अमेरिकन समाजातील स्त्रीची परिस्थिती

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आतापर्यंत महिला दिनाच्या निमित्ताने बऱ्याच जणांनी भारतीय समाजातील स्त्रीमुक्तीविषयी बरंच काही लिहीलं आहे. अमेरिकन समाजातील स्त्रीच्या परिस्थितीविषयी माहिती करुन घेणेही उपयुक्त ठरेल या अनुषंगाने काही अनुभव मांडत आहे. इथे राहणाऱ्या भारतीय समाज हा अमेरिकन समाजाचाच अविभाज्य भाग असल्याने मी इथल्या भारतीय लोकांनाही त्यात सामिल केले आहे.

पहिला अनुभव आहे इथल्या भारतीय समाजातला - भारतीय सोडा - मराठी समाजातला. माझा एक मित्र गेली दहा बारा वर्षे अमेरिकेत राहतो आहे. स्वत: पीचडी आहे, बायकोकडे मास्टर्स डिग्री आहे. दोघंही अतिशय चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. दोघांना दोन गोंडस मुली आहेत. एक सात वर्षाची आणि दुसरी अकरा वर्षाची. अचानक याची एक दिवस ईमेल येते. सांगतो बायको गर्भार आहे. मी आश्चर्यचकित होतो. कुठल्याशा निमित्ताने आम्ही त्यांच्या घरी जातो. इतरही मित्र मंडळी जमलेली असतात. अभावितपणे पार्टीत दोन गट पडतात. पुरुष एका बाजूला आणि स्त्रिया एका बाजूला. (माझ्या दृष्टीने तेही स्त्री मुक्ती च्या दृष्टीने घातकच). नेहमीप्रमाणे गप्पा टप्पा होतात. आम्ही त्या दोघांच अभिनंदन करतो. एव्हाना त्यांना मुलगा होणार आहे हे कळलेलं असतं. (अमेरिकेत सोनोग्राफिमध्ये सांगतात - मुलगा आहे की मुलगी ते). मजेत पार्टी संपते आणि आम्ही परत जायला निघतो. परतीच्या प्रवासात बायको जे सांगते ते ऐकून माझं डोकं सुन्न होतं. हा माझा मित्र माझ्या नजरेत खाली घसरतो. त्याच्या बायकोने इतर बायकांना सत्य सांगितलेलं असतं. सासू सासरे (महाराष्ट्रातल्या कुठल्याश्या छोट्या शहरात राहणारे) अडून बसले - दोन मुली आहेत - मुलगा हवा म्हणून. त्यांच्या पुढे यांनी मान तुकवली. आणि तिसरा चान्स घेतला. नशिबाने हात दिला आणि तो मुलगा निघाला. आता सर्व काही आलबेल. बाळंतपण करायला आले होते ते इथे.

अशा गोष्टी ऐकल्या की मला अस्वस्थ व्हायला होतं. काय उपयोग यांच्या शिक्षणाचा? कुठे चुकलो आपण? शिक्षणाने वैचारिक प्रगती होते का? नक्कीच आपण कुठेतरी चुकतो आहोत. आई वडिल सांगतात म्हणून काहीही करणार का आपण? निदान आपण जे करतो आहोत ते बरोबर की नाही किंवा त्याच्या मागची भावना चांगली की नाही याचा विचार करुन ठामपणे नाही म्हणता येणार नाही का? तिसरी मुलगी झाली असती तर काय केलं असतं यांनी?

भारतामध्ये अमेरिकन स्त्रियांची जे चित्र रंगवले जाते ते सर्वस्वी खरं नाही. लॉस अँजलिससारख्या मोठ्या शहरात मी अनेक शिकलेल्या स्त्रियानी नोकऱ्या सोडून चूल आणि मूल यात रमल्याचे मी बघितले आहे. अर्थातच मुख्य फरक एवढा कि ते त्यांनी पूर्णत: त्यांच्या मर्जीने केले आहे. समाज, कुटूंब वगैरेच्या दडपणाला बळी पडून नव्हे. परंतु टेक्सास, युटाह वगैरे राज्यामध्ये अतिशय वाईट परिस्थितीत जगणाऱ्या, धर्माच्या नावाखाली ब्रेनवॉशिंग केलेल्या ख्रिस्ती किंवा मॉर्मिन धर्मीय स्त्रीयाही (टिव्हीवर) पाहिल्या आहेत. अमेरिकेत द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे. किंबहुना हा कायदा कुठल्याही धर्माच्या लोकांना एकाहून अधिक लग्न करण्याची परवानगी देत नाही. तरीही मॉर्मिन धर्मातून फुटून निघालेले अनेक छोटे छोट पंथ आजही एकापेक्षा अधिक लग्ने करतात. एका अंदाजानुसार आजही अमेरिकेत ३०,००० ते ५०,००० लोकांनी एकापेक्षा जास्त बायकांबरोबर (लग्न करुन) राहत आहेत. त्यांना तसे करण्याचा उपदेश करणाऱ्या वॉरन जेफला अमेरिकन सरकारने तुरुंगात टाकले असूनही त्याचे अनुयायी टेक्सास आणि इतर मिडवेस्टर्न राज्यांमध्ये त्याचा उपदेश पसरवत आहेत. पेनसिल्वेनिया राज्यातील आमिष समाजातही अनेक लग्ने करायची प्रथा नसली तरीही स्त्रीचे स्थान दुय्यम मानले जाते. स्त्रीने आपल्या गरजांपेक्षा तीच्या कुटुंबाच्या, चर्चच्या किंवा समाजाच्या गरजांना प्राधन्य देण्याची अपेक्षा आमिष समाज बाळगतो. त्यांचा पोषाखही गोषा नसला तरी अंगभर आणि जुन्या इंग्रजी चित्रपटातील पोषाखाप्रमाणे असतो. त्यांनी ठराविक पद्धतीचेच कपडे घालावेत अशी अपेक्षा असते. त्यांना दागिने घालायची बंदी असते.

अर्थातच आकडे बघितले तर अमेरिकन स्त्रियांची परिस्थिती भारतापेक्षा नक्कीच हजारो पटींनी जास्त चांगली आहे. परंतु अशा या प्रगत समाजात आजही असे घटक असावेत याचा मात्र विषाद वाटतो.

विषय: 
प्रकार: 

लेख आवडला.

अशा गोष्टी ऐकल्या की मला अस्वस्थ व्हायला होतं. काय उपयोग यांच्या शिक्षणाचा? कुठे चुकलो आपण? शिक्षणाने वैचारिक प्रगती होते का?>>>

ही विधाने फारच आवडली.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

वैभव लेख आणि मुख्य म्हणजे विषय चांगला. अमेरीकेत अनेक वर्ष राहणारे मायबोलीकर जास्त बोलू शकतील. या विषयावरची चर्चा नक्कीच वाचायला आवडेल.

सासू सासरे (महाराष्ट्रातल्या कुठल्याश्या छोट्या शहरात राहणारे) अडून बसले - दोन मुली आहेत - मुलगा हवा म्हणून. त्यांच्या पुढे यांनी मान तुकवली. आणि तिसरा चान्स घेतला. नशिबाने हात दिला आणि तो मुलगा निघाला.

कडवट म्हणतात तसे काहीतरी हसायला आले. सेम हाच सीन माझ्या जवळच्या नात्यात गेल्या वर्षी घडला. नशीबाने त्यांना हात दिला नाही आणि तिसरी मुलगी निघाली. ती बाई आधीच सासरच्या त्रासाने मानसिक संतुलन हरवुन बसलेली, मानसोपचार चालु होते. नव-याची आर्थिक परिस्थिती जेमतेम. दोन मुलींचेही नीट भागत नव्हते. असे असताना त्या कणाहीन नव-याने स्वतःच्या आईला समजवायला हवे होते. पण त्याला आईला नाही म्हणवले नाही. मुलगी झाल्यानंतरच्या काळात तर त्या बाईचे मानसिक संतुलन इतके ढासळले की तिला आता वेड्यांच्या हॉस्पिटलातच ठेवावे लागणार असे मला वाटायला लागले. माझ्याकडे थोडे दिवस आणुन ठेवले आणि डॉक्टरी उपाय केले. तेवढ्यापुरती बरी झाली पण घरी गेल्यावर परत जैसे थे. आज तिच्या तिन्ही मुली गावी बहिण संभाळतेय. १ वर्षाची लहान मुलगी आईशिवाय राहतेय. मोठ्या मुली आईच्या आजाराला इतक्या घाबरल्यात की मुंबईला यायला नकोच म्हणताहेत. नव-याने इथे मानसोपचार करुन फायदा होत नाही असे म्हणत तिला कुठेतरी दुस-या गावी ठेवलेय. तिथे ती व्यवस्थित आहे असे तो म्हणतोय. सध्या तिच्याकडे फोनही नसल्याने तिचे नक्की काय झालेय, बरे वाटतेय की नाही याबद्दल मला काहीच माहित नाही.. Sad

एकुणच शिकलेल्या असो वा नसो, स्वतंत्र असो वा नको, अमेरीकेतल्या असो वा मुंबईतल्या, बायांची ससेहोलपट काही थांबत नाही. तुमच्या मित्राची बायको खरेच नशिबवान निघाली, तिला मुलगा झाला. नाहीतर काय परिस्थितीला तोंड द्यावे लागले असते ते देवच जाणे.

कडवट म्हणतात तसे काहीतरी हसायला आले>>> सहमत आहे.

साधना, आपण सांगितलेली कथा तर फारच त्रास देऊन गेली.

दबाव देणाऱ्या इतकेच काहीही विचार न करता दबावाला बळी पडणारेही दोषी नाहीत का?
आणि आपल्याकडे मुलीच्या जातीने असे आणि तसे करू नये..इतके माजवून ठेवले आहे कि ती स्त्री प्रतिकार करायचेच विसरते. Sad

ह्म्म्म... खरय, शिक्षण आणि मानसिकता याचा मलाही काहिच संबंध वाटत नाही (पुर्वी मलापण याचं आश्चर्य वाटयचं). म्हणुनच बहुतेक आपल्याकडे सुसंस्कृत आणि सुशिक्षिक्त असे दोन वेगळे शब्द आहेत!
इथे (फ्रांन्समधे) स्त्री सर्व बाबतीत स्वतंत्र जाणवते (घरातील काम, निर्णय, मुलांचे संगोपन वै वै). खासकरुन immigrant स्त्रियांच्या तुलनेत (अरब/आफ्रिकन/भारतिय). इथे स्थाईक झालेले भारतीय देखिल उघड्या डोळ्यांनी अजुबाजुची परिस्थिती बघुन चांगले ते घ्यायच्या ऐवजी स्वत:चीच संस्कृती(?) गोंजारत बसलेले दिसतात. (त्यांना फक्त गोर्‍यांच्या वाईट गोष्टीच दिसतात)

वर वैभवने लिहिलेय ते प्रकार आहेतच त्या शिवाय बॉयफ्रेंड्/नवरा यांचा मार खाऊन त्याच्या सोबत रहाणार्‍या, स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्त्रीयाही भरपूर आहेत. माराच्या खूणा लपवायला अंगभर कपडे घालणे, चेहर्‍याला मेकअप वगैरे प्रकार चालतात. शेजार्‍यांनी पोलिस बोलावले तरी या बाया तक्रार करायला नकार देतात. Sad अगदी १४-१५ वर्षांच्या मुलीही या प्रकारातून जातात.
युनिव्हर्सिटी कँपसवर रेप्/सेक्शुअल अ‍ॅसॉल्टच्या केसेसमधे बरेचदा मुली गप्प रहातात. सोशल स्टिग्मा नसुनही हे घडते. हायस्कुलमधे बॉयफ्रेंड या प्राण्याला अवाजवी महत्व दिले जाते. त्याला आवडणार नाही म्हणून गुणवत्ता असुनही सायन्स/ मॅथ चे अ‍ॅडवान्स कोर्सेस न घेणे वगैरे प्रकारही चालतात. बॉयफ्रेंड सोडून जाईल या भितीने मनात नसताना सेक्शुअली अ‍ॅक्टिव होणे हे ही बरेच कॉमन आहे.
बॉडी इमेज, अ‍ॅपिरन्सला असलेले अवाजवी महत्व यामुळे इटिंग डिसॉर्डरला बळी पडणार्‍या मुलींचे प्रमाणही बरेच आहे. १५-१६ वर्षाच्या मुली प्लॅस्टिक सर्जरीसाठी हट्ट करतात तेव्हा हसावे की रडावे असे होते.
बाकी जेंडर सॅलरी गॅप, मिलिटरीने सेक्शुअल अ‍ॅसॉल्टच्या केसेसकडे केलेले दुर्लक्ष वगैरे नेहमीच्या लढाया आहेतच.

नुकताच federal report on welfare of women in US प्रसिद्ध झाला. १९६३ नण्तर आलेला हा पहिलाच रिपोर्ट. ह्याचे मह्त्व हेच कि battlefield is still open.

1. More women are enrolled in collage, > 50% compared to men.
2. Women are less likely to be unemployed.
3. Getting married later (avg age 28)
4. Having children later (30+)
5. Pay gap and glass ceiling still persists by difference of 25%

http://www.whitehouse.gov/sites/default/files/rss_viewer/Women_in_Americ...

अन्तर्मूख करणारा लेख.
माझी १ अमेरीकेत गेली चारेक वर्षे रहात असलेली मैत्रीण , तिची जुळी मुले आणि माझी मुलगी एकाच वर्गात असल्याने ओलख झाली. ती मुळ्ची उत्तर प्रदेशातली. बोलता बोलता मी म्हणाले कस जमवतेस ग जुळ्या मुलान्च सकाळी आवरण ? तर म्हणाली की मला ४ मुल आहेत .....मी आवाक....४?? ती म्हणाली, हो २ मोठ्या मुली आहेत ११ आणि ९ वर्षाच्या मग हे दोघे मुलगे पाच वर्षाचे......मी म्हंट्ले, अग तुम्हाला इथे एकाच्या पगारात ४ मुले परवडतात कशी..? .....तर म्हणाली करना पडा..मै क्या करती??
आणि बोलता बोलता तिची कहाणी उलगडत गेली...१९ व्या वर्षी तिचं लग्न झाल, लगेच पहील्या वर्षात १ ली मुलगी मग २ वर्षात २ री मुलगी झाली त्यानन्तर तिच्या सासून बजावल की अगली बार लडका ही होगा..दिल्लीत कुठल्याश्या डॉ कडून भरपूर पैसे चारून ३ र्या महीन्याच्या आतच कोणालाही नकळत सोनोग्राफी करायची ,मुलगा नाही म्ह्ण्ट्ल्यावर गर्भपात..तोही गोळ्या घेउन घरच्या घरीच. म्हणजे या कानाचे त्या कानालाही कळणार नाही अशा ३ वर्षात ४ हत्या ,हो हत्याच... त्यानन्तर परत दिवस राहीले ,पण त्यात २ मुलगे आहेत हे कळल्यावर तिला हाय रिस्क प्रेग्नन्सी आणि काही कॉम्प्लिकेशन्स असतानाही नवर्याने आणि सासूने तिला गर्भपात करू दिला नाही.
त्या बाळंतपणात ही सिझेरिअन करताना T.L.(मूल होउ नये म्हणून ऑपरेशन) करण्यास सासूने नकार दिला.
त्यानन्तर हे कुटुंब अमेरीकेत आले. इथे आल्यावर ही , ही बिचारी २ वेळा प्रेग्नन्ट राहीली , मग परत मुल नको म्हणून गर्भपात...शेवटी ही गुपचूप मागच्या भारत्वारीत आई कडे राहून ऑपरेशन करून आली मूल न होण्या साठी..हीच्या नवर्याला आणि सासूला याचा पत्ता नाहीये तर याची तिला भीती वाटतेय...
काय अवस्था झाली असेल बिचारीच्या शरीराची....कुणीच तिचा विचार केला नाही.......असे ही घडते यावर विश्वासच बसत नाही............

शीर्षक वाचून जे वाचायला मिळेल असे वाटले होते तसे झाले नाही. अपेक्षाभंग झाला. मुख्य प्रवाहातला अमेरिकन समाज आणि अमेरिकन स्त्री याबद्दल लेखात फारसे काहीच नाही.
मॉर्मन्स, अमिश हे धर्म आणि पंथाचा पगडा असलेले अल्पसंख्य गट आहेत. ते अमेरिकन समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

स्वाती२ च्या पोस्टमध्ये काही मुद्दे आले आहेत. "यंग अ‍ॅडल्ट्स" चे प्रॉब्लेम्स हे मुली आणि मुले दोघांतही आहेत.
वैभवच्या धाग्यावर नको, पण चर्चा हवी असेल तर वेगळा धागा उघडता येईल.

लालू, अगदी माझ्या मनातलं लिहीलंस. लेखातले अनुभव सच्चे असतील, पण अमेरीकन स्त्रिया आणि त्यांचे अनुभव यांच्या अनुषंगानं वाचायला मिळेल असं वाटलं होतं.

लॉस अँजलिससारख्या मोठ्या शहरात मी अनेक शिकलेल्या स्त्रियानी नोकऱ्या सोडून चूल आणि मूल यात रमल्याचे मी बघितले आहे. अर्थातच मुख्य फरक एवढा कि ते त्यांनी पूर्णत: त्यांच्या मर्जीने केले आहे. >>>> तुमचा हा मुद्दा नाही पटला. सगळ्याच मुलींनी काही नोकरी सोडुन घरी बसण्यचा निर्णय स्वःताच्या मर्जीने घेतला असेल असं नाही. इथे अमेरीकेत वर्क परमिट मिळायला जेवढी कटकट असेल तेवढी अजुन कुठे नसेल. लग्न करुन येणार्‍यांपैकी बर्‍याच जणी डिपेंडंट विसावर येतात. त्यांच्यासाठी वर्कपरमिट मिळवणं इतकं सोप्पं नाहिये. शिवाय इतकं करुनही नवर्‍याची जिथे नोकरी आहे तिथेच जॉब मिळेल ह्याची काहीच गॅरंटी नाही. मला वाटतं शेवटी माणुस नोकरी केवळ २ कारणांसाठी करतो, एक तर घेतलेलं शिक्षणाचा काहितरी उपयोग व्हावा म्हणुन आणि दुसरं म्हणजे पैसे मिळवावे म्हणुन. उद्या जर तुम्हाला कोणी म्हटलं की तुम्हाला एकदम मनासारखा जॉब देतो पण एक छदाम मिळणार नाही तर मला नाही वाटत कोणी तयार होईल. सो, नोकरी करण्याचा मुख्य उद्देश पैसे कमवणं हा आहे, हे नाकारुन चालणार नाही. मग तुम्ही म्हणाल की करावी दुसरीकडे नोकरी. पण मग त्यातुन मिळालेले पैसे जर २ ठिकाणची घरं + दर आठवड्याचा प्रवास ह्यातच जाणार असेल तर तो अजुन नसल्या सारखा आहे. इतकं करुन फॅमिली/ सोशल लाईफ काहीच उरत नाही. असा विचार करुनच माझ्या पाहण्यात कितीतरी मुली घरी बसल्या आहेत. ह्यात त्यांच्यावर अन्याय झाला आहे/ होतो आहे किंवा त्याची इच्छा असुनही घरच्यांच्या किंवा इतर कुठल्या दबावामुळे घरी बसल्या आहेत असं अजिबात नाही. शेवटी आपल्याला हव्या तश्या सगळ्याच गोष्टी होतात असं काही नाही.

मिनी, तू म्हणते आहेस ते अमेरीकेत आलेल्या भारतीय स्त्रियांच्या बाबतीत खरे असू शकेल. पण वैभवना अमेरीकन स्त्रियांबद्दल बोलायचं आहे का अमेरीकेत आलेल्या भारतीय स्त्रियांबाबत हे स्पष्ट होत नाहीये.

मिनीला अनुमोदन. चूल आणि मूल ह्यात त्या बाया 'रमल्या' आहेत हे सांगणं खरच कठीण आहे. मनात सल असेल तर तो रोज येता-जाता रडकं तोंड करुन थोडीच दाखवणार आहेत.

शीर्षक वाचून जे वाचायला मिळेल असे वाटले होते तसे झाले नाही. अपेक्षाभंग झाला. >>>> अनुमोदन.

येथे आता 'पुरेशी चर्चा' होण्याची शक्यता दिसत आहे.

(अवांतर प्रतिसाद दिला पण त्यापुर्वी दोन समांतरही दिलेले आहेत तेव्हा अ‍ॅडमीनला कळवून त्यांचा वेळ घालवू नये अशी विनंती)

दिवा!

अंजली, मान्य. हे स्पष्ट होत नाहीये की अमेरिकन स्त्रियांबद्दल लिहिलं आहे की भारतीय असलेल्या पण अमेरिकेत राहण्यार्‍या स्त्रियांबद्दल लिहिलं आहे.
पण त्याने काय फरक पडतो? एखादी मुलगी घरी बसली म्हणजे ते चुकीच आहे असं काही नाही. माझ्या आईने कधीच नोकरी केली नाही. पण आम्ही सगळे भावंडं आज जे काही आहोत, ते तिच्यामुळे आहोत. ती होती म्हणुन आम्हाला कधीच बाहेर क्लासला जावं लागलं नाही, मी तर म्हणेन तिने तिच्या शिक्षणाचा किती चांगला उपयोग केला. फक्त बाहेर जाऊन नोकरी केल्यानेच शिक्षणाचा उपयोग होतो असं काही नाहीये.
असो, विषयाला धरुन पोष्ट नाहिए, तरीही माझा मुद्दा क्लिअर व्हावा म्हणुन मी लिहिलं.

अनेक अनिवासी भारतीय अनेक संस्थळांवर लिहिताना दिसतात पण त्यांच्या लेखनात त्या त्या समाजाविषयीची माहिती अपवादानेच दिसते.तिथल्या स्थानिक समाजाविषयी जाणून घावे असे ह्या लोकांना वाटत नाही काय? की हे लोक त्यांच्यात मिसळतच/मिसळू शकतच नाहीत? आपला एक घेटो करून राहाणेच त्यांना आवडते?

जाणून घेतात, मिसळतात सगळे होते. (अपवाद आहेत) संस्थळांवर लिहीत नसतील. बाकीच्यांना ते जाणून घेण्यात रस असेल असे त्यांना वाटत नसेल. (यातही अपवाद आहेतच) Happy

मिनी,

तुमचा मुद्दा पटला. नवरा-बायको दोघं कमावते असले की द्यावा लागणारा Tax आणि मुलांच्या day-care चा खर्च विचारात घेतला तर फारसे काही हातात पडत नाही. शिवाय, मुलांच्या संगोपनाला पुरेसा वेळ न दिल्याची टोचणी लागून रहाते मनाला. असा सर्व विचार करूनही अनेक भारतीय बायका नोकरी सोडून घरी बसायचा निर्णय घेतात.

भारतात नोकरी केली तर, आजी-आजोबा मुलांची काळजी घेतात त्यामुळे Day-Care चा खर्च वाचतो. शिवाय व्हिसा, वर्कपरमिट इ. भानगडी नसल्यामुळे पुरेसे job satisfaction नसेल तर job change करणे सोपे असते.

>> शीर्षक वाचून जे वाचायला मिळेल असे वाटले होते तसे झाले नाही. अपेक्षाभंग झाला. मुख्य प्रवाहातला अमेरिकन समाज आणि अमेरिकन स्त्री याबद्दल लेखात फारसे काहीच नाही.
मॉर्मन्स, अमिश हे धर्म आणि पंथाचा पगडा असलेले अल्पसंख्य गट आहेत. ते अमेरिकन समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

पूर्ण अनुमोदन.

यंग अ‍ॅडल्टचे प्रॉब्लेम मुलगा/मुलगी दोघांचे असले तरी मनाविरुद्ध तडजोड करणे हे या वयोगटातल्या मुली जास्त करताना दिसतात. मुलगा बहुतेक वेळा पटणार नाही म्हणुन ब्रेक अप करुन मोकळा होतो त्या मानाने मुली प्रेमाच्या नावाखाली बरेच काही चालवून घेतात. नंतरही पुढील आयुष्यात हाच पॅटर्न चालू रहातो. त्यामुळे वरवर बघता हे यंग अ‍ॅडल्टचे प्रॉब्लेम्स असले तरी एक स्त्री म्हणून त्याचे दुरगामी परीणाम आयुष्यभर भोगावे लागतात.

तिथे अमेरिकेत/युरोपात असलेल्या पण मूळ भारतीय नसलेल्या बायांचे रोजचे आयुष्य कसे चालते त्याबद्दल काही आले तर इथल्या आम्हाला कळेल तिथे कसे आहे ते.

तिथल्या समाजाबद्दल मूळ इथले पण आता तिथले झालेल्या लोकांनी पेपरात व. लिहिलेले वाचुन मला तर तिथे कुटूंबे नसतातच, चारपाच घटस्फोट नॉर्मल व्.व्.वाटत होते. वर स्वातीने जे लिहिलेय तेच तिथे प्राधान्याने होते असे वाटलेल. तो गैरसमज हळूहळू दुर होतोय. एकंदरीत तिथल्या समाजाबद्दल वाचायला मिळाले तर अजुन काही गैरसमज असतील तर तेही दुर होतील.

बाकी भारतीय बायांचे सगळीकडे तेच चालु असते बहुतेक... Sad

Pages