उमलू द्या कळ्यांना : लहान मुलांचे शोषण, माहिती, खबरदारी व कायदा

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 4 April, 2011 - 12:04

''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्‍या, त्यांना कुस्करणार्‍या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते. अतिशय गंभीर अशा ह्या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविचार करण्यास लोक अनुत्सुक दिसतात. ''माझा काय संबंध?'' ह्या प्रवृत्तीपासून ते ''असले विषय दूर राहिलेलेच बरे'' इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते. मात्र त्यामुळे वस्तुस्थिती लपत वा बदलत नाही तर अधिकच बिकट होत जाते. प्रस्तुत लेखात बालकांच्या सुरक्षेच्या फक्त एका पैलूविषयी माहिती संकलन केले असून ह्या विषयावर सर्व समाजात अधिक मंथन करण्याची व जागृती निर्माण होण्याची गरज आहे.
आंतरजालावर देखील बातमीपत्रांखेरीज अथवा सरकारी/ सेवाभावी संस्थांखेरीज मराठीतून ह्या विषयावर क्वचितच माहिती आढळते.

लहान मुले ही समाजाचा दुर्बल घटक मानली जातात, कारण ती आपल्या योगक्षेमासाठी, पालन-पोषणासाठी मोठ्यांवर अवलंबून असतात. परंतु दुर्दैवाने ह्या दुर्बल घटकाचे शोषण सर्वाधिक रीत्या समाजात दिसून येते.
हिंसाचार, शिव्या, मारामार्‍या, आतंकवाद ह्यांना सध्याची लहान मुलांची पिढी प्रत्यक्ष व प्रसारमाध्यमांतून रोजच सामोरी जात असते. पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलांना चोपणे, स्त्रीभ्रूणहत्या, मुलीला जन्मानंतर नष्ट करणे, जातिभेद किंवा धर्मामुळे पोळली जाणारी मुले, मुलींची कुटुंबात व समाजात होणारी अवहेलना, बालविवाह, बलात्कार, छळ अशा अनेक परिस्थितींचा, वस्तुस्थितींचा सामना आजच्या मुलामुलींना करायला लागतो.

पण वास्तवात अशी समाजातील ग्रासलेली किंवा अवहेलना झालेली मुले जर तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या/ कुटुंबियांच्या संपर्कात आली तर एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही काय करता अथवा कराल?

• नशिबाला दोष द्याल ?

• वाद घालाल की “आमच्या लहानपणी असेच होते, मग ह्यांनी सहन केले तर काय बिघडले ? ”

• वाद घालाल की “हीच संस्कृती आहे, म्हणून हे असेच चालत राहील?”

• गरीबीला दोष द्याल?

• भ्रष्टाचाराला दोष द्याल?

• कुटुंबाला दोष द्याल व दुर्लक्ष कराल?

किंवा आपला संबंध नाही म्हणून दुर्लक्ष कराल ?

• खरंच ह्या बालकाला सुरक्षिततेची गरज आहे का हे पाहाल?

• कारण-मीमांसा होईपर्यंत वाट पाहाल ?

किंवा तुम्ही ….…..

• त्या मुलाच्या सुरक्षिततेची काळजी घ्याल?

• त्या बालकाला व त्याच्या कुटुंबाला गरज पडल्यास मदत कराल?

• त्या मुलाच्या सुरक्षितेत काय त्रुटी आहेत हे पाहाल?

• जे त्या बालकाच्या हिताच्या विरोधात आहेत त्यांच्यापासून त्या बालकाचा बचाव कराल?

• गरज भासल्यास पोलिसांत किंवा बालक संरक्षण संस्थांना कळवाल ?

तुम्ही कसे वागाल हे तुमच्यावर आहे. तुम्ही स्वतःला फक्त एक सामान्य नागरिक म्हणून पाहता की समाजातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून?

जर तुम्ही स्वतःला जबाबदार समजत असाल तर सर्वप्रथम मुलांचे - बालकांचे हक्कही जाणून घ्या.

‘बालक’ म्हणजे कोण?

आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे, ‘बालक’ हा १८ वर्षाखालील कोणीही व्यक्ती असू शकतो. ही आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त व्याख्या आहे आणि युनायटेड नेशन्स कनवेन्शन ऑन द राईटस् ऑफ द चाइल्ड (यु.एन.सी.आर.सी.) ने व बर्‍याच देशांनी देखील ही व्याख्या मान्य केली आहे.

भारतात १८ वर्षावरील व्यक्तींनाच मतदानाचा हक्क व वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) व कायदेशीर मान्यता मिळते. १८ वर्षाखालील कोणत्याही मुलीचे लग्न व २१ वर्षाखालील मुलांचे लग्न हे कायद्याने गुन्हा आहे, बालविवाह कायदा १९२९ प्रमाणे. कायद्याप्रमाणे लग्नास पात्र व्यक्तीचे वय हे १८ मुलींचे व २१ मुलांचे आहे.

लहान मुलांची काळजी का घ्यावी लागते?

• लहान मुलं मोठ्यांसारखी प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकत नाहीत.

• बहुतेक समाजात असा समज झालेला आहे की मुले ही फक्त त्यांच्या पालकांची संपत्ती आहे, किंवा त्यांचा अन्य समाजाशी काहीही संबंध नाही.

• लहान मुलांना स्वतःचे विचार मांडणे, चांगल्या वाईटाची निवड करणे, निर्णय घेण्याची कुवत नसते असा समज आहे.

• त्यांना समजून मदत करण्याऐवजी त्यांच्यावर मोठ्यांचे विचार लादले जातात.

• लहान मुलांना मतांचा अधिकार नाही, राजकीय सहभाग नाही, व आर्थिक स्वातंत्र्य नाही. आणि त्यांचे म्हणणे देखील कोणी ऐकत नाही.

• मुख्य म्हणजे लहान मुलांना अत्याचारांना व शिव्याशापांना तोंड द्यावे लागते व त्याचा मुकाबला करण्यास ती असमर्थ असतात.

बालकांचे / मुलांचे शोषण म्हणजे नक्की काय?

ज्याद्वारे मुलाच्या शरीराला इजा किंवा हानी पोहोचेल असा संपर्क/ स्पर्श, आणि अशी कोणतीही कृती/ भाषण/ वर्तन ज्यामुळे ते मूल घाबरेल/ लज्जित होईल/ अवमानित होईल ते सर्व बालकाच्या शोषणा अंतर्गत मोडते. तसेच अशी कोणतीही कृती किंवा दुर्लक्ष ज्यामुळे मुलांची निकोप वाढ होण्यास बाधा येईल.

कोणत्याही धर्म, वय, वंश, लिंग वा सामाजिक/ आर्थिक स्तरातील मूल हे शोषणाला व अवहेलनेला बळी पडू शकते.

जर पालक व्यसनाधीन असतील तर मुलांच्या शोषणाची शक्यता जास्त वाढते.

भावनिक शोषण : (शिव्या देणे, मानसिक अत्याचार करणे किंवा मानसिक दृष्ट्या हानिकारक वर्तन करणे) ह्यात पालक किंवा देखभाल करणार्‍या व्यक्तीचे असे कृत्य किंवा कृत्य न करणे ज्याचा परिणाम गंभीर स्वरूपाच्या मानसिक/ भावनिक/ वर्तनात्मक वा त्यासंबंधी विकारात होतो किंवा होऊ शकतो.
ह्यात पालक/ देखभाल करणार्‍याने टोकाची किंवा विचित्र प्रकारची शिक्षा देणे (उदा : मुलाला अंधार्‍या खोलीत/ कपाटात बंद करणे किंवा बराच वेळ खुर्चीला बांधून ठेवणे किंवा मुलाला धमकावणे, घाबरविणे इत्यादी) यांचा समावेश होतो.
कमी तीव्रतेचे भावनिक शोषण म्हणजे मुलाला सदा हीन/ तुच्छ लेखणे, त्याला दूर लोटणे व नकोसे असल्याची वागणूक देणे, त्याचा हीन प्रकारे उल्लेख करणे, त्याचेवर निष्कारण दोषारोपण करणे किंवा त्याला बळीचा बकरा बनविणे.

उपेक्षा : बालकाच्या किमान गरजा न भागविणे. उपेक्षा ही शारीरिक, भावनिक किंवा शैक्षणिक असू शकते. शारीरिक उपेक्षेत अन्न, वस्त्र, पुरेशी वैद्यकीय काळजी, देखरेख न पुरविणे हे येते. तसेच मुलाचा त्याग करणे हेही ह्यात येते. शैक्षणिक उपेक्षेत मुलाला योग्य प्रकारे शाळेत दाखल न करणे, त्याची शाळेची फी न भरणे किंवा शाळेला अतिरिक्त दांड्या मारण्यास मुलाला भाग पाडणे/ उत्तेजन देणे इत्यादी येते. मानसिक उपेक्षेत मुलाला भावनिक आधार व प्रेम न देणे, मुलाकडे लक्ष न देणे, त्याची काळजी न घेणे, आई-वडिलांमधील भांडणांना त्याला सामोरे जावे लागणे, मुलांसमोर व्यसने (दारू, ड्रग्ज इत्यादी) करणे आणि त्यांना दारू व मादक पदार्थांच्या सेवनात सामील करून घेणे हे प्रकार येतात.

शारीरिक शोषण : बालकाला/ मुलाला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा करणे. डाग देणे, जाळणे, मारणे, गुद्दे घालणे, लाथा मारणे, छडीचा मार, मुलाला गदगदा हालविणे किंवा मुलाला इजा पोहोचेल असे वर्तन. त्यात मुलाला इजा करण्याचा हेतू नसला तरी जर ती कृती मुलाच्या वयासाठी अयोग्य अशा अती-शिस्तीचा किंवा शारीरिक शिक्षेचा परिणाम असेल तर त्याची गणना शारीरिक शोषणातच होते.

काही आकडेवारी :

युनिसेफ व भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने २००७ साली केलेल्या 'बाल शोषणावर एक अध्ययन: इंडिया २००७' सर्वेक्षणानुसार बाहेर आलेली काही धक्कादायक आकडेवारी :

५ ते १२ वयोगटातील मुलांना शोषणाचा व त्यांच्याशी गैरवर्तन केले जाण्याचा सर्वात जास्त धोका असतो. या अत्याचारांमध्ये शारीरिक, लैंगिक तसेच मानसिक अत्याचारांचा समावेश होतो.

बालकांचे शारीरिक शोषण :

१. सर्वेक्षणात दर ३ मुलांमधील २ मुले शारीरिक शोषणाला बळी पडतात हे दिसून आले.
२. नमुन्यादाखल १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणांत ६९% मुलांचे शारीरिक शोषण होत होते. त्यात ५४.६८% मुलगे होते.
३. तेरा राज्यांमधील ५०% पेक्षा जास्त मुले ही कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या शारीरिक शोषणाला व मारहाणीला सामोरी जात होती.
४. कौटुंबिक वातावरणात शारीरिक शोषण होणार्‍या मुलांमध्ये ८८.६% मुलांना त्यांच्या पालकांकडून शारीरिक शोषण होत होते.
५. शाळेत जाणार्‍या ६५% मुलांना शारीरिक दंडाची शिक्षा ( कॉर्पोरल पनिशमेन्ट) सहन करायला लागली होती. म्हणजेच ३ मधील २ मुलांना शाळेत अशी शिक्षा झाली होती.
६. त्यातील ६२% दंड शिक्षा ह्या सरकारी आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये दिल्या गेल्या होत्या.
७. इतर राज्यांपेक्षा आंध्र प्रदेश, आसाम, बिहार आणि दिल्लीत मारहाण व शोषणाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
८. बहुतेक सर्व मुलांनी ह्याबद्दल कोणाकडेच तक्रार केली नाही.
९. ह्यातील ५०.२% मुलं आठवड्याचे सातही दिवस काम करतात.

लैंगिक शोषण :

१. सर्वेक्षणातील ५३.२२% मुलांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लैंगिक शोषण झाल्याचे सांगितले.
२. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार आणि दिल्लीत सर्वात जास्त लैंगिक शोषणाचे बळी आढळले. मुलगे व मुली दोन्ही.
३. एकुणांतील २१.९०% मुलांनी तीव्र स्वरूपाचे लैंगिक शोषण होत असल्याचे नोंदविले तर ५०.७६% मुलांनी इतर प्रकारचे लैंगिक शोषण होत असल्याचे सांगितले.
४. लहान मुलांमध्ये ५.६९% मुलांनी आपल्यावर लैंगिक स्वरूपाचा हल्ला झाल्याचे सांगितले. (सेक्शुअल अ‍ॅसॉल्ट)
५. आसाम, बिहार, दिल्ली आणि आंध्र प्रदेशात लहान मुलांवर लैंगिक स्वरूपाचा हल्ला घडण्याचे प्रमाण सर्वाधिक दिसून आले.
६. रस्त्यावर राहणारी मुले, बालमजूर आणि संस्थागत देखभालीत असलेल्या मुलांनी सर्वात जास्त लैंगिक स्वरूपाच्या हल्ल्यांचे प्रमाण नोंदविले.
७. ह्यातील ५०% शोषणकर्ते हे मुलांच्या परिचयातील होते किंवा विश्वासाच्या व जबाबदारीच्या पदावर होते.
८. बहुतेक मुलांनी ह्या प्रकारांची तक्रार कोणाकडेही केली नाही.

भावनिक शोषण व मुलींची उपेक्षा :

१. दर दोन मुलांमागे एकाला भावनिक शोषणाला सामोरे जावे लागले.
२. मुलगे व मुलींना समप्रमाणात भावनिक शोषणाला सहन करावे लागले.
३. ह्यात ८३% केसेस मध्ये पालक हे शोषणकर्ते होते.
४. ह्यात ४८.४% मुलींनी आपण मुलगा व्हायला हवे होते ही इच्छा प्रकट केली.

ह्या लेखात भारतातील लहान किंवा अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल माहिती घेण्याचा, त्याविषयी सतर्क होण्याचा व प्रतिबंधात्मक उपायांबरोबरच आपली एक नागरिक म्हणून जी जबाबदारी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती भारत सरकारच्या संबंधित संकेतस्थळांवरही उपलब्ध आहे.

मुलांचा लैंगिक छळ (Child Sexual Abuse )

समज : मुलांचा लैंगिक छळ आपल्या देशात कमी आहे. प्रसार माध्यमे चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींना प्रोत्साहन देतात. त्यामुळे लहान मुले व तरुण वर्ग आकर्षित होऊन लैंगिक छळाचे आरोप करतात. बऱ्याच घटनांमध्ये नालायक व वाईट वर्तनाच्या मुलीच कारणीभूत असतात.

वस्तुस्थिती : काहीच महिन्याची लहान बाळे, किंवा थोडी मोठी मुले लैंगिक छळाला बळी पडतात. मुलीच जास्त लैंगिक छळाच्या बळी होतात असे नाही तर मुले देखील लैंगिक छळाला बळी पडल्याचे दिसून आले आहे. व्यंग असणारे किंवा मंदबुद्धी मुले त्यांच्या निराधारते मुळे जास्तीत जास्त प्रमाणात लैंगिक छळाला बळी पडतात.

मुलांचा लैंगिक छळ हा जाती, धर्म, मूळ यावर मुळीच अवलंबून नाही व हे खेड्यात व शहरात दोन्हीकडे दिसून येते.

खालील पैकी कोणत्याही प्रकारे मुलांचा लैंगिक छळ होऊ शकतो :

• लिंगा द्वारे लैंगिक छळ. जसे. बलात्कार, किंवा शरीराच्या कुठल्याही अवयवाचा आत प्रवेश करून.
• मुलांचा लैंगिक कृत्याचे नमुने तयार करण्यासाठी वापर, वा लैंगिक कृत्याचे चित्र वा फिती दाखवणे.
• मुलांना संबंधासाठी उत्तेजित करण्यासाठी त्यांच्या अवयवांना स्पर्श करणे, किंवा एखादी वस्तू त्यांच्या अवयवांवरून फिरवणे.
• संबंधासाठी उत्तेजित करण्यासाठी शरीराचा भाग नग्न करणे.
• मुलांना अश्लील चाळे दाखवणे वा दोन मुलांना आपापसात अश्लील चाळे करायला लावणे.
• त्यांच्या वह्यांवर रंगीत अश्लील चित्र काढून किंवा त्यांच्याशी बोलताना अश्लील भाषा वापरणे.

अशा प्रकरणांमध्ये आरोपी हा नेहमी गोड बोलणारा, काळजी घेणारा, प्रेमाने वागणारा असल्याने तो स्वतःवरचे आरोप चुकीचे व खोटे असल्याचा दावा करतो.

मुलांचा लैंगिक छळ हा त्यांच्या परिचिताकडून किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडूनही होतो.

याला जबाबदार असणारी व्यक्ती ९०% त्यांच्या परिचयाची वा ओळखीची असते. अशी परिचित व्यक्ती आपल्या ओळखीचा, हुद्द्याचा व विश्वासाचा फायदा घेते आणि अश्लील कृत्ये करते. बऱ्याचवेळा अशी व्यक्ती ही नातेवाईकातलीच एक असते जसे, भाऊ, वडील, नातलग किंवा शेजारी. अशी व्यक्ती ही नातेवाईकातलीच असल्यास तो incest संबंध होतो.

लैंगिक छळ हा देह व्यापारातही मोडतो. जसे मुलींचा वेश्या व्यवसायासाठी व्यापार, ‘जोगीण’ किंवा ‘देवदासी‘ प्रथा. प्रसारण माध्यमे व लोकजागृती बरीच झाल्या मुळे, ह्या विषयीच्या अत्याचारांचे प्रमाण कमी झाले आहे.

अजून काही समज / गैरसमज व वास्तव :

पुरुष लहान मुलांचा वापर व त्यांवर लैंगिक अत्याचार त्यांची लैंगिक भूक मिटवण्यासाठी करतात, किंवा आपल्या सहचार्‍याकडून लैंगिक सुख न मिळाल्यामुळे करतात असा गैरसमज आहे. ते खरे नाही. हाही गैरसमज आहे की असा लैंगिक अत्याचार करणारे विकृत बुद्धीचे नसतात. हे अत्याचारी लोक विकृत बुद्धीचे नाहीत व ते पूर्णपणे सर्वसामान्य आहेत असा दिखावा केला जातो. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशा व्यक्ती स्वतःची गैरकृत्ये ही कशी न्याय्य व उचित होती हे दर्शविण्याचा प्रयत्न करतात. अत्याचार करणारी व्यक्ती सहसा त्या घटनेचा कोणी साक्षीदार नसावा ह्याची खबरदारी घेते. अनेकदा लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत असताना आजूबाजूचे लोक दुर्लक्ष करतात.

स्वतःवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबद्दल, किंवा लैंगिक चित्र वा दृश्य पाहण्यास भाग पाडल्याबद्दल, कोणाला सांगण्यास वा त्याबद्दल चर्चा करण्यास लहान मुले खूप घाबरतात. अत्याचारी मग कोणत्याही वयाचा असो, तो नेहमीच धीट असतो. अत्याचारी आपले असे कृत्य थांबवत नाही व अत्याचार होणारे ते अत्याचार सहन करत राहतात, खास करून जर ती व्यक्ती नातेवाईक किंवा जवळची परिचित असल्यास. बऱ्याच वेळा अशा प्रसंगात आईला हे सर्व माहीत असूनही ती तिच्या लाचारीमुळे काही करू शकत नाही. कुटुंबातील संबंध बिघडण्याची भीती किंवा तिच्या सांगण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही ह्या भीतीने ती हे सहन करत राहते. घरातील मुख्य पुरुष / मोठा माणूस समाजाच्या, कुटुंबाच्या भीतीने ह्याकडे दुर्लक्ष करत राहतो.

लहान मुलांनी सांगितलेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल शहानिशा करता असे अत्याचार नेहमी खरे आढळून आले आहेत. ही खरोखरीच आश्चर्याची व खेदाची बाब आहे की समाजात अशा लैंगिक अत्याचारांकडे दुर्लक्ष केले जाते. हेही दिसून येते की लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घातले जाते आणि अत्याचाराचे जे बळी ठरतात त्यांबद्दल उलटे आरोप केले जातात व अत्याचार रोखण्यासाठी काही उपाय केले जात नाहीत.

मुले ही असहाय व भोळी असतात. त्यांना मोठ्यांसारखे लैंगिक अत्याचाराबद्दल किंवा लैंगिक संबंधाबद्दल काही ज्ञान नसते. म्हणून अशा प्रकारांत ती स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. नुसते लैंगिक अत्याचाराबद्दल किंवा लैंगिकते बद्दल ज्ञान असल्याने मुलांवर आरोप करणे बरोबर नाही. वेश्यांवर देखील बलात्कार होऊ शकतात, व कायदाही त्याचा विचार करतो. मुलांवर उलटे आरोप करून आपण आपली सामाजिक जबाबदारी मुलांवरच ढकलतो आहोत, व अत्याचार करणाऱ्याला मोकळा सोडत आहोत.

अल्पवयीन मूल हे लैंगिक संबंधास परवानगी देऊच शकत नाही. आणि तशी परवानगी त्याने दिल्यास कायद्याने ती परवानगी ग्राह्यच होऊ शकत नाही. ह्यात मुलगे व मुली दोघांचाही समावेश होतो.

कायद्यानुसार जर मुलीचा नकार असेल वा ती १६ वर्षापेक्षा लहान असेल तर तिच्याशी शारीरिक संबंध करणे म्हणजे बलात्कार होतो.

मुले जेव्हा लैंगिक अत्याचारा विषयी तक्रार करतात तेव्हा त्यांच्यावर अनेकदा कोणी विश्वास ठेवत नाही व त्यांना त्यांच्या चारित्र्यावर वा विश्वासार्हतेवर शंका घेणारे प्रश्न केले जातात. त्यांना असे भासवले जाते की तेच मोठे गुन्हेगार आहेत व त्यांच्या वागणुकीने त्यांच्या वर असा प्रसंग ओढवला आहे.

लैंगिक अत्याचाराचा लहान मुलांवर परिणाम (Impact of Sexual Abuse on Children)

अत्याचाराचा मुलांवर परिणाम कमी किंवा जास्त होऊ शकतो :

• शारीरिक जखमा जसे ओरखडे, चावे, चिरा इ. गुप्तांगातून रक्त येणे, किंवा आणखी इतर जागी शारीरिक जखमा.
• मुले भीती, चूक केल्याची भावना, मानसिक तणाव किंवा लैंगिक कमतरता याला तोंड देतात आणि कुटुंबापासून वेगळी पडतात.
• असे अत्याचार झालेल्या मुलांना मोठेपणी नातेसंबंधामध्ये बाधा येतात आणि लैंगिक संबंधामध्ये कमतरता येतात.
• आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे अशा अत्याचार झालेल्या मुलांमध्ये प्रत्येकावर संशय घेण्याची वृत्ती वाढते आणि ती फार काळ राहते. कधीकधी जन्मभर हा परिणाम होतो. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते व लैंगिक संबंधांवरही याचा परिणाम होतो.

मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार ओळखणे (Identifying Child Sexual Abuse)

मुलांवर वा युवांवर होणारे लैंगिक अत्याचार ओळखण्याची चिन्हे : खाली सांगितलेली चिन्हे / खुणा ही मुले त्रासात आहेत हे ओळखण्याचा अंदाज घेण्यासाठी आहेत आणि हा लैंगिक अत्याचार असू शकतो. त्यावरून एकदम या निर्णयावर पोहोचू नका की हे लैंगिक अत्याचाराचेच परिणाम आहेत , त्यापेक्षा सर्वांच्या सल्ल्याने किंवा स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या. हे फार महत्त्वाचे आहे.

मुली

६ ते ११ वर्षे -

  • इतर मुलांमुलींत उच्छृंखल/ कामुकपणे वावरणे वा त्यांच्याशी अश्लील बोलणे
  • तोंडाने लैंगिक अत्याचारा बद्दल बोलणे.
  • गुप्तांगांची काळजी दाखवणे वा फार काळजी घेणे
  • मोठ्यांबरोबर उच्छृंखल संबंध ठेवणे.
  • अचानक पुरुष किंवा मुलांविषयी किंवा स्त्रियांविषयी वाटणारी भीती, किंवा एखाद्या जागेला घाबरणे.
  • वयोमाना पेक्षा लैगिकते बद्दल व लैंगिक संबंधांबद्दल जास्त माहिती असणे

१२ ते १७ वर्षे -

  • आपल्यापेक्षा लहान मुलांमध्ये उच्छृंखलपणे वावरणे वा तशी कृत्ये करणे
  • उच्छृंखल वागणे वा लैंगिकतेचा विषय पूर्णपणे टाळणे
  • लाज, शरम वा भीती लपवण्याचा प्रयत्न करणे
  • घरातून पळून जाणे.
  • झोपेत दचकणे घाबरणे, वाईट स्वप्ने बघणे इ.

मुले

६ ते ११ वर्षे -

  • इतर मुलांशी लैंगिक वागणूक
  • आकस्मिक भीती किंवा मुलांवर, मुलींवर किंवा विशिष्ट जागे बद्दल अविश्वास
  • झोपेत दचकणे घाबरणे इ.
  • अचानक आक्रमक/ हिंसक वागणे
  • पूर्वीच्या आवडींविषयी नावड दाखवणे

१२ ते १७ वर्षे -

  • इतर वा लहान वयाच्या मुलांशी लैंगिक वागणूक किंवा एकदम आक्रमक वागणूक
  • भिडस्त किंवा कुढणारी वागणूक
  • दिखावेबाजी वा बेडर वागणूक
  • लाज, शरम वा भीती लपवण्याचा प्रयत्न करणे
  • भिडस्त वागणूक

(स्रोत : युनिसेफ, शिक्षकांना शिकण्याची माहिती http://www.unicef.org/teachers/ युनिसेफ मुलांचे संरक्षण आय.लेथ, यांच्याकडून)

मुलांना नेहमी मोठ्यांची आज्ञा पाळायला सांगितले जाते. ह्या प्रक्रियेत ते मोठ्यांना नाही कसे म्हणायचे हेच विसरतात. जरी त्यांना मोठ्यांचे वागणे आवडत नसले तरीही ते अनेकदा मोठ्यांना “नाही” म्हणू शकत नाहीत.

मुलांना अशा परिस्थितीत ''नाही'' म्हणायला शिकवा.

एक नागरिक म्हणून तुमचे कर्तव्य :

• पोलिसांना किंवा मुलांच्या संरक्षण संस्थांना कळवा.
• मुलांच्या संरक्षण संस्था मदत व सहकार्य करतात ना हे पाहा.
• समाजाचे सहकार्य मिळवा.
• प्रेसला कळवणे हा तुमचा शेवटचा उपाय असेल.

स्वतःच्या कुटुंबातील मुलांच्या सुरक्षिततेविषयी एक पालक या नात्याने तुम्ही कोणती जबाबदारी व खबरदारी घ्याल?

# तुमच्या मुलांना ग्राह्य / मान्य आणि अग्राह्य/ अमान्य स्पर्शांविषयी शिकवा. त्यांना लोकांबद्दल त्यांचे मन जे काही सांगेल त्यावर विश्वास ठेवायला शिकवा. तुम्ही स्वतः शोषणाची लक्षणे काय असतात, कसे ओळखावे हे शिकून घ्या म्हणजे तसे होत असेल तर लगेच तुम्हाला ते ओळखता येईल.

# मुलांचे किंवा बालकांचे शोषण म्हणजे फक्त लैंगिक शोषण एवढेच नव्हे तर त्यात मुलांना कोणत्याही प्रकारची इजा मोडते.

# मुलांना ''चांगला'' व ''वाईट'' स्पर्श ह्यांमधील फरक शिकवा. त्याबद्दल समजावून सांगा.

# त्यांना हे समजावा की कोणालाही तुमच्या मुलाला / मुलीला दुखापत करण्याचा किंवा गुप्तांगांना स्पर्श करण्याचा किंवा नकोसा वाटणारा स्पर्श करण्याचा अधिकार नाही.

# तुमच्या मुलांना हे शब्द लक्षात ठेवायला व गरज पडल्यास वापरायला सांगा : नाही, जा, ओरडा, सांगा.
त्यांना कोणी नकोशा पद्धतीने स्पर्श केला किंवा अनोळखी वा ज्या व्यक्तीविषयी त्यांना खात्री वाटत नाही अशा व्यक्तीबरोबर जायला सांगितले तर त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला पाहिजे.

# अशा व्यक्तीपासून व स्थान / परिस्थितीपासून लवकरात लवकर दूर जाण्याचे आपल्या मुलांना सांगा.

# आरडा ओरडा करायचा असेल तर कशा प्रकारे संकटसूचक आरडाओरड करायची हेही मुलांना शिकवा. अशा ओरडण्यात खर्जातील किंवा खालच्या स्वरातील आवाजात मोठ्याने ओरडतात. अशा आवाजाकडे लक्ष लगेच वेधले जाते. असा आवाज इतर कोणत्याही कारणासाठी वापरू नये. तो फक्त त्याच परिस्थितीत वापरावा.

# मुलांनी पालक/ शिक्षक किंवा देखभाल करणारे / काळजीवाहूंना झाल्या प्रकाराबद्दल लगेच सांगावे.

# जी व्यक्ती मुलांना अस्वस्थ करते, नकोशी वाटते, अगदी ती व्यक्ती तुमचा शेजारी का असेना, त्या व्यक्तीपासून मुलांना सावध राहायला सांगावे.

# मुलांना हेही शिकवा : कोणती परिस्थिती टाळावी, जी व्यक्ती पालक/ शिक्षक/ देखभाल करणारी किंवा जवळची नाही त्यांकडून खाऊ/ पेय / खेळ/ भेटवस्तू इत्यादी घेऊ नये. पोलिसांची मदत कशी घ्यावी, पोलिसांना कसे ओळखावे, पोलिसांचा बिल्ला कसा ओळखावा हेही मुलांना शिकवावे.

# भारतातील मुलांना चाइल्ड हेल्पलाईनचा नंबर १०९८ कसा वापरायचा ते सांगावे. चाइल्ड हेल्पलाईन तर्फे प्रत्यक्ष मदत, वैद्यकीय मदत, निवारा, शोषणापासून संरक्षण इत्यादी अनेक बाबतींत मदत मिळते, तसेच फोनवरून सल्ला, मार्गदर्शन व समुपदेशनही केले जाते. http://www.childlineindia.org.in/1098/b1a-telehelpline.htm

अमेरिकेसारख्या ठिकाणी ९११ नंबर ला कॉल करता येतो.

# शोषणाच्या खुणा ओळखायला शिका. मुलाचे वर्तन, त्याच्या अंगावरच्या जखमा, वळ, इतर खुणांवरून जर तुम्हाला काही गैरप्रकार होतोय असे वाटले तर चाइल्ड हेल्पलाईन, समाजकल्याण खाते, मुलांच्या संदर्भात काम करणार्‍या संस्था, पोलिस यांची मदत घ्या.

# जर तुम्हाला इतर कोणा मुलावर असा अत्याचार होतोय हे जाणवले/ आढळले तर त्याविषयी योग्य ठिकाणी तक्रार नोंदवा. प्रशिक्षित व अनुभवी लोकांची मदत घ्या.

# तुमचे कायदे समजून घ्या.

संस्थात्मक पातळीवर / शाळांतून ह्याविषयासंदर्भात काय करता येईल?

१. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन

२. पालक व शिक्षकांच्या कार्यशाळा.

३. शाळेतील मुलांना ''वैयक्तिक सुरक्षे'' अंतर्गत बोलते करणे, चांगला स्पर्श व वाईट स्पर्श ह्याबद्दल जागरूकता निर्माण करणे. जर ह्या संवादांतर्गत एखाद्या मुलाने / मुलीने जे काही सांगितले त्यातून त्याचे/ तिचे शोषण होत आहे हे पुढे आले तर परिस्थितीनुसार ते पालक व शिक्षकांच्या निदर्शनास आणून देणे.

भारतीय कायदा :

द कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स अ‍ॅक्ट २००५ : http://wcd.nic.in/The%20Gazette%20of%20India.pdf

मुलांविषयी / बालकांविषयी भारतात अस्तित्त्वात असलेल्या कायद्यांतील त्रुटी:

भारतीय दंड संहितेनुसार बालक म्हणजे बारा वर्षे वय किंवा त्यापेक्षा कमी धरले गेले आहे. बालक हक्कांनुसार १८ वर्षांखालील कोणीही व्यक्ती ही बालक म्हणून गृहित धरलेली आहे. भारताच्या कायदेव्यवस्थेतही वेगवेगळ्या कायद्यांनुसार बालकाची व्याख्या बदलताना दिसते.
भारतीय दंडविधानानुसार बालकाचे वय १२ वर्षांपर्यंत म्हटले आहे तर भारताच्या मनुष्य दलाली विरोधी कायद्यांनुसार ते वय १६ आहे. ज्या कलमानुसार बलात्काराला शिक्षा मिळते त्या भारतीय दंड विधानाच्या ३७६ व्या कलमानुसार हेच वय १६ वर्षे म्हटले आहे. तसेच दंड विधानाच्या ८२ व ८३ व्या कलमानुसार ७ वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या बालकाने तसेच १२ वर्षे पेक्षा कमी वय असलेल्या बालकाने केलेली कोणतीही कृती ही गुन्हा ठरू शकत नाही असे म्हटले आहे.

व्याख्यांमध्ये असलेल्या ह्या फरकामुळे त्याचा गैरफायदा गुन्हेगारांतर्फे घेतला जातो व ते कमी शिक्षेवर सुटतात.
तसेच ह्या संदर्भातील गुन्ह्यांना जरी ७ ते १० वर्षांची कारावासाची शिक्षा असली तरी ह्या केसेस मॅजिस्ट्रेट कोर्टातही चालविल्या जाऊ शकतात, जेथे जास्तीत जास्त ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देता येते.

जर लैंगिक शोषण व लैंगिक गुन्हा पुन्हा पुन्हा होत राहिले तर त्याचा त्या पीडित मुला/मुलीच्या मानसिकतेवर प्रचंड दुष्परिणाम होतो. पण अशा प्रकारच्या पुन्हा पुन्हा केल्या जाणार्‍या शोषणासाठी वेगळा कायदा किंवा शिक्षा नाही.

केवळ प्रत्यक्ष बलात्काराच्या गुन्ह्यात ३७७ व्या कलमानुसार ७ ते १० वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते. परंतु इतर प्रकारचे लैंगिक गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांचा गुन्हा हा कमी तीव्रतेचा धरला जातो.
·
ह्या संदर्भात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रोम सेक्शुअल ऑफेन्सेस अंतर्गत २०११ मध्ये राज्यसभेत दाखल केलेले विधेयक : http://www.lawyerscollective.org/files/The%20Protection%20of%20Children%...

हे विधेयक संमत झाल्यावर बालकांविरोधात केल्या जाणार्‍या लैंगिक गुन्ह्यांसाठी एक सर्वसमावेशक कायदा अस्तित्वात येईल. त्यानुसार १० वर्षांची सक्तमजुरी, आणि ती प्रलंबित झाल्यास आजन्म कारावासची शिक्षा होऊ शकेल. बालकांच्या विरोधात घडणारे वेगवेगळे लैंगिक गुन्हे, जशी पोर्नोग्राफी, लैंगिक छळ, बलात्कार इत्यादी गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून ह्या विधेयकात तरतुदी सुचविल्या आहेत तसेच जलद न्याय मिळण्यासाठी जलदगती न्यायालयांची सोयही सुचविली आहे.

घटनेने बालकांना हक्क दिले आहेत. पण त्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सार्‍या समाजाने एक होऊन काम करण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा जरी उचलला तरी आपण समाजात मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करू शकू. त्यांचे बालपण अबाधित राखू शकू, तसेच स्वस्थ मनाचे अन् आरोग्यपूर्ण शरीराचे नागरिक होण्यासाठी ह्या मुलांच्या उपयोगी पडू शकू.

धन्यवाद!

(लेखाचे संदर्भ : युनिसेफ व महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केलेले सर्वेक्षण अहवाल, सरकारी अहवाल, कायदेतज्ञांची संकेतस्थळे, कायदाविषयक ब्लॉग्ज, बाल सुरक्षा पुस्तिका, बालक सुरक्षा विषयक विविध संकेतस्थळे )

-- अरुंधती

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अरुंधती खूप खूप चांगली माहिती देणारा आणि खूप विचार करायला
लावणारा लेख आहे. पुन्हा एकदा नीट वाचून विचार करून ह्या सम्बन्धी
लिहीन. कारण लिहिण्यासारखं खूप आहे. ह्या विषयावर प्रकाश टाकल्याबद्दल
धन्यवाद.

भारतात मुळातच 'बालकांचे लैंगिक शोषण’ ही संकल्पना पाश्चात्य मानली जाते. आपल्याकडे मुलांना देवाघरची फुले मानत असल्याने तसलं काही घाणेरडं होत नसतं ह्या दृढ समजात बरेच लोक असतात-आहेत. त्यामुळे आपला मुलगी/मुलगी लैंगिक शोषणाला बळी पडलेत हे सत्य सर्वप्रथम पचायला खूप अवघड जाते.त्यामुळे हे मुलीच्या/मुलाच्या मनाचे खेळ असावेत, "छे! काहीतरीच काय, तसं नसेल" इ. नी मुलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष, क्वचित फ़टकारले जाते. तेवढ्या वेळात त्या मुलाच्या/मुलीच्या मनावरचे घाव खोल जाऊन ते काच ती आयुष्यभर बाळगतात, कडवट बनतात. कधीकधी मुलांनी धीर करुन याला वाचा फ़ोडलीच आणि आई-वडीलांनी अविश्वास दाखवला तर तो धक्का मुलं पचवू शकत नाही. मुलांवर विश्वास दाखवून अशा समस्या हाताळल्या, त्यांचं भय, या सर्वांमधून निपजलेली स्वतःबद्दलची घृणा, अविश्वास कमी करण्यास त्यांना मदत केली तर लैंगिक शोषणाला बळी पडलेली मुलं/मुली यातून लवकर सावरतात असं RAHI ( Recovering And Healing from Incest) चं सर्वेक्षण सांगतं.

मीना नाईक यांचं ’वाटेवरती काचा गं’ हे नाटक यातल्या बरयाच गुंतागुंतींवर प्रकाश टाकतं. मी आठवीत असताना हे नाटक आमच्या शाळेने आयोजित केलं होतं. लैंगिक शोषणाबद्दल आईकडे बोलू पाहणारया पण तिने अविश्वास दाखवल्याने चुरमडत गेलेल्या त्या मुलीची घुसमट, बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून सत्यप्रकाराबद्दल मुलीला बोलकं करायची पद्धत खूपच हृद्य आहे.

संविधान, कायदा काय सांगतो-

आपल्याकडे सुधारीत Juvenile Justice act,2000 हा कायदा सोडला तर मुलांसाठी असा खास कायदा नाही.स्त्रियांविषयीचेच कायदे extend करुन मुलांना लावले गेलेतभारतातल्या या मुलांच्या सुरक्षेबद्दलच्या योजनेच्या मसूद्यात ’लैंगिक शोषण’ स्पष्टपणे नमूद नाही. फ़क्त ’शोषण’ आहे.

Integrated Child Protection Scheme (ICPS) मध्येही योजनेचा हेतू-
Improvement in the well being of children in difficult circumstances, as well as to the reduction of vulnerabilities to situations and actions that lead to abuse, neglect, exploitation, abandonment..

भारतीय संविधानाच्या राज्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, कलम ३९ मध्ये The State shall, in particular, direct its policy towards securing-
e. that the health and strength of workers, men and women, and the tender age of children are not abused and that citizens are not forced by economic necessity to enter avocations unsuited to their age or strength;
f.that children are given opportunities and facilities to develop in a healthy manner and in conditions of freedom and dignity and that childhood and youth are protected against exploitation and against moral and material abandonment."
>

भारतीय संविधानाच्या राज्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, कलम ३९ मध्ये
The State shall, in particular, direct its policy towards securing-
e. that the health and strength of workers, men and women, and the tender age of children are not abused and that citizens are not forced by economic necessity to enter avocations unsuited to their age or strength;

f.that children are given opportunities and facilities to develop in a healthy manner and in conditions of freedom and dignity and that childhood and youth are protected against exploitation and against moral and material abandonment.

वर अरुंधती ताईंनी दाखवलेली आकडेवारी बघता फक्त मुलांच्या लैंगिक शोषणाला फक्त 'शोषणा'मध्ये मोडून या समस्येची बोळवण करता येणार नाही इतपत आपल्याकडे ही बाब गंभीर आहे असे दिसते. ह्या समस्येची दखल घेणे आणि तद्वत कायद्यामध्ये आणि संविधानातल्या तरतूदींमध्ये बदल करण्याची गरज आहे असे दिसते.

चाईल्डलाईन सर्विस-१०९८
१०९८ हा नंबर डायल केल्यावर मिळणारी 'चाईल्डलाईन सर्विस' ही २४ तास टोल-फ्री सेवा आहे. ही सेवा
समस्यांनी ग्रासल्यामुळे नैराश्य आलेल्या मुलांसाठी किंवा अशा मुलांच्या पालकांसाठी भारत सरकारची 'चाईल्ड्लाईन इंडिया फाऊंडेशन' चालवते.

आपण काय करु शकतो-

मुलाने/मुलीने लैंगिक शोषणाबद्दल वाच्यता केली तर-
-त्याचा/तिचा पहिल्यांदा स्वतःवर अविश्वास असेल तरी तुम्ही ती/तो काय सांगतोय यावर विश्वास ठेवा. तुमचा विश्वास बसलाय हे त्याच्या/तिच्यापर्यंत पोहोचवा. शेवटी हे त्यांचे मनाचे खेळ नसतात, मनाची तयारी करुन, धीर एकवटून ती हे सांगायला आपल्यापर्यंत विश्वासाने आलेली असतात. आपलं कोणीतरी विश्वासाने ऐकतंय ही भावना खूप आधार देणारी असते
-तिने/त्याने हे सर्व आपल्याला सांगीतले हे चांगलेच केले हे सांगा
-त्यात तिने/त्याने स्वतःला कोसत बसू नये हे सांगावे किंवा या घटनेने त्यांच्या आयुष्यात, नेहमीच्या आपल्या वागण्या/बोलण्यात फरक होऊ नये याची काळजी घ्यावी
-यातून सावरायला त्यांना स्वत:ला वेळ द्या.
-या घटनेने त्यांच्या प्रतिमेला काळीमा लागलाय किंवा त्यांनी लाज वाटून घेतली पाहिजे असं काहीही नाही हे त्यांना पटवून द्या
-काहीही झालं, काहीही होवो, तुमचं त्यांच्यावर जिवापाड प्रेम आहे आणि तुम्ही त्यांच्या पाठीशी नेहमी असाल हे त्यांना सांगा.

आणि शेवटचे आणि सर्वात महत्वाचे- एखाद्या बालकाचा/बालिकेचा लैंगिक छळ होतोय असे दिसले/ माहित असले तर "त्यांचं खाजगी प्रकरणेय, आपल्याला काय", "ते निस्तरतील, बघून घेतील काय करायचेय ते" असं म्हणत गप्प बसू नका. त्याला वाचा फोडा. कदाचित असं करुन तुम्ही एखाद्या मुलाचं/मुलीचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होण्यापासून रोखू शकाल.

"चुप्पी तोडो!"

सुरेखा, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मणि, खूप उपयुक्त मुद्दे आहेत हे. आपल्यापैकी प्रत्येकाने ते आचरणात आणायची गरज आहे. फक्त १०९८ ला फोन केल्यावर आपले काम भागले एवढे गृहित न धरता अशा पीडित मुलांना मानसिक आधार देण्याची व निकोप आयुष्य जगण्याची संधी देणे फार आवश्यक आहे हेही समजून घेणे त्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व गुन्हे आपल्याच आजूबाजूला घडत आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे सत्य स्वीकारणे. ह्या लेखातून तेवढे जरी काही अंशी साध्य झाले तरी पुरे!

अरुंधती,

अशाप्रकारच्या अत्यंत दुर्दैवाची शिकार भारतातीलही मुले होत असतात ही गोष्ट लांछनास्पद आहे.
आपण अशा एखाद्या दुर्घटनेस रोखू शकलो तरीही आपण स्वतःस भाग्यवान समजू शकतो.
मात्र सामाजिक अनिष्ट, म्हणून समाजमान्यतेच्या आधारे ह्याचा बिमोड करण्याइतपत सामाजिक परस्परसंबंधांची आज आपल्या समाजात तीव्र उणीव आहे.

त्यामानाने आपली परंपरागत एकत्र कुटुंबे खूपच संवेदनाशील आणि सक्षम होती हे आठवल्यावाचून राहत नाही. असो. लयास गेली ती व्यवस्था! समप्रभावी नव्या व्यवस्थेची गरज आहे हे नक्की.

ह्या लेखाने किमान वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास मोलाची मदत होईल असे वाटते. लेख अभ्यासपूर्ण आहे.

खुप अभ्यास्पुर्वक लिहिलेल लेख.
वाद घालाल की “आमच्या लहानपणी असेच होते, मग ह्यांनी सहन केले तर काय बिघडले ? ”
हेच विधान बरेचदा असा छ्ळ विषेशतः corporal punishments करायला प्रव्रुत्त करते.

सुंदर लेख. याबाबतीत पालकांचे अधिकाधिक प्रबोधन होणे गरजेचे आहे. वर उल्लेख केलेल्या ’वाटेवरती काचा गं’ नाटकाप्रमाणेच अशाच विविध मनोरंजनाच्या माध्यमातुन हा विषय सर्वांपर्यंत पोचवला गेला पाहिजे. नुकतीच टीव्हीवर या विषयावरची अ‍ॅनिमेटेड जाहिरात बघितली. ती पण खूप छान होती.

अतिषय माहीतीपुर्ण लेख !!

जे अ‍ॅब्सोल्युटली रॉन्ग आहे ते र्रॉन्गच आहे ...तिथे वाद होणार नाही .

लहान मुलांचे शोषण, माहिती, खबरदारी व कायदा हा खरेच खूप महत्वाचा आणि सेन्सेटीव्ह विषय आहे ...आपल्याला ह्या संबंधी काही " शाळांमधे जनजागृती / सभा वगैरे काम करता येईल का ?
" मैत्र जिवांचे " च्या अजेंड्यावर घेता येईल का ? असे कार्यकारी समितीला विचारुन पहातो .

चांगला, अभ्यासपुर्ण लेख आहे.

दुर्देवाने, भारतातच नव्हे तर पुर्ण जगातच हा प्रश्न आहे. प्रबोधन करणे आणी प्रतिबंध करणे हे उपाय आहेतच पण योग, ध्यान याच्या माध्यमातुन देखील मानसिकता बदलण्याची गरज आहे

अकु नेहमीप्रमाणे अभ्यासपुर्ण लेख,
पालकांचं प्रबोधन करणं तसचं मुलांना अशा धोक्यांपासुन सावध करणं खुप महत्वाच आहे .
मध्यंतरी ह्याच विषयावर एक मराठी लघुचित्रपट आला होता ' मांजा' , आपली मराठीवर आहे , पण मी पुर्ण पाहुच शकलो नाही.

अरुंधतीताई...
खूप महत्वपुर्ण आणि योग्य माहिती इथे दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. या सगळ्याचा मला खुप उपयोग होणार आहे. यावर सविस्तर चर्चा करायला नक्किच आवडेल. आत्तातरी मी ह्या संपुर्ण लेखाची प्रत प्रिंट करुन घेतली आहे. यावर सविस्तर अभ्यास करून काही अडचणी आल्यास आपल्याशी जरूर संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन.

अश्या आणखी काही विषयावर आपण लिहिलं असेल तर मला जरूर कळवा.

गोळे जी, निलिमा, डेलिया, गणू, प्रगो, श्री, मंदार, गोजिरी.... प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.

प्रगो, अवश्य सुचवा... जितके करू तेवढे थोडे आहे.

गोजिरी, प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना बाल सुरक्षा पुस्तिका जर दिली जात असेल तर त्यात तुला वरच्या माहितीपैकी तीस ते चाळीस टक्के माहिती आढळेल. शिक्षकांच्या हाताखाली मुले दिवसातला बराच काळ वावरतात. त्यामुळे शिक्षकांना तर ह्याविषयावरचे ज्ञान हवेच!

गणू, तुमचं म्हणणं खरं आहे. नुसती बाहेरून डागडुजी करून उपयोग नाही. सकस, निकोप, सशक्त व सुदृढ मनांसाठी चांगले विचार, आचार ह्यांबरोबरच ध्यान - प्राणायाम करण्याची गरज आहे. मनातली नकारात्मकता, मरगळ, औदासिन्य झटकता आले तर त्याचा संपूर्ण जीवनशैलीवरच चांगला परिणाम दिसून येतो.

जाहिराती, चित्रपट, माहितीपट ह्यांद्वारे प्रबोधनाचे प्रयत्न चालूच असतात. परंतु तेवढ्याने भागणार नाही. मुलांचे हक्क अबाधित राखण्यासाठी त्यांच्यासाठीचे कायदेही तितकेच सशक्त हवेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची व्यवस्थाही प्रस्थापित व्यवस्थेपेक्षा वेगळ्या प्रकारे काम करणारी हवी.

ह्या विषयात काम करणा-या तुलीर ह्या संस्थेने माझी सुरक्षा नावाची एक कार्यपुस्तिका मुलांसाठी काढली आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत. ही साईट http://www.tulir.org/ तिथे इंडिकेटर्स देखील दिलेले आहेत. अश्या केसेस मध्ये आई आणि मुलगी/मुलगा ह्यात सुसंवाद आणि विश्वास असणे खूप गरजेचे आहे.

क्षिप्रा, परवाच ह्या संस्थेबद्दल माहिती वाचली होती. रेड्डी नामक गृहस्थांची मुलाखत होती. वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन ते ह्या समस्येसंदर्भात कशा प्रकारे प्रबोधन करत आहेत याविषयी होती ती मुलाखत (बहुधा ३-४ वर्षांपूर्वीची होती!) धन्स इथे लिंक शेअर केल्याबद्दल. Happy साइटवर बरीच माहिती आहे.

छाया, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अकु, लेख नेहमीप्रमाणेच उत्तम आहे.
याबाबतीत अनेक वर्षांपुर्वी एका प्रसिद्ध हॉस्पिटलमधे दाखल झालेल्या बालिकांच्या केसेस बद्दल ऐकून / बघून मी तिथल्या डिनशी बोललो होतो, तर त्या म्हणाल्या. आमच्याकडे या केसेस आल्यात, म्हणून माहित तरी आहेत. ज्या मूली आमच्यापर्यंत येऊच शकत नाहीत त्यांचे का ?
पण त्यांनी त्यावेळेस सांगितलेला एक महत्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आहे. त्या म्हणाल्या होत्या, आई किंवा बाबा, नोकरीवरून घरी आल्यावर त्यांनी रोजच्या रोज मूलांशी संवाद साधायला हवा. मूलांच्या आयूष्यात काहीही घडले तरी ते पालकांना सांगण्या एवढा विश्वास आणि मोकळेपणा मूलांच्या मनात असायलाच हवा.

दिनेशदा, तुम्ही म्हणताय ते ''आयडियल'' किंवा आदर्श परिस्थितीविषयी म्हणताय.... दुर्दैवाने अनेकदा आपले व्याप, इतर सांसारिक व व्यावसायिक जबाबदार्‍या सांभाळताना आईवडिलांचे अनेकदा मुलांकडे दुर्लक्ष होते. मुलांच्या मनात विश्वास निर्माण जरी केला असला तरी मुले त्यांच्याशी कोणी विपरीत वागल्यावर खूप घाबरतात, स्वतःला आक्रसून घेतात, मोकळेपणाने बोलत नाहीत. अशा वेळी त्यांच्या इतर वर्तनातून त्यांचे काहीतरी बिनसले आहे हे ओळखून, त्यांना आंजारून गोंजारून, प्रेमाने पोटाशी घेऊन आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मनात कोणतीही अपराधी भावना निर्माण न करता, वर मणिकर्णिकाने म्हटल्याप्रमाणे तुमचं त्यांच्यावर जिवापाड प्रेम आहे आणि तुम्ही त्यांच्या पाठीशी नेहमी असाल ह्याची त्यांना खात्री देऊन सगळेच आईवडील वागले तर ते किती चांगले होईल!
दुर्दैवाने तसे होत नाही.

अरूंधती,
लहान मुलांच्या शोषणाचे प्रमाण वाचून सुन्न झाले. Sad
पण त्यावरचा तुझा हा विस्तारीत लेख अतिशय महत्वपुर्ण आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो मनात कुठेतरी जागरूकता निर्माण करतो.

लेख उत्तमच आहे
परंतु
खाली ओळीत स्त्रियांचाही सहभाग बराच आहे असे मला वाटते

पुरुष लहान मुलांचा वापर व त्यांवर लैंगिक अत्याचार त्यांची लैंगिक भूक मिटवण्यासाठी करतात,

याही पेक्षा भंयकर घरातील कामे करण्यासाठी मुलाचा अथवा मुलीचा छळ हा त्या घरातील महिले कडुन झाल्याची बरीच उदाहरणे मिळतील.

धन्यवाद

अरूंधती,
फारच चांगला व अभ्यासपुर्ण लेख आहे... ह्याचा नक्कीच उपयोग होईल..
धन्यवाद.

अरूंधती चांगला लेख. धन्यवाद
मनकर्णिका, क्षिप्रा, माहितीसाठी धन्यवाद.

दक्षिणा, वर्षू, रैना, आस, मुक्तेश्वर, शैलजा, अल्पना, चंदन.... प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मुक्तेश्वर, आपण कृपया लेख पुन्हा एकदा, नीट वाचावा.

अरुंधती, जबरा, या अतिशय माहितीप्रद लेखासाठी तुझे जेवडे अभिनंदन करावे तेवडे कमी. खुप खुप माहीतीने परिपुर्ण लेख. खुप्च कौतुक वाटते मला तुझ्या ज्ञानाचे, लिखाणाचे आणी त्याहीपेक्षा जास्त, न कंटाळता लिहायचे... (जो माझा दुर्गुण आहे.)
पुनश्च एकवार अभिनंदन!!
जाता जाता ,मागच्या महिला शोषण लेखावरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, मी ज्या आदीपथ संस्थेसाठी काम करते, तिथे हा ही १ विभाग आहेच.
आणि सर्व वाचकांच्या माहितीसाठी- मुलांवरील कोणत्याही प्रकारचा अत्याचार लक्षात आल्यास, दुर्ल़क्ष करु नका, आदिपथ चा हा टोल फ्री नं. लक्षात ठेवा. १८००-२२-०२०५ (वेळ १२-६)

मुग्धानन्द, तू माबोवर आदिपथ विषयी लिहिलं होतंस, त्या लेखाची लिंक इथे दे ना!

AADIPATH - Aadipath Foundation and Research Centre
G-91,Gr. Floor, Lokmanya Nagar
Near Karnataka Sangh Hall,
T.H.Kataria Marg,,Mahim (W)
Mumbai - 400016.
Maharashtra

Note - This is a Charitable non-profit organization, working for Prevention of Abuse and Trauma at Home, Started toll free help line 1800 22 0205. ( दुपारी १२ ते ६)

This service on phone is free of charge, deal with counseling ,advice, guidence,legal rights,and to impart information about available services in the proximity of the caller.

Pages