केल्याने भाषांतर - प्रवेशिका १४ (अरुंधती कुलकर्णी)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 25 February, 2011 - 20:39

मूळ भाषा : हिंदी
मूळ कवितेचे शीर्षक : साधो ये मुरदों का गाँव
रचनाकार : संत कबीर

कविता अनुवाद : अरुंधती कुलकर्णी
मायबोली आयडी : अरुंधती कुलकर्णी

साधो, हे मुडद्यांचे गाव

साधो, हे मुडद्यांचे गाव
साधो, हे मुडद्यांचे गाव
पीर मरे पैगंबरही जो मरे
मरती जिवंत योगी
राजा मरे प्रजाही मरणशील
मरती वैद्य अन् रोगी
चंद्रही मरतो मरेल सूर्यही
मरते धरणी अन् आकाश
चौदा भुवनीचे प्रतिपालही मरती
त्यांची काय ती आशा!
नऊही मरती दशही मरती
मरती सहज अठ्ठ्याऐंशी
तेहतीस कोटी देवता मरती
काळाची ही सरशी
नाम अनाम अनंत कायम
दूजे तत्त्व ना होई
कबीर म्हणे ऐक हे साधो
ना भटकत मरणी जाई

-- संत कबीर

मूळ काव्य :

साधो ये मुरदों का गाँव
साधो ये मुरदों का गाँव
पीर मरे पैगम्बर मरिहैं
मरि हैं जिन्दा जोगी
राजा मरिहैं परजा मरिहै
मरिहैं बैद और रोगी
चंदा मरिहै सूरज मरिहै
मरिहैं धरणि आकासा
चौदां भुवन के चौधरी मरिहैं
इन्हूं की का आसा
नौहूं मरिहैं दसहूं मरिहैं
मरि हैं सहज अठ्ठासी
तैंतीस कोट देवता मरि हैं
बड़ी काल की बाजी
नाम अनाम अनंत रहत है
दूजा तत्व न होइ
कहत कबीर सुनो भाई साधो
भटक मरो ना कोई

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुंधती, मस्त रचना निवडलीस, आणि अनुवादही छान झाला आहे. Happy
फक्त,
>> भटक मरो ना
याचा अर्थ मला निराळा वाटतोय. हिंदीत 'भटकना' म्हणजे रस्ता चुकणे वा हरवणे. या ओळीला आधीच्या 'नाम अनाम अनंत रहत है.. दूजा तत्व न होइ'चा संदर्भ आहे.
ज्याला नाव नाही, जे अनादि अनंत आहे, तेच एक अंतिम सत्य आहे. त्याच्यापासून आमरण कोणी दूर जाऊ नये. (सगळ्यांनाच एक दिवस मरायचं आहेच, पण त्याआधी जो जीवनकाल मिळाला आहे, त्यात कोणी सन्मार्ग सोडू नये.)
असा अर्थ असावा असं मला वाटतंय.

अकु, अनुवाद आवडला. छान लिहितेस. Happy

शेवटाबद्दल स्वाती म्हणते आहे त्याला अनुमोदन. एक नाम सोडता, चराचरातल्या सार्‍या अशाश्वत आणि कदाचित शाश्वत गोष्टींना अंत असल्याने, - नाम न घेता - अशा गोष्टींमागे लागून, वेळ घालवण्यातच (भटक) आयुष्याचा अंत करु नकोस, असं ते असावं,असं वाटलं मला.

धन्स स्वाती, शैलजा. Happy
अगं, त्याच अभिप्रेत अर्थाने शेवटच्या ओळीचा अनुवाद केलाय. पण बहुतेक तो तितका चांगला जमला नाहीए की काय?? Uhoh इतर काही पर्याय तेव्हा सुचला नाही. तुम्हाला सुचला तर जरूर सांगा. Happy

>>पण बहुतेक तो तितका चांगला जमला नाहीए की काय?? >> असं नाही मला म्हणायच Happy ते जरासं शब्दशः वाटलं, इतकंच.
थोडंसं धाडस करुन - शेवटची ओळ 'निरुद्देश ना अंत कवटाळी' किंवा ना च्या जागी का घालून, अशी चालेल का?

हम्म्म... यमक पण जुळवायचंय.... आणि खरं सांगू का? मी मूळ काव्यातल्या ''भटक'' शब्दाच्या प्रेमात आहे! Lol त्या शब्दात जो अर्थ ध्वनित होतोय तसा अर्थ इतर मराठी शब्दांमध्ये अद्याप गावला नाहीए गं! असो. कर अजून विचार आणि सांग. Happy धन्स!!

आवडलं कबीरांच काव्य आणि तुझा अनुवादही , मलाही स्वाती सारखचं वाटलं.
काळाचा महिमा मोठा आहे त्याच्या पुढे कोणीही मोठा नाही म्हणुन आयुष्य असं वाया घालवुन मरु नये तर काही चांगलं काम करुन नाव मिळवावं.

शाश्वत केवळ ब्रह्मच साधो,
बाकी सगळी माया
कबिर म्हणे सन्मार्ग न सोडी,
जन्म न जावो वाया

असं काही चालेल का?

मला सर्वात मजा वाटली ती ते किती सहज 'तैंतीस कोट देवता मरि हैं' म्हणून गेले! त्यांच्या नादी लागून शाश्वत सत्यापासून दृष्टी ढळते ही 'चेतावनी' त्यांच्या रचनांमधे वारंवार येते.

यासंदर्भात पटकन आठवणारे काही दोहे :

पूजा, सेवा, नेम, बरत सब गुडियन का सा खेल
जब लग पियु परसे नहीं तबलग संशय मेल

पत्थर पूजे हरि मिले, तो मैं पूजूँ पहाड
तां ते वह चक्की भली! पिस खाये संसार!

कांकर पत्थर जोरि के मस्जिद लयी बनाय
तां चढी मुल्ला बांग दे, क्या बहरो भयो खुदाय?!

सॉरी अरुंधती, तुझ्या धाग्यावर थोडं विषयांतर झालं, पण मला अगदीच राहवलं नाही. Happy

आय हाय, स्वाती..... तुला १००००० मोदक! किती सुंदर केलाहेस तो अनुवाद..... मस्त गं! मी आता तुझ्या परवानगीने तो सश्रेय उचलणार आहे!!! Happy

रच्याकने, तू कबिराचे 'मोको कहां ढूँढे रे बंदे' वाचले/ ऐकले आहेस का? अजून एक अप्रतिम निर्गुणी रचना आहे ती. प्रस्थापित धर्म व्यवस्था, संकल्पना, भेदभाव.... सर्वांनाच छेद देणार्‍या कबीराच्या रचना वाचतानाही स्तिमित व्हायला होते. आणि हे सर्व अशा काळात जेव्हा समाज रूढी, परंपरा, कर्मठतेच्या विळख्यात अडकला होता तेव्हा...

कबीर, नानक, नामदेव, तुकाराम.... सगळेच विद्रोही संतकवी होते..... सध्या मी नामदेव आणि कबिराच्या पंजाबी / हिंदी रचना वाचत आहे. एकेक रचना म्हणजे डोळ्यांत झणझणीत अंजन आहे. त्यांवर लिहीन बहुतेक. Happy