संपादनेथॉन: मराठी दिनानिमित्त विकिपीडियाचा उपक्रम

Submitted by मस्त कलंदर on 22 February, 2011 - 04:42

नमस्कार मंडळी,
औचित्य आहे दरवर्षी २७ फेब्रुवारीला जगभर पाळल्या जाणार्‍या मराठी भाषा दिवसाचं. त्या निमित्त येत्या २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित केली आहे. या दिवशी अधिकाधिक संपादने करून आपला सक्रीय सहभाग नोंदवण्यासाठी विकिपीडियाकडून सर्व मराठी भाषिकांना यात सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे.

विकिपीडियाच्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणं सर्व भारतीय भाषांमध्ये मराठीतील लेखांचा तिसरा क्रमांक आहे. ( हिंदी आणि तेलुगू आपल्यापेक्षा पुढे आहेत.) तरीही जर मराठी विकि पाने चाळली असतील, तर ही लेखसंख्या पुरेशी नाही हे लगेच कळून येतं. तेव्हा त्यात भर घालणं हे काम आपणा सर्वांनी पुढे येऊन करणं गरजेचं आहे. त्यासाठी छोटे लेख संपादित करणं(यांचीही यादी खूप मोठी आहे), नवीन लेख तयार करणं किंवा त्या त्या लेखाला पूरक अशी चित्रे/फोटोग्राफ्स अपलोड करणं असे खारीचे आणि सिंहाचे दोन्ही वाटे आपण सहजच उचलू शकू..

अधिक माहिती विकिपीडियावरून उचलून मी इथे डकवण्यापेक्षा सरळ या दुव्यावरच पहा:
http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन_१
इथे सहभागासाठी नोंदणी करता येऊ शकेल तसेच नोंदणी न करताही आपला हातभार लावता येऊ शकेल. पानाच्या शेवटी साहाय्यासाठी मदतकेंद्राचाही दुवा दिलेला आहे, तेव्हा लेखांत भर घालताना जास्त अडचणी येऊ नयेत.

एक रविवार असाही सत्कारणी/कारणी लावूयात.. Happy
धन्यवाद,
-मस्त कलंदर

गुलमोहर: 

दुव्याबद्दल धन्यवाद मस्त कलंदर! Happy मीही आज इकडे एखादा धागा सुरू करून मराठी भाषा दिवसानिमित्त आयोजलेल्या विकिपीडिया संपादनेथॉनेची माहिती द्यावी असं ठरवलं होतं; पण त्याआधी हा धागा तुम्ही सुरू केलात, त्याबद्दल धन्यवाद!

>> सर्व भारतीय भाषांमध्ये मराठीतील लेखांचा तिसरा क्रमांक आहे. (उडीया आणि हिंदी आपल्यापेक्षा पुढे आहेत.) <<
फक्त एक दुरुस्ती - लेखसंख्येनुसार मराठी विकिपीडिया हिंदी व तेलुगू विकिपीडियांखालोखाल तिसर्‍या क्रमांकावर आहे.

बाकी लेखसंख्येपेक्षाही विकिपीडियाची माहितीपूर्णता हा मुद्द महत्त्वाचा आहे - सध्या मराठी विकिपीडियावर काही लेखांमध्ये अक्षरश: एका ओळीचीदेखील माहिती नाही, असे शीर्षकमात्र अवस्थेत पडून राहिलेले लेख आहेत. त्या लेखांमध्ये भर घालून मराठी विकिपीडीयाची माहितीपूर्णता वाढवणे, हे प्रधान उद्दिष्ट आहे. ज्ञानभाषा म्हणून मराठीत नानाविध विषयांवर संदर्भांसहित, दर्जेदार व अद्ययावत माहिती गोळा करणे मराठीच्या जतन-संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे (नाहीतर संस्कृताप्रमाणे 'पूर्वीचं साहित्य चांगलंय हो; पण आता भाषा मेल्यातच जमा' अशी अवस्था व्हायची. शिकायला, पैसा कमवायला आणि उद्योगधंदे करायला भाषा कमकुवत ठरू लागल्या, की त्या भाषांचे दिवस भरले म्हणून समजावे.).

हा विचार ध्यानात ठेवून मराठी भाषा दिवसानिमित्त कथा-कविता-गाणी-रसास्वाद अश्या साहित्यिक उपक्रमांसोबत मराठी भाषक नेटीझनांनी विकिपीडिया संपादनेथॉनेसही भरभरून प्रतिसाद द्यावा.

कलंदर, मला नक्की आवडेल हे काम करायला. मला खूपदा संदर्भ शोधताना अपूरे संदर्भ सापडतात. पण माझ्याकडचे संदर्भ तिथे देता येतात का ते बघतो.

वा! सार्‍यांचे प्रतिसाद वाचून हुरूप आला. विकिपीडियावर संपादने कशी करावीत, यासाठी संपादनेथॉनेसाठी लिहिलेले हे पूर्वप्रसिद्धीपर ईमेल येथे चिकटवत आहे :

नमस्कार!

विकिपीडिया हा मुक्त (= वाचायला, लिहायला, आधी भरलेल्या माहितीत नव्याने भर घालायला/दुरुस्त करायला सर्वांना खुला असलेला आणि मोफत Happy ) ज्ञानकोश प्रकल्प आहे. मराठीसह इंग्लिश व जगभरातील २६०+ भाषांमध्ये विकिपीडिया प्रकल्प चालू आहेत. इंग्लिश विकिपीडिया (http://en.wikipedia.org/) हा सध्याच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मोठा व आशयसंपन्न ज्ञानकोश असून त्यात ३५ लाखांहून अधिक लेख उपलब्ध आहेत. मराठी विकिपीडिया तुलनेने अशक्त Happy आणि बाल्यावस्थेत असून त्यात सध्या ३२,०००+ लेख आहेत. मराठी विकिपीडियावर तुम्ही खाली नोंदवलेल्या कोणत्याही मार्गाने सहभाग घेऊन जमेल तसा हातभार लावू शकता :

* उपलब्ध लेखांमधील माहितीत अधिक भर घालणे/ माहिती अद्ययावत करणे
* नवीन लेख बनवणे
* लेखांमधील संपादनाच्या चुका दुरुस्त करणे व लेखांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने यथायोग्य बदल करणे.
* लेखांमध्ये सचित्र स्पष्टीकरणे देण्यासाठी विकिमीडिया कॉमन्स (http://commons.wikimedia.org) या सामायिक रिपॉझिटरीतून विषयानुरूप चित्रे/फोटो लेखात जडवणे
* मराठी विकिपीडियाबाबत आपल्या मित्रमंडळींना, कुटुंबियांना माहिती देऊन प्रकल्पाची खबरबात अन्य मराठीजनांपर्यंत पोचवणे.
* ब्लॉग पोस्टी, ऑर्कुट/फेसबुक अश्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवरील किंवा मराठी भाषेतील मायबोली, मनोगत, मिसळपाव, उपक्रम इत्यादी सार्वजनिक फोरम संकेतस्थळांवरील गप्पांमध्ये, ऑनलाइन चर्चा/वाद-विवाद, ईमेल इत्यादी माध्यमांतून मराठी विकिपीडियावरील माहितीचे/लेखांचे संदर्भ, दाखले नोंदवत मराठी विकिपीडियाची उपयुक्तता अप्रत्यक्षपणे इतरांसमोर मांडणे.

अर्थात हे सर्व तुम्ही तुमच्या सवडीनुसार, आवडीनुसार आणि अगदी खारीचा वाटा उचलत केलेत, तरी हरकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आठवड्याभरात वृत्तपत्रांत वाचलेल्या माहितीवरून रविवारी १५ मिनिटांत संबंधित लेखांमध्ये भर घातली/नवीन लेख बनवले, तरीही हरकत नाही - या सार्वजनिक प्रकल्पात तुमचा कोणत्याही प्रकारचा सहभाग स्वागतार्हच आहे. फक्त दोन-तीन पथ्ये तेवढी पाळावीत :

* मराठी विकिपीडिया हा ज्ञानकोश (एन्सायक्लोपीडिया) प्रकल्प असल्यामुळे व्यक्तिगत अनुभवकथन/ टीकाटिप्पणी/ प्रवासवर्णन किंवा वृत्तांतपर ललित ढंगाने माहिती न मांडता त्रयस्थ वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून लिहावी.
* हा प्रकल्प मराठी भाषेत असल्यामुळे प्रमाण मराठी भाषेत व देवनागरी लिपीतच मजकूर लिहिणे अपेक्षित आहे.
* हा प्रकल्प मुक्त असल्यामुळे कुणाचाही सहभाग विनामूल्यच धरला जातो (पगार/मानधन मिळत नाही :). मात्र या ज्ञानकोशाचा वापर सर्वांना मोफत करता येतो, हा पैशातील मूल्यापेक्षाही मौल्यवान असणारा मोबदला जरूर मिळतो.

मराठी विकिपीडियाबद्दल ही झाली नमनाची माहिती. आता सुरुवात नेमकी कशी करावी, याबद्दल माहिती जाणून घ्यायला खालील दुवे चाळून बघा :

* विकिपीडिया:परिचय (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:परिचय )
* विकिपीडिया:सफर (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:सफर )
* सहाय्य:संपादन (http://mr.wikipedia.org/wiki/सहाय्य:संपादन )
* विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे)
* विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १ (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १)

आणखी काही मदत लागल्यास, व्यक्तिशः मला ईमेल करू शकता किंवा 'विकिपीडिया:चावडी' (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:चावडी) येथे आम्हां मराठी विकिपीडियनांना भेट देऊ शकता.

क.लो.अ.,

नमस्कार,

मराठी विकिपीडियावर संकल्प आणि स्वाती यांची बातचीत पाहून मुद्दाम येथे येउन नवीन सभासद झालो.
संकल्पने वर माहिती दिलेली आहेच, शिवाय संपादनेथॉनच्या पानावरही बरीच उपयुक्त माहिती आहे. याशिवायही माहिती, मदत लागल्यास कळवणे, संकल्प, मी, इतर विकिपीडियन, यांपैकी कोणीतरी लगेचच उत्तर देऊ शकेल.

मराठी विकिपीडियावर लिहिण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बाबतीत पूर्ण ज्ञान असलेच पाहिजे असे नाही. जी काही माहिती तुम्हाला नक्की माहिती आहे (आणि त्याबद्दल संदर्भ देता आले तर अत्युत्तम) ती तेथे येउन बिनधास्त लिहा. त्यात कोणी न कोणी भर घालेल किंवा सुधारेल. तुमच्या लिखाणात सुधारणा केल्यास राग मानून घेऊ नका. यात तुमच्या चुका काढणे हे उद्दिष्ट नसून लिहिलेले अधिकाधिक अचूक व्हावे हीच धडपड असते.

मराठी विकिपीडिया आत्ताशी बाळसे धरू लागला आहे व आपल्या सहयोग आणि योगदानाने हा अधिक समृद्ध होईल अशी आशा आणि खात्री आहे.

क.लो.अ.

अभय नातू

संकल्प, धन्यवाद रे.
मला लेख लिहिताना उडिया की तेलुगू यांत थोडा संभ्रम झाला होता.
अभय आणि संकल्प,
मी आतापर्यंत नवीन लेख तयार केला नाहीय. आता करायचा मानस आहे, पण तत्पूर्वी माझ्या मनात शंका आहे की,
१.प्रत्येक पानावर त्या पानावरच्या माहितीची अनुक्रमणिका येते, त्याचा काही विशिष्ट मसुदा आहे का?
२. जर नसेल, तर साधारण कोणकोणत्या गोष्टींचा ढोबळमानाने पानामध्ये अंतर्भाव असावा?
३. विकिपीडियाच्या १०व्या वर्धापणदिनाच्या कार्यक्रमात क्रॉस रेफरन्सेस कसे द्यावेत, लिंक्स कशा द्याव्यात, याबद्दल माहिती दिली होती. तशा प्रकारची माहिती लिखित स्वरूपात तुम्हा लोकांकडे आहे का? [मी हाच लेख चार मराठी संस्थळांवर प्रकाशित केला आहे. अशी परिपूर्ण माहिती त्या त्या संस्थळांच्या सदस्यांपर्यंत पोचवल्यास केवळ काही शंकांमुळे तिथे न लिहिणारे लोकही लिहू इच्छितील.]

धन्यवाद..

@ संकल्प, तुझा प्रतिसाद वाचल्यानंतर हा लेख तूच लिहायला हवा होतास असं वाटलं.. Happy

नमस्कार स्वाती,

तू विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने सर्वसाधारण माहिती :
१. >> प्रत्येक पानावर त्या पानावरच्या माहितीची अनुक्रमणिका येते, त्याचा काही विशिष्ट मसुदा आहे का? <<

मराठी विकिपीडियातील एखाद्या लेखाच्या पानावर उपविभागांची अनुक्रमणिका दिसते, ती आपोआप तयार होते, त्यासाठी काही मसुदा नाही. मुळात लेखाचे स्वरूप 'अमुक तमुक क्रमानेच विस्तारावे', असा कोणताही सरधोपट नियम नाही. काही संकेत गेल्या काही वर्षांमध्ये बनलेल्या दर्जेदार लेखांच्या मांडणीनुसार (आपसूक) सहमत झाल्यासारखे आहेत.. अर्थात त्यात बदल, सुधारणा, अपवाद करायला कुणाचीही आडकाठी नाही. अंतिमत: लेखातील माहितीचा दर्जा उत्कृष्ट असल्याशी मतलब.

बाकी, मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर मुख्य सदर व उदयोन्मुख लेख ही दोन सदरे आहेत, त्यांचे आर्काइव्ह बघितल्यास त्यांत दर्जेदार लेखांचे संकलन आढळेल. ते चाळून बघितल्यास, थोडे निरखल्यास आपसूक काही गोष्टी ध्यानी येऊ लागतील.

२. >> साधारण कोणकोणत्या गोष्टींचा ढोबळमानाने पानामध्ये अंतर्भाव असावा? <<

वर नोंदवल्याप्रमाणे यासाठी कुठलाही 'अधिकृत' नियम नाही. मात्र एक प्रमुख मार्गदर्शक तत्त्व सांगता येईल - 'एखाद्या एन्सायक्लोपीडियात या 'अबक' विषयावर माहिती कशी नोंदवली असेल?' किंवा ''अबक' विषयावरील लेखाची विश्वकोशीय दर्जाची माहिती मला वाचक म्हणून मिळवायची असल्यास, त्यात मला कोणत्या गोष्टी वाचनीय / '''माहितीपूर्ण''' वाटू शकतील', हा प्रश्न आपणच आपल्याला विचारून जे उत्तर येईल, तेच. Happy

उदाहरणार्थ : एखाद्या व्यक्तीवरील लेखात त्या व्यक्तीचे नाव, जमल्यास स्थानिक भाषेतील (म्हणजे त्या व्यक्तीच्या भाषेतील) नाव/लेखन, जन्मदिनांक व मृत्युदिनांक (व्यक्ती हयात असल्यास, मृत्युदिनांकाऐवजी 'हयात' म्हणून उल्लेख), त्या व्यक्तीचा पेशा किंवा ठळक नोंदवण्याजोगी कामगिरी या गोष्टी किमानपक्षी असणे सयुक्तिक ठरते.

एखाद्या ठिकाणाविषयीच्या लेखात ते ठिकाण कुठल्या देशात, त्या देशात कुठल्या प्रांतात/शहरात/विभागात आहे, ते लिहून, मग त्याच्या परिसरातील शेजारी देश/प्रांत इत्यादी लिहावेत. खेरीज त्या ठिकाणाचे विशेष महत्त्व (प्रांतीय राजधानी/जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र / कुठल्या उद्योगाचे/संस्थेचे मुख्यालय असणे इत्यादी) नोंदवावे. याशिवाय त्या ठिकाणाचा इतिहास, हवामान, लोकसांख्यिकी (डेमोग्राफिक्स) इत्यादी बाबींविषयीदेखील जमेल तितकी माहिती नोंदवावी.

३. >> विकिपीडियाच्या १०व्या वर्धापणदिनाच्या कार्यक्रमात क्रॉस रेफरन्सेस कसे द्यावेत, लिंक्स कशा द्याव्यात, याबद्दल माहिती दिली होती. तशा प्रकारची माहिती लिखित स्वरूपात तुम्हा लोकांकडे आहे का? [मी हाच लेख चार मराठी संस्थळांवर प्रकाशित केला आहे. अशी परिपूर्ण माहिती त्या त्या संस्थळांच्या सदस्यांपर्यंत पोचवल्यास केवळ काही शंकांमुळे तिथे न लिहिणारे लोकही लिहू इच्छितील.] <<

माझ्या याच पानावरच्या दुसर्‍या क्रमांकाच्या पोस्टीत या संदर्भातील सर्व माहिती लिखित स्वरूपात यापूर्वीच दिली आहे. त्यातल्या (http://mr.wikipedia.org/wiki/सहाय्य:संपादन), (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:परिचय ), (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:सफर ) या लिंका जरूर पाहा. अन्य संस्थळांवर तू लिहिलेल्या माहितीला पूरक माहिती म्हणून माझी वरची दुसर्‍या क्रमांकाची पोस्ट त्या-त्या ठिकाणी नोंदवायला हरकत नाही.

अजून काही मदत लागल्यास, इथे लिहा/ ईमेल करा किंवा विकिपीडियावर लिहा, विकिपीडिया आपलाच आहे. Happy

मायबोलीकरांपैकी काही जणांनी उत्साह दाखवत सहभाग घ्यायला सुरुवातही केली आहे. स्वाती, श्यामली, क्षिप्रा टुमणे यांनी मराठी विकिपीडियावर गेल्या दोनेक दिवसांत साइनप केले आहे. काल दिवसभरात क्षिप्रा टुमणे यांनी (http://mr.wikipedia.org/wiki/वि. वा. शिरवाडकर) या लेखातील त्यांच्या प्रकाशित पुस्तकांच्या सूचीत उपयुक्त माहिती भरून सक्रिय पदार्पणही केले आहे. अन्य मायबोलीकरही लवकरच झळकतील, अशी आशा आहे. Happy

"बघताय काय, सामिल व्हा!" Proud

खास मायबोलीकर सदस्यांसाठी आता सदस्यसाचा मायबोलीकर हा तयार केलेला आहे. तुमच्या सदस्य पानावर {{सदस्यसाचा मायबोलीकर}} असे लिहिले असता, तुम्ही मायबोलीचे सदस्य आहात हे सर्व विकिपीडियनांना कळवता येईल.
पहा - http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4...

गेल्या सप्ताहांताला आयोजित केलेली मराठी विकिपीडियावरील संपादनेथॉन यशस्वीरित्या (खरे तर अपेक्षेहून यशस्वीरित्या) पार पडली. संपादनेथॉनेचा कालावधी २६ व २७ फेब्रुवारी असा दोन दिवसांचा होता, तरीही सर्व आंतरराष्ट्रीय कालविभागांत (म्हणजे किरितिमाती कालविभागात २६ फेब्रुवारी सुरू झाल्यापासून प्रशांत महासागराच्या अतिपश्चिमेकडील कालविभागात, आंतरराष्ट्रीय वाररेखेच्या अलीकडील भागात २७ फेब्रुवारी संपेर्यंत, अशी एकंदर ७२ तास ही मॅरेथॉन चालली. या कालावधीत मराठी विकिपीडियावर प्रतिदिन ७३४.५ दराने संपादने घडली (एरवीची सरासरी सुमारे ५०० संपादने). संपादनेथॉनेचा आढावा आणि कामगिरीचे विश्लेषण येथे नोंदवले आहे :

  1. विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १/आकडेवारी आणि आरंभबिंदू
  2. विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १/आढावा

मायबोलीकरांपैकी क्षिप्रा टुमणे, श्यामली, श्रद्धा, मी आणि अभय नातू अश्या (मला माहीत असलेल्या) मायबोलीकर सदस्यांनी संपादनेथॉनेत सहभाग घेतला. त्यांचा सहभाग असलेल्या लेखांची सूची उद्यापर्यंत गोळा करून इकडे टाकतो.

मायबोलीकरांनी भर घातलेले लेख खालीलप्रमाणे :
* आयन रँड : इंग्लिश भाषेत कादंबर्र्या लिहिणारी लेखिका.
* जेम्स जॉइस : इंग्लिश भाषेत लिहिणारा आयरिश लेखक.
* अळू : वनस्पती Happy
* दोडका : वनस्पती
* गिरीश कुबेर : मराठी पत्रकार, लेखक.
* धनेश : पक्ष्यांमधील एक कुळ (शास्त्रीय कुलनाम : ब्यूसेरोटिडे )
* पडवळ : वनस्पती.
* फलाफल : मध्यपूर्वेतील खाद्यपदार्थ.
* बाळकृष्ण भगवंत बोरकर : मराठी भाषेतील कवी.
* लक्ष्मीकांत तांबोळी : मराठी साहित्यिक.
* सदानंद रेगे : मराठी साहित्यिक.
* षांतोंग : चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील एक प्रांत.
* षान्शी : चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील एक प्रांत.

(आपल्या लोकांच्या सहभागाची सखल म्हणून) जरूर वाचा :). आणि जमलं तर तुमच्याकडूनही मूठमूठ योगदान येऊ द्या. मदतीसाठीची पाने वरच्या काही पोस्टींमध्ये अगोदरच दिली आहेत.