आमचें गोंय-प्रास्तविक(१)

Submitted by टीम गोवा on 5 April, 2011 - 21:27

***
आमचें गोंय- प्रास्तविक(१)
आमचें गोंय- प्रास्तविक(२)
आमचें गोंय- भाग १ - प्राचीन इतिहास
आमचें गोंय- भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता
आमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण)
आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)
आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही

***

खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी टीव्ही नव्हता, म्हणजे आमच्याकडे नव्हता. करमणुकीचे साधन म्हणजे चित्रपट आणि नाटके! करमणूक घरबसल्या हवी असेल तर, रेडिओ! आमच्याकडे जुना फिलिप्सचा व्हॉल्व्हवाला रेडिओ होता. कॉलेजमधे जाणारा काका आणि थोडी मोठी आत्या त्यावर गाणी वगैरे ऐकत. मी अगदीच लहान, शाळेतही जात नसेन तेव्हा. एके दिवशी एक गाणे कानावर पडले आणि त्यानंतर चित्रपटाचे नाव पण... 'बॉम्बे टू गोवा'!

बॉम्बे तर ऐकून माहित होतं, हे गोवा काय आहे? पण ते पटकन दोन शब्दात संपणारे नाव का कोणास ठाऊक, चांगलेच लक्षात राहिले. पण तेवढेच. पुढे बरीच वर्षे हे नाव उगाचच कधीतरी आठवायचे. वर्गात एकदोन मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला जाणारी. त्यांच्याकडून कधीतरी उडत उडत गोव्याबद्दल ऐकलेलं. तिथली देवळं, चर्चेस, बीचेस यांची वर्णनं माफक प्रमाणात ऐकली. असंच कधीतरी मंगेशकर लोक मूळचे गोव्याचे असं वाचलं होतं.

बरीच वर्षं गोव्याचा संबंध एवढाच.

साल १९८१. अर्धवट, कळत्या न कळत्या वयात आलो होतो. अचानक एक तूफान आलं... 'एक दुजे के लिये'. सुप्परडुप्परहिट्ट सिनेमा! भयानक गाजला. आम्हाला आधी तो बघायची परमिशन नव्हती घरून. पण सिनेमा जेव्हा प्रमाणाबाहेर हिट झाला तेव्हा कशीतरी परमिशन काढून बघितला. वासू सपनाच्या प्रेमकहाणीच्या जोडीने लक्षात राहिला तो त्यात दिसलेला गोवा. हे माझं गोव्याचं प्रथम दर्शन. भन्नाटच वाटलेला गोवा तेव्हाही.

पण, गोव्याचं प्रत्यक्ष दर्शन होईपर्यंत अजून पाच वर्षं वाट बघायची होती. बारावीची परिक्षा संपली आणि रिकामपण आलं. कुठेतरी जाऊया म्हणून बाबांच्यामागे भूणभूण लावली होती. खूप पैसे खर्च करून लांब कुठेतरी जाऊ अशी परिस्थिती नव्हती. विचार चालू होता. एक दिवस बोलता बोलता बाबांनी त्यांच्या एका स्नेह्यांसमोर हा विषय काढला. गोव्यात त्यांच्या चिक्कार ओळखी होत्या. त्यांनी गोव्याला जा म्हणून सुचवलं. एवढंच नव्हे तर 'तुमची राहण्याची / खाण्याची सोय अगदी स्वस्तात आणि मस्त करून देतो' असं सांगितलं. एवढं सगळं झाल्यावर नाही वगैरे म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. निघालो आम्ही गोव्याला. आठ दहा दिवसांचं ते गोव्यातलं वास्तव्य, भटकणं, ते एक वेगळंच जग. आजही माझ्या डोळ्यासमोर त्यातला क्षणन् क्षण जिवंतपणे उभा आहे. पंचवीस वर्षं झाली, गोव्याने मनातून जागा रिकामी केली नाहीये.

माझं अजून एक भाग्य म्हणजे त्यावेळी आम्ही अगदी घरगुती वातावरणात गोव्यात सैर केली होती. त्यावेळीही गोवा म्हणजे फक्त बीचेस, तारांकित रिसॉर्टस, दारू, विदेशी पर्यटक एवढीच गोव्याची जनमान्यता होती. पण आम्ही ज्यांच्या बरोबर गोवा हिंडलो, त्यांनी या सगळ्याच्या व्यतिरिक्त असलेला, सदैव हिरव्या रंगात न्हालेला, शांत (सुशेगाऽऽऽत हा शब्द तेव्हाच ऐकलेला), देवळातून रमलेला गोवाही दाखवला. माझी तो पर्यंत गोवा म्हणजे चर्चेस, गोवा म्हणजे ख्रिश्चन संस्कृती अशी समजूत. हा दिसत असलेला गोवा मात्र थोडा तसा होता, पण बराचसा वेगळाही होता. गोवा दाखवणार्‍या काकांनी गोव्याबद्दलची खूपच माहिती दिली. जसजसे ऐकत होतो, चक्रावत होतो. गोव्याच्या इतिहासातील ठळक घटना, पोर्तुगिज राजवटीबद्दलची माहिती वगैरे प्रथमच ऐकत होतो. शाळेत नाही म्हणायला गोव्यात पोर्तुगिजांची सत्ता होती वगैरे वाचले होते, पण ते तितपतच. काकांकडून प्रत्यक्ष ऐकताना खूप काही कळले.

माझ्या मनावर अगदी खोल कोरला गेलेला प्रसंग म्हणजे आम्ही एका देवळात (बहुतेक दामोदरी का असेच काहीसे नाव होते) गेलो होतो आणि एक लग्नाची मिरवणूक आली वाजत गाजत. देवळाच्या बाहेरच थांबली. पुजारी लगबगीने बाहेर गेला. लगीनघरच्या मुख्य पुरूषाने पुजार्‍याच्या हातात काहीतरी बोचके दिले. पुजारी आत आला. त्याने ते बोचके देवाच्या पायवर घातले, एक नारळ प्रसाद म्हणून बाहेर जाऊन त्या पुरूषाला दिला. वरात चालू पडली. मला कळे ना! हे लोक देवळात आतमधे का नाही आले? कळले ते असे, ती वरात ख्रिश्चनांची होती. बाटण्याआधी त्या घराण्याचे हे कुलदैवत, अजूनही मंगलप्रसंगी कुलदैवताचा मानपान केल्याशिवाय कार्य सुरू होत नाही! पण बाटल्यामुळे देवळाच्या आत पाऊल टाकता येत नाही. देवळाच्या बाहेरूनच नमस्कार करायचा.

असलं काही मी आयुष्यात प्रथमच ऐकत / बघत होतो. गोव्याच्या ऊरात काही वेदना अगदी खोलवर असाव्यात हे तेव्हा जाणवलं होतं. (वेदना असतीलही, नसतीलही. तेव्हा मात्र एकंदरीत त्या वरातीतल्या लोकांच्या तोंडावरचा भक्तिभाव आणि बाहेरून नमस्कार करण्यातली अगतिकता जाणवली होती असे आता पुसटसे आठवते आहे.)

अशीच एक आठवण म्हणजे त्रिकाल चित्रपटात, एका ख्रिश्चन मुलाचे लग्न दुसर्‍या एका ख्रिश्चन मुलीशी होत नाही कारण तो मुलगा ब्राह्मण ख्रिश्चन असतो आणि मुलगी इतर जातीची ख्रिश्चन!!! त्रिकाल लक्षात राहिला तो असल्या सगळ्या बारकाव्यांनिशी. याच चित्रपटात मी गोव्यातील राणे आणि त्यांचे बंड हा उल्लेख प्रथम ऐकला.

गोव्याहून परत येताना गोवा माझ्याबरोबरच आला. कायम मनात राहिला. कधी मधी अचानक, गोवा असा समोर येतच गेला.

गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याचे उल्लेख वाचताना, त्या लढ्याबद्दल कुठे फुटकळ वाचताना, गोव्याच्या दैदिप्यमान लढ्याचा इतिहास कळला. पुलंच्या 'प्राचीन मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास' वाचताना तर मला "जैसी हरळामाजी रत्नकिळा | रत्नामाजी हिरा नीळा | तैसी भासामाजी चोखुळा | भासा मराठी" म्हणणारा फादर स्टीफन भेटला. या बहाद्दराने तर 'ख्रिस्तपुराण' हे अस्सल भारतीय परंपरेला शोभून दिसेल असे पुराणच लिहिले ख्रिस्तावर. हा गोव्याचा, आणि ही पुराण रचना गोव्यातली. ज्या गोव्यात मराठीचा एवढा सन्मान झाला, त्याच गोव्यात मराठी विरूद्ध कोंकणी वाद उफाळला आणि मराठीवर 'भायली' असल्याचा आरोप झाला हे वर्तमानपत्रातून वाचत होतो. सुभाष भेंड्यांची 'आमचे गोंय आमका जांय' नावाची कादंबरी वाचली होती. तपशील आठवत नाहीत, पण गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे आणि त्याचबरोबर, 'भायले' लोकांबद्दलची एकंदरीतच नाराजी याचे चित्रण त्यात होते एवढे मात्र पुसटसे आठवत आहे.

असा हा गोवा! अजून परत जाणे झाले नाहीये. कधी होईल सांगताही येत नाहीये.

काही दिवसांपूर्वी 'प्रीतमोहर'ने गोव्याबद्दल एक लेख लिहिला. गोव्याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त. तेव्हा तिची ओळख झाली आणि असे वाटले की ती गोव्याबद्दल अजूनही बरेच काही लिहू शकेल. त्याच वेळेस आमची 'ज्योती'बायसुद्धा गोव्याची आहे असं कळलं. तीही उत्तम लिहू शकेल असे वाटले. या सगळ्यामुळे गोव्यावर एखादी साग्रसंगीत लेखमाला का होऊन जाऊ नये? असा विचार मनात आला. अर्थात, त्या दृष्टीने माझा उपयोग शून्य! पण ज्योती आणि प्रीतमोहर यांनी कल्पना तत्काळ उचलून धरली. ज्योतीतैने पुढाकार घेतला आणि लेखमालेची रूपरेषाही ठरवून टाकली.

या मेहनतीचं फळ म्हणजे, 'आमचे गोंय' ही लेखमाला!

या निमित्ताने एक वेगळीच लेखमाला वाचायला मिळेल म्हणून मलाही आनंद होत आहे. सर्वच वाचकांना ही लेखमाला आवडेल आणि महाराष्ट्राच्या या नितांत सुंदर लहान भावाची चहूअंगाने ओळख होईल ही आशा!

- बिपिन कार्यकर्ते

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (ज्योति_कामत,प्रीतमोहर, बिपिन कार्यकर्ते)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वडिलांकडून महालसा आणि आईकडून शांतादुर्गा अशी आमची दैवतं गोव्यातलीच. पुढल्या लेखाची वाट पहात आहे. गोव्यातल्या खाद्यसंस्कृतीबद्दल पण लिहा हं, त्यावर वेगळी प्रकरणं हवीतच हवीत. Happy

गोव्यातल्या खाद्यसंस्कृतीबद्दल पण लिहा हं, त्यावर वेगळी प्रकरणं हवीतच हवीत.

खरच. म्हापशाचा बाजार नेहमी डोळ्यापूढे दिसतो.

छान लेखमाला , पहिला भाग आज वाचला , गोव्याबद्दल अजुन जाणुन घेण्याची उत्सुकता वाढलीय , पुढील भाग नक्कीच वाचेन.

आता एक एक करून सर्व भाग वाचतोय.. Happy
मी माझ्या लहानपणी एकदाच गोव्याला गेलोय.. त्यानंतर अगदी वेंगुर्ला वगैरे जाऊनही गोवा जाणे झालेले नाही...

ती वरात ख्रिश्चनांची होती. बाटण्याआधी त्या घराण्याचे हे कुलदैवत, अजूनही मंगलप्रसंगी कुलदैवताचा मानपान केल्याशिवाय कार्य सुरू होत नाही
>> आजही वसई भागातही अश्या प्रथा आहेत... Happy हे मी पाहिले आहे.

फादर स्टीफनने असेही म्हटले आहे ना... Happy

जैसीं पुस्पांमाजि पुस्प मोगरी | की परिमळामाजि कस्तुरी |
तैसी भासांमाजि साजिरी | मराठिया ||

आमच्या गोंयकारांचें संगीतप्रेम - मंगेशकर, रामदास कामत, जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर कारेकर, किशोरी आमोणकर, केसरबाई केरकर, अजित कडकडे. दत्ताराम, मोगूबाई कुर्डीकर, ज्योत्स्ना भोळे.

Pages