राजगड-एक वास्तुवैभव

Submitted by चिन्मय कीर्तने on 5 April, 2011 - 06:53


प्रभुणा दुर्गमं दुर्गं प्रभु दुर्गेण दुर्गम:।
अदुर्गमत्वा दुभयोर्विद्विषन्नेव दुर्गम: ॥

खरच, कवींद्र परमानंद यानी ’शिवभारत’ या ग्रंथातील वरील श्लोकामधे ’दुर्ग’ या शब्दाचे किती सार्थ वर्णन केले आहे. "आक्रमणाय दुर्गम:,गमनाय दुर्गम: इति दुर्ग:" अशी आहे ’दुर्ग’ या शब्दाची सार्थ व्याख्या. दुर्गांचा प्रथम उल्लेख सापडतो तो ऋग्वेदामध्ये.तटबंदी असलेल्या शहरांचे ’पुर’ असे उल्लेख ऋग्वेदातील ऋचांमध्ये सापडतात.महाभारत आणि रामायण या प्राचीन ग्रंथांमधे खासकरुन महाभारताच्या ’शांतिपर्वामधे’ दुर्गांचे स्पष्ट उल्लेख आणि वर्णने आहेत.कौटिल्याच्या ’अर्थशास्त्र’ या ग्रंथामधे तर दोन प्रकरणे तर ’दुर्ग’ या विषयावर आहेत.तट,बुरुज,खंदकांचे बांधकाम इ दुर्गवास्तुबांधणी विषयक अनेक बाबींचा सांगोपांग उहापोह त्यामधे केला आहे.
महाराष्ट्रामधील पैठण येथील ’सातवाहन’हे सर्वात आद्य ञात राजकुल.नाणेघाट,जीवधन,चावंड,हडसर अशा सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगांमधील दुर्गांच्या अनेक श्रेणी सातवाहन कुळातील सम्राटांनी निर्माण केल्या. पुढे महाराष्ट्रावर अभीर,वाकाटक,चालुक्य,राष्ट्रकुट,यादव इ अनेक राजवटींचे राज्य आले.त्यांनीदेखिल महाराष्ट्राच्या दुर्गसंपदेमध्ये भर घातली.पुढे इस्लामी परचक्र महाराष्ट्रावर आल्यावर बहमनी कालामधे देशमुख-देशपांडे ही स्थानिक सत्ताकेंद्रे उदयास येऊ लागली. पंचक्रोशीचे प्रशासकिय कार्य आणि बाह्य आक्रमणांपासून संरक्षण यासाठी या अधिकार्यांनी लहान भुईकोट अर्थात गढ्यांची स्थापना केली.मात्र या सर्व राजवटींमधे दुर्गांचा वापर केवळ जकात गोळा करणे,घाटवाटांवर देखरेख करणे अशी मर्यादीत भूमिका हे दुर्ग निभावत होते.
भारतामधे "दुर्गकेंद्रित राज्यपद्धतीचा" उगम,विकास आणि उत्कर्षाचा कालखंड म्हणजे निर्विवादपणे छ्त्रपती शिवरायांचा कालखंड! ’एषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गो विशिष्यते’ या कौटिल्याच्या विधानाप्रमाणे शिवछत्रपतींनी आपल्या मावळातील जहागिरीच्या भूगोलाची मानसिकता अचूक जाणुन घेत गतिमान हालचाली केल्या. अनेक ओसाड,दुर्लक्षित डोंगरांवर ठाणी घालून आणि आपल्या उभरत्या राज्यासाठी सह्यपर्वताच्या दुर्गमपणाचा नेमका वापर स्वराज्य संरक्षण आणि विस्तारासाठी केला. या सर्व हालचालीमध्ये शिवरायांची धोरणी नजर मावळातील एका कोणे एके काळापासुन उभ्या असलेल्या डोंगरावर पडली अन त्या पुराणपुरुषाच रुपांतर दुर्गपुरुषात झाल. तोच तो इतिहासाच्या पानापानांनी गौरवलेला गडांचा राजा आणि राजांचा गड-किल्ले राजगड!
गुंजवणी,कानद आणि नीरा नदीच्या बेचक्यातील गुंजण मावळातील हा डोंगर तापसांना फार आधीपासुन माहित असावा.ब्रम्हर्षी ऋषींच्या वास्तव्याच्या खुणा मिरवणारा हा डोंगर "बिरमदेवाचा डोंगर" ह्या नावाने मावळाला माहीत होता.यादव आणि बहमनी पुढे आदिलशाही-निजामशाही कालखंडामधे एक दुर्लक्षित ठाण एवढेच ’बिरमदेवगडाला’ मह्त्व होत. शिवरायांनी त्याचे तीन नद्यांनी वेढलेले लष्करीद्रुष्ट्या असलेल मह्त्वपुर्ण स्थान,तीन दिशांना असलेला विस्तार अचूक जाणून घेत त्याला तटबंदीचा साज चढवून डोंगरावर उभारलेल्या जगातील एका सर्वोत्क्रुष्ट राजधानीत रुपांतर केलं. राजगड हा एक आदर्श डोंगरी किल्ला आहे.घेरा-मेट-माची-बालेकिल्ला ही आदर्श डोंगरी किल्ल्याबाबतीत आढळणारी सर्व वैशिष्ट्ये राजगडासंदर्भात आढळतात.
१)घेरा:
घेरा म्हणजे गडाच्या पायथ्याला असलेली गावे व मुलुख. राजगडचा घेरा तब्बल बारा कोसांचा म्हणजेच जवळ्जव्ळ २० किमी एवढा प्रचंड आहे.तो सर्व डोंगरानी आणि दाट अरण्यांनी युक्त असल्याने रागजडला पुर्णपणे वेढणे अतिशय कठीण होते. यातच त्याची खरी दुर्गमता दिसुन येते. या घेर्यामधे गुंजवणे,दादवडी,वाजेघर,मळे,भुतोंडे आणि पालखुर्द ही गावे येतात.
२)मेट:
पायथ्यापासुन गडाचा डोंगर चढायला सुरुवात केली कि मधल्या सपाटीवर ह्या चढणीच्या वाटांवर नजर ठेवणारी छोटी तपासणी केंद्रे होती.त्यावर रामोशी,बेरड अशा लोकांची वस्ती असे. हा गड संरक्षणाचा दुसरा टप्पा.ह्यामुळे शत्रुसैन्य आडवाटांवरुन गडाला सहजासहजी बिलगू शकत नसे. वाजेघर गावातून राजगड चढताना भिकुल्यांचे प्रसिद्ध मेट लागते. राजगडची इतर मेटे कालौघामधे नाहिशी होण्याच्या मार्गावर आहेत.
३)माची:
राजगड बिरमडोंगरी।,तीन माच्या तीन द्वारी॥
दोन तपे कारोभारी।जयावरी राहिले॥

ही ओवी राजगडच्या रचनेचे सार्थ वर्णन करते.माची म्हणजे गडाचा दोन तृतियांश डोंगर चढल्यावर तटबंदीने वेढलेली सपाट जागा.येथून प्रत्यक्ष गडाला सुरुवात होते. राजगडाला काहिशी ईशान्येकडची पद्मावती माची,पूर्वेकडची सुवेळा माची आणि पश्चिमेकडील संजीवनी माची या तीनही माच्यांचे वास्तुशास्त्र लष्करी तसेच प्रशासकिय बाबतीत केवळ अनुपमेय आहे.

१>पद्मावती माची:
उत्तर दिशेजवळील ही माची प्रशासकिय दृष्टया अत्यंत महत्वाची आहे.या माचीएवढी विस्तॄत सपाटी गडावर अन्य कोठेही नाही.या कारणामुळे मह्त्वाचे प्रशासकिय अधिकारी जसे की सोनोपंत डबीर,मोरोपंत पिंगळे ह्या मजालसींची वास्तव्यस्थाने या माचीवर होती.शिवरायांचा "दिवाण-ई-आम" ह्याच माचीवर होता.तसेच स्वराज्याचा मुलकी कारभार जेथुन चाले अशी सर्व महत्वाच्या खात्यांची सचिवालये ह्या माचीवर होती.त्यामुळे इमारतींच्या चौथर्यांची संख्या येथे तुलनेने जास्त आहे.

अ)पाली दरवाजा: ह्या माचीचे संरक्षणदृष्ट्या मह्त्वाचे वास्तुवैशिष्ट्य म्हणजे दोन टप्प्यांमधे असलेला "पाली दरवाजा". हा गडाचा मूळ राजमार्ग. पेशवे दप्तरातील सातारा जमाव-रुमाल क्रमांक ७५४ यातील१८१४-१५ सालच्या कागदामधे खालच्या दरवाज्याचे नाव "बिनी दरवाजा" आणि वरच्या दरवाज्याचे नाव "म्यान दरवाजा" असे दिले आहे.खालील बिनी दरवाज्याला भिडणारा शत्रु पुढुन बिनी दरवाज्यावरुन,मागुन बालेकिल्यावरुन आणि उजवीकडून महाद्वार पायर्यांच्या तटबंदीमधील जंग्यामधुन केलेल्या बंदुका,तिरंदाजी,गोफणगुंडे ह्यांच्या मार्यात सापडावा अशी कोंडिव्यूह रचना होती. ह्या दरवाज्याची अंतर्गत रचना गोमुखी अथवा हुकासारखी आहे. बिनी दरवाज्यातून आत आल्यावर बांधीव पायर्यांचे ३ टप्पे आहेत.त्यांची रचना नागमॊडी आहे.हे ३ टप्पे सुद्धा डावीकडील पद्मावती माचीची तटबंदी आणि बालेकिल्याच्या पद्मावती माची रक्षक बुरुज ह्यांच्या आहारी आहेत.गडाच्या प्रत्येक टप्प्यांवर केलेली प्रतिकाराची रचना तसेच प्रत्येक दरवाजा तसेच बुरुजाला मागाहून दिलेले दुहेरी संरक्षण (Backup Protection) हे राजगडच्या वास्तुंचे मह्त्वाचे वैशिष्ट्य! महाद्वाराच्या आत एक दुर्बोध शिलालेख दिसतो.तो शिवकालीन नसावा.शिवकालीन शिलालेख उठावदार असतात हा खोदीव(engraved)आहे.
ब)पद्मावती तलाव: हा गडावरील सर्वात मह्त्वाचा तलाव आहे. गडावरील महामूर पडणार्या पावसाच पाणी वाहून जाणार्या ओहोळाच्या सपाटीवरील भागात खोदकाम करुन नि पुढे त्याच खड्ड्याच्या तोंडाशी बांध घालून या तलावाची निर्मिती केली गेली आहे.ह्याच तंत्राचा वापर पुढे प्रतापगड,रायगड(गंगासागर तलाव) आदी ठिकाणी केलेला आढळतो.ह्याच सर्वात मह्त्वाच वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूंनी बांधून काढलेल्या भिंती.त्यात असणार्या द्बारांवाटेच पद्मावती तळ्याच्या काठावर जाता येते.
क)सदर: तीन माच्यांवर त्या माचीच्या प्रमुखाची म्हणजेच "तटसरनोबताच्या" कचेरीची म्हणजेच सदरेची बांधणी केलेली आढळते. १६६१ ते १६६५ या दरम्यान "कडतोजी गुजर" ह्या माचीचा तटसरनोबत होता.पुढे भोर संस्थानी कालखंडामध्ये पवार कूळ तटसरनोबत होते.माचीच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याचे तसेच रहाळातील तंटे सोडवण्याचे कार्य त्या-त्या माचीचा तटसरनोबत सदरेवरुन करत असे.

ड)चोरदिंडी: "किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब(दोष)आहे,याकरिता गड पाहून एक-दोन-तीन दरवाजे तसेच चोरदिंड्य़ा करुन ठेवाव्यात" असे महाराज आञापत्रात म्हणतात.महाराजांचे हे दुर्गवास्तुशास्त्राचे खास वैशिष्ट्य होते! जर गडाचा एक दरवाजा शत्रुच्या ताब्यात गेला तर आपत्कालीन दाराने पळता यावे. त्यामुळेच राजगडावर तिन्ही माच्यांवर अशा चोरदिंड्या आढळतात.चोरदरवाजा म्हणजे पिछाडीचा,खाजगी असा दरवाजा! अशा काही दिंड्या शत्रुची दिशाभूलसुद्धा करण्यास उपयोगी पडत असाव्यात.
इ)तटबंदीतील प्रातर्विधी स्थाने: जाणत्या शिवरायांचे दुर्गवास्तुशास्त्रातील मह्त्वाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे तटबंदीवरील पहार्याच्या शिबंदीसाठी तसेच निवासीयांसाठी तटातच प्रातर्विधी स्थाने. पहारा सोडून इतरत्र देहधर्मास्तव जावे लागू नये ,सर्वत्र दुर्गंधी पसरु नये यास्तव ही रचना होती. दिल्ली-विजापूर-गोवळकोंडा येथील शासकांना माहीत नसलेली आणि आता आपण स्वीकारलेली ही मलनि:सारण व्यवस्था ही साडेतीनशे वर्षांपूर्वी राजगडावर बांधली गेली हे कालातीत आश्चर्य होय!
ई)संजीवनी माची तटबंदी-द्वार: ही तटबंदी पाली दरवाज्याकडून वर चढत बालेकिल्ल्याच्या कड्याच्या पायथ्यास भिडली आहे.ही संजीवनी आणि पद्मावती माची यांची मर्यादा आहे.त्यामधे दोन्ही माच्यांवर येण्या-जाण्यासाठी द्वार आहे.अशीच रचना सुवेळा-पद्मावती या दोन माच्यांमधे केलेली आढळते. पद्मावती ही राजगडची अत्यंत मह्त्वाची माची.सुवेळा तसेच संजीवनी माचीवरुन येणार्या अपरिचितांना पद्मावती माचीवर सहजासहजी येता येऊ नये म्हणून ही अंतर्गत तटबंदी तसेच द्वारे निर्माण केली असावीत. दुर्दैवाने युद्धामधे सुवेळा किंवा संजीवनी माची पडली आणि गनीम त्या माच्यांवर प्रवेशला तरी या अंतर्गत तटबंदीचा वापर करुन निर्वाणीची झुंज पद्मावती माचीला देता येईल अशी युद्धशास्त्रानुसार किल्ले राजगडची विविध पातळ्यांवर तसेच टप्प्यांवर केलेली अभिनव संरक्षणव्यवस्था जागोजागी आढळते.

२>सुवेळा माची:
राजगडाच्या पूर्व दिशेला ही माची आहे. या माचीचे वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या खड्या सैन्यातील येसाजी कंक,तानाजी मालुसरे इ हजारी सरदारांची वास्तव्यस्थाने ह्या माचीवर होती. हे खड्या सैन्यातील अधिकारी असल्याने यांचे कायम वास्तव्य राजधानीमधे होते. सुमारे २ कि.मी इतकी ही माची लांब आहे. ह्या माचीला २ टप्पे आहेत.
अ)गुंजवणे दरवाजा: वास्तुअभ्यासासाठी हा दरवाजा अत्यंत मह्त्वाचा आहे. राजगडाची शिवकाळाच्या आधीची "यादव" राजवटीकालीन साक्ष हा दरवाजा देतो तसेच दोन भिन्न कालखंडांमध्ये दुर्गबांधणीशास्त्रामधे झालेले फरक ठळक नजरेत भरतात. राजगड पायथ्याच्या गुंजवणे गावातून एका सोंडेने वर चढून आल्यावर पहिला दरवाजा लागतो.शिवकालीन वास्तुनिर्मितीचा तो नमुना आहे. दगडी चिरे आणि त्यांना सांधणारा चुना अशी शिवकालीन रचना स्पष्ट दिसते. हा दरवाजा आतील दाराचे संरक्षण करतो. या दरवज्यातून आत गेल्यावर आतील दरवाजा अत्यंत महत्वपूर्ण आहे.हा दरवाजा एकंदर त्याची बांधणी पाहता शिवपूर्वकालीन आहे असे प्रख्यात दुर्गाभ्यासक डॉ.प्र.न.देशपांडे ह्यांचे मत आहे. ह्या दरवाज्याची बांधणी यादव राजवटीकालीन "हेमाडपंती" पद्धतीची आहे. कोणताही चुना(cementing material) न वापरता एकावर एक चिरे अशाप्रकारे ठेवले की दोन लगतच्या चिर्यांमधील जागेच्या बरोबर आणखी एक चिर्याचा दाब देवून (Press Fitting) अशी अभेद्य रचना तयार केली जाते.या द्वारावर एक मह्त्वपूर्ण शिल्प आढळते त्याला "गजलक्ष्मी शिल्प" म्हणतात.दोन उपडे घट घेतलेल्या गजशुंडा आणि त्यामधे एक कमलकलिका कोरलेली आढळते.यादव राजे वैष्णव होते त्यांच्या "पद्मटंक" या सुवर्णमुद्रेवर विकसित कमळाचा ठसा होता. ह्या दाराच्या उंबर्यात खजिन्याची प्राप्ती झाल्याने शिवरायांनी हे द्वार पाडले नाही अशी एक लोककथा आढळते. वरचा तिसरा दरवाजा मात्र भग्नावस्थेत आहे. जवळच एक व्याल/शरभ शिल्प आढळते. शिवपूर्वकालीन मुरुंबदेवाच्या मामुली लष्करी ठाण्यावर जाण्यासाठी असलेल्या वाटेवरील हा दरवाजा असावा.
ब)झुंजार बुरुज: सुवेळा माचीचा बालेकिल्ल्याच्या पूर्व पायथ्यापासुन सुरु होणारा तसेच "डुबा" नावाची टेकडी असणारा रुंदीला जास्त असणारा टप्पा ह्या बुरुजापाशी संपतो.वास्तुशास्त्रीय दृष्टीकोन, लष्करी नियोजन,संरक्षण प्रयोजन, आसमंत टेहळणी असे अनेक पैलु ह्या बुरुजाशी संबंधीत आहेत.विस्तृत सोपान त्याचे सौंदर्य दर्शवतात. हा बुरुज सुवेळा माचीच्या दुसर्या टप्प्याचे रक्षण करतो. नैसर्गिक प्रस्तराचा सुरेख वापर करत हा खणखणीत बुरुज बांधला गेलाय. हा प्रस्तर पूर्व दिशेहून एका भव्य ह्त्तीप्रमाणे तर हा बुरुज अंबारीप्रमाणे भासतो असे अप्रतिम नैसर्गिक वास्तुशिल्प तयार झाले आहे.ह्या बुरुजाच्या उजवीकडे सुवेळा माचीच्या दुसर्या टप्प्यामधे जाण्यास द्वार आहे.
क)तटबंदीयुक्त दुसरा टप्पा: नीट निरीक्षण केले असता असे लक्षात येते की या भागात राजगडाचा डोंगर अरूंद झालाय तसेच हा मार्ग वर चढून येण्यास काहीसा सुगम आहे.त्यामुळे ह्या सोंडेच्या दुतर्फा मजबूत तटबंदी बांधली गेली आहे. ह्या टप्प्याच्या शेवटी एक कडा सरळसोट तासून त्यावर भव्य "बिनीचा बुरुज" उभारलाय.हा बुरुज "दुहेरी" आहे. म्हणजे ह्या बुरुजाच्या बाहेर बुरुजाच्या अर्ध्या उंचीवर पुन्हा बुरुजयुक्त बांधकाम आहे. ह्या टप्प्यावरुन उत्तरेला गुंजवणे तसेच दक्षिणेला उतरणार्या दिंड्या आहेत. ज्या ठिकाणी सोंड खुपच अरुंद आहे त्या ठिकाणी नैसर्गिक घसारा थांबवण्यासाठी तटबंदीमधे पायर्यांचे बांधकाम अभ्यसनीय आहे. ह्या टप्प्यामधे एकापुढे एक अशी पाण्याची ५ टाकी आहेत. "गडाचे पाणी बहुत जतन करावे" असे आञापत्रात म्हटले आहे.गडावरील पाण्याची व्यवस्था ही अतिशय मह्त्वाची असे. काही कारणाने एखादे टाके फुटले,सुकले,संपले तर निदान १ टाके तरी पावसाळ्यापर्यंत पुरावे या विचाराने एकच टाके न बांधता अधिक टाकी पावसाच्या पाण्याचा प्रवाह,डोंगर उतार तसेच सपाटी ह्यांचा विचार करुन राजगडावर जागोजागी बांधलेली सापडतात.या तटबंदीच्या बाहेर बिनी बुरुजाअलिकडे एक मीटर चौरसाकृती द्वार असलेले भुयार दिसते.मुंबईतील "नेचर लव्हर्स" ह्या संस्थेने या भुयाराच्या केलेल्या अंतर्गत पाहणीनुसार आतील मार्ग डाव्या-उजव्या वळणावळणांचा आहे.हे कसले दालन असावे की शत्रुसाठी भूलभूलैय्या असावा याचा काही उलगडा होत नाही.ह्या परिसरातील ठिसूळ डोंगराला पडलेले आरपार भगदाड म्हणजेच "नेढे", त्यासमोरील तटबंदीतील पेशवेकालीन गणेशमूर्ती व त्यासमोरील १७०३ साली ह्या माचीवर वीरगतीला गेलेल्या संताजी सिलिंबकराचे स्मारक अर्थात वीरगळ म्हणजे सुवेळा माचीचे अपूर्व असे वास्तुवैभव आहे.
ड)काळेश्वरी परिसर: राजगडाच्या कालखंडानुरूप बदललेल्या दुर्गवास्तुबांधणीच्या अभ्यासासाठी हा परिसर खूप मह्त्वाचा आहे.हा परिसर राजगडाच्या दक्षिण दिशेला येतो. ही दहनभूमी असु शकते.भागीरथी तीर्थ, श्री मल्लिकार्जून,गणपती अशा मंदीरांचा समूह लागतो.या परिसरातील मूर्ती तसेच शिवरायनिर्मित इतर मूर्तींची (उद.प्रतापगडावरील भवानी देवीची मूर्ती) तुलना केली असता असे लक्षात येते की ह्या परिसरातील वास्तु ह्या शिवकालाच्या आधीच्या आहेत.हा परिसर शैव,शाक्त,गाणपत्य अशा पंथातील तांत्रिक विचारांशी संबंधीतांच्या कालखंडातील असण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. येथील खंडित मूर्ती १४९० सालच्या सुमारास निजामशाही संस्थापक मलिक अहमद बहिरीचे झालेले राजगडावरील आक्रमण सूचित करतात. या परिसरातील कडयाच्या पोटात कोरलेले खांबानी तोलून धरलेले सातवाहनकालीन "तीन खांबी टाके" विशेष अभ्यसनीय आहे.शिवकालीन टाकी बांधीव असतात हे खोदीव आहे. भागीरथी कुंडाच्या काठावरील वैशिष्टपूर्ण अशा दिपस्तंभाला लागून एक "ब्रम्हर्षि कुंड" आहे. ते गडाच्या आद्यतन खुणा सांगते. या कुंडावर कोरलेली योग्याची पद्मासनस्थ,उजव्या हाती सन्यासदंड,डावा हात मांडीवर,दोन्ही हातात रुद्राक्षबंधन अशी मूळ खडकात उठावदारपणे खोदलेली मूर्ती गंगा-यमुना दुआबातून अध्ययन-अध्यापनासाठी या डोंगरावर सर्वप्रथम आलेल्या ब्रम्हर्षी किवा त्यांच्या अनुयायांची साक्ष देतात. इतर बुरुजांप्रमाणे गोलाकृती न बांधता निमुळता होत गेलेला " काळेश्वरी बुरुज" हा अत्यंत विशेष बुरुज पाहायला मिळतो.ह्या भागातील एका दिंडीतून राजगड पायथ्याच्या "मळे" ह्या नीरा नदीवरील भाटघर जलाशयाजवळील गावामधे जायला एक वाट आहे.

३>संजीवनी माची
शिवरायांच्या दुर्गबांधणी शास्त्राचा परमोविष्कार म्हणजे ही गडाच्या पश्चिम दिशेस असलेली संजीवनी माची! ही माची लांबीला तीन-सव्वा किलोमीटर आहे. ही माची ३ टप्प्यांमधे उतरत गेली आहे.प्रत्येक टप्पाच्या शेवटी एक भक्कम झुंजार बुरुज बांधला गेला आहे. पहिल्या टप्प्यामधे बालेकिल्ल्याच्या पश्चिम कड्याच्या पायथ्याशी या माचीच्या तटसरनोबताच्या सदरेचे आणि किल्ल्याच्या रक्षणार्थ असलेल्या शिबंदीच्या घरट्यांचे अवशेष नजरेला पडतात.
अ)तीन तिहेरी बुरुज:पहिला टप्पा उतरुन तटालगत थोडे मागे गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुज हे युद्धशास्त्रासाठी अत्यंत मह्त्वाचे आहेत.यांची बांधणी तिहेरी आहे. प्रत्येक टप्प्यामधे जाण्यास पायर्या आहेत.या तीनही बुरुजांवर तोफगाडयांवरील प्रचंड तोफा ठेवलेल्या असाव्यात हे त्या बुरुजाच्या विस्तृत फांजी तसेच चर्यांचे बांधकाम केल्यावर लक्षात येते.या तोफा मार्गासनी ते वेल्हे मार्ग रक्षित होत्या.तोरण्याच्या झुंजार माचीपर्यंतचा मार्ग ह्या बुरुजांच्या टेहळणीमधे येतो.राजगडाचा शिवापट्टण म्हणजेच पालखुर्द हा राजमार्ग या मार्गावरच आहे.मोगली फौजांना पुणे-पाबे-खरीव खिंडीमार्गे वाजेघरहून शिवापट्टण हा मार्ग माहीत होता. किल्ले प्रचंडगड म्हणजेच तोरणा आणि सिंहगड जिंकल्यावर गनीम शिवापट्टणकडे सरकणे सोपे होते यास्तव हे तीन बुरुज हे राजगड राजमार्गाचे जणू ३ अंगरक्षक आहेत. ह्या बुरुजांचा अजुन एक विशेष म्हणजे तोफ डागल्यावर त्याच्या विरुद्ध दिशेत तोफेचा गाडा मागे विस्थापित होतो हे लक्षात घेउन काही अंतरावर कंसाकृति अलंग बांधले आहेत.तोफ डागल्यावर मागे परावर्तित होणारा गाडा त्या कंसाकृति अलंगेमधे अडला जाई.इतका सूक्ष्म विचार राजगड बांधताना राजांनी केलेला दिसतो आणि "शिवरायांचा आठवावा साक्षेप" ह्या विधानाची अनुभूती येउ लागते!
ब)पहिला झुंजार बुरुज: हा माचीच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटी बांधला आहे. बालेकिल्ल्यच्या पश्चिमेकडील बुरुज ह्या बुरुजाची पाठराखण करतो. हा बुरुज माचीच्या दुसर्या टप्प्यातील झुंजार बुरुजाची पाठराखण करतो.दुसर्या टप्पातील झुंजार बुरुज माचीच्या तिसर्या टप्प्याच्या शेवटी असणार्या बिनीच्या बुरुजाचे रक्षण करतो. अशी ह्या माचीच्या संरक्षणात्मक प्रतिकाराची साखळी व्यवस्था अजोड आहे. यदाकदाचित संजावनी माची गनीमाने जिंकली तर ह्या प्रत्येक टप्प्यावर गनीमाला कडवा प्रतिकार होईल आणि पद्मावती माचीकडे सरकणे दुरापास्त होईल.
क)आळ/अळू दरवाजा: दुसर्या झुंजार बुरुजालगत डाव्या हाताला हा दरवाजा लागतो. संजीवनी माचीचे हे मुख्य प्रवेशद्वार.राजगडवर येण्यासाठी हा मह्त्वाचा मार्ग आहे. येथून भुतोंडे ह्या घेर्यातील गावात जाता येते.ह्याची रचना एखाद्या "हुकाप्रमाणे" आहे.बाहेर जाताना डावीकडून हा दरवाजा झुंजार बुरुजांच्या मार्यात येतो. त्या दरवाज्याच्या अत्यंत चिंचोळ्या जागेमधे गनिमाची सहज कोंडी करता येते.
ड)शाहमृग शिल्प: आळ दरवाज्याच्या माथ्यावर हे एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. एका हरिणाला उताणे पाडून दोन वाघ त्यावर पाय रोवून गर्वाने पाहत आहेत असे ते शिल्प आहे. १५६५ मधे विजयनगरचे हिंदु साम्राज्य दक्षिणेतील इस्लामी शाह्यांनी तालीकोटच्या लढाईमधे धुळीला मिळवले.त्याचे प्रतीक म्हणून आदिलशहा आणि निजामशहा ह्यांनी आपल्या सरहद्दीवरील मुरुंबदेवगडावर कोरले.ह्याला पुरावा म्हणजे "चित्रे शकावली" मधील-"शके १५६४ चित्रभानु नाम संवत्सरे,मावळचे हद्दीत शाहमृग नावाचा पर्वत होता.तेथे शिवाजी माहाराजे याणी ठाणे घालून इमारत केली आणि राजगड नाव ठेवले"आढळणारी ही नोंद.दोन वाघ हे आदिलशाह आणि निजामशाह ह्यांचे प्रतिक तर हरिण म्हणजे विजयनगरच्या हिंदु साम्राज्याचे प्रतिक. हे राजगडावरचे दुसरे शिवपूर्वकालीन शिल्प आहे.
इ)नाळयुक्त चिलखती तटबंदी: हे तो किल्ले राजगडचे भूषण! अनेक किल्ल्यास कोट,परकोट,खंदक आढळतील पण चिलखती तटबंदी हे खास शिवरायांनी राजगडला घातलेले आभूषण! आळ दरवाज्यानंतर माचीचा तिसर्या टप्प्यापासुन ही जगातील एकमेवाद्वितीय अशी रचना सुरु होते. चिलखताच्या दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाउण मीटर आहे.खोली चार-पाच मीटर आहे. चिलखतामधे उतरण्यास पायर्यांच्या दिंडी आहेत. तसेच नाळेमधून वर येण्यास दगडी सोपान आहेत. सोपानात गस्तीकर्यास रात्री मशाल अडकवण्यासाठी छिद्र आहे. संजीवनी माचीचा हा टप्पा उंचीचा विचार करता मूळ डोंगरापेक्षा बराच उतरलेला आहे. त्यामुळे गडास शत्रु भिडण्याची शक्यता जास्त होती. म्हणून तोफांच्या मार्याने किंवा सुरुंग स्फोटाने दुश्मनाने तटबंदी पाडली किंवा भगदाड पाडले तर तिला संरक्षक अशी अंतर्गत तटबंदी बांधली होती. युद्धसमयी नाळेतून शिबंदी फिरती(mobile) ठेवून खूप मोठ्या सैन्याचा आभास मर्यादित सैन्याद्वारे निर्माण करुन शत्रुला विस्मयित करता येऊ शकते. संजीवनी माचीच्या ह्या बाह्य तटबंदीला एकंदर १२ चिलखती बुरुज आहेत.अंतर्गत तटबंदी बुरुजविरहित असून फांजी(तटावर गस्तकर्यांना फिरण्यासाठी असलेली जागा) विस्तृत आहे. जंग्या(तटबंदीमधील बंदुकांसाठी मारगिरीच्या जागा). निरनिराळ्या कोनांमधून राखलेल्या असल्याने वेगवेग्ळ्या जंग्यामधून संपूर्ण गडाचा चढणीचा मार्ग मार्यात येत असे. सर्वात मह्त्वाचे वास्तुवैशिष्ट्य म्हणजे चिलखतामधे उतरण्यास असलेले जिने! त्यांवर खाली उतरताना डोके आपटू नये म्हणून वेगवेगळ्या उंचीवर चैत्य कमानी बांधलेल्या आढळतात. वरच्या तटबंदीचे प्रचंड वजन ह्या दगडांनी कसे पेलून धरले हे "Strength of Materials" ह्या शास्त्रागत विचार करता हे जिने बांधताना दगडी चिर्यांमधे तसेच ह्या जिन्यासाठी वापरलेल्या चुन्यामधे काही फरक केला होता का हे राजगड बांधकामाचा तौलनिक अभ्यास करुन ठरवणे अत्यंत मह्त्वाचे आहे.
ई)बिनीचा बुरुज: संजीवनी माचीच्या तिसर्या टप्प्याच्या टोकाशी हा बलाढ्य बुरुज आहे.फिरत्या आडव्या चाकावर (चरकी) ठेवलेली तोफ ३६० अंशामधे मारा करु शकेल इतका हा विस्तृत आहे.त्यालादेखिल चिलखती तटबंदी आहे. चिलखतास उतरण्यास दोन्ही बाजूनी दारे आहेत. त्या बुरुजाखालील मुलभूत खडक उभा तासून काढला आहे त्या छिन्नीच्या आघाताच्या खुणा आजही दृश्यमान आहेत.भुगोलाचा विचार करता तोरणा,रायगड,लिंगाणा या किल्ल्यापर्यंत ह्या बुरुजाची नजर आहे. दिवसा धूम्रवलयांनी तर रात्री अग्निशिखांनी तोरणा-लिंगाणा-रायगड या माध्यमांतून सांकेतिक संदेश येत-जात असावेत.सह्याद्रीची मुख्य रांग ह्याच दिशेस असल्याने कोकणातून घाटमाथ्यावर येणार्या वरंधा,सुपेनाळ,मढे,शेवत्या,बोराटा,सिंगापूर नाळ,बोचेघोळ,कावल्या-बावल्या असे अनेक घाटमार्ग,खिंडी,नाळी ह्यांवर ह्या बुरुजाची पर्यायाने राजगडाची करडी नजर होती.
फ)तटबंदीतील शिल्पे: ह्या माचीवर तसेच संपूर्ण राजगडावरील तटबंदीमधे वीरासनामधील मारुतिची मूर्ति कोरलेली दिसते. तत्कालीन सामाजिक चाली-रितींचा विचार केला असता मुख्य गडापासून आडबाजूला एकाकी असणार्या गस्तकर्यांसाठी अनिष्ट शक्ती निवारणार्थ हा मारूति स्थापलेला होता. संजीवनी माचीवर अजून तीन विशेष अशी सिंहशिल्पे दिसतात. एक सिंहछावा शिल्प आहे. त्यापुढील शिल्प एक वनराज सिंहावलोकन करतानाचे आहे.त्याच्या पाठी एक मदोन्मत्त हत्ती लहान स्वरुपात दिसतो. त्यापुढे एका बलाढ्य सिंहाने आपल्या पंजाने हत्तीचे गंडस्थळ विदीर्ण केले आहे. इतिहास सांगतो की राजगड निर्मिती १६६२ पर्यंत चालू होती. त्यामुळे सिंहाचा छावा म्हणजे १२व्या वर्षी मावळात आलेले शिवराय,वनराज म्हणजे स्वतंत्रतेची गर्जना करणारे शिवराय़,त्यापुढील शिल्प म्हणजे अफजलरुपी हत्तीचे पोट फाडणारे शिवराय. १६५९ मधील घटना पाथरवट,गवंडी ह्यांनी शिल्पस्वरुपात साकारलेली असावी. याच तटबंदीमधे "मकरमुख" तसेच "व्याघ्रमुख" ही शिल्पे सापडतात. मगर हे जलदेवतेचे प्रतिक आहे.पायथ्याच्या गावांमधे "बारवजाई" ही जलदेवता तसेच "वाघजाई" ह्या दैवतांचे अस्तित्व आहे.शिबंदीने आपली ही प्रतिके स्थापन केली असावीत.

४)बालेकिल्ला:
मूळ फारसी शब्द आहे " बाला-ई-किल्ला". डोंगरी किल्ल्याच्या तटबंदीच्या आतील एखादे शिखर वा टेकडी पुन्हा तटबंदी बांधून अभेद्य केलेली जागा म्हणजे बालेकिल्ला. अवघ्या जगात राजगडाच्या बालेकिल्ल्यासारखा बेलाग,बळकट आणि डौलदार बालेकिल्ला(Citadel)नाही. प्रख्यात लेखक पं.महादेवशास्त्री जोशी आपल्या "महाराष्ट्राची धारातीर्थे" ह्या दुर्गविषयक ग्रंथामधे म्हणतात," बालेकिल्ल्याचा दगड शुद्ध दगड आहे.तो पावसात भिजतो,वार्यावर सुकतो आणि उन्हात तापतो,जणु युगायुगांचा उभा अनिकेत तपस्वीच! ह्यावर चढणारी वाट कशी आहे? तर उभ्याने चढता येउ नये,काठीचा उपयोग न व्हावा...अनेक गडांना बालेकिल्ले आहेत पण ह्याची सर कोणातही नाही..." ह्या मोजक्या शब्दांमधे राजगडच्या बालेकिल्ल्याच नेमक दुर्गमत्व ध्यानी येत.
अ)आरोहण मार्ग: पद्मावती माचीहून एक फाटा बालेकिल्ला चढणार्या वाटेला लागतो.ह्या सर्व मार्गावर दोन द्वारांचे सध्या भग्नावशेष दिसतात. म्हणजेच ह्या मार्गावरील सुरक्षा खुप कडक असावी कारण की बालेकिल्ल्यावर राजकुटुंब,अष्टराञीं,शिवराय ह्यांची निवासस्थाने होती. त्यापैकी दुसर्या द्वाराजवळच द्वाररक्षक बंकींसाठी एक विस्तृत गुहा आढळते.ती शिवपूर्वकालीन असु शकते पण शिवकालात तिचा वापर पहार्याची चौकी म्हणून केला गेला असावा. ह्या संपूर्ण मार्गावर शिवकालात खोदीव तसेच बांधीव अशा पण अत्यंत अरुंद पायर्यांचे बांधकाम असावे.कालौघात ही वाट खूप ढासळलेली आहे.
ब)बालेकिल्ला महाद्वार: उभ्या सह्याद्रीच्या कड्यावर उभे बांधलेले हे महाद्वार म्हणजे ह्या देशीचे एक अतर्क्य बांधकामाचा नमुना आहे. मोगल,आदिलशाह,कुतुबशाह,इंग्रज यांनी बांधलेल्या समकालीन किल्ल्यातही एवढी कलात्मकता आढळत नाही.समकालीन साम्राज्यांची आर्थिक स्थिती आणि राजगड निर्मितीच्या बांधकामाच्या वेळची शिवरायांची आर्थिक स्थिती ह्यांचा विचार करता किल्ले राजगडचे हे बांधकाम काकणभर सरस आहे. ह्या द्वाराचे बुरुज हे गोलाकार नसून कोनदार अष्टकोनी आहेत. ह्या महद्वारामधे वर्षाकालीन पाण्याचा निचरा करण्यास केलेली चर खणलेली रचना अवलोकनीय आहे.अफजलखानाचे शिर ह्या महाद्वाराच्या एका कोनाडयात पुरले गेले अशी कथा सभासद बखरीची पाने सांगतात.
क)जननी आणि ब्रम्हर्षी मंदीरे:
शाक्त पंथाशी नाते सांगणारी बालेकिल्ल्यावरील जननी देवता राजगडाचे प्राचीनत्व सांगते.आता त्या मंदीराचे द्वार उत्तराभिमुख आहे शिवकालामधे ते वास्तुशास्त्रानुसार पुर्वाभिमुख असावे.सध्याची मूर्ति जरी शिवकालाशी नाते सांगत असली तरी शाक्त पंथातील निराकार पाषाणखंडामधे असलेले("तांदळा") हे दैवत पुढे सगुण पाषाणरुपात साकरले गेले असावे. ब्रम्हर्षी मंदीर तर राजगडचे "मुरुंबदेव" ह्या नावाची साक्ष देते.ह्या मंदिराची वास्तुशास्त्रीय रचना एका जलाशयाच्या बरोबर बांधले गेल्याचे दर्शवते.ब्रम्हदेवाचे निवासस्थान सुद्धा पाण्यातील कमळ हेच असते.ह्याचा अर्थ ह्या मंदिराचे वास्तुशास्त्र आपल्याला राजगडावर मानव वस्तीच्या आदिम खुण असलेल्या "ब्राह्म" संप्रदायाशी घालून देते.
ड)ब्रम्हर्षी उपासक गुहा: ब्रम्हर्षी मंदीरापासून डाव्या हाताल थोडे खाली उतल्यावर हे एक मह्त्वाचे लेणे लागत्ते.३-४ मीटर प्राकारास डावीकडे मीटरभर उंचीवर एक अंतर्गत दालन आहे.हे लेणे यादवपूर्व कालीन असावे. आदिम कालखंडामधील ब्रम्हर्षीच्या अनुयायाच्या अध्ययन-अध्यापन-वास्तव्यासाठी निर्मिलेले असावे. अनेक किल्यांवर बौद्ध(कोंडाणे लेणे,राजमाची),जैनलेणी(अंकाई-टंकाई किल्ले,त्रिंगलवाडी किल्ला) अशी खुप लेणी सापडतात पण हे "ब्रम्ह" सांप्रदायाशी निगडीत वास्तु-लेण्यांचे वैभव फक्त राजगडावर आहे.
इ)माची रक्षक बुरुज: राजगड बालेकिल्ल्याचा आकार काहिसा त्रिकोणी आहे.ह्या तीन शिरोबिंदूंवर पद्मावती,सुवेळा आणि संजीवनी ह्या माच्यांच्या संरक्षणार्थ ३ बलाढ्य बुरुज तीन दिशांना बांधले आहेत. त्यामुळे संपूर्ण राजगड बालेकिल्ल्यावरुन लढवायची ही अभिनव अशी व्यवस्था होती.संरक्षणसिद्धतेची बालेकिल्ला म्हणजे चौथी पायरी. आपत्कालीन परिस्थितीमधे उत्तरेकडील पद्मावती माची रक्षक बुरुजातून थेट पाली दरवाज्यावर पोहोचणार्या वाटेचे उध्वस्त अवशेषसुद्धा निरीक्षणामधे येतात.
फ)राजकुटुंबासाठी बांधकामे: बालेकिल्ल्यावरील सर्वोच्च सपाटीवर अनेक बांधकामांचे उध्वस्त चौथरे सापडतात.त्यापैकी काही शिवरायांचे स्वत:चे निवासस्थान होते.दिवाण-ई-खासचे अवशेष स्पष्ट दिसतात. राण्यांची निवास्स्थाने ह्याच परिसरात आहेत.त्याशिवाय कोषागार,दफ्तरखाना ह सुद्धा ह्याच परिसरात असावा. १९८६ च्या एप्रिल महिन्यामध्ये पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननामधे ह्या परिसरात अनेक वस्तु सापडल्य होत्या जसे की चांदीची झाकणी इ. ह्या अहवालाचा नीट अभ्यास झाल्यास वास्तुंचे नेमके प्रयोजन कळू शकेल.
ग)चंद्रकोर तळे: बालेकिल्ल्याची पाण्याची गरज भागावण्यासाठी असलेल्या अष्टमीच्या आकारात बांधून काढलेले "चंद्रकोर तळे" शिवकालीन बांधकामाची फार सुंदर साक्ष देते.तळ्याची पश्चिमेकडील अर्धवर्तुळाकार बाजू खडकातून खोदुन काढली आहे.ह्या तळ्याच्या मागे काही छोटी पाण्याची खोदीव टाकी आहेत.एकाच ठिकाणी पाण्याची ७ टाकी असणे हे सप्तमातृकांशी संबधित ठिकाण असु शकते. किल्ले अवचितगड,किल्ले चावंड,तळेगड अशा ठिकाणी असे बांधकाम आढळते.

उपसंहार:
तीन दिशांच्या तीन माच्या,मध्यभागी बेलाग बालेकिल्ला, ३ प्रमुख दरवाजे-६ चोरदिंड्या,नाळयुक्त दुहेरी चिलखती तटबंदी,दुहेरी-तिहेरी बांधणीचे बुरुज हे गडबांधणीतील अभिनव प्रयोग यांचे अवलोकन करता आपल्या लक्षात येते की शिवरायांनी दुर्गबांधणीचे "दुर्गविञान" हे एक नवेच शास्त्र निर्माण केले आहे. समकालीन पाश्चात्यांनी लिहिले आहे-"He(shivaji) studied with extreme care everything about the duty of general,soldier,above all the art of fortification which he understood better than ablest engineers"
खरच गुंजण मावळातील हा डोंगर वयाच्या १२ वर्षी महराजांनी निरखला, हेरला आणि आपली बुद्धी कुंठीत होईल असे एक-एक प्रयोग करून जगातल्या एक सर्वोत्क्रृष्ट डोंगरी राजधानीमधे रुपांतर केले. दुर्गवास्तुशास्त्राचा हा सर्वोत्तम नमुना म्हणावा लागेल. अजुनही अनेक वास्तुंचे उत्खनन करुन त्यांना इतिहासाच्या कागदपत्रांची आणि भुगोलाच्या साक्षीची जोड दिली तर वास्तुंचे नवीन संदर्भ उजेडात येउ शकतात. राजगडचे हे वास्तुवैभव पाहून फक्त मला एवढेच आठवते,
"हे शिवसुंदर मंदिर बघता। क्षणभर थांबे रवी मावळता
दिग्गज आणति अभिषेकाला स्वर्गंगेचे घडे॥
उभे हे राजगडाचे कडे......"

संदर्भसूची:-

१)गडांचा राजा राजगड - प्र.के.घाणेकर.
२)राजगड स्थळदर्शन- आप्पा परब.
३)अथातो दुर्गजिञासा- प्र.के.घाणेकर
४)महाराष्ट्राची धारातीर्थे-पं.महादेवशास्त्री जोशी.
५)दुर्गकारिण: राजा शिवछत्रपती-मिलिंद पराडकर,जिद्द मासिक दिवाळी विशेषांक २०१०

प्रकाशचित्रांसाठी ही लिंक पाहा: https://picasaweb.google.com/chinu234/RAJGADDARSHANANDRAJGADPRADAKSHINA2...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रहो, खूप खूप धन्यवाद...यातील जे चांगले आहे ते पूर्वसुरींचे आहे आणि निर्विवादपणे राजगडाचे आहे Happy

पहिल्यांदा एवढी विस्तृत माहिती वाचली. आपले खूप खूप धन्यवाद.
प्रत्येक मुद्यासाठी एक असा फोटो टाकता येईल का हो?

वा..वा.. सुरेख लिहिलय !! मधे पक्का भटक्याने की यो ने राजगडाचे फोटो टाकले होते.. त्यांच्या परवानगनी ते फोटो ह्या लेखात अधेमधे घालता आले तर पहा..

संजिवनी माचीचा परिसर फारच सुंदर आहे... एकदम भक्कम ! चोर दरवाजाने वर येताना लागणार्‍या पठाराचे वर्णन लिहा कोणीतरी !

चिन्मय,
मस्त संग्रहण. प्रत्येकाला पुन्हा एकदा राजगडवारीला निमित्त दिल्याबद्दल आभार..
तालीकोटची लढाई १५६५ मध्ये झाली आहे, तेवढी टंकचूक दुरुस्त करावी.

धन्यवाद सर्वांना प्रतिसादाबद्दल Happy
@ हेमः चूक सुधारली आहे दर्शवल्याबद्दल आभारी..

आडो.. माझ्या आठवणीप्रमाणे लवीहून जाताना.. चोरवाटेवर..मी वर जे पठार म्हंटलय ते भिकुला पॉईंट नंतर लगेचच आहे..

पराग, लवीहून जाताना खाली बाबुदांचं घर लागतं मग जंगलातून बर्‍यापैकी चढ चढून गेलं की बाबुदांचं झापावरचं घर लागतं. तिथून मात्र सगळी चढाई नाकाडासारखी, म्हणजे नाकाड च म्हणतात त्याला. ती चढाई चढली की आपण चोरवाटेने पद्मावतीला पोहोचतो.

केवढी विस्तृत महिती दिली आहे ! सगळा गड, गडाखालील परिसर अगदी विंचरुन काढलेला दिसतोय चिन्मया तू ! त्याकरता तुला सलाम........
ते "गडांचा राजा, राजांचा गड" का म्हणतात याची जाणीव झाली.
श्री शिवछत्रपतींच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत.

@सचिन: राजगडाचे अप्रतिम प्रकाशचित्र !
@ आऊटडोअर्सः हो तेच गोनिदांनी आपल्या वाघरु कादंबरीतून अमर केलेले बाबुदा भिकुले... त्यांची मुलगी यसुदी आणि जामात हानुवती फणसे हल्ली दादवडी गावात असतात.
@शशांकः हा गडच असा गोनिदा उर्फ आप्पांच्या भाषेत मनी मानसी जडणारा आहे की कितीही वेळा जा,पाहा,अनुभवा तरी समाधान नाहीच.. Happy

'रा..ज गड' नावाप्रमाणेच राजा असलेला हा गड. अत्यंत प्रेमात पाडणारा असा हा गड. या गडावर माहीती नसतानाही २०० जणांना वर नेउन गोड्धोडाचे जेवण घालुन सुखरुप परत आणण्याचा पराक्रम केल्यानंतर कळले की 'त्या'नी त्या काळी हे कसे पेलले असेल. छान आणि अप्रतिम लेखन.