अमेरिकन समाजातील स्त्रीची परिस्थिती

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आतापर्यंत महिला दिनाच्या निमित्ताने बऱ्याच जणांनी भारतीय समाजातील स्त्रीमुक्तीविषयी बरंच काही लिहीलं आहे. अमेरिकन समाजातील स्त्रीच्या परिस्थितीविषयी माहिती करुन घेणेही उपयुक्त ठरेल या अनुषंगाने काही अनुभव मांडत आहे. इथे राहणाऱ्या भारतीय समाज हा अमेरिकन समाजाचाच अविभाज्य भाग असल्याने मी इथल्या भारतीय लोकांनाही त्यात सामिल केले आहे.

पहिला अनुभव आहे इथल्या भारतीय समाजातला - भारतीय सोडा - मराठी समाजातला. माझा एक मित्र गेली दहा बारा वर्षे अमेरिकेत राहतो आहे. स्वत: पीचडी आहे, बायकोकडे मास्टर्स डिग्री आहे. दोघंही अतिशय चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. दोघांना दोन गोंडस मुली आहेत. एक सात वर्षाची आणि दुसरी अकरा वर्षाची. अचानक याची एक दिवस ईमेल येते. सांगतो बायको गर्भार आहे. मी आश्चर्यचकित होतो. कुठल्याशा निमित्ताने आम्ही त्यांच्या घरी जातो. इतरही मित्र मंडळी जमलेली असतात. अभावितपणे पार्टीत दोन गट पडतात. पुरुष एका बाजूला आणि स्त्रिया एका बाजूला. (माझ्या दृष्टीने तेही स्त्री मुक्ती च्या दृष्टीने घातकच). नेहमीप्रमाणे गप्पा टप्पा होतात. आम्ही त्या दोघांच अभिनंदन करतो. एव्हाना त्यांना मुलगा होणार आहे हे कळलेलं असतं. (अमेरिकेत सोनोग्राफिमध्ये सांगतात - मुलगा आहे की मुलगी ते). मजेत पार्टी संपते आणि आम्ही परत जायला निघतो. परतीच्या प्रवासात बायको जे सांगते ते ऐकून माझं डोकं सुन्न होतं. हा माझा मित्र माझ्या नजरेत खाली घसरतो. त्याच्या बायकोने इतर बायकांना सत्य सांगितलेलं असतं. सासू सासरे (महाराष्ट्रातल्या कुठल्याश्या छोट्या शहरात राहणारे) अडून बसले - दोन मुली आहेत - मुलगा हवा म्हणून. त्यांच्या पुढे यांनी मान तुकवली. आणि तिसरा चान्स घेतला. नशिबाने हात दिला आणि तो मुलगा निघाला. आता सर्व काही आलबेल. बाळंतपण करायला आले होते ते इथे.

अशा गोष्टी ऐकल्या की मला अस्वस्थ व्हायला होतं. काय उपयोग यांच्या शिक्षणाचा? कुठे चुकलो आपण? शिक्षणाने वैचारिक प्रगती होते का? नक्कीच आपण कुठेतरी चुकतो आहोत. आई वडिल सांगतात म्हणून काहीही करणार का आपण? निदान आपण जे करतो आहोत ते बरोबर की नाही किंवा त्याच्या मागची भावना चांगली की नाही याचा विचार करुन ठामपणे नाही म्हणता येणार नाही का? तिसरी मुलगी झाली असती तर काय केलं असतं यांनी?

भारतामध्ये अमेरिकन स्त्रियांची जे चित्र रंगवले जाते ते सर्वस्वी खरं नाही. लॉस अँजलिससारख्या मोठ्या शहरात मी अनेक शिकलेल्या स्त्रियानी नोकऱ्या सोडून चूल आणि मूल यात रमल्याचे मी बघितले आहे. अर्थातच मुख्य फरक एवढा कि ते त्यांनी पूर्णत: त्यांच्या मर्जीने केले आहे. समाज, कुटूंब वगैरेच्या दडपणाला बळी पडून नव्हे. परंतु टेक्सास, युटाह वगैरे राज्यामध्ये अतिशय वाईट परिस्थितीत जगणाऱ्या, धर्माच्या नावाखाली ब्रेनवॉशिंग केलेल्या ख्रिस्ती किंवा मॉर्मिन धर्मीय स्त्रीयाही (टिव्हीवर) पाहिल्या आहेत. अमेरिकेत द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे. किंबहुना हा कायदा कुठल्याही धर्माच्या लोकांना एकाहून अधिक लग्न करण्याची परवानगी देत नाही. तरीही मॉर्मिन धर्मातून फुटून निघालेले अनेक छोटे छोट पंथ आजही एकापेक्षा अधिक लग्ने करतात. एका अंदाजानुसार आजही अमेरिकेत ३०,००० ते ५०,००० लोकांनी एकापेक्षा जास्त बायकांबरोबर (लग्न करुन) राहत आहेत. त्यांना तसे करण्याचा उपदेश करणाऱ्या वॉरन जेफला अमेरिकन सरकारने तुरुंगात टाकले असूनही त्याचे अनुयायी टेक्सास आणि इतर मिडवेस्टर्न राज्यांमध्ये त्याचा उपदेश पसरवत आहेत. पेनसिल्वेनिया राज्यातील आमिष समाजातही अनेक लग्ने करायची प्रथा नसली तरीही स्त्रीचे स्थान दुय्यम मानले जाते. स्त्रीने आपल्या गरजांपेक्षा तीच्या कुटुंबाच्या, चर्चच्या किंवा समाजाच्या गरजांना प्राधन्य देण्याची अपेक्षा आमिष समाज बाळगतो. त्यांचा पोषाखही गोषा नसला तरी अंगभर आणि जुन्या इंग्रजी चित्रपटातील पोषाखाप्रमाणे असतो. त्यांनी ठराविक पद्धतीचेच कपडे घालावेत अशी अपेक्षा असते. त्यांना दागिने घालायची बंदी असते.

अर्थातच आकडे बघितले तर अमेरिकन स्त्रियांची परिस्थिती भारतापेक्षा नक्कीच हजारो पटींनी जास्त चांगली आहे. परंतु अशा या प्रगत समाजात आजही असे घटक असावेत याचा मात्र विषाद वाटतो.

विषय: 
प्रकार: 

मोठा देश म्हंटला की जी inhomogeneity असते त्यामुळे असे गट सापडायची शक्यता जास्त.

इतरत्र धर्माचाही भाग प्रकर्शाने लिहिला गेलेला नाही (किंवा टाळण्यात आलेला आहे).

लोक एकमेकांचे विचार आपलेसे करु लागले, ideas चे sampling वाढवु लागले तर बरेच प्रॉब्लेम्स कमी होतील.
अनेक ठिकणी प्रवास करणे हा एक सोपा (पण खार्चीक) मार्ग आहे.

साधना, मी इथे मिडवेस्ट मधल्या लहान गावात राहाते. इथेही लोकं कुटुंबाला प्राधान्य देणारीच आहेत. मात्र असे असले तरी कुठल्याही समाजात असतात तसे प्रॉब्लेम इथेही आहेत. उठसूठ घटस्फोट इथेही होत नाहित पण भारतात जसे कुठल्याही परिस्थितीत लग्न टिकवण्यासाठी मुलीच्या घरचे दबाव आणतात तसेही होत नाही. आमचे स्टेट नो फॉल्ट डिवोर्स वाले आहे. त्यामुळे घटस्फोटासाठी 'पटत नाही' एवढे कारण पुरेसे असते. उगाच आरोप लावायची गरज नसते. माझ्या ओळखीत अशी घटस्फोट झालेली आणि मैत्रीचे संबंध असलेली बरीच कुटुंबं आहेत. मुलेही व्यवस्थीत वेल बॅलन्स्ड आहेत. पण अ‍ॅब्युझिव्ह रिलेशनशिप, व्यभिचार वगैरे कारणे असतील तर गोष्टी चिघळतात. त्याचा परीणाम मुलांवरही होतो.
इथे घरच्या कामात मुलगा-मुलगी भेद नसतो. घरातील कामे दोघांनाही करावी लागतात. त्यामुळे मोठे झाल्यावरही एकाने स्वयंपाक केला तर दुसर्‍याने मागचे आवरले हे होतेच. नोकरी धंद्याच्या बाबतीत त्या त्या भागात ज्या काही संधी असतील त्या प्रमाणे नोकर्‍या. आमच्या इथे फॅक्टरीतले जॉब जास्त आहेत तर स्त्रीया फॅक्टरीत काम करतात. एखाद्या ठिकाणी हेल्थकेअरचे जॉब जास्त असतील तर तिथे स्त्रीयांच्या जोडीला पुरुषही नर्सिंगच्या जॉबमधे दिसतात.
अमेरीका हा बराच मोठा देश आहे. त्यामुळे एका भागात जी परीस्थिती आहे ती दुसर्‍या भागात असेलच असे नाही. शिक्षण, उत्पन्न या प्रमाणेही घराघरातील वागणे वेगळे असू शकते. आमची ज्या अमेरिकन लोकांशी ओळख आहे त्यांच्या घरातील वागणे माझ्या घरापेक्षा फारसे वेगळे नाही.

साधना, वर आशीष आणि स्वाती२ यांनी म्हटल्याप्रमाणे हा खंड:प्राय देश असल्यामुळे निरनिराळ्या राज्यांत निरनिराळी परीस्थिती दिसून येते. आमच्यासारखे स्थलांतरित पक्षी Happy सहसा जिथे दाणापाणी जास्त अशा राज्यांत बहुतांशी वस्ती करून असतात (प्रामुख्याने पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांजवळची राज्यं). इथली 'संस्कृती' ही 'आर्थिक' गणितांवर आधारित असल्याने इथे बहुतांशी 'सुधारक' लोक दिसतात. तर उदा. मध्य अमेरिकेत त्यामानाने चित्र निराळं दिसतं. सामाजिक, धार्मिक, राजकीय - सगळ्याच बाबतीत हा फरक दिसून येतो.

माझ्याही माहितीतल्या अमेरिकन लोकांची राहणी थोड्याफार फरकाने माझ्या घरासारखीच आहे असं म्हणता येईल.

लग्नसंस्था / कुटुंबव्यवस्था काय ती भारतानेच जपली आहे अशा प्रकारचे गैरसमज सहसा लोकांच्या मनात असतात, पण त्यात काही तथ्य नाही. नेस्टिंग इन्स्टिंक्ट जगाच्या पाठीवर सगळीकडे तीच असते आणि मुलांबद्दलचं प्रेमही. Happy
घटस्फोटांचं प्रमाण जास्त आहे, पण एका अर्थी विचार करता ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं.

माझ्याही माहितीतल्या अमेरिकन लोकांची राहणी थोड्याफार फरकाने माझ्या घरासारखीच आहे असं म्हणता येईल.

लग्नसंस्था / कुटुंबव्यवस्था काय ती भारतानेच जपली आहे अशा प्रकारचे गैरसमज सहसा लोकांच्या मनात असतात, पण त्यात काही तथ्य नाही. नेस्टिंग इन्स्टिंक्ट जगाच्या पाठीवर सगळीकडे तीच असते आणि मुलांबद्दलचं प्रेमही. स्मित
घटस्फोटांचं प्रमाण जास्त आहे, पण एका अर्थी विचार करता ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं.

<<< १००% अनुमोदन !!

माझ्याही माहितीतल्या अमेरिकन लोकांची राहणी थोड्याफार फरकाने माझ्या घरासारखीच आहे असं म्हणता येईल.लग्नसंस्था / कुटुंबव्यवस्था काय ती भारतानेच जपली आहे अशा प्रकारचे गैरसमज सहसा लोकांच्या मनात असतात, पण त्यात काही तथ्य नाही. नेस्टिंग इन्स्टिंक्ट जगाच्या पाठीवर सगळीकडे तीच असते आणि मुलांबद्दलचं प्रेमही. स्मितघटस्फोटांचं प्रमाण जास्त आहे, पण एका अर्थी विचार करता ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं.>>>>>>>>

पुर्णपणे अनुमोदन. त्याचप्रमाणे भारतात अमेरिकन स्त्रियांविषयी बरेचदा फारसा कुटुंबाचा विचार न करणारी , अनिर्बंध स्वातंत्र्य उपभोगणारी असे भडक चित्र रंगवले जाते. पण प्रत्यक्षात परिस्थिती खुप वेगळी आहे.
टिपिकल मिडलक्लास अमेरिकन कुटुंबाच्या बर्‍याचशा व्हॅल्युज आपल्यासारख्याच आहेत.
सिंगल मदर, पिअर प्रेशर मुळ इच्छा नसतानाही सेक्स्युअली अ‍ॅकटिव्ह होणार्‍या मुली, प्रेग्नंट झाल्यावर काँझर्व्हेटिव्ह ख्रिस्तियन व्हॅल्युजमुळे अ‍ॅबॉर्शनला नाकारुन ऐपत नसणार्‍या १४/१५ वर्षाच्या मुली हे इथल्या समाजातले काही ठळक प्रॉब्लेम मला वाटतात.

लग्नसंस्था / कुटुंबव्यवस्था काय ती भारतानेच जपली आहे अशा प्रकारचे गैरसमज सहसा लोकांच्या मनात असतात, पण त्यात काही तथ्य नाही. नेस्टिंग इन्स्टिंक्ट जगाच्या पाठीवर सगळीकडे तीच असते आणि मुलांबद्दलचं प्रेमही. >>> पूर्ण सहमत!

घटस्फोटांचं प्रमाण जास्त आहे, पण एका अर्थी विचार करता ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं.
>>>
अत्यंत सहमत.. मी 'खो'पोस्टमध्ये हा मुद्दा मांडायचा विचार केला होता पण विषय भरकटेल म्हणुन नाही लिहिले. आपल्याकडे ज्या पद्धतीने लग्नं होतात (वा जगात कुठेही) त्यात probabilityच्या दृष्टीने बघितले तर घटस्फोटांचे प्रमाण बरेच अधिक पाहिजे. पण आपल्याइथे टिकवून ठेवण्याची मानसिकता (ज्यास इतर अनेक सामाजिक दबाव कारणीभूत आहेत) घटस्फोटांचे प्रमाण कमी करते. जे अनैसर्गिक आहे. घटस्फोटांचे (ह्यात केवळ कोर्टात जावून घेतलेले घटस्फोट अपेक्षित नसून दोन एकत्र राहणार्‍या माणसांचे विभक्त होणे अपेक्षित आहे) प्रमाण एका समतोल (equilibrium) प्रमाणावर असणे हे एका प्रगल्भ समाजाचे लक्षण आहे असे मला वाटते. घटस्फोटांचे प्रचंड प्रमाण जितके कुटुंबव्यवस्थेला घातक (पण व्यक्तिस्वातंत्र्यास पूरक - इथे रसेलच्या मॅरेज अँड मोरल्सची आठवण आल्याशिवाय राहत नाही) तितकेच त्याचे प्रमाण अगदी कमी हे व्यक्तिविकास व पर्यायाचे समाजाच्या विकासास घातक आहे.

रात्री मुख्य धागा बंद करण्यात आल्याने मला रंगेबीरंगीमध्ये खो चे उत्तर द्यावे लागले.

मला "लॉस अँजलिससारख्या मोठ्या शहरात मी अनेक शिकलेल्या स्त्रियानी नोकऱ्या सोडून चूल आणि मूल यात रमल्याचे मी बघितले आहे. " यात मला अमेरिकन (गोरे) अभिप्रेत आहेत. माझ्या एका गोऱ्या मित्राच्या बायकोने मुलांना सांभाळण्यासाठी चांगली नोकरी सोडली. आणि ते तीने कुठल्याही दबावाशिवाय संपूर्णपणे स्वत:ची इच्छा आहे म्हणूनच केले.

एक महत्वाचा मुद्दा मांडायचा राहून गेला आणि तो म्हणजे एच फोर वर लग्न करुन इथे आलेल्या मुली. बऱ्याचशा मुली आपला वेळ सत्कारणी घालतात पण बऱ्याच मुलींची कुचंबणा झालेलीही मी बघितली आहे. त्यांना ड्रायव्हर्स लायसन्ही काही राज्यात मिळत नाही. त्यांना कुठलीही नोकरी करायला बंदी असते. नवीन देश, आजूबाजूला कोणीच नाही - नवरा सकाळी जाणार तो रात्री परत येणार. अशा परिस्थितीत अनेक भारतीय मुली अमेरिकेत दिवस काढत आहेत. त्यांची परिस्थिती गंभीर नसली तरी विचार करण्याईतकी वाईट नक्कीच असते.

एका व्यक्तीची मानसिकता, कारणे, सबबी हे सगळे तिच्या तिच्या परीने योग्यच असते. पण एक समाज म्हणून, शासनकर्ते म्हणून आपण कसे वागतो हे खूप महत्त्वाचे ठरते. पोराच्या ओढीने कडा उतरणारी हिरकणी आपला आदर्श असते. पण रोज सकाळी गडावर जाताना कुठलाही हिशेब न मांडणारी हिरकणी आणि तिचे वर्क एथिक कधीच आपण शिकवत नाही. (ह्या घागरभर दुधाचे किती पैसे मिळणार? त्यापेक्षा गाय विकूनच टाकू इ इ. जसे, आता आपण म्हणतो कितीसे पैसे मिळणार त्यापेक्षा आहे तो स्कील्सेट गंजून जाऊ दे) ह्यात भारतीय आणि अभारतीय दोन्ही समाज आले. समाज म्हणून हे आपले फेल्युअर आहे. शासक म्हणून आपण धोरण कशी आखतो (अगदी आपल्या ऑफिसात असेल)? त्यात स्त्री, कुटुंब ह्यांना सोय-सवलत दिली जाते का? शिवाजी विषयी पूर्ण आदर आहे पण शिवाजीने हि हिरकणीचा बुरुज बांधला, तिला साडी चोळी दिली पण गावात जाऊन दुध गोळा करायला घोडे पाठवले इ इ असे काही ऐकिवात नाही कारण स्त्रीचे कष्ट हे स्त्री-पुरुष सर्वांनाच स्वस्त वाटतात. त्याकाळी आणि आजसुद्धा.

धागाकर्ता व सर्व प्रतिसादकांचे आभार
लेखन व प्रतिसाद छान आहेत

Pages