमोदन.

नुसतंच भारतातल्या लोकांना दोष देऊन काहीच उपयोग नाही. भारतातली अस्वच्छता आणि परदेशातली स्वच्छता याचा तुलनात्मक अभ्यास केला आहे का? मणी म्हणाल्याप्रमाणे 'सफाई कामगार करतील की साफ, आम्ही का करायचं?' ही मानसिकता बदलणं अत्यंत आवश्यक आहे. ही जागरूकता त्या त्या गावाच्या म. न. पाने, नगरसेवकांनी आणायलाच हवी. नगरसेवकांनी विकासकामांमधील लोण्यापेक्षा ह्या गोष्टीकडे अधिक लक्ष दिलं तर फायद्याचं होईल. नागरीकांची गार्‍हाणी सरकारपर्यंत पोचवायचं काम नगरसेवकांचं, मग त्यांनीच सरकारचं गार्‍हाणं नागरीकांपर्यंत पोचवायला काय हरकत आहे? आज देशात इतके लोकं बेकार बसले आहेत, त्यांना नाक्यानाक्यांवर उभे करा, थुंकणार्‍या, कचरा फेकणार्‍या, मूत्रविसर्जन करणार्‍या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे त्यांना अधिकार द्या. त्या वसूल होणार्‍या दंडातूनच त्यांचा पगार भागेल याची १००% गॅरंटी.

आडो, नरेंद्र गोळे, मणि धन्यवाद.
मणि दंड करावा लागेल मान्य आहे. पण केवळ दंड करुन समस्या सुटणार असे वाटत नाही. कदाचित लाच देण्या आणि घेण्याचे आणखी नविन मार्ग मिळतील. जे लोक किमान शिक्षित आहेत त्या लोकांपर्यंत तरी जाणीव पोचवायला हवी. ज्यांना केवळ 'ये पब्लिक का प्रॉपर्टी है. हम कुछ भी करेगा'
इतकच कळवुन घ्यायचे असते त्यांना दंड आणि नियम हवेतच.

एक प्रसंग सांगते -
सिग्नल ला उभे होतो. बाजुला (सुस्थितीतले) आई आणि एक छोटा मुलगाही उभा होता. मुलाने आईला विचारले सिग्नलला गाड्या का थांबतात. आईने काय उत्तर द्यावे 'नाहीतर पोलिस पकडतात म्हणुन!' म्हणजे आता केवळ पोलिस बघत असेल त्यावेळी नियम पाळून इतर वेळी मनमानी करता येते असे मुलाला वाटल्यास काय चुक.
म्हणजे अशी मानसिकता कळत नकळत बनत जाते. म्हणुन केवळ नियम आणि दंड यात न बसवता मनालाच स्वच्छतेची सवयही लावायला हवी असं मला वाटतं.

वर्षू नील हो ते करता येईल Happy
मंजूडी,
नाही मी दोष कुठेच दिलेला नाही. मी म्हणतेय सगळे मिळुन हि जाणिव निर्माण करुयात.
तुझी कल्पनाही चांगली आहे पण सरकारवर, नगरसेवकांवर अवलंबुन काम कितीशी होणार? तशी होणारी असती तर आता पर्यंत झालीही असती म्हणुनच आपणही आपल्याकडून काही प्रयत्न करायला हवा असे वाटते.

मलाही ह्या गोष्टीचा खुप त्रास होतो. आता येतानाच बघितले, उड्डाणपुल झाडणा-या माणसाने त्याच्यावरचा कचरा उचलुन खाली फेकुन दिला, माझ्या पुढचा मोटरसायकलवीर थोडक्यात बचावला. नाहीतर मातीची आंघोळ घडली असती त्याला. तसेच अजुन पुढे गेले तर गाडीतुन काचा खाली करुन आतले कागद बाहेर रस्त्यावर.... मी चक्क मर्सिडीज गाडीतुनही रस्त्यावर प्लेटी आणि चहाचे कप एक्स्प्रेसवेवर टाकणरे महाभाग बघितले आहेत.

माझ्या बाजुने हे थांबवण्यासाठी मी काय करु शकते? तर उत्तर काही नाही. कारण इथे लोकशाही आहे. मी कधी कोणाला म्हटले कचरा टोपलीत टाका तर लोक उद्धटपणे तुमचे काय जातेय किंवा इथे आधीच इतका कचरा पडलाय, आमच्या एका पिशवीने काय होणार अशी उत्तरे देतात. रेल्वेत संत्री खाऊन साली पायाखाली टाकणा-या लोकांना साली पिशवीत ठेवा म्हटले तर ते पायाने साली सीटखाली ढकलतात.

माझ्या घरातल्यांना मात्र मी शिस्त लाऊ शकते. माझ्या मुलीला अगदी लहानपणापासुनच कचरापेटीतच कचरा टाकायची इतकी सवय लावलीय की ती कचरापेटी सापडली नाही तर आइसक्रिमचे कागद वगैरे तसेच हातात घेऊन फिरते. माझ्यासोबत राहणारा एक चुलतभाऊ सहा वर्षांपुर्वी गावाहून मुंबईत आला. त्याला रस्त्यात थुंकायची, नको असलेले तिथेच टाकायची इतकी सवय होती की त्याला बदलायला मला दोन वर्षे लागली. आता तो तर कुठे काहीही कचरा टाकतच नाही पण कुठे बाहेर फिरायला गेल्यावर त्याच्या घरातल्यांवरही बारीक लक्ष ठेऊन राहतो. गाडीत खायची पिशवी उघडली की त्यातलीच एक पिशवी कच-याची होते. सगळा कचरा त्या एका पिशवीत गोळा करायचा आणि मग कुठे थांबले की कचरापेटी शोधुन त्यात ही पिशवी टाकायची. अर्थात प्लेस्टिक पिशवी कचराकुंडीत टाकणे हेही वाईट. त्या पिशव्या टाळायचाही शक्य तितका प्रयत्न चालु आहे. एकुणच कचरा योजाटा ची एवढी सवय झालीय की घरातल्या एकाही व्यक्तीकडुन तो इतरत्र टाकला जातच नाही .

मी माझ्यापुरती माझ्या घराला शिस्त लावलीय. नातेवाईकांना जमेल तेवढी लावायचा प्रयत्न करते. माझ्या समोरतरी कोणाला बाहेर कुठेही कचराकुंडीशिवाय कचरा टाकु देत नाही.

बाकी इतरांचे काय करणार? इथे कोणाला काही बोलून उपयोग नाही. परवा सकाळी बाहेर फिरायला पडले तेव्हा एका महाभागाला त्याच्या कुत्र्याला प्रातर्विधीसाठी मुद्दाम रस्त्यावर घेऊन येताना पाहिले. कुत्र्याच्या जातीवरुन आणि त्या महाभागाच्या अवतारावरुन दोघेही श्रीमंताघरचे वाटत होते. घरातल्या एका टॉयलेटमध्ये कुत्र्याची सोय लावणे सहजशक्य असतानाही त्यांना रस्ता सोईचा वाटतो. कुठेतरी वाचलेले - काही देशांमध्ये रस्त्यावर आपले कुत्रे घेऊन आल्यास सोबत प्लॅस्टिक पिशवीही बाळगावी लागते म्हणुन. सकाळीसकाळी तेच आठवले आणि ह्या जाड्यालाही पिशवी बाळगुन कुत्र्याची घाण भरायला लावलेय कोणीतरी असे दृष्य डोळ्यासमोर आले.

आपन स्वतः प्रयत्न करायला हवा............मागे कॉलेज मधे असताना आम्ही एक उपक्रम राबवलेला.....
स्टेशन वर उभे राहुन कचरा पेट्या ठेवलेल्या.......त्यात जो कोणी येवुन कचरा टाकायचा त्याचा टाळ्यांच्या गजरात सत्कार होत असे........ समोरच्या व्यक्ति ला आपण फार मोठे काम केल्या सारखे वाटायचे.. समाधान वाटायचे......

वेब साइट उघडुन जे लोक कचारा बाहेर टाकतात त्यांचे फोटो प्रसिध्द करु.....म्हणजे इतरांना सुध्दा ती लोक कळतील...... Happy

आज देशात इतके लोकं बेकार बसले आहेत, त्यांना नाक्यानाक्यांवर उभे करा, थुंकणार्‍या, कचरा फेकणार्‍या, मूत्रविसर्जन करणार्‍या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे त्यांना अधिकार द्या. त्या वसूल होणार्‍या दंडातूनच त्यांचा पगार भागेल याची १००% गॅरंटी.

१००% काम होईल याची गॅरँटी. नव्यामुंबईत ट्रॅफिक पोलिस असेच खाजगी लोकांचा वापर करुन चुकीच्या जागी पार्किग करणा-यांच्या गाड्या उचलतात. परवा पैसे काढायचे होते म्हणुन एका एटीएमसमोर घाईघाईत गाडी लावली आणि आत जात होते तोच एटीएमसमोर खुर्ची टाकुन बसलेल्या एकाने माझ्याकडे पाहातपाहात मोबाईल कानाला लावला आणि फोनवर 'अरे जल्दी आ, एक गाडी खडी है' हा निरोप दिला. नक्की काय होतेय हे पाहण्यासाठी मागे वळुन पाहते तर टो वेहीकल येतेय माझ्या गाडीच्या दिशेने. धावत गाडीत जाऊन बसले आणि वळणावरच्या पार्किंग्मध्ये जाऊन गाडी लावली आणि मग एटिएम मध्ये गेले. अशी दहशत निर्माण केली तर कोण करेल चुकीच्या जागी पार्किंग?? तसेच थुंकल्यावर लगेच मागे १०० रुपये वसुन करणारा उभा राहिला तर सगळे बंद करतील थुंकायचे.

सावली कित्ती म्हणुन धन्यवाद देउ तुला? याच आशयाचा धागा सुरु करण्याकरीता किती दिवस विचार चालु होता.
अग मला १ कळत नाही, लोकांना अस्वच्छता दिसत नाही व सांगुनही कळत नाही. (अव्यवस्थीत पणा नाही, अस्वच्छपणा म्हणतेय मी).
१ उदा. मुद्दामच डीटेल्स देतेय, ती व्यक्ती चुकुन वाचत असेल तर लाज वाटो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. (अर्थात अशा व्यक्ती धाग्याचे नाव वाचुन इथे येणारही नाहीत).
मी वाशीला जाते, ठाणेहुन. १दिवस घरी येत होते. मस्त थाडथाड विंग्लीश फाडणार्‍या ३ पोरी गाडीत. ५-५ रु, चे ते कराम-कुरुमचे २ पॅकेट त्यांनी घेतले.
१ संपवले व पिशवी बाहेर टाकणार तोच माझी नजर गेली. (मी लक्ष ठेवुनच होते कारण पुढचा सीन एक्सपेकटेड होता.) मी त्या मुलीला शांतपणे सांगितले -
मी - do not throw the plastic outside like this.
ती - then where should i keep the empty bags?
मी - there are dust bin provided everywhere.
ती - oh but i can't c any here? (we were sitting in train)
मी - there are there on each and every platform & your n my home also has 1. if you can not carry it give that to me i know where the dust bins are and i will throw the same in that. (बहुदा ईथेच माझा शहाणपणा नडला. तिने चक्क ती रीकामी पिशवी मला दिली. तद्दनंतर त्यांनी दुसरे पाकीत पोटात रिकामे केले, तोवर ठाणे आले होते व मी उतरायचे म्हणुन पॅसेज मधे आले होते. मागुन शुक शुक - तीच मुलगी -
ती - will you take this bag as well and throw wherever you are gonna throw the other one?
आता सांगा काय बोलायचे? ही मुले हेच घरुन शिकतात का? की आम्ही / आमचे आई बाबा / शिक्षक / आत्ताचे आई बाबा यांना हे जाणवत नाहीये? हल्ली आई लोक मस्त पोरांना चॉकलेट देतात व वरील कागद सीट खाली वा खिडकीतुन बाहेर टाकतात मग मुलांनी कोठले आदर्श ठेवायचे?

सरसकट कायदा केला, थुंकण्यावर बंदी घातली, उघड्यावर कचरा टाकणारयांना दंड लावला तर हे प्रकार आपसूकच कमी होतील << असं वाटणं साहाजीक आहे पण ... असा कायदाही त्यावर दंडाची तरतूद पुणे महापालीकेने केला आहे पण त्याची अंमलबजावणी मात्र आजिबात होत नाही.

मागच्या वर्षी काही कामाने बान्द्र्याच्या रजिस्ट्रेशन ऑफिस मधे गेलो असता लक्षात आले कि एव्हढ्या मोठ्या आवारात दूर दूर पर्यन्त नावालाही डस्ट बिन्स दिसत नव्हत्या.. (नाईलाजाने) विझलेल्या सिगारेट्स,<<< सरकारी ऑफिसमधे हे अपेक्षीतच नाहीये
सार्वजनीक ठिकाणी धुम्रपानास बंदिचा न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा त्यावर कारवाई करणारे प्रशासन ढिम्म पडून आहे.

एखाद्या एरियातच छोटे छोटे ग्रूप्स ब नवून स्वच्छतेबद्दल लोकांच्या मनावर बिंबवणं जास्त गरजेचं आहे.<< हा सगळ्यात चांगला मार्ग होऊ शकतो.

कुठेतरी वाचलेले - काही देशांमध्ये रस्त्यावर आपले कुत्रे घेऊन आल्यास सोबत प्लॅस्टिक पिशवीही बाळगावी लागते म्हणुन.
---- जागरुक लोकं कुत्र्याला फिरायला सोबत नेतांना पिशवी तसेच gloves ठेवतात... जेणे करुन सार्वजनिक जागा स्वच्छ रहाव्यात. हे मी रोज अनुभवतो आहे.

१. मी मुंबईला असतांना कचर्‍याची भली मोठी कुंडी नेहेमीच ओतप्रोत भरलेली बघितली आहे... आता पुढचा कचरा टाकणारा कचरा टाकेल तर कुठे? तो जरी प्रामाणिक असला तरी त्याला पर्याय काय आहेत (कचरा घरी परत घेऊन जाणे?)?
२. काही ठिकाणी कचरा कुंडी हा पर्यायच नसणे
३. सर्व सुविधा असल्यावरही कचरा कुंडित टाकण्याची तसदी न घेणे. समाजातल्या लोकांच्या स्वच्छते बद्दलच्या जाणिवा अति बोथट झाल्या आहेत. रेल्वेने प्रवास करतांना मुंबईला गाडी स्वच्छ असते, काही तासातच कचरा बाका खाली दिसतो. ७-८ तासात तर कचर्‍यामधुनच मार्ग काढावा लागतो...

सर्वांना स्वच्छता पाळण्यासाठी शुभेच्छा...

.

मी चक्क मर्सिडीज गाडीतुनही रस्त्यावर प्लेटी आणि चहाचे कप एक्स्प्रेसवेवर टाकणरे महाभाग बघितले आहेत.>>>>
अगदी. अग म्हणतात ना मोठे तितके खोटे.

माझ्या बाजुने हे थांबवण्यासाठी मी काय करु शकते? तर उत्तर काही नाही. कारण इथे लोकशाही आहे. मी कधी कोणाला म्हटले कचरा टोपलीत टाका तर लोक उद्धटपणे तुमचे काय जातेय किंवा इथे आधीच इतका कचरा पडलाय, आमच्या एका पिशवीने काय होणार अशी उत्तरे देतात. रेल्वेत संत्री खाऊन साली पायाखाली टाकणा-या लोकांना साली पिशवीत ठेवा म्हटले तर ते पायाने साली सीटखाली ढकलतात.>>> मला तर कोणितरी सांगीतले म्हणे - रुळाखालील खडी भरताना मुद्दाम शॉक अ‍ॅबसॉर्बन्ट म्हणुन कागद घालतात. (in detail study :P)

असेच प्रश्नोत्तरे -
प्र - जर dust-bin च्या पिशव्या चंगल्या नाहीत तर सरकार बंदी का नाही आणत?
उ - सरकार तर दारु-सिगारेट वरही बंदी नाही आणत. मग ती सुरु करा तुम्ही.
प्र - मग ग्राहक संघ या पिश व्या का विकतात?
उ - ---- मला नाहि माहिती. ईथे आहे का कोणी ग्राहक वाले?

नको असुनही कधिकधि प्लॅस्टीकच्या पिशव्या येतात. जसे दुधाच्या. त्या री-युज होण्यापेक्षा बीन मधे बेसला का वापरत नाही लोक? स्पेशली त्या काळ्या पिशव्या का विकत घ्या? नाहीतर बीन धुवायचा ना २-३ दिवसात १दा. काय हरकत आहे? मुळात प्लॅस्टीकचा वापर कमी केला तर रीसायकल करायला प्लॅस्टीक कमी मिळेल लोकांना. (I hope this.)

दोन मुख्य अडथळे हेच आहेत की, जाणीव व अंमल.
लोकांना जाणीव नसते व त्यामुळे अंमल कमी होतो.
जाणीव हिच की ,आपले घर स्वच्छ ठेवतो तर बाहेर का घाण करावी. कारण त्यांच्यामते बाहेर इतकी घाण आहे तर आपण केले तर काय इतके?

त्यात कायदा व भ्रष्टाचार भरलेल्या ठिकाणी हे होते. बाहेरच्या देशात असे केले तर कायद्याने दंड होतो. आपल्या इथे असे कायदे आणले तरी भ्रष्ट कर्मचारी जो घाण करणार्‍यावर पाळत ठेवण्यासाठी असतो तोच पैसे खाणार.. मग काय होणार.
ह्याबरोबरच उदय ह्यांनी म्हटलेले १ नंबर कारण.

सार्वजनिक ठिकाणीच कचरे भरून कचराकुंडी वहात असते. त्यातच भटके कुत्रे, गायी , मांजरी अश्या ठिकाणी फिरणार.

मला बँकॉक मधला प्रसंग आठवला. तिथल्या स्वच्छतेच्या अभियानाबद्दल माझ्या गाईडने मला सांगितले ते असे.
तिथल्या घराची पुढची बाजू रस्त्यावर आणि मागची बाजू नदीत असे होते. तरीही नदीचे पाणी स्वच्छ होते.
त्यात कुणीही कपडे वगैरे धूत नाहीत कि भांडी घासत नाहीत. यासाठी वेगळी पाईपलाइन दिली आहे. पण महत्वाचे म्हणजे असे लोकशिक्षण देण्यात आले कि, जर नदी खराब केलीत तर मासे जिवंत राहणार नाहीत, आणि तेच तर त्यांचे मुख्य अन्न आहे.
तिथे रस्त्यावर पण घाण दिसली नाही. अगदी खाद्यपदार्थांच्या हातगाड्या असल्यातरी तिथे घाण नसे. त्यावर गाईडने सांगितले कि, पर्यटकांना अस्वच्छता आवडत नाही. परिसर अस्वच्छ ठेवलात तर पर्यटक येणार नाहीत. आणि पर्यटकांशिवाय त्यांचे चालणारच नसल्याने हि मात्रा लागू पडली. तसेच पोलिसांना दंड करण्याचे अधिकार दिले. तसेच पोलिस नीट काम करत आहेत कि नाहीत ते बघण्यासाठी वेगळी यंत्रणा राबवली.

ओमानमधे पाऊस पुरेसा पडत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी खेडेगावातील लोक, नैसर्गिक झर्‍यांवर अवलंबून असतात. या झर्‍याचे पाणी पाटाने आठ दहा खेड्यात फिरवलेले असते (त्याला फलाज म्हणतात.) त्यातले पाणी अतिशय स्वच्छ असते. कुठलीही बाई त्यात काही धुणार नाही, तर त्यातले पाणी घेऊन घरात धुणी भांडी करेल. आपण पाणी खराब केले तर खालच्या खेड्यांना चांगले पाणी मिळणार नाही, हि भावना कायम असते. तसेच हे पाणी नेहमीच पुरेसे असते असे नाही, त्यामूळे त्यांचा प्राधान्यक्रम ठरला आहे (पिण्यासाठी, गुरांसाठी, शेतीसाठी, अंघोळीसाठी) हा क्रम कटाक्षाने पाळला जातो.

तर पुरेसा रेटा असला तर हि स्वच्छता आपसूक पाळली जाते.
आपल्याकडे कचरा करणार्‍यांना दंड, कचरा गोळा करण्यासाठी चार्जेस वगैरे कागदोपत्रीच राहिलेत.
कचरा गोळा करुन उपजीविका करणारे अनेक आहेत. त्यांना ओळखपत्र वगैरे देऊन थेट घरातूनच कचरा गोळा करण्याची (किंवा सोसायटी मधूनच) मुभा द्यावी, म्हणजे त्यांना कचरा चिवडत बसावे लागणार नाही. कंपोस्ट करायची संयंत्र बसवायची सक्ती प्रत्येक सोसायटीला करावी.
आणि मुख्य म्हणजे जाहिरातदारांना स्वच्छतेचा प्रसार करायची सक्ती करावी. कोकाकोलाच्या १० जाहिरातींपैकी एक जरी सामाजिक स्वच्छतेबद्दल असती, तरी बरेच काही साधता आले असते.

परवाचा प्रसंग, PMT बसमधे एका माणसाने खिडकीत काचेच्या खाली काच पडू नये म्हणून एक खिट्टि सारखं असतं त्याला स्वतःची पिशवी अडकवली होती, मला अगदी राहवलं नाही म्हणून मी सांगितलं , तर म्हणे हलकी आहे, मी सरळ हातात घेतली आणि म्हणाले की ह्या वजनाने ही खिट्टी तुटली तर PMT परत लावेल ह्याची काय गॅरेंटी आणि मग पावसात खिडक्या लागत नाही म्हणून कोण ओरडेल ? गैरसोय कोणाची होणार ? पटलं का नाही माहीत नाही पण त्याने पिशवी काढली. (स्वच्छतेविषयी नाहीये, पण एकंदर जी अनास्था दिसून येते त्याविषयी आहे)

सावली,
उत्तम लेख.
पण वरच्या अनेक प्रतिसादातही दिसत आहे त्याप्रमाणे, मोठे लोक, आईवडीलच लहान मुलांसमोर कचरा फेकतात,
तर त्या लहान मुलांनी काय आदर्श घ्यायचा?

माझ्या डोक्यात आलेला उपाय-
असामी असामी ज्यांनी ऐकलं असेल त्यांना धोडो जोशी आणि त्यांचा मुलगा शंकर्‍या यांचा चौपाटीवरचा संवाद आठवत असेलच. परत येताना, 'स्टॉप फादर स्टॉप.रस्ता ओलांडू नये असा सिग्नल लागलाय'.
असेच कचर्‍याच्या बाबतही घडू शकते. नव्हे घडलेलं मी पाहिलं आहे.
एका लहान मुलाने पुण्यात त्याच्या आईला सांगितलं होतं, 'थ्रोइंग वेस्ट ऑन रोड इज नॉट गुड'.
त्यामुळे लहान मुलांच्यात ही जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे असे वाटते.

मी माझ्या भाच्याबरोबर(वय ६) कुठेही जाताना एक कॅरी बॅग जवळ ठेवतो, काहीही घेऊन खाल्लं, तरी त्याचे कव्हर्स त्या कॅरी बॅगमध्ये टाकायची त्याला सवय लावलीये. ती कॅरी बॅग घरी गेलं की घरच्या कचरापेटीत किंवा येता-जाता दुसरी एखादी कचरापेटी दिसली तर तिथे टाकतो.

सुधारणा व्हायला वेळ लागणार हे मान्य, पण आशावादी राहून सुरुवात करायला हवी !
(वर मोनाली यांनी दिलेलं उदाहरण मात्र संतापजनकच आहे.)

अगदी खरं ग सावली. आता आता नवी पिढी शाळेतून स्वच्छतेचे धडे घेतेय. पण होतं काय की आधीच्या पिढीला असे धडे न मिळाल्याने त्यांची मानसिकता बदलली नाहीये.

अतिशय योग्य धागा...
सक्ती करूनही फारसा उपयोग नाही
आपल्याकडे किती नियम आहेत आणि ते कीती पाळले जातात. सिग्नलला पोलिस उभा असेल तरच तो पाळण्याची आपली मनोवृत्ती. त्यामुळे दंडाच्या भितीने काही ठिकाणी लोक स्वच्छता पाळतील. (त्यातही पोलिस अधिकारी, राजकारणी, पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी, शासकीय कर्मचारी असे सन्माननीय अपवाद आहेत जे कुणालाच जुमानत नाहीत.)
माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून काढलेला निष्कर्ष हाच की प्रबोधन करणे हे अतिशय वेळखाऊ आणि दृश्य परिणाम अत्यंत कमी असलेले साधन आहे.
मोनालीपच्या उदाहरणाशी साम्य असलेली लोक मी कितीतरी वेळेला पाहिली आहेत. ट्रेकिंग किंवा प्रवासात मी कधीच बरोबरच्यांना कचरा करू देत नाही. प्रवासासाठी निघतानाच मी घरून एक पिशवी बरोबर घेतो आणि त्यात सर्व कागद, साली आणि बाकीचा कचरा टाकतो. आणि आत्तापर्यंतचा अनुभव असा की लोकांना त्याचे काही वाटतच नाही पण वर पुन्हा टोमणेही मारले जातात. तुझ्या एका पिशवीने काय लगेच स्वच्छता होणार आहे का. त्यावर माझे उत्तर असते की ही एक सुरूवात आहे. माझे बघून आणखी चारजण असे करतील. पण दुर्दैवाने सांगावेसे वाटते की अजुनही मला चारजण असे भेटले नाहीत.

आशुचॅंप, प्रवासात जवळ पिशवी ठेवून सगळा कचरा त्यात भरण्याबद्दल अगदी अनुमोदन. मी, माझे काही मित्र मैत्रिणी आणि काही नातेवाईक हे आवर्जून करतोच. अजूनही काही करत असतील. Happy

सावली, उत्तम धागा. Happy
लोक ऐकत नाहीत, उलट तु.क. फेकतात हे मात्र अगदी खरंय.
२६ जुलैच्या मुंबईला झोडपणार्‍या पावसाचा आणि तुंबलेल्या पाण्यामुळे झालेल्या प्रचंड हानीचा अनुभव ज्यांनी घेतलाय त्यांना जास्त जाणवेल ह्यातील गंभीरता. येता-जाता ट्रेनच्या खिडकीतून बाहेर टाकलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा पराक्रम पावसाळ्यात दिसून येतो.
स्वच्छतेची सुरूवात प्रत्येकाने स्वतःपासूनच करायला हवी.
सोबत एक बॅग ठेवून त्यात कचरा साठवून घरी आल्यावर टाकणे हा सगळ्यात चांगला उपाय.

खूपच मस्त धागा आहे. पण खरंच आपल्या भारतात यातलं काही एक होऊ शकेल असं वाटत नाही. आपण आपल्यापासून सुरूवात करावी हे उत्तम. आशुचॅम्प म्हणतात त्याप्रमाणे मी ही 'चार जणांची' वाट बघत असते पण कोणी भेटत नाही.
लहानपणीच अशा सवयी लावलेल्या चांगल्या असतात हे मी माझ्या ४ वर्षाच्या मुलीच्या अनुभवावरून सांगते. कचरा पडलेला दिसला कि ती लगेच विचारते लोकं कचरापेटीत का नाही टाकत? वेडीच असतात. (इथे अमेरिकेत त्यातल्या त्यात जर्सी सिटी तर धन्य आहे. भारतात राहणार्‍यांना वाटेल की इथे काही कचरा वगैरे नसतो पण असे का>>>>ही नाही. मला इथल्या फुटपाथवरही कचरा कित्येकदा दिसतो.) त्यामुळे ही मानसिकताच पाहिजे की स्वच्छता तिथे देव!

सावलीने वेबसाइटचा उल्लेख केलाय. पण तिन्ही त्रिकाळ, भारतीय जनतेसमोर असलेल्या सिरियल्स (मनात आणले तर ) याकामी काहीतरी करू शकतील.
मी सिरियल्स बघत नाही, पण मला सांगा एकातरी सिरियलमधे घरच्या व्यवहारात एखादे पात्र, कचरा टाकताना दाखवले जाते का ? (गुटखा खाऊन थुंकताना नक्कीच दाखवत असतील.)
इथे भ्रूणहत्या अगदी थेट दाखवतील, जातीयवाद दाखवतील पण इतका साधासोपा सामाजिक संदेश देण्याचे भान नसते.
आणि याबाबतीत अगदी सेलेब्रिटी पण अपवाद नाहीत, संजीव कपूर कधी, काम झाल्यावर गॅस बंद करताना दाखवलाय ?

आदर्श क्रिकेटपटू मैदानावर पचापचा थुंकताना दिसतात (सचिनचा अपवाद). तेव्हा थुंकणे वाईट हे लोकांच्या मनावर बिंबणे अशक्य!

खरय मास्तुरे,
क्रिकेट्वीरांनी सामा़जिक स्वच्छ्तेसाठी जाहीरात करणे हा एक चांगला उपाय दिसतो.
(त्यामुळे त्यांचे पीचवर थुंकणे थांबेल हा अतिरिक्त फायदा)
तुम्ही-आम्ही सामान्य लोकांनी सांगून जनता सुधारेल असं वाटत नाही.
त्यासाठी त्यांच्या हिरोंनाच कामाला लावा.

<<<थुंकल्यावर लगेच मागे १०० रुपये वसूल करणारा उभा राहिला तर सगळे बंद करतील थुंकायचे>>>साधनाला अनुमोदन

Pages