Molecular Gastronomy चा माझा पहिला अनुभव

Submitted by अजय on 21 February, 2011 - 01:44

ऑफीसमधला एक सहकारी म्हणाला, शिकागोला चाललोच आहोत कॉन्फरन्स साठी तर एका "Experience Restaurant" चा अनुभव घ्यायचा का? म्हणजे त्याचं नाव Experience नाही तर एक वेगळा "Experience " देणारे रेस्टॉरंट. आधी आरक्षण करावं लागेल आणि पैसे मजबूत पडू शकतील. मला काहीही माहिती नव्हती पण नवीन काही करायला मी सहसा एका पायावर तयार असतो.

आम्ही चौघेजण आत गेलो. नेहमीसारखं रेस्टॉरंट. म्हणजे तसं पॉश होतं पण तेवढ्यासाठी मी इथे आलो नसतो.

सुरुवातीला मेनू आला. जरा विचित्र जाड कागदावर "छापील" मेनू होता. आम्ही "10 course Dinner" मागितलं. मग वेटरने सांगितलं तो मेनू एका ब्रेडवर छापला होता. म्हणजे मेनू खाऊन तुमच्या जेवणाची सुरुवात करायची.

मग आलं ब्रेकफास्ट म्हणून आम्लेट आणि इंग्लिश मफीन. म्हटलं ही काय फालतूगिरी ! हे खायला का इथे आलो? त्या आम्लेट्चा तुकडा तोडला तर इतकं कागदासारखं हलकं लागलं. आणि खाल्ल्यावर ओळखीची चव होती पण काही समजत नव्हतं. नंतर कळालं एका लसणाच्या पाकळीला फुगवून त्याला आम्लेटचं रूप दिलं होतं. मफीन म्हणजे एका Shrimp ला प्रक्रिया करून , त्यात बुडबुडे आणून त्याला मफीनसारखं केलं होतं

या अगोदर मी फोटो काढायला विसरलो. पण म्हटलं हे काहितरी वेगळंच प्रकरण दिसतंय. तिथे कॅमेरा नेला नव्हता आणि अंधूक प्रकाशात फोनवर फोटोही चांगले आले नाहीत. पण त्यातल्या त्यात जे बरे आले ते इथे टाकतोय.

MG-1.jpg

यातलं जे नळ्यासारखं दिसतंय ते आहे सूप. होय ! या डिशचं नाव होतं Reconstituted Veg Clear Soup.
मधे आहेत त्या भाज्या.
MG-2.jpg

ही पालकाची केलेली क्यूबन सिगार. राख आहे ती तिळाची चटणी

नंतर आले चार आण्याच्या आकाराचे ( American quarters) ४-५ बर्गर. इतक्या छोट्या बन ला ही तीळ लावले होते. पण त्याचा फोटो नीट आला नाही.
MG-3.jpg

हा एक छापील कागद त्या बर्गरबरोबर होता. तो खायचा कागद होता आणि तो बर्गरमधे Tobasco सॉस ऐवजी तिखट म्हणून घालायचा होता. अगदी खणखणीत तिखट होता.

MG-4.jpg

उजव्या भांड्यातले सूप आधी अर्धे प्यायचे आणि मग बाजूच्या भांड्यातला फेस त्यात टाकायचा. तो फेस टाकल्यावर त्या सूपाचा रंग आणि चव एकदम बदलून गेली. दोन्ही चवी मस्त होत्या.

MG-5.jpg
हे होते ग्रीन टी आईस्क्रीम. ते खाल्यावर तोंडात काहीतरी गंमत होतं होती. नंतर कळालं की आधी Liquid Nitrogen मधे बुडवून मधाला घट्ट करून त्या मधाची भुकटी करतात आणि तुम्हाला आईस्क्रीम द्यायच्या आधी ती भुकटी त्यात जोरात फवारतात. त्यामुळे जेंव्हा तुमच्या तोंडात आईस्क्रीम वितळत असते तेंव्हा, तेंव्हा त्या आईस्क्रीममधे आत मध वित़ळत असतो.

अजूनही काय काय गंमती होत्या पण त्यांचे फोटो नीट आले नाही. उदा. नेहमी आपण कॉफी पितो आणि त्यात बिस्कोटी बुडवून खातो. इथे Liquidized बिस्कोटी होती आणि Liquid Nitrogen मधे बुडवून केलेला घट्ट कॉफीचा गोळा होता ( Coffee Ice-cream नाही).
म्हणे "Here you eat your coffee and drink your biscoti "

Molecular Gastronomy चा हा माझा पहिला अनुभव. याला काहितरी मराठी शब्द सुचला पाहिजे. "रेण्विय आहारशास्त्र" ? शास्त्रीय पाककला जास्त योग्य. पाक "कला" होतीच पण इथे शास्त्रही आलं.

विकिपिडियामधे याबद्दल असलेली माहिती

जगात फक्त काही ठिकाणीच अशी रेस्टॉरंट आहेत. मी गेलो त्यांच नाव मोटो. रेस्टॉरंटच्या वेबसाईटवर जास्त चांगले फोटो आहेत.

---------------------------------------------------------------
अवांतर : यापासून स्फूर्ती घेऊन मी ही काही प्रयोग करायला सुरुवात केली. माझा पहिला प्रयत्न सपशेल फसला (Mango Ravioli ही माझ्या डोक्यातून तयार झालेली कृती असेल म्हणून Happy ). पण दुसर्‍यांदा यशस्वी झालो.
खरे (मांसाहारी)Caviar असे दिसतात.

हे मी केलेले
MG-6.jpg
या Valentines Day ला माझ्या हनीसाठी , हे मी केलेले हनी कॅविआर. पूर्ण शाकाहारी. त्याची पाककृती नंतर कधितरी. यातला प्रत्येक दाणा(अंडे) वेगळा स्वतंत्र तयार केला आहे. एक दाणा साधारण साबुदाण्याएवढा आहे आणि तोंडात टाकल्यावर आतला मध बाहेर पडतो. आईस्क्रीम, पॅनकेक, ओटमील, फ्रेंच टोस्टवर घ्यायला एकदम मस्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजय सुरेखच प्रकार आहे हा. मजा आली एकुणच बघताना वाचताना. अनुभवताना तर आणखी मजा येईल.

मध्यंतरी जपानमधे एका अशाच रेस्तोरांबद्दल ऐकले होते जिथे सर्व गोष्टी बर्फाच्या असतात. http://en.wikipedia.org/wiki/Ice_hotel असेच अंधेरीत एक हॉटेल आहे म्हणे. जनु बांडेच्या डाय अनादर डे मधेही तसे हॉटेल दाखवले गेले होते. मध्यंतरी माझा एक कलिग क्युबेकला अशाच एका हाटेलात राहुन आला. मला चल म्हणत होता खरतर पण जमु शकले नाही.

अजय, लेख आवडला. फूडनेटवर्कवर एक कार्यक्रम असायचा असे पदार्थ तयार करणार्‍या शेफांचा.

>>पेशन्स संपत गेला तसतसा साइझ बदलत गेला. Lol
स्वाती, लेकाला शाब्बासकी!

अजय, तुमच्या एका कलाकृतीमुळे आमच्यासारखे असंख्य व्यसनी झाले आता दुसर्‍या कलाकृतीमुळे किती होतात ते पहावे लागेल Happy (लाईटली घ्यावे ही नम्र विनंती)

स्वाती, तुझ्या लेकाला दंडवत माझ्याकडून! मस्त आहे सगळे!

अजय एक मॉलीक्युलर गॅस्ट्रॉनॉमी डेमो गटग करायचे का?
अजय आणि ज्यु आंबोळे आहेत डेमो द्यायला.

अदभुत प्रकरण आहे हे. द चा पाय मोडताच येत नाहिये काही केल्या Sad
स्वाती Happy - झक्कास प्रयोग चाललेत!!

अजय, भारीच माहिती.

पण फोटो आणि वर्णन वाचून एक प्रश्न (जो अनेकदा गिळायचा प्रयत्न केला पण .. Happy )
चार आण्याच्या आकाराचे बर्गर, लसणाच्या पाकळीचे ऑमलेट वगैरेंनी पोट कसे भरायचे? की केवळ गंमत म्हणून या रेस्टॉरंट मध्ये जायचे?

देवाSSSSSSSSSS... मला वाचव..

गॅस्ट्रॉनॉमी मधला गॅस्ट्रॉ / गॅस्ट्रो ऐकुन मला हे कोणत्यातरी रोगाचे नाव वाटले होते.

आणि हा धागा तो रोग झालेल्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी.. (जसे मधुमेहाशी लढतांना वगैरे)

आणि "चा माझा पहिला अनुभव वाचुन "माझा साक्षात्कारी हृदयरोगप्रमाणे काहीतरी...

येडीचे मी !!! Lol

(आज चुकुन हा धागा उघडला नसता तर माझे अज्ञान दूर झाले नसते कधीच !!! )

Pages