फलश्रुती - भाग १ - श्रीफळ

Submitted by दिनेश. on 4 April, 2011 - 08:35

॥ श्री ॥
नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः ।
अन्ये च बदरीकाकारा बहिरेव मनोहराः ॥

या मालिकेची सुरवात, श्रीफळापासून करावी, हे ओघाने आलेच. नारळाचा उल्लेख एक फळ म्हणून करावा, हे बहुतांशी किनारपट्टीतील लोकांना रुचणार नाही.
कारण तिथे तो नारळ इतक्या प्रकारे वापरला जातो, कि त्याचा काहि खास वेगळेपणाच नाही. पण किनारपट्टीपासून दूर असणाऱ्या प्रदेशात मात्र, ते फळ म्हणूनच खाल्ले जाते. दिल्ली मधे तर नारळ भाजीवाल्याकडे न मिळता, फळवाल्याकडेच मिळतो.

पारंपारीकरित्या नारळाची लागवड किनारपट्टीच्या प्रदेशात होते, हे नक्कीच. याचे कारण नारळाचा प्रसार हा समुद्रमार्गे झाला. आणि जिथे तो किनार्‍याला लागला तिथे तो रुजला. आज, जगातील उष्ण कटीबंधातील, बहुतेक समुद्रकिनारे नारळाच्या झाडांनी सुषोभित झालेले आहेत.

पण नारळ केवळ किनारपट्टीवरच होऊ शकतो, हा आता गैरसमज ठरला आहे. आपल्या देवरुखमधे नारळावर संशोधन होत असे. कोल्हापूरला, गुजरीच्या मागच्या गल्लीत एक मोठे नारळाचे झाड पूर्वापार बघतोय. नगर जिल्यातल्या, राहुरी ऋषि विद्यापिठात पण नारळाची झाडे बघितली होती.

नारळाला आपल्या कुठल्याही पूजेत मानाचे स्थान असते. मंगल कलश, मंगल तोरण हे नारळाशिवाय पुर्णच होऊ शकत नाही. ओटी भरणे या विधीत त्याला मानाचे स्थान आहेच तसेच देवतेला अर्पण करण्यात येणारी एक वस्तू म्हणूनही तिला महत्व आहे.
हे असे स्थान का मिळाले असावे, यासंबंधी काही मते अशी आढळली, कि नारळाची एकदंर रचना. म्हणजे त्याला असणारे कठीण कवच. आतमधे असणारे मधुर खोबरे. शिवाय पाणी हि मानवाला अचंबित करुन गेली. दुसरे म्हणजे त्याचे टिकाऊपण. नारळ किनारपट्टीपासून आतील भागात पुर्वापार नेला जातोय. तसेच तो साठवूनही ठेवला जाऊ शकतो.

आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नारळ हे मानवाच्या शिराचे प्रतीक मानले गेलेय. त्याचे कठीण कवच, त्यावर असणारे डोळे, त्यावरचे केस आणि आतील पाणी, यामूळे अशी तुलना झाली. शिवाय नारळ फ़ोडण्याच्या क्रियेत, कुठेतरी बळी दिल्याची भावनाही आहेच.
नारळाबाबत आपण आता एवढे श्रद्धाळू आहोत, कि नारळ फ़ोडणे या शब्दप्रयोगाच्या जागी आपण, नारळ वाढवला, असा शद्बप्रयोग करतो.

तर असा हा नारळ आला कुठून ? म्हणजे त्याचे उगमस्थान कुठले.

नारळाच्या झाडाचा उगम नेमका कुठे झाला असावा, याबाबत एकमत नाही. गंगेच्या त्रिभूज प्रदेशात म्हणजे सध्याच्या बांगला देशात, किंवा दक्षिण अमेरिकेत किंवा अगदी आपल्या केरळमधेही तो झाला असल्याची शक्यता आहे.
न्यू झीलंडमधे, नारळसदृष्य झाडाचे जीवाष्म सापडले आहेत आणि ते किमान दिड कोटी वर्षांपुर्वीचे आहेत.
अर्थात नारळ, आपण सध्या ज्या रुपात पाहतो, तसाच तो निर्माण झाला असावा याची शक्यता कमी आहे. उंच वाढलेली नारळाची झाडे ते त्याचा बुटका सिंगापुरी अवतार, हा तर आपल्याच आयूष्यात घडवून आणलेला बदल आहे,

नारळचे झाड, तसे आपल्या सर्वांच्या परिचयाचे. कुणी नारळाच्या झाडाचे चित्र काढायला सांगितले तर आपण एक सरळसोट वाढलेले खोड आणि त्यावर चहूबाजूंनी पसरलेल्या झावळ्या, आपण काढूच. आणि त्याचे स्वरुप हे तसेच असते. नारळाला क्वचितच फांद्या फूटतात. (फांद्या फूटलेले एक
झाड मालवणच्या सिंधुदूर्ग किल्ल्यात होते. काही वर्षांपूर्वी त्यावर वीज कोसळ्याने ते आता केवळ अवशेषरुपात उरले आहे) बूंध्याच्या टोकाला एक मऊसर असा भाग असतो. आणि त्या भागातूनच नारळाच्या झाडाची वाढ होत असते. या भागाला इजा झाल्यास, अर्थातच वाढ थांबते. तसेच काही कारणास्तव हा भाग कापला गेला, तर उरलेल्या बुंध्यापासून नवीन फूटवा येत नाही.

नारळाचे झाड सहज १०० फूट वाढते. त्याच्या झावळ्या अगदी तीन मीटर्स पर्यंत वाढत असल्या, तरी झाडाला फांद्याच नसल्याने, झाडाला आडवा विस्तारच नसतो. बाकिच्या झाडांच्या स्पर्धेतूनही आपल्यालाच जास्तीत जास्त, सूर्यप्रकाश मिळावा, म्हणून नारळाचे झाड हि उंची गाठते.
नारळाचे झाड जमिनीतील क्षार (मीठ) सहन करु शकते. पण त्याला ऊन,पाऊस आणि आर्द्रता यांची पण गरज असते. (बाकीचे घटक असले तरी, आर्द्रता कमी असल्याने, भूमध्य सागराच्या किनारपट्टीवर नारळाची झाडे नाहीत.)

नारळच्या झाडाच्या वरील भागातून, व्यवस्थित चुण्या घातलेले पान बाहेर येते आणि ते मोकळ्या जागेत बाहेरच्या बाजूने पसरते. नवीन पान आल्यावर सर्वात खालचे पान गळून पडते. गळून पडताना, ते बुंध्यापासून पूर्णपणे विलग तर होतेच, शिवाय खाली पडताना, आणखी एक काम करते.
बुंध्यावर यदाकदाचित एखादे बांडगुळ रुजले असेल, तर त्याला ते उपटून टाकते. हि झावळी पडताना, कुणाच्या डोक्यात पडत नाही, असा एक समज कोकणात आहे. या झावळीची रचना बघितल्यास, मध्यभागी एक जाडजूड दांडा आणि त्याच्या दोन्ही बाजूने समसमान, लांबीला जास्त पण रुंदीला कमी अशी पाने असतात. अशा रचनेमूळे ते पान उभेच्या उभे खाली कोसळते.
नारळाच्या झाडाचा बुंधा, हा कायम गुळगुळीत आणि बांडगूळ विरहीत असतो, त्याचे मुख्य कारण हे आहे.

नारळाला इंग्लीशमधे कोकोनट म्हणत असले तरी तो काही, इतर नट्स प्रमाणे नट नाही. कोकोनट हे नाव कोकोस न्यूसिफ़ेरा या स्पॅनिश नावावरुन आलेय आणि त्यातल्या कोकोस चा अर्थ, माकडाच्या तोंडासारखा, असा आहे.
(मला नारळ, नारिकेल या शब्दाची व्युत्पत्ती हवी आहे ??? )

पण तसे बघितले तर हे फळ अत्यंत वैषिष्ठपूर्ण रचनेच आहे. बाहेरील आवरण से साधारण होडीच्या आकाराचे असल्याने ते पाण्यात व्यवस्थित पुढे सरकू शकते. आतील आवरण हे केसाळ असल्याने ते फळ पाण्यात तरंगू शकते. आतमधे अत्यंत कठीण असे कवच असल्याने आतले बीज सुरक्षित राहते. त्या बीजाला प्रारंभ काळात जरूर पडेल इतके पाणी आणि अन्न त्या कवचात असतेच. आतील अंकुराला बाहेर येण्यासाठी त्या कवचाला तीन ठिकाणी छिद्रे ठेवलेली असतात. नारळ फ़ोडल्यानंतर आत कधीकधी सुपारीएवढा गोळा दिसतो तो त्याचा कोंब असतो.

नारळ रुजवण्यासाठी कोकणात तो विहिरीत टाकून देतात. तो विहिरिच्या पाण्यात तरंगत राहतो आणि यथावकाश त्याला कोंब फ़ूटल्यावर तो जमिनीत पेरतात. घरातही असा नारळ पाण्यात ठेवल्यास वा त्यावर ओले फडके ठेवल्यास, त्याला कोंब येऊ शकतो (अनेक मंगलोरी हॉटेल्समधे असा नारळ तूम्ही पूजेत ठेवलेला बघितला असेल.) पेरल्यानंतर त्याला मीठ आणि सुक्या मासळीचे खत घालायची पद्धत आहे. तसेच सुरवातीच्या काळात त्या रोपाचे वार्‍यापासून व उन्हापासून रक्षण करावे लागते. पाणीही नियमित द्यावे लागते.

नारळाची मूळे हि इतर झाडांपेक्षा वेगळी असतात आणि झाडाच्या उंचीच्या मानाने ती खोलवर
गेलेली नसतात. त्यामूळे त्याची लागवड घराच्या जवळ केली तरी घराच्या बांधकामाचे नुकसान
करत नाहीत. कोकणामधे पूर्वापार घराभोवती नारळाची लागवड केलेली असतेच, आणि घर
विकताना, घराभोवती माड किती, हा एक महत्वाचा मुद्दा असतो. माड पडला तरी, घरावर
पडून घराचे नुकसान करत नाही, अशी श्रद्धा कोकणात आहे.

नारळाच्या जातीप्रमाणे योग्य ती उंची गाठल्यावर नारळाच्या झाडाला फूले येतात, कोकणात वाढणार्‍या अनेक फळझाडात (उदा. जायफळ, रातांबे, पपई) नर आणि मादी फूले येणारी झाडे वेगळी असतात. पण नारळाच्या बाबतीत मात्र, हि दोन्ही फूले एकाच झाडावर येतात.
नारळाचा फूलोरा एका खास आवरणात, झावळीच्या मूळाशी येतो. मग हळूवारपणे ते आवरण उकलते आणि फ़ूले उमलतात. यातल्या प्रत्येक दांडोऱ्यावर पहिले फूल मादी तर बाकीची नर असतात. या फूलांना खास असा सुगंध नसतो, पण याचे परागीभवन मधमाश्यांसारख्या किटकांकडून होते.

नर फूले अर्थातच गळून पडतात आणि मादीफूलांपासून छोटासा नारळ तयार होतो. नारळाची पुर्ण वाढ व्हायला, जवळजवळ वर्षभराचा कालावधी जातो. त्यामूळे नारळपिकाचा खास मोसम असा नसतो, तर वर्षभर ही फळे लागतच असतात.
फळे छोटी असताना, त्यावर काही किटकांचे हल्ले होतात आणि ती गळून पडतात. नैसर्गिकरित्या मात्र, फळ पूर्ण पक्व झाल्याशिवाय झाडावरुन पडत नाही.

नारळाच्या झाडावर इतर किटकांचे हल्ले होत असले तरी काही प्रमाणात उंदीरही नारळाचे नुकसान करतात. त्यांच्या मजबूत दातांमूळे ते नारळ कुरतडू शकतात.
अरबी समुद्रातील काही बेटांवर काही भलेमोठे खेकडेही, नारळाच्या झाडावर चढून, तो आपल्या तीक्ष्ण नांग्यानी तोडून खाऊ शकतात. बाकीच्या प्राण्यांना मात्र नारळ अप्राप्य आहे. तरी अलिकडे अनेक किटकांनी नारळाच्या कोवळ्या फळांना लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. यामूळे कोवळी फळे गळून
पडायचे प्रमाण वाढतेय.

नारळाची पूर्ण वाढ व्हायच्या आधी, कोवळा नारळ, काढला जातो. टेंडर कोकोनट किंवा शहाळे अनेक देशात आवडीने खाल्ले जाते. खरे तर मुख्य भर असतो तो त्यातल्या पाण्यावर. मधुर चवीचे आणि खनिजांनी युक्त असे हे पाणी, उन्हाळ्यात खास उपयोगी असते.त्यामधे मऊसर असे खोबरे, ज्याला मलाई म्हणतात ती पण असते. हि जेलीसदृष्य दिसत असली, तरी ती जेलीप्रमाणे स्थिर होऊ शकत नाही. शहाळे कितपत कोवळे आहे, यावर त्यातील खोबऱ्याचा कठीणपणा ठरतो. शहाळे फ़ोडणे हे एक कौशल्याचे काम आहे.
सिंगापूर आणि थायलंड मधे या कामासाठी एका यंत्राची योजना केल्याचे मी बघितले होते.
मी अनेक देशात नारळपाण्याचा आस्वाद घेतला आहे. सर्वात मधूर शहाळे मला ओमान मधल्या सलालाह मधे मिळाले होते, तर सर्वात जास्त पाणी असलेला नारळ, श्रीलंकेतला होता. (अर्थात हे वैयक्तीक निरिक्षण आहे.)

नारळाच्या झाडाच्या उंचीमुळे, त्याच्या सरळसोट खोडामूळे झाडावरुन नारळ काढणे हेही एक कौशल्याचे काम आहे. त्यासाठी खास कसब असलेले निष्णात लोक लागतात. दोन्ही पायांना दोरी बांधून, तिचा विळखा खोडाभोवती देत, त्या झाडावर चढावे लागते. मग योग्य तो नारळ बघून त्याच्या देठावर कोयत्याने घाव घालून तो खाली टाकतात.
कोवळा नारळ वा शहाळे मात्र असे खाली टाकता येत नाही. तो पूर्ण घड, खास दोरी बांधून सावकाश खाली उतरवला जातो.
असे लोक आता उपलब्ध नसल्याने, आता काही माकडांना या कामासाठी प्रशिक्षित केले जाते. ती माकडे त्या नारळाला गोल गोल फ़िरवून, त्याचा देठ कमकुवत करतात, आणि तो खाली टाकून देतात.

नारळाच्या उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे.(फिलीपीन्स आणि इंडोनेशिया नंतर ) तरीही नारळावर आधारीत मोठे उद्योगधंदे भारतात नाहीत. नारळाच्या खोबर्‍यापासून दूध, क्रीम, दूध पावडर, खोबरे कीस आणि अर्थातच तेल काढले जाते. भारतात त्याचा वापर कसकसा केला जातो, ते पुढे बघूच.

कल्पवृक्ष

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात असे आपण लहानपणापासून वाचत आलोय. कल्पवृक्ष हि तर एक कविकल्पना आहे. या काल्पनिक झाडाखाली बसून जी इच्छा मनात धरू ती पूर्ण होते, असा एक समज. नारळाच्या झाडाखाली बसून तसे काही होत नाही (त्या झाडाखाली बसायला, त्याची सावलीही पडत नाही.) पण नारळाच्या झाडापासून अनेक वस्तू तयार करता येतात. त्यापैकी काही बघू.

नारळाचे लांबलचक सरळ खोड, घराचे वासे म्हणून वापरता येतात. किनार्‍यावर होड्या आणताना, त्या रेतीमधून नीट ओढता याव्यात म्हणून त्याखाली हि गोलाकार खोडे ठेवता येतात. ती आडवी कापून, बसण्यासाठी बाक करता येतात.
नारळाच्या पानातील मधली कठीण शीर वेगळी काढून, तिच्यापासून केरसुणी करतात. हि केरसुणी मजबूत असल्याने झाडलोटीच्या कामासाठी उपयोगी ठरतेच. केरळमधे तीच मशाल म्हणूनही वापरतात. ती स्थिर ठेवली तर त्यातली आग विझते आणि परत जोरात हलवली तर पेटते.
या झावळ्यांतील पाने, चटईसारखी विणून जो प्रकार करतात त्याला झापा असे म्हणतात. कोकणात त्याचा वापर छ्परासाठी आणि भिंतीसाठीही केला जातो. हे पान पावसात लवकरकूजत नाही आणि पावसाचा माराही थोपवून धरते. मालवणमधील एक नाट्यगृह तर केवळ झापांनीच बंदीस्त केले होते. अत्यंत नैसर्गिक, स्वस्त, मजबूत तरीही हवेशीर असे हे कुंपण असते.

केरळमधील प्रख्यात नृत्य असलेल्या, कथकली मधे, कलाकारांच्या वेषभूषेत, नारळांच्या
कोवळ्या पानांचा अत्यंत कलात्मक वापर केलेला असतो.
नारळाच्या फ़ळाच्या वरच्या कडक आवरणापासूनही अनेक वस्तू केल्या जातात. खास करुन, जात्याभोवती सांडलेले पिठ गोळा करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याचा जळण म्हणूनही उपयोग होतो. गोव्यातील प्रसिद्ध गोड पदार्थ, बेबिंका करण्यासाठी भांड्याला खालून नव्हे तर वरुन उष्णता द्यावी लागते, आणि त्यासाठी हे "सोडण" उपयोगी पडते. ते पेटवून भांड्याच्या झाकणावर ठेवतात.

पण याचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे त्यापासून कॉयर म्हणजेच काथ्या मिळवता येतो. हि प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. हि सोडणे अनेक दिवस पाण्यात कूजत ठेवली जातात. मग कुटून कुटून त्यातील धागे वेगळे केले जातात. (यावरुनच मराठीत "काथ्याकूट" हा शब्द आलाय) या काथ्यापासून दोर तर वळले जातातच. हे दोर अत्यंत मजबू असतात आणि पाण्यात लवकर कूजत नाहीत. जून्या पद्धतीच्या होड्यांमधे जोडकामासाठी हे दोरच वापरले जात. अजूनही त्यांचा तसा वापर होतोच.
पण यापासून कार्पेट्स, पायपुसणी, भिंतीची आवरणे. शोभेच्या वस्तू असे अनेक प्रकार केले जातात. मॅट्रेस मधे पण याचा उपयोग होतो.

नारळाची करवंटी देखील वाया जात नाही. जळण म्हणून तिचा उपयोग होतोच. तिच्यातील तेलकट पदार्थामूळे ती छान जळते, कोकणात अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी जे बंब पेटवले
जात त्यात जळण म्हणून सोडण आणि करवंट्याच वापरत असत.
गोव्यामधे, भात वगैरे पदार्थ ढवळण्यासाठी कुलेर नावाचा खास चमचा असतो. एका खास
आकाराच्या करवंटीत बांबूची कामटी खोचून तो केलेला असतो. असा कुलेर पाणी पिण्यासाठी
पण वापरता येतो. करवंटीपासून अगदी अंगठीपर्यंत अनेक वस्तू केलेल्या मी बघितल्या आहेत.
पुर्वी तर जिलेबीचा साचा म्हणूनही करवंटी वापरत असत.

नारळाचा खाद्यपदार्थात उपयोग :-

गुजराथ सोडल्यास भारतातील बहुतेक किनारपट्टीच्या राज्यांमधे आणि खास करुन त्या राज्यातील
किनारपट्टीच्या भागात, नारळाचा रोजच्या खाद्यपदार्थात विपुल उपयोग होतो.
गुजराथमधे तो होत नाही असे नाही, त्यांच्या पारंपारीक उंधियु मधे नारळाचेच वाटण असते. पण
तरी तो तूलनेने कमीच असतो. महाराष्ट्रात मुंबईच्या उत्तरेला तो वापर कमी आहे, पण मुंबईच्या
दक्षिणेकडे मात्र तो विपुल होतो.
नारळाचे खोबरे सुकवून ठेवता येते आणि ते तुलनेने जास्त टिकाऊ असते. त्यामूळे किनारपट्टी
पासून दूर असणाऱ्या प्रदेशात सुक्या खोबऱ्याचा जास्त वापर होतो. कोकणातील राजापूर हे
पुर्वापार सूक्या खोबऱ्याचे व्यापारी केंद्र होते. तिथून अंबाघाटमार्गे ते कोल्हापूर भागात जात असे.
त्यामूळे अर्थातच कोल्हापुरी मसाल्यात सुके खोबरे असते. जेजुरीच्या खंडोबाला सुद्धा, सुके खोबरे
आणि हळद असा नेवैद्य दिला जातो. त्या मानाने जुन्नर, नाशिक भागात सुक्या खोबऱ्याचा
तेवढा वापर नाही. त्यापुढच्या पठारी प्रदेशात तर तो अजिबातच नाही.
देशातील मध्य व उत्तर भागात नारळाचा वापर एक दुर्मिळ आणि खास पदार्थ म्हणून,
गोड वा तिखट पदार्थांवर पेरण्यासाठी केला जातो. पण पंजाब हरयाना मधे तर तो अजिबात
प्रचलित नाही.
सुके खोबरे हे खास दूरच्या भागात पाठवण्यासाठीच केले जात असे. कोकणी लोकांना मात्र
ओले खोबरेच लागते. तरीही राजापूरच्या जवळ असलेल्या, रत्नागिरी, मालवण भागात काही
प्रमाणात सुके खोबरे वापरले जाते.
मालवणपासून दक्षिणेकडे मात्र नारळाचा वापर विपुल आहे. झाडावरुन नारळ काढल्यावर तो
सोलावा लागतो (म्हणून तो असोला ) तो सोलण्यासाठी मालवणला कोयताच वापरतात, पण
गोव्यापासून केरळ पर्यंत एक वेगळे उपकरण वापरतात. जमिनीत रोवलेला एक टोकेरी सुळा
असतो, त्यावर नारळ जोरात आपटतात. मग तो सुळा नारळात घुसतो. मग त्या सुळ्याचे
दोन भाग वेगळे केले जातात. असे दोनतीन वेळा केल्यास नारळ व्यवस्थित सोलून निघतो.
पण हे उपकरण वापरणे अत्यंत कौशल्याचे काम आहे.
नारळ सोलल्यावर तो फ़ोडण्यासाठी कोयताच वापरला जातो, पण काही ठिकाणी बत्त्यासारखे
हत्यारही वापरले जाते. भारताच्या दक्षिण भागात, सहसा नारळ खोवला जातो. त्यासाठी
खोवणी वापरली जाते. लाकडाच्या निमुळत्या पाटावर टोकाला एक गोलाकार पाते असते,
आणि त्याला दातेरी कडा असतात. त्यावर खरवडून नारळ खोवला जातो. हातामधे करवंटीचा
भाग असल्याने तसा हाताला धोका नसतो.
(भारताच्या पूर्व भागात मात्र काहि वेळा, नारळाची करवंटी आपटून आपटून फ़ोडली जाते
आणि आतला अखंड गोटा किसणीवर किसला जातो. किंवा त्याचे काप काढले जातात.)
खोवणीचे हे जे डिझाईन आहे ते नारळ खोवण्यासाठी अत्यंत उपयोगी असते. नारळ खोवताना
त्यावर पाय देऊन बसल्याने व्यवस्थित आधार मिळतो. या कामासाठी काही नाजूक उपकरणे
निघाली खरी, पण त्या असा आधार मिळत नाही. चमच्यासारखे पण एक उपकरण मिळते, पण
त्याने मनगटावर जास्तच ताण येतो.
खोवलेले खोबरे, तसेच अनेक पदार्थात वापरता येते. भाजी आमटीत ते घालता येतेच, शिवाय
पोहे, मसालेभात सारख्या पदार्थांवर ते पसरताहि येते. पण कालवण वगैरे करण्यासाठी ते
वाटावे लागते. मालवण भागात ते पाट्यावर वाटले जात असल्याने तेवढे बारिक वाटले जात
नाही. आणि तशी अपेक्षाही नसते. पण गोव्यात मात्र रगड्यावर बारीक वाटता येत असल्याने,
ते गंधासारखे बारीक वाटले जावे अशी अपेक्षा असते. या वाटणावरून पदार्थांची नावेही ठरतात.
उदा. दबदबीत, लिपते वगैरे.
या खोबऱ्यामूळेच पदार्थाला चव येते असा ठाम समज असल्याने, खोबऱ्याला "चव" असाही
शब्द आहे. या वाटलेल्या खोबऱ्यामूळे पदार्थाचा रस दाट होतोच पण पदार्थाला काही प्रमाणात
आकारमानही मिळते.
कर्नाटकातील उपकरी भाज्या असो कि केरळचे अवियल असो. ओल्या नारळाशिवाय त्या
होऊच शकत नाहीत. नूसत्या रोजच्या भाजी आमटीतच नव्हे तर सणासुदीच्या गोड पदार्थातही
नारळाशिवाय पान हलत नाही.
उकडिचे मोदक, शिरवळ्या, रस घावणे, सातकापे घावण, नेवऱ्या, रव्याचे लाडू, चुनकापं,
लवंगलतिका, घावन घाटले, धोंडस, पातोळ्या, नारळीभात या सगळ्या पदार्थात नारळ हवाच.
नारळ आणि साखर वा गुळ एकत्र शिजवून घट्ट केले जाते. हे सारण पश्चिम किनाऱ्यावरच
नव्हे तर पूर्व किनाऱ्यावरही भलतेच लोकप्रिय आहे.
नारळाच्या वापराचा आणखी एक प्रकार म्हणजे नारळाचे दूध. नारळाचे खोबरे वाटून
त्यात पाणी न घालता, पिळल्यावर जो रस निघतो त्याला नारळाचे जाड दूध म्हणतात, नंतर
त्यात पाणी घालून जो पातळसर रस निघतो, त्याला पातळ दूध म्हणतात.
पदार्थ शिजवताना आधी पातळ दूध घालून पदार्थ शिजवतात आणि मग जाड दूध घालतात.
मालवणी सोलकढीचा हा आत्मा. पण यासाठी नेमका ओला नारळ असावा लागतो. आणि
अनुभवी गृहिणींना ते बरोबर कळते. कोवळ्या नारळाचे दूध जास्त निघत नाही आणि जून
नारळाचे जरा तेलकट निघते.
गोव्यात मात्र सगळ्याच पदार्थात नारळ असल्याने, सोलकढी मात्र शक्यतो नारळ न वापरता
करतात, या कढीची अनेक रुपे (जसे तंबळी) दक्षिणेकडे दिसतात.
अगदी अलिकडच्या काळापर्यंत म्हणजे ६०/७० वर्षांपुर्वी कोकणात फ़ारशी गुरे नव्हती. दुध
दुभत्याचा अभावच होता. चहा प्यायची पण पद्धत नव्हती. त्यामूळे हे दूधच बहुतेक पदार्थात
वापरले जाई. जसे पुरणपोळीबरोबर देशात दूध दिले जाते तसे कोकणात उकडीच्या मोदका
बरोबर, शेवयांबरोबर नारळाचे दूध दिले जात असे. त्यांच्याकडच्या खीर सदॄष्य प्रकारात
(मुगाचे कढण, मणगणे ) नारळाचेच दूध वापरले जाते.
मुंबईतील आद्य रहिवासी पाठारे प्रभू यांच्या रोजच्या जेवणात, एकतरी पदार्थ नारळाच्या
दूधातील असतो. त्याला ते शिंरे म्हणतात.
नारळात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण बरेच जास्त असल्याने, या दूधावर साय म्हणजेच क्रीम
येते, या क्रीमचा असा वेगळा वापर आपल्याकडे होत नाही. पण थायलंडसारख्या देशात
त्याचा खूप वापर होतो.
नारळ वाटून केलेल्या चटण्या या दक्षिणेतील चार राज्याची खासियत. श्रीलंकेतही अशी चटणी
रोजच्या जेवणात असतेच. आणि ती चवीला झणझणीत असते. तिचा उपयोग भाजी आमटिसारखा
पण केला जातो. आपल्या नारळीभातासारखाही प्रकार त्यांच्या जेवणात असतो. आणि तो भात
नारळाच्या दूधातच शिजवला जातो.

नारळात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने, त्यापासून तेलही काढता येते. या तेलाचा
सौदर्यप्रसाधनात तसेच खास करुन केसांना लावण्यासाठी उपयोग होतोच पण खाद्यतेल म्हणूनही
उपयोग होतो.
खाद्यतेल म्हणून त्याचा वास महाराष्ट्रातील लोकांना आवडत नाही. गोव्यात त्याचा वापर माफ़क
असतो, पण कर्नाटक आणि केरळ मधे मात्र तो मुबलक केला जातो. हे तेल लवकर गोठते
आणि लवकर खराबही होते. पण तरीही काही पदार्थांत त्या तेलानेच स्वाद खुलतो.

देवाची करणी आणि नारळात पाणी

नारळ फळाच्या सुरवातीच्या टप्प्यात नारळात भरपूर पाणी असते. मी स्वतः जवळ जवळ एक लिटर पाणी असलेला नारळ बघितला आहे. नारळ जसजसा जून होत जातो, तसतसे पाण्याचे प्रमाण कमी होत जाते.
नारळाचे पाणी हे बहुतांशी चवीला मधूर असते (काहि वेळेला ते खारट असू शकते.) ते पाणी, नारळ फोडेपर्यंत निर्जंतूक असते. ते रक्तात सहज मिसळते, दुसर्‍या जागतिक महायुद्धात ते थेट शिरेत देण्यात आले होते.
त्या पाण्यात साखरेबरोबरच खनिजे, जिवनस्त्वे आणि प्रथिनेही असतात. दमट आणि उष्ण हवामानात, ते शरिरातील निघून गेलेल्या पाण्याची आणि क्षारांची उत्तमरित्या भरपाई करु शकते.
थायलंडमधील काही गोड पदार्थात ते वापरतात. पण हे पाणी जर तसेच ठेवले तर उष्ण हवामानात ते आंबते. त्याच्या या गुणाचा उपयोग करुन, केरळमधे काही डोश्याचे प्रकार केले जातात. तसा वापर गोवा आणि कर्नाटकात पण होतो.
अनेक वेळा स्पोर्टस ड्रिंक्स मधे त्यांचा वापर होतो. ते सुकवून त्याची पावडरही करता येते, आणि अशी पावडर आता बाजारात उपलब्ध आहे. पाण्याचे बॉटलिंग करण्याचे पण प्रयत्न होत आहेत.
शरिरातील पाणी कमी झाल्यावरदेखील त्याचा उपयोग करता येतो.
टिश्यू कल्चरमधे (झाडांच्या छोट्याश्या भागापासून पूर्ण झाड तयार करण्याची पद्धत) ते वापरता येते.

नारळातील पोषक द्रव्ये

नारळाच्या खोबर्‍यामधे जवळजवळ ३३.५० टक्के चरबी असते. त्यापैकी जवळजवळ
३० टक्के ही सॅच्यूरेटेड असते. १५ टक्के पिष्टमय पदार्थ आणि ६ टक्के साखर असते.
९ टक्के फ़ायबर, प्रथिने ३ टक्के.
नारळात थायमिन. रिबोफ़्लेवीन, नायसिन, पॅन्टोथेनिक, फ़ोलेट ही ब गटातील जीवनसत्वे
असतात. तसेच जीवनसत्व क, चुना आणि लोह ही असते. मॅग्नेशीयम, फ़ॉस्फ़ोरस,
पोटॅशियम आणि झिंक हि खनिजेही असतात. पण यातली चरबी हि थोडी धोकादायकच
आहे. शर्करेचे प्रमाण कमी आणि खनिजे व प्रथिनांचे प्रमाण समाधानकारक आहे.
(नारळाचे वाटप आणि मासे हे मात्र एक आरोग्यपूर्ण मिश्रण आहे, असे मत डॉ. शरदीनी
डहाणुकर यांनी नोंदवले होते.)

नारळातील चरबीच्या या प्रमाणामूळे त्यापासून तेल गाळले जाते. या तेलाचा स्वयंपाकात
वापर हा महाराष्ट्रात फ़ारसा नसला तरी गोव्यापासून जसजसे खाली दक्षिणेकडे जावे, तस
तसा वाढत जातो. गोव्यात तो अगदी थोड्या प्रमाणात असला तरी कर्नाटकात आणि
केरळमधे मोठ्या प्रमाणात आहे. कर्नाटकातील चकल्या आणि केरळमधील बनाना चिप्स
खास करुन खोबरेल तेलात तळल्या जातात.
हे तेल लवकर गोठते आणि लवकर खराबही होते. तसेच या तेलात तळलेल्या पदार्थांना
एक विशिष्ठ वास येतो, तो अनेकजणांना आवडत नाही. या तेलाचा सौंदर्यप्रसाधनात मात्र
भरपूर वापर होतो. केशवर्धक तेले, त्वचेसाठी मलमे आणि शांपूमधेही त्याचा वापर होतो.
पुर्वी साबणातही त्याचा वापर केला जात असे, सध्या तो केला जात नाही.

नारळाचे आणि नारळाच्या झाडाच्या इतर भागाचे औषधी उपयोग आहेतच. पण इतर
कुठल्याही औषधाप्रमाणे, त्याचा प्रयोग तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानेच होणे योग्य असते.

(या लेखाची सुरवात नमुन्यादाखल केलीय. या लेखमालिकेचे स्वरुप कसे असावे, यात
कुठले विभाग असावेत, ते अवश्य कळवा. अर्थात अशी लेखमालिका हवी कि अजिबात
नको, तेही कळवाच. हा लेख अपुर्ण आहे. तूमच्या प्रतिक्रियेवरुन, हा कसा पूर्ण करायचा
ते ठरवेन.)

गुलमोहर: 

छान दिनेशदा:
मला सुचलेली "सुची". (विभाग स्वरुप).

१) फळाचे मुळस्थान त्याला लागणारी भौगोलीक परिस्थिति.
२) फळांचा सिजन (हंगाम) त्याच सिजनमध्ये येण्याचे कारण.
३) फळाच्या लागवडी करीता लागणारे कसब.
४) फळाचे विविध उपयोग. जसे शास्त्रिय, वैद्यकिय इ.
५) फळाचे खास वैशिष्ट्य वा तत्सम बाबी.

जमल्यास उत्पादन व वितरण प्रमाण.उत्पादित आणि वितरण करण्यात आलेले ठीकाण.

दिनेशदा, मी पहिली. Happy
नारळ आणि सज्जनाची बरोबरी करणारं एक सुभाषित आठवलं.
नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः ।
अन्ये च बदरीकाकारा बहिरेव मनोहराः ॥

मला नारळ एकदम सहज आणि फटाफट खोवून देणारं एखादं घरगुती मशिन सुचवा ना.कारण ओलं खोबरं बहुतेक सर्व पदार्थांमध्ये आवडतं....पण खोवायचा आळस. ( बहुतेक रजनीकांतला सांगायला हवं :फिदी:)

अरे वाह. दिनेशदांची नवी लेख मालिका.
मी (बहुदा) सिंधूदुर्ग किल्ल्यामध्ये लहनपणी Y shape चं (म्हणजे फांदी असलेलं) नारळाचं झाड पाहिल्याचं आठवतं आहे. तस परत कधीच कुठेच दिसलं नाही. आई कडे फोटो पण असणार.

दिनेशदा, सह्हीच!!.
या लेखमालिकेचा शुभारंभ श्रीफळाने केलात हे खुप आवडले. Happy

अरे वा दिनेशदा लेख मालिका सुरु पण केलीत,मी आताच तुमच्या फलेषु सर्वदा लेखावर प्रतिसाद देऊन आले.
बाकी लेख नेहमीप्रमाणे सुंदर....आवडला Happy
शुभारंभ श्रीफळाने केलात हे मला पण खुप आवडले. Happy

दिनेशदा,

आधी तुम्हाला मनापासून थँक्स म्हणते... नारळाचं झाड हे माझं नॉस्टॅल्जिक व्हायचं ठिकाण आहे. Happy

बाकी लेख मस्तच!

नमस्कार दिनेशदा,

मस्त लेखमालिका. पुढच्या भागांची वाट पाहतेय.

नमस्कार रुणुझुणु.

हे पहा फटाफट खोबर खोवून देणारं घरगुती मशिन

http://www.coconutty.co.uk/coconut-grater-p-53.html?osCsid=e21e05748ce57...

नमस्कार अर्चना.
तू दिलेली लिन्क पाहिली. त्याच प्रकारचं 'अंजली'चं स्क्रेपर होतं माझ्याकडे. पण त्याचं वॅक्युम निघतं...म्हणजे मी करताना तरी निघायचं, आणि खोवलेल्या खोबर्‍याचा माझ्या अंगावर अभिषेक ! Proud
दिनेशदा, विषयांतराबद्दल सॉरी.

मस्त लेख!

चातक यांच्या कल्पनांशी सहमत आहे.

फलेषू - फळांमध्ये

फलस्य - फळांचे, फळांबाबत!

निवड आपलीच!

मालिका चांगली व उपयुक्त होणार हे लक्षात येतच आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफिकीर, मला योग्य ते शीर्षक सूचवा, प्लीज.
"फळांची अपेक्षा करावी" असा अर्थ मल सूचवायचाय.

रुणूझूणु, मी त्याच्याकडे येतोच अहे. हा लेख मी अशा प्रतिक्रिया बघत बघतच पूर्ण करणार आहे.

दिनेशदा.. जास्ती विचार करु नका.. सरळ लिहीत जा.. आमच्या ज्ञानात तेवढीच भर.. लेख अर्धवट वाटतोय नि तुम्ही तसे म्हटलेय देखिल.. तेव्हा पुर्णत्वास आणा.. नि लेखमालिका सुरु होउन जाउदे Happy

तो शेवटचा फोटो लै भारी !

ज्या काही फळझाडांविषयी लिहाल ते प्रकार घरच्या बागेत वाढवायचे असतील तर ते कसे वाढवायचे ह्यावर पण लिहा. सगळ्यांकडेच मोठी अंगणं असतील असे नाही. पण ज्यांच्याकडे आहेत त्यांना फायदा होइल.

यो रॉक्स, यापुढे या मालिकेसाठी पण वेगळे फोटो काढत जा.
झाडावरच्या वेलीवरच्या फळांचे फोटो हवेत.

सिंडरेला, नक्कीच प्रयत्न करेन. मला नारळापासून केलेल्या पदार्थांच्या कृति पण हव्या आहेत. इथे असतील, तर त्याच्या लिंक्स देईन.

छान मालिका.

उत्तरेकडे सुका आख्खा नारळ वरची करवंटी काढलेला असा मिळतो. त्याला ते 'गोला' म्हणतात. जेवणात नारळाचा वापर अर्थातच नसतो त्यामुळे हा फोडून फळाप्रमाणे खातात. क्वचित तिळाच्या वड्यांवर किंवा बर्फीवर वगैरे सुक्या नारळाचा कीस भुरभुरवतात आणि दाबून बसवतात.

दिनेशदा.. जास्ती विचार करु नका.. सरळ लिहीत जा.. >>ह्याला अनुमोदन. ललित लेखासारखे लिहिले कि अधिक वाचनीय वाटेल.

नारळाला कल्पवृक्ष का म्हणतात? .......................................... ५ गुण Wink
मला काही शंका आहे...
१. कधी कधी नारळ फोडल्यावर आत पांढरे गोळ्यासारखे काही असते, ते नारळाचं बी असतं असं लहानपणी वाटायचं, ते नक्की काय असतं? त्याचं बी नक्की कुठे आहे?
२. बाकीच्या फळात खायचा भाग बाहेर आणि बी आत असते.. नारळात खायचा/प्यायचा भाग आत असल्यामुळे नारळ फोडावाच लागतो, फुटलेल्या नारळापासुन झाड येत नसणार (बहुतेक Happy ). मग अशा रचनेचा झाडाला काय उपयोग?
(माझा अंदाज: नारळाचे आपला प्रसार करायचे डावपेच इतर झाडांसारखे नाहीत. नारळ पक्षी/प्राण्यांची मदत न घेता पाण्याबरोबर वाहात जाउन नवीन जागी रुजत असावा आणि म्हणुनच त्याची बाहेरची बाजू कठोर असणार!)

रुणुझुणु, भारतात फ्रोजन खोबरे मिळते की.

दिनेश ,चांगली मालिका काढताय. फोटो पण टाका भरपूर. माहित असल्यास प्रत्येक देशात कसा वापर केला जातो ते पण मराठीत वाचायला आवडेल. शुभेच्छा!
पाककृतीच्या लिंक्स द्या, नाहितर खूपच भेसळ होइल एकाच लेखात. पाककृती नकोच , खूपच नाविन्यपुर्ण असेल तर लिहा नाहितर कंटाळा येतो पाककृती वाचायला माहितीपुर्ण लेखात कधी कधी.

दिनेशदा मस्त मालिका चालू केलेय. सुरूवात तर एकदम झकास. प्रचि पण खूप छानच आहेत.

नारळाबद्दल बरीच नवीन माहीती समजली... नाहीतर कोंकणात राहून आपली नारळाच्या ज्ञानाबद्दलची झेप माशांचं तिखलं, सोलकढी, नारळपाणी, खोबर बर्फी गुळवणी यांपल्याड नव्हती... Proud

पदार्थांच्या लिंक्सही द्याच पण सिंडी म्हणतेय तसं लागवडीची माहीती दिलीत तर ज्यांना इच्छा आहे व ज्यांच्याकडे जागा आहे अशांना त्याचा उपयोग होइल.

नारळाच्या करवंट्यांपासून शोभेच्या वस्तू, झावळ्यांपासून इतर टिकाऊ वास्तू बनवतात असं वाचलं होतं पण ते नक्की कुठे, त्याचा बिझीनेस आहे का की घरगुती/लघुद्योगच करतात याबद्दल खूप उत्सुकता होती... दिनेशदा माहीती असल्यास प्लीज सांगा.

इथे नारळपाणीवाल्याला विचारलं होतं, एवढ्या रिकाम्या नारळांचं तुम्ही काय करता, जळण?? तर त्याने सांगितले काही झोपडपट्ट्यांमध्ये घेतात जळण म्हणून पण फेकतोच बहुदा! कुठे कचरा सांभाळत बसायचा? तर या शहाळयाच्या कवचांपासून काही शोभेच्या वस्तू करता येतात का? कित्ती वाया जातात!!

कधी कधी नारळ फोडल्यावर आत पांढरे गोळ्यासारखे काही असते, ते नारळाचं बी असतं असं लहानपणी वाटायचं, ते नक्की काय असतं? >> सॅम त्याला नारळाचा कोंब म्हणतात. अख्खा नारळच रूजतो. कधी कधी कलशावर ठेवलेल्या नारळाला अचानक कोंब फुटतो, मग तो नारळ वाढवू (फोडू)देत नाहीत. परसदारी/अंगणात नेऊन रूजवतात.

चातकाला अनुमोदन.. मलाही प्रत्येक फळाचा शास्त्रीय,वैद्यकीय उपयोग जाणून घ्यायला आवडेल.
या मालिकेद्वारे आमच्या सामान्य ज्ञानात खूपच भर पडणार..या विचारानेच आनंद झालाय.. Happy
धन्स दिनेश!

छान मालिका दिनेशदा. आधीच म्हणाल्याप्रमाणे ज्या फळांचे फोटो आहेत ते पाठवेनच.
प्लिज अजुन खुप माहीती हवी या लेखात Happy

मी आमच्या घराच्या मागच्या माडांच्या आगरात माडीवाले बघते. घरमालकांनी नारळ माडीला दिलेयत, त्यामुळे ते माडी उतरवणारे ठराविक वेळी (बरेचदा रात्री उशीराच) येऊन जातात.
झाडावर/नारळाच्या चवीत त्याचा काय परिणाम होत असेल? नारळ माडीला तयार झालाय हे कसं समजतं? लागवडीमधे फरक नसावा, कारण तसं काही बदललेलं दिसलं नाही आगरात.

हे मी बघितलं म्हणून पडलेले प्रश्न. इतरही फळांच्या बाबतीत असं काही असेलच. काजूफेणी वगैरे Happy तर अशीही माहिती द्याल का दिनेशदा?

दिनेशनी लेखात सांगितलेले सिंधुदूर्ग किल्ल्यातले 'फांदी' असलेले झाड. फोटो २००७ सालातला आहे आणि तेंव्हाच ते झाड विज पडून (२००५ साली) जळले होते. फोटोत आहेत ते त्याचे अवशेष Sad

माधव, ते Y आकाराचं झाड सहीच.
ध्वनी, पण मी सध्या इंडियात नाही. Happy .....आणि ताजं ताजं खोवलेलं, लुसलुशीत ओलं खोबरं खाण्यात जी मज्जा आहे ती फ्रोजन खोबर्‍यात नाही ना.

दिनेशदा, फळांचा वापर म्हणी/वाक्प्रचार ह्यांत होत असेल तर त्याचाही उल्लेख करा प्लीज. म्हणजे एखाद्याला "नारळ देणे", "करवंटी हातात येणे" वगैरे. आजकाल हे सर्व नामशेष होत चाललंय.

तसंच एकाच फळाचा अनेक रुपात वापर होत असेल - उदा, ओलं खोबरं, सुकं खोबरं, नारळाचं दूध - जाड आणि पातळ दोन्ही, नारळाचे काप. तसंच एखाद्या फळाच्या झाडाचे वेगवेगळे भाग वापरात असतील. उदा. केळं आणि त्याची पानं.

माधव, फोटो दिल्याबद्द्ल धन्यवाद. पण अरेरे ते झाड आता नाही तर.
दिनेशदा, उंबराच्या लेखात जसे सगळे काही in-detail सांगीतलेलेत तसेच इथे पण येउदेत.

Pages