Molecular Gastronomy चा माझा पहिला अनुभव

Submitted by अजय on 21 February, 2011 - 01:44

ऑफीसमधला एक सहकारी म्हणाला, शिकागोला चाललोच आहोत कॉन्फरन्स साठी तर एका "Experience Restaurant" चा अनुभव घ्यायचा का? म्हणजे त्याचं नाव Experience नाही तर एक वेगळा "Experience " देणारे रेस्टॉरंट. आधी आरक्षण करावं लागेल आणि पैसे मजबूत पडू शकतील. मला काहीही माहिती नव्हती पण नवीन काही करायला मी सहसा एका पायावर तयार असतो.

आम्ही चौघेजण आत गेलो. नेहमीसारखं रेस्टॉरंट. म्हणजे तसं पॉश होतं पण तेवढ्यासाठी मी इथे आलो नसतो.

सुरुवातीला मेनू आला. जरा विचित्र जाड कागदावर "छापील" मेनू होता. आम्ही "10 course Dinner" मागितलं. मग वेटरने सांगितलं तो मेनू एका ब्रेडवर छापला होता. म्हणजे मेनू खाऊन तुमच्या जेवणाची सुरुवात करायची.

मग आलं ब्रेकफास्ट म्हणून आम्लेट आणि इंग्लिश मफीन. म्हटलं ही काय फालतूगिरी ! हे खायला का इथे आलो? त्या आम्लेट्चा तुकडा तोडला तर इतकं कागदासारखं हलकं लागलं. आणि खाल्ल्यावर ओळखीची चव होती पण काही समजत नव्हतं. नंतर कळालं एका लसणाच्या पाकळीला फुगवून त्याला आम्लेटचं रूप दिलं होतं. मफीन म्हणजे एका Shrimp ला प्रक्रिया करून , त्यात बुडबुडे आणून त्याला मफीनसारखं केलं होतं

या अगोदर मी फोटो काढायला विसरलो. पण म्हटलं हे काहितरी वेगळंच प्रकरण दिसतंय. तिथे कॅमेरा नेला नव्हता आणि अंधूक प्रकाशात फोनवर फोटोही चांगले आले नाहीत. पण त्यातल्या त्यात जे बरे आले ते इथे टाकतोय.

MG-1.jpg

यातलं जे नळ्यासारखं दिसतंय ते आहे सूप. होय ! या डिशचं नाव होतं Reconstituted Veg Clear Soup.
मधे आहेत त्या भाज्या.
MG-2.jpg

ही पालकाची केलेली क्यूबन सिगार. राख आहे ती तिळाची चटणी

नंतर आले चार आण्याच्या आकाराचे ( American quarters) ४-५ बर्गर. इतक्या छोट्या बन ला ही तीळ लावले होते. पण त्याचा फोटो नीट आला नाही.
MG-3.jpg

हा एक छापील कागद त्या बर्गरबरोबर होता. तो खायचा कागद होता आणि तो बर्गरमधे Tobasco सॉस ऐवजी तिखट म्हणून घालायचा होता. अगदी खणखणीत तिखट होता.

MG-4.jpg

उजव्या भांड्यातले सूप आधी अर्धे प्यायचे आणि मग बाजूच्या भांड्यातला फेस त्यात टाकायचा. तो फेस टाकल्यावर त्या सूपाचा रंग आणि चव एकदम बदलून गेली. दोन्ही चवी मस्त होत्या.

MG-5.jpg
हे होते ग्रीन टी आईस्क्रीम. ते खाल्यावर तोंडात काहीतरी गंमत होतं होती. नंतर कळालं की आधी Liquid Nitrogen मधे बुडवून मधाला घट्ट करून त्या मधाची भुकटी करतात आणि तुम्हाला आईस्क्रीम द्यायच्या आधी ती भुकटी त्यात जोरात फवारतात. त्यामुळे जेंव्हा तुमच्या तोंडात आईस्क्रीम वितळत असते तेंव्हा, तेंव्हा त्या आईस्क्रीममधे आत मध वित़ळत असतो.

अजूनही काय काय गंमती होत्या पण त्यांचे फोटो नीट आले नाही. उदा. नेहमी आपण कॉफी पितो आणि त्यात बिस्कोटी बुडवून खातो. इथे Liquidized बिस्कोटी होती आणि Liquid Nitrogen मधे बुडवून केलेला घट्ट कॉफीचा गोळा होता ( Coffee Ice-cream नाही).
म्हणे "Here you eat your coffee and drink your biscoti "

Molecular Gastronomy चा हा माझा पहिला अनुभव. याला काहितरी मराठी शब्द सुचला पाहिजे. "रेण्विय आहारशास्त्र" ? शास्त्रीय पाककला जास्त योग्य. पाक "कला" होतीच पण इथे शास्त्रही आलं.

विकिपिडियामधे याबद्दल असलेली माहिती

जगात फक्त काही ठिकाणीच अशी रेस्टॉरंट आहेत. मी गेलो त्यांच नाव मोटो. रेस्टॉरंटच्या वेबसाईटवर जास्त चांगले फोटो आहेत.

---------------------------------------------------------------
अवांतर : यापासून स्फूर्ती घेऊन मी ही काही प्रयोग करायला सुरुवात केली. माझा पहिला प्रयत्न सपशेल फसला (Mango Ravioli ही माझ्या डोक्यातून तयार झालेली कृती असेल म्हणून Happy ). पण दुसर्‍यांदा यशस्वी झालो.
खरे (मांसाहारी)Caviar असे दिसतात.

हे मी केलेले
MG-6.jpg
या Valentines Day ला माझ्या हनीसाठी , हे मी केलेले हनी कॅविआर. पूर्ण शाकाहारी. त्याची पाककृती नंतर कधितरी. यातला प्रत्येक दाणा(अंडे) वेगळा स्वतंत्र तयार केला आहे. एक दाणा साधारण साबुदाण्याएवढा आहे आणि तोंडात टाकल्यावर आतला मध बाहेर पडतो. आईस्क्रीम, पॅनकेक, ओटमील, फ्रेंच टोस्टवर घ्यायला एकदम मस्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त ....... वाचूनच मजा आली.
त्यामुळे जेंव्हा तुमच्या तोंडात आईस्क्रीम वितळत असते तेंव्हा, तेंव्हा त्या आईस्क्रीममधे आत मध वित़ळत असतो.>.>>>> हा अनुभव घ्यायला आवडेल नक्कीच.

मस्त. असे काही प्रकार ट्रॅव्हल अँड लिव्हींग चॅनेलवर दाखवले होते. खाण्याजोगा बल्प वगैरे होता. तिथले कॅव्हियर बीटच्या रसापासून केले होते.
पण हा प्रकार आपल्या इतिहासात होता,
पिस्ते कोरुन त्यापासून केलेली "डाळ" आणि बदाम कोरुन त्यापासून केलेले "तांदूळ", कोबंडीच्या पोटात अंडे शिजवून त्यापासून केलेले "मोती", तांदळाचा प्रत्येक दाणा, अर्धा केशरात बुडवून त्यापासून केलेला "मोत्यापोवळ्याचा" पुलाव. अशी काही वर्णने आढळतात.
एक आग्रहाची सूचना, परत गेलात तर कॅमेरा न्यायला विसरू नका !

मस्त ! इथे काही कुक्सना टिव्हीवर बनवताना पाहिले होते पण अजून खायचा योग आला नाहीये , योग जमवावा लागेल असं दिसतंय . Happy

वाह! तुम्ही तयार केलेले caviar सही दिसतयं एकदम, आता पाकृ पण हवी.

>>मुंबईला हेमंत ओबेरॉय आणि विकी रत्नानी या पद्धतीनं पदार्थ तयार करतात.

चिनूक्सा, माहिती आणि पाकृ येऊ द्या.

हे भलतचं कैतरी दिस्तय
हे खायला माणूस तितकाच दर्दी निष्णात खवय्या हवा Happy
जौदे, आम्ही सध्यातरी "जोशीवर्डेवाल्यावर" समाधान मानुन घेतो Proud

असल्या पाककृतींसाठी वेगळा धागा काढा.. चांगल्या आणि जळलेल्या पाककृतींचे असे ऑलरेडी दोन धागे आहेतच. आता हा एक नवीन धागा काढा.

खूपच आवडलं हे. पहिल्यांदाच ऐकलं याबद्दल. नक्की अनुभव घ्यायला आवडेल.

ते नूडल(!) सूप प्रकार झकासच आहे.

स्वयंपाकात पदार्थ शिजवण्याच्या तापमानात बदल करुनच फक्त हे रेण्विय बदल घडतात कां की काही इतर घटक पदार्थही मिसळतात? यात पदार्थांचे रासायनिक गुणधर्मही बदलतात कां?

हनी कॅव्हिअर लई भारी दिसताहेत. पाककृती येऊद्या लवकर.

वॉव मस्तच. पहिल्यांदाच पाहीलं , ऐकलं !
हो खरच पुढच्या वेळी नक्की कॅमेरा घेऊन जा.

ते हनी कॅव्हिअर एकदम मस्त दिसतय. खरच त्याची रेसिपी द्या.

गुगलवर Molecular Gastronomy सर्च केलं तर अफलातुन फोटो दिसताहेत. मस्तच नविन काहीतरी कळलं!

मस्तच. अमेझिंग. ही कन्सेप्ट पहिल्यांदाच ऐकतेय आणि वाचतेय. मज्जा मज्जा आहे.

चिनूक्स, मुंबईत मिळत? कुठे?

सह्ही!!
मी बरेच दिवसापासून ऐकत होते याबद्द्ल्.. पण मला एक कळले नाही ते हे की इतक्या कमी प्रमाणात खाऊन पोट कसं भरतं? Happy
म्हणजे लसणाच्या एका पाकळीपासून केलेलं ऑम्लेट नेहमीच्या ऑम्लेट इतकं पोटभर होईल का? Uhoh

Pages